आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३० मे, दिवस १५० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५७६ ते ६०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १७८९ ते १८००
“३० मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३० May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३० मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७८९ ते १८०० चे पारायण आपण करणार आहोत.
३० मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५७६ ते ६००,
576-11
नातरी प्राणाचे सोयरे भेटे । मग जीवे भूतली जिये संकटे । तिये निवेदिता न वाटे । संकोचु काही ॥576॥
किंवा अत्यंत जिवलग सोयर्यांची भेट झाली असता, मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग, त्याला सांगतांना मनात काही संकोच वाटत नाही.
577-11
का उखिते आंगे जीवे । आपणपे दिधले जिया मनोभावे । तिया कांतु मिनलिया न राहवे । हृदय जेवी ॥577
किंवा जिने आपले एकंदर शरीर व प्राण, ज्याला मनोभावाने समर्पण केले, त्या पतीची भेट झाल्यानंतर, आपल्या मनातील गोष्ट सांगितल्यावाचून, ज्याप्रमाणे तिला राहवत नाही.
578-11
तयापरी जी मिया । हे विनविले तुमते गोसाविया । आणि काही एक म्हणावया । कारण असे ॥578॥
त्याप्रमाणे देवा ! मी तुमच्या सलगीने प्रार्थना केली आहे. तसेंच प्रार्थना करण्याचे दुसरे आणखी एक कारण आहे.
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास॥11. 45॥
अर्थ पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भायाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर. ॥11-45॥
579-11
तरी देवेसी सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापे पुरविली । स्नेहाळाचेनि ॥579॥
देवा ! मी तुझ्याशी सलगी करून तुझे विश्वरूप पहाण्याचा हट्ट धरला आणि प्रेमळभक्ताच्या मायबापाने तुवां, तो हट्ट पुरविला.
580-11
सुरतरूंची झाडे । आंगणी लावावी कोडे । देयावे कामधेनुचे पाडे । खेळावया ॥580॥
ज्याप्रमाणे कौतुकाने अंगणात कल्पतरूची झाडे लावावीत किंवा कामधेनुचे वासरू खेळावयाला आणून द्यावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-11
मिया नक्षत्री डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागी आणावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवा ॥581॥
नक्षत्ररूप फाश्यांनी डाव टाकावा व चेंडू खेळण्याकरिता चंद्र द्यावा इत्यादि हट्टासारखाच असलेला माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट, आई तू पूर्णपणे सिध्दिस नेला.
582-11
जिया अमृतलेशालागी सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥582॥
ज्या अमृताचा एक थेंब मिळविण्याकरिता देखील अत्यंत प्रयास पडतात, त्याचा चार महिने सारखा पाऊस पडावा किंवा संपूर्ण पृथ्वीची मशागत करून वाफ्यावाफ्यामध्ये चिंतामणी पेरावेत.
583-11
ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्ही । दाविले जे हरब्रह्मी । नायकिजे कानी ॥583॥
त्याप्रमाणे भगवंता ! मला अत्यंत कृतार्थ केले. माझा तुम्ही पुष्कळ लाड पुरविला आणि जे विश्वरूप दाखविले, ते शंकर, ब्रह्मदेव यांनी कानांनी देखीले ऐकिले नाही.
584-11
मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदा नाही भेटी । ते जिव्हारीची गाठी । मजलागी सोडिली ॥584॥
मग प्रत्यक्ष विश्वरूप पाहण्याची गोष्ट दूरच राहिली. ज्या विश्वरूपाची वेदालाहि भेट घेपां आली नाही, ती ह्रदयातील विश्वरूपाची गांठ, आपण माझ्याकरिता सोडली.
585-11
जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी । माझी जेतुली हौनी । गेली जन्मे ॥585॥
देवा ! कल्पांच्या आरंभापासून या क्षणापर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले,
586-11
तया आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असे पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥586॥
या प्रत्येक जन्मांतील घराघरांचा शोध करून पाहताहि हे विश्वरूप मी पाहिले किंवा ऐकिले असे म्हणणारा कोणी सांपडत नाही.
587-11
बुद्धीचे जाणणे । कही न वचेचि याचेनि आंगणे । हे सादही अंतःकरणे । करवेचिना ॥587॥
तेथे डोळ्यांनी कोणी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची ! किंबहूना हे विश्वरूप करता येत नाही.
588-11
तेथा डोळ्या देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वी । दृष्ट ना श्रुत ॥588॥
तेथे डोळ्यंनी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची ! किंबहूना हे विश्वरूप पूर्वी कोणी पाहिले किंवा ऐकलेहि नाही.
589-11
ते हे विश्वरूप आपुले । तुम्ही मज डोळा दाविले । तरी माझे मन झाले । हृष्ट देवा ॥589॥
ते हे विश्वरूप आपण माझ्या डोळ्याला दाखविले. त्यामुळे मला अत्यंत आनंद झाला.
590-11
परि आता ऐसी चाड जीवी । जे तुजसी गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥590॥
पण अंतःकरणात आता अशी इच्छा आहे की, तुझ्याशी चार गोष्टी कराव्या व तुला अलिंगन देण्याकरिता तुझे सांन्निध्य प्राप्त व्हावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-11
ते याचि रूपी करू म्हणिजे । तरि कोणे एके मुखेसी चावळिजे । आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाही ॥591॥
ह्या सर्व गोष्टी, या विश्वरूपाशी करू म्हटल्यास, तुझ्या या विश्वरूपाला संख्याच नसल्यामुळे कोणत्या एका मुखाशी बोलावे व कोणत्या रूपाला आलिंगन द्यावे ?
592-11
म्हणौनि वारियासवे धावणे । न ठके गगना खेंव देणे । जळकेली खेळणे । समुद्री केउते ? ॥592॥
म्हणून वार्याबरोबर धावणे किंवा आकाशाला आलिंगन देणे शक्य नाही. समुद्रात जलक्रीडा कशी करायची ?
593-11
यालागी जी देवा । एथ िचे भय उपजतसे जीवा । म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हे आता ॥593॥
याकरिता हे देवा ! माझ्या मनात या विश्वरूपाचे भय वाटते; म्हणून माझा हट्ट पुरवा, आता हे विश्वदर्शन पुरे.
594-11
पै चराचर विनोदे पाहिजे । मग तेणे सुखे घरी राहिजे । तैसे चतुर्भुज रूप तुझे । तो विसावा आम्हा ॥594॥
ज्याप्रमाणे कौतुकाने सर्व पृथ्वीचा प्रवास केल्यावर प्रवासाची दगदग नाहीशी करण्याकरिता परत घरी येऊन, सुखाने विश्रांती घ्यावी, त्याप्रमाणे तुझे हे चतुर्भुजरूप आमचा सर्व शीण नाहीसा करणारे आमचे विश्रांतीस्थान आहे.
595-11
आम्ही योगजात अभ्यासावे । तेणे याचि अनुभवा यावे । शास्त्रांते आलोडावे । परि सिद्धांतु तो हाचि ॥595॥
आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी याच चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घ्यावा. सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे, पण शेवटी एका तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयानेच पूर्ण सुखाची प्राप्ती होते, हाच सर्व शास्त्रांचा सिध्दान्त आहे.
596-11
आम्ही यजने किजती सकळे । परि तिये फळावी येणेचि फळे । तीर्थे होतु सकळे । याचिलागी ॥596॥
आम्ही नानाप्रकारच्या, सर्व प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान करावे, पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी, हेच असावे. या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्तीकरिता सर्व तीर्थाटन असावे.
597-11
आणीकही काही जे जे । दान पुण्य आम्ही कीजे । तया फळी फळ तुझे । चतुर्भुज रूप ॥597॥
आणिकही काही जी जी दानादिक पुण्ये आम्ही करू त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी.
598-11
ऐसी तेथिची जीवा आवडी । म्हणौनि तेचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगी ॥598॥
अशी तुझ्या चतुर्भुजमूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवड असल्यामुळे, हे तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. ती तळमळ लवकर नाहीशी कर.
599-11
अगा जीवीचे जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होई पूजितया । देवांचिया देवा ॥599॥
हे सर्व अंतःकरणातील जाणणार्या, सर्व जगाला आधार असणार्या व सर्व देवांना पूज्य असणार्या देवाच्या देवा ! माझ्यावर प्रसन्न हो.
किरीटिनं गदिनं चक्रहस्त
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते । 11. 46 ।
अर्थ
किरीट धारण करणारा, गदा धारण करणारा, हातामधे चक्र असणारा अशाच तुला पहाण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन् तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. ॥11-45॥
600-11
कैसे नीलोत्पलाते रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥600॥
भगवंताच्या अंगाच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पाहा ! भगवंताच्या अंगाचे तेज इंद्रनील मण्याचे ठिकाणी कशी झांक दाखवीत आहे, पहा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १५० वा, ३०, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७८९ ते १८००
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १७८९
धालो सुखे ढेकर देऊ । उमटे जेवू तोवरी ॥१॥
क्रीडा करू निरांजनी । न पुरे धणी हरीसवे ॥धृपद॥
अवघे खेळो अवघ्यामधी । डाई न पडो ऐसी बुद्धि ॥२॥
तुका म्हणे वांचविता । आम्हा सत्ता समर्थ ॥३॥
अर्थ
ज्ञानामृत सेवनाने आम्ही तृप्त झालो आहोत. आता सुखाने ढेकर देऊ ; आणि देहावर देखील तृप्ततेची लक्षणे उमटतील तोपर्यंत ज्ञानामृताचे जेवण करू. आता एकातात बसून निर्गुण हरीच्या अधिष्ठानावर सगुण हरीबरोबर खेळ करू. हा खेळ कितीही खेळला, तरी तृप्तता होत नाही. या सा-या विश्वात विश्वाशी खेळ खेळू, पण ” जन्म-मरणाच्या डावात सापडणार नाही. ” अशी आम्ही अलिप्त बुद्धी ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, शिवाय, काळापासून आमचे रक्षण करणारा सर्वसत्ताधीश सर्वसमर्थ हरी आहे.
अभंग क्र. १७९०
ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि ॥१॥
उमटे तेव्हा कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥धृपद॥
दुसऱ्या परी एक ऐसा । वजे रिसा निकुरे ही ॥२॥
तुका म्हणे कळत्या कळे । येर खेळे खेळ म्हणो ॥३॥
अर्थ
एकट्यानेच आध्यात्मिक खेळ खेळणे चांगले वाटत नाही त्यामुळेच आम्ही वैष्णवांची संगती धरली. वेगवेगळ्या वाद्यातून वेगवेगळी नाद उमटतात परंतु वाद्यांचे प्रकार कळत नाहीत. या आध्यात्मिक खेळामध्ये पहिला जसा खेळाडू असेल तसाच दुसरा एक खेळाडू असावा नाहीतर बळेच जर एखाद्याला ओढून या खेळामध्ये आणले तर त्यांची जोडी जमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा खेळ ज्याला कळतो त्यालाच कळतो इतर लोकही हा खेळ खेळतात परंतु त्यांच्यावर जन्म मरणाचे डाव लागतात हा खेळ ज्याला खेळता येतो त्यालाच आम्ही खेळाडू म्हणत असतो.
अभंग क्र. १७९१
बोलविले जेणे । तोचि याचे गुह्य जाणे ॥१॥
मी तो काबाडाचा धनी । जेवू मागावे थिंकोनि ॥धृपद॥
मजुराच्या हाते । माप जाले गेले रिते ॥२॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥
मायबापासवे । बाळे कौतुके खेळावे ॥४॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनिया छंदा ॥५॥
त्याच्या साच गाई म्हैसी । येणे खेळावे मातीसी ॥६॥
तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥
अर्थ
ज्या हरीने माझ्या मुखातून हे शब्द बोलवले आहे तोच त्या शब्दाचा अर्थ जाणतो आहे. मला केवळ देवाने निरोप सांगायचे काम सांगितले आहे मी ओझे वाहण्याचा धनी आहे आणि जसे लहान मूल रडते व रडून पडून आईला जेवण मागते त्याप्रमाणे मी देवाला जेवण मागत आहे. मी तर केवळ देवाचा मजूर आहे एकदा की मालकाने सांगीतले की ही वस्तू तिथे नेऊन ठेव की मी केवळ ती वस्तू तिथे नेऊन ठेवणार एकदा ते काम झाले तर मापही मोकळे होते आणि मजूरही मोकळा होतो. माझे सर्व इच्छा पूर्ण करणारा पिता माझा पांडुरंग आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर कौतुकाने खेळ खेळते त्याप्रमाणे आम्ही या हरीबरोबर भक्तीचा खेळ कौतुकाने खेळतो. ज्याप्रमाणे आई वडील जसा धंदा करतात तसा छंद मुलांनाही लागतोच. जसे आई-वडिलांच्या प्रपंचातील गाई म्हशी असतात तसे मुले मातीची गाई म्हशी करून खेळतात. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही बोलत आहे ते मी बोलत नसून प्रत्यक्ष विठ्ठलच बोलतो आहे.
अभंग क्र. १७९२
का हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥
आणीक म्या कोणा पुसावा विचार । मुळी संवसार दुराविला ॥धृपद॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरी । सांगितले करी कारण ते ॥२॥
तुका म्हणे नाही शिकविले जेणे । तो याच्या वचने उगा राहे ॥३॥
अर्थ
हे पांडुरंगा तुम्ही माझी वाणी या अभंग रूपाने का वदवली आहे ? मग याच्यातील खरी कारणे देखील तुम्ही का सांगत नाहीत. देवा आम्ही तर आमचा सर्व संसार समोर दूर टाकून दिला आहे मग आता तुम्हीच आमचे सर्व काही आहात आमच्या काही शंका असतील तर आम्ही तुमच्या वाचून कोणाला विचारावे ? आम्ही तुमची सेवा करतो कारण तुम्ही आमचे स्वामी आहात आणि तुम्ही सांगितलेले कोणतेही कार्य आम्ही पदरात घेतो तुमची आज्ञा आम्ही पदरात घेतो आणि तुम्ही कोणतेही काम सांगितले की आम्ही ते व्यवस्थित पणे करतो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत आम्हाला हा पांडुरंग शिकवत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवून शांत राहू.
अभंग क्र. १७९३
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकाचा धाक न धरावा मनी । निरोपावचनी ढळो नये ॥धृपद॥
समय सांभाळूनि आगळे उत्तर । द्यावे भेदी वज्र तपायरी ॥२॥
तुका म्हणे तरी म्हणावे सेवक । खादले ते हाक अन्न होय ॥३॥
अर्थ
सेवकाला स्वामीची आज्ञा प्रमाण आहे. जोपर्यंत त्याच्या कुडीत प्राण आहे, एवढेच काय पण प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवकाने आज्ञेचे पालन केलेच पाहिजे. स्वामीवाचून इतरांचे भय मनात धरू नये, व स्वामीच्या आज्ञेप्रमाणे वागण्यात अंतर पडू देऊ नये. कदाचित स्वामीकडून धर्म-नीतीविरूध्द आज्ञा करण्याची चूक घडल्यास वेळप्रसंग पाहून एकान्तात त्यांची भेट घ्यावी ; व वज्र ज्याप्रमाणे पर्वताचा भेद करते, त्याप्रमाणे त्यांना मार्मिक उत्तरे द्यावीत ; व त्यांना सन्मार्गावर आणावे. तुकाराम महाराज म्हणतात, इतकी लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतील, त्याने स्वतःला ‘ सेवक ‘ म्हणवून घ्यावे ; व त्याने जे स्वामीचे अन्न खाल्ले असेल, ते त्याच्या ख-या हक्काचे होईल.
अभंग क्र. १७९४
नये पुसो आज्ञा केली एकसरे । आम्हासी दुसरे नाही आता ॥१॥
ज्याचा तो बळिवंत सर्व निवारिता । आम्हा काय चिंता करणे लागे ॥धृपद॥
बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाही एक अंगी तया ॥२॥
तुका म्हणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाही हाती ॥३॥
अर्थ
आम्हाला या पांडुरंगाने आता जी आज्ञा केली आहे त्या आज्ञेचे आम्ही काटेकोर पणाने पालन करू पांडुरंगा वाचून दुसरे आम्हाला काहीही आता प्रमाण नाहीये. हरीच्या आज्ञेचे पालन करत असताना आमच्या वर काही संकट आले तर त्या संकटाचे निवारण हरी करील त्याबद्दल आम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही ? बुद्धीचा जनीता विश्वामध्ये सर्वत्र व्यापून उरणारा असा जो हरि आहे मग त्याच्या अंगामध्ये कोणती ही एक शक्ती नाही सर्वगुणसंपन्न तो असा हरी आहे. तुकाराम महाराज म्हणतात जर माझ्यावर काही संकट आले आणि मी त्याचे निवारण करण्याकरता हरी कडे गेलो आणि हरीने जर मला दूर लोटले तर मी असे म्हणेन की हरी च्या हातात काही सत्ता नाही परंतु तसे आज पर्यंत कधी घडले नाही.
अभंग क्र. १७९५
बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥
तेथे मानसाचा कोण आला पाड । उल्लंघोनि जड गेलो आधी ॥धृपद॥
संसाराचे बळी साधिले निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥
तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥
अर्थ
आम्ही बलवंत समर्थ हरीचे दास आहोत त्यामुळे आम्ही ही बलवंत झालो आहोत व त्याच बळाच्या जोरावर आणि कळीकाळाला देखील कास घातली आहे. मग तेथे सर्वसामान्य माणसाचा तरी काय पाड आहे आम्ही जडाला देखील उल्लंघुन गेलो आहोत. आम्ही संसाराचा बळी देऊन हरी रूप आणि ध्यान साधले आहे, काम क्रोध मदमत्सर अहंकार हे दुर्जन आम्ही मारले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही हरीच्याच ठिकाणी ठाव धरला आहे बाकी सर्व आम्ही गवताप्रमाणे मानले आहे.
अभंग क्र. १७९६
एक गावे आह्मी विठोबाचे नाम । आणिकापे काम नाही आता ॥१॥
मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥धृपद॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळ घोष । सेवू ब्रम्हरस आवडीने ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळा मात्रे ॥३॥
अर्थ
आम्ही केवळ एका विठोबाचेच नाम गाणार आहोत आता या ठिकाणी इतर कोणाचेही काहीच काम नाही. कर्माच्या सूक्ष्म वाटा आणि योगाच्या दुस्तर वाटा मोडून राजाचे चतुरंग सैन्य जेवढे बलाढ्य असतेउ तेवढा मोठा मार्ग आम्ही प्रस्तापित केला. आता आम्ही मृदंग, विना, स्वरात लावू व टाळाचा घोष करून ब्रम्ह रस आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात कोणी किती ही महा घातकी असो त्यांनी हरीचे नाम श्रद्धेने घेतले तर त्याचे हित व तो जिवनमुक्त तात्काळ होतात.
अभंग क्र. १७९७
वाचा चापल्ये बहु जालो कुशळ । नाही बीजमूळ हाता आले ॥१॥
म्हणोनि पंढरिराया दुखी होते मन । अंतरीचे कोण जाणे माझे ॥धृपद॥
पूज्य जालो अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबले ॥२॥
तुका म्हणे खूण न कळेचि निरुती । सापडलो हाती अहंकाराचे ॥३॥
अर्थ
मी परमार्थामध्ये बोलण्यात फार कुशल झालो परंतु परमार्थाचे जे मुळ बीज आहे तेच माझ्या हाती आले नाही. त्यामुळे हे पाढरीराया माझे मन दुःखी होते माझ्या अंतकरणातील तुझ्या वाचून कोणी जाणणारे आहे काय ? देवा परमार्थिक विषयांमध्ये बोलण्याकरता मी फार कुशल झालो त्यामुळे जनमाणसांमध्ये मी पूज्य झालो व त्यामुळे माझ्या अंगी अभिमान निर्माण झाला पण त्याच अभिमानामुळे माझे पुढचे तुझ्या प्राप्तीचे कार्य आहे त्यामध्ये खोळंबा निर्माण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला हरी प्राप्ती करून घेण्याचे खरे वर्म अजूनही कळले नाही परंतु मी अहंकाराच्या हाती सापडलो आहे.
अभंग क्र. १७९८
आता काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाही तरी वाया गेलो दास ॥१॥
जाणता बैसलो दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥धृपद॥
मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हाव ॥२॥
तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आता मज हरी वाट दावी ॥३॥
अर्थ
हे पंढरीराया आता मला या भवसागरातून वरती काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा नाहीतर मी तुमचा दास झालो असून देखील वाया जाईल देवा. मी तर सर्व जाणत असून देखील दगडाच्या नावेत बसलो आहे त्या नावेचा स्वभावच आहे, स्वतःही बुडवावे व दुसऱ्याचाही बुडवून प्राण घ्यावा. इंद्रियांच्या ओढीने जेथे विषय आहेत तेथे धाव घेणे व त्या विषयांकडे धाव घेऊन स्वत:चे पतन करून घेणे हा मनाचा स्वभाव आहे व त्याचीच हाव त्याला होते. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझी गती ही आंधळ्या प्रमाणे झाली आहे आता त्यामुळे तू मला वाट दाखव.
अभंग क्र. १७९९
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकासी ॥१॥
एक गुण तो केला दो ठायी । ज्याचा त्यास पाही जैसा तैसा ॥धृपद॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाही ॥३॥
जातिवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥
हित ते अनहित केले कैसे । तुका म्हणे पिसे लागले यासी ॥५॥
अर्थ
जो वेद-शास्र-पुराणे व संत यांचे शब्द प्रमाण मानतो त्याला ‘ सज्जन ‘ म्हणावे ; आणि जो दुस-याला पीडा देतो त्याला दुर्जन म्हणावे. मुळात एकच सामान्य गुण असतो ; पण तो दोन ठिकाणी विभागला गेला, म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो विशेषत्वाला प्राप्त होऊन त्याच्या हिताला किंवा अनहिताला कारण होतो. जो सात्त्विक आहे, तो दुस-याशी परिमित व सत्य बोलतो, आणि जो वाचाळ आहे, तो आपल्या वाणीने खोटे बोलतो. ज्याच्याकडून परमार्थ घडतो तो चांगला आणि जो नाठाळ असतो त्याला कोणाची दया येत नाही. जो शुध्द जातीचा व शहाणा असतो, तो आपला अधिकार ओळखून मर्यादेने वागतो ; आणि जो अधम आहे, तो आपला अधिकार न जाणता खुंटाप्रमाणे ताठ असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे सद्गुणाने आणि दुर्गुणाने मनुष्याचे अनुक्रमे हित व अनहित होत असते. या मनुष्यदेहात सद्गुणाने हित होणे शक्य असूनही काही लोकांनी दुर्गुणाने अनहित का केले ? या उत्तरने त्यांना वेड लागले आहे.
अभंग क्र. १८००
तुझे नाम मुखी न घेता आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥
हे मज देई हे मज देई । आणिक दुजे काही न मगे तुज ॥धृपद॥
बहिरे कान तुझी कीर्ती नाइकता । पाय न देखता जावोत डोळे ॥३॥
मना तुझे ध्यान नाही नित्य काळ । धिग ते चांडाळ जळो जळो ॥३॥
हातपाय तेणे पंथे न चलता । जावोत अनंता गळोनिया ॥४॥
तुजविण जिणे नाही मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझे ॥५॥
अर्थ
हे हरी ज्यावेळी माझ्या मुखाने तुझे नाम आवडीने घेतले नाही त्याच वेळी माझी जीभ झडून जावो. देवा हेच दान मला दे या पलीकडे दुसरे कोणतेही दान तुला मी मागत नाहीये. देवा मी तुझी कीर्ती माझ्या कानांनी ऐकली नाही तर माझे कान जावो मी बहिरा हवो आणि मी तुझे पाय माझ्या डोळ्याने पाहिले नाही तर माझी दृष्टीच जावो. देवा माझ्या मनाला जर तुझे ध्यान नित्य सर्वकाळ होत नसेल तर त्या मनाचा धिक्कार असो ती चांडाळ आहेत असे समजावे ते जळून जावो. देवा जर माझे हात तुला वंदन करीत नसतील तुझी पूजा करीत नसतील आणि माझे पाय तुझ्या मार्गाने चालत नसतील तर ते दोन्ही ही गळून जावोत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझ्या वाचून जगण्याची मला आवड नाही तुझे नांव नेहमी घ्यावे आणि ते नामच मला नेहमी गोड वाटते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















