२२ मे, दिवस १४२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३७६ ते ४०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १६९३ ते १७०४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२२ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २२ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २२ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १६९३ ते १७०४ चे पारायण आपण करणार आहोत.
२२ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी ३७६ ते ४००,

376-11
असो दात दाढांची दाटी । न झांकवे मा दो दो वोठी । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥376॥
हे असो संपूर्ण प्रलयकालच्या शस्रांचे दाट कुंपण लागावे, त्याप्रमाणे तुझ्या मुखातील दांतदाढांची असलेली दाटी दोन्ही ओठांनी झाकली जात नाही.
377-11
जैसे तक्षका विष भरले । हो का जे काळरात्री भूत संचरले । की आग्नेयास्त्र परजिले । वज्राग्नि जैसे ॥377॥
जणु काय विषारी तक्षकाचे ठिकाणी विष भरले, प्रलयकालच्या रात्री भूतांचा संचार झाला किंवा प्रलयाग्नीने पुनः अग्नेयास्र हातात घेतले.
378-11
तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हावरी ॥378॥
त्याप्रमाणे तुझी ही प्रचंड भयंकर मुखे असून त्यातहि पुनः त्यांचा आवेश बाहेर प्रगट होत आहे. असे वाटते की त्यातून आम्हावर मरणरूपी रसांचे लोंढे आले आहेत. चंडा
379-11
संहारसमयींचा निळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोही जै होय मेळु । तै काय एक न जळे ? ॥379॥
देवा ! प्रलयकाळचा भयंकर वायु व महिकल्पाच्या वेळचा प्रलयाग्नि, हे दोन्ही मिळाले असता काय जळणार नाही ?
380-11
तैसी संहारके तुझी मुखे । देखोनि धीरु का आम्हा पारुखे ? । आता भुललो मी दिशा न देखे । आपणपे नेणे ॥380॥
त्याप्रमाणेच तुझी सर्व ब्रह्मांडाचा संहार करणारी मुखे पाहून, धैर्य आम्हाला स्पर्श करील काय ?आता मी भ्रमिष्ट दिङ्मूढ झालो व मला माझेंहि भान राहिले नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

381-11
मोटके विश्वरूप डोळा देखिले । आणि सुखाचे अवर्षण पडिले । आता जापाणी जाणारी । आपुले अस्ताव्यस्त हे ॥381॥
तुझे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले मात्र, तोच सुखाचा दुष्काळ पडला; म्हणून आपले हे अवाढव्य पसरलेले विश्वरूप आता आवरा आवरा.
382-11
ऐसे करिसी म्हणौनि जरी जाणे । तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे । आता एक वेळ वांचवी जी प्राणे । या स्वरूपप्रळयापासोनि ॥382॥
(हे आपले भयंकर विश्वरूप दाखवून आम्हाला) अशाप्रकारे अत्यंत भयभीत करशील असे जर मला माहित असते, तर विश्वरूप दाखवा, असे मी कशाला म्हटले असते ? तरी आता देवा ! एकवेळ प्राणदान देऊन, या माझ्या जीवाच्या होऊ पाहणार्‍या स्वरूपप्रलयापासून -म्हणजे माझी संपूर्ण स्थूळ सूक्ष्मतत्वे अव्यक्तांत मिळू पाहत आहेत त्यापासून -प्राणाने मला वांचवा म्हणजे माझे प्राण जीवंत ठेवा.
383-11
जरी तू गोसावी आमुचा अनंता । तरी सुई वोडण माझिया जीविता । सांटवी पसारा हा मागुता । महामारीचा ॥383॥
भगवंता ! जर तू आमचा स्वामी म्हणवितोस, तर माझ्या, जीवितावर आडपडदा घालून माझे संरक्षण कर व हा महामारीचा पसारा पुनः फिरून आपले ठिकाणी सांठवून घें.
384-11
आइके सकळ देवांचिया परदेवते । तुवा चैतन्ये गा विश्व वसते । ते विसरलासी हे उपरते । संहारू आदरिले ॥384॥
हे सर्व देवांच्याहि परम देवा ! माझे म्हणने ऐक. तूच चैतन्यस्वरूपाने सर्व विश्वांत वास करतोस, हे तू विसरलास आणि उलट सर्व विश्वाचा संहार करावयास उठलास.
385-11
म्हणौनि वेगी प्रसन्न होई देवराया । संहरी संहरी आपुली माया । काढी माते महाभया- । पासोनिया ॥385॥
म्हणून देवा ! त्वरित प्रसन्न होऊन या आपल्या मायेचा, येथून उपसंहार कर व या महाभयापासून मला सोडवं.

386-11
हा ठायवरी पुढतपुढती । तूते म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलो ॥386॥
अशाप्रकारे वारंवार तुला अत्यंत काकूळती येऊन म्हणावे, इतका मी, विश्वरूपा भगवंता ! अत्यंत भित्रा झालो आहे.
387-11
जै अमरावतीये आला धाडा । तै म्या एकलेनि केला उवेडा । जो मीकाळाचियाही तोंडा । वासिपु न धरी ॥387॥
जेव्हा इंद्राच्या अमरावती राजधानी वर राक्षसांची धाड पडली, तेव्हि ज्या मी एकट्यानेच त्यांचा पराभव केला, कारण मी मृत्यूच्या तोंडाचेही भय बाळगीत नाही.
388-11
परी तया आंतुल नव्हे हे देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवा आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेसी ॥388॥
पण देवा ! हे तुझे विश्वरूप त्यापैकी दिसत नाही. येथे मृत्युवरहि ताण करून सर्व ब्रह्मांडासह आमचा घास घ्यावा असे तू केलेस.
389-11
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥389॥
खरोखर हा सृष्टिच्या प्रलयाचा काल नसतांना मध्येच कसा तू काळ होऊन प्राप्त झालास ?पहा ! बिचारे हे संपूर्ण ब्रह्मांड अल्पायुषि झाले आहे.
390-11
अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिले शांत करिता । कटाकटा विश्व गेले आता । तू लागलासि ग्रासू ॥390॥
आहारे माझ्या दुर्दैवा ! विश्वरूप सुखप्राप्ति व्हावी म्हणून मी प्रयत्न करीत असता, हे विघ्न उत्पन्न झाले हाय ! तू ग्रासू लागल्यामुळे आता हे विश्व नाहीसे होणार !
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

391-11
हे नव्हे मा रोकडे । सैंघ पसरूनिया तोंडे । कवळितासि चहूकडे । सैन्ये इये ॥391॥
जिकडे तिकडे मुखे पसरून या दोन्ही सैन्याला चहूंकडून आपल्या तोंडात टाकीत आहेस, हे स्पष्ट दिसत नाही काय ?

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः । 11. 26 ।

अर्थ हे धृतराष्ट्राचे पुत्र, राजांच्या समुदायांसह वर्तमान, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह ॥26॥
392-11
नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनी ॥392॥
हे कौरव कुळांतील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत काय ? हे सर्व आपल्या परिवारासह तुझ्या मुखात शिरलेत.
393-11
आणि जे जे यांचेनि सावाये । आले देशोदेशीचे राये । तयांचे सांगावया जावो न लाहे । ऐसे सरकटित आहासी ॥393॥
आणि युध्दात यांचे सहाय्य करण्याकरिता इतर देशीचे जे जे राजे आले आहेत, त्यांची मृत्युवार्ता सांगायलाहि कोणी उरणार नाही. अशा रितीने सरसकट सर्वाना गिळीत आहेस.
394-11
मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटा । आरणी हन थाटा । देतासि मिठी ॥394॥
मदोन्मत्त हत्तींच्या समुदायांना तोंडात घटघट ओतीत आहेस व त्याचप्रमाणे युध्दात थाटलेल्या संपूर्ण सैन्यरचनेला मिठी मारत आहेस.
395-11
जंत्रावरिचील मार । पदातीचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥395॥
तोफादिक यंत्राचा मारा करणारे व पायदळाचे मुख्य यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात गडप होत आहेत ना ?

396-11
कृतांताचिया जावळी । जे एकचि विश्वाते गिळी । तिये कोटीवरी सगळी । गिळितासि शस्त्रे ॥396॥
एकच शस्र संपूर्ण विश्वाचा संहार करते व म्हणून मृत्यूचे भावंड होय, अशी कोट्यावधी शस्रे तू गिळीत आहेस.
397-11
चतुरंगा परिवारा । संजोडिया रहंवरा । दात न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥397॥
हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता ! कसा प्रसन्न झाला आहेस पहा की, यांना तू दात लागू न देता गिळून टाकीत आहेस.
398-11
हा गा भीष्मा{ऐ}सा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥398॥
देवा ! भीष्माचार्यासारखा सत्यवचनी व शौर्यात निपून असा कोण आहे ? पण अरेरे ! त्याला व द्रोणाचार्यासारख्या ब्राम्हणालाही ग्रासून टाकलेस.
399-11
अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखे । 399 ।
हाय ! हाय ! सूर्यपुत्र जो महायोध्दा कर्ण, तोही तुझ्या मुखात गेला आणि आमच्या सर्वाचाकेरळच्या नाहीसा केलास, असे मी पाहत आहे.
400-11
कटकटा धातया । कैसे जाहले अनुग्रहा यया । मिया प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिले मरण ॥400॥
अरेरे ब्रह्मदेवा ! विश्वरूप दर्शनाचा अनुग्रह कसा फळला पहा ! मी विश्वरूपदर्शनाकरिता भगवंताची प्रार्थनाकरून बिचार्‍या जगा वरमरणाचा प्रसंग आणला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १४२ वा, २२, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १६९३ ते १७०४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. १६९३
करावा काटाळा नव्हे हे उचित । आधी च का प्रीत लावियेली ॥१॥
जाणतसा तुह्मी लाघव रूपाचे । आपुले ते जीव घेते ऐसा ॥धृपद॥
काय म्हणऊनि आलेती आकारा । आम्हा उजगरा करावया ॥२॥
तुका म्हणे भीड होती आजिवरी । आता देवा उरी कोण ठेवी ॥३॥
अर्थ

देवा तू आमचा कंटाळा करावा हे चांगले नाही जर तुला आमचा कंटाळा करायचाच होता तर आम्हाला तुझ्या स्वरूपाची प्रिती का लावली ? देवा तुम्हाला तुमच्या रुपाची ताकत तर माहीतच आहे आणि तुमच्या रूपामुळे आमचा जीवभाव नाहीसा होतो हे ही तुम्हाला माहित आहे. देवा तुम्हाला आम्हाला दर्शन घ्यायचे नाही तर तुम्ही आकारालाच का आलात केवळ आम्हाला दुःखच द्यायचे आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आज पर्यंत तुमची खूप भीड ठेवली आहे आता यापुढे तुमची भीड कोण ठेवतोय.

अभंग क्र. १६९४
धरूनि पालव असुडीन करे । मग काय बरे दिसे लोकी ॥१॥
काय ते विचारा ठायीचे आपणा । जो हा नारायणा अवकाश ॥धृपद॥
अंतर पायासी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालो नेदी ॥२॥
रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावे हे ॥३॥
सांपडलिया आधी कारणासी ठाव । येथे करू भाव दृढ आता ॥४॥
तुका म्हणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥
अर्थ

देवा मी माझ्या हाताने चारचौघांमध्ये तुमचा पितांबर धरून ओढीन मग ही गोष्ट चांगली दिसणार आहे काय ? मी तुम्हाला जोपर्यंत सवलत दिली आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या दोघामध्ये काय ठराव झाला आहे याविषयी विचार करा. जोपर्यंत तुझ्या पायात आणि माझ्यात अंतर आहे तोपर्यंतच मी तुला बोलू देईल नंतर एकदा की मी तुझ्या पायाशी मिठी मारली की मग मी तुला हालुच देणार नाही. देवा तुम्ही जर माझ्यावर रुसला आहात तर मग मी तुमची समजूत काढीन पण एकदा की तुमची मी समजूत काढली तर मला भेटण्या विषयी तुम्ही तातडी करा. देवा तुझ्या पायाची प्राप्ती ज्या कारणामुळे होईल त्याच ठिकाणी आम्ही आमचा भक्तिभाव दृढ करून ठेवु देवा. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की तुझ्या प्राप्तीचे वर्म मला समजले की मग तुझी प्राप्ती करण्यासाठी जे काही खटपट करावी लागते ती चुकलीच समजा.

अभंग क्र. १६९५
निष्ठुर उत्तरी न धरावा राग । आहे लागभाग ठायीचाचि ॥१॥
तू माझा जनिता तू माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥धृपद॥
मुळींच्या ठेवण्या आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलो होतो ॥२॥
पोटींच्या आठवा पडिला विसर । काही आला भार माथा तेणे ॥३॥
राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥
तुका म्हणे काही बोलणे न लगे । आता पांडुरंगे तू मी ऐसे ॥५॥
अर्थ

देवा मी तुम्हाला जर काही कठोर शब्दात बोललो असेल तरी तुम्ही राग धरू नका कारण आपला संबंध जुनाच आहे. हे रुक्मिणीकांता पांडुरंगा तूच माझा जन्मदाता आहेस तूच माझा जन्मदाता आहेस. देवा माझ्या मूळ स्वस्वरूपाचा ठेवा मी तुमच्या जवळ ठेवला आहे व मला त्याचा अधिकारही आहे केवळ द्वैता मुळेच मी तुमच्यापासून दूर झालो आहे. देवा मी पोटासाठी काहीतरी व्यवहार करू लागलो व त्यामुळे मी तुमच्यापासून अंतरलो. आपल्या दोघामध्ये स्वामी आणि सेवक असा संबंध होता परंतु नंतर माझा संतांशी संग झाला व त्यांनी तू देव आणि मी भक्त दोन्ही एकच आहोत असे सिद्ध करून दाखवले. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तू आणि मी एकच आहोत त्यामुळे आता आपल्यामध्ये कोणतेच बंधन नको.

अभंग क्र. १६९६
सांगता गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥
सुख जाले सुख जाले । नये बोले बोलता ॥धृपद॥
अंतर ते नये दिसो । आता सोस कासया ॥२॥
तुका म्हणे नाही भेद । देवा करू नये वाद ॥३॥
अर्थ

देवाच्या गोष्टी सांगताना फार गोड वाटतात कारण हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे मला खूपच सुख झाले आणि ते मी माझ्या मुखाने देखील सांगू शकत नाही. हरित आणि माझ्यात कोणतेच अंतर राहिले नाही मग आता कष्ट तरी कशाकरता करू ? तुकाराम महाराज म्हणतात आता जे सुख प्राप्त झाले आहे तेच आपल्या जिवाशी धरू आणि त्याचे जतन करू.

अभंग क्र. १६९७
मजशी पुरे न पडे वादे । सुख दोहीच्या संवादे ॥१॥
तूचि आगळा काशाने । शिर काय पायाविणे ॥धृपद॥
वाहो तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥
तुका म्हणे नाही भेद । देवा करू नये वाद ॥३॥
अर्थ

देवा आपल्यामध्ये जर वाद झाला तर त्या ठिकाणी मी माघार घेणार नाही परंतु आपल्यामध्ये जर संवाद झाला तर मला चांगलेच वाटेल. अरे देवा तुला मोठेपणा कोणामुळे आहे तर आमच्या मुळेच आहे पाय जर नसेल तर नुसते डोके असून काही उपयोग आहे काय ? देवा आम्ही तुझ्या सेवेचा भार वाहत आहोत तेही अनेक दुःख सहन करून. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यात आणि माझ्यात काहीच अंतर नाही त्यामुळे तू निष्कारण माझ्याशी वाद करू नको.

अभंग क्र. १६९८
तुज नाही शक्ती । काम घेसी आम्हा हाती ॥१॥
ऐसे अनुभवे पाही । उरले बोलिजेसे नाही ॥धृपद॥
लपोनिया आड । आम्हा तुझा कैवाड ॥२॥
तुका म्हणे तुजसाठी । आम्हा संवसारे तुटी ॥३॥
अर्थ

देवा तुझ्या हाती काहीच शक्ती नाही त्यामुळेच तो आम्हा भक्तांकडून काम करून घेतोस. यासंबंधी तू स्वतः याचा अनुभव घेऊन पहा आता यासंबंधी आणखी काही बोलायचे बाकी राहिले नाही. देवा तु मायेच्या आड लपून बसतोस त्यामुळे नास्तिक लोक तू नाहीस असे म्हणतात, पण त्यावेळी आम्हाला तुझा कैवाड म्हणजे तुझी बाजू घ्यावी लागते म्हणजेच तू आहे असे असे सिद्ध करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्यासाठी आम्ही संसार बंधनही तोडले आहेत.

अभंग क्र. १६९९
तुझाठायी ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥
झडले उरले किती । आम्ही धरियेले चित्ती ॥धृपद॥
कळलासी नष्टा । यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥
तुका म्हणे बोला । नाही ताळा गा विठ्ठला ॥३॥
अर्थ

देवा तुझ्या ठिकाणी पाप आणि दोषाचा आभाव आहे. देवा तुझ्या ठिकाणी किती दोष आणि गुण राहिले आणि नष्ट झालेत हे आम्ही आमच्या चित्ता तर ठेवले आहेत. देवातुझा तु जातीहिन, धर्मभ्रष्ट आणि क्रियानष्ट आहे हे मला कळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरी विषय बोलण्याकरीता त्याच्या संबंधित काहीच ताळमेळ लागत नाही.
अभंग क्र. १७००
भांडावे तो हित । ठायी पडा ते उचित ॥१॥
नये खंडो देऊ वाद । आम्हा भांडवलभेद ॥धृपद॥
शब्दासारसे भेटी । नये पडो देऊ तुटी ॥२॥
तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ॥३॥
अर्थ

देवाशी भांडण केले की हितच होते आणि उचित काय आहे हे समजते लगेच कळूनही येते. याकरिता आम्ही देवाशी भांडण करणे थांबवणार नाही आणि आमच्यामधील जो भेद आहे तोच याला कारण आहे की आम्ही एकमेकांशी बोलू शकतो म्हणजे देव आणि मी वेगळा आहे त्यामुळेच मी देवाशी बोलू शकतो जर मी अद्वैतरूपाने देवाला पाहिले तर मी त्याच्याशी बोलू शकत नाही कारण त्यावेळी देव आणि मी एकच असु. देवा सारस नावाचे पक्षी यांची एकमेकांशी भेट जरी झाली नाही तरी ते शब्दानेच भेटतात त्याप्रमाणे आम्ही तुझ्याशी बोलणे थांबवणार नाही कारण तुझ्याशी बोलणे झाले म्हणजे भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आळस धरू नये सारखा देवाशी संवाद करावा आणि जर देवाशी संवाद केला नाही तर देवाच्या कार्‍यात अडथळा होईल.
अभंग क्र. १७०१
नव्हो गांढे आळसी । जो तू आम्हापुढे जासी ॥१॥
दिले आम्हा हाती । वर्म विवादाचे संती ॥धृपद॥
धरोनिया वाट । जाली शिरोमणि थोंट ॥२॥
तुका म्हणे देवा । वादे करीन खरी सेवा ॥३॥
अर्थ

देवा तू आम्हाला जिंकून आमच्या पुढे जाऊ शकत नाही कारण आम्ही तुझ्याशि वाद घालण्याकरिता गावंढळ किंवा आळशी नाही आहोत. अरे देवा संतांनी आमच्या हाती असे वर्म दिले आहे की कोणाशी कसा वाद करावा किंवा कोणाशी कसा वाद न करावा. देवा तू वादातून पळून जाऊच शकत नाही कारण मी तुझी वाट धरली आहे व मी उद्घाटाचाही शिरोमणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुझ्याशी वाद करूनच तुझी सेवा करीन.
अभंग क्र. १७०२
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आता येचि घडी । कायसी आवडी याची मज ॥धृपद॥
कुश्चीळ इंद्रिये आपुलिया गुणे । यांचिया पाळणे कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरी खाणोरी । यांचा कोण धरी संग आता ॥३॥
पिंड हा उसना आणिला पाचांचा । सेकी लागे ज्याचा त्यासी देणे ॥४॥
तुका म्हणे नाही आणिक सोइरे । तुजविण दुसरे पांडुरंगा ॥५॥
अर्थ

हे केशवा मायबापा तुझा विसर मला एक क्षण एक पळ देखील नकोय. देवा माझा देह जावो अथवा राहो तरी मला या देहा विषयी आवड आता थोडीच राहिली आहे ? देवा हा देह तुझे गुणानुवाद गात नसेल तर त्यांचे पालनपोषण करून काय उपयोग आहे. पुत्र, पत्नी, बहीण, बंधू हे तर केवळ खाण्याच्या पंक्तीला बसणारे आहेत आता यांची संगती कोण करतो ? हा देह पाच तत्वाचा उसना आणलेला असतो मग तो ज्याचा त्याला द्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या वाचुन इतर दुसरा कोणीही मला सोयरा नाही.
अभंग क्र. १७०३
ऐसे सत्य माझे येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥
वचनांसारिखे तळमळी चित्त । बाहेरि तो आत होईल भाव ॥धृपद॥
तरि मज ठाव द्यावा पायापाशी । सत्यत्वे जाणसी दास खरा ॥२॥
तुका म्हणे सत्य निकट सेवके । तरिच भातुके प्रेम द्यावे ॥३॥
अर्थ

देवा मी ज्या काही प्रतिज्ञा माझ्या मनात केल्या आहेत त्या खऱ्या करून दाखवण्याचे सामर्थ्य जर माझ्या मनात असेल तरच तुम्ही माझ्यावर कृपा करा. देवा मी जे काही बोलतो आहे त्याप्रमाणे वागण्याची तळमळ जर माझ्या चित्तात आहे आणि जो भक्ती भाव मी बाहेरून वर वर दाखवतो आहे तोच भक्तिभाव माझ्या अंतःकरणात असेल आणि मी खरच तुमचा दास आहे असं तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही तुमच्या पायापाशी मला जागा द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या जवळ राहतो आणि तुमची खरोखर सेवा करत असेल तरच तुम्ही तुमचा प्रेमरूपी खाऊ मला द्यावा.
अभंग क्र. १७०४
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागे पुढे नीस संचिताचा ॥१॥
आता काय देऊ पायापे परिहार । जाणा तो विचार करा देवा ॥धृपद॥
आपुले ते येथे काय चाले केले । जोडावे ते भले हात पुढे ॥२॥
तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल ते ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही भूत, भविष्य, वर्तमान व मागील सर्व संचित जाणता. देवा आता मी याविषयी तुमच्या पायाजवळ काय बोलु तुम्हीच काय योग्य निर्णय माझ्या विषय असेल तो घ्यावा. आमचे येथे काय चालणार आहे तुमच्या पुढे हात जोडावे हे चांगले. तुकाराम महाराज म्हणतात हे दातारा माझे बोलणे म्हणजे फिके आहे त्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही जे बोलाल ते होऊ शकते त्यामुळे तुम्ही माझे संचित नाहीसे करा.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading