आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२४ ऑक्टोबर, दिवस २९७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५५३ ते ३५६४
“२४ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २४ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५५३ ते ३५६४ चे पारायण आपण करणार आहोत.
२४ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २०१ ते २२५,
201-18
परी हे मी करितु असे । ऐसा आठवु त्यजी मानसे । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥201॥
परंतु हे कर्म मी करीत आहे, अशी मनात आठवणही होवू देत नाही; तसेच फळाच्या आशेवर ही पाणी सोडतो. ॥201॥
202-18
पै अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायी अर्जुना । केलिया दोनी पतना । कारण होती ॥202॥
अर्जुना, असे पहा कि, मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली, तर या दोन्ही गोष्टी नरक प्राप्तीस कारण होतात.
203-18
तरी दोनी ये त्यजावी । मग माताची ते भजावी । वाचूनि मुखालागी वाळावी । गायचि सगळी ? ॥203॥
तर या दोन्ही वर्ज्य करून मातेची सेवा करावी. गाईचे तोंड अपवित्र असले म्हणून गाईच्या सर्वागाचा त्याग करावयाचा की काय ?
204-18
आवडतियेही फळी । असारे साली आंठोळी । त्यासाठी अवगळी । फळाते कोण्ही ? ॥204॥
आपल्यास आवडते जे फळ (आंबा) त्याची साल व कोय यामध्ये रस नाही, हे दोन दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत, म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल काय ?
बंध म्हणजे काय ?.
205-18
तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहीचे नांव बंधु । कर्माचा की ॥205॥
त्याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोहोसच बंध असे नाव आहे.
206-18
तरी या दोहीच्या विखी । जैसा बापु नातळे लेकी । तैसा हो न शकेदुःखी । विहिता क्रिया ॥206॥
म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगत नाही, त्याप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोहोविषयी इच्छा करीत नाही, त्याला दुःख होऊ शकत नाही.
207-18
हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळे ये थोरु । सात्विक ऐसा डगरु । यासीच जगी ॥207॥
हा त्याग रूप वृक्ष सर्व वृक्षांत श्रेष्ठ असून, यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात म्हणून सर्व जगात सात्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे.
208-18
आता जाळूनि बीज जैसे । झाडा कीजे निर्वंशे । फळ त्यागूनि कर्म तैसे । त्यजिले जेणे ॥208॥
आता, झाडाचे बीज जाळून झाडास जशी निर्वंश करावे, तसे फळाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो.
209-18
लोह लागतखेवो परीसी । धातूची गंधिकाळिमा जैसी । जाती रजतमे तैसी । तुटली दोन्ही ॥209॥
ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताक्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात, त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोन गोष्टीचा त्याग केल्यावर रज व तम हे दोन्ही त्याग नाहीतसे होतात.
210-18
मग सत्वे चोखाळे । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसे ॥210॥
मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाच्या उजेड होउन जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहितसे होते,
211-18
तैसा बुद्ध्यादिकांपुढा । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडा । आकाश जैसे ॥211॥
किंवा आकाश (पोकळी) जसे कोणीकडे दिसत नाही, तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥18. 10॥
212-18
म्हणौनि प्राचिनाचेनि बळे । अलंकृते कुशलाकुशले । तिये व्योमाआंगी आभाळे । जिराली जैसी ॥212॥
म्हणून पूर्वकर्मानुरोधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती, आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात.
213-18
तैसी तयाचिये दिठी । कर्मे चोखाळली किरीटी । म्हणौनि सुखदुःखी उठी । पडेना तो ॥213॥
तशी अर्जुना, त्याच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात. म्हणून त्यापासून होणार्या सुखदुःखांची उठाठेव तो करीत नाही.
214-18
तेणे शुभकर्म जाणावे । मग ते हर्षे करावे । का अशुभालागी होआवे । द्वेषिया ना ॥214॥
शुभ कर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही, किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही.
215-18
तरी इयाविषयींचा काही । तया एकुही संदेहो नाही । जैसा स्वप्नाच्या ठायी । जागिन्नलिया ॥215॥
ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीची कोणी सुखदुःख मानीत नाही, त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ याविषयी त्याच्या मनात शंकाच येत नाही.
216-18
म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । नेणे तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥216॥
म्हणून अर्जुना, हे कर्म आणि कर्ता यात द्वैतभावाची वार्ता तो जाणतहि नाही, त्याला सात्त्विक त्याग असे म्हणतात.
217-18
ऐसेनि कर्मे पार्था । त्यजिली त्यजिती सर्वथा । अधिके बांधिती अन्यथा । सांडिली तरी ॥217॥
पार्था, अशाप्रकारे कर्माचा त्याग केला तरच कर्माचा त्याग होतो; पण या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला, तर ती उलटी अधिकच बंधनात पाडतात.
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥18. 11॥
218-18
आणि हा गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥218॥
आणि अर्जुना, जो देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते मूर्ख होत. ॥18॥
219-18
मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? । केउता ताथु पटु । सांडील तो ? ॥219॥
मातीचा कंटाळा करून घट काय करील ? आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल ? ॥19॥
220-18
तेवीचि वन्हित्व आंगी । आणि उबे उबगणे आगी । की तो दीपु प्रभेलागी । द्वेषु करील काई ? ॥220॥
तसेच अग्नीत्व अंगी असलेल्या आगीला उष्णतेचा कंटाळा करता येईल का ? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय ? ॥220॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-18
हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचे सुगंधत्व आणी ? । द्रवपण सांडूनि पाणी । के राहे ते ? ॥221॥
हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास आला तरी त्याने चांगला वास कुठून आणावा ? किंवा पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार ? ॥21॥
222-18
तैसा शरीराचेनि आभासे । नांदतु जव असे । तव कर्मत्यागाचे पिसे । काइसे तरी ? ॥222॥
त्याप्रमाणे शरीराचे अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे, तोपर्यंत कर्म त्यागाचे वेड काय उपयोगी पडेल ? ॥22॥
223-18
आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसो ये वेळोवेळा । मा घाली फेडी निडळा । का करू ये गा ? ॥223॥
आपण लावलेले गंध वाकडे लागले, तर ते वरचेवर पुसता येते; परंतु कपाळ जर वाकडे असेल, तर ते कसे नीट करता येईल ? ॥23॥
224-18
तैसे विहित स्वये आदरिले । म्हणौनि त्यजू ये त्यजिले । परी कर्मचि देह आतले । ते का सांडील गा ? ॥224॥
त्याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे, त्याचा त्याग करावयाचा म्हटले तर करिता येईल; पण त्यायोगे काही कर्मत्याग होणार नाही. कारण शरीर हे कर्म रूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार ? ॥24॥
225-18
जे श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी । काही न करणेयाचि परी । होती जयाची ॥225॥
का की, मनुष्य निजला असला तरी श्वासोश्वास रूपाने कर्म हे घडतेच, अर्थात आपण काही एक न करिता त्याची उभारणी होते, ॥25॥
दिवस २९७ वा. २४, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५५३ ते ३५६४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३५५३ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काय पोरे जाली फार । किंवा न साहे करकर ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । घास घेऊ न लाहे तोंडी ॥धृपद॥
करू कलागती । तुज भांडणे भोवती ॥२॥
तुका म्हणे टांचे । घरी झालेंसे वरोचे ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला माझ्यासारखी भक्तरुपी पोरे फार झाली आहेत की काय किंवा त्यांची किरकिर तुम्हाला सहन होत नाही की काय ? देवा तुम्हाला आम्ही तुमच्या हातातला घास देखील व्यवस्थित तोंडापर्यंत जाऊन देत नाही तुम्हाला व्यवस्थित जेवण करु देत नाही त्यामुळेच तुम्ही आम्हाला असे टाकून दिले आहे की काय ? देवा आम्ही तुझ्याभोवती जमा होऊन भांडणे करतो त्यामुळेच तुम्ही आम्हाला त्रासले आहात की काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमच्या घरी खाण्यासाठी अन्न कमी पडले आहे की काय म्हणून आम्हाला तुमच्यापासून तुम्ही असे दूर केले आहे. ”
12:05
अभंग क्र. ३५५४ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
काही चिंतेविण । नाही उपजत सीण ॥१॥
तरी हा पडिला विसर । माझा तुम्हा झाला भार ॥धृपद॥
आली काही तुटी । गेली सुटोनिया गाठी ॥२॥
तुका म्हणे घरी । बहु बैसले रिणकरी ॥३॥
अर्थ
काहीतरी चिंता असल्याशिवाय शीण उत्पन्न होत नाही. देवा तुम्हाला माझा भार झाला असावा त्यामुळेच तुम्हाला माझा विसर पडला असावा. देवा तुम्हाला आमच्यापासून काहीतरी तोटा झाला असावा त्यामुळेच तुम्ही आम्हाला तुमच्यापासून थोडे बाजूला केले असावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा किंवा तुझ्या घरापुढे तू ज्यांच्याकडून सेवारुपी ऋण घेतले असे तुझे भक्त तुझ्या घरापुढे बसलेले असावेत. ”
12:05
अभंग क्र. ३५५५ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
निरोपासी वेचे । काय बोलता फुकाचे ॥१॥
परी हे न घेवेचि यश । भिऊ नको सुखी आस ॥धृपद॥
सुख समाधाने । कोण पाहे देणे घेणे ॥२॥
न लगे निरोपासी मोल । तुका म्हणे वेचे बोल ॥३॥
अर्थ
देवा तू जर चार निरोपाचे शब्द पाठवले असते तर तुझे काही खर्च झाले असते काय ? तुला चार शब्द पाठवण्याचा देखील श्रेय घ्यायचा नसेल तर ठीक आहे नको घेऊ यापुढे मला तू भिऊ देखील नको तू तुझ्या ठिकाणी सुखी राहा. जो सुखी आणि समाधानी असेल तो दुसऱ्याचे घेणे देणे कशाला पाहात बसेल ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे देवा निरोप पाठवण्यासाठी किंवा चार शब्द बोलण्यासाठी तुझे काही खर्च होणार नाही तेवढे तरी काम तू कर. ”
12:05
अभंग क्र. ३५५६ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
जोडीच्या हव्यासे । लागे धनांचेचि पिसे ॥१॥
मग आणीक दुसरे । लोभ्या नावडती पोरे ॥धृपद॥
पाहे रुक्याकडे । मग अवघे ओस पडे ॥२॥
तुका म्हणे देवा । तुला बहुताचा हेवा ॥३॥
अर्थ
एकदा की मानवाला धनाचा साठा करण्याचा हव्यास लागला की तेच वेड त्याला कायम लागते मग त्या लोभी मनुष्याला दुसरे काहीही आवडत नाही अगदी आपले मुले सुध्दा आवडत नाहीत. असा लोभी मनुष्य नेहमी रुपयांकडे पाहातो रुपयापुढे त्याला सर्व ओस पडलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुला देखील असाच हव्यास आहे साऱ्या जगाचा तुला हव्यास असल्यामुळे आमच्यासारख्या लेकरांकडे तुझे लक्षच नाही. ”
12:05
अभंग क्र. ३५५७ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
मविले मविती । नेणो रासी पडिल्या किती ॥१॥
परि तू धालाचि न धासी । आले उभाउभी घेसी ॥धृपद॥
अवघ्या अवघा काळ । वाटा वाहाती सकळ ॥२॥
तुका म्हणे नाही । अराणूक तुज काही ॥३॥
अर्थ
कितीही मोजल्या तरी मागे मोजायच्या शिल्लकच राहतील अशा कितीतरी राशी तुझ्यापुढे देवा पडलेल्या असतील. देवा तू एवढा तृप्त असून तरी देखील अतृप्तच आहेस तुझ्यापुढे जे काही येईल ते तू उभ्या उभ्याच घेतोस. देवा सर्वकाळ तुझे भक्त तुझ्याकडे येण्यासाठी तुझे दर्शन घेण्यासाठी येतच आहेत त्या वाटा नेहमी सारख्या वाहातच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा एवढे सगळे असून देखील तुला मात्र समाधान काही प्राप्त होत नाही. ”
12:05
अभंग क्र. ३५५८ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
न बैससी खाली । सम उभाच पाउली ॥१॥
ऐसे जाले बहुत दिस । जाली युगे अठ्ठाविस ॥धृपद॥
नाही भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥
तुका म्हणे किती । मापे केली देती घेती ॥३॥
अर्थ
देवा तू कधीही खाली बसत नाही किती दिवस झाले तसा दोन्हीही समचरण ठेवून तू विटेवर तसाच उभा आहेस. देवा तू विटेवर तुझे दोन्हीही समचरण ठेवून उभा राहून कितीतरी दिवस म्हणजे अठ्ठावीस युग झाले आहेत. देवा असे असले तरी देखील तुला काही त्रास शीण होत नाही एक क्षण देखील तू आराम करत नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू कितीतरी वेळा भक्तांजवळ देण्याघेण्याचे माप केले आहेस त्याला काही गणती नाही व आम्हालाही काही कळत नाही. ”
12:05
अभंग क्र. ३५५९ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
जोडी कोणासाठी । एवढी करितोसी आटी ॥१॥
जरी हे आम्हा नाही सुख । रडो पोरे पोटी भूक ॥धृपद॥
करूनि जतन । कोणा देसील हे धन ॥२॥
आमचे तळमळे । तुझे होईल वाटोळे ॥३॥
घेसील हा शाप । माझा होऊनिया बाप ॥४॥
तुका म्हणे उरी । आता न ठेवी यावरी ॥५॥
अर्थ
देवा अरे तू भक्तांकडून एवढे ऋण कशासाठी गोळा करतोस एवढे कष्ट का करतोस कोणासाठी एवढे तू ऋण गोळा करुन ठेवत आहेस ? अरे देवा तू एवढे धन गोळा करतो ते कशासाठी जर तुझे लेकरच सुखी नाहीत पोटात भूक असल्यामुळे ते रडते आहे मग त्या धनाचे तू काय करणार आहेस ? अरे देवा तू हे धन जतन करुन देशील तरी कोणाला ? परंतू हे देवा तू आम्हाला तळमळ करायला लावतोस आमच्या तळमळीने तुझे वाटोळेच होईल देवा तू आमचा बाप झाला आहेस खरा परंतू आमच्या लेकरांचा तू शापच घेशील. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू आता तुझ्याजवळ काहीही शिल्लक ठेवू नकोस सर्व काही आम्हाला देवून टाक. ”
12:06
अभंग क्र. ३५६० (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥
जरि तू होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥धृपद॥
येथे न करी काम । मुखे नेघें तुझे नाम ॥२॥
तुका म्हणे कुळ । तुझे बुडवीन समूळ ॥३॥
अर्थ
देवा तुझी चहाडी मी सर्वत्र करीन आणि तू आतापर्यंत प्राप्त करुन घेतलेली तुझी किर्ती मी सर्व बुडवून टाकीन. देवा तू जर अशी आशा अपेक्षा बुडवित असशील आणि माझ्याविषयी उदास होत असशील तर मीही तुझे वाटोळेच करीन. मग मी देवा येथे कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही व तुझे नाम मी कधीही माझ्या मुखाने घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू जर माझ्याविषयी उदास राहिलास तर मी कूळ समूळ बुडवून टाकीन. ”
12:06
अभंग क्र. ३५६१ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
समर्थाचे पोटी । आह्मी जन्मलो करंटी ॥१॥
ऐसी झाली जगी कीर्ती । तुझ्या नामाची फजिती ॥धृपद॥
येथे नाही खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥२॥
तुका म्हणे जिणे । आता खोटे जीवेपणे ॥३॥
अर्थ
देवा तुझ्यासारख्या सर्वसमर्थाच्या पोटी आम्ही करंटी मुले जन्मलो आहोत. देवा अशी किर्ती तुझी जगामध्ये झाली असून तुझ्या नामाची अशा प्रकारे फजिती झाली आहे. अहो या देवाच्या घरी खाण्यासाठी काहीच नाही त्यामुळे तर त्याच्या पोरांना कोणी मूळ पाठवित नाही किंवा त्यांना नेण्याकरताही कोणी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अशी तुझी किर्ती झाली असून आता आमचा जीवपणा आम्ही राखून आम्ही जगावे हे देखील आता खोटेच झाले आहे. ”
12:06
अभंग क्र. ३५६२ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
पुढे तरी चित्ता । काय येईल ते आता ॥१॥
मज सांगोनिया धाडी । वाट पाहातो बराडी ॥धृपद॥
कंठी धरिला प्राण । पायापाशी आले मन ॥२॥
तुका म्हणे चिंता । बहु वाटतसे आता ॥३॥
अर्थ
आता यापुढे देवा तुमच्या चित्तामध्ये काय येईल काय माहित. देवा आता तरी कोणाच्या हाती तू मला पंढरीला येण्यासाठी निरोप धाड मी भिकाऱ्यासारखा तुझा निरोप येण्याची वाट पाहात आहे. देवा कंठात प्राण धरुन मी राहीलो आहे माझे मन तर केव्हाच तुमच्या पायापाशीच आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता यापुढे तू माझ्याबाबतीत काय निर्णय घेशील याचीच मला खूप चिंता वाटत आहे. ”
12:06
अभंग क्र. ३५६३ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
कैचा मज धीर । कोठे बुद्धि माझी स्थिर ॥१॥
जे या मनासी आवरू । आत पोटी वाव धरू ॥धृपद॥
कैची शुद्ध मति । भांडवल ऐसे हाती ॥२॥
तुका म्हणे अंगा । कोण दशा आली सांगा ॥३॥
अर्थ
देवा मला कसला धीर आहे मला तर धीरच नाही माझी बुध्दी तरी कोठे स्थिर आहे ? जेणेकरुन मी माझ्या मनाला आवरु शकेल आणि माझ्या अंत:करणामधे वाव धरु शकेन. देवा माझी बुध्दी तरी एवढी शुध्द कोठे आहे आणि माझ्या हाती विवेक आणि वैराग्य हे भांडवल तरी कोठे आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे या गोष्टीमुळे माझी कशी दशा झाली आहे हे तुला कसे सांगावे ? ”
12:07
अभंग क्र. ३५६४ (पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर देवास पत्र)
समर्पक वाणी । नाही ऐकिजेसी कानी ॥१॥
आता भावे करूनि साचा । पाया पडिलो विठोबाच्या ॥धृपद॥
न कळे उचित । करू समाधान चित्त ॥२॥
तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्ती ॥३॥
अर्थ
अहो देवा माझी वाणी एवढी समर्पक नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या कानाने ऐकावीशी वाटत नसावी. आता मी माझा भक्तीभाव अगदी खरा केला आहे आणि विठोबाच्या पाया पडलो आहे. देवा तुमच्या चित्ताचे समाधान कशाने होईल व त्यासाठी योग्य उचित असे काय आहे तेच मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुम्हाला जी विनंती केली आहे तेवढी माझी विनवणी तुम्ही तुमच्या चित्तात धरा म्हणजे झाले. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















