१२ मे, दिवस १३२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १५७३ ते १५८४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१२ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १२ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १२ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५७३ ते १५८४ चे पारायण आपण करणार आहोत.
१२ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १२६ ते १५०,

126-11
एके घूर्णिते सावधे । असलगे एके अगाधे । एके उदारे अतिबद्धे । क्रुद्धे एके ॥126॥
काही रूपे धुंदीत असलेली, तर काही सावध दिसत आहेत. काही सूक्ष्म दिसतात, तर काही रूपे फार मोठी आहेत. काही रूपे उदार, काही कृपण व काही क्रुध्द आहेत.
127-11
एके शांते सन्मदे । स्तब्धे एके सानंदे । गर्जिते निःशब्दे । सौम्ये एके ॥127॥
काही रूपे शांत दिसत आहेत, तर काही मदयुक्त दिसत आहेत. काही स्तब्ध, काही आनंदयुक्त, काही रूपे गर्जना करीत असलेलीं, तर काहीच्या तोंडून एक शब्दहि निघतांना दिसत नाही व काही अत्यंत सौम्य आहेत.
128-11
एके साभिलाषे विरक्ते । उन्निद्रिते एके निद्रिते । परितुष्टे एके आर्ते । प्रसन्ने एके ॥128॥
काही रूपांचे ठिकाणी अभिलाष दिसून येतो, तर काही निरिच्छ आहेत. काही रूपे जागी, तर काही रूपे निजलेंली, काही रूपे अत्यंत संतोषयुक्त, तर काही रूपे सवासन आहेत व काही प्रसन्न आहेत.
129-11
एके अशस्त्रे सशस्त्रे । एके रौद्रे अतिमित्रे । भयानके एके पवित्रे । लयस्थे एके ॥129॥
काही रूपे शस्ररहित दिसतात, तर काही शस्रसहित दिसतात. काही रूपे अति भयंकर आहेत, तर काही रूपे अत्यंत मित्राप्रमाणे भासतात आणि काही रूपे विक्राळ आहेत तर काही विचित्र आहेत व काही रूपे सर्व वृत्तींचा लय करून समाधिस्थ झालेली दिसत आहेत.
130-11
एके जनलीलाविलासे । एके पालनशीले लालसे । एके संहारके सावेशे । साक्षिभूते एके ॥130॥
काही रूपे प्रजोत्पत्तिरूप लीला करीत आहेत, तर काही रूपांचे ठिकाणी प्रजा पालनाची इच्छा दिसून येते. काहीच्या ठिकाणी सर्व सृष्टीचा संहार करण्याचा आवेश दिसून येतो, तर काही रूपे केवळ साक्षीरूपाने दिसत आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


131-11
एवं नानाविधे परी बहुवसे । आणि दिव्यतेजप्रकाशे । तेवीचि एक{ए}का ऐसे । वर्णेही नव्हे ॥131॥
अशा रितीने नानाप्रकारची अनंत रूपे दिसतात, तरी ती असंख्य आहेत आणि त्या सर्वाचे तेजही अपरिमित आहे. त्याचप्रमाणे त्या सर्व रूपांचे वर्णही एकसारखे नाहीत.
132-11
एके तातले साडेपंधरे । तैसी कपिलवर्णे अपारे । एके सर्वांगी जैसे सेंदुरे । डवरले नभ ॥132॥
तापलेल्या सोन्याप्रमाणे लालसर अशी काही रूपे अमर्याद आहेत व आकाशाला शेंदूर फासावा, त्याप्रमाणे काहीचे सर्वाग शेंदरी रंगाचे आहे.
133-11
एके सावियाचि चुळुकी । जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी । एके अरुणोदयासारिखी । कुंकुमवर्णे ॥133
माणिकांनी जडविलेल्या ब्रह्मांडाप्रमाणे कित्येक स्वाभाविकपणे सुंदर व चमकणारी आहेत. काही रूपे अरूणोदयासारखी कुंकुमवर्णाची आहेत.
134-11
एके शुद्धस्फटिकसोज्वळे । एके इंद्रनीळसुनीळे । एके अंजनवर्णे सकाळे । रक्तवर्णे एके ॥134॥
कित्येक शुध्द स्फटिकाप्रमाणे पांढरी आहेत. कित्येक नीलमण्यासारखी नीलवर्ण आहेत. कित्येक काजळासारखी काळीकुट्ट आहेत, तर कित्येक लाल रंगाची आहेत.
135-11
एके लसत्कांचनसम पिवळी । एके नवजलदश्यामळी । एके चांपेगौरी केवळी । हरिते एके ॥135॥
कित्येक रूपे चमकणार्‍या सोन्यासारखी पिवळी, कित्येक नवमेघाप्रमाणे श्यामवर्ण, कित्येक चाफ्याच्या फुलासारखी गौरवर्ण आहेत व कित्येक केवळ हिरवी आहेत.


136-11
एके तप्तताम्रतांबडी । एके श्वेतचंद्र चोखडी । ऐसी नानावर्णे रूपडी । देखे माझी ॥136॥
कित्येक पातविलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी, तर कित्येक पांढर्‍या चंद्राप्रमाणे पांढरी आहेत. अशा प्रकारे नाना प्रकारच्या वर्णांची माझी रूपे पहा.
137-11
हे जैसे का आनान वर्ण । तैसे आकृतीही अनारिसेपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसी सुंदरे एके ॥137॥
हे जसे नानाप्रकारचे वर्ण आहेत, तसेच आकृतीतही नाना प्रकार आहेत. काही रूपे, अत्यंत सुंदर आहेत की, मदनही लाजेने शरण जाईल.
138-11
एके अतिलावण्यसाकारे । एके स्निग्धवपु मनोहरे । शृंगारश्रियेची भांडारे । उघडिली जैसी ॥138॥
श्रृंगारसंपत्तीची भांडारे उघडल्याप्रमाणे, काही रूपे, अत्यंत सौंदर्य साकार व्हावे, अशी होती, तर काही मनोहर तुकतुकीत शरीराची होती.
139-11
एके पीनावयवमांसाळे । एके शुष्के अति विक्राळे । एके दीर्घकंठे विताळे । विकटे एके ॥139॥
कित्येकांचे अवयव मांसल व पुष्ट आहेत, तर कित्येकांचे देह शुष्क रोड व अती विक्राळ दिसतात. कित्येक देह लांब मान व मोठी डोकी असलेले आहेत, तर कित्येक वाकड्या तिकड्या आकाराचे आहेत.
140-11
एवं नानाविधाकृती । इया पाहता पारु नाही सुभद्रापती । ययाच्या एकेकी अंगप्रांती । देख पा जग ॥140॥
या प्रकारे नानाप्रकारच्या आकृती पाहता, अर्जुना ! अंत सापडणार नाही आणि या एकएकाच्या अवयवावर एक एक जग दिसत आहे, पहा

पश्यादित्यान्वसून्रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥11. 6॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


141-11
जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनी मिठी । देत आहाती ॥141॥
ज्या विश्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी उघडल्या बरोबर सर्व बाराही आदित्यांची उत्पत्ती होते व लावल्याबरोबर त्यांचा लोप होतो.
142-11
वदनींचिया वाफेसवे । होत ज्वाळामय आघवे । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥142॥
तोंडातून निघणार्‍या वाफेबरोबर सर्व ज्वालामयच होऊन जाते व त्यातच अग्नी इत्यादि सर्व वसूंचा समूह दिसू लागतो.
143-11
आणि भ्रूलतांचे शेवट । कोपे मिळो पाहती एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखे ॥143॥
आणि जेथे क्रोधाने भृकुटींचे शेवट एकत्र होऊ पाहत आहेत, तेथे रुद्रगणांचा समूह उत्पन्न होत आहे, पहा.
144-11
पै सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवा । श्रोत्री होती पांडवा । अनेक वायु ॥144॥
माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी, जेथे सौम्यपणाचा थोडा थंडावा दिसेल, तेथे असंख्य अश्विनौ देव उत्पन्न झालेले दिसतील आणि कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न झालेले आहेत, पहा.
145-11
यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांची कुळे । ऐसी अपारे आणि विशाळे । रूपे इये पाही ॥145॥
याप्रमाणे एका एका माझ्या रूपाच्या या लीलेमध्ये अनेक देव, सिध्द यांची कुळे जन्माला येतात. अशी माझी ही अनंत व विशाल रूपे पहा.


146-11
जयाते सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेही आयुष्य थोडे धातयाही परी न सापडे । ठाव जयांचा ॥146॥
ज्या विश्वरूपाचे वर्णन करता करता वेदाची बोबडी वळली, ज्याला पाहण्याकरिता काळाचे आयुष्य अपुरे पडते म्हणजे जेथे काळाचाही अंत होतो व ब्रह्मदेवालाही ज्याचा पत्ता लागत नाही,
147-11
जयाते देवत्रयी कधी नायके । तिये इये प्रत्यक्ष देख अनेके । भोगी आश्चर्याची कवतिके । महासिद्धी ॥147॥
ज्या स्वरूपाची गोष्ट तिन्ही वेदांना देखील ऐकायला कधी मिळत नाही, ती माझी रूपे तू आता प्रत्यक्ष पहा व आश्चर्याचे कौतुक किंवा आनंद हीच कोणी महासिध्दि, तिचे सुख भोग.
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि ॥11. 7॥

148-11
इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळी देखे पा सृष्टी । सुरतरुतळवटी । तृणांकुर जैसे ॥148॥
ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे अंकुर वाढावे, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या रोमरोमांच्या ठिकाणी तुला सृष्टी दिसेल, पहा.
149-11
चंडवाताचेनि प्रकाशे । उडत परमाणु दिसती जैसे । भ्रमत ब्रह्मकटाह तैसे । अवयवसंधी ॥149॥
एखाद्या गवाक्षातून आलेल्या सूर्याच्या किरणात परमाणू उडत असलेले दिसतात, त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयवसंधीत अनेक ब्रह्मांडे फिरत असलेली दिसतील.
150-11
एथ एकैकाचिया प्रदेशी । विश्व देख विस्तारंशी । आणि विश्वाही परौते मानसी । जरी देखावे वर्ते ॥150॥
येथे एका एका अवयवप्रदेशावर सर्व विस्तृत ब्रह्मांडरचना आहे, पहा ! आणि ब्रह्मांडाच्या पलीकडेही पाहण्याची जर इच्छा असेल,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १३२ वा, १२, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५७३ ते १५८४
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १५७३
जोवरी तोवरी शोभतील गारा । जव नाही हिरा प्रकाशला ॥१॥
जोवरी तोवरी शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥२॥
जोवरी तोवरी सांगती संतपणाचिया गोष्टी । जव नाही भेटी तुकयासवे ॥३॥
अर्थ

गारा तोपर्यंतच शोभतील जोपर्यंत हिरा प्रकाशीत होत नाही. छोटे छोटे दिवे तोपर्यंतच शोभून दिसतात जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही. “तुकाराम महाराज म्हणतात, “काही लोक तोपर्यंतच संतसंगतीच्या गोष्टी सांगतील जोपर्यंतच माझी गाठ त्यांच्याशी होत नाही. ”
अभंग क्र. १५७४
धरोनि दोन्ही रूपे पाळणे संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥
जटाजूट एका मुगुट माथा शिरी । कमळापति गौरीहर एक ॥धृपद॥
भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपी ॥२॥
वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणे अळंकार हरीहरा ॥३॥
कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥
तुका म्हणे मज उभयरूपी एक । सारोनि संकल्प शरण आलो ॥५॥
अर्थ

जगाचे पालन आणि संहार करण्याकरता पाडूरंगानेच दोन रुप धारण केले आहे ते म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू भगवान शंकर कोप धरुन संहार करतात तर भगवान विष्णू दयाळूपणाने पालन करतात. एकाच्या डोक्यावर जटा आहे तर एकाच्या डोक्यावर मुकूट आहे एक पार्वतीचा पती आहे तर एक कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. एकाने अंगाला भस्म लावला तर एक लक्ष्मीचा भोग घेत आहे याप्रमाणे भगवान शंकर आणि भगवान श्रीरंग विष्णू हे उभयरुपाने एकच आहेत. एकाच्या गळयात वैजयंती माळ आहे तर एकाच्या गळयात वासुकी दर्पाचा हार आहे. अशा प्रकारे हरी आणि हर यांचे अलंकार आहेत. भगवान शंकराच्या एका हातात नरकपाळ आहे काखेत झोळी आहे आणि ते स्मशानात वास करतात आणि विश्वंभर भगवान विष्णू सर्व जगतामध्ये निवास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही दोघेही एकरुपच आहेत आणि मी सर्व प्रकारचे संकल्पे बाजूला सारुन त्यांना शरण आलो आहे. ”
अभंग क्र. १५७५
उचिताचा भाग होतो राखोनिया । दिसती ते वाया गेले कष्ट ॥१॥
वचनाची काही राहेचि ना रुचि । खळाऐसे वाची कुची जाले ॥धृपद॥
विश्वासाने माझे बुडविले घर । करविला धीर येथवरी ॥२॥
तुका म्हणे एकी थार नाही बुड । कैसे तुह्मी कोड पुरविले ॥३॥
अर्थ

देवा मी तुमची सेवा तुमचे भजन कीर्तन करण्याचा जो उचित भाग मोबदला होता तो राखून ठेवला होता आणि तो मला मिळणार असे मी गृहित धरले होते परंतू आता माझे सर्व कष्ट वाया गेले आहेत असे मला वाटते. देवा तुमचे वचन म्हणजे उध्दार करतो असे होते परंतू तुमचे हे वचन म्हणजे दुष्ट माणसाप्रमाणे खोटे ठरले. देवा तुम्ही मला आज उध्दार करतो उदया उध्दार करतो असे करुन करुन इथपर्यंत धीर धरायला लावला परंतू मी तुमच्यावर विश्वास ठेवला व तुम्ही माझा विश्वासघात करुन माझे घर बुडविले. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता मला कोठेही थारा राहिला नाही आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असे तरी कसे म्हणावे ? ”
अभंग क्र. १५७६
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडे घेऊनि क्रोधे चाले ॥१॥
खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैचा ॥धृपद॥
सेवी भांग आफू तंबाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥
तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥
अर्थ

लांब लांब जटा वाढवून हातात कुबडी घेऊन ठिकठिकाणी भिक्षा मागत फिरतो आणि कोणी भिक्षा दिली नाही तर तेथून क्रोधाने चालता होतो मग अशा गोसाव्यांना परमार्थामध्ये काय लाभ होणार आहे ? याला चांगले चांगले अन्न खाण्याचा छंद लागलेला असतो आणि कोणी जर चांगले अन्न दिले नाही तर तो लोकांना शिव्याशाप देतो मग अशा तपस्व्याला भगवान शंकराचा बोध तरी कसा होणार. अशा माणसांना भांग अफू तंबाखू हे पुष्कळ प्रमाणात सेवन करणे चांगले वाटते आणि त्याच गुंगीत ते नेहमी असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “असा मनुष्य सर्वास्वाने बुडाला आणि त्याला पाडूरंग अंतरला आहे. ”
अभंग क्र. १५७७
अवघी च तीर्थे घडली एकवेळा । चंद्रभागा डोळा देखिलिया ॥१॥
अवघी च पापे गेली दिगंतरी । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥धृपद॥
अवघिया संता एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥२॥
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक । विठ्ठलचि एक देखिलिया ॥३॥
अर्थ

चंद्रभागा एक वेळा जरी डोळयाने पाहिली तरी जगातील सर्व तीर्थे घडल्याचे पुण्य घडते. पृथ्वीवरील वैकुंठ म्हणजे पंढरी व पंढरिला डोळयाने पाहिले की, सर्व पापे नष्ट होतात. एक वेळा पुंडलिकाला दृष्टीने पाहिले तर जगातील सर्व संतांची भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “एक वेळा विठ्ठलाला आत्मतत्वाने जर पाहिले तर जन्माला आल्याचे सार्थक होते. ”
अभंग क्र. १५७८
आम्ही असो निंश्चिंतीने । एक्या गुणे तुमचिया ॥१॥
दुराचारी तरले नामे । घेता प्रेम म्हणोनि ॥धृपद॥
नाही तुम्हा धाव घेता । कृपावंता आळस ॥२॥
तुका म्हणे विसरू काही । तुज वो आई विठ्ठले ॥३॥
अर्थ

देवा तुमच्या केवळ एका गुणामुळेच आम्ही निश्चिंतीने राहातो. तो सद्गुण म्हणजे तुमचे नाम आहे तुमचे नाम घेतल्याने अनेक महापापी दुराचारी तरले आहेत म्हणूनच आम्ही तुमचे नाम प्रेमाने घेत आहोत. हे कृपावंता तुमचे नांव घेतले की तुम्ही कोणत्याही प्रकारचा आळस न करता आमच्याकडे धावत येतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझे आई विठ्ठले तुला मी कसा बरे विसरेन ? ”
अभंग क्र. १५७९
अनुभवे वदे वाणी । अंतर ध्यानी आपुले ॥१॥
कैची चिका दुधचवी । जरी दावी पाढरे ॥धृपद॥
जातीऐसा दावी रंग । बहु जग या नांव ॥२॥
तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोवते आपुलिया ॥३॥
अर्थ

मी जे काही बोलत आहे ते माझ्या अंतरंगातील ध्यान आहे आणि त्याच्याच अनुभवाने मी बोलत आहे. अंतरंगातून आलेला अनुभव आणि नुसता वरवरचे शाब्दिक ज्ञान यामध्ये फरक आहे म्हणजे नुकतीच व्यालेली गाय तिच्या सुरवातीला स्तनातून निघलेला चीक आणि नंतर निघलेले दूध हे दोन्ही जरी पाढरे असले तरी दोघाच्याही चवीमध्ये फरक असतो. अनेक जातीचे लोक असतात ते विविध रंगाचे असतात व विविध गुणधर्माचे असतात व हे सर्व मिळून जे तयार होते त्याचेच नांव जग असते जग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “काजव्याचा प्रकाश हा फक्त त्याच्या ढुंगणाभोवतीच असतो त्याप्रमाणे वरवर शब्दज्ञान हे फक्त मर्यादापुरतेच असते आणि अंत:करणापासून आलेला अनुभव हा जगमान्य असतो. ”
अभंग क्र. १५८०
परपीडक तो आम्हा दावेदार । विश्वी विश्वंभर म्हणऊनि ॥१॥
दंडू त्यागू बळे नावलोकु डोळा । राखू तो चांडाळा ऐसा दुरि ॥धृपद॥
अनाचार काही न साहे अवगुण । बहु होय मन कासावीस ॥२॥
तुका म्हणे माझी एकविध सेवा । विन्मूख तो देवा वाळी चित्ते ॥३॥
अर्थ

सर्व विश्वामध्ये हा विश्वंभर सामावलेला आहे त्यामुळे एखादयाने जर कोणालाही त्रास दिला तर तो आमचा शत्रू आहे. आम्ही त्याला बळाने दंड करु त्याचा त्याग करु त्याचे तोंड आम्ही डोळयाने पाहाणार देखील नाही आणि त्याचा इतका त्याग करु की, त्याला चांडाळाप्रमाणे दूर ठेवू. अनाचार आणि अवगुण या दोषाने जे वागतात मला ते सहन होत नाही आणि त्यांना पाहिले की, माझे मन प्रचंड कासावीस होते. तुकाराम महाराज म्हणतात की, “माझे देवाविषयी एकविध एकनिष्ठ सेवा आहे आणि जो देवाशी विन्मुख राहातो त्याला मी मनापासून वाळीत टाकले आहे. ”
अभंग क्र. १५८१
काही न मागे कोणासी । तोचि आवडे देवासी ॥१॥
देव तयासी म्हणावे । त्याचे चरणी लीन व्हावे ॥धृपद॥
भूतदया ज्याचे मनी । त्याचे घरी चक्रपाणी ॥२॥
नाही नाही त्यासमान । तुका म्हणे मी जमान ॥३॥
अर्थ

जो कोणत्याही प्रसंगी कोणालाही काहीच मागत नाही तो देवाला आवडतो. त्यालाच देव म्हणावे आणि त्याच्या चरणी लीन व्हावे. ज्याच्या मनामध्ये सर्व भूतमात्रांविषयी दया असते त्याच्याच घरी चक्रपाणी वास्तव्य करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याच्या समान या जगामध्ये दुसरा कोणीच नाही त्याला मी जामीनदार आहे. ”
अभंग क्र. १५८२
नाम उच्चारिता कंठी । पुढे उभा जगजेठी ॥१॥
ऐसे धरोनिया ध्यान । मने करावे चिंतन ॥धृपद॥
ब्रह्मादिका ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥
तुका म्हणे सार घ्यावे । मने हरीरूप पाहावे ॥३॥
अर्थ

आपल्या वाणीने आपल्या कंठाने हरीचे नामोच्चार केले असता तो जगजेठी हरी आपल्या पुढे उभा राहातो. अशा प्रकारचीच भावना मनात धरुन हरीनाम चिंतन करावे. जो देव ब्रम्हादिक देवांच्या लवकर ध्यानी येत नाही तोच देव नामसंकीर्तनाच्या साधनाने सहज साध्य होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व साधनाचे जे सार आहे ते म्हणजे हरीनाम आहे ते हरीनाम आपल्या वाणीने घ्यावे आणि मनाने असा विचार करावा की आपण हरीरुपच झालो आहोत. ”
अभंग क्र. १५८३
आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरी काठी तूचि ॥१॥
आडिले गांजिले पीडिले संसारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥धृपद॥
प्रल्हाद महासंकटी रक्षिला । तुम्ही अपंगिला नानापरी ॥२॥
आपुलेचि अंग तुम्ही वोढविले । त्याचे निवारले महादुःख ॥३॥
तुका म्हणे तुझे कृपे पार नाही । माझे विठाबाई जननीये ॥४॥
अर्थ

हे देवा अडलेल्या लोकांना तूच साहाय्य करतोस आणि आंधळया माणसांच्या हातातील काठी तूच होत असतो त्यांना मार्गदर्शनही तूच करतोस. हे नारायणा जे भक्त अडलेले आहेत पीडलेले आहेत गांजलेले आहेत त्यांचा तूच कैवारी होतोस. देवा तुमचा भक्त प्रल्हाद अनेक प्रकारच्या संकटात महासंकटात सापडला त्याचे रक्षण तुम्ही केले व त्याचा अंगीकार केला. प्रल्हादावर… अनेक प्रकारचे महादु:ख ओढावून आले परंतू तुम्ही ते सर्व दु:ख स्वत:च्या अंगावर ओढून घेतले व त्याच्या सर्व महादु:खाचे निवारण केले. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझे जननी विठाबाई तुझ्या कृपेचा अंत:पार नाही. ”
अभंग क्र. १५८४
तपासी ते मन करू पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥
म्हणोनि कीर्तन आवडले मज । सांडोनिया लाज हेचि करी ॥धृपद॥
पाहाता आगमनिगमाचे ठाव । तेथे नाही भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे येथे नाही वो विकार । नाम एक सार विठोबाचे ॥३॥
अर्थ

तपश्चर्या करावी असे वाटते परंतू माझे मन इंद्रियांची संगत करतात व काम क्रोधादी विकार निर्माण करुन माझा घात करु पाहतात. म्हणूनच मला कीर्तन हे माध्यम आवडले आणि आता सर्व प्रकारची लाज सोडून मी हेच करीत आहे. मी वेदशास्त्र हे पाहिले त्यांचाही शोध करुन पाहिला परंतू त्यांच्यातही मला एकवाक्यता मिळाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा केवळ नाम या साधनेतच मला कोणताही विकार दिसला नाही त्यामुळे विठोबाचे नामच सर्व साधनांचे सार आहे. ”

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading