आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

५ मे, दिवस १२५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १४८९ ते १५००
“५ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ५ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ५ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग१४८९ ते १५०० चे पारायण आपण करणार आहोत.
५ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २७६ ते ३००,
276-10
तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येसी जे संपत्ती । तेही मीचि जाणे ॥276॥
तरी नित्य नवी जी कीर्ति आहे ती, अर्जुना ! माझी विभूति होय आणि औदार्यासह जी संपत्ति तीहहि माझी विभूति होय, असे जाण.
277-10
आणि ते गा मी वाचा । जे सुखासनी न्यायाचा । आरूढोनि विवेकाचा । मार्गी चाले 277॥
आणि जी वाणी न्यायाला व विवेकाला धरून असते ती माझी विभूति होय.
278-10
देखिलेनि पदार्थे । जे आठवूनि दे माते । ते स्मृतिही पै एथे । त्रिशुद्धी मी ॥278॥
पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी स्तुति, माझी विभूति होय हे त्रिवार सत्य जाण.
279-10
पै स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनी । धृती मी त्रिभुवनी । क्षमा ते मी ॥279॥
आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणाशक्ति, ही माझी विभूति होय आणि आत्मप्राप्तिकरिता शमदमादिसाधनांचे दुःख, ज्या धैर्याने सहन केले जाते, ते धैर्य व कोणी उपकार केला असता, उलट त्याच्यावर अपकार करण्याची वृत्ति न उठणे, ही जी क्षमा, ती माझी विभूति होय.
280-10
एवं नारींमाझारी । या सातही शक्ति मीचि अवधारी । ऐसे संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥280॥
हे प्रियतम अर्जुना ! संपूर्ण वेदराशीत श्रेष्ठ असलेल्या सामवेदांत, बृहत्साम हे माझे स्वरूप आहे, असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥10. 35॥
281-10
वेदराशीचिया सामा- । आत बृहत्साम जे प्रियोत्तमा । ते मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ॥281॥
हे प्रियतम अर्जुना ! संपूर्ण वेदराशीत श्रेष्ठ असलेल्या सामवेदांत, बृहत्साम हे माझे स्वरूप आहे, असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
282-10
गायत्रीछंद जे म्हणिजे । ते सकळा छंदांमाजी माझे । स्वरूप हे जाणिजे । निभ्रांत तुवा ॥282॥
ज्याला गायत्री छंद म्हणतात, ते सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे, हे निःसंशय जाण.
283-10
मासा आंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु । ऋतूंमाजी कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥283॥
मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे व ऋतूंमध्ये वसंतऋतु मी आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले.
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥10. 36॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥10. 37॥
284-10
छळितया विंदाणा- । माजी जू ते मी विचक्षणा । म्हणोनि चोहटा चोरी परी कवणा । निवारू न ये ॥284॥
हे सुज्ञ अर्जुनि ! छळणार्या प्रकारात जुगार हे माझे स्वरूप होय. म्हणून द्यूत, उघड चव्हाट्यावर चोरी करणेच होय; पण कोणाला त्यापासून परावृत्त करू नये.
285-10
अगा अशेषांही तेजसा- । आत तेज ते मी भरवसा । विजयो मी कार्योद्देशा । सकळांमाजी ॥285॥
अर्जुना ! संपूर्ण तेजस्वी पदार्थात तेज माझे स्वरूप होय, हे निश्चयाने जाण. कार्य करण्याचे जे विजयाचे उद्देश असतात, त्या सर्वामध्ये माझी विभूति होय.
286-10
जेणे चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायात व्यवसाय । माझे स्वरूप हे राय । सुरांचा म्हणे ॥286॥
सर्व उद्योगांमध्ये ज्या उद्योगांत न्याय स्पष्ट दिसतो ते माझे स्वरूप होय; असे देवाधिदेव श्रीकृष्ण म्हणतात.
287-10
सत्त्वाथिलिया आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजी श्रीमंतु । तोचि तो मी ॥287॥
सात्विकांमध्ये राहणारे सत्व मी आहे. यादवांमध्ये जो श्रीमंत तोच मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात.
288-10
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठी गोकुळी गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेते ॥288॥
जो देवकीवसुदेवाच्या तपामुळे प्रगट झाला, जो गोपकुमारीकरिता गोकुळात गेला व ज्याने प्राणासकट पूतनेचे प्राशन केले तोच मी होय.
289-10
नुघडता बाळपणाची फुली । जेणे मिया अदानवी सृष्टि केली । करी गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥289॥
बाळपणाची अवस्था संपण्यापूर्वी दैत्यरहित पृथ्वी केली आणि हातावर पर्वत पर्वत धरून इंद्राचा पराक्रम अजमाविला.
290-10
कालिंदीचे हृदयशल्य फेडिले । जेणे मिया जळत गोकुळ राखिले । वासरुवांसाठी लाविले । विरंचीस पिसे ॥290॥
यमुनेच्या ह्रदयातील दुःख नाहीसे केले, गोकुळ जळण्याची भीति प्राप्त झाली असता, तेवढा अग्नी पिवून गोकुळाचे रक्षण केले. वासरे चोरून नेणार्या ब्रह्मदेवास वेड लाविले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-10
प्रथमदशेचिये पहाटे- । माजी कंसा ऐशी अचाटे । महाधेंडी अवचटे । लीळाचि नासिली ॥291॥
कुमारदशेतच कंसासारख्या अचाट पराक्रमी वीरांचा सहज लीलेने नाश केला.
292-10
हे काय कितीएक सांगावे । तुवांही देखिले ऐकिले असे आघवे । तरि यादवांमाजी जाणावे । हेचि स्वरूप माझे ॥292॥
अर्जुना ! हे किती वर्णन करायचें ? तू देखील हे सर्व पाहिले ऐकिले आहेस, तर यादवांमध्ये हेच माझे स्वरूप होय.
293-10
आणि सोमवंशी तुम्हा पांडवा- । माजी अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥293॥
आणि चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या तुम्हा पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, म्हणूनच आपल्या परस्पराच्या प्रेमांत कशानेहि बिघाड होत नाही.
294-10
संन्यासी तुवा होऊनि जनी । चोरूनि नेली माझी भगिनी । तऱ्ही विकल्पु नुपजे मनी । मी तू दोन्ही स्वरूप एक ॥294॥
लोकात बाह्यतः संन्यासी होऊन तू माझी बहीण चोरून नेलीस; पण मी व तू एक स्वरूप असल्यामुळे माझ्या मनात काही विकल्प उठला नाही.
295-10
मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजी धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ॥295॥
सर्व मुनीमध्ये व्यासदेव तो मी आहे आणि कवीश्वरामध्ये, सर्व धैर्याचे वसते ठिकाण जो शुक्राचार्य तो मी आहे, असे यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥10. 38॥
296-10
अगा दमितयांमाझारी । अनिवार दंडु तो मी अवधारी । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरी । नियमित पावे ॥296॥
निग्रह करणार्यांमध्ये, अर्जुना ! मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्यांच्या कर्मानुसार कधी न चुकता अवश्य दंड जो मिळतो, तो मी आहे.
297-10
पै सारासार निर्धारितया । धर्मज्ञानाचा पक्षु धरितया । सकळ शास्त्रांमाजी यया । नीतिशास्त्र ते मी ॥297॥
सर्व शास्रांमध्ये सार काय, असार काय, यांचा निर्णय करणारे व धर्मज्ञान यांचा पक्ष धरणारे जे नीतिशास्र ते मी आहे.
298-10
आघवियाचि गूढा- । माजी मौन ते मी सुहाडा । म्हणोनि न बोलतया पुढा । स्त्रष्टाही नेण होय ॥298॥
संपूर्ण गुप्त ठेवणार्यामध्ये, सख्या अर्जुना ! मौन ते मी आहे. म्हणूनच बोलणार्यांच्या मनातील, सृष्टि उत्पन्न करणारा ब्रह्मदेवहि जाणू शकत नाही.
299-10
अगा ज्ञानियांचिया ठायी । ज्ञान ते मी पाही । आता असो हे यया काही । पार न देखो ॥299॥
अगा अर्जुना ! ज्ञानियांचे ठिकाणी जे ज्ञान असते, ते मी आहे. आता पुरे माझ्या विभूतींना मर्यादाच नाही.
यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥10. 39॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांनां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥10. 40॥
300-10
पै पर्जन्याचिया धारा । वरी लेख करवेल धनुर्धरा । का पृथ्वीचिया तृणांकुरा । होईल ठी ॥300॥
अर्जुना ! एकदां पावसाच्या धारा मोजता येतील किंवा पृथ्वीवरील गवताच्या संपूर्ण अंकुराचे ठिकाणी देखील मर्यादेची दृष्टि होऊ शकेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १२५ वा, ५, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४८९ ते १५००
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १४८९
दुःखाची संगति । तिच्याठायी कोण प्रीति ॥१॥
अवघे असो हे निराळे । करू सोइरे सावळे ॥धृपद॥
क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावेचि वाव ॥२॥
तुका म्हणे बरा । ठाव पावलो हा थारा ॥३॥
अर्थ
ज्याच्या संगतीने दुःख होते अशा विषयांच्या ठिकाणी कोण प्रेम करणार ? आता सर्व संसार बाजूला ठेवू आणि सावळ्या हरीशी संबंध जोडू. सर्व विषय क्षणभंगुर आहेत याविषयी विचार करून त्याचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले मी हरीच्या रूपाशी संबंध जोडले त्यामुळे मला उत्तम स्थान प्राप्त झाले.
अभंग क्र. १४९०
गेला तरी जावो सुखे नरकासी । कळंकी याविशी शिवो नये ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरे तो हित दुरी बरे ॥धृपद॥
उगीच का आली नासवावी फळे । विटाळ विटाळे कालवूनि ॥२॥
तुका म्हणे लोणी घालोनि शेणात । उपेगाची मात काय असे ॥३॥
अर्थ
दुष्ट मनुष्य सुखाने नरकात गेलात तरी जावो परंतु त्या कलंकी मनुष्याला स्पर्शदेखील करू नये. विटाळलेल्या स्त्रीच्या स्पर्शाने पानवेली ज्याप्रकारे नाश पावते तसेच दुष्ट माणसाच्या स्पर्शाने आपले हित होत नाही. त्यामुळेच त्याच्यात व आपल्यात अंतर ठेवले तरच चांगले. विटाळा ने विटाळ होतो व एकमेकांच्या स्पर्शाने वृक्षाला आलेली चांगली फळे का नासून टाकावे म्हणजे अधमाची संगती करून चांगल्या माणसाने आपले अनहीत का करून घ्यावे ? तुकाराम महाराज म्हणतात लोणी जर शेणात घातले तर त्याचा काय उपयोग आहे ?
अभंग क्र. १४९१
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥
विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥धृपद॥
भाव शुद्ध तरी । सांगितले काम करी ॥२॥
तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥
अर्थ
श्रीपती ने केलेले चरित्र किती वर्णन करावे ? पद्मनाभा च्या ठिकाणी दृढ विश्वास ठेवावा म्हणजे तो हरी मोठा लाभ देईल. ज्याचा शुद्ध भक्तिभाव आहे तो, देवाने व गुरूने सांगितलेले काम व्यवस्थितपणे करतो. तुकाराम महाराज म्हणतात देव भोळा आहे परंतु आपला संदेह आपल्याला नागवित असतो.
अभंग क्र. १४९२
संचितावाचून । पंथ न चलवे कारण ॥१॥
कोरडी ते अवघी आटी । वाया जाय लाळ घोटी ॥धृपद॥
धन वित्त जोडे । देव ऐसे तो न घडे ॥२॥
तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥
अर्थ
पूर्वपुण्य असल्याशिवाय मनुष्य परमार्थाकडे वळत नाही कारण पूर्वपुण्य चांगले असेल तरच मनुष्यला परमार्थाची आवड लागते. वरवर हरीची भक्ती केल्याने काहीच उपयोग होत नाही हरीची कृपा होण्याकरिता लाळ घोटावी लागते. धन द्रव्याच्या जोरावर देव जोडला जातो असे केंव्हाही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण केलेले पापच आपल्या स्वहिताच्या आडवे येते.
अभंग क्र. १४९३
अतित्याईं बुडे गंगे । पाप लागे त्याचे त्या ॥१॥
हे तो आपुलिया गुणे । असे जेणे योजिले ॥धृपद॥
अवचटे अग्नि जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥२॥
जैसे तैंसे दावी आरसा । नकट्या कैसा पालटे ॥३॥
अर्थ
एखादया आततायी मनुष्याने गंगेत आत्महत्या केली तर ते पाप त्यालाच लागेल. ज्याने ज्या प्रकारचे कर्म योजले व केले आहे त्याप्रमाणेच त्याला फळ मिळत असते. एखादया मनुष्याच्या शरीराला अचानक जर अग्नी लागला आणि त्यापासून त्याने स्वत:चा सांभाळ केला नाही तर त्याला दु:ख प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, “आरसा जे खरे स्वरुप आहे तेच स्वरुप दाखवित असतो आरशासमोर जर एखादा नकटा उभा राहिला तर त्याचे स्वरुप कसे बदलेन ? ”
अभंग क्र. १४९४
हेंदऱ्याचे भरिता कान । हलवी मान भोंक रिते ॥१॥
नाही मी येथे सांगो स्पष्ट । भावे नष्ट घेत नाही ॥धृपद॥
अवगुणी बाटले चित्त । तया हित आतळे ना ॥२॥
तुका म्हणे फजितखोरा । म्हणता बरा उगा रहा ॥३॥
अर्थ
एखाद्या हेंदर्या मनुष्याला कितीही चांगले उद्देशाने त्याचे कान भरविले तरी काहीच उपयोग होत नाही, तो फक्त तुम्हाला मान हलविण्याचे काम करतो, असे जरी असले तरी त्याच्या कानाचे भोके रिकामेच राहतात. अशा नष्ट लोकांना कितीही चांगला उद्देश करण्याचा प्रयत्न केला तरी ते भक्तिपूर्वक ग्रहण करत नाही त्यामुळे मी येथे काहीच स्पष्ट सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे चित्त अवगुणानी बाटले आहे त्याला किती चांगला उद्देश सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो उद्देश कळत नाही.
अभंग क्र. १४९५
नाही सरो येत जोडिल्या वचनी । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे । अनुभवाच्या गुणे रुचो येतो ॥धृपद॥
काय आगीपाशी शृंगारिले चाले । पोटींचे उकले कसापाशी ॥२॥
तुका म्हणे येथे करावा उकल । लागेचि ना बोल वाढवूनि ॥३॥
अर्थ
अभक्त मनुष्याने कितीही कुशलता पूर्वक शब्दाला शब्द जोडून कवित्व केले तरी ते देवाला मान्य होत नाही. ज्याच्याकडे खरेच अनुभव आहे त्याचे बोलणे इतर लोकांना पटते व त्या अनुभवाच्या गुणामुळे त्याचे बोलणे सर्वाना आपल्याकडे वेधून घेते. एखाद्या शूद्र धातूला वरवर नुसता सोन्याचा मुलामा लावला आणि तो धातू अग्नी पुढे नेला तर त्याच्यावरील सोने वितळून जाते व त्या धातूचे खरे स्वरूप सर्वाच्या समोर येते अगदी त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने कितीही काव्यरचना केली तरी त्याचे संतांपुढे खरे स्वरूप उघडे पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरोखरच अनुभव आहे त्या ला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही कारण त्याच्या अनुभवावरूनच त्याचे खरे स्वरूप स्पष्ट होते.
अभंग क्र. १४९६
लचाळाच्या कामा नाही ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥धृपद॥
समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥
तुका म्हणे याचा धिक्कारचि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥
अर्थ
मूर्ख मनुष्याला कितीही उपदेश केला तरी त्याला समजत नसतो आणि त्याच्या कोणत्याही कामात ताळमेळ नसतो. त्याला चांगले बोललेले व चांगले माणसे समजत नाही. अशांची संगती मंगळ असते वेडगळ माणसांना वेळ आणि काळ कळत नाही व अशा प्रकारच्या माणसांना आपण कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक लोक आहेत की ज्यांची बुद्धी गाढवा होऊनही खालची पातळीची आहे आणि अशांचा धिक्कार करणे हेच योग्य आहे.
अभंग क्र. १४९७
एक धरिला चित्ती । आह्मी रखुमाईचा पती ॥१॥
तेणे जाले अवघे काम । निवारला भवभ्रम ॥धृपद॥
परद्रव्य परनारी । जाली विषाचिये परी ॥२॥
तुका म्हणे फार । नाही लागत व्यवहार ॥३॥
अर्थ
आम्ही आमच्या चित्तामध्ये एक रुक्मिणी चा पती म्हणजे पांडुरंग धारण केला आहे. त्यामुळे सर्व कामे पूर्ण झाले आहे व आमचा भव भ्रम म्हणजे जगत सत्या हा भ्रम नाहीसा झाला आहे. आम्हाला परद्रव्य आणि परनारी हे विषयाप्रमाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला यापेक्षा अधिक व्यवहार करावे लागत नाही.
अभंग क्र. १४९८
भेणे पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥
कैसी जाली दिशाभुली । नवजाति ये वाटे चाली ॥धृपद॥
संसाराची खंती । मावळल्या तरी शक्ती ॥२॥
तुका म्हणे हीणा । बुद्धि चुकली नारायणा ॥३॥
अर्थ
काही मनुष्य मृत्यूच्या भीतीने नुसतेच पळत असतात परंतु त्यांना हे समजत नाही की मृत्यु तर त्याच्यासोबत आहे. अशा लोकांची दिशाभूल कशी झाली असते ते पहा ज्या मार्गाने मृत्यूचे भय राहात नाही तो मार्ग म्हणजे परमार्थ आहे आणि हे डोळस मनुष्य याच मार्गाने नेमके जात नाहीत. अशी माणसे शक्तिहीन झाली तरी संसाराची काळजी करतच राहतात. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा अशा दिन मनुष्याची बुद्धी चुकलेली असते ते त्याला चुकीच्या मार्गाने नेते.
अभंग क्र. १४९९
अभिमानाचे तोंड काळे । दावी बळे अंधार ॥१॥
लाभ न्यावा हातोहाती । तोंडी माती पाडोनि ॥धृपद॥
लागलीसे पाठी लाज । जाले काज नासाया ॥२॥
तुका म्हणे कुश्चळ मनी । विटंबनी पडिली ती ॥३॥
अर्थ
अभिमानाचे तोंड काळे व्हावे कारण अभिमान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व मीच आहे असा भ्रम, अंधार निर्माण करतो. अभिमान आपल्याला होणाऱ्या परमार्थसुखाला हातोहात पळून नेतो व तोंडत दुःखाची माती घालतो. अभिमान झाला की आपल्या ठिकाणी लाज निर्माण होते व लाज निर्माण झाली की आपण संतांना शरण जात नाही व संतांना शरण गेलो नाही तर आपल्या हातून चांगले कर्म घडत नाही आणि चांगले कर्म घडू नये यासाठी जणू लाज उत्पन्न होत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या मनात पाप आहे कुश्चळपणा आहे अशी माणसे विटंबनेच्या डोहात पडतात.
अभंग क्र. १५००
चोराचिया धुडका मनी । वसे ध्यानी लांछन ॥१॥
यासी आह्मी करणे काय । वर्षो न्याये पर्जन्य ॥धृपद॥
ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥२॥
तुका म्हणे त्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥३॥
अर्थ
चोराच्या मनात नेहमी चोरीच असते आणि मला कोणी पडते की काय ही भीतीही नेहमी असते. आमचे बोलणे असेच आहे त्याला आम्ही काय करणार जसा मेघ भेदभाव न करता सर्वत्र सारखा वर्षाव करत असतो त्याप्रमाणे आम्ही सर्वाना सारखाच व चांगला उपदेश करत असतो. ज्याच्या दुःखावर माशी बसते आणि तो तेथेच हालचाल करतो, त्याप्रमाणे त्याच्या मनात पाप असते त्याचे नांव आम्ही जरी नाही घेतले तरी त्याला आमचे बोलणे झोंबत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंगात खोड असते त्याप्रमाणे त्याला त्याच्या खोडी प्रमाणेच म्हणजे कर्माप्रमाणे फळ मिळत असते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















