आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१४ मे, दिवस १३४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १५९७ ते १६०८
“१४ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १४ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १४ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५९७ ते १६०८ चे पारायण आपण करणार आहोत.
१४ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी १७६ ते २००,
176-11
म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवो । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तू ॥176॥
म्हणून तो देवांचाहि देव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ज्या दृष्टिने माझ्या विश्वरूपाचा ठाव घेशील, अशी दृष्टि तुला देतो.
177-11
ऐसी श्रीमुखौनि अक्षरे । निघती ना जव एकसरे । तव अविद्येचे आंधारे । जावोचि लागे ॥177॥
श्रीकृष्णाच्या मुखातून अशी अक्षरे निघाल्याबरोबर एकदम अविद्यारूपी अंधकार नाहीसा झाला.
(सर्वाच्या अंतःकरणात ज्या परमेश्वराचा अखंड वास आहे व ज्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करावयाचा असतो, तोच परमात्मा अर्जुनाला बाहेर सद्गुरुरूपाने प्राप्त झाला, तर त्या सत्यसंकल्प परमेश्वराने दिव्यदृष्टि देतो असा संकल्प केल्याबरोबर अविद्या अंधकार नाहीसा व्हावा यात आश्चर्य नाही. तोच अंतर्यामी परमात्मा आत्मज्ञानाच्या रूपाने प्रगट होतो व भक्ताच्या अंतःकरणातील अविद्या अंधकार नाहीसा करतो. अविद्या अंधःकार नाहीसा होऊन ज्ञानदृष्टीने पाहिले जाणारे विश्वरूपहि अर्थातच खोटे असणे शक्य नाही. )
178-11
ती अक्षरे नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागी चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णे ॥178॥
श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताचे मुखातून ” मी तुला दिव्यदृष्टि देतो ” ही जी अक्षरे निघाली ती अक्षरे नव्हती, ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखविणारी ज्योती होती. ती ज्ञानज्योती अर्जुनाकरिता भगवंतांनी उजळली होती.
(भगवंतानी अर्जुनाला जी दिव्य दृष्टि दिली, ती ” चित्कळिका ” म्हणजे चैतन्याची ज्योती होती आणि ती ” ब्रह्मसाम्राज्यदीपिका ” म्हणजे परब्रह्माचा संपूर्ण नामरूपात्मक आविष्कार सच्चिदानंदस्वरूप आहे असा प्रत्यय आणून देणारी होती, हे श्री ज्ञानेश्वरमाऊलींनीच येथे स्पष्ट केले आहे. )
179-11
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ॥179॥
मग (भगवंतांनी म्हटल्याबरोबर) अज्ञानांधःकार नाहीसा होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे, त्याला सर्वत्र एक अस्फुट अद्वैत श्रीकृष्णवस्तुच आहे, अशी ज्ञानदृष्टि प्राप्त झाली. या प्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर्य दाखविले.
180-11
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रीचे का कल्लोळ । विश्व हे मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥180॥
संपूर्ण अवतार हे त्या समुद्राचे तरंग असून जग त्याच्या वृत्तिरूप किरणामुळे दिसणारे मृगजळ आहे.
(भगवंताचा सगुण साकार विग्रह व सगुण साकार जगत् या दोहोंमध्ये असा फरक आहे, हे या ओवीतून माऊलिंनी दाखविले आहे. सर्व कैवल्यद्वैतवादी आचार्य व श्रीज्ञानेश्वर महाराजादि संत यांनी सच्चिदानंदपरब्रह्माहून भिन्न भासणारे जीव, जगत्, परमात्मा, अवतार यांचे परब्रह्माशी ऐक्य आहे हे सांगण्यांकरिता, परब्रह्माचे ठिकाणी हे निवर्तरूप आहे असे मानले आहे. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-11
जिये अनादिभूमिके निटे । चराचर हे चित्र उमटे । आपणपे श्रीवैकुंठे । दाविले तया ॥181॥
सच्चिदानंदनामरूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हे चराचरविश्वाचे चित्र उमटते, ते विश्वरूप आपणच आहो असे भगवंतांनी अर्जुनाला दाखविले.
182-11
मागा बाळपणी येणे श्रीपती । जै एक वेळ खादली होती माती । तै कोपोनिया हाती । यशोदा धरिला । 182
मागे एकदां जेव्हा भगवंतांनी बाळपणी माती खाल्ली होती, तेव्हा यशोदेने रागावून त्यांना हाताप धरलें.
183-11
मग भेणे भेणे जैसे । मुखी झाडा द्यावयाचेनि मिसे । चवदाही भुवने सावकाशे । दाविली तिये ॥183॥
तेव्हा मग भगवान श्रीकृष्णाने ‘भ्यालो’असे दाखवून ‘मी माती खाल्ली नाही’ हे दाखविण्याकरिता. तोंड उघडले असता, आपल्या तोंडात चौदाहि भुवनाची सृष्टि यशोदेला दाखविली
184-11
ना तरी मधुवनी ध्रुवासि केले । जैसे कपोल शंखे शिवतले । आणि वेदांचियेही मती ठेले । ते लागला बोलो ॥184॥
किंवा मधुवनांत तपःश्चर्या करीत असलेल्या व भगवंताची स्तुति करू इच्छिणार्या ध्रुवाचे गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श केल्याबरोबर जे वेदालाहि अगम्य, ते तो बोलू लागला.
185-11
तैसा अनुग्रहो पै राया । श्रीहरी केला धनंजया । आता कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेचि तो ॥185॥
संजय म्हणतो. राजा धृतराष्ट्रा ! भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनावर तशीच कृपा केली. त्यामुळे माया व तिचा कार्यपसारा या शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते.
186-11
एकसरे ऐश्वर्यतेजे पाहले । तया चमत्काराचे एकार्णव जाहले । चित्त समाजी बुडोनि ठेले । विस्मयाचिया ॥186॥
एकसारखे जिकडे तिकडे ऐश्वर्यतेजच प्रकाशमान झालेले दिसू लागले. तो आश्चर्याचा सर्वत्र समुद्रच पसरलेला आहे. असे पाहू लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुदायात बुडून गेले.
187-11
जैसा आब्रह्म पूर्णोदकी । पव्हे मार्कंडेय एकाकी । तैसा विश्वरूप कौतुकी । पार्थु लोळे ॥187॥
ब्रह्मलोकांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले असता, ज्याप्रमाणे एकटे मार्कंडेय ऋषीच त्या जलात पोहत असतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेल्या विस्मयसमुद्रावर अर्जुनहि लोळू लागला.
188-11
म्हणे केवढे गगन एथ होते । ते कवणे नेले पा केउते । ती चराचर महाभूते । काय जाहली ? ॥188॥
अर्जुन म्हणतो. (मी विश्वरूप पाहण्यापूर्वी) येथे केवढे मोठे आकाश होते, ते आता कोणी कोठे नेले समजत नाही आणि त्या आकाशात दिसणारी भूतसृष्टिही काय झाली कोणाला माहित
189-11
दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणो जाहले । चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥189॥
दिशांचा ठावठिकाण राहिला निही. खाली-वर या दिशाहि काय झालं समजत नाही ?ज्याप्रमाणे जागे झाल्यावर संपूर्ण स्वप्न मावळते, तसे संपूर्ण लोकालोकाचा प्रत्यय नाहीसा झाला.
190-11
नाना सूर्यतेजप्रतापे । सचंद्र तारांगण जैसे लोपे । तैसी गिळिली विश्वरूपे । प्रपंचरचना ॥190॥
किंवा सूर्य उगवल्याबरोबर, त्याच्या प्रखर तेजाने, ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात लोपून जातात, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंचभाव नाहीसा झाला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-11
तेव्हा मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपे न सांवरे । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥191॥
(अशी विश्वरूपाने सर्व प्रपंचरचना गिळलेली पाहून) अर्जुनाच्या मनाचे मनपण स्फुरत नव्हतें- म्हणजे मनाचा बाह्यविषयाविषयी होणारा संकल्पविकल्पात्मक व्यापार बंद पडला. बुध्दि निश्चयाचा व्यापार करीनाशी झाली व इंद्रियांच्या प्रवृत्ति माघार्या होऊन ह्रदयाच्या ठिकाणी एकवटल्या
192-11
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले । टकासी टक लागले । जैसे मोहनास्त्र घातले । विचारजाता ॥192॥
जणूंकाय मोहनास्र घालून संपूर्ण विचार बंद पडावे, त्याप्रमाणे ताटस्थहि तटस्थ राहिले- म्हणजे साक्षित्वहिं आठवेनासे झाले – एकसारखे टक लावून विश्वरूपाकडे पाहणे हेहि विसरला.
193-11
तैसा विस्मितु पाहे कोडे । तव पुढा होते चतुर्भुज रूपडे । तेचि नानारूप चहूकडे । मांडोनि ठेले ॥193॥
असा आश्चर्यकारक होऊन कौतुकाने तो पाहू लागला, तेंव्हि त्याला असे दिसले की आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णाची तीच सर्वत्र अनेक नामरूपात्मक झाली.
194-11
जैसे वर्षाकाळीचे मेघौडे । का महाप्रळयीचे तेज वाढे । तैसे आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरो ॥194॥
ज्याप्रमाणे वर्षाऋतुत जिकडे तिकडे मेघच मेघ दिसतात किंवा प्रलयात वाढलेले तेज जिकडे तिकडे दिसते, त्याप्रमाणे भगवंतानी आपल्यावाचून कोठेच काही उरू दिले नाही सर्वत्र नामरूपाने एक परमात्मा श्रीकृष्णच अनुभवाला येत होता, असा अर्थ.
195-11
प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तव विश्वरूप देखे ॥195॥
प्रथम अर्जुन आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने पूर्ण समाधान पावला व मग लगेच डोळे उघडून पाहतो तो त्याला विश्वरूप दिसू लागले.
196-11
इहीचि दोही डोळा । पाहावे विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णे सोहळा । पुरविला ऐसा ॥196॥
याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्व पाहावे, अशी जी अर्जुनाची इच्छा होती, ती भगवान श्रीकृष्णांनी, पुढे सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली.
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥11. 10॥
अर्थ ज्यामधे अनेक मुखे व नयन होते, ज्यामधे अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले (विश्वरूप दर्शनाचा अर्जुनाच्या मनावरील प्रथदर्शनी परिणाम, मुखे, हात, दागिने डोळे पहातो – 195)
197-11
मग तेथ सैंघ देखे वदने । जैसी रमानायकाची राजभुवने । नाना प्रगटली निधाने । लावण्यश्रियेची ॥197॥
वैकुंठासारखे किंवा सौंदर्यलक्ष्मीचे ठेवेच पसरल्याप्रमाणे भगवंताची तोंडे जिकडे तिकडे दिसत होती.
198-11
की आनंदाची वने सासिन्नली । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसी मनोहरे देखिली । हरीची वक्त्रे ॥198॥
किंवा आनंदाची वनेच भरास आली अथवा संपूर्ण सौंदर्याचे राज्य दिसावे- म्हणजे निःसीम सौंदर्यवान अशी ती, भगवान विश्वरूपाची अत्यंत मनोहर मुखे अर्जुनाने पाहिली.
199-11
तयांही माजी एकैके । सावियाचि भयानके । काळरात्रीची कटके । उठवली जैसी ॥199॥
तेथेच पुनः काही मुखे काळरात्रीच्या सैन्याने उठाव केल्याप्रमाणे खरोखर अत्यंत भयानक अशी होती.
200-11
की मृत्यूसीचि मुखे जाहली । हो का जे भयाची दुर्गे पन्नासिली । की महाकुंडे उघडली । प्रळयानळाची ॥200॥
किंवा मृत्युलाच मुखे प्राप्त झाली किंवा भयंकर भीतिचे किल्लेच पसरलेले आहेत किंवा प्रलयकालाच्या अग्नीची कुंडे उघडी केली जावीं.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १३४ वा, १४, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५९७ ते १६०८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १५९७
नको नको मना गुंतू मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा । सोडविना तेव्हा मायबाप ॥धृपद॥
सोडवीना राजा देशीचा चौधरी । आणीक सोइरी भली भली ॥२॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वाचूनिया ॥३॥
अर्थ
हे मना तू प्रपंचाच्या मोहजाळात मायाजाळामध्ये गुंतू नकोस तुला गिळून टाकण्याकरता काळ जवळ आला आहे. ज्यावेळी तुझ्यावर काळाची झडप पडेल तेव्हा तुला त्याच्यातून तुझे मायबाप देखील सोडवणार नाहीत. त्यावेळी तुला देशाचा राजा चौधरी आणि इतरही तुझे मोठे मोठे नातेवाईकही सोडविणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “एका चक्रपाणीवाचून तुला त्यावेळी कोणीही सोडविणार नाहीत. ”
अभंग क्र. १५९८
पुढे जाणे लाभ घडे । तेचि वेडे नासती ॥१॥
येवढी कोठे नागवण । अंधारुण विष घ्यावे ॥धृपद॥
होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरू ते ॥२॥
तुका म्हणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥
अर्थ
एखादया सत्कर्माने पुढे लाभ होणार आहे हे माहित असले तरी हे वेडे लोक त्याचा नाश करतात. अंधारामध्ये विष घ्यायचे आणि कोणाला कळूही देखील दयायचे नाही एवढा कोठे आत्मघातकीपणा असतो काय ? पुढे होणा-या घटनाला अनुसरुनच कर्म करण्याची बुध्दी आपोआप तयार होते व असे कर्म करु नये अशी सावधगिरी ठेवण्याची शुध्दही त्यावेळी राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “असे अनेक लोक आहेत की जे स्वत:ला शहाणे समजतात व अनेक प्रकारचे सोंग लोकांमध्ये दाखवतात अनेक प्रकारचे रंग दाखवतात. ”
अभंग क्र. १५९९
ऐका गा हे अवघे जन । शुद्ध मन ते हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावा ॥धृपद॥
नाही कोणी सवे येता । संचिता या वेगळा ॥२॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रिये ॥३॥
कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥
तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥
अर्थ
मी सर्व लोकांना हे सांगत आहे की आपले मन शुध्द करा यानेच आपले हित होणार आहे. प्रत्येक वेळी मन शुध्द करुन राहाता येत नसले तरी देखील वेळप्रसंगी सावधान राहावे. कारण तुमच्याबरोबर कोणीही येत नाही केवळ तुमचे संचित कर्मच तुमच्याबरोबर राहाते. काळाने आणखी तुमच्यावर झडप घातलेली नाही त्यामुळे तुम्हाला अजून बराच अवकाश आहे व या कारणामुळे तुमचे सर्व इंद्रिय परमार्थ मार्गाला लावा. ही कर्मभूमी अशी आहे आपण येथे जे प्रयत्न करु ते घडू शकते अशा महिमा या कर्मभूमीचा आहे त्यामुळे आपल्या हिताचा जो व्यवसाय आहे तो “परमार्थ” करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला हा मोठा लाभ आहे त्यामुळे आपण या नरदेहाचा उपयोग परमार्थ करण्याकरता करावा कारण हा देह घडीघडीने वाया जात आहे याचा विचार करावा. ”
अभंग क्र. १६००
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥
ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचे तोंड ॥धृपद॥
संतचरणी ठेविता भाव । आपेआप भेटे देव ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥
अर्थ
संतसेवा करण्याकरता जो अंग चोरतो म्हणजे कंटाळा करतो अशा अधम व्यक्तीवर माझी दृष्टी देखील पडू नये. अशा दुष्ट माणसाची रांड आई तिने याला जन्मच का दिला असेल तिचे तोंड जळून जावो. संतांच्या चरणी भक्तीभाव ठेवला की देव आपोआप भेटतो. तुकाराम महाराज म्हणतात, “संतसेवा करणे हाच माझा पूर्वजांचा ठेवा आहे. ”
अभंग क्र. १६०१
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझे माझे ॥१॥
सळे धरोनि बैसला काळ । फाको नेदी घटिका पळ॥धृपद॥
का रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥
हित कळोनि असता हाती । तोंडी पाडोनि घेसी माती ॥३॥
तुज ठाउके मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥
तुका म्हणे वेगे । पंढरिराया शरण रिघें ॥५॥
अर्थ
अरे तुझ्या आयुष्यातील कितीतरी काळ, घटका, पळ गेले आहेत तरी या भव सागरातील उपाधींना तू माझे माझे असे का म्हणत आहेस ? हा काळ हातात सळ घेऊन बसला आहे तुझ्या आयुष्यातील शेवटची वेळ आली की तो काळ तुला एक पळ, एक घटका देखील इकडेतिकडे होऊ देणार नाही. अरे तुझे केस पिकले, तुला कानाने ऐकायला कमी झाले, डोळ्याने दिसायला कमी झाले तरी तुला अजून कसे कळत नाही ? अरे हित तुला समजत नाही तरी तुझ्या तोंडात माती पाडून तू घेत आहेस. अरे तुला माहित आहे की एक दिवस मी देखील जाणार आहे तरीदेखील घर कुठे बांधावे, त्याचा पाया कोठे घ्यावा, म्हणजे घर मजबूत होईल ते चांगले झाले पाहिजे याविषयी शोध घेतो. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू वेगाने पंढरीराया ला शरण जा.
अभंग क्र. १६०२
आता माझ्या मायबापा । तू या पापा प्रायिश्चत्त ॥१॥
फजित हे केले खळ । तो विटाळ निवारी ॥धृपद॥
प्रेम आता पाजी रस । करी वास अंतरी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥
अर्थ
हे माझ्या मायबापा आता तूच माझ्या पापाला प्रायचित्त देऊ शकतो. देवा ते पाप म्हणजे मी आजपर्यंत अनेक दुष्ट, अज्ञानी, वेड्या मनुष्यांची बोलून फजिती केली त्याचा मला विटाळ झाला आहे तो विटाळ तूच निवारण करून टाक. देवा आता तू मला तुझा प्रेम रस पान द्यावे आणि माझ्या अंतःकरणात तुझा वास कर. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तूच माझ्या जिवाचा जिवलग आहेस.
अभंग क्र. १६०३
का रे न पवसी धावण्या । अंगराख्या नारायणा ॥१॥
अंगी असोनिया बळ । होसी खटयाळ नाट्ट्याळ ॥धृपद॥
आम्ही नरकासी जाता । काय येईल तुझ्या हाता ॥२॥
तुका म्हणे कान्हा । क्रियानष्टा नारायणा ॥३॥
अर्थ
देवा तू अंगाराखून काम करणारा आहेस तुला जर मी हाक मारली तर तू का येत नाहीस ? देवा तुझ्या अंगी असे बळ आहे की तू हवे ते करू शकतोस तरीही तू असा खट्याळ आणि नाठाळ का झालास. ? अरे देवा आम्ही जर नरकाला गेलो तर तुझ्या हाताला काय येणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात हे कृष्णा, कान्हा, नारायणा तू क्रिया नष्ट आहेस.
अभंग क्र. १६०४
माझे पाय तुझी डोई । ऐसे करि गा भाक देई ॥१॥
पाहता तव उफराटे । घडे तई भाग्य मोठे ॥धृपद॥
बहु साधन मोलाचे । यासी जोडा दुजे कैचे ॥२॥
नका अनमानू विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥३॥
अर्थ
देवा माझे पाय असावे आणि तुझे डोके असावे असे काहीतरी करण्याचे वचन तू मला दे. असे पाहिले तर हे उरफाटे दिसते पण असे जर घडले तर मी माझे मोठे भाग्य समजेल. हे साधन खूप मोलाचे आहे आणि या साधनाला दुसऱ्या कोणत्या साधनांची जोड असू शकेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला जे काही मागितले आहे ते फार विचारपूर्वक मागितले आहे ते तुम्ही आम्हाला देण्यास हायगय करू नका कारण यापूर्वी आम्हाला तसा धडा झाला आहे.
अभंग क्र. १६०५
पवित्र ते अन्न । हरीचिंतनी भोजन ॥१॥
येर वेठया पोट भरी । चाम मसकाचे परी ॥धृपद॥
जेऊनि तो धाला । हरीचिंतनी केला काला ॥२॥
तुका म्हणे चवी आले । जे का मिश्रित विठ्ठलें ॥३॥
अर्थ
हरिचिंतन चालू असताना जे अन्नसेवन केले जाते ते अन्न पवित्र आहे. हरिचिंतन केल्याशिवाय अन्न भक्षण करणे म्हणजे ते चामड्याच्या पिशवीत काहीतरी भरावे असेच होते. हरिचिंतन करता करता अन्नाचा काला करूनच जो जेवण करतो तो खरा तृप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात भोजन करताना विठ्ठल नाम घेतले तर त्या अन्नाला मोठी गोडी येते.
अभंग क्र. १६०६
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥
अंध पारखी माणिके । बोलविशी स्पष्ट मुके ॥धृपद॥
काय नाही सत्ता । हाती तुझ्या पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे मूढा । मज चेष्टविले जडा ॥३॥
अर्थ
हे पुरुषोत्तमा हा तुझ्या चरणाचा महिमा आहे. तो महिमा म्हणजे असा आहे की अंध व्यक्तीला देखील माणिक मोत्याची चांगल्याप्रकारे पारख होऊ शकते आणि मुका व्यक्ती स्पष्ट बोलू शकतो. हे पंढरीनाथा तुझ्या हातात कोणती सत्ता नाही ? तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा तू तर माझ्या सारख्या अज्ञानी व्यक्तीकडूनही काव्य करून घेतले आहेस.
अभंग क्र. १६०७
बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥
पुढे घालुनिया सत्ता । न्यावे पतना पतिता ॥धृपद॥
आचरणे खोटी । केली सलताती पोटी ॥२॥
तुका म्हणे देवा । नाही भजन केली सेवा ॥३॥
अर्थ
प्रारब्ध, कर्म हे फार बलवंत असतात त्यामुळे तेच शरीराला भोग घडवितात. प्रारब्ध कर्म पापी मनुष्याला पुढे घालून आणखी पतनाला नेत असतात. जे वाईट कर्मे केलेली असतात, जे वाईट आचरण केलेले असतात ते पोटात सलतात कारण त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्याणे तुझे भजन आणि सेवा केली नाही त्याच्याकडून तर नक्कीच पाप घडते असते.
अभंग क्र. १६०८
जननिया बाळका रे घातले पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारितया चहू कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हाती भाव दावी खेळणा ॥१॥ निजी रे निजी आता । म्हणोनि परिये दे माता । खेळता कष्टलासी बाळा तू रे नेणता । निजी रे निजी आता ॥धृपद॥ खेळता बाहेरि रे मुला लोकांच्या सवे । बागुल काळतोंडा नाही नेतो ते ठावे । खेळता दुश्चित्ता रे देखोनि ते न्यावे । म्हणोनि सांगे तुज शीघ्र वचन पाळावे ॥२॥ संचित मागे तुज शुद्ध होते सांगाती । तेणे तुज वांचविले वेरझारिया हाती । आणीक नेली मागे काय जाणो ती किती । आलासि येथवरी थोर पुण्ये बहुती ॥३॥ खेळता शुक देवा तो रे लागला पाठी । लपाला वरुषे बारा तिये मातेचे पोटी । रिघता बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणे रिघें कपाटी ॥४॥ खेळता चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे काप अंगी सुख नाठवे दुःख । आप पर ते ही नाही देहभाव सकळिक ॥५॥ शिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिले हाती । टाकिले तयावरी खुणे गोविला अंती । पावला मायबाप हिरोन घेतला हाती ॥६॥ बांधले अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाके कळले मायबापासी । घातली धाव नेटे वेगी पावला त्यासी । हिरोनि नेली दोघे आपणया ती पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहे निश्चळ । खेळता दुश्चिता रे नको जाऊ बरळ । टोकताहे तुजलागी दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवू रे नेत्री घाली पडळ ॥८॥ ऐसी ती कृपावंते बाळा मोहिले चित्त । सुस्वरे कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणे ते चित्त राहे होऊनिया निवांत । पावती तुका म्हणे नाही विश्वास तो घात ॥९॥
अर्थ नाही टाका
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















