आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

११ ऑक्टोबर, दिवस २८४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३९७ ते ३४०८
“११ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 11 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ११ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३९७ ते ३४०८ चे पारायण आपण करणार आहोत.
११ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३०१ ते ३२५,
301-17
विपाये घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सापडे । तैसे तामसा पर्व जोडे । पुण्यदेशी ॥301॥
भुंग्याने कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असता त्यात कावळा सहज सापडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणाराला पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो. 1
302-17
तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोही आला । तोही दर्पा चढला । भांबावे जरी ॥302॥
तेथे ह्याचे ऐश्वर्य पाहून सहज सत्पात्र ब्राह्मण दान मांगूआला, तेव्हा हा गर्वाने फुगून त्यास काही द्यावे असेही त्यास वाटले. 2
303-17
तरी श्रद्धा न धरी जिवी । तया माथाही न खालवी । स्वये न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥303॥
तरी त्याजबद्दल मनात श्रद्धा न धरिता किंवा त्याला नमस्कार न करिता स्वतः किंवा अन्याकडूनही त्याच्या हातावर दानाचे उदक सोडीत नाही. 3
304-17
आलिया न घली बैसो । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसी नरी ॥304॥
त्याला आसनही देत नाही, मग गंधअक्षतादिकांची गोष्ट कशाला ? असा तो त्याचा अपमान करितो 4
305-17
पै बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तू करणे याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥305॥
व एखाद्या ऋणकऱ्याची जशी बोळवण करावी त्याप्रमाणे, त्याच्या हातावर थोडेसे द्रव्य देतो व तेव्हांही त्याची ‘अरे तुरे ” अशा भाषेनेच संभावना करितो. 5
306-17
आणि जया जे दे किरीटी । तयाते उमाणी तयासाठी । मग कुबोले का लोटी । अवज्ञेच्या ॥306॥
आणि ज्याला जे थोडे बहुत देतो, तेवढयाच्या जोरावर त्याचा अपमान करून त्याला अपशब्द बोलण्यासही कमी करीत नाही. 6
307-17
हे बहु असो यापरी । मोल वेचणे जे अवधारी । तया नांव चराचरी । तामस दान ॥307॥
हे पुरे; असे जे दान त्याला लोकात तामस दान असे म्हणतात. 7
308-17
ऐशी आपुलाला चिन्ही । अळंकृते तिन्ही । दाने दाविली अभिधानी । रजतमाचिया ॥308॥
ह्याप्रमाणे त्या त्या दानांची तिन्ही लक्षणे तुला सांगितली 8
309-17
तेथ मी जाणत असे । विपाये तू गा ऐसे । कल्पिसील मानसे । विचक्षणा ॥309॥
अर्जुना, मी समजतो की तुझ्या मनात ह्यावर अशी शंका येणे संभवनीय आहे की, 9
310-17
जे भवबंधमोचक । येकले कर्म सात्त्विक । तरी का वेखासी सदोख । येर बोलावी ? ॥310॥
संसारबंधापासून मुक्त करणारे जे एक सात्विक कर्म त्याचेच वर्णन मी करावयाचे होते, अन्य सदोष कर्माचे का केले ? 310
311-17
परी नोसंतिता विवसी । भेटी नाही निधीसी । का धू न साहता जैसी । वाती न लगे ॥311॥
परंतु भूतसमंधादिकांची अडचण दूर केल्याशिवाय जसे जुने ठेवने प्राप्त होत नाही, किंवा, धूर सोसल्याशिवाय जसा अग्नि पेटत नाही. 11
312-17
तैसे शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचे कवाड । ते भेदणे याते कीड । म्हणावे का ? ॥312॥
त्याप्रमाणे शुद्ध सात्विक गुणाच्या आड रज व तम ह्यांचा प्रतिबंध आहे; अरे, त्यांचा नाश करणे चुकीचे ठरेल काय ? 12
313-17
आम्ही श्रद्धादि दानात । जे समस्तही क्रियाजात । सांगितले का व्याप्त । तिही गुणी ॥313॥
श्रद्धे पासून दानापर्यंत जेवढया क्रिया सांगितल्या त्या सर्व ह्या तीन गुणांनी युक्त असतात. 13
314-17
तेथ भरवसेनि तिन्ही । न सांगोचि ऐसे मानी । परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलो येरे ॥314॥
खरोखर त्या तीहीचे वर्णन आम्ही केलेच नसते हे ध्यानात ठेव; पण, सत्वगुणाची स्पष्ट कल्पना येण्यासाठी दुसऱ्या दोन गुणांची लक्षणे सांगणं प्राप्तच झाले. 14
315-17
जे दोहीमाजी तिजे असे । ते दोन्ही सांडिताचि दिसे । अहोरात्रत्यागे जैसे । संध्यारूप ॥315॥
ज्याप्रमाणे दिवस नाही व रात्र नाही अशा दोहीच्या त्यागाने संध्याकाळचे स्पष्टरूप ध्यानात येते; त्याप्रमाणे रज व तम ह्या दोहोंहून निराळा असा जो तिसरा गुण तो सत्व होय, हे स्पष्टपणे ध्यानात येते. 15
316-17
तैसे रजतमविनाशे । तिजे जे उत्तम दिसे । ते सत्त्व हे आपैसे । फावासि ये ॥316॥
तसेच रज तम ह्यांच्या नाशाने (त्यागाने) तिसरा जो सत्वगुण तो आपोआप उत्तमपणे लक्ष्यात येतो. 16
317-17
एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिले तम रज । ते सांडूनि सत्त्वे काज । साधी आपुले ॥317॥
ह्याप्रमाणे तुला सत्वाची स्पष्ट कल्पना यावी म्हणून रज व तम ह्यांचे निरूपण केले; त्यांचा त्याग करून सत्वाने आपले कार्य साधून घे. 17
318-17
सत्त्वेचि येणे चोखाळे । करी यज्ञादिके सकळे । पावसी तै करतळे । आपुले निज ॥318॥
या सत्वाच्याच सहाय्याने यज्ञादि सर्व क्रियाजात आचर. म्हणजे तुला आपल्या स्वरूपाची करतळावरील वस्तूप्रमाणे प्राप्ति होईल. 18
319-17
सूर्ये दाविले सांते । काय एक न दिसे तेथे । तेवी सत्त्वे केले फळाते । काय नेदी ? ॥319॥
सूर्यच स्वतः सहाय झाल्यावर कोणती वस्तु दिसणार नाही ? तसे सात्विक आचाराला कोणते फल येणार नाही ? 19
320-17
हे कीर आवडताविखी । शक्ति सत्त्वी आथी निकी । परी मोक्षेंसी एकी । मिसळणे जे ॥320॥
सत्वाच्या आंगी असे वाटेल तितके सामर्थ्य असले तरी, मोक्षप्राप्ति म्हणून जो एक स्थिति आहे. 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-17
ते एक आनचि आहे । तयाचा सावावो जै लाहे । तै मोक्षाचाही होये । गावी सरते ॥321॥
तिचे एक निराळेच तंत्र आहे; त्यांचे सहाय्य जेव्हा ह्या सत्वाला मिळेल तेव्हा त्या सत्वगुणाला मोक्षापर्यंत मजल मारिता येईल. 21
322-17
पै भांगार जऱ्ही पंधरे । तऱ्ही राजावळीची अक्षरे । लाहे तैचि सरे । जियापरी ॥322॥
पंधरा दराचे उत्तम सुवर्ण असले तरी त्यावर जेव्हा राजसत्तेचा शिक्का पडेल तेव्हांच हे जसे चालते. 22
223-17
स्वच्छे शीतळे सुगंधे । जळे होती सुखप्रदे । परी पवित्रत्व संबंधे । तीर्थाचेनि ॥323॥
स्वच्छ, शीतळ व सुगंध असे आल्हादकारी उदक असले तरी, त्यास तीर्थासंबंधावाचून पवित्रता येत नाही. (आंत तीर्थ घालावे लागतं. ) 23
324-17
नयी हो का भलतैसी थोरी । परी गंगा जै अंगीकारी । तैचि तिये सागरी । प्रवेशु गा ॥324॥
सामान्य ओढयाला स्वतः थोरवी नसो; पण गंगेला तो मिळाला म्हणजे त्याला समुद्र प्रवेशाची योग्यता येते. 24
325-17
तैसे सात्त्विका कर्मा किरीटी । येता मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । ते वेगळे आहे ॥325॥
त्याप्रमाणे, अर्जुना, सात्विक कर्माचरणाने मोक्ष प्राप्तीकडे जात असता, ज्याचा प्रतिबंध होऊ नये ते एक वेगळेच आहे. 25
दिवस २८४ वा. ११, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३९७ ते ३४०८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३३९७
(श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकाराम महाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
माझ्या बापे मज दिधले भातुके । म्हणोनि कवतुके क्रीडा करी ॥१॥
केली आळी पुढे बोलिलो वचन । उत्तम हे गुण आले त्याचे ॥धृपद॥
घेऊनि विभाग जावे लवलह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥
तुका ज्ञानदेवी समुदाय । करावा मी पाय येईन वंदू ॥३॥
अर्थ
माझा बाप पाडूरंग याने मला भक्तीप्रेम सुखाचा खाऊ दिला आहे त्यामुळे तर मी कौतुकाने खेळ खेळत आहे. मी त्याच्यापुढे हट्ट केला हट्टाने त्याला मला जे लागेल ते मागितले त्यामुळे तर माझ्या अंगी त्याचे उत्तम गुण आले आहेत. त्यामुळे हे ब्राम्हणा तू येथे माझ्याकडे आला आहेस तू येथील तुझा पुण्याचा वाटा तू घे आणि लवकर आपल्या ठिकाणी पुन्हा तू जावे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे ब्राम्हणा मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐक तू काया, वाचा, मन, इंद्रिय, प्राण, बुध्दी यांचा समुदाय श्रीज्ञानदेवांच्या चरणांवर अर्पण कर व त्यांच्या चरणांना वंदन कर मीही त्यांच्या चरणांना वंदन करण्यासाठी येईन. ”
4:27
अभंग क्र. ३३९८ (ज्ञानेश्वरमहाराजांनाउद्देशूनमहाराजम्हणतात)
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहाण पायी बरी ॥धृपद॥
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे । इतर तुळणे काय पुढे ॥२॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥३॥
अर्थ
हे श्रीज्ञानेदव माऊली तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात नव्हे नव्हे त्यांचे गुरु आहात असे सर्वजण म्हणत असतात. मग तुम्ही धरणेकरी ब्राम्हणास माझ्याकडे उपदेश घेण्यास पाठविले माझा पामराचा एवढा मोठेपणा तरी आहे काय पायाची वहाण कधीही पायातच चांगली. अहो ब्रम्हादिक देव तुम्हाला शरण येतात तुमच्यापुढे नम्र होतात मग तेथे तुमच्याशी बरोबरी करण्याकरता इतर कोण पुरे पडणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा ज्ञानेश्वरा तुमचे वर्णन कसे करावे तुमच्या थोरवीचे गुणगान कसे गावे कोणती युक्ती चालवावी कोणते शब्द वापरावेत तुमचे वर्णन करण्यास खोल युक्ती कशी करावी हे मला समजत नाही त्यामुळे मी तुमच्या पायावर डोके ठेवले आहे. ”
4:27
अभंग क्र. ३३९९ ( ज्ञानेश्वरमहाराजांना महाराज म्हणतात)
बोलिली लेकुरे । वेडी वांकुडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥धृपद॥
नाही विचारिला । अधिकार म्या आपुला ॥२॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायापे किंकरा ॥३॥
अर्थ
हे ज्ञानराज माऊली मी लहान लेकरु आहे मी जे काही वेडेवाकडे शब्द बोललो आहे बोबडे शब्द बोललो आहे. महाराज मी जे काही शब्द बोललो असेल त्यामध्ये काही चुकीचे शब्द आले असतील तर त्या अपराधाबद्दल मला तुम्ही क्षमा करा तुम्ही सिध्दमहापुरुष आहात. हे ज्ञानेश्वर माऊली मी बोलताना आपल्या अधिकाराचा विचारच केला नाही उगाचच मी बडबड करत राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे ज्ञानेश्वर महाराज मला या किंकर दासाला तुमच्या पायाजवळ नेहमी राखा. ”
4:27
अभंग क्र. ३४०० (श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यासउपदेश. )
काय तुम्ही जाणा । करू अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची ग्वाही । निवडिली दुसरे ठायी ॥धृपद॥
कळो अंतरीचा गुण । नये फिटल्यावाचून ॥२॥
आणिले अनुभवा । जनाच्या हे ज्ञानदेवा ॥३॥
आणीक कोणी भीती । त्यांच्या चिंतने विश्रांति ॥४॥
तुका म्हणे बीज पोटी । फळ तैसेचि शेवटी ॥५॥
अर्थ
तुम्ही नारायणाचा अव्हेर करण्याचे मनात आणले आहे काय ? खोटी साक्ष देणारा मनुष्य नंतर लक्षात येतो. कोणतेही फळ असो ते फोडल्यावाचून त्याच्या अंतरंगात गोडपणा आहे की कडूपणा आहे हा गुण कळून येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांच्या अनुभवास या गोष्टी आणून दिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी असा अनुभव आणून दिला आहे की देवाचे चिंतन केले की विश्रांती आणि समाधान मिळते तर मग इतर कोणाची काय भिती आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “जशी भावना आपल्या पोटामध्ये आहे तसेच फळ शेवटी आपल्याला मिळते. ”
अभंग क्र. ३४०१
अभंग क्र. ३४०१
अविश्वासीयाचे शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥
काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढे ॥धृपद॥
मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचे धोंडा उभा ठाके ॥२॥
तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकी जाणा खोटा तैसा ॥३॥
अर्थ
अविश्वास असणाऱ्या मनुष्याचे शरीर सुतकी असते व पातकाने विटाळलेले असते त्याच्या अंत:करणामध्ये तो नेहमी भेद ठेवत असतो. अशा अविश्वासी मनुष्याचा परमार्थिक वेल हरीप्राप्तीच्या मांडवापर्यंत जाईल का जसे पूर्वसंचित कर्म त्याने केले तसेच त्याच्यापुढे ते आले. गर्भवती मातेला असे वाटते की आपल्या पोटी राजबिंडा पुत्र जन्माला यावा परंतू तिच्या जर नशिबात जर धोंडाच असेल तर तोच तिच्या उदरातून जन्म घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अन्न शिजवताना स्वयंपाक करताना धान्यामधे एखादा कुचर दाणा असतो तो कितीही शिजवला तरी शिजला जात नाही त्याप्रमाणे परमार्थामध्ये लोक असे आहेत की जे विश्वासघातकी आहेत अविश्वासी आहेत खोटे आहेत त्यांना कितीही परमार्थाचा उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो. ”
11:27 am –
अभंग क्र. ३४०२
तामसाची तपे पापाची सिदोरी । तमोगुणे भरी घातले से ॥१॥
राज्यपदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगावा ॥धृपद॥
इंद्रिये दमिली इच्छा जिती जीवी । नागविती ठावी नाही पुढे ॥२॥
तुका म्हणे हरीभजनावाचून । करिती तो सीण पाहो नये ॥३॥
अर्थ
तमोगुणाने युक्त असलेल्या मनुष्याने तपे जरी केले तरी त्याने पापाचा संग्रह केला आहे कारण कोणतेही कर्म तो तमोगुणाच्या प्रेरणेनेच करत असतो. सध्या जरी तो राज्यपद किंवा संपत्तीचा भोग घेत असेल तरी या सर्वाचे उल्लंघन करुन तो नरकगावाला जातो. त्याने जरी इंद्रियांचे दमन केले तरी त्याच्या जीवामधे इच्छा वासना जीवंत राहातात आणि त्याच त्याला पुढे नागवून सोडतात हे त्याला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जर एखादा मनुष्य हरीभजनावाचून इतर कोणतेही साधन करीत असेल तर तो व्यर्थ त्रासच करुन घेत आहे असे समजावे व अश्या मनुष्याला आपण कधी पाहू देखील नाही. ”
11:27 am –
अभंग क्र. ३४०३
हरीकथेविण इच्छिती स्वहित । हरीजन चित्त न घला तेथे ॥१॥
जाईल भंगोन आपुला विश्वास । अवघिया नास कारणांचा ॥धृपद॥
ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावे ॥२॥
तुका म्हणे काय झालेती जाणते । देवा ही परते थोर तुम्ही ॥३॥
अर्थ
हरीकथेवाचूनच म्हणजे हरीकथा ऐकल्याशिवायच आपले स्वहित हाईल असे काही लोकांना वाटते परंतू हरीजन हो तुम्ही आपले चित्त हरीकथेवाचून दुसरे कोठेही घालू नका. कारण हरीकथेवाचून जर इतरत्र तुम्ही चित्त घालाल तर तुमचा हरीकथेवरील विश्वास कमी होईल आणि सर्वनाशच होईल. आपण भोजन करताना पंगतीत ज्याच्याबरोबर बसतो त्या मनुष्याने जसे भोजन खाण्यासाठी निवडले तेच भोजन आपल्याला देखील त्याच्या संगतीत बसूनच खावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “संतसंगती करणे हे केव्हाही चांगले ज्याने गीता लिहीली अशा देवापेक्षाही तुम्ही थोर आणि शहाणे झाला आहात काय ? ”
11:27 am –
अभंग क्र. ३४०४
(श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकाराम महाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळरूपाने दिले परंतु त्याने तेन घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
सेवके करावे स्वामीचे वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईल जीव का सारील परते । भंगलिया चित्ते सांदीजेना ॥धृपद॥
खद्योते दावावी रवी केवी वाट । आपुले ते नीट उसंतावे ॥२॥
तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजो भेदे ॥३॥
अर्थ
सेवकाने स्वामीने दिलेल्या शब्दाचे पालन करावे ते करत असताना हुतूतूपणा करु नये. स्वामी आपल्याला कामावरुन दूर लोटेल किंवा आपला जीव घेईल तरी देखील आपण स्वामीने दिलेले शब्द पाळावेत कारण एकदा की आपले मन फाटले तर पुन्हा ते एकत्र येणे शक्य होत नाही. काजव्याने आपण चाललेल्या वाटेने गुपचूप चालत राहावे सूर्याला वाट दाखवण्याच्या भानगडीत त्याने पडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, “श्रीज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचा सागर आहेत ते आपले ह्दयस्थान भेदाच्या ओलाव्याने अव्दैताचा सुगंध भिजू देत नाहीत. ”
अभंग क्र. ३४०५
(श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीपाठविलेल्याधरणेकऱ्यासउपदेशवतुकाराममहाराजांनीत्यालादेवाचेवर्णनकेलेलेअभंगमहाफळम्हणूननारळरूपानेदिलेपरंतुत्यानेतेनघेतातसेचटाकूनतोब्राह्मणनिघूनगेला. )
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी ॥धृपद॥
जया हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहे समाधाने चित्ताचिया ॥३॥
अर्थ
ज्ञानाचा सागर असलेले जे ज्ञानेश्वर महाराज आहे त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि त्यांच्या अंगी असे बळ आहे की त्यांनी प्रत्यक्ष रेड्याच्या मुखी वेद बोलविले आहेत. असे हे ज्ञानेश्वर महाराज काय करु शकत नाहीत परंतू साधकाच्या अंत:करणामध्ये परमार्थाचे शुध्द बीज आहे की नाही हे ते पाहात असतात. ज्यांनी मुक्तिछत्र घातले आणि वैष्णवाचा मेळा एकत्र आणला, तुकाराम महाराज म्हणतात, “खरे हे धरणेकरी ब्राम्हणा ज्ञानेश्वर महाराजांजवळ सुखाला काय कमतरता आहे त्यामुळे आपल्या चित्ताचे समाधान कर आणि त्यांच्याजवळच आश्रय घेऊन राहा. ”
11:28 am –
अभंग क्र. ३४०६
बहुता छंदाचे बहु असे जन । नये वाटू मन त्यांच्या संगे ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥धृपद॥
सुखाची समाधी हरीकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथे काय कोड धावायाचे ॥३॥
अर्थ
येथे खूप छंदाचे खूप लोक आहेत परंतू आपले मन त्यांच्या संगतीत एकत्र करुन त्या वाटेने जाऊ नये. आपल्या अंगी जो भक्तीचा आवडीचा रस आला आहे तो तसाच राखावा व देव संत यांच्यावर जो आपला दृढ विश्वास आहे तो देखील तसाच जतन करुन ठेवावा. हरीकथा माऊली सुखाची समाधी आहे संसारमध्ये त्रासलेल्या हरीभक्तांना विश्रांती देणारी सावली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो जो स्वत:च्या पोटाला दगड बांधून पाण्यामध्ये उडी घेतो त्याला वाचवण्याची आवड तरी काय धरावी म्हणजेच ज्याला हरीकथा, संत, देव यांच्याविषयी आवड नाही श्रध्दा नाही त्यांना उपदेश करुन तरी काय उपयोग आहे ? ”
11:28 am –
अभंग क्र. ३४०७
हरीकथे नाही । विश्वास ज्याचे ठायी ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचे बीळ ॥धृपद॥
सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥
तुका म्हणे पिसी । वाया गेली किती ऐसी ॥३॥
अर्थ
ज्याच्या ठिकाणी हरीकथेविषयी विश्वासच नाही, त्याची वाणी अमंगळ आहे आणि कान म्हणजे उंदराचे बीळ आहे. हरीकथेसारखा अमृत रस टाकून हरीप्राप्तीसाठी इतर कष्टदायक साधने काही लोक करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “असे कितीतरी वेडे आहेत की ज्यांनी हरीभक्तीचा आनंद सोडून दिला आणि हरीप्राप्तीसाठी इतर साधने केली ती वायाला गेलेले आहेत. ”
11:28 am –
अभंग क्र. ३४०८
अमृताची धार । वाहे देवाचे समोर ॥१॥
उर्ध्ववाहिनी हरीकथा । मुगुटमणि सकळा तीर्था ॥धृपद॥
शिवाचे जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हरी । इची स्तुति वाणी थोरी ॥३॥
अर्थ
देवाच्या समोर उभा राहून हरीकथा करणे म्हणजे ते शब्द अमृताच्या धारेप्रमाणेच आहेत. हरीकथा ही उर्ध्ववाहिनी आहे मोक्षाकडे वाहणारी आहे सर्व तीर्थांचे ती मुकूटमणी आहे. हरी कीर्तन हे भगवान शिवाचे जीवन आहे महादोषाना जाळणारे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “स्वत: हरीच हरी कीर्तनाची मोठी स्तुती वर्णन करत असतो. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















