आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

११ मे, दिवस १३१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १५६१ ते १५७२
“११ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ११ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ११ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५६१ ते १५७२ चे पारायण आपण करणार आहोत.
११ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १०१ ते १२५,
101-11
हा गा राजसूय यागाचिया सभासदी । देखता त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्भाग्य । शब्दी निस्तेजिलासी ॥101॥
त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा ! पांडवांच्या राजसूययज्ञामध्ये सर्व सभासदांच्या समोर, त्रैलोक्यातील समुदाय जमला असतांना, त्या शिशुपालाकडून हजारो अपशब्दांनी तुमचा कसा पाणउतारा केला गेला
102-11
ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपे ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदी चाड ? ॥102॥
तसा घोर अपराध करणार्याशिशुपालाला देखील गोपाळा ! तुम्ही आपल्यात मिळवून घेतले आणि उत्तानपादराजाच्या मुलाला ध्रुवाला काय ध्रुवपदाच्या प्राप्तीची इच्छा होती ?
103-11
तो वना आला याचिलागी । जे बैसावे पितयाचिया उत्संगी । की तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगी । श्लाघ्यु केला 103॥
पित्याच्या मांडीवर बसावे याच उद्देशाने तपश्चर्या करण्याकरिता तो अरण्यात आला होता, पण तुम्ही त्याला चंद्रसूर्यापेक्षाहि श्रेष्ठ केला.
104-11
ऐसा वनवासिया सकळा । देता एकचि तू धसाळा । पुत्रा आळविता अजामिळा । अपणपे देसी ॥104॥
अशा रीतीने तुझ्या करिता वनवास करणार्यांना तूच एक विचार न करता देणारा आहेस. अजामेळ पुत्राला प्रेमाने बोलावित असता तुम्ही त्याला आपलीच प्राप्ति करून दिली.
105-11
जेणे उरी हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना 105
ज्याने तुमच्या वक्षस्थलावर लाथ मारली, त्याच्या चरणाचा ठसा, अजून तुम्ही वक्षस्थलावर धारण केला आहे. अजूनहि आपल्या (शंखासूर या) शत्रूच्या शरीराला (म्हणजे शंखाला) आपण दूर करीत नाहीत.
106-11
ऐसा अपकारिया तुझा उपकारु । तू अपात्रींही परी उदारु । दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥106॥
असे तुम्ही अपकार करणार्यावरहि उपकार करणारे आहांत. दानाला अयोग्य असणार्यावरहि आपण उदार होऊन दान दिले आहे, बळीने सर्व पृथ्वीचे दान केले म्हणून आपण त्याचे द्वाररक्षक झालांत.
107-11
तूते आराधी ना आयके । होती पुंसा बोलावित कौतुके । तिये वैकुंठी तुवा गणिके । सुरवाडु केला ॥107॥
नामस्मरणाने तुझी आराधना करीत नव्हती किंवा तुझे नांव ऐकतहि नव्हती. कौतुकाने राघुला रामकृष्ण म्हणून बोलविण्यास शिकवित होती; पण त्या वेश्येला आपण वैकुंठसुख दिले. (गणिका महानंदा पाळलेल्या राघूला ‘राम कृष्ण हरि’ हे शब्द केवळ बोलण्याला शिकवित होती, त्यात आपण नामस्मरण करून भगवंताची आराधना करावी किंवा राघूच्या मुखातून आपण भगवंताचे नाव ऐकावे असा काही एक उद्देश तिने धरला नव्हता; तरीपण कोणत्याहि निमित्ताने भगवंताचे नाव मुखी आले असता मनुष्य उध्दरला जातो, अशा नामाच्या माहात्म्यामुळे व भगवंताच्या नामांतच रंगून तिची पापप्रवृत्ति बंद पडल्यामुळे, ती तात्काळ उध्दरली गेली. )
108-11
ऐसी पाहूनि वायाणी मिषे । आपणपे देवो लागसी वानिवसे । तो तू का अनारिसे । मजलागी करिसी ॥108॥
असे काही तरी फोल निमित्त पाहून जो तू आपली कौतुकाने प्राप्ति करून दूतोस, तो तू इतका उदार, मी विश्वरूप दाखव म्हटल्यानंतर भलतेच कसे करशील ?
109-11
हा गा दुभतयाचेनि पवाडे । जे जगाचे फेडी सांकडे । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ? ॥109॥
दुभत्याच्या प्रभावाने – म्हणजे इच्छिले ते देण्यास समर्थ असल्यामुळे – जी कामधेनू सर्व जगाचे दुःख नाहीसे करते, त्या कामधेनूचेच वासरू भुकेले राहील काय ?
110-11
म्हणौनि मिया जे विनविले काही । ते देव न दाखविती हे कीर नाही । परी देखावयालागी देई । पात्रता मज ॥110॥
म्हणून मी जे आपल्याला विनंति करून विश्वरूप दाखवा म्हटले, ते आपण दाखविणार नाही असे मुळीच नाही; पण ते विश्वरूप पाहण्याची पात्रता मला द्या.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-11
तुझे विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरी आर्तीचे डोहळे । पुरवी देवा ॥111॥
माझ्या या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप पाहण्याजोगे आहे, असे जर आपणांला वाटत असेल, तर देवा ! माझी विश्वरूपदर्शनाची इच्छा पूर्ण करा.
112-11
ऐसी ठायेठावो विनंती । जव करू सरला सुभद्रापती । तव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥112॥
सुभद्रापती अर्जुन अशी यथायोग्य विनंति जेव्हा करू लागला तेव्हा षड्गुणैश्वर्याचा सार्वभौम राजा – म्हणजे अमर्याद षड्गुणैश्वर्यसंपन्न – जो भगवान श्रीकृष्ण, त्याला धीर धरवला नाही.
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥11. 5॥
113-11
तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळा आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥113॥
कारण भगवान श्रीकृष्ण, कृपारूपी अमृताने वळून आलेला जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा अत्यंत जवळ येऊन ठेपलेला पावसाळा होता किंवा श्रीकृष्ण कोकिळपक्षी होता व अर्जुन वसंतऋतु होता.
114-11
नातरी चंद्रबिंब वाटोळे । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेही वरी प्रेमबळे । उल्लसितु जाहला ॥114॥
किंवा वाटोळे पूर्णबिंब पाहून जसा क्षीरसागर उचंबळतो, त्याप्रमाणे अर्जुनावरील द्विगुणित झालेल्या प्रेमाने भगवान अत्यंत आनंदित झाले.
115-11
मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपे । गाजोनि म्हणितले सकृपे । पार्था देख देख अमुपे । स्वरूपे माझी ॥115॥
मग त्या प्रसन्नचित्ताच्या आवेशाने भगवान श्रीकृष्ण गर्जना करून व दयार्द्र होऊन म्हणाले, अर्जुना ! माझी असंख्य स्वरूपे पहा ! पहा !
116-11
एक विश्वरूप देखावे । ऐसा मनोरथु केला पांडवे । की विश्वरूपमय आघवे । करूनि घातले ॥116॥
एकच विश्वरूप पहावे अशी अर्जुनाने इच्छा केली होती; पण भगवंतांनी सर्व विश्वरूपमय करून टाकले
117-11
बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुले ॥117॥
धन्य आहे हा अमर्याद उदार परमात्मा ! याचकाची इच्छा पूर्ण करण्यास हा सिध्द असतो आणि याचकाच्या मागण्याच्या सहस्रपट देतो किंवा आपले सर्वस्वहि देतो
118-11
अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागी झकविले । लक्ष्मीयेही राहविले । जिव्हार जे ॥118॥
अहो, जे विश्वरूप अत्यंत गुह्य म्हणून शेषाच्या डोळ्यालाहि दिसू दिले नाही, वेदाला कळू दिले नाही व लक्ष्मीलाही ज्यापासून दूर ठेविले
119-11
ते आता प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥119॥
असे विश्वरूप आता त्या धन्य व थोर भाग्यवान अर्जुनासाठी अनेकप्रकारे प्रगट करून, भगवान विश्वरूपदर्शनाचा खटाटोप करीत आहेत
120-11
जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवी स्वप्नीचे आघवे होये । तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला 120॥
जो जागा असलेला पुरूष, पुढे स्वप्नात जातो व तो मग स्वप्नात जेवढे काही दिसते, ते सर्व आपणच होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान, आपणच अनंतब्रह्मांडरूप झाले.
(येथे भगवंताच्या विश्वरूपाने प्रगट होण्यास जो स्वप्नांचा दृष्टांत दिसला, तो एकच पुरुष अनेकरूप कसि होतो हे जीवाला स्वप्न दृष्टांतावरूनच समजत असल्यामुळे दिला आहे.
स्वप्न जसे भ्रमजन्य काल्पनिक खोटे असते, तसे भगवंताचे हे विश्वरूप भ्रमजन्य काल्पनिक खोटे आहे, हे सांगण्याकरितिं दिला नाही. भगवंताचे हे स्वरूप तसे ‘अज्ञानजन्य, काल्पनिक, खोटे असते, तर स्वप्नात जसा मनुष्य, एक मीच अनेकरूपे झालो आहो हे जाणत नाही, तसे भगवंतांनीहि आपले एकवस्तुत्व व अद्वैतत्व जाणले नसते आणि अर्जुनालाहि विश्वरूपदर्शनांत भगवंताचे एक अद्वैतवस्तुत्व अनुभवाला आले नसते व त्याला पाहण्याकरिता दिव्यदृष्टीची अवश्यकता लागली नसती.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-11
ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥121॥
आपल्या मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाचा आकार एकदम लुप्त केला आणि ज्या अज्ञानजन्य स्थूलदृष्टीने भगवंताचे श्रीकृष्णस्वरूप व जगत् निरनिराळे पांचभौतिक स्थूल दिसत होते, त्या स्थूलदृष्टीचा पडदा दूर केला; किंबहुना भगवंताने आपले परमैश्वर्य प्रगट केले.
(स्थूलदृष्टीची जवनिका फेडिली — स्थूल दृष्टि — संपूर्ण नामरूपात्मकदृश्य, नाना, जडविनाशी व पांचभौतिक वस्तुरूप आहे असे समजणे, याला स्थूलदृष्टि म्हणतात. ही स्थूलदृष्टि अज्ञानदशेंत सर्वाच्या ठिकाणी असते.
जवनिका – ही दृष्टि, विश्वरूपाच्या दर्शनाला प्रतिबंधक आहे हे ” जवनिका ” शब्दाने सुचविले आहे. फेडिली – भगवंताने आपल्या सामर्थ्याने ती नाहीशी केली.
122-11
परी हा हे देखेल की नाही । ऐसी सेचि न करी काही । एकसरा म्हणतसे पाही । स्नेहातुर ॥122॥
पण हा अर्जुन हे पाहील किंवा नाही याची भगवंताला आठवण झाली नाही. प्रेमाने उतावीळ होऊन, अर्जुना ! विश्वरूप पहा, असे एकसारखे भगवान म्हणू लागले.
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥11. 5॥
123-11
अर्जुना तुवा एक दावा म्हणितले । आणि तेचि दावू तरी काय दाविले । आता देखे आघवे भरिले । माझ्याचि रूपी ॥123॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस; आणि मी एकच विश्वरूप दाखविले, तर मी आपले पूर्ण विश्वरूप दाखविले असे होणार नाही म्हणून जेवढे काही आहे, ते सर्व माझ्याच रूपाने भरले आहे पहा !
(आता देखे आघवे भरिले । माझ्याचि रूपी — भगवान श्रीकृष्णांनी, आपल्या श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणीच अनंत ब्रह्मांडे दाखविली. अनंत ब्रह्मांडाला आधार असणारे श्रीकृष्णस्वरूप, भक्तांना प्रेमवृत्तिमुळे व इतरांना अज्ञानामुळे एकदेशीय दिसत असले, तरी ते व्यापकच असते. त्याची व्यापकता ज्ञानीभक्त विसरत नसतात. )
124-11
एके कृशे एके स्थूळे । एके ऱ्हस्वे एके विशाळे । पृथुतरे सरळे । अप्रांते एके ॥124॥
एक रोड तर एक स्थूल, एक ठेंगणे तर एक उंच, एक जाड पसरलेले तर एक सरळ, एक अमर्याद.
125-11
एके अनावरे प्रांजळे । सव्यापारे एके निश्चळे । उदासीने स्नेहाळे । तीव्रे एके ॥125॥
एक न आवरण्याजोगें, तर एक सुलभ आहे. एक व्यापार करीत असलेले, तर एक निश्चळ आहे. काही उदासींन रूपे, तर काही प्रेमळ रूपे आहेत व काही तीव्र वाटत आहेत.
दिवस १३१ वा, ११, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५६१ ते १५७२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र.१५६१
लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाही ॥१॥
लटिकाचि दंभ घातला दुकान । चाळविले जन पोटासाठी ॥ध्रु.॥
लटिकेचि केले वेदपारायण । जरि नाही स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिके ते तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळी ॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरी । नाही त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥
तुका म्हणे ऐसी गर्जती पुराणे । शिष्टांची वचने मागिलाही ॥५॥
अर्थ
एखाद्या मनुष्याला हरिकीर्तनच प्रिय नसेल आणि त्याने कितीही ज्ञान संपादन केलेलो असेल, त्याने कितीही ध्यान केलेले असो ते सर्व लटिके म्हणजे खोटे आहे. अशा प्रकारचे दांभिक लोक स्वतःचे पोट भरण्याकरता पारमार्थिक दुकान टाकतात आणि लोकांची फसवणूक करतात. अशा मनुष्याने हरिकथा करत असताना त्याच्या हृदयात जर अष्टसात्विक भाव उत्पन्न होत नसेल तर त्याने कितीही वेद पारायण केले तरी ते व्यर्थच आहे. ज्या मनुष्याला कथेच्या वेळी आळस, निद्रा, झोप येते मनुष्याने कितीही जप-तप असो ते सर्व खोटे आहे. ज्याला हरीचे नाम आवडत नाही, ज्याची खरोखरच चित्तशुद्धी झालेली नाही त्याने आपल्या पारमार्थिकाचे वाटोळे केले आहे असेच जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही सांगतो आहे ते पुराने देखील गर्जून सांगतात आणि मागे झालेले श्रेष्ठ संत देखील हेच सांगतात.
अभंग क्र. १५६२
भूती भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥
ऐसी गर्जती पुराणे । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणे । अनुभवे निर्भर ॥धृपद॥
माझे तुझे हा विकार । निरसता एकंकार । न लगे काही फार । विचाराचि करणे ॥२॥
तुका म्हणे दुजे । हे तो नाही सहजे । संकल्पाच्या काजे । आपे आप वाढले ॥३॥
अर्थ
सर्व भूत मात्रामध्ये, भूत जीवनामध्ये हा भगवंत वसतो आहे असा भगवत भाव सर्वत्र असावा. देव भेदशून्य असून सर्व जगाला अधिष्ठान आहे. वेदवाणी देखील हेच सांगतात आणि पुराने देखील हेच गर्जून सांगताहेत. स्वतःच्या अनुभवाच्या बळावर सर्व संत देखील हेच गर्जुन सांगत आहेत. माझे आणि तुझे हाच विकार नाहीसा झाला की सर्वत्र एकच परमात्मा दिसतो. या वाचून दुसरा विचार करण्याची काहीच गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात मुळातः द्वैत नाहीच जिवाच्या संकल्पनेनेच द्वैत निर्माण होते व त्यामुळे पुढचे आपोआप वाढले जाते.
अभंग क्र. १५६३
नेणे फुंको कान । नाही एकातीचे ज्ञान ॥१॥
तुम्ही आइकाहो संत । माझा सादर वृत्तांत ॥धृपद॥
नाही देखिला तो डोळा । देव दाखवू सकळा ॥२॥
चिंतनाच्या सुखे । तुका म्हणे नेणे दुःखे ॥३॥
अर्थ
कोणाच्या कानात गुरुमंत्र सांगण्याचे मला ज्ञाना नाही आणि एकातात बसून मी ब्रम्ह आहे हे ज्ञान सांगण्याचे तर मी मानत नाही. तरीपण संतजन हो मी जे काही सांगत आहे ते तुम्ही श्रद्धापूर्वक एेका आज पर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिला नाही तो देव आम्ही तुम्हाला दाखवू. तुकाराम महाराज म्हणतात मी हरीचे अखंड नामचिंतन करतो त्यामुळे मी सुखी झालो व त्या सुखा मुळे मला कोणतेही दुःख माहित होत नाही.
अभंग क्र. १५६४
त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावे ॥१॥
मग जैसा तैसा राहे । कव्य पाहे उरले ते ॥धृपद॥
अंतरीचे विषम जाड । येऊ पुढे न दयावे ॥२॥
तुका म्हणे शुद्ध मन । समाधान पाहिजे ॥३॥
अर्थ
तुम्हाला त्याग करायचा असेल तर असा करा की जेणेकरून अहंकार नाहीसा होईल. मग तुम्ही ज्या स्थीतीत आहात त्याच स्थितीत रहा. अहंकार की एकदा नाहीसा झाला की खाली काय उरते ते साक्षी रूपाने पहा. अंतःकरणातील संस्कार पुढे येऊ देऊ नयेत. तुकाराम महाराज म्हणतात तुमचे मन शुद्ध व समाधानी पाहिजेत.
अभंग क्र. १५६५
मातेचिये चित्ती । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥
देह विसरे आपुला । जवळी घेता शीण गेला ॥धृपद॥
दावी प्रेमभाते । आणि अंगावरी चढते ॥२॥
तुका संतापुढे । पायी झोंबे लाडे कोडे ॥३॥
अर्थ
मातेच्या चित्तामध्ये नेहमी बाळाविषयी विचार असतात. बाळाला जवळ घेतले की त्या मातेला आपल्या देहाचा विसर पडतो आणि तिचा सर्व शिण भाग नाहीसा होतो. आईने बालकाला प्रेमाने खाऊ दाखवला किती बालक तिच्या अंगावर लडीवाळपणे चढते. तुकाराम महाराज म्हणतात मी अगदी त्याप्रमाणे संतांचा बालक आहे व संत माझ्या आईप्रमाणे आहेत मी हे संता पुढे लाडाने कोड कौतुकाने त्यांच्यापुढे झोंबतो आहे.
अभंग क्र. १५६६
कोणा पुण्या फळ आले । आजि देखिली पाउले ॥१॥
ऐसे नेणे नारायणा । संती सांभाळिले दीना ॥धृपद॥
कोण लाभकाळ । दीन आजि मंगळ ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभ गा विठ्ठला ॥३॥
अर्थ
आज कोणते माझे असे पुण्य फळाला आले आहे की, मला संतांच्या चरणाचे दर्शन झाले. हे नारायणा मला हे काही समजत नाही कळत नाही परंतू माझ्यासारखा दीनांचा या संतांनी सांभाळ केलाय. आजचा कोणता असा शुभ दिवस आहे की मला संतांच्या चरणदर्शनाचा लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला मला एवढा मोठा लाभ कसा झाला हे तेच तुच मला सांग. ”
अभंग क्र. १५६७
मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥
एकाचिये अंगी दुजियाचा वास । आशा पुढे नाश शुद्ध करी ॥धृपद॥
अधीक फळासी कोठे पावो शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
तुका म्हणे राजहंस ढोरा नावे । काय तया घ्यावे अळंकाराचे ॥३॥
अर्थ
जो मनुष्य आपल्याला मान मिळावा याची इच्छा करतो त्याच्या पदरी अपमान पडतो कारण अभागी मनुष्य कोठेही गेला तरी त्याच्याबरोबर अपयशच असते. एखादयाच्या अंगी एखादा चांगला गुण असला की त्याच्या अंगात एखादा वाईट गुणही असतो आणि अपेक्षेने पुढील नाश होतो हे सिध्द आहे. जास्त फळाची अपेक्षा केली तर ते कुठे लगेच प्राप्त होते आणि वासनेमुळे मनुष्याला भीक मागावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया पशूचे नांव जर राजहंस ठेवले तर त्या अलंकारिक नावाचे त्या पशूला काही उपयोग आहे काय ? ”
अभंग क्र. १५६८
संसारापासूनि कैसे सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो । करिता न सरे अधिक वाढ पाही ।
तृष्णा देशधडी केलो । भक्तीभजनभाव यांसी नाही ठाव । चरणी तुझ्या अंतरलों ।
मागे पुढे रीग न पुरे चि पाहाता । अवघा अवघी वेष्टिलो ॥१॥
आता माझी लाज राखे नारायणा । हीन दीन लीन याचकाची ।
करिता न कळे काही असतील गुण दोष । करी होळी संचिताची ॥धृपद॥
इंद्रिये द्वारे मन धावे सैरे । नांगवे करिता चिंता काही । हात पाय कान मुख लिंगस्थान ।
नेत्रद्वारे घ्राण पाही । जया जैसी सोय तया तैसे होय । क्षण एक स्थिर नाही ।
करिती तडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझे यास काही ॥२॥
शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंते । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।
सोइरी सज्जने बहुते । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपाते ।
तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझी शरणागते ॥३॥
अर्थ
हे ऋषीकेशा या संसारापासून माझी सुटका केव्हा होईल ते मला काही कळत नाही. देवा या भवसागरात मी सुटका होण्यासाठी जो जो प्रयत्न करतोय तो तो मी अधिकच त्यात गुंतत चाललो आहे आणि विषय भोगाच्या आशेने मला देशोधडीला लावले आहे. देवा तुझ्याविषयी भक्तीभाव तुझे भजन हे तर माझ्या ठिकाणी नाहीये त्यामुळे मी तुझ्या चरणाला अंतरलो आहे. या भवसागरात मला अनेक उपाधींनी पूर्णपणे वेढले आहे मला पुढे मागे होण्यासाठी थोडीशीही जागा शिल्लक राहिली नाहीये. हे नारायणा आता तूच माझी लाज राख मी तर सर्व गोष्टींनी हीन आहे दीन आहे म्हणूनच मी तुझ्या ठिकाणी लीन झालो आहे. त्यामुळे देवा माझ्यासारख्या याचकाला आता काय करावे ते कळत नाही माझे काही गुण दोष असतील आणि संचित कर्मे असतील तर ते सर्व तू जाळून टाक. देवा माझे मन इंद्रियाच्या व्दारा सैरावैरा धावत आहे ते काही केल्या ऐकत नाही. देवा माझे हात पाय कान मुख लिंगस्थान नेत्र घ्राण म्हणजे नाक जिकडे वाटेल तिकडे धाव घेत आहेत. एक क्षणभर देखील ते स्थिर राहात नाहीत अशा प्रकारे या इंद्रियांनी माझी ओढ ताण केली आहे व हे असे खोडी करतच राहातात आणि यांच्या पुढे तर माझे काही चालत नाही. माझ्या शरीराशी संबंधीत असलेले पुत्र पत्नी बंधू हे धनलोभी मायावंत लोक, व हे जनलोक मित्र सोयरे सज्जन हे सगळेच असे विविध प्रकारचे घाव डावाचे उपाय करतात प्रसंगी घातपात करण्यासही पुढे मागे पाहात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी तू आमचे कोणत्याही प्रकारे रक्षण कर आम्ही तुला शरण आलेलो आहोत.
अभंग क्र. १५६९
नाम घेता उठाउठी । होय संसारासी तुटी ॥१॥
ऐसा लाभ बांधा गाठी । विठ्ठलपायी पडे मिठी ॥धृपद॥
नामापरते साधन नाही । जे तू करिशी आणिक काही ॥२॥
हाकारोनि सांगे तुका । नाम घेता राहो नका ॥३॥
अर्थ
उठता बसता हरीचे नाम घेतले असता संसाराचा संबंध तुटतो. अशा प्रकारचा महत्वपूर्ण लाभ तुम्ही आपल्या पदरात बांधा की ज्यामुळे विठ्ठलाच्या पायाची मिठी तुम्हाला पडेल. नामावाचून इतर कोणतेही साधन हरी प्राप्तीस नाही मग तू कोणतेही इतर प्रयत्न ककेले तरी ते व्यर्थच होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “याच करता मी सर्वाना हाक मारुन आरोळी देऊन सांगत आहे की, नाम घेतल्यावाचून कोणीही राहू नका. ”
अभंग क्र. १५७०
प्राण समर्पीला आम्ही । आता उशीर का स्वामी ॥१॥
माझे फेडावे उसणे । भार न मना या ॠणे ॥धृपद॥
जाला कंठस्फोट । जवळी पातलो निकट ॥२॥
तुका म्हणे सेवा । कैसी बरी वाटे देवा ॥३॥
अर्थ
हे स्वामी पाडूरंगा आम्ही तुला आमचे प्राण अर्पण केले आहे तरीही आमच्या भेटी करता तुम्ही एवढा उशीर का लावता आहात ? माझ्या सेवेचे उसने ऋण तुमच्याकडे आहे त्याची परतफेड तुम्ही तुमच्या भेटीने करा मनात कोणत्याही प्रकारचा भार राहू देऊ नका. देवा तुम्हाला आळवून आळवून माझा कंठ स्फोट झाला आता मी तुमच्याजवळ येऊन उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही जर आम्हाला भेटच दिली नाही तर तुमची सेवा करणे हे तरी कसे आम्हाला बरे वाटेल ? ”
अभंग क्र. १५७१
येणे मार्गे गेले । त्याचे निसंतान केले ॥१॥
ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥धृपद॥
नागविल्या थाटी । उरो नेदीच लंगोटी ॥२॥
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥
अर्थ
देवा जे या भक्तीमार्गाने गेले त्यांना तुम्ही निसंतान केले आहे. असा हा भक्तीमार्ग अवघड कठीण आहे पण आता हे कोणाला सांगावे ? आतापर्यंत या मार्गातील अनेक भक्तांना देवाने नागविले आहे त्यांच्याजवळ साधी लंगोटी देखील ठेवली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “तोच हा भक्तांचे सर्व काही चोरणारा चोर कटेवर कर ठेवून विटेवर उभा आहे. ”
अभंग क्र. १५७२
जोवरी तोवरी जंबुक करि गर्जना । जव त्या पंचानना देखिले नाही ॥१॥
जोवरी तोवरि सिंधु करि गर्जना । जव त्या अगिस्तब्राम्हणा देखिले नाही ॥धृपद॥
जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी । जव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही ॥२॥
जोवरी तोवरी शत्रुत्वाच्या गोष्टी । जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही ॥३॥
जोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे । जव तुक्याचे दर्शन जाले नाही ॥४॥
अर्थ
जंबूक म्हणजे कोल्हा तोपर्यंतच ओरडत असतो जोपर्यंत तो पंचानन म्हणजे सिंहाला पाहात नाही. समुद्र तोपर्यंतच गर्जना करतो जोपर्यंत तो अगस्ती ऋषींना पाहात नाही. वैराग्याच्या गोष्टी तोपर्यंतच बोलल्या जातात जोपर्यंत सुंदर स्त्री दृष्टीस पडत नाही. शौर्याच्या गोष्टी तोपर्यंतच बोलल्या जातात जोपर्यंत शत्रू समरांगणावर पाहिला जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “या दांभिक लोकांची माळ मुद्रांची भूषणे तोपर्यंतच आहेत जोपर्यंत माझी व त्यांची गाठभेट होत नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















