आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१७ ऑक्टोबर, दिवस २९० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४६९ ते ३४८०
“१७ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 17 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १७ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४६९ ते ३४८० चे पारायण आपण करणार आहोत.
१७ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २६ ते ५०,
26-18
तरी जिंतले जैसे भुली । पिसे आलापु घाली । तैसे वानू ते माऊली । उपसाहावे तुवा ॥26॥
तर तसा एखादा मनुष्य भ्रांतीयुक्त होऊन वेडेपणाने बडबड करितो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे तर हे गुरुमाऊली तुम्ही ते सहन करावे. ॥26॥
27-18
आता गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । जे माने हे सभासदी । सज्जनांच्या ॥27॥
आता तुम्ही माझ्या वाणी कडून गीतार्थ वाढेल म्हणून जे स्पष्ट होईल अशी मुद्रा (शिक्का) लावा म्हणजे मी सांगितलेला अर्थ या सज्जनांचे सभेत मान्य होईल. ॥27॥
28-18
तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती । नको हे पुढतपुढती । परीसी लोहा घृष्टी किती । वेळवेळा कीजे गा ॥28॥
तेव्हा श्री निवृत्ति महाराज म्हणाले की, “तू अशी वारंवार आमची विनंती करू नको अरे लोखंडाचे सुवर्ण करण्याकरिता परी सावरते लोखंड वरचेवर का घालावे लागते” ॥28॥
29-18
तव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो का जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आता ॥29॥
तेंव्हा ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली की महाराज आपला हाच प्रसाद व्हावा की, मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवांनी लक्ष द्यावे. ॥29॥
30-18
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊ जो ॥30॥
गीताग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीचा आहे, तो असा की, ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते. ॥30॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-18
लोकी तरी आथी ऐसे । जे दुरूनि कळसु दिसे । आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥31॥
जगात रूढीही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचे फळ प्राप्त होते. ॥31॥
32-18
तैसेचि एथ ही आहे । जे एकेचि येणे अध्याये । आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥32॥
तसाच येथेही प्रकार आहे की जो एकच अध्याय वाचला असता सर्व गीता शास्त्रच वाचल्याचे श्रेय येते ॥32॥
33-18
मी कळसु याचि कारणे । अठरावा अध्यायो म्हणे । उवाइला बादरायणे । गीताप्रासादा ॥33॥
याच कारणास्तव मी या अठराव्या अध्यायास कशाची कळसाची उपमा दिली आहे कारण जो कळस वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविला आहे, ॥33॥
34-18
नोहे कळसापरते काही । प्रासादी काम नाही । ते सांगतसे गीता ही । संपलेपणे ॥34॥
देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही तसेच हा अठरावा अध्याय गीता संपविली असे दर्शवितो. ॥34॥
35-18
व्यासु सहजे सूत्री बळी । तेणे निगमरत्नाचळी । उपनिषदार्थाची माळी- । माजी खांडिली ॥35॥
व्यास हे स्वभावताच श्रेष्ठ त्यांनी मोठ्या कुशलतेने सूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थाच्या माळ जमिनीत खणती केली. ॥35॥
36-18
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोवता केला ॥36॥
त्या माळ जमिनीत धर्म, अर्थ व काम एतदृपी भिन्नभिन्न आकाराचे पुष्कळ गडगळ गोटे निघाले, त्या धोंड्यांचा महाभारतरुपी देवालयाचे भोवती तट बांधला. ॥36॥
37-18
माजी आत्मज्ञानाचे एकवट । दळवाडे झाडूनि चोखट । घडिले पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ॥37॥
नंतर आत्मज्ञानरुपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. ॥37॥
38-18
निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥38॥
मग निवृत्तीरूपी दोरीने आणखी करून सर्व शास्त्राची पुरणी घालून मोक्षमार्यादेचा आकार साधाला. ॥38॥
39-18
ऐसेनि करिता उभारा । पंधरा अध्यायात पंधरा । भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥39॥
याप्रमाणे देवालयाची रचना करीता करीता पंधरा अध्यायापर्यंत पंधरा थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येवून ठेपल्या. ॥39॥
40-18
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥40॥
पुढे सोळावा अध्याय हा गळमण्याचा आकार असून. सतरावा अध्याय पडघानी कळसाची बैठक होय. ॥40॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-18
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकी व्यासु । ध्वजे लागला ॥41॥
त्यात पडघाणीवर अठरावा अध्यायरुपी सहजच कळस उत्तम रीतीने बसवून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला आहे ॥41॥
42-18
म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये । तयांचे पुरे दाविताहे । आपुल्या आंगी ॥42॥
म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांचे आपल्या योगाने पूर्णता झाली, हे हा अठरावा अध्याय दाखवतो ॥42॥
43-18
जालया कामा नाही चोरी । ते कळसे होय उजरी । तेवी अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥43॥
कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते, तसे अठराव्या अध्यायात साद्यंतगीतेचे वर्णन आहे ॥43॥
44-18
ऐसा व्यासे विंदाणिये । गीताप्रासादु सोडवणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥44॥
याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्रांचा नानाप्रकारे उद्धार केला ॥44॥
45-18
एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषे छाया । सेविती ययाची ॥45॥
कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करितात, (गीतेचा पाठ करितात) कोण श्रवणरूप छायेत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात ॥45॥
46-18
एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरा । घेऊनि रिघती गाभारा । अर्थज्ञानाच्या ॥46॥
कोणी अवधानरुपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थ ज्ञानरूपी गाभार्यात शिरतात ॥46॥
47-18
ते निजबोधे उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादी सरी । सर्वाही आथी ॥47॥
ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात; परंतु मोक्षरुपी देवालयात सर्वाची योग्यता सारखीच आहे ॥47॥
48-18
समर्थाचिये पंक्तिभोजने । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्ने । तेवी श्रवणे अर्थे पठणे । मोक्षुचि लाभे ॥48॥
समर्थांचे घरी भोजनास गेले असता पंगतीत वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने असतात (पंक्तीभेद नसतो) त्याप्रमाणे गीता श्रवण करणारास, अर्थ जाणणारास, व पठण करणारास, मोक्ष प्राप्त होतो ॥48॥
49-18
ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्या म्हणितला हा भेदु । जाणोनिया ॥49॥
असो; गीता ग्रंथ हा विष्णूचे देवालय असून अठरावा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे, असा भेद मी जाणूनबुजून केला ॥49॥
50-18
आता सप्तदशापाठी । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥50॥
आता सतराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो ॥50॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २९० वा. १७, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४६९ ते ३४८०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३४६९ (वाममार्गीशाक्तांचानिषेधशाक्तावरीलअभंग)
बहुत गेली वाया । न भजता पंढरीराया ॥१॥
करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥धृपद॥
अवघियांचा धनी । त्यासी गेली विसरोनि ॥२॥
तुका म्हणे अंती । पडती यमाचिया हाती ॥३॥
अर्थ
पंढरीरायाचे भजनपूजन केले नाही त्यामुळे खूप लोक वाया गेले आहेत. भक्त आपल्याला काहीतरी नैवेदय आणेल आणि आपले पोट भरेल या अपेक्षेने तो देव त्याच्या कामिक भक्ताची सेवा करतो मग त्या भक्ताचे नैवेदय तो सेवन करतो पण ते सर्व व्यर्थ आहे. परंतू सर्वाचा जो मालक आहे असा पंढरीराया त्यालाच सर्वजण विसरुन गेलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “शेवटी हे लोक यमाच्याच हाती पडतात. ”
11:46 am –
अभंग क्र. ३४७०
असो आता ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवू ॥१॥
रक्षिता तू होसी जरी । तरि काय येरी करावे ॥धृपद॥
काया वाचा मन पायी । राहे ठायी करू ते ॥२॥
तुका म्हणे गाइन गीती । रूप ते चित्ती धरूनिया ॥३॥
अर्थ
हे गोविंदा आता शाक्त उपासकांची निंदा करण्याचा व्यापार पुरे झाला खूप झाला यापुढे तुझे स्मरण करुन तुझेच चिंतन नेहमी करु. अरे तू जर आमचा रक्षणकर्ता झालास तर आम्हाला इतरांचे काय करायचे आहे ? आम्ही कायावाचामनाने तुझ्या पायाच्याच ठिकाणी राहू असेच उपाय करु. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझे रुप मी माझ्या चित्तामध्ये साठवून तुझे गीत गाईन. ”
11:46 am –
अभंग क्र. ३४७१ (भुपाळ्यांवरीलअभंग)
बोलोनिया दाऊंका तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१॥
पागुळले मन काही नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवी धरूनि राहिलो ॥धृपद॥
त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ॥२॥
तुका म्हणे माता बाळा चुकलिया वनी । न पवता जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥
अर्थ
देवा मला काय हवे असे आहे काय नको आहे ते तुम्हाला समजत नाही काय माझ्या अंत:करणातील इच्छा ओळखत नाहीत काय, बरं ठीक आहे परंतू मी पण असे ठरवले आहे की तुम्ही मला जसे ठेवाल ज्या ठिकाणी ठेवाल मी त्या ठिकाणी आहे तश्या प्रकारे राहीन. देवा अहो माझे मन पागळे झाले आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कोणताही उपाय सापडत नाहीये त्यामुळे मी तुमचे पाय माझ्या चित्तात दृढ आणि श्रध्दापूर्वक धरुन राहिलो आहे. कोणत्या गोष्टीचा त्याग करावा, कोणत्या गोष्टीचा भोग घ्यावा, कोणत्या गोष्टीविषयी दु:ख मानावे, काय टाकून दयावे, काय घ्यावे याची शंका माझ्या जीवाने मोठया प्रमाणात घेतली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आईची आणि बाळाची एखादया वनामधे चुकामूक झाली आणि त्या बाळाला त्याची आई लवकर सापडली नाही तर त्याला किती दु:ख होते तशा प्रकारचे दु:ख मला होत आहे तुमच्या भेटीवाचून मलाही तसेच दु:ख सध्या होत आहे. ”
11:46 am –
अभंग क्र. ३४७२ (भुपाळ्यांवरीलअभंग)
ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ । का हो कळवळ तुम्हा उमटेचिना ॥१॥
आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनिया आसे चाळवूनी ठेविले ॥धृपद॥
काय जन्मा येवूनिया केली म्या जोडी । ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू ॥२॥
तुका म्हणे खरा न पवेचि विभाग । धिक्कारिते जग हेचि लाहे हिशोबे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही मला बोलावण्यासाठी निरोप पाठवाल अशी मी वाट पाहातो आहे पण तुमचा निरोप काही येत नाही तुम्हाला माझ्याविषयी कळवळा का येत नाही ? अहो पंढरीनिवासी पाडूरंगे तुमची आवड मला लावून तुम्ही मला असे का फसविले आहे ? जन्माला येऊन मी काय प्राप्त करु घेतले काय लाभ मला झाला याच विषयी घडोघडीला विचार माझ्या मनात येतोय. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला माझ्या वाट्याचा खरा हिस्सा तर मिळालाच नाही परंतू जगाने माझा धिक्कार करावा हाच हिशोब माझ्या पदरात पडला आहे. ”
11:46 am –
अभंग क्र. ३४७३ (भुपाळ्यांवरीलअभंग)
का गा किविलवाणा केलो दीनांचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा म्हणविता दास । गोडी नाही रस बोलिलीया सारिखी ॥धृपद॥
लाजविली मागे संतांची ही उत्तरे । कळो येते खरे दुजे एकावरूनि ॥२॥
तुका म्हणे माझी कोणे वदविली वाणी । प्रसादावाचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥
अर्थ
देवा तू मला असा केविलवाणा दीनापेक्षाही दीन का केले आहे मला तुझी शक्तीहीन झाल्यासारखी का दिसत आहे ? देवा स्वत:ला तुझा दास म्हणून घेताना देखील माझ्या मनाला लाज वाटते कारण तुम्ही जे शब्द बोलले आहात त्याप्रमाणे वर्तणूक करत नाहीत त्यामुळे तुमच्याशी बोलण्यातही मला आता कोणत्याही प्रकारचा रस किंवा गोडी राहिली नाही. देवा मागे संतांनी तुझ्याविषयी खूप काही सांगितले आहे तुझा पराक्रमही त्यांनी सांगितला आहे परंतू त्यांच्या त्या बोलण्याला तू लाज आणली आहेस कारण तुझा मी भक्त आहे माझी अवस्था आज तुझ्यामुळे अशी आहे आणि दुसऱ्या भक्ताचीही अवस्था अशीच असणार हे लगेच कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला तुमच्या कृपाप्रसादावाचून माझ्या वाणीला एवढे परखडपणे कोणी बोलाविले असेल ? ”
अभंग क्र. ३४७४ (भुपाळ्यांवरीलअभंग)
जळो माझे कर्म वाया केली कटकट । झाले तैसे तंट नाही आले अनुभवा ॥१॥
आता पुढे धीर काय देऊ या मना । ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ॥धृपद॥
गुणवंत केलो दोष जाणायासाठी । माझे माझे पोटी बळकट दूषण ॥२॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥३॥
अर्थ
देवा माझे कर्म जळून जावो तुमच्याशी केलेली कटकट वाया गेली आहे आणि संताच्या मुखातून तुमचे जे वर्णन ऐकले त्याचा अनुभव तर मला अजून आलाच नाही. अहो नारायणा मला तुमचा कोणत्याही प्रकारचा अनुभव आतापर्यंत आला नाही त्यामुळे तुमची सेवा करण्याविषयी मनाला धीर तरी कसा देऊ तुमचा काहीतरी अनुभव माझ्या मनाला तुम्ही दिला पाहिजे आणि सेवा करण्याविषयी माझ्या मनाला तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे. देवा तुम्ही मला गुणवंत केले केवळ इतरांचे दोष जाणून घेण्यासाठीच परंतू माझ्यामध्येच किती दोष आहेत हे माझे मलाच माहीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो केशीराजा तुम्ही दयाळू आहात शेवटी का होईना तुम्ही माझ्याविषयी दयाळूपणा दाखवला व माझा लळा पूर्ण केला हे फार बरे झाले. ”
अभंग क्र. ३४७५ (भुपाळ्यांवरीलअभंग)
कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख । बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय ॥१॥
का गा सासुरवासी मज केले भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ॥धृपद॥
प्रभातेसि वाटे तुमच्या यावे दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥
येथे अवघे वाया गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥३॥
अर्थ
देवा माझे चित्त विविध प्रकारच्या विषयांकडे जात आहे त्यामुळे ते विषय मला तुमचे मुखदर्शनही होऊ देत नाही व याच कारणाने मला खूप दु:ख वाटत आहे माझे ह्दय फुटू पाहात आहे. हे भगवंता तुम्ही मला संसार सागरामध्ये सासुरवाशीण का केले अहो येथे आपल्या सत्तेने वागण्याचा अधिकार देखील नाही. देवा प्रात:काळी असे खूप वाटते की तुमचे दर्शन घ्यावे तुमच्या दर्शनाला मंदीरात जावे परंतू येथे स्वाधीनता नाही म्हणजेच विविध विषयाने मन बांधलेले आहेत त्यामुळे तुमच्या दर्शनालाही येता येत नाही कितीही विषयभोग भोगला तरीही वासना मागे राहातेच. आता हे मी तुमच्यापासून लपून ठेवणार नाही कारण तुम्हाला सर्वकाही कळते. तुकाराम महाराज म्हणतात, “आतापर्यंत मी वासनेचा नाश करण्यासाठी जे जे काही सायास केले ते ते सर्व वायाच गेले असे मला दिसत आहे त्यामुळे माझे आयुष्य आणि देवाची केलेली भक्ती या दोघाचाही नाश झाल्यासारखेच मला दिसते आहे. ”
अभंग क्र. ३४७६ (भुपाळ्यांवरीलअभंग)
जळोत ती येथे उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आता मज साह्य येथे करावे देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥धृपद॥
भोगे रोगा जोडोनिया दिले आणीका । अरुचि ते हो का आता सकळांपासूनि ॥२॥
तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी । नाही ये लौकिकी आता मज वर्तने ॥३॥
अर्थ
देवा तुमच्यात व माझ्यामध्ये जो कोणी अंतर निर्माण करेल ते सर्व काही जळून जावोत कारण मी आतापर्यंत जे काही श्रम केलेत ते केवळ तुमच्या पायाचा लाभ व्हावा यासाठीच. देवा आता परमार्थ करण्यासाठी तूच मला साहाय्य करावे आणि सर्व संकटांचा विनाश करुन तुझी सेवा तूच माझ्याकडून करुन घ्यावी. प्रारब्ध भोगाने मला विविध रोगांशी भेट घालून दिली आहे त्यामुळे मला आता संगती नको आहे कोणाविषयी रुची माझ्या मनामध्ये राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा हे शरीर तुझेच आहे त्यामुळे या शरीराची तूच काळजी घे याचा उदरनिर्वाह करण्याचा भारही तूच तुझ्या मस्तकावर घे मला आता या लौकिकाची आणि शरीराची जोपासना करण्याची काही एक गरज राहिलेली नाही. ”
अभंग क्र. ३४७७ (भुपाळ्यांवरीलअभंग)
नसंगता तुम्हा कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहारचि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरीता आवडी । अवसान ते घडी पुरो एकी देत नाही ॥धृपद॥
काय उणे मज येथे ठेविलिये ठायी । पोटा आलो तईपासूनिया समर्थे ॥२॥
तुका म्हणे अवघी आवरीली वासना । आता नारायणा दुसरियापासूनि ॥३॥
अर्थ
देवा तूम्हांला कोणत्याही गोष्टी न सांगता सर्व कळतात या विश्वाच्या पालनपोषण करणाऱ्या विश्वंभराला त्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिहार दयावा लागत नाही. परंतू देवा माझ्या अंत:करणात तुमच्याविषयी जी आवड आहे ती माझ्यासाठी अनावर आहे ती आवड मला काही केल्या आवरल्या जात नाही कितीही मी आवरण्याचा प्रयत्न केला तरी एक क्षण देखील मला तुमची आवड स्वस्थ बसू देत नाही. देवा मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून या समर्थांने म्हणजेच तुम्ही मला काय कमी केले आहे मला जे हवे आहे ते तुम्ही बसल्या जागेवरच आणून दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता नारायणावाचून माझ्या अंत:करणामधील ज्या काही वासना आहेत त्या सर्वाना मी आवरले आहे. ”
अभंग क्र. ३४७८ (भुपाळ्यांवरीलअभंग)
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा । नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ ॥१॥
सासुरवासा भीतो जीव ओढे तुजिपाशी । आता दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥धृपद॥
न कळता संग झाला सहज खेळता । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरी ॥२॥
तुका म्हणे असता जसै तसै बरवे । वचन या भावे वेचूनिया विनटलो ॥३॥
अर्थ
एका गोपी स्त्रीचे वर्णन महाराज येथे करतात ती गोपीका म्हणते हे हरी आम्ही तुझ्यावर अनुसरलो आहोत आम्ही अबला आहोत त्यामुळे तू आमच्या अंगी हीन दीन कळा येऊ देऊ नको. हे हरी सासुरवासाला आमचा जीव तर फार भितो परंतू आमचा जीव तुझ्याकडेही ओढ घेतोय त्यामुळे परमार्थामध्ये आणि संसारामध्ये तूच आमची लज्जा रक्षण कर. हे हरी नकळता अगदी सहजच खेळता खेळता तुझ्याशी आमचा संग झाला परंतू आता आम्हाला संसारातील आमचा मागच्या मंडळींचीही चिंता लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता ज्या स्थितीत आम्ही चांगले राहू त्याच स्थितीत आम्ही राहू म्हणजे आमचे हित ज्या वागण्याने होईल तसेच आम्ही आम्ही वागू आणि तेच शब्द लक्षात ठेवून आम्ही तुमच्या प्रेमात पडलो आहोत. ”
अभंग क्र. ३४७९ (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
नाही घाटावे लागत । एका सिते कळे भात ॥१॥
क्षीर निवडिते पाणी । चोची हंसाचिये आणी ॥धृपद॥
आंगडे फाडुनि घोंगडे करी । अवकळा तयापरी ॥२॥
तुका म्हणे कण । भुसी निवडे कैचा सीण ॥३॥
अर्थ
एका भाताच्या शितावरुन भात शिजला आहे किंवा नाही याची तपासणी होते त्यासाठी संपूर्ण भात तपासावा लागत नाही. हंस आपल्या चोचीने पाणी आणि दूध वेगवेगळे करतो. अंगातील कपडे काढून ते फाडून त्याचे घोंगडे तयार करणे हा प्रकार जसा आहे त्याप्रमाणेच हा सालू मालू माझे काव्य चोरुन त्यामध्ये त्याचे नांव टाकतो आहे अगदी तसाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “कण आणि भूस निवडण्यास त्रास कसला त्याप्रमाणे जे मनुष्य सज्ञान आहेत ज्ञानी आहेत त्यांना सालू मालूचे काव्य् कोणते व संतांचे काव्य कोणते हे लगेच कळेल. ”
अभंग क्र. ३४८० (तुकोबांच्याअभंगातीलतुकोबांचेनावकाढूनसालु-मालुयांनीआपलेनावघातलेत्याबद्दलत्यांचानिषेध)
सालोमालो हरीचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥
अवघे बचमंगळ केले । म्हणती एकाचे आपुले ॥धृपद॥
मोडूनि संतांची वचने । करिती आपणा भूषणे ॥२॥
तुका म्हणे कवी । जगामधी रूढी दावी ॥३॥
अर्थ
सालू मालूने स्वत:ला हरीचा दास म्हणून घेतले आणि सगळा सर्वनाश करुन घेतला. इतरांनी म्हणजेच संतांनी केलेले अभंग रचनेमध्ये आपले नांव मिसळवले व आपणच हे काव्य तयार केले आहे असे लोकांना तो सांगत आहे आणि असे करुन त्याने सर्व गोंधळच केला आहे. संतांनी केलेले काव्य रचनेमध्ये आपले नांव मिसळून हे काव्य आपणच केले आहे असे भूषण तो सर्वत्र सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे असले खोटे कवी जगामध्ये आपली किर्ती पसरवितात व खोटी रुढी जगामध्ये निर्माण करतात. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















