आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ मे, दिवस १२९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १५३७ ते १५४८
“९ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ९ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
९ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५१ ते ७५,
51-11
मी जगी एक अर्जुनु । ऐसा देही वाहे अभिमानु । आणि कौरवाते इया स्वजनु । आपुले म्हणे ॥51॥
या जगात मी एक कोणी अर्जुन आहे, असा या देहाच्या ठिकाणी मी अभिमान वागवित होतो व हे कौरव माझे सोयरे आहेत असे म्हणत होतो.
52-11
याहीवरी याते मी मारीन । म्हणे तेणे पापे के रिगेन । ऐसे देखत होतो दुःस्वप्न । तो चेवविला प्रभु ॥52॥
यावरहि आणखि मी यांना मारीन, तर त्या पापामुळे माझी काय गति होईल असे खोटेच स्वप्न पाहत होतो; पण भगवंता ! तू मला जागे केलेस.
53-11
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालो लक्ष्मीपती । होतो उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥53॥
हे देवा ! खरी वस्ती सोडून आकाशांतील गंधर्वनगराकडे जायला निघालो. पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो.
54-11
जी किरडू तरी कापडाचे । परी लहरी येत होतिया साचे । ऐसे वाया मरतया जीवाचे । श्रेय तुवा घेतले ॥54॥
खरोखर कापडाचा केलेला साप, पण तो सत्य मानल्यामुळे त्याच्या विषाची बाधा होऊन लहरी येऊ लागल्या होत्या आणि आता मी मरणार अशी व्यर्थ कल्पना करणार्या जीवाला वांचविण्याचे श्रेय तुम्ही घेतले.
55-11
आपुले प्रतिबिंब नेणता । सिंह कुहा घालील देखोनि आता । ऐसा धरिजे तेवी अनंता । राखिले माते ॥55॥
आपलेच प्रतिबिंब आहे असे न जाणता (हा दुसरा सिंह आहे असे जाणून त्याच्याशी लढण्याकरिता आता) हा सिंह उडी टाकतो असे पाहून त्याला मागे जसे धरून ठेवावे, त्याप्रमाणे देवा ! तुम्ही माझे रक्षण केले.
56-11
एऱ्हवी माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारी । जे आताची ️सातांही सागरी एकत्र मिळिजे ॥56॥
नाही तर, पहा देवा ! माझा असा पक्का निश्चय होता की आतांच सातही समुद्र एकत्र मिळून –
57-11
हे जगचि आघवे बुडावे । वरी आकाशहि तुटोनि पडावे । परी झुंजणे न घडावे । गोत्रजेशी मज ॥57॥
सर्व जग बुडो की आकाश तुटून पडो, पण काही झाले तरी आपल्यांच स्वजनांशी लढू नये.
58-11
ऐसिया अहंकाराचिये वाढी । मिया आग्रहजळी दिधली होती बुडी । चांगचि तू जवळा एऱ्हवी काढी । कवणु माते ॥58॥
अशा प्रबळ अहंकाराने मी आग्रहरूपी जळांत बुडी मारून बसलो होतो, पण इतके फार चांगले झाले की तू जवळच होतास, नाही तर कोणी मला त्यातून काढीले असते ?
59-11
नाथिले आपण पा एक मानिले । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविले । थोर पिसे होते लागले । परि राखिले तुम्ही ॥59॥
मी कोणी निराळा नसतांना, मी कोणी एक आहे अशी कल्पना केली आणि माझ्याहून कोणी निराळा नसतांना निराळे मानून त्याला गोत्रज हे नांव ठेवलें. असा विलक्षण भ्रम झाशा होता, पण तू माझे रक्षण केलेस.
60-11
मागा जळत काढिले जोहरी । तै ते देहासीच भय अवधारी । आता हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥60॥
पूर्वी जळत असलेल्या लाक्षागृहांतून आम्हाला वांचविलेस, मात्र त्यावेळी देहालाच भीति होती, पण ही दुसरी लाक्षागृहाची भीति चैतन्यासह देहाला प्राप्त झाली.
(लौकिक अग्नि देहाचा नाश करतो; पण अविवेकरूपी अग्नि चैतन्यासहित देहांच्या नाशाची भीति उत्पनान करतो, असा अर्थ. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-11
दुराग्रह हिरण्याक्षे । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे । मग माहार्णव गवाक्षे । रिघोनि ठेला ॥61॥
मी युध्द करणार नाही, या दुराग्रहरूपी हिरण्याक्षाने माझी बुध्दिरूपी पृथ्वी आपल्या काखेंत घालून अविवेकरूपी समुद्राच्या भगदाडांतून तो पाताळांत जाऊन राहिला होता – (म्हणजे काही झाले तरी मी युध्द करणारच नाही अशा अट्टाहासामुळे माझी बुध्दि विचारहीन होऊन अविवेकाने कौरव हे माझे स्वजन आहेत या मोहात सापडली होती. )
62-11
तेथे तुझेनि गोसावीपणे । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणे । हे दुसरे वराह होणे । पडिले तुज ॥62॥
येथे तुझ्यासारखा समर्थ स्वामी मिळाल्यामुळे, माझी बुध्दि एकदांची विवेकरूपी आपल्या मूळ ठिकाणावर आली. माझ्या बुध्दिचा उध्दार करण्याकरिता तुला दुसर्यांदा हे असे वराह व्हावे लागले.
63-11
ऐसे अपार तुझे केले । एकी वाचा काय मी बोले । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥63॥
देवा ! तुझे असे उपकार मी या एका वाचेने काय सांगणार ? पण एवढे मात्र खरे की तू माझ्या ठिकाणी आपले पंचप्राण अर्पण केले आहेस.
64-11
ते काही न वचेचि वाया । भले यश फावले देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥64॥
देवा ! तू माझ्याकरिता श्रम केलेस, ते काही वाया गेले नाहीत; कारण तू माझा संपूर्ण अज्ञानभ्रम नाहीसा केलास असे थोर यश तुला प्राप्त झाले.
65-11
आजी आनंदसरोवरीची कमळे । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाची राउळे । जयालागी करिती ॥65॥
परमानंदरूपी सरोवरांतील जणू काय कमळेच, असे हे तुझे डोळे, ज्याच्यावर कृपेचे मंदिर करतील-
66-11
हा हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेसी ॥66॥
अशा त्याच्याशी मोहाची किंवा अविवेकाची गाठ पडणे, ही अगदीच दुर्घट गोष्ट कशी असणार ? जो वडवानळ समुद्राचे पाण्याने विझत नाही, त्याला मृगजळाच्या वृष्टीने काय होईल –
67-11
आणि मी तव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारा । घेत आहे चारा । ब्रह्मरसाचा ॥67॥
आणि प्रभो ! कृपासागरा ! मी तर तुमच्या कृपेच्या गाभार्यातच बसून ब्रह्मानंदाचा अस्वाद घेत आहे.
68-11
तेणे माझा जी मोह जाये । एथ विस्मो काही आहे ?तरी उद्धरलो की तुझे पाने शिवतले आहाती ॥68॥
त्यामुळे माझे मोहरूपी अज्ञान नाहीसे झाले त्यात काय आश्चर्य आहे ? पण आपल्या कृपेने माझा उध्दार झाला हे मी आपल्या पायावर हात ठेवून सांगतो.
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥11. 2॥
69-11
पै कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मिया तुजपासोनि महेशा । परिसिले आजी ॥69॥
हे कमळाला आश्रय होणारे ज्याचे डोळे आहेत अशा व कोटी सूर्यांचे तेजाप्रमाणे ज्यांची अंगकांति अशा सर्वेश्वरा ! मी तुझ्यापासून आज ऐकीले.
70-11
इये भूते जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढा प्रकृती । विवंचिली देवे ॥70॥
ही सर्व भूतसृष्टि ज्या प्रकृतिपासून उत्पन्न होते व जी मध्ये पुनः लय पावते, त्या प्रकृतीचे संपूर्ण विवेचन माझ्यासमोर केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-11
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेद 71॥
आणि माझ्या प्रकृतीचे झाडून विवेचन केले तसेंच ज्याचे कीर्तिरूप वस्र पांघरून वेद सवस्र झाला, त्या परमात्म्याची स्वरूपस्थितिहि सांगितली.
72-11
जी शब्दराशी वाढे जिये । का धर्मा{ऐ}शिया रत्नांते विये । ते एथ िचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥72॥
अहोजी महाराज ! शब्दराशीरूप वेदाचा जो एवढा विस्तार झाला आहे व टिकून राहिला आहे किंवा धर्मासारख्या रत्नाला ज्यांनी जो जन्म दिला, तो आपल्या सामर्थ्यरूप पायाचा आश्रय केला म्हणूनच होय.
73-11
ऐसे अगाध माहात्म्य । जे सकळमार्गैकगम्य । जे स्वात्मानुभवरम्य । ते इयापरी दाविले ॥73॥
असे आपले सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे व स्वानुभवालाहि रमविणारे जे तुझे अगाध माहात्म्य मला तुम्ही दाखविले.
74-11
जैसा केरु फिटलिया आभाळी । दिठी रिगे सूर्यमंडळी । का हाते सारूनि बाबुळी । जळ देखिजे ॥74॥
ज्याप्रमाणे आकाशात आलेले ढग निहीसे झाले असता सूर्यमंडलाचे ठिकाणी दृष्टि जाते किंवा हाताने शेवाळ बाजुला सारूणच पाणी पाहता येते.
75-11
नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसे चंदना खेंव देणे घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हाता ॥75॥
किंवा सर्पाचे वेढे दूर केले असताच चंदनाच्या झाडाला मिठी मारता येते अथवा द्रव्यावर बसलेले पिशाच्च पळाले की ते द्रव्य आपल्या हाती येते.
दिवस १२९ वा, ९, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५३७ ते १५४८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १५३७
न सरे भांडार । भरले वेचिता अपार ॥१॥
भरीत्याचे पोट भरे । पुढिलासी पुढे उरे ॥धृपद॥
कारणा पुरता । लाहो आपुलाल्या हिता ॥२॥
तुका म्हणे देवा । पुढे केला चाले हेवा ॥३॥
अर्थ
परमार्थ धनाचे भांडार इतक्या प्रमाणात भरले आहे की त्याची कोणीही कितीही भजनादि, कीर्तनादी साठी वापर केला तरीही ते कधीच संपत नाही. जो याचा वापर करतो त्याचे पोट तर नक्कीच भरते परंतु पुढे जे वापर करणारे आहेत त्यांच्यासाठी ही हे परमार्थिक धन बाकी राहते व त्यामुळे आपले हित होण्यापुरते तरी हे धन मिळवण्याची घाई तुम्ही करा. तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ हे धन मागण्याची इच्छा धारा म्हणजे तुमची मागणी पूर्ण होईल.
अभंग क्र. १५३८
तरी हाव केली अमुप व्यापारे । व्हावे एकसरे धनवंत ॥१॥
जालो हरीदास शूरत्वाच्या नेमे । जाली ठावी वर्मे पुढिलांची ॥धृपद॥
जनावेगळे हे असे अभिनव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे तरी लागलो विल्हेसी । चालतिया दिवसी स्वामी ॠणी ॥३॥
अर्थ
परमार्थामध्ये मी अतिशय धनवान व्हावा यासाठी मी परमार्थाचा मोठा व्यापार करत आहे. शूर शिपायाचा जसा निश्चय असतो त्याप्रमाणे मी ही परमार्थामध्ये हरिदास झालेलो आहे. हरीची प्राप्ती कशी करावी याचे वर्म मला संतांकडून समजले आहे पण हे परमार्थिक धन अलौकिक आहे, सर्वजोणा पेक्षा वेगळे आहे म्हणून ते प्राप्त करून घेण्याकरिता मी माझा जीव बळी दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे परमार्थिक धन प्राप्त करून घेण्यासाठी मी ज्यावेळी तयारीला लागलो त्याच वेळेपासून माझा स्वामी पांडुरंग माझा ऋणी झाला आहे.
अभंग क्र. १५३९
कोण दुजे हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥१॥
तुम्हाविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनी ॥धृपद॥
कोण ऐसे वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥२॥
तुका म्हणे धाव घाली । कोण चाली मनाचे ॥३॥
अर्थ
हे देवा तुला शरण आलेल्या दिन जणांचे दुःख तुझ्या वाचून दुसरे कोण हरणार आहे ? हे जगदीशा त्रैलोक्यामध्ये उदाराचा शिक्का तुझ्या वाचून दुसर्या कोणाला आहे ? देवा तुझ्या वाचून पाप आणि जन्म-मरणाचा ताप दुसरे कोण हरण करणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्ता करिता मनापेक्षा ही वेगाने धाव घेणारा तुमच्या शिवाय दुसरा कोण आहे ?
अभंग क्र. १५४०
ग्रंथाचे ते अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयी ॥१॥
नाही भेद म्हणून भलतेचि आचरे । मोकळा विचरे मनासवे ॥२॥
तुका म्हणे विषा नांव ते अमृत । पापपुण्या भीत नाही नष्ट ॥३॥
अर्थ
दुष्ट लोकांना धार्मिक ग्रंथांचे अर्थ माहीत नाहीत पण ते केवळ विषय भोगण्या करिता असक्त झालेले असतात. असे हे लोक ‘जग एका परमात्मा पासून झाले आहे’ असे म्हणतात पण त्यांच्या मनाला येईल तसे ते वागतात. विधीचे कोणतेही बंधन ते मानत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे दुष्ट लोक जसे विषाला अमृत नांव ठेवले तरी विषाचा मूळ गुणधर्म विष सोडीत नाही त्याप्रमाणे त्यांना चांगले जरी म्हटले तरी ते चांगले होत नाही त्यांना पाप आणि पुण्य समजतच नाही.
अभंग क्र. १५४१
कायावाचामने जाला विष्णुदास । कामक्रोध त्यास बाधीतना ॥१॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचे ॥२॥
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथे ॥३॥
अर्थ
जे काया, वाचा, मनाने खरोखर विष्णुदास झालेले आहेत त्यांच्या चित्तामध्ये काम क्रोध कधीही बाधा करीत नाही. जो आपल्या मालकाचा विश्वास संपादन करतो तो आपल्या मालकावर ही सत्ता गाजवीतो व तो सेवक मालकाचे सर्व ऐश्वर्य देखील भोगण्यास पात्र होतो. तुकाराम महाराज म्हणतात जर आपले चित्त निर्मळ केले तर तेथे गोपाळ येऊन राहत असतो.
अभंग क्र. १५४१
कायावाचामने जाला विष्णुदास । कामक्रोध त्यास बाधीतना ॥१॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचे ॥२॥
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथे ॥३॥
अर्थ
जे काया, वाचा, मनाने खरोखर विष्णुदास झालेले आहेत त्यांच्या चित्तामध्ये काम क्रोध कधीही बाधा करीत नाही. जो आपल्या मालकाचा विश्वास संपादन करतो तो आपल्या मालकावर ही सत्ता गाजवीतो व तो सेवक मालकाचे सर्व ऐश्वर्य देखील भोगण्यास पात्र होतो. तुकाराम महाराज म्हणतात जर आपले चित्त निर्मळ केले तर तेथे गोपाळ येऊन राहत असतो.
अभंग क्र. १५४२
येई गां तू मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काया ॥१॥
याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥धृपद॥
दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥
विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हा ध्यान निरंतर ॥३॥
अर्थ
हे पंढरीच्या मायबाप तू माझ्या भेटीसाठी लवकर ये तुझ्या वाचून सर्व काही व्यर्थ शिण वाटत आहे आणि आता माझी काया म्हणजे शरीर देखील झाले क्षिण आहे. देवा माझी जात हीन आहे, माझी बुद्धिहीन आहे व माझा कर्म देखील हिन आहे त्यामुळे मी सर्व लज्जा सोडून तुला शरण आलो आहे. देवा तुम्हाला दीनानाथ, दीनबंधू, पतितपावन हि नामे शोभून दिसतात आणि तुमची ही ब्रिदे संपूर्ण जगामध्ये गाजलेली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा कटेवर कर ठेवून वीटेवर तू नीट उभा आहेस आणि आम्हाला तुझे हेच रूप आवडते व आम्ही त्याचं रुपाचे नित्य ध्यान करत असतो.
अभंग क्र. १५४३
हरीचे नाम कदाकाळी का रे नये वाचे । म्हणता रामराम तुझ्या बाचे काय वेच ॥१॥
पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ ॥धृपद॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥२॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥
अर्थ
अरे हरीचे नाम कधीकाळी तुझ्या वाचे मध्ये का बरे तुला घेता येत नाही वाचेने राम राम म्हटले तर तुझ्या बापाचे काही खर्च होणार आहे काय ? अरे तू पोटा करता रात्रंदिवस खटपट करतो आणि राम राम जर तुला म्हणायला लावले तर तुझी दातखिळी बसते. द्रव्य मिळण्याच्या आशेने तुला दहाही दिशा काम करण्यासाठी पुरत नाहीत पण कीर्तनाला जाण्या करतात तुझ्या कायची म्हणजे शरीराची माती फार जड होते काय ? तुकाराम महाराज म्हणतात या अशा जीवांना मी काय करू, जो मुखाने राम राम असे म्हणत नाही तो व त्याचे आई-वडील गाढवच आहेत म्हणजे तो गाढवाच्या पोटी जन्माला आला आहे असे समजावे.
अभंग क्र. १५४४
गंगा आली आम्हावरी । संतपाउले साजिरी ॥१॥
तेथे करीन अंघोळी । उडे चरणरज धुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥धृपद॥
पाप पळाले जळाले । भवदुःख दुरावले ॥२॥
तुका म्हणे धन्य जालो । संतसागरी न्हालो ॥३॥
अर्थ
संतांची साजिरी पाऊले म्हणजे गंगा रूप आहेत आणि ती आमच्या जवळ सहजच आले आहेत. ज्या ठिकाणी संतांच्या चरणाची धूळ उडत असते तेथे जाऊन त्या धुळीने मी स्नान करीन. संता जवळ, त्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ व सर्व पर्वकाळ येतात. मी संतांच्या चरणी धुळीने स्नान केले त्यामुळे माझे सर्व पाप पळाले नुसते पळाले नाही तर जळाले सुद्धा व जन्ममरणाचे दुःख नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात मी आज धन्य झालो कारण आज संत सागरामध्ये मी स्नान केले.
अभंग क्र. १५४५
आम्हा सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामे वैष्णव ॥१॥
घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवू काही उरी । ओसरता भरी । तोंडवरी अंबर ॥धृपद॥
वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभेचि विकिले एका । सनकादिका सापडले ॥२॥
धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जी दुबळी । ती आगळी सदैव ॥३॥
माप आपुलेनि हाते । कोणी नाही निवारिते । पैस करूनि चित्ते । घ्यावे हिते आपुलिया ॥४॥
नाही वाटिता सरले । आहे तैसेचि भरले । तुका म्हणे गेले । वायाविण न घेता ॥५॥
अर्थ
पंढरीचा बाजार आमच्याजवळ आहे त्यामुळे आम्हाला सदासर्वकाळ सुखाचा सुकाळ आहे. तेथे वैष्णव राम नाम मुखाने घेण्याकरता नेहमीच सदावीत असतात त्यामुळे आपल्या शक्तीप्रमाणे रामाचे नाम घ्या पुढे काही बाकी ठेवू नका. तुमच्या आयुष्य भर ओसरल्या नंतर तुम्ही वर तोंड करून मराल त्यामुळे तुम्ही उशिर करू नका. पहिली खेप द्वारकेतून निघाली व पुंडलिका करता ती पंढरीमध्ये आली आणि तोच मला पंढरीत आल्या-आल्या पंढरीत विकला गेला व त्यातील थोडा भाग सानकांदिकांना सापडला. ही भूमंडळ धन्य धन्य आहे कारण येथे नामावळी प्रगटली आहे. आणि ज्यांना योगयागादी साधने करणे अशक्य आहे अशा दीनदुबळ्या भक्तांनी हरिनाम रूप नामावळी घेतली आहे व जी भक्त ही नामावळी घेत आहे ती सर्व कायमस्वरूपी सर्वापेक्षा श्रेष्ठ होऊन राहिले आहेत. हरिनामाचे माप तुम्ही आपल्या हाताने मोजा, येथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आपले चित्त व्यापक बनवा आणि हित व्हावे यासाठी हरिनाम रुपी माल लागलेला आहे, तेवढा तुम्ही घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात हा माल आजपर्यंत पुष्कळ भक्तांना वाटला आहे तरीही तो माल जितका वाटला तेवढाच अजूनही शिल्लक आहे ज्यांनी हा हरिनाम रुपी माल घेतला आहे ते वाया गेले नाहीत.
अभंग क्र. १५४६
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळा ॥१॥
तैसे जागे करी चित्ता । काही आपुलिया हिता ॥धृपद॥
विक्षेपिले धन । तेथे गुंतलेसे मन ॥२॥
नाशिवंतासाठी । तुका म्हणे करिसी आटी ॥३॥
अर्थ
एखादा हिशोब चुकला आणि तो हिशोब लवकर लागला नाही तर डोळ्यात तेल घालून तो हिशोब लावण्यात माणसे तल्लीन होतात. त्याचं तल्लीनतेने आपले हित व्हावे याकरिता आपले चित्त जागे करावे. एखाद्या माणसाने जमिनीत धन पुरून ठेवले तर त्याचे पूर्ण चित्त त्या धना जवळ लागलेलो असते त्याप्रमाणे आपले चित्त हरीच्या ठिकाणी तल्लीन करावे. तुकाराम महाराज म्हणतात अरे नाशिवंता साठी तुम्ही किती आटा आटी करतात मग अविनाश हरि साठी प्रयत्न का करत नाहीत ?
अभंग क्र. १५४७
करूनि जतन । कोणा कामा आले धन ॥१॥
ऐसे जाणत जाणता । का रे होतोसी नेणता ॥धृपद॥
प्रिया पुत्र बंधु । नाही तुज यांशी संबंधु ॥२॥
तुका म्हणे एका । हरीविण नाही सखा ॥३॥
अर्थ
जतन करून ठेवलेले धन कोणत्याही मनुष्याच्या मरणानंतर कामी आले आहे काय ? अरे तु हे सर्व जाणत असून देखील न जाणता का होतोस. स्त्री पुत्र आणि बंधू यांच्याशी तुझा काहीही संबंध नाही. तुकाराम महाराज म्हणतात एका हरी वाचून तुझा कोणीही सखा नाही.
अभंग क्र. १५४८
आह्मी देतो हाका । का रे जालासी तू मुका ॥१॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥धृपद॥
आधी करू चौघाचार । मग सांडू भीडभार ॥२॥
तुका म्हणे शेवटी । तुम्हा आम्हा घालू तुटी ॥३॥
अर्थ
देवा आम्ही तुला इतक्या कळवळ्याने हाक मारतो तरीही तू आमच्या हाकेला ” ओ ” का बरे देत नाहीस ? हे नारायणा तू आमच्याशी काही बोलत नाहीस याचा अर्थ तू क्रियाहीन आहेस. आधी आम्ही तुझ्याकडे चार चौघे पाठवून देऊ आणि तुझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू आणि तरीही तू नाही ऐकलेस तर मग आम्ही तुझी कोणतीही भीडभाड ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मग शेवटचा पर्याय अाम्ही वापरू तो म्हणजे तुमचा आणि आमचा संबंधच आम्ही तोडून टाकू.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















