आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२ ऑक्टोबर, दिवस २७५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२८९ ते ३३००
“२ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२८९ ते ३३०० चे पारायण आपण करणार आहोत.
२ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ७६ ते १००,
यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥17. 4॥
76-17
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तया बहुतकरूनि मेधा । स्वर्गी आथी ॥76॥
तर ज्यांचे अंत:करण सात्विक श्रद्धयुक्त असते, त्यांच्या बुद्धीचा ओढा प्रायः स्वर्गादि प्राप्तीकडे असतो. 76
77-17
ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकी ॥77॥
ते सर्व विद्या शिकतात, यज्ञक्रियेविषयी चर्चा करतात व आपण कोणता करावा हे ठरवितात; किंबहुना, ते देवलोकाला जातात. 77
78-17
आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसा । खेचरा हन ॥78॥
आणि अर्जुना, ज्यांच्या ठिकाणी राजस श्रद्धेचा पगडा आहे ते राक्षस पिशाचादिकांच्या भजनी लागतात. 78
79-17
श्रद्धा जे का तामसी । ते मी सांगेन तुजपाशी । जे का केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वे ॥79॥
आणि तामस श्रद्धेचे जे लोक त्यांचे लक्षण तुला सांगावयाचे तर ते केवळ पापाची राशि, कठोर व निर्घृण (दयाशून्य) असतात. 79
80-17
जीववधे साधूनि बळी । भूतप्रेतकुळे मैळी । स्मशानी संध्याकाळी । पूजिती जे ॥80॥
ते प्राणिवध करून बळी देतात आणि स्मशानांत सायंकाळी भूतप्रेतादि अमंगळ देवतांची पूजा करतात. 80
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-17
ते तमोगुणाचे सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचे घर । श्रद्धेचे ते ॥81॥
ते तमोगुणचा अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे माहेरघरच होय. 81
82-17
ऐसी इही तिही लिंगी । त्रिविध श्रद्धा जगी । पै हे ययालागी । सांगतु असे ॥82॥
अशी या तीन श्रद्धांची तीन चिन्हे ह्या जगात दिसून येतात; पण तुला अशाकरिता सांगत आहे की, 82
83-17
जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥83॥
त्यातील जी सात्विक श्रद्धा तिचे जतन करून अन्य तद्विरुद्धा ज्या दोन त्यांचा तू त्याग करावा. 83
84-17
हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागुल नोहे तया । कैवल्य ते ॥84॥
अर्जुना, ज्याला अशा सात्विक बुद्धीचे संरक्षण किंवा आधार आहे त्याला ते कैवल्यपद म्हणजे काही बागुलबुवा (कठीण) नव्हे. 84
85-17
तो न पढो का ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हाती ॥85॥
तो, वेद, ब्रह्मसूत्रादि न पढो, शास्त्रो अवगाहन (चर्चा) न करो, किंवा त्याला शास्त्रसिद्धांत हस्तगत नसोत. 85
86-17
परी श्रुतिस्मृतीचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । अनुष्ठाने जगा देत । वडील जे हे ॥86॥
परंतु जे श्रेष्ठ विद्वान श्रुतिस्मृतींच्या अर्थाची जणू मूर्तीच बनून त्यांचा अनुष्ठानाचा जगाला कित्ता घालून देतात. 86
87-17
तयांची आचरती पाउले । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले । तो तेचि फळ ठेविले । ऐसे लाहे ॥87॥
त्यांच्या आचरणाच्या पावलावर टाकून जो सात्विक श्रद्धावान् चालतो, त्याला, त्यांना जे फल मिळते, तेच फल प्राप्त होते. 87
88-17
पै एक दीपु लावी सायासे । आणिक तेथे लाऊ बैसे । तरी तो काय प्रकाशे । वंचिजे गा ? ॥88॥
हे पहा, एकाने सर्व सामग्री जमा करून खटपटने दिवा लावला व तेथे दुसरा आयता येऊन बसला, तर प्रकाश काय त्याच्याशी प्रतारणा करील ? 88
89-17
का येके मोल अपार । वेचोनि केले धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ? ॥89॥
किंवा एखाद्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून घर बांधले आणि कोणी वाटसरू तेथे वस्तीस आला तर त्याला त्या घरातील सुखसोईचा काय भोग घडत नाही ? 89
90-17
हे असो जो तळे करी । ते तयाचीच तृषा हरी । की सुआरासीचि अन्न घरी । येरा नोहे ? ॥90॥
हे असो; जो तलाव बांधील त्याचीच तेवढी तृषा ते हरण करणार काय ? किंवा घरात सिद्ध झालेले अन्न एका स्वयंपाक्यापुरतेच असते आणि इतरास नाही असे का होते ? 90
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-17
बहुत काय बोलो पै गा । येका गौतमासीचि गंगा । येरा समस्ता काय जगा । वोहोळ जाली ? ॥91॥
फार काय सांगावे ? गौतमांनी दीर्घ प्रयत्नांनी आणिलेली गंगा काय त्यांनाच तेवढी गंगा ? आणि इतर जगाला ती ओहोळ होते काय ? 91
92-17
म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी । जाणे तयाते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥92॥
म्हणून, स्वतःसाठीच जे दक्षतेने (कुशलतेने) शास्त्रानुष्ठान करितात, त्यांचे जो श्रद्धाळू जाणून अनुकरण करतो, तो मूर्खही तरून जातो. 92
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥17. 5॥
93-17
ना शास्त्राचेनि कीर नांवे । खाकरोही नेणती जीवे । परी शास्त्रज्ञाही शिवे । टेको नेदिती ॥93॥
ज्याला आवाजी साफ करण्यासाठी ‘‘ हा हुं” ” वगैरे खाकरावे कसे इतकेच कळत नाही तो गाणार काय ? त्याप्रमाणे शास्त्राच्या नांवाने ज्याला स्वतःला काडीचेही ज्ञान नाही, पण कोणी शास्त्रज्ञ आला तर त्याला नुसता थाराही देत नाहीत. 93
94-17
वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडिता डाकुलिया । वाजविती ॥94॥
वडिल माणसांचे आचरणादि पाहून जे त्यांच्या चेष्टा करतात व पंडित काही सांगू लागले तर ते टाळ्या किंवा टिमक्या वाजवितात. 94
95-17
आपलेनीचि आटोपे । धनित्वाचेनि दर्पे । साचचि पाखंडाची तपे । आदरिती ॥95॥
आपल्याच शहाणपणाच्या तोऱ्यात आणि धनाच्या गर्वात जे पाखंडी जनांच्या तपाचा व आचरणाचा आदर करतात. 95
96-17
आपुलिया पुढिलांचिया । आंगी घालूनि कातिया । रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥96॥
आपल्या समोरील जीवांच्या अंगावर शस्त्र चालवून, रक्तमांसने यज्ञपात्र भरभरून, 96
97-17
रिचविती जळतकुंडी । लाविती चेड्याच्या तोंडी । नवसिया देती उंडी । बाळकांची ॥97॥
जळत्या अग्नीकुडांत आहुति देतात; तसेच चेड्यादि देवतांना आहुति देऊन व नवस करून त्यांच्यापुढे बालकांचे बळी देतात. 97
98-17
आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवता वरीया । अन्नत्यागे सातरीया । ठाकती एक ॥98॥
आग्रहास पेटून क्षुद्र देवतांचा प्रसाद व्हावा म्हणून अन्नत्यागपूर्वक सात दिवस जे स्वतः अनुष्ठान करितात. 98
99-17
अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्री सुहाडा । पेरिती मग पुढा । तेचि पिके ॥99॥
अरे, स्वतःला व अन्याला पीडा देऊन जे बीज तमोरूप भूमीत पेरतात तेच पुढेही पिकास येते. 99
100-17
बाहु नाही आपुलिया । आणि नावेतेही धनंजया । न धरी होय तया । समुद्री जैसे ॥100॥
स्वतःला तरून जाण्यासारखे समर्थ बाहु नाहींत आणि नावे चाही आश्रय करावयास तयार नाही याची सागरांत जी स्थिति होते. 100
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २७५ वा. २, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२८९ ते ३३००
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३२८९
किती सांगो तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥
नका नका करू रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥धृपद॥
तुका म्हणे जरी देवी नाही चाड । हाणोनि थोबाड फोडी काळ ॥२॥
अर्थ
अहो या बटकीच्या लोकांना किती सांगावा तरी देखील ते ऐकत नाही पण हे शिंदळीचे पुढे रडतील. अहो तुम्ही इच्छारुपी रांडेची संगती करु नका ती तुम्हाला अधोगतीला तर नेईलच परंतू यमलोकाला नरक भोगण्यास घेऊन जाईन. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे जर तुम्हाला देवाविषयी आवड नसेल तर काळ तुमचे थोबाड फोडून तुम्हाला मारेन. ”
3:51
अभंग क्र. ३२९०
पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हा केले पांडुरंगे ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥धृपद॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे । संसारी जन्मीजे याचि लागी ॥३॥
अर्थ
सेंद नावाचे फळ पिकले की त्याच्या आतील कडूपणा जातो अगदी त्याप्रमाणेच पाडूरंगाने आमच्याविषयी केले आहे. काम, क्रोध, लोभ हे आमच्या अंत:करणातून जागच्या जागीच नाहीसी झाली आहे त्यामुळे सर्व सृष्टी आम्हाला आनंदाची झाली आहे. मी ब्रम्ह आहे किंवा नाही याविषयी आठवले किंवा नाही आठवले तसेच प्रपंचाविषयी भाव, अभाव हे सर्व नाहीसे झाले असून स्वत: पाडूरंगच सर्व काही झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आपली जीवदशा नाहीसे होऊन आपल्याला ब्रम्ह अवस्था प्राप्त होणे याचेच नांव भाग्य असे आहे आणि संसारात जन्माला यायची इच्छा धरणे किंवा संसारामध्ये जन्माला यावे ते केवळ एवढेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. ”
3:51
अभंग क्र. ३२९१
कारणा कारण वारीयेले जेथे । जातो तेणे पंथे संतसंगे ॥१॥
संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । पाडुरगं भेटे भरवसेनी ॥३॥
अर्थ
कार्य आणि कारण ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत त्या मार्गाने मी जात आहे व इतरांनाही त्या मार्गाने मी बोलावीत आहे. संत देखील याच मार्गाने पुढे गेले आणि भवसमुद्र पार करुन ते पैलतीरावर पोहोचले व त्याची निशाणी म्हणून त्यांनी विजयाचा ध्वज फडकविला व ती निशाणी पाहूनच मी आनंदाने हरीनामाची गर्जना करत या मार्गाने चालत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे तुम्ही देखील याच मार्गाने माझ्या मागोमाग चाला तुम्हाला पाडूरंगाची भेट होईल हे निश्चिंत आहे असा भरवसा ठेवा. ”
3:52
अभंग क्र. ३२९२
आइत्या भाग्या धणी व्हावे । केणे घ्यावे न सरे ते ॥१॥
केणे आहे पंढरपुरी । उधारीचे लाभीक ॥धृपद॥
बाखराची करुनी रिती । भरा पोती सकळ ॥२॥
तुका म्हणे संतांपाडे । करा पुढे वाखती ॥३॥
अर्थ
आयत्या भाग्याचा मालक व्हावे आणि जे धन कधीही न संपणारे आहे ते आपल्या पदरात घ्यावे. असे धन पंढरीमध्ये आहे ते उधार जरी घेतले तरी लाभच होईल. आपले देहरुपी पोते विविध विकारांनी भरले आहे ते मोकळे करा आणि भक्तीरुपी परमार्थाचा माल तुम्ही त्यात भरा. तुकाराम महाराज म्हणतात, “पूर्वी संतांनी देखील पंढरीला जाऊन आपल्या देहरुपी पोत्यामध्ये भक्तीरुपी माल भरला आहे तुम्ही देखील त्यांच्यासारखे पंढरपूरला जा आणि आपल्या देहरुपी पोत्यामध्ये भक्तीरुपी माल भरुन घ्यावे. ”
3:52
अभंग क्र. ३२९३
सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥
ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषे देखा पती जाय ॥धृपद॥
आपण बुडती पती बुडविती । दोन्ही कुळे नेती अधःपाता ॥२॥
तुका म्हणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागे पुढे ॥३॥
अर्थ
व्याभिचारी स्त्रीचे चित्त नेहमी परपुरुषावर असते व या कारणामुळेच तिचा पती रात्रंदिवस स्वत:च्या मनाशी चुरचुर करत असतो. अशी ती ओंगळ स्त्री स्वत: तर नरकाला जाते परंतू तिचे दोष पाहून पाहून तिचा पती देखील नरकाला जातो. अशी व्याभिचारीणी स्त्री स्वत: बुडते पण पतीला घेऊन देखील बुडते आणि माहेर आणि सासर या दोन्ही कुळाला अध:पतनाला नेते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा व्याभिचारीणी स्त्रीची संगती नवऱ्याने करु नये कारण तिची संगती केली तर त्याची मागेपुढे फजितीच होईल. ”
3:52
अभंग क्र. ३२९४
मायबाप सवे नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ॥१॥
म्हणवुनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवू ॥धृपद॥
आयुष्य शेवटी सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हे ॥२॥
तुका म्हणे काळे लावियेले माप । जमा धरी पापपुण्याचीही ॥३॥
अर्थ
मेल्यानंतर तुझ्याबरोबर तुझे आई, बाप, धन, वित्त कोणीच येणार नाही जे तू पुण्यकर्म पापकर्म करशील तेच संचित तुझ्याबरोबर येईल आणि त्याच्यानुसारच तुला भोग भोगावे लागतील. म्हणूनच आपला लाभ कशात आहे याचा तू विचार कर प्रपंचित चालीरितींवर चित्त ठेवू नकोस. अरे आयुष्य तर शेवटी तर संपणारच आहे कारण तुझे शरीरच हे खरे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे काळ तुझ्या आयुष्याचे मापच लावून बसलेला आहे त्यामुळे तू सावध हो तू जे काही पाप पुण्यकर्म करशील ते सर्व कर्म तो तुझ्या नावावर जमा करीत आहे. ”
3:52
अभंग क्र. ३२९५
मोटळे हाटी सोडिल्या गाठी । विकर्या घातले कण ।
ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिले । सारूनि लिगाड दान ।
खरे माप हाती घेऊनि बैसलो । मानिती तेचि चौघे जन ।
खरे वित्त तेथे आले चोजवीत । गिर्हाइक संतजन ॥१॥
झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीच अराणूक ।
याल तरि तुम्ही करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥धृपद॥
एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन ।
बहुता जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण ।
लाभ हाणि कोणा मुदल जाले । कोणासी पडिले खाण ।
अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥२॥
एक सांते आले एक गावीहून । येकामेचि नव्हे जाणे ।
येता जाता रुजू नाही दिवाणा । काळतोंडी एके तेणे ।
लाग भाग एकी एकानी गोविले । मागील पुढिलां ॠणे ।
तुका म्हणे आता पाहू नये वास । साधावे आपुले पेणे ॥३॥
अर्थ
या प्रपंचरुपी बाजारामध्ये मी माझा देहरुपी गाठोडे मोकळे केले आहे व देहातील सर्व कण विक्रीस काढले आहे. या देहामध्ये पंचभूताचे वास्तव्य असते मी माझ्या देहातील पंचभूताचे ज्याचे त्याचे भाग ज्याला त्याला देऊन मोकळा झालो आहे. हरीनामरुपी खरे माप मी माझ्या हातात घेऊन बसलो त्यामुळे चार वेद मला मान्यता देतात. संतजण हे ग्राहक आहेत त्यांच्याकडे हरीरुपी खरे वित्त आहे आणि ते माझा शोध घेत माझ्याकडे आले आहेत. या बाजारामध्ये मी सर्वकाही झटकून मोकळा झालो आहे त्यामुळे मला सर्व प्रकारे समाधान प्राप्त झाले आहे. त्यामुळे जर माझ्याबरोबर कोणाला यायचे असेल तर त्याने लगबग करा आणि जे आमच्यासारखे परमार्थिक आहेत ते आमच्याबरोबर येतीलच. येथे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे मालाचे �
3:53
अभंग क्र. ३२९६
आम्हा काही आम्हा काही । आता नाही या बोले ॥१॥
मोल सांगा मोल सांगा । घेणे तीही गा पुसावे ॥धृपद॥
कैसे घडे कैसे घडे । बडबड तुज मज ॥२॥
मुद्दले साठी मुद्दले साठी । लाभ पोटी त्यामध्ये ॥३॥
तुका म्हणे साठवू घरी । आडल्या काळे पुसती तरी ॥४॥
अर्थ
आम्हाला थोडा परमार्थ घडावा आम्हाला थोडा देव देव घडावा अशी व्यर्थ बडबड काही लोक करतात परंतू त्यांच्या या व्यर्थ बोलण्याने त्यांना काहीच प्राप्त होत नाही. काही लोक केवळ आम्हाला या देवाची किंमत सांगा किंमत सांगा असे व्यर्थ प्रश्न विचारतात परंतू खरोखर ज्यांना देव हवा आहे त्यांनीच असे प्रश्न विचारावे. काही लोक म्हणतात, परमार्थ कसा घडेल देव देव कसा घडेल परंतू त्यांना एकच उत्तर दयावे ते म्हणजे असे की, “अरे तुझ्या अंत:करणात या गोष्टीविषयी जिव्हाळाच नाही त्यामुळे तुझी आणि माझी ही बडबड व्यर्थच आहे. ” ज्याने भक्तीरुपी मुद्दलाचे जतन करुन ठेवले त्यालाच परमार्थरुपी मालाचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही देवाची भक्ती करुन देवाला आम्ही आमच्या ह्दयामध्ये साठवून ठेवू मग अडल्यावेळी कोणीतरी मला त्याविषयी विचारीलच. ”
3:53
अभंग क्र. ३२९७
काय मागावे कवणासी । ज्यासी मागो तो मजपाशी ॥१॥
जरी मागो पद इंद्राचे । तरी शाश्वत नाही त्याचे ॥धृपद॥
जरी मागो ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥
स्वर्गभोग मागो पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणे ॥३॥
मागो जरी पद वैकुंठ । ते तव येकदेशी करंटे ॥४॥
आयुष्य मागो चिरंजीव । जीवा मरण नाही स्वभावे ॥५॥
तुका म्हणे एक मागे । एकपणे नाही भंग ॥६॥
अर्थ
कोणाला काय मागायचे ज्याला मागायचे तोच माझ्याजवळ आहे. इंद्राचे पद मागावे तर त्याचेच पद शाश्वत नाही. जरी धुव्रपद मागावे तरी त्याला येथील म्हणजे त्याच्या बापाच्या मांडीवर बसण्याचा छंद होता नक्की. जर परिपूर्ण भोग जेथे मिळतो तो स्वर्ग मागावा तर पुण्य संपले तर पुन्हा या पृथ्वीलोकात यावे लागते. जर वैकुंठपद मागावे तर ते एकदेशी असून करंटे आहे म्हणजेच भिकारडे आहेत. चिरंजीव पद मागून दीर्घायुष्य मागावे तर त्याला वस्तुत: स्वभावाने मरणच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता मी काही मागायचे असेल तर हरीशी एकरुपता होणे हेच मागेल कारण त्या एकरुपतेला कोणत्याही प्रकारे भंग नाही. ”
3:53
अभंग क्र. ३२९८
रुसलो आह्मी आपुलिया संवसारा । तेथे जनाचारा काय पाड ॥१॥
आम्हा इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाही या दुसरे देवाविण ॥धृपद॥
दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथे ॥२॥
उपाधिवचन नाइकती कान । त्रासले हे मन बहु माझे ॥३॥
तुका म्हणे करा ठाकेल ते दया । सुख दुःख वाया न धरावे ॥४॥
अर्थ
अहो येथे आम्ही आमच्या संसारावरच रुसलो आहोत तर मग लोकाचाराची येथे काय भीड आहे ? देवावाचून आता आम्हाला इष्ट, मित्र, सज्जन, सोयरे दुसरे कोणीही नाही. जेथे आम्ही सहोदर सखे बंधू यांनाच दूर केले आहे तेथे इतरांचा काय विचार करायचा आहे ? कोणत्याही प्रकारचे उपाधीचे वचन आता माझ्या कानाला ऐकावेसे वाटत नाही कारण संसाराला माझे मन खूप त्रासले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे जनहो त्यामुळे तुम्ही आता माझ्यावर दया धरायची असेल तर धरा नाहीतर धरुही नका आणि माझ्या सुख दु:खाची काळजी तर अजिबात करुच नका. ”
3:53
अभंग क्र. ३२९९
सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
का रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुंठा जाऊन ॥धृपद॥
येथे मिळतो दही भात । नाही वैकुंठी ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संताचिये संगे ॥३॥
अर्थ
अहो या मनुष्य देहात भक्तीसुखाचा एवढा मोठा वाटा असून जो मुक्ती मागतो तो करंटाच आहे. मग भक्तीसुखासाठी जन्म का बरे घेऊ नये आणि वैकुंठाला जाऊन तरी काय करायचे आहे ? येथे दहीभाताचा काला खाण्यास मिळतो ज्याची अपेक्षा वैकुंठातील देव करतात आणि वैकुंठात तर काल्याची गोष्ट देखील होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मला मुक्ती नको आहे मुक्तीची अपेक्षा देखील नाही मला मुक्ती लागतही नाही संतांच्या संगतीतच मी राहीन व हरीचे नाम घेईन. ”
3:53
अभंग क्र. ३३००
तरिच शोभे वेडी । नग्न होय धड फाडी ॥१॥
काय बोलाचे गौरव । आत वरी दोन भाव ॥धृपद॥
मृगजळा न्याहाळिता । ताहान न वजे सेविता ॥२॥
न पाहे आणिकाचीवास । शूर बोलिजे तयास ॥३॥
तुका म्हणे या लक्षणे । संत अळंकार लेणे ॥४॥
अर्थ
जी स्त्री अंगावरील चांगले वस्त्र फाडून नग्न होते तीच स्त्री वेडी म्हणून शोभत असते. म्हणजेच मी परमार्थ करतो आणि याचे भांडवल करुन जगाला पटवून देतो या बोलण्याचा काय उपयोग आहे अंतरंगात एक भाव आणि बाह्यरंगात दुसराच भाव जर असेल तर तो मनुष्य जगाचे कल्याण तरी कसे करेल ? केवळ मृगजळाला न्याहाळून तहान जाईल कशी त्यासाठी पाणी प्यावे लागले तेव्हा आपली तहान जाईल त्याशिवाय जाणार नाही. युध्द प्रसंगी कोणाचीही वाट न पाहात जो लढाई करतो त्यालाच शूर म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यांच्या अंगी सत्कार्य करण्याचे, सत्विचार जगाला सांगण्याचे आणि अंतरंगात केवळ दुसऱ्याचे हित करण्याचे लक्षण आहे व सद्गुणाचे अलंकार ज्यांनी अंगावर परिधान केले आहेत त्यांनाच संत म्हणावे. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















