आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२ मे, दिवस १२२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १४५३ ते १४६४
“२ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १४५३ ते १४६४ चे पारायण आपण करणार आहोत.
२ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी २०१ ते २२५,
201-10
आता हे सुख कायिसयासारिखे । काही निर्वचेना मज परितोखे । तरि येतुले जाणे जे येणे मुखे । पुनरुक्तही हो ॥201॥
आता हे होणारे सुख कशासारखे आहे, हे मला झालेल्या आनंदामुळे शब्दाने काही सांगता येत नाही. पण एवढे मात्र मला सांगता येते की तुमच्या मुखाने तेच सांगितले गेले, तरी ते गोडच लागतें.
202-10
हा गा सूर्य काय शिळा ? । अग्नि म्हणो येत आहे वोंविळा । का नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ॥202॥
भगवंता ! सूर्य शिळा होतो काय ? अग्नीला ओवळा म्हणता येते काय ? नित्य वाहणार्या गंगाजळाला पारोसेपण असते काय ?
203-10
तुवा स्वमुखे जे बोलिले । हे आम्ही नादासि रूप देखिले । आजि चंदनतरूची फुले । तुरंबीत आहो मा ॥203॥
तुम्ही जे स्वमुखाने सांगितले, ते ऐकून आम्ही मूर्तीमंत नादब्रह्मच पाहिला किंवा आज सुवासिक अशा चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेत आहो असे वाटलें.
204-10
या पार्थाचिया बोला । सर्वांगे कृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥204॥
असे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण सर्वागाने डोलू लागले व खरोखर, अर्जुन हा भक्तिज्ञानाचे कोठार झाला, असे मनात म्हणाले.
205-10
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु । प्रेमाचा वेगु उचंबळतु । सायासे सांवरूनि अनंतु । काय बोले ॥205॥
याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी भक्तिज्ञानाचा अविष्कार पाहून, भगवंताला झालेल्या संतोषाने, भगवंताच्या अंतःकरणात प्रेम उचंबळून लागले. पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा अवेग आवरून देव पुढे बोलू लागले.
श्रीभगवानुवाच
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥10. 19॥
206-10
मी पितामहाचा पिता । हे आठवितांही नाठवे चित्ता । की म्हणतसे बा पंडुसुता । भले केले ॥206॥
मी ब्रह्मदेवाचाहि पिता आहे याची आठवणं करताहि भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती, म्हणून भगवंतांनी अर्जुनाला, ” बापा अर्जुना ! ” बरे केलेस असे म्हटलें.
207-10
अर्जुनाते बा म्हणे एथ काही । आम्हा विस्मो करावया कारण नाही । आंगे तो लेकरू काई । नव्हेचि नंदाचे ॥207॥
येथे भगवंतांनी अर्जुनाला ” बापा अर्जुना ” म्हटले याचे आपणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान स्वतः नंदाचे लेकरू झाले नाही काय ?
208-10
परि प्रस्तुत ऐसे असो । हे करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइके सांगतसो । धनुर्धरा ॥208॥
पण सध्या हे बाजूला ठेवू. मनात असलेले अतिशय प्रेमच असा प्रकार करवित असते. मग भगवान म्हणतात, धनुर्धरा ! सांगतो ते ऐक.
209-10
तरी तुवा पुसलिया विभूती । तयांचे अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥209॥
तू माझ्या विभूति विचारल्यास, पण अर्जुना ! त्यांना मर्यादाच नाही. कारण मलाच माझ्या विभूतींची संख्या करवत नाही.
210-10
आंगीचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥210॥
अंगावर रोम किती आहेत, हे ज्याचे त्यालाच मोजून सांगता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मलाच मोजता येण्याजोग्या नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-10
एऱ्हवी तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागी प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइके ॥211॥
एरवी मी कसा व केवढा आहे, हे मलाच स्पष्ट कळत नाही, म्हणून मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिध्द आहेत त्या सांगतो, ऐक.
212-10
जिया जाणतलियासाठी । आघवीया जाणितलिया होती किरीटी । जैसे बीज आलिया मुठी । तरूचि आला होय ॥212॥
ज्याप्रमाणे बीज हाती आले असता वृक्षच हातात आल्यासारखा होतो, त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य मुख्य विभूती जाणल्या असता, संपूर्ण विभूती जाणल्या जातील.
213-10
का उद्यान हाता चढिले । तरी आपैसी सांपडली फळे फुले । तेवी देखिलिया जिया देखवले । विश्व सकळ ॥213॥
किंवा बगीचा हातात आला असता, त्यातील फुले, फळेहि अनायासे हातात येतात, याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतीमय दिसू लागेल.
214-10
एऱ्हवी साचचि गा धनुर्धरा । नाही शेवटु माझिया विस्तारा । पै गगना ऐशिया अपारा । मजमाजी लपणे ॥214॥
वस्तुतः धनुर्धरा ! माझ्या विस्ताराला खरोखर अंत नाही, कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशहि माझ्या ठिकाणीच असते.
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानांमन्त एव च ॥10. 20॥
215-10
आइके कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असे एकैका । भूतमात्राचा ठायी ॥215॥
काळे कुरळे केस मस्तकावर धारण करणार्या, धनुर्विद्येत दुसरा शंकर असलेल्या अशा अर्जुना ! ऐक, मी प्रत्येक भूताचे ठिकाणी आत्मरूपाने आहे.
216-10
आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणी । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणी । मध्यही मीचि ॥216॥
या भूतांच्या आत अंतःकरणात – मीच असून, बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे व भूतांच्या आदी, अंती व मध्येहि मीच आहे.
217-10
जैसे मेघा या तळी वरी । एक आकाशचि आत बाहेरी । आणि आकाशीचि जाले अवधारी । असणेही आकाशी ॥217॥
ज्याप्रमाणे मेघाला खाली-वर, आत -बाहेर एक आकाशच असते. आकाशांतच मेघ उत्पन्न होतात व आकाशांतच राहतात.
218-10
पाठी लया जे वेळी जाती । ते वेळी आकाशचि होऊनि ठाती । तेवी आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥218॥
शेवटी जेव्हा ते नाहीसे होतात, तेव्हा आकाशरूपच होऊन जातात, त्याप्रमाणे सर्व भूतांचे उत्पत्ति, स्थिति, लय मीच आहे.
219-10
ऐसे बहुवस आणि व्यापकपण । माझे विभूतियोगे जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥219॥
असे माझे नानाविध व व्यापक होणे हे माझ्या विभूति व योगामुळे होत असते असे समज. तर आता आपल्या जीवाचे व श्रवणेंद्रियाचे ऐक्य करून श्रवणेंद्रियांच्या द्वारा ऐक- म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक.
220-10
याहीवरी त्या विभूती । सांगणे ठेले तुजप्रति । सांगेन म्हणितले तुज प्रीती । त्या प्रधाना आइके ॥220॥
मी सर्वत्र निमरूपात व्यापून असल्यामूळें, विभूति सांगणे खरोखर संपले; पण अर्जुना ! तुला विभूति सांगतो असे म्हटले, म्हणून माझ्या मुख्य मुख्य विभूति ऐक.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान ।
मरीचिर्मरुतानामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥10. 21॥
221-10
हे बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजी ॥221॥
असे म्हणून तो कृपाळु भगवान म्हणाला, आदित्यात मी विष्णु आहे. चांगल्या प्रकाशवान् पदार्थामध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे.
222-10
मरूद्गणांच्या वर्गी । मरीचि म्हणे मी शारङ्गी । चंद्र मी गगनरंगी । तारांमाजी ॥222॥
मरुद्गणांच्या समुदायात, भगवान म्हणाले मी मरीचि आहे. आकाशमंडळांतील नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे.
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥10. 22॥
223-10
वेदाआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजी मरुद्बंधु । महेंद्र तो मी ॥223॥
भगवान म्हणतात, वेदात सामवेद तो मी आहे. देवांमध्ये मरुतांचा भाऊ इंद्र तो मी आहे.
224-10
इंद्रियाआंतु अकरावे । मन ते मी हे जाणावे । भूतांमाजी स्वभावे । चेतना ते मी ॥224॥
इंद्रियांमध्ये अकरावे जे मन, ते मी आहे असे जाण. भूतमात्रामध्ये सर्वाच्या ठिकाणी स्वाभाविक असणारे चैतन्य, ते मी आहे.
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥10. 23॥
225-10
अशेषांही रुद्रांमाझारी । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरी । भ्रांति काही ॥225॥
सर्व रुद्रांमध्ये मदनाचा नाश करणारा जो शंकर तो मी आहे, या विषयी शंका घेऊ नकोस.
दिवस १२१ वा, २, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४५३ ते १४६४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १४५३
राहाणे ते पायापाशी । आणिका रसी विटोनि ॥१॥
ऐसा धीर देई मना । नारायणा विनवितो ॥धृपद॥
अंतरी तो तुझा वास । आणिका नाष कारणा ॥२॥
तुका म्हणे शेवटींचे । वाटे साचे राखावे ॥३॥
अर्थ
मला सर्व रसांचा वीट आला असून देवा मला तुझ्या पायाजवळ रहावेसे वाटते. हे नारायणा असे धैर्य माझ्या मनाला दे अशी विनंती मी तुला करत आहे. देवा तुझा माझ्या अंतःकरणात वास व्हावा, त्यामुळे इतर सर्व गोष्टींचा नाश होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंत काळी तू माझे रक्षण करावे असे मला वाटते.
अभंग क्र. १४५४
चंदन तो चंदनपणे । सहज गुणेसंपन्न ॥१॥
वेधलिया धन्य जाती । भाग्ये होती सन्मुख ॥धृपद॥
परिसा अंगी परिसपण । बाणोनि ते राहिले ॥२॥
तुका म्हणे कैची खंती । सुजाती ते टाकणी ॥३॥
अर्थ
चंदन त्याच्या सुगंध गुणामुळे सहजच संपन्न असतो. चंदनाच्या वृक्षाजवळ जे वृक्ष असतात ते भाग्यवान असतात कारण चंदनाच्या जवळ राहून इतर वृक्षांमध्ये चंदनाचा गुण आपोआप प्राप्त होतो. परिसराच्या अंगी लोखंडाला सोने करण्याची ताकद आहे व तीच ताकद त्याच्या अंगी बाणलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे सर्वगुणसंपन्न असतात त्यांना कसली काळजी आली ते तर स्वतः शुद्ध असतात व इतरांनाही ते शुद्ध करतात.
अभंग क्र. १४५५
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथे बळ आसनाचे ॥१॥
हे तो असाध्य जी सर्वत्र या जना । भले नारायणा आळवि ॥धृपद॥
कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥
कर्म उसंतावे चालत पाउली । होय जो राहिली देहबुद्धि ॥३॥
भक्ती ते नमावे जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥
तुका म्हणे साध्य साधन अवघडे । देता हे साकडे देह बळी ॥५॥
अर्थ
लक्ष चित्त स्वस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करावे आणि तसे होत नाही कारण मन खूप चंचल आहे आणि मन स्थिर करण्याकरिता आसन मुद्रा जिंकावे लागते. आणि गोष्टी या सर्वसामान्य लोकांना असाध्य आहे त्यामुळे नारायणाचे नामचिंतन करावे हे चांगले. वासनेचा, कुटुंबाचा आणि विषय भोगांचा त्याग करणे याचे नांव वैराग्य आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत वर्णाश्रम विहित कर्मे केली पाहिजेत. काम, क्रोध त्यांना शांत करून सर्व प्राणिमात्र, भूतमात्रांना नमन करावे याचेच नांव भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात योग, वैराग्य आणि भक्ती कर्म यांचे साध्य व साधने हे दोन्हीही अवघड आहे आणि तो मार्ग खूप अवघड आहे आणि जो त्या मार्गाने जातो त्यात त्याचा बळी ही जाऊ शकतो त्यामुळे सामान्य माणसांना नाम भक्ती म्हणजे हरीचे नाम घेणे ही साधना करावी व तीच साधना सर्व सोपी आहे.
अभंग क्र. १४५६
ऐसे काहो न करा काही । पुढे नाही नास ज्या ॥१॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥धृपद॥
श्रुतीचे का नेघा फळ । सारमूळ जाणोनि ॥२॥
तुका म्हणे पुढे काही । वाट नाही यावरी ॥३॥
अर्थ
तुम्ही असे काही का करत नाही की ज्या कारणामुळे तुमचा नाश होणार नाही. सर्व भूतमात्रांना वंदन करून विश्वंभरा शरण का जात नाही श्रुतीचे सर्व सारतत्व हेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात लोकहो हरीला शरण जाण्या ऐवजी दुसरा कोणताही मार्ग नाही तुम्ही हरीला शरण गेलात तर तुमचा पुढे नाश होणार नाही.
अभंग क्र. १४५७
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥धृपद॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरा ब्रम्हत्वेसी ॥२॥
फिरविला घट फोडिला चरणी । माहावाक्य ध्वनि बोंब जाली ॥३॥
दिली तिळांजुळी कुळनामरूपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पीले ॥४॥
तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
अर्थ
आमच्या शरीराची कळा अवस्था प्रेतासारखी झाली आहे आणि स्मशानाच्या ठिकाणी आमचे लक्ष लागले आहे. काम, क्रोध हे रात्रंदिवस रडत आहेत आणि अविद्या रूप माया हाय हाय करीत बसली आहे. या शरीराला वैराग्याचे गोवऱ्या लागल्या आहेत आणि तत्वमसि या अग्नीने त्या पेटल्या आहेत. संसाराचा घट या प्रेत रुपि शरीराला फिरविला व फोडला आणि महावाक्य रूप ध्वनीची बोंब झाली. मी माझ्या नाम रूपाला तिलांजली दिली व हे शरीर ज्याचे होते त्याला ते अर्पण केले. तुकाराम महाराज म्हणतात गुरुकृपेने ज्ञानदीप उजळले आणि या देहाची राख आपोआप झाली.
अभंग क्र. १४५८
आपुले मरण पाहिले म्या डोळा । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने । सर्वात्मकपणे भोग जाला ॥धृपद॥
एकदेशी होतो अहंकारे आथिला । त्याचा त्यागे जाला सुकाळ हा ॥२॥
फिटले सुतक जन्ममरणाचे । मी माझ्या संकोचे दुरी जालो ॥३॥
नारायणे दिला वस्तीस ठाव । ठेवूनिया भाव ठेलो पायी ॥४॥
तुका म्हणे दिले उमटोनि जगी । घेतले ते अंगी लावूनिया ॥५॥
अर्थ
मी माझ्या स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्याने पाहिले व तो सोहळा फारच अनुपम्य आहे. त्रीभुवनामध्ये आनंद दाटला गेला आहे आणि सर्वत्र आत्मभाव निर्माण झाल्यामुळे आनंदाचा भोग प्राप्त झाला आहे. माझ्या ठिकाणी देहाभिमान निर्माण झाला त्यामुळे मी संकुचित झालो होतो आता देहाभिमानाचा त्याग केल्यामुळे सर्वत्र सुकाळ झाला आहे. आता जन्म मरणाचे सुतक फिटले मी माझ्या संकुचित बुद्धी मुळे हरी पासून दूर झालो होतो पण नारायणानेच त्याच्या ठिकाणी आश्रय दिला व मी माझा भक्तिभाव नारायणाच्या चरणावर ठिकाणी ठेवून राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या परमार्थिक मरणाचा प्रकार आपल्या अंगी लावून घेतला व अनुभवला आहे मगच या सर्व जगाला माझा अनुभव मी सांगत आहे.
अभंग क्र. १४५९
बोळविला देह आपुलेनि हाते । हुताशिली भूते ब्रह्माग्नीस ॥१॥
एकवेळे जाले सकळ कारण । आता नारायण नारायण ॥धृपद॥
अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगे तये ठायी हारपली ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥३॥
अवघी कर्मे जाली घटस्पोटापाशी । संबंध एकेसी उरला नाही ॥४॥
तुका म्हणे आता आनंदी आनंदु । गोविंदी गोविंदु विस्तारला ॥५॥
अर्थ
मी माझ्या हाताने माझ्या देहाची बोळवण केली आहे आणि सोहंम या ज्ञानाग्नीने पंचमहाभूते जाळून टाकले आहे आता सर्व कार्य पूर्ण झाले असून फक्त नारायणा नारायणा नाम चिंतन करणे बाकी आहे. ज्ञानाग्नीने पेटलेली चिता मोक्ष रुपी अमृत संजीवनी व योगाने शांत केली आहे. एकादशीच्या दिवशी उपवास व हरी जागरण केले व बाराव्या दिवशी भोजन केले. देवाच्या पायाजवळ देहरुपी घट सोहंम या बोधाने फोडला त्यामुळे सर्व देहाची कर्मे समाप्त झाली. आता केवळ हरीच्या नामाशी संबंध राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता सगळीकडे आनंदीआनंद झाला असून जिकडेतिकडे मला गोविंदच गोविंद दिसत आहे.
अभंग क्र. १४६०
पिंडदान पिंडे ठेविले करून । तिळी तिळवण मूळत्रयी ॥१॥
सारिले संकल्प एका चि वचने । ब्रह्मी ब्रम्हपण सेवटीच्या ॥धृपद॥
सव्य अपसव्य बुडाले हे कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥
पित्यापुत्रत्वाचे जाले अवसान । जनी जनार्दन अभेदेंसी ॥३॥
आहे तैसी पूजा पावले सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥
तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार । आता नमस्कार शेवटींचा ॥५॥
अर्थ
विष्णू पदी मी माझा देह अर्पण करून पिंडदान केले आहे. आणि अहंकार, महतत्व, अज्ञान या तीन मूळत्रयांना तिलांजली दिली आहे आणि शेवटी ब्रह्मार्पणमस्तू या एका वाक्याने सर्व संकल्प नाहीसे केले. सर्व जग विष्णुमय आहे हे रहस्य समजले व माझे सर्व सव्य अपसव्य कर्म करण्याचे संपले. अभेद तत्त्वामुळे सर्व जनार्धनच आहे हे समजून आले. व त्यामुळे पिता-पुत्र हे नाते संपले नाहीसे झाले. शास्त्रात सांगितलेल्या प्रमाणे पिंड पूजा झाली आणि त्यामुळे मला श्रद्धाचा पर्व काळ सहज साध्य झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे मी पिंडदान केल्यामुळे माझ्या सर्व कुळांचा उद्धार मी केला आता त्या जनार्दनाला माझा शेवटचा नमस्कार आहे.
अभंग क्र. १४६१
सरले आता नाही । न म्हणे वेळकाळ काही ॥१॥
विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमे पान्हायेली ॥धृपद॥
सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठुर नाही राग ॥२॥
भेदाभेद नाही । तुका म्हणे तिच्याठायी ॥३॥
अर्थ
विठू माऊली कडे काही मागावयास जर गेलो तर माझ्याकडील संपले तुम्हाला वेळ काही समजत नाही का असे ती विठू माऊली केव्हाच म्हणत नाही. माझी विठ्ठल माऊली कृपाळू आहे ती सदासर्वकाळ प्रेमपान्हा भक्तांना सोडते आहे. ती विठू माऊली भक्तांना मुळे आपल्याला किती त्रास होतो याचा विचार कधीही करत नाही. भक्तांविषयी कधीच ती विठू माऊली निष्ठुर नसते आणि भक्तांवर ती कधीही रागवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल माऊली जवळ भेदाभेद अजीबात नाही.
अभंग क्र. १४६२
तुज पाहावे हे धरितो वासना । परि आचरणा ठाव नाही ॥१॥
करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥धृपद॥
बाहिरल्या वेषे उत्तम दंडीले । भीतरी मुंडले नाही तैसे ॥२॥
तुका म्हणे वाया गेलोंच मी आहे । जरि तुम्ही साह्य न व्हा देवा ॥३॥
अर्थ
देवा तुला पहावे अशी इच्छा मी करत आहे परंतु तुझी भेट व्हावी असे आचरण माझे मात्र नाही. देवा तू माझा अभिमान धरला आणि तुझ्या सत्तेने तू माझा कैवारी झाला तर मला तुझ्या पायाचे दर्शन होईल. देवा मी माझ्या बाह्य रूपाने माझ्या शरीराला उत्तम प्रकारे रंगविले आहे परंतु माझ्या अंतरंग मध्ये मनाचे मुंडण मी केले नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही मला सहाय्य केले नाही तर मी वाया जाईल.
अभंग क्र. १४६३
दुष्ट आचरण ग्वाही माझे मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥
आता तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसे केले ॥धृपद॥
व्याह्याजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिज तो काळ नव्हे काही ॥२॥
तुका म्हणे आता जालो शरणागत । पुढिल उचित तुम्हा हाती ॥३॥
अर्थ
देवा माझे आचरण किती वाईट आहे याला माझे मनच जाणते आहे, साक्षी आहे आणि माझे गुणदोष मलाच माहित आहेत. हे पांडुरंगा तुम्ही सर्वच जाणता मग प्रसंग पाहूनच तुम्ही माझ्याशी वागावे. व्याही आणि जावई यांच्या पंक्तीला जर एखादा अन्ना विषयी भुकेलेला दरिद्री येऊन बसला तर त्याला जेवण खाऊन न घालता तिथून हाकलून देणे योग्य ठरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे देवा पांडुरंगा मी तुम्हा संत आणि भगवंत यांच्या पंक्तीत येऊन बसलो आहे आता तुम्हाला मी शरण आलो आहे यापुढे काय योग्य आहे व काय अयोग्य आहे हे तुम्हीच करावे.
अभंग क्र. १४६४
आता भय नाही ऐसे वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥
आता माझ्या मने धरावा निर्धार । चिंतनी अंतर न पडावे ॥धृपद॥
येथे नाही जाली कोणांची मिरास । आल्या याचकास कृपेविशी ॥२॥
तुका म्हणे येथे नाही दुजी परी । राया रंका सरी देवा पायी ॥३॥
अर्थ
समर्थांची सेवा घडल्यामुळे मला कोणाचेही भय राहिले नाही. असे वाटते देवा आता माझ्या मनाने हाच निर्धार धरावा की, तुझ्या चिंतनात अंतर पडू देऊ नये देवाजवळ कृपे विषय दान मागण्यासाठी कधीच व कोणाचीही निराश झालेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ कोणताही भक्त येवो मग तो राजा असो किंवा रंक असो त्या दोघावरही देवाची सारखीच कृपा असते.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















