आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२९ मे, दिवस १४९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५५१ ते ५७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १७७७ ते १७८८
“२९ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २९ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २९ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १७७७ ते १७८८ चे पारायण आपण करणार आहोत.
२९ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ५५१ ते ५७५,
551-11
देवो बोनयाच्या अवसरी । लोभे कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारी । जे फुगूनचि बैसे ॥551॥
देवा ! तुम्ही जेवणाचे वेळी माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असा, पण मी फुगुनच बसत असे. हा माझा निर्लज्ज गर्व पहा !
552-11
देवाचिया भोगायतनी । खेळता आशंकेना मनी । जी रिगोनिया शयनी । सरिसा पहुडे ॥552॥
देवाच्या अंतःपुरात खेळतांना मनात शंका देखील येत नसे. देवा ! तुझ्या अंथरूणावर तुझ्याबरोबर निजत असे.
553-11
‘कृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणे तूते लेखिजे । आपली आण घालिजे । जाता तुज ॥553॥
‘अरे कृष्णा ! ‘म्हणून तुला हाक मारावी. तू एक यादव आमचा सोयरा आहेस, असे समजावे. तु जायला लागलास की तुला मी आपली आण वाहून ‘जाऊ नकोस’असे म्हणत असे.
554-11
मज एकासनी बैसणे । का तुझा बोलु न मानणे । हे वोतटीचेनि दाटपणे । बहुत घडले ॥554॥
तू बसलेल्या असनावर मी बसणे किंवा तुझे म्हणणेहि न ऐकणे, हे अतिपरिचयामुळे पुष्कळवेळा घडून आले आहे;
555-11
म्हणौनि काय काय आता । निवेदिजेल अनंता । मी राशि आहे समस्ता । अपराधाचि ॥555॥
म्हणून अनंता ! काय काय अपराध सांगूं ?मी सर्व अपराधाची राशीच आहे.
556-11
यालागी पुढा अथवा पाठी । जिये राहटलो बहुवे वोखटी । तिये मायेचिया परी पोटी । सामावी प्रभो ॥556॥
म्हणून प्रत्यक्ष तुमच्यासमोर किंवा तुमच्या पश्चात्, जे काही माझ्याकडून वाईट वागणे झाले, भगवंता ! ते सर्व आईप्रमाणे पोटात घाल.
557-11
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळे । तिये सामाविजेति सिंधुजळे । आन उपायो नाही ॥557॥
देवा ! कोणे एखादे वेळी नद्या गढूळ पाण्याचे प्रवाह घेऊन समुद्राकडे येतात व दुसरा उपायच नसल्यामुळे समुद्र, त्या पाण्याला आपल्यात समावून घेतो.
558-11
तैसी प्रीती का प्रमादे । देवेसी मज विरुद्धे । बोलविली तिये मुकुंदे । उपसाहावी जी ॥558॥
त्याप्रमाणे प्रेमाने असो की प्रमादिने असो, बोलू नये असे, सलगीमुळे सवयीने जे शब्द बोलले गेले असतील, ते सर्व भगवंता पोटात घालावे.
559-11
आणि देवाचेनि क्षमत्वे क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवू ते थोडे ॥559॥
आणि देवाच्या क्षमागुणांमुळे पृथ्वी क्षमा संज्ञेला पात्र झाली, म्हणून ती सर्व भूतसृष्टीला आधार झाली आहे; म्हणून पुरुषोतातमा ! मी काय विनंति करू !
560-11
तरी आता अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधासि ॥560॥
तरी आता प्रमाणाच्या आटोक्यात न येणार्या भगवंता ! मज आपल्या शरणगताला या सर्व अपराधाची क्षमा कर.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥11. 43॥
अर्थ या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य व आद्य असा गुरु आहेस. हे अप्रतिम प्रभावा (ज्याच्या प्रभावाशी तुलना करण्याला योग्य असा दुसर्या कोणाचाही प्रभाव नाही अशा) (स्वर्ग, मृत्यु, पाताळ, या) तिन्ही लोकांमधे देखील तुझ्य़ासारखा दुसरा कोणीही नाही. मग तुझ्याहून अधिक कोठून असणार ? ॥11-43॥
561-11
जी जाणितले मिया साचे । महिमान आता देवाचे । जे देवो होय चराचराचे । जन्मस्थान ॥561॥
अहो जी देवा ! आता मी यथार्थ महिमा जाणला आहे. तू सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्तिस्थान आहेस.
562-11
हरिहरादि समस्ता । देवा तू परम देवता । वेदांतेही पढविता । आदिगुरु तू ॥562॥
हरिहरांदि सर्व देवांची तू परम पूज्य देवता असून, वेदालाहि उपदेश करणारा आद्य व परम गुरु तू आहेस.
563-11
गंभीर तू श्रीरामा । नाना भूतैकसमा । सकळगुणी अप्रतिमा । अद्वितीया ॥563॥
हे श्रीरामा तू अति गंभीर असून, सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी एकसारखा व्यापून आहेस. तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान ऐश्वर्यादि षड्गुण निरतिशय असून तुझ्यावाचून दुसरी वस्तूच नाही.
564-11
तुजसी नाही सरिसे । हे प्रतिपादनचि कायसे ? । तुवा जालेनि आकाशे । सामाविले जग ॥564॥
तुझ्या बरोबरीचे दुसरे काही नाही, हे काय बोलायचें ?आकाशरूप झालेल्या ठिकाणीच संपूर्ण त्रिभुवन सामावले आहे.
565-11
तया तुझेनि पाडे दुजे । ऐसे बोलताचि लाजिजे । तेथ अधिकाची कीजे । गोठी केवी ॥565॥
तुझ्या बरोबरीचे दुसरे आहे, हे म्हणतांच जेथे लाज वाटते, तेंथे तुझ्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे हे कसे म्हणता येईल ?
566-11
म्हणौनि त्रिभुवनी तू एकु । तुजसरिखा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानू ॥566॥
म्हणून या संपूर्ण त्रिभुवनात तूच एक असून, तुझ्यासारखा किंवा तुझ्यापेक्षा अधिक दुसरा कोणी नाही. तुझा अगाध महिमा वर्णन करतांना आमची मति कुंठित होते.
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥11-44॥
अर्थ यास्तव (जगताचा) स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला, मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करवून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस. ॥11-44॥
567-11
ऐसे अर्जुने म्हणितले । मग पुढती दंडवत घातले । तेथे सात्त्विकाचे आले । भरते तया ॥567॥
अर्जुन असे बोलला व भगवंताला पुनः त्याने साष्टांग नमस्कार घातला, तेव्हा त्याला अष्टसात्विकभाव दाटून आले.
568-11
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढी जी अपराध । समुद्रौनि माते ॥568॥
मग अत्यंत गहिंवरून गद् गद् वाणीने भगवंताला म्हणाला, भगवंता ! कृपा कर, कृपा कर व मला या अपराध समुद्रांतून बाहेर काढ.
569-11
तुज विश्वसुहृदाते कही । सोयरेपणे न मनूंचि पाही । तुज विईश्वेश्वराचिया ठायी । ऐश्वर्य केले ॥569॥
तू सर्व ब्रह्मांडाचा अहेतुक कल्याणकर्ता असूनहि, सोयरेपणामुळे आम्ही असे मानित नव्हतो तू सर्व सृष्टीचा चालक, पण आम्हाला ते आश्चर्यकारक वाटत असे.
570-11
तू वर्णनीय परी लोभे । माते वर्णिसी पा सभे । तरि मिया वल्गिजे क्षोभे । अधिकाधिक ॥570॥
तूंच एक सर्वस्वी वर्णन करण्यास योग्य, परंतु सभेमध्ये प्रेमाने तू माझे वर्णन करावे व मी ते पाहून गर्वाने फुगून अधिकच बडबड करीत असे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
571-11
आता ऐसिया अपराधा । मर्यादा नाही मुकुंदा । म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनिया ॥571॥
भगवंता ! आता अशा माझ्या अपराधाला मर्यादाच नाही म्हणून या अपराधाला मर्यादाच नाही म्हणून या अपराधापासून माझे रक्षण कर रक्षण कर.
572-11
जी हेचि विनवावयालागी । कैची योग्यता माझिया आंगी । परी अपत्य जैसे सलगी । बापेसी बोले ॥572॥
माझे इतके असंख्य अपराध आहेत की अपराधापासून माझे रक्षण कर अशी प्रार्थना करण्याचीहि माझ्या अंगी योग्यता राहिली नाही. पण मुलगा जसा बापाशी सलगीने बोलतो तसे मी बोलत आहे.
573-11
पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसे साहिजो जी ॥573॥
पुत्राचे असंख्य अपराध झाले तरी, पिता जसा ते सर्व अपराध दुजाभाव सोडून देऊन सहन करतो, तसे माझे सर्व अपराध, देवा ! सहन कर.
574-11
सख्याचे उद्धत । सखा साहे निवांत । तैसे तुवा समस्त । साहिजो जी ॥574॥
मित्राचा उद्दामपणा, जसा मित्र मनात काही न येऊ देता सहन करतो, त्याप्रमाणे माझे सर्व अपराध तू पोटात घाल.
575-11
प्रियाचिया ठायी सन्मान । प्रिय न पाहे सर्वथा जाण । तेवी उच्छिष्ट काढिले आपण । ते क्षमा कीजो जी ॥575॥
प्रिय, प्रियेच्या ठिकाणी मनाची मुळीच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे आपण राजसूय-यज्ञांत उच्छिष्ट पाने काढलीं, त्याची क्षमा करा.
दिवस १४९ वा, २९, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १७७७ ते १७८८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. १७७७
आणिका छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खाने । आडिके पैके करूनि सायास ।
कृपणे सांचले धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षता । याती तयाचा गुण ।
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥
काय जाले यास वाया का ठकले । हाती सापडले टाकीतसे ।
घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥धृपद॥
सिद्धी सेविले सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिली मोती जन्मले स्वातीचे ।
वरुषले सर्वत्र जळ । कापुस पट नयेचि कारणा । तयास पातला काळ ।
ते चि भुजंगे धरिले कंठी । मा विष जाले त्याची गरळ ॥२॥
भिक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळे । घालुनिया घसा अंगोळिया ।
हाते वांती करू बळे । कुंथावयाची आवडी ओवा । उन्हवणी रडवी बाळे ।
तुका म्हणे जे जैसे करिती । ते पावती तैसीच फळे ॥३॥
अर्थ
काही मनुष्य दुसऱ्याला त्रास देण्याकरता छळवन्याकरता शहाणे झाले आहेत आणि परंतु ते स्वहिताचा नाश करून घेतात. कंजूस मनुष्याने खूप कष्ट करून पैसा अडका धन साठविले, कुत्र्याला जास्त दूध पाजले तर तो वानटी करून बाहेर टाकतो कारण ते त्याला पचत नाही तो त्याच्या जातीचाच गुण आहे. त्या प्रमाणे तारुण्य अवस्थेत एखांदा अधम मजल्या सारखा वागतो हात पाय कान इत्यादी इंद्रियांचा तो गैरवापर करतो. या लोकांना काय झाले हे लोक का असे वागतात कोणास ठाऊक कारण एवढा अनमोल रत्नासारखा देह आपल्या हातात सापडला आहे त्याचा वापर न करता व्यर्थ टाकून देतात. हे मूर्ख लोक आपल्या इच्छे मुळेच नागवले जातात. सिद्ध मनुष्याने अन्नसेवन केले व त्याचे उष्टे जर एखाद्या अधम मनुष्याने सेवन केले तर त्याच्या योग्यते नुसार त्याला फळ मिळते. ज्यावेळी स्वाती नक्षत्रा मध्ये पाऊस पडतो त्यावेळी शिंपल्यामध्ये मोती जन्म घेतात. परंतु त्याच नक्षत्रातातले पाणी कापसावर पडले तर ते कापसासाठी काळ ठरतात. आणि तेच पाणी सर्पाच्या मुखात पडले तर त्याचे विष तयार होते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या व्यक्तीने उत्तम प्रकारचे अन्न त्यामध्ये तूप साखर खाल्ले आणि त्या बरोबरच सोललेली केळी खाल्ली, आणि घशामध्ये बोटे घालून बळच वानटी करू लागला, कुंथत बसला तर लोकांना वाटतं की त्याचे पोट दुखतेय त्यामुळे लोक त्याला ववा आणि गरम पाणी देतात परंतु असे वागणे काय उपयोग आहे जो जसे कर्म करेल त्याच प्रकारचे फळ त्याला मिळेल.
अभंग क्र. १७७८
तुज दिले आता करी यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥
भागलो दातारा सीण जाला भारी । आता मज तारी शरणागता ॥धृपद॥
नेणता सोसिली तयाची आटणी । नव्हता ही कोणी काही माझी ॥२॥
वर्म नेणे दिशा हिंडती मोकाट । इंद्रिये सुनाट दाही दिशा ॥३॥
वेरझारीफेरा सिणलो सायासी । आता हृषीकेशी अंगिकारी ॥४॥
तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धावे यासी काई करू आता ॥५॥
अर्थ
देवा मी तुला माझा जीव भाव काया-वाचा-मन सर्व काही अर्पण केले आहे तुच प्रयत्न करून यांचे रक्षण कर. हे दाता मी या भव सागरातील कर्म करून करून फार थकलो आहे या गोष्टीचा मला शीन झाला आहे त्यामुळे मी तुला शरण आलो आहे आता तु मला भवसागरातून तार. माझे येथे कोणीही नसताना मी त्यांच्यासाठी आजपर्यंत खूप अटाआटी केली आहे. देवा मला तुझ्या भक्तीचे खरे वर्म समजले नाही त्यामुळे माझे इंद्रिय आता दाही दिशेला मोकाट फिरत सुटले आहेत. मी या जन्म मरण रुपी फेऱ्यांमध्ये मध्ये खूप शिणलो आहे मला खूप त्रास झाला आहे त्यामुळे हे ऋषिकेशा आता तुम्ही माझा अंगिकार करा. तुकाराम महाराज म्हणतात माझे मन देखील इंद्रियाच्या सोबत विषयाकडे धाव घेत आहेत त्यामुळे हे देवा मी आता काय करू ते तुम्हीच मला सांगा.
अभंग क्र. १७७९
स्वये पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरी । आणीक परी बुडती ॥१॥
जाणे विरळा एक । जाले तेथीचे हे सुख । देखिले बहुतेक । पुसता वाट चुकले ॥धृपद॥
तोचि जाणे सोवळे । शोधी विकल्पाची मुळे । नाचती पाल्हाळे । जे विटाळे कोंडिले ॥२॥
तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी । वेठी आणिक धरियेले ॥३॥
अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वायाविण । ते झांकून बैसती ॥४॥
करणे जयासाठी । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साठी । चित्तवित्तेंवाचूनि ॥५॥
अर्थ
जो स्वतः स्वयंपाक करतो व तोच नंतर म्हणतो की या स्वयंपाकामध्ये काही विष वगैरे तर पडले नाही ? त्याच्या या संशयाच्या सागरांमध्ये जी जेवणासाठी इतर लोक आलेले असतात ते ही बुडतात. हरीचे सुख कशात आहे हे जाणनारा एखादाच असतो. एरवी परमार्था मध्ये तुम्ही हरीचे ज्ञान अनुभवले आहेत काय असे विचारणारे व वाट चुकलेले खूप लोक पाहिले आहेत. सोवळे म्हणजे काय हे केवळ कोण जाणते तर जो आपल्या चित्ता मधून विकल्पाचे मूळ जी अविद्या आहे तिचा शोध करून नाश करतो त्यालाच सोवळे म्हणजे काय माहित असते. आणि जे केवळ वर वर सोवळ्याचे सोंग आणून नाचत असतात तेच खरे, विटाळाने कोंडून गेलेले असतात. जो बाल्य तारुण्य आणि वृद्ध अवस्थेमध्ये आपली बुद्धी जपतो तोच हरित ज्ञानाची संधी साधत असतो. आणि जे संदेहाच्या जाळ्यात अडकतात ते लोक कर्तुत्व आणि वक्तृत्वाचा जाळ्यात अडकतात. सर्वत्र समान बुद्धी ठेवणे व समाधानी राहणे हेच खरे अखंड ध्यान आहे. आणि जे लोक डोळे झाकून ध्यानाला बसण्याचे सोंग करतात त्यांचे असे वागणे व्यर्थं आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे हरी च्या प्राप्ती करता प्रयत्न करत आहेत त्यासाठी वेगळी आटाआटी करायची काहीच गरज नाही. त्या हरीला केवळ चित्त आणि वित्त जरी अर्पण केले तरी तो हरी प्राप्त होतो.
अभंग क्र. १७८०
माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आता तयाच्या ॥१॥
तरि मज कळलासी । नव्हता भेटी जाणीवेसी । एका संपादिसी । मान करिसी येकाचा ॥धृपद॥
तरि हे प्रारब्ध जी गाढे । काही न चले तयापुढे । काय तुज म्या कोंडे । रे साकडे घालावे ॥२॥
भोगाधीपति क्रियमाण । ते तुज नांगवे अजून । तरि का वायाविण । तुज म्या सीण करावा ॥३॥
तुज नव्हता माझे काही । परि मी न संडी भक्तीसोई । हो का भलत्या ठायी । कुळी जन्म भलतैसा ॥४॥
तू भितोसि माझिया दोषा । काही मागणे ते आशा । तुका म्हणे ऐसा । काही न धरी संकोच ॥५॥
अर्थ
हे देवा माझे संचित अतिशय बलवंत आहे हे पाहूनच तु, हे पंढरीनाथा भिऊन पळून जात आहेस की काय ? माझे कोणत्याही प्रकारचे भले न करता. देवा पूर्वी तुझी व माझी भेट नव्हती त्यामुळे तु मला कळत नव्हता परंतु आता तू मला चांगला कळला आहेस. परंतु हे देवा आता मला चांगले समजले आहे की तू स्वतःला पतितपावन म्हणून तुझी ब्रीद सर्वत्र मिरवत आहे व दुसरीकडे माझे संचित कर्म अतिशय बलवंत आहे त्यामुळे माझा उद्धार करता येणार नाहीये असेही सांगत आहेस. ठीक आहे देवा माझे प्रारब्ध बलवंत आहे त्याच्यापुढे तुझे काही ही चालत नाही. असे जर असेल तर मग मी तरी तुला उगाच संकटात का टाकावे कशाला तुला कोड्यात ढकलून द्यावे. हे सर्व भोगाचे भोग घेणाऱ्या देवा माझे क्रियामान अजूनही तुझ्या स्वाधीन होत नाही, तर हे देवा मी तुला व्यर्थच त्रास का द्यावा. देवा तुझ्या चरणी माझे हित होत नसेल तरी काही हरकत नाही पण मी भक्तिमार्ग काही सोडणार नाही. मग माझा जन्म जरी भलत्या कुळात, भलत्या ठिकाणी कोठेही झाला तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या दोषाना भीतोस मी काही मागेन माझी काही अशा अपेक्षा असेल असे तुला वाटत असेल, परंतु देवा तू असा कोणत्याही प्रकारचा संकोच मनामध्ये धरू नकोस.
अभंग क्र. १७८१
लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवाचूनि ॥१॥
तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्ये वीट । तुज दैवे चि लाधली ॥धृपद॥
काय ब्रम्हज्ञान करू कोरडे । रिते मावेचे मापाडे । भेटीविण कुडे । तुझिये अवघे मज वाटे ॥२॥
आत्मिस्थतीचा विचार । काय करू हा उद्धार । न देखता धीर । चतुर्भुज मज नाही ॥३॥
रिद्धीसिद्धी काय करू । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥
तुजवाचूनि काही व्हावे । ऐसे नको माझिया जीवे । तुका म्हणे द्यावे । दरूषन पायाचे ॥५॥
अर्थ
देवा लोकापासून मिळालेला मान देहाला विविध प्रकारचे सुखावणारे साधने संपत्ती व अनेक प्रकारचे भोग, ही सर्व साधने तुझ्या भेटी म्हणजे वाचूनच विटंबनाच आहे, तूझी भेट झाली नाही तर मला दुखच होते. त्यामुळे हे हरी तु मला भेटण्यासाठी लवकर ये असा काय एकाच जागेवर विटेवर उभा ठाकलास ? अरे देवा तु ज्या विटेवर उभा आहेस ना ती विट केवळ आमचा पुण्यामुळे तुला भेटली आहे. देवा तुझ्या भेटी वाचून नुसतेच कोरडे ब्रम्हज्ञान घेऊन तरी काय करू ते म्हणजे एक प्रकारचे मायेचे कोरडे मापच आहे. तुझ्या भेटी वाचुन हे सर्व व्यर्थ आहे असेच मला वाटते. देवा तुझी भेटच झाली नाही तर मग नुसते विचार करून तरी काय करू आणि कदाचित माझा उद्धार झाला तरीही त्याचे मी काय करू ? देवा मला आता तुझे चतुर्भुज रुप पाहिल्याशिवाय धीर धरवत नाही. रिद्धी सिद्धी घेऊन मी काय करू आणि वेदशास्त्र चा विचार करून तरी मला काही उपयोग आहे का ? कारण देवा मला तुझ्या भेटी वाचून या सर्व गोष्टींचा भार वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या भेटीपासून काही प्राप्त व्हावे असे वाटतच नाही केवळ तुमच्या पायाचे दर्शन तुम्ही मला द्यावे.
अभंग क्र. १७८२
तुझा म्हणवून तुज नेणे । ऐसे काय माझे जिणे ॥१॥
तरि मज कवणाचा आधार । करोनिया राहो धीर ॥धृपद॥
काय शब्दाचि ऐकिला । भेटी नव्हता गा विठ्ठला ॥२॥
तुका म्हणे आता । अभय देई पंढरिनाथा ॥३॥
अर्थ
देवा मी स्वतःला तुझा म्हणून घेतो परंतु तुझ्या स्वरूपाचे ज्ञान अजून मला झाले नाही, असे काय माझे जगणे आहे. देवा तुझ्या वाचून मला कोणाचा आधार आहे मी कोणाच्या आधाराने धीर धरून राहू, तूच सांग ? हे विठ्ठला तुझ्या भेटी वाचून केवळ “तू सर्वव्यापी आहेस” असे शब्द मी ऐकले आहे त्याचे काय करावे, पुराणात मी ऐकले आहे तू सर्वव्यापी आहेस पण त्या शब्दाला काय करावे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा आता तू लवकर यावे आणि मलाअभयदान द्यावे.
अभंग क्र. १७८३
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविले ते दाखवी ॥१॥
तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणे तेथे ॥धृपद॥
जनकश्रुतदेवा करी । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरी । कण्या धरी कवतुके ॥२॥
पांडवा अकांती । तेथे पावसी स्मरती । घातले द्रौपदी । यागी बिरडे चोळीचे ॥३॥
करी गोपीचे कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावी ते चि मुख । दृष्टी माझ्या आपुले ॥४॥
तरि तू अनाथाचा दाता । मागतिया शरणागता । तुका म्हणे आता । कोड पुरवी हे माझे ॥५॥
अर्थ
देवा उद्धव, अक्रुर, व्यास, अंबऋषी, रुक्मांगद, प्रल्हाद यांना जे रूप तुम्ही दाखवले आहे तेच रूप मला दाखवा. मी तुझे श्रीमुख व तुझे चरण पुन्हा पुन्हा पाहीन. देवा त्याकरताच माझे मन उतावीळ झाले आहे. हे देवा तु जनक राजा व श्रुतदेव यांच्या घरी एकाच वेळी वास केला त्यावेळी तू श्रुतदेवांच्या हातात हात दिला त्यावेळस तू कसा शोभला होतास. आणि तू विदुराच्या घरी कौतुकाने कन्या खातोस. पांडव ज्यावेळी संकटांमध्ये होते त्यावेळी त्यांनी केवळ तुझे एकदाच स्मरण केले व तू देखील त्यांच्या मदतीस लगेच धावून गेलास. राजसू यज्ञ चालू असताना पंगतीमध्ये द्रौपदी भोजन वाढत होती त्यावेळी तिच्या चोळीचे बिरडे सुटले व हे पाहून दुर्योधन व त्याचे सर्व सहकारी द्रोपदीला हसू लागले त्यावेळी तू तिचे चोळीचे बिरडे बांधले. तू गोकुळामध्ये गोपींचे कौतुक करतो व सर्व गाई गोपाळांना तुझे रूप दाखवून सुख देतोस. आता तेच रूप तू माझ्या दृष्टीला दाखव. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही अनाथांचा नाथ आहात तुम्हाला जे शरण येतात त्यांना तुम्ही काहीही मागितले तरी देता. हे देवा त्यामुळे आता मला तुमचे दर्शन व्हावे एवढीच माझी इच्छा आहे तेवढे तुम्ही पूर्ण करा.
अभंग क्र. १७८४
मागता भिकारी जालो तुझे द्वारी । देई मज हरी कृपादान ॥१॥
प्रेम प्रीति नाम उचित करावे । भावे संचरावे हृदयामाजी ॥धृपद॥
सर्वभावे शरण आलो पांडुरंगा । कृपाळु तू जगामाजी एक ॥२॥
तापत्रये माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥
संबंधी जनवाद पीडलो परोपरी । अंतरलो दुरी तुजसी तेणे ॥४॥
तुका म्हणे आता तुझा शरणागता । करावे सनाथ मायबापा ॥५॥
अर्थ
हे हरी मी तुझ्या दारा मध्ये भीक मागणारा भिकारी म्हणून आलो आहे तरी तुम्ही मला कृपादान द्यावे द्यावा. प्रेम आणि प्रीतीने मी तुझे नाम उच्चार करीन असेच उचित कार्य तुम्ही करावे आणि तुम्ही प्रीतिने माझ्या हृदयामध्ये येऊन संचार करावा. हे पांडुरंगा सर्व जगामध्ये तूच एक कृपाळू आहेस त्यामुळे मी सर्वभावे तुला शरण आलो आहे देवा. देवा त्रिविध तापाने माझे संपूर्ण शरीर तापविले आहे आता त्याला शितल करण्यासाठी केवळ तुझे पायच एक उपाय म्हणून बाकी आहे. देह संबंधी आणि लौकीकाच्या मुळेच मी पदोपदी त्रासलो गेलो व त्या कारणाने तुझ्यापासून मी आतरलो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यामुळे हे मायबापा तुम्ही मला सनाथ करा माझा सांभाळ करा.
अभंग क्र. १७८५
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥१॥
भाव नाही काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानी ॥धृपद॥
नाही चाड देवाची काही । छळणे टोंके तस्करघाई ॥२॥
तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥
अर्थ
जो हरिनामाच मानत नाही मी त्याला मानत नाही त्याच्या वाचाळ शब्दाला कोण किंमत देतो ? त्याच्या अंतकरणात मध्ये देवाविषयी भक्ती भावच नाही तो मनुष्य केवळ ध्यानाला बसल्याचे सोंग करतो आणि ध्यान मुद्रा लावून शांत बसून असतो अगदी बगळा जसा मासा पकडण्यासाठी शांत बसलेला असतो तसा. अशा माणसाला देवाविषयी कसल्याही प्रकारची चाड म्हणजे आवड नसते जसा एखादा चोर रस्त्यामध्ये सुईचे टोक दाखवून एखाद्या मनुष्याचे गाठोडे चोरतो त्याप्रमाणे असे नास्तिक मनुष्य परमार्थाचे केवळ सोंग दाखवतात ते केवळ विषयांचे सुख भोगण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याचा संग काय परंतु त्याच्या अंगाचा स्पर्श, एवढेच नव्हे तर त्याने बोललेले शब्द देखील माझ्या कानी पडू नये.
अभंग क्र. १७८६
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवता गाढे ॥१॥
कैसी भुलली बापुडी । दंबविषयांचे सांकडी ॥धृपद॥
विसरली मरण । त्याची नाही आठवण ॥२॥
देखत देखत पाही । तुका म्हणे आठव नाही ॥३॥
अर्थ
अर्थ:–संसारातील लोकांचे आयुष्य बघता, त्यांचा दिनक्रम बघता दिवसेंदिवस माझी या लोकांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल शंका वाढत चालली आहे. ही बापुडी प्रापंचिक माणसे या दंभगिरीला किती खोलवर भुलतात याचे मला वाईट वाटते, आयुष्य किती गूढ आहे, मायेने किती भरलेले आहे व त्यातून स्वतःहून बाहेर येणे किती कठीण आहे किंबहुना स्वबळावर बाहेर येणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे हे माहित नसल्याने ही बिचारी माणसे येथील दांभिक आयुष्याला भुलत चालली आहेत आणि विषयाच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहेत. अशा या लोकांना मरणाचे स्मरण देखील राहिले नाही उलट माणसाला मरण असते हेच ते विसरली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु रोज लोक मृत्युमुखी पडत आहेत, ह्या ना त्या कारणाने त्यांचा अंत होत आहे व कमावलेले सर्व तसेच टाकून त्यांना जावे लागत आहे हे सर्व ही माणसे रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत परंतु तरीही आयुष्याच्या खऱ्या सत्याचे त्यांना स्मरण नाही किंवा अजूनही कसे होत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.
अभंग क्र. १७८७
माझे मज आता न देखे निरसता । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हती माझी कोणी मी कवणांचा । आर्त मोहो सांडवला ।
तारी मारी करी भलते दातारा । होऊन तुझा आता ठेलो रे ॥१॥
असो माझे कोडे तुज हे साकडे । मी असेन निवाडे सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरी मायबाप ॥धृपद॥
पापपुण्ये श्रुति आटल्या । शास्त्रांस न लागेचि ठाव ।
विधिनिषिधे गोविली पुराणे वेदांसी तो अहंभाव ।
ओंकाराचे मूळ व्यापिले माया । तेथे न धरे च भाव ।
म्हणऊन काबाड सांडिले उपसता । धरिले तुझे चि नांव ॥२॥
तनमनइंद्रिये ठेवूनि राहिलो । सर्व आशा तुझे पायी । तप तीर्थ दान करवू कवणा हाती ।
आधीन ते मज काई । आहिक्ये परत्रे चाड नाही सर्वथा । जन्म सदा मज देही ।
मायामोहपाश करी विष तैसे । तुका म्हणे माझ्याठायी ॥३॥
अर्थ
देवा माझा भ्रम मला घालवता आला नाही त्यामुळे मी तुझा आधार घेतो आहे. आता मी सर्व संसाराचे आस सोडून लौकीक टाकून देऊन जीव भाव तुला अर्पण केला आहे. मी कोणाचाही नव्हतो आणि कोणी माझे नव्हते आता जो व्यर्थ मोह होता मी तो सोडून दिला आहे. हे दातारा आता तु मला तार किंवा मार किंवा काहीही कर पण मी मात्र आता तुझा झालो आहे रे देवा. देवा आता मी माझे साकडे तुझ्यावर घातले आहे तूच माझी कोडे सोडव आणि मी तुझ्याच आधाराने सुखरूप राहणार आहे. ज्या बालकाच्या शिरावर त्याच्या आई बापाचे हात आहेत मग त्याला त्याचे पोट भरण्याची चिंता करण्याची काय गरज ? देवा श्रुती देखील पापपुण्य सांगतच आटल्या व शास्त्राला देखील तुझा ठाव आजुन लागला नाही. विधीने सिद्ध सांगण्यातच पुराने गुंतले आहेत आणि वेद म्हणतो मला तर सर्व माहित आहे या अहंकारातच तो गुंतलेला आहे. ओंकाराचे मूळ ब्रम्ह ते मायेनी व्यापलेले आहे त्यामुळे तेथेही श्रद्धा बसत नाही. त्यामुळेच मी आता बाकीचे सर्व काबाडकष्ट करण्याचे सोडून दिले आहे आणि तुझे नाम कंठात धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझे तन, मन, इंद्रिय सर्व तुझ्या पायी समर्पण केले आहे व माझी तुझ्यापाशीच सर्व आशा आहे. मग आता मी तीर्थ दान कोणाच्या हस्ते करून घेऊ कारण माझे इंद्रिय माझ्या अधीन राहिले नाहीत. मला ही लौकीक सुखाची देखील इच्छा राहिलेली नाही केवळ तुमची सेवा घडावी यासाठी मला तुम्ही कोठेही जन्माला घाला. आणि देवा माझ्या हृदयामध्ये माया, मोह हे सर्व विषाप्रमाणे वाटू द्या.
अभंग क्र. १७८८
नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥
रसना येरा रसा विटे । घेता घोट अधिक हे ॥धृपद॥
आणिका रसे मरण गाठी । येणे तुटी संसारे ॥२॥
तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठला आम्हासी ॥३॥
अर्थ
हरिनाम अतिशय गोड आहे खूप गोड आहे त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. रसना याद्वारे कोणत्याही रसाचा कितीही घोट घेतला कितीही सेवन केले तरी रसना कोणत्याही रसाला कधी ना कधी तरी विटते परंतु हरीचे नामामृत घोट कितीही घेतले तरी रसना विटत नाही अधिकच नामामृताचे घोट घ्यावे असेच वाटते. इतर कोणतेही रस रसने द्वारे घेतले तरी मरण तर येणारच आहे परंतु हरी नामामृत रसना द्वारे सेवन केले तर जन्ममरण रुपी संसार संबंध तुटतो. तुकाराम महाराज म्हणतात आता हे विठ्ठला नाम म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा आहारच झालेला आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















