आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१३ ऑक्टोबर, दिवस २८६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४२१ ते ३४३२
“१३ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 13 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १३ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४२१ ते ३४३२ चे पारायण आपण करणार आहोत.
१३ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ३५१ ते ३७५,
351-17
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणता वीरा । प्रकाशु नोहे ॥351॥
किंवा तेल, वात व अग्नि वगैरे सामग्री असली तरी त्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धति माहीत नसेल तर, जशी प्रकाशाची प्राप्ति होत नाही. 51
352-17
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ ते आघवे । विनियोगेवीण ॥352॥
त्याप्रमाणे, योग्य वेळी कर्म घडून त्यावेळचे मंत्रही जरी स्मरले तरी त्याच्या विनियोगाचे वर्म माहीत नसेल तर ते सर्व व्यर्थ होते. 52
353-17
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हे परब्रह्मनाम एक । विनियोगु तू आइक । आता याचा ॥353॥
म्हणून, ह्या परब्रह्माचे जे वर्णत्रयात्मक एक नाम आहे त्याचा विनियोग (उपयोग) कसा करावा ते तू आता श्रवण कर. 53
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥17. 24॥
354-17
तरी या नामींची अक्षरे तिन्ही । कर्मा आदिमध्यनिदानी । प्रयोजावी पै स्थानी । इही तिन्ही ॥354॥ नामीची
तरी ह्या ब्रह्मनामाची तिन्ही अक्षरे ” ॐ तत् सत् ” ह्यांची कर्मारंभाच्या आधी मध्ये व अंती योजना करावी. 54
355-17
हेचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥355॥
हेच विनियोगाचे वर्म जाणून, ब्रह्मवेत्ते (ब्राह्मण) ब्रह्मरूप झाले. 55
356-17
ब्रह्मेसी होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकी । जे चावळले वोळखी । शास्त्रांचिया ॥356॥
ब्रह्मरूप होण्याची ज्यांना इच्छा आहे ते, ज्यांचे यथार्थ स्वरूप शास्त्रांत सांगितले आहे अशा, यज्ञादिक क्रियांचा त्याग करीत नाहीत. 56
357-17
तो आदि तव ओंकारु । ध्याने करिती गोचरु । पाठी आणिती उच्चारु । वाचेही तो ॥357॥
ते प्रथम ॐकाराची ध्यानाने सिद्धि करून नंतर त्याचा वाणीने उच्चार करतात. 57
358-17
तेणे ध्याने प्रकटे । प्रणवोच्चारे स्पष्टे । लागती मग वाटे । क्रियांचिये ॥358॥
असे ध्यान करून नंतर प्रकट प्रणवोच्चार करून मग सर्व कर्माना आरंभितात. 58
359-17
आंधारी अभंगु दिवा । आडवी समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभी ॥359॥
अंधारांत दिव्याचा, अरण्यात शूर सोबत्याचा जसा आधार असतो तसा ‘प्रणवाचा’ कर्मारंभांत रक्षक म्हणून उपयोग असतो. 59
360-17
उचितदेवोद्देशे । द्रव्ये धर्म्ये आणि बहुवसे । द्विजद्वारा हन हुताशे । यजिती पै ते ॥360॥
योग्य देवतांच्या उद्देशाने धर्माजित पुष्कळ द्रव्याने ते ब्राह्मणद्वारा अग्नींत यजन करतात. 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-17
आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपी हवनी । यजिती पै विधानी । फुडे हौनी ॥361॥
आहवनीय, गार्हपत्य व दक्षिण ह्या तीन अग्नींत, हवनीय आज्यादि (तूप वगैरे) द्रव्यांनी ते हवन करतात. 61
362-17
किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥362॥
किंबहुना अनेक यज्ञ करण्याच्या संकल्पाने आपल्यास न आवडणाच्या इतर उपाधींचा त्याग करितात (सांसारिक उपाधि) 62
363-17
का न्याये जोडला पवित्री । भूम्यादिकी स्वतंत्री । देशकाळशुद्ध पात्री । देती दाने ॥363॥
आणि न्यायाजित पवित्र द्रव्य व भूमि वगैरे दाने शुद्ध देशकाल पाहून सत्पात्र ब्राह्मणास देतात. 63
364-17
अथवा एकांतरा कृच्छ्री । चांद्रायणे मासोपवासी । शोषोनि गा धातुराशी । करिती तपे ॥364॥
अथवा एक दिवस आड भोजन करून किंवा कृच्छचांद्रायणादि मासिक उपवासाने शरिरांतील सप्त धातूचे शोषण करून जे तप करितात. 64
365-17
एवं यज्ञदानतपे । जिये गाजती बंधरूपे । तिहीच होय सोपे । मोक्षाचे तया ॥365॥
याप्रमाणे, जी यज्ञ, दान, तपे बंधरूप आहेत, अशी प्रसिद्धि आहे त्यांनीच, आरंभाला केलेल्या प्रणवोच्चाराच्या हातवटीने, त्यांना मोक्ष सुलभ होते. 65
366-17
स्थळी नावा जिया दाटिजे । जळी तियांचि जेवी तरीजे । तेवी बंधकी कर्मी सुटिजे । नामे येणे ॥366॥
जमिनीवर जी नाव मोठे ओझे अशी वाटते तीच पाण्यात लोटल्यावर हलकी वाटून तरणोपाय होते. त्याप्रमाणे कर्म बंधनकारक खरी, पण प्रणवोच्चाराने ती बंधनकारक होत नाहीत. 66
367-17
परी हे असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया । ओंकारे सावायिलिया । प्रवर्तती ॥367॥
परंतु हे राहो; ह्या यज्ञदानादि क्रिया ॐकाराच्या सहाय्याने मोठ्या योग्यतेस चढतात. 67
368-17
तिया मोटकिया जेथ फळी । रिगो पाहाती निहाळी । प्रयोजिती तिये काळी । तच्छब्दु तो ॥368॥
ती कर्मे फलीभूत होण्याच्या वेळेस ” तत ” शब्दाचा ते प्रयोग करितात. 68
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥17. 25॥
369-17
जे सर्वाही जगापरौते । जे एक सर्वही देखते । ते तच्छब्दे बोलिजे ते । पैल वस्तु ॥369॥
जे सर्व जगाच्या पलीकडले असून सर्वसाक्षी आहे व ज्याचा ‘तत् ” ह्या । शब्दाने निर्देश करितात ते सर्वश्रेष्ठ परब्रह्म होय. 69
370-17
ते सर्वादिकत्वे चित्ती । तद्रूप ध्यावूनिया सुमती । उच्चारेही व्यक्ती । आणिती पुढती ॥370॥
अर्जुना, ते सर्वाच्याही आधीचे असे त्याच्या रूपाचे चित्तांत ध्यान करून नंतर त्याचा ‘तत् ” शब्द मे स्पष्ट निर्देश करितात. 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-17
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेसी क्रिया इया । तेचि होतु आम्हा भोगावया । काहीचि नुरो ॥371॥
आणि म्हणतात तत् शब्दवाच्य जे ब्रह्म त्याला ह्या सर्व क्रिया त्यांच्या फलांसह अर्पण असोत, व त्या तद्रूपच होवोत; त्यांचा अगर त्यांच्या फळांचा आम्हास कोणत्याही प्रकारे भोग न घडो. 71
372-17
ऐसेनि तदात्मके ब्रह्मे । तेथ उगाणूनि कर्मे । आंग झाडिती न ममे । येणे बोले ॥372॥
ह्याप्रमाणे तद्रूप जे ब्रह्म त्याला सर्व कर्मे समधून “न मम” (माझे काहीही नव्हे) असा उच्चार करून अंग झाडून मोकळे होतात. 72
373-17
आता ओंकारे आदरिले । तत्कारे समर्पिले । इया रिती जया आले । ब्रह्मत्व कर्मा ॥373॥
आता प्रणब म्हणजे ॐ काराच्या उच्चाराने आरंभून जे कर्म ‘तत् ” शब्दाच्या उच्चाराने ब्रह्मसमर्पण करून त्याला ब्रह्मत्व आणिलें. 73
374-17
ते कर्म कीर ब्रह्माकारे । जाले तेणेही न सरे । जे करी तेणेसी दुसरे । आहे म्हणौनि ॥374॥
पण ते कर्म ब्रह्माकार झाले, एवढयानेच केवल भागत नाही. कारण त्यांचा कर्ता म्हणून एक दुसरेपणाने शिल्लक आहेच. 74
375-17
मीठ आंगे जळी विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसे कर्म ब्रह्माकारे । गमे ते द्वैत ॥375॥
मीठ पाण्यात विरून जरी रूपाने नष्ट झाले तरी क्षार ह्या स्वभावाने त्याचे पृथकत्व उरतेच, त्याप्रमाणे कर्म ब्रह्मरूप आहे किंवा झाले असे म्हणण्यातच त्याचे द्वितीयत्व सिद्ध होते. 75
दिवस २८६ वा. १३, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४२१ ते ३४३२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३४२१ (शिवाजीमहाराजांनीतुकाराममहाराजांनानेण्याकरताघोडाकारकूनअबदागिरीपाठविलीत्यावेळीकारकुणाबरोबरपाठविलेलानिरोप)
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
तुमचे येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥धृपद॥
कंठी मिरावा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥
अर्थ
हे शिवराय तुम्ही मुखाने “विठ्ठल विठ्ठल” असे म्हणा आम्ही त्यायोगाने सुखी होऊ. तुमचे वित्त, धन हे आम्हाला मातीच्या समान आहे. कंठामध्ये तुळशीची माळ घाला व त्याचे भूषण सर्वत्र मिरवा आणि एकादशी सारखे पवित्र व्रत करा. तुकाराम महाराज म्हणतात, “स्वत:ला मी हरीदास आहे असे म्हणून घ्या एवढीच एक अपेक्षा मला तुमच्यापासून आहे. ”
11:31 am –
अभंग क्र. ३४२२ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबे ॥१॥
सांडूनि लौकिक झालिये उदास । नाही भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइके वचन बोलता या लोका । म्हणे झाले तुका हरीरत ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) , “लोकांनी वाळीत टाको, व्याभिचारीण म्हणो परंतू या वनमाळिला मी कधीही विसरणार नाही. ती कृष्ण रूपामध्ये तल्लीन झालेली बुद्धी पुढे म्हणते की मी आता लोकलौकिक टाकून संपूर्णपणे उदास झाले आहे मला कोणाचे भय किंवा माझ्या जीवित्वाची अपेक्षा राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता मला कोणीही बोलो लोक मला काहीही म्हणोत माझ्या बुध्दीला त्याविषयी काहीही वाटणार नाही कारण माझी बुध्दी आता हरीरत झाली आहे. ”
11:31 am –
अभंग क्र. ३४२३ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलिये ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आता । रातले अनंता तुका म्हणे ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) चित्तरुपी स्त्री म्हणते की माझा पहिला संसाररुपी नवरा माझ्या इच्छा पूर्ण करत नाही त्यामुळे मी परपुरुषाकडे म्हणजे श्रीहरीशी व्याभिचार करण्यासाठी प्रवृत्त झाले आहे. तो परपुरुष म्हणजे श्रीहरी मला रात्रंदिवस माझ्याजवळच पाहिजे त्याच्यावाचून एक क्षणभर देखील मला वेळ जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “लोकहो तुम्ही आता मला माझ्या पहिल्या नवऱ्याकडे म्हणजे संसाराकडे नेण्याविषयी काही समजून सांगू नका माझे तुम्ही नांव विसरुन जा कारण मी आता परपुरुषाशी म्हणजे या अनंताशी एकरुप झाले आहे. ”
11:32 am –
अभंग क्र. ३४२४ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसले शेजारी गोविंदाचे ॥१॥
घररिघी झाले पट्टराणी बळे । वरीले सांवळे परब्रम्ह ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आता । नाही भय चिंता तुका म्हणे ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) मी आता गोविंदाच्या शेजारी येऊन बसले आहे हाच माझा नियम आहे आता येथून मी माघारी फिरणार नाही असे चित्तरुपी स्त्री म्हणते. मी माझ्या पहिल्या नवऱ्याला म्हणजे संसाराला त्यागून परपुरुषाच्या म्हणजे श्रीहरीच्या घरी बळेच घुसले आहे आणि त्याची पट्टराणी मी झाली आहे आणि या सावळया परब्रम्हालाच मी माझा वर म्हणून नेमले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व शक्तीमान असा श्रीहरी याच्याशी माझा आता अंगसंग झाला आहे त्यामुळे कसलीही भय किंवा चिंता राहिली नाही त्यामुळे मला पुन्हा माघारी नेण्यासाठी माझा पहिला नवरा म्हणजे संसार माझ्याकडे फिरकणार सुध्दा नाही. ”
11:32 am –
अभंग क्र. ३४२५ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
नाही काम माझे काज तुम्हासवे । होते गुप्त ठावे केले आता ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकामाजी झाले ॥२॥
न धरावा लोभ काही मजविशी । झाले देवपिशी तुका म्हणे ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) हे लोकहो माझे तुमच्याजवळ आता कोणत्याही प्रकारचे काही कामही नाही आणि जे गुप्त माहिती होती ती तुम्हाला माहितही करुन दिली आहे. आणि चित्तरुपी स्त्री पुढे म्हणते माझा व्याभिचार तुम्हाला आता ठाऊक झाला आहे त्यामुळे लोकांमध्ये मी मान्य होण्यासारखी राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझ्याविषयी कोणीही लोभ धरु नये कारण मी आता देववेडी झालेली आहे. ”
11:32 am –
अभंग क्र. ३४२६ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त झाले ॥२॥
मज आता कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानी बहिर झाले ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) चित्तरुपी स्त्री म्हणते मी आता आपला कूळ, आचार, पती, भावे, दीर, घर, सोयरे सर्व विसरले आहे. मी आता लोकलज्जा, भय, चिंता सर्वकाही सोडून दिले आहे परपुरुष असलेल्या अनंताशी माझे चित्त रत झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर आता मला कोणी बोलवले किंवा कोणी माझी समजूत काढण्यासाठी आले तर त्यावेळी माझे कान बहिरे झालेले असतील. ”
11:32 am –
अभंग क्र. ३४२७ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
न देखे न बोले नाइके आणीक । बैसला हा एक हरी चित्ती ॥१॥
सासुरे माहेर मज नाही कोणी । एक केले दोन्ही मिळोनिया ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) मी आता कोणालाही डोळयाने पाहाणार नाही, कोणाविषयी काही बोलणार नाही, कोणाविषयी काही ऐकणारही नाही कारण एक हरीच माझ्या चित्तामध्ये बसलेला आहे. मला आता सासर माहेर काहीच राहिले नाही मी दोन्ही एक केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “इतके दिवस आम्ही भांडखोर आहोत असा आळ आमच्यावर आला होता परंतू आता आम्ही ती गोष्ट सत्य करुन दाखवली आहे. ”
11:33 am –
अभंग क्र. ३४२८ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
दुजा ऐंसा कोण बळी आहे आता । हरी या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही झालो बळिवंता । करू सर्व सत्ता सर्वावरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । झालो प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आम्हाला आता अनंतापासून दूर करील असा अनंतावाचून बलवान दुसरा येथे कोण आहे ? सर्वात बलवान असा हरी याच्या आम्ही बायका झालो आहोत त्यामुळे आता आम्हीच सर्वत्र सत्ता करु व सर्वावर आमची सत्ता गाजवू. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही आता आमच्या जीवावर उदार झालो त्यामुळे तर गोविंदाचे प्रेम आमच्यावर अधिक वाढले आहे. ”
11:33 am –
अभंग क्र. ३४२९ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
क्षणभरी आम्ही सोसिले वाईट । साधिले अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागे केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणे जाणे नाही आता । राहिलो अनंताचिये पायी ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आम्ही क्षणभर थोडे वाईट दिवस सहन केले परंतू कधीही न विटणारे नीजसुख प्राप्त केले. मी यापूर्वी अनेक साधने स्वीकारले व पुन्हा सोडून दिले परंतू त्याने हरीची प्राप्ती झाली नाही उलट मला अधिकच दु:ख झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्हाला कोणत्याही प्रकारचे जन्ममरणाचे येरझार राहिले नाहीत कारण आम्ही अनंताच्या पायाशी रममाण झालो आहोत. ”
11:33 am –
अभंग क्र. ३४३० (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
आम्हा आम्ही आता वडील धाकुटी । नाही पाठी पोटी कोणी दुजे ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हासवे सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायी । असो जेथे नाही दुजे कोणी ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आता आम्हीच आमचे वडील व आम्हीच आमचे धाकटे आहोत आमच्या पाठीमागेही कोणी नाही व पुढेही दुसरे कोणी नाही. हरी हा आम्हाला एकातात बसल्यानंतर भेटतो व आम्ही त्याचा भोग घेतो हरीच्या ठिकाणीच आमचा एकविध भक्तीभाव आहे व हरी देखील आमचा सर्वस्वाने भोग घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, “एकातामध्ये जाऊन आम्ही हरीशी अंगसंग करतो हरीचा आम्ही व आमचा हरी असे आम्ही दोघेही अद्वैत स्वरुपाने एकमेकाचा भोग घेतो. ”
11:33 am –
अभंग क्र. ३४३१ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ । तोडियेले जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥२॥
तुका म्हणे आता गर्भ नये धरू । औषध जे करू फळ नव्हे ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) आम्ही सर्व प्रकारचे सुख सर्वकाळ भोगू कारण आम्ही सर्व प्रकारचे जाळे व मोहपाश तोडून टाकले आहेत. यासाठीच आम्ही प्रपंचरुपी संसाररुपी आमचा नवरा आम्ही सोडून दिला आहे व परपुरुष असा हरी याच्याशी आम्ही रत झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्ही पुन्हा संसाररुपी नवऱ्याकडे जाऊन जन्ममरणरुपी येरझार गर्भधारणा करुन घेणार नाही त्यापेक्षा आम्ही ज्ञानरुपी औषध सेवन करु असे केल्याने आम्हाला जन्ममरणरुपी बाळ होणारच नाही. ”
11:33 am –
अभंग क्र. ३४३२ (व्यभिचारिणीस्त्रीचेंरूपक)
एका जिवे आता जिणे जाले दोही । वेगळीक काही नव्हे आता ॥१॥
नारायणा आम्हा नाही वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे झाले सायासाचे फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) देव आणि मी जरी दिसायला भिन्न असलो तरी आम्ही दोघेही एकाच जीवाने जगत आहोत आता आमच्यामध्ये भेद पुन्हा कधीही राहाणार नाही. नारायणाने पूर्वी गीतेमध्ये असे वचन सांगितले आहे की, तो त्याच्या भक्तांना त्याच्या स्वरुपापेक्षा भिन्न उरु देणार नाही आणि याच वचनाचे तो रक्षण करील व आम्हाला तो त्याच्यापेक्षा वेगळे होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आतापर्यंत आम्ही परमार्थामध्ये जे काही कष्ट सोसले त्याचे आता फळ आम्हाला मिळाले आहे ते म्हणजे असे की आमच्यासाठी काळ आणि वेळ दोन्ही नाहीसे झाले. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















