आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

८ ऑक्टोबर, दिवस २८१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३६१ ते ३३७२
“८ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 8 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ८ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३६१ ते ३३७२ चे पारायण आपण करणार आहोत.
८ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी २२६ ते २५०,
226-17
नाना कळावैषम्ये चंद्रु । का सांडिला आधी नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळे ॥226॥
किंवा कलाहीन चंद्र, चिंतारहित राजा अथवा मंदर पर्वतावाचून समुद्र. 26
227-17
तैसी नाना विकल्पजाळे । सांडुनि गेलिया सकळे । मन राहे का केवळे । स्वरूपे जे ॥227॥
ह्याप्रमाणे सर्व दूषने अथवा विकल्परहित अशी जी मनाची केवलस्थिति. 27
228-17
तपनेवीण प्रकाशु । जाड्येवीण रसी रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥228॥
उष्णतेवाचून प्रकाश, जडत्वावाचून अन्न किंवा पोकळीवाचून आकाश, अशी जी स्थिति. 28
229-17
तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिके । हिवो नेदी निजांग ॥229॥
तसे आपण आहो असे जाणून जे मन आपला स्वभाव टाकते (चंचलता, संकल्प, विकल्प) म्हणजे थंडीलाच जशी थंडीची बाधा होत नाही, तसे ते स्वरूपस्थितीला पावले. 29
230-17
तैसे न चलते कळंकंवीण । शशिबिंब जैसे परीपूर्ण । तैसे चोखी शृंगारपण । मनाचे जे ॥230॥ बु
अचल, कलंकरहित परिपूर्ण चंद्रबिंब जसे असावे त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपी मनाची जी विश्रांति किंवा स्थापना. 230
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-17
जाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥231॥
या स्थितीत वैराग्याची इच्छा नाहीशी होऊन, मनाचे चांचल्य मोडून आमबोधाचे अंकुर यावे असा वाफसा त्या मनाच्या ठिकाणी तयार असतो. ( ते आत्मबोधाचे अधिकारी होते ) 31
232-17
म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावे जे वक्त्र । ते वाचेचेही सूत्र । हाती न धरी ॥232॥
म्हणून, अशा स्थितीत ज्या वाणीने शास्त्राध्ययन व विचार करावयाचा ती एक शब्दही उच्चारण्यास प्रवृत्त होत नाही. 32
233-17
ते स्वलाभ लाभलेपणे । मन मनपणाही धरू नेणे । शिवतले जैसे लवणे । आपुले निज ॥233॥
व मिठाने आपले मूल तत्त्व जे पाणी त्याला पावून जसे निजस्वरूप टाकावे, त्याप्रमाणे, आत्मलाभाच्या लाभलेपणाने संतुष्ट होणाऱ्या त्या मनाला मनपणाही उरत नाही इत्यर्थः 33
234-17
तेथ के उठिती ते भाव । जिही इंद्रियमार्गी धाव । घेऊनि ठाकावे गाव । विषयांचे ते ॥234॥
अशा स्थितींत, इंद्रियद्वारा धाव घेऊन विषयग्राम गांठावे, इत्यादि विकार तेथे उत्पन्न होण्याला अवसरच कोठला ? 34
235-17
म्हणौनि तिये मानसी । भावशुद्धिचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहातासी ॥235॥
म्हणून तळहात जसा रोमरहित सहजच असतो, त्याप्रमाणे अशा स्थितींतील मन सहजच शुद्ध किंवा विकल्प रहित असते. 35
236-17
काय बहु बोलो अर्जुना । जै हे दशा ये मना । तै मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥236॥
अर्जुना, फार काय सांगावे ? मनाची जेव्हा अशी स्थिति होते तेव्हा ते मानसतप ह्या संज्ञेला पात्र होते. 36
237-17
परी ते असो हे जाण । मानस तपाचे लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितले ॥237॥
पण, ते असो; हे सांगितले ते मानसतपाचे संपूर्ण लक्षण असे जाण. 37
238-17
एवं देहवाचाचित्ते । जे पातले त्रिविधत्वाते । ते सामान्य तप तूते । परीसविले गा ॥238॥
असे कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन रूपांचे तप म्हणजे काय हे तुला सामान्यत्वे ऐकविले. 38
239-17
आता गुणत्रयसंगे । हेचि विशेषी त्रिविधी रिगे । तेही आइक चांगे । प्रज्ञाबळे ॥239॥
आता तीन गुणांच्या संगाने हेच तप तीन प्रकारचे कसे होते तेही लक्ष्य देऊन ऐक. 39
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥17. 17॥
240-17
तरी हेचि तप त्रिविधा । जे दाविले तुज प्रबुद्धा । तेचि करी पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥240॥
तरी, अर्जुना, जे हे तीन प्रकारचे कायिक, वाचिक व मानसिक तप तुला सांगितले त्याचेच फलशारहित पूर्ण श्रद्धेने आचरण कर. 240
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-17
जै पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तै तयातेचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥241॥
अरे, पूर्ण शुद्ध मनाने ज्या वेळी ह्या तपाचे श्रद्धायुक्त आचरण केले जाते, तेव्हां, त्याला ज्ञाते सात्विक तप असे म्हणतात. 41
सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥17. 18॥
242-17
नातरी तपस्थापनेलागी । दुजेपण मांडूनि जगी । महत्त्वाच्या शृंगी । बैसावया ॥242॥
किंवा तपाच्या निमित्ताने, इतरांपेक्षा आपले वैशिष्टय दाखविण्याची व मोठेपणा मिरविण्याची व मिळविण्याची जे महत्त्वाकांक्षा धरितात. 42
243-17
त्रिभुवनीचिया सन्माना । न वचावे ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागी ॥243॥
जगांतील सर्व मानमान्यता अन्य कोणाच्या वाट्यास न जाता आपल्याच वाट्यास यावी व भोजनादि समारंभांत आपल्यालाच अग्रस्थान असावे. 43
244-17
विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वे आपलिया यात्रा । कराविया यावे ॥244॥
साऱ्या जगाने आपली स्तुति करावी अशी आपली पात्रता दाखवितो व सर्वानी आपल्या भेटीस यावे अशी जो इच्छा करितो. 44
245-17
लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥245॥
लोकांनी नानाप्रकारे आपलीच स्तुति करावी, इतरांचा आश्रय करू नये, व सर्व महत्त्वाचे भोग आपल्यासच घडावे असे जो इच्छितो. 45
246-17
अंग बोल माखूनि तपे । विकावया आपणपे । अंगहीन पडपे । जियापरी ॥246॥
अंगहीनता म्हणजे कुरूपता झांकण्यासाठी ज्याप्रमाणे एखादा मनुष्य भांगपट्टा थाटमाट करितो, त्याप्रमाणे खरे स्वरूप झांकून आपली लोकात तपी म्हणून प्रसिद्धि व्हावी ह्यासाठी वरून तपाचा खूप आव आणतो. 46
247-17
हे असो धनमानी आस । वाढौनी तप कीजे सायास । तै तेचि तप राजस । बोलिजे गा ॥247॥
हे असो, द्रव्य व मानमान्यतेसाठी सायासाने जे तप केले जाते ते राजस तप होय असे म्हणतात. 47
248-17
परी पहुरणी जे दुहिले । तै ते गुरू न दुभेचि व्याले । का उभे शेत चारिले । पिकावया नुरे ॥248॥
किंवा पहुरणी नामक रोगाने ज्या गाईचे दूध आटते ती गाय व्याली तरीही तिला दूध येत नाही किंवा शेतात उभे असलेले पीक जर गुरांकडून खावविले तर पीक कसे येणार ? 48
249-17
तैसे फोकारिता तप । कीजे जे साक्षेप । ते फळी तव सोप । निःशेष जाय ॥249॥
त्याप्रमाणे, केवल प्रसिद्धीसाठी जे तप केले जाते त्याचे काहीही फल मिळत नसते. 49
250-17
ऐसे निर्फळ देखोनि करिता । माझारी सांडी पंडुसुता । म्हणौनि नाही स्थिरता । तपा तया ॥250॥
शिवाय तप फळाला येत नाही असे दिसतांच ते मध्येच सोडून देतो ह्यामुळे त्याला स्थिरताही नसते. 250
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २८१ वा. ८, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३६१ ते ३३७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३३६१
कामधेनूचे वासरू । खाया न मिळे काय करू ॥१॥
ऐसे आम्हा मांडियेले । विठो त्वां का सांडियेले ॥धृपद॥
बैसोनि कल्पद्रुमातळी । पोटासाठी तळमळी ॥२॥
तुका म्हणे नारायणा । भले लोकी हे दिसेना ॥३॥
अर्थ
कामधेनूच वासरु आहे परंतू त्याला खायलाच काही मिळत नाही आता त्याला काय करावे ? हे विठोबा अगदी तसेच तुम्ही आमची अवस्था केली आहे तुम्ही आमचा त्याग का केला आहे ? सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष त्याच्याखाली एखादया मनुष्याने बसून पोटासाठी घासभर अन्नासाठी तळमळ करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा तुझे असे वागणे लोकांमध्ये चांगले दिसत नाही. ”
4:19
अभंग क्र. ३३६२
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥
रूप ठसवी न जिवा । अवघा येच ठायी हेवा ॥धृपद॥
कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरी ॥२॥
तुका म्हणे असा । संनिधचि जगदीशा ॥३॥
अर्थ
मी देवावर वेठबिगारीप्रमाणे भक्तीभाव धरणार नाही आणि वरवर भक्तीचे सोंग देखील दाखवणार नाही. मी माझ्या ह्दयामध्ये देवाविषयी भक्तीभाव दृढ ठसवून घेईन आणि त्याच्याच ठिकाणी मी माझा भक्तीभाव दृढ निश्चयपूर्वक ठेवीन. कृपण मनुष्याचे चित्त जसे पैसावर असते नेहमी तो पैशाचे चिंतन करत असतो त्याप्रमाणे मी देवाचे चिंतन करीन एक क्षण देखील मी देवाचे चिंतन करण्यावाचून राहाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे जगदीशा तुम्ही माझ्या निकटच राहा. ”
4:19
अभंग क्र. ३३६३
सर्वसुखा अधिकारी । मुखे उच्चारी हरिनाम ॥१॥
सर्वांगे तो सर्वोत्तम । मुखी नाम हरीचे ॥धृपद॥
ऐशी उभारिली बाहे । वेदी पाहे पुराणी ॥२॥
तुका म्हणे येथे काही । संदेह नाही भरवसा ॥३॥
अर्थ
मुखाने नेहमी हरीनामाचा उच्चार करणाराच सर्व सुखाचा अधिकारी आहे. ज्याच्या मुखामध्ये हरीचे नाम आहे तो सर्वांगाने सर्वोत्तम आहे. असे वेदाने आणि पुराणाने आपले दोन्हीही बाहू वर करुन सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “येथे कोणत्याही प्रकारचा संदेहच येत नाही मी जे काही सांगतो आहे त्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवा. ”
4:19
अभंग क्र. ३३६४
कोडियाचे गोरेपण । तैसे अहंकारीज्ञान ॥१॥
त्यासि आता रिझे कोण । जवळी जाता चीळसवाणे ॥धृपद॥
प्रेतदेह गौरविले । तैसे विटंबवाणे झाले ॥२॥
तुका म्हणे खाणे विष्ठा । तैशा देहबुद्धीचेष्टा ॥३॥
अर्थ
कोड फुटलेल्या मनुष्याला जसे ठिकठिकाणी गोरेपणा आलेला असतो पण तो व्यर्थ ठरतो त्याप्रमाणे अहंकारी मनुष्याला ज्ञान जरी झाले तरी ते व्यर्थच ठरते. आता त्याच्याजवळ कोणीही जाईन कारण त्याच्याजवळ गेले की किळस येते त्याप्रमाणे मनुष्याला ज्ञान जरी प्राप्त झाले परंतू अहंकार जर त्याच्यामध्ये असेल तर संत त्याच्याजवळ तो कधीही जाणार नाही. प्रेताच्या देहाला कितीही श्रृंगारले तरी ते व्यर्थ ठरते अगदी त्याप्रमाणे अहंकारी मनुष्याला कितीही ज्ञान झाले तरी ते विटंबनाचेच कारण ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादयाने देहालाच आत्मा समजणे म्हणजे एक चेष्टेचाच प्रकार तो ठरतो जसे एखादया मनुष्याने विष्ठा खाण्यासारखे घाणरेडी क्रिया करणे त्याप्रमाणेच देहाला आत्मा समजून कोणतेही कर्म केले तरी ते वाईटच कर्म ठरते. ”
4:20
अभंग क्र. ३३६५
व्यापक हा विश्वंभर । चराचर ज्याचेनी ॥१॥
पंढरिराय विटेवरी । त्याचि धरी पाउले ॥धृपद॥
अवघियांचा हाचि ठाव । देवीदेव सकळ ॥२॥
तुका म्हणे न करी सोस । भेदे दोष उफराटे ॥३॥
अर्थ
ज्याच्यापासून चराचर उत्पन्न झाले असा हा विश्वंभर सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे. असा हा परमात्मा पंढरीक्षेत्रामध्ये माझा पंढरीचा राया विटेवर उभा आहे त्यामुळे तुम्ही त्यांचे चरण धरावे. सर्वाचा आश्रय म्हणजे हा माझा पंढरीचा राया आहे. सर्व देवी देवता म्हणजे हा देव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे या पंढरीरायाविषयी तू कोणत्याही प्रकारची चिकित्सा किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद आणि चिकित्सा तू पाहू नकोस जर असे तू केलेस तर उलटा तुला दोष लागेल व तुझ्या हातून पाप घडेल. ”
4:20
अभंग क्र. ३३६६
भुंकुनिया सुने लागे हत्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥
काय त्या मशकेतयाचे करावे । आपुल्या स्वभावे पीडतसे ॥धृपद॥
मातले माकड विटवी पंचानना । घेतले मरणा धरणे तेंणे ॥२॥
तुका म्हणे संता पीडितील खळ । घेती तोंड काळे करूनिया ॥३॥
अर्थ
गावामधे जर एखादा हत्ती आला तर त्या हत्तीच्या मागे कुत्रे भुंकत भुंकत पाठीमागे पळतात हत्तीला त्याचा काहीच परिणाम होत नाही परंतू कुत्रा कष्टी होतो आणि भुंकून भुंकून दु:खी पावतो. हत्तीच्या पुढे ते कुत्रे अगदी चिलटाप्रमाणे आहे ते हत्तीचे काय वाटोळे करणार परंतू त्यांचा स्वभावच भुंकणे आहे आणि त्याचा स्वभावच त्याला त्रासदायक ठरतो. अहो माजलेले वानर सिंहाला छळवते त्यावेळी असे समजावे की त्याने मरणासाठीच धरणे धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “संत हे हत्तीप्रमाणे व बलाढय सिंहाप्रमाणे आहेत आणि दुष्ट लोक हे अगदी कुत्र्याप्रमाणे चिलटाप्रमाणे व वानराप्रमाणे आहेत जरी दुष्टांनी संतांना त्रास दिला त्यांचा छळ केला तरी असे करुन ते दुष्ट लोक आपले तोंड काळे करुन घेतात. ”
4:20
अभंग क्र. ३३६७
गर्जत जावी नामावळी । प्रेमे टाळी वाहोनि ॥१॥
येणे सुखे पुढती धावे । भेटी सवे गोपाळ ॥धृपद॥
लोटांगण घाला तळी । वंदा धुळी संतांची ॥२॥
तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥
अर्थ
हरीनामाची नामावळी मोठया प्रेमाने गर्जना करुन टाळी वाजवून करत जावी. असे जर केले तर सर्व सुख आपल्यापुढे धावत येतात आणि आपली व गोपाळाची भेट होते. संतांच्या पायाजवळ लोटांगण घाला आणि त्यांच्या चरण धुळीला वंदन करा. तुकाराम महाराज म्हणतात, “विठ्ठलाची प्राप्ती करुन घेण्यासाठी त्वरा करा आणि हाच उपदेश लोकांना सांगण्यासाठी आपले दोन्हीही बाहू उभारा. ”
4:20
अभंग क्र. ३३६८
पदोपदी पाया पडणे । करुणा जाण भाकावी ॥१॥
ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥धृपद॥
जोडोनिया करकमळ । नेत्री जळ भरोनि ॥२॥
तुका उभे दान पात्र । पुरवी आर्त विठोबा ॥३॥
अर्थ
पदोपदी देवाच्या पाया पडावे आणि त्याला करुणा भाकावी. आणि म्हणावे हे माझी विश्रांतीस्थान असलेल्या करुणेच्या दयेच्या सागरा तू ये, तू ये. आपले कमलासारखे कर जोडून डोळयामध्ये प्रेमाश्रूरुपी जळ भरुन विनंती देवाला करावी. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा विठोबा मला तुझ्या दानास पात्र कर मी तुझ्यापुढे माझे दोन्ही हात जोडून उभा आहे आणि माझी आर्त इच्छा पूर्ण कर. ”
4:20
अभंग क्र. ३३६९
मृगाचिया अंगी कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥
भाग्यवंत घेती वेचूनिया मोले । भारवाही मेले वाहता ओझे ॥धृपद॥
चंद्रामृते तृप्तिपारणे चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥
अधिकारी येथे घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसे ॥३॥
तुका म्हणे काय अंधळिया हाती । दिले जैसे मोती वाया जाय ॥४॥
अर्थ
हरणाच्या अंगामध्ये कस्तुरी असते व तिचा वास सर्वत्र पसरलेला असतो हरीणच खरा कस्तुरीचा अधिकारी असतो परंतू त्याला अज्ञानामुळे कस्तुरी कोठे आहे व त्याचे मौल्य काय हे माहित नसते. जे भाग्यवंत आहेत तेच चांगल्या वस्तूची मोल देऊन खरेदी करतात परंतू जे ओझे वाहणारे आहेत ते ओझे वाहू वाहूच मरतात. चंद्रामृताचे पान पिऊन चकोर तृप्त होतो आपले पारणे फेडतो तोपर्यंत तो उपाशीच परंतू चंद्रामृताचा आस्वाद चंद्राला घेता येत नाही भ्रमर फुलाचा सुगंधाचा आस्वाद घेतो परंतू फुलाला त्याच्या सुगंधाचा आस्वाद घेता येत नाही. याचा अर्थ असा जो अधिकारी मनुष्य आहे तोच मुख्य सार घेऊ शकतो कारण त्याला तशी हातोटी आलेली असते रत्नाची पारख असलेला मनुष्य जसा रत्नाची पारख करु शकतो अगदी त्याप्रमाणे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याप्रमाणे आंधळयाच्या हातात जर मोती दिला तर तो मोती वायालाच जातो त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील भक्तीचा अधिकार ज्याला आहे त्यानेच भक्ती करावी अन्यथा कोणीही भक्ती केली तर ती व्यर्थ ठरते. ”
4:21
अभंग क्र. ३३७०
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जव नाही चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥
दुजा ऐसा नाही कोणी । जो या काढी भयातूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायीचा ॥धृपद॥
होती गात्रे बेंबळी । दिवस अस्तमाना काळी । हातेवाहेटाळी । जव मोकळी आहेती ॥२॥
का रे घेतलासी सोस । तुज वाटताहे कैसे । तुका म्हणे ऐसे । पुढे कै लाहासी ॥३॥
अर्थ
अहो घाई करा आणि पंढरीची वाट धरा. जोपर्यंत तुम्ही एखादया संकटात सापडले नाहीत आणि तुमच्यावर काळाचा घात झाला नाही तोपर्यंत तुम्ही पंढरीला जाण्याची घाई करा. अहो या पंढरीच्या रायाशिवाय दुसरे कोणीही तुला काळाच्या भयातून बाहेर काढणार नाही. हा मूळ विचार आहे त्यामुळे म्हणूनच तर हा मूळ विचार तुम्ही करा. अहो काम करुन करुन आपले हातपाय सूर्यास्तापर्यंत फार थकून जातात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मोकळीक आहे तोपर्यंत तुम्ही हरीचे नाम घ्या व हाताने टाळी वाजवत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू संसाराविषयी इतका छंद तरी कसा घेतला आहेस. तुला असे वाटते तरी कसे, की तुला पुन्हा मनुष्य देह मिळेलच म्हणून अरे एकदा की हा मनुष्य देहाचा लाभ हातातून गेला की पुढे तू पंढरीला कसा जाशील आणि पंढरीरायाची भक्ती तरी कशी करशील ? ”
4:21
अभंग क्र. ३३७१
सुखाची वस्ती झाली माझे जीवी । तुमच्या गोसावी कृपादाने ॥१॥
रूप वेळावेळा आठवी अंतरी । बैसोनि जिव्हारी राहिले ते ॥धृपद॥
विसावले मन विठ्ठले प्रपंचा । गोडावली वाचा येणे रसे ॥२॥
तुका म्हणे काही नाठवेसे झाले । दुसरे विठ्ठले मज आता ॥३॥
अर्थ
हे माझ्या स्वामी तुमच्या कृपादानामुळेच माझ्या जीवामध्ये सुखाची वस्ती झाली आहे. देवा तुझे रुप माझ्या अंत:करणामध्ये अगदी ठासून बसले आहे आणि तेच मी वेळोवेळा आठवित आहे. देवा तुझ्या नामरसाने माझी वाचा गोडावली आहे आणि माझे मन प्रपंचाला विटले आहे व ते मन तुझ्याच ठिकाणी विश्रांत पावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठाई मला तुझ्यावाचून आता दुसरे काहीही आठवेनासे झाले आहे. ”
4:21
अभंग क्र. ३३७२
येथे आड काही न साहे आणीक । प्रमाण ते एक हेचि झाले ॥१॥
गाऊ नाचु टाळी वाहू गीत छंदे । डोलावू विनोदे अंग तेणे ॥धृपद॥
मथुनिया सार काढिले बाहेरी । उपाधि त त्या येरी निवडिल्या ॥२॥
तुका म्हणे जना लाविली शिराणी । सेविता हे धणी होत नाही ॥३॥
अर्थ
मी जे साधन ठरवले आहे त्यावाचून दुसरे काहीही आडवे आलेले मला सहन होत नाही कारण तेच साधन मला प्रमाण झाले आहे. ते साधन म्हणजे हरीचे गीत गाऊ त्या छंदामध्ये नाचू टाळी वाजवू आणि त्या छंदामध्येच आमचे अंग आनंदाने डोलवू कौतुकाने डौलवू. आम्ही वेदशास्त्राचे मंथन करुन मुख्य साररुपी मी निवडलेले साधन हेच बाहेर काढले आहे आणि योगयागादी उपाध्या बाजूला निवडून टाकल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी देखील लोकांना याच साधनेविषयी म्हणजे हरीच्या नामाविषयी हरीचे गुणगान वर्णन करण्याविषयी त्या छंदामध्ये टाळी वाजवून अंग कौतुकाने डोलवण्याविषयी छंद लावला आहे कारण देवाचे नांव कितीही सेवन केले तरी तृप्ती मात्र होत नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















