आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२६ ऑक्टोबर, दिवस २९९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५७७ ते ३५८८
“२६ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 26 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २६ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५७७ ते ३५८८ चे पारायण आपण करणार आहोत.
२६ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २५१ ते २७५ ,
251-18
तैसी कर्मे करिता शरीरी । लाहती महत्त्वाची फरारी । पाठी निधनी एकसरी । पावती फळे ॥251॥
त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्म करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहवत, मरणानंतर एकसारखी त्यांना फळे भोगावीच लागतात. ॥51॥
252-18
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागो आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥252॥
जसा समर्थ असून त्याचजवळ ऋण काढले आणि तो वायद्याच्या मुदतीस मागणी करू लागला, तर त्याला जसे नाही म्हणवत नाही, त्याप्रमाणे प्राणिमात्राला कर्माचे फळ भोगणे भाग पडते ( कर्मफल चुकत नाही). ॥52॥
253-18
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥253॥
मग कणसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो ॥53॥
254-18
तैसे भोगी जे फळ होय । ते फळांतरे वीत जाय । चालता पावो पाय । जिणिजे जैसा ॥254॥
त्याप्रमाणे उपभोगाचे फळ जे शरीर ते फळाच्याशेवटी जन्म घेते, जसा वाट चालणारा मनुष्य एकेक पाऊल टाकून वाट वन बसतो लोकसभा जिंकतो;
255-18
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवी न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥255॥
होडी एका तीराहून दुसऱ्या तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलिकडला होय, कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडेपणा आहेच, म्हणून वाहून न्यावे लागते. तसा फळाच्या उपभोगाला शेवट नाही. ॥255॥
256-18
पै साध्यसाधनप्रकारे । फळभोगु तो पसरे । एवं गोविले संसारे । अत्यागी ते ॥256॥
हे बघ, साध्य व साधन अशा क्रमाने फळ व फळाचा भोग वाढतात, फळेच्छेचा त्याग न करणारे, याप्रमाणे संसारात गोवले जातात. ॥256॥
257-18
येऱ्हवी जाईचिया फुला फांकणे । त्याचि नाम जैसे सुकणे । तैसे कर्ममिषे न करणे । केले जिही ॥257॥
एऱ्हवी जाईचे फूल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होताक्षणी सुकते, त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करूनही फक्त अभिमान सोडून ते न केल्याप्रमाणे फळा पासून अलिप्त असतात; ॥257॥
258-18
बीजचि वरोसि वेचे । तेथ वाढती कुळवाडी खाचे । तेवी फळत्यागे कर्माचे । सारिले काम ॥258॥
बिजा करिता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खर्चास खाऊन टाकले, तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो, तसे फळाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूस राहतात. ॥258॥
259-18
ते सत्वशुद्धि साहाकारे । गुरुकृपामृत तुषारे । सासिन्नलेनि बोधे वोसरे । द्वैतदैन्य ॥259॥
शुद्ध सत्वाच्या साह्याने गुरुकृपारुपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध द्वैताचे दैन्य नाहीतसे होते. ॥259॥
260-18
तेव्हा जगदाभासमिषे । स्फुरे ते त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसे । निमाले हे ॥260॥
मग ज्या तीन प्रकारच्या फळापासून जग उत्पन्न होते, ते आपोआप नाश पावून भोक्ता व भोग्यवस्तू याही आपोआप लयास जातात. ॥260॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-18
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जया वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥261॥
हे विरेशा, त्यांच्या हातून अशा प्रकारच्या कर्माचा ज्ञानप्रमुख संन्यास होतो, त्यांनाच फळाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही; ॥261॥
262-18
आणि येणे कीर संन्यासे । जै आत्मरूपी दिठी पैसे । तै कर्म एक ऐसे । देखणे आहे ? ॥262॥
आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मरुपी दृष्टी पोहोचते, तेव्हा कर्म निराळे आई असे दिसते काय ? ॥262॥
263-18
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । का पाहालेया राती । आंधारे उरे ? ॥263॥
चित्रे काढलेली भिंत पडल्यावर चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय ? ॥263॥
264-18
जै रूपचि नाही उभे । तै साउली काह्याची शोभे ? । दर्पणेवीण बिंबे । वदन के पा ? ॥264॥
जर आकृतीच नसली, तर आपल्या मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल ? ॥264॥
265-18
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? । मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥265॥
झोप पुरी झाल्यावर स्वप्न कुठून पडणार ? आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल ? ॥265॥
266-18
तैसे गा संन्यासे येणे । मूळ अविद्येसीचि नाही जिणे । मा तियेचे कार्य कोणे । घेपे दीजे ? ॥266॥
त्याप्रमाणे कर्मफळाचा संन्यास केला असता मूळच्या अविद्येंच थारा मिळत नाही; मग तिच्या पासून होणारे जे फळ, त्याचा कोण उपभोग घेईल व देईल ॥66॥
267-18
म्हणौनि संन्यासी ये पाही । कर्माची गोठी कीजेल खई । परी अविद्या आपुलाम् देही । आहे जै का ॥267॥
म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कुठून बोलता येणार ? परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल; ॥267॥
268-18
जै कर्तेपणाचेनि थांवे । आत्मा शुभाशुभी धावे । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जै ॥268॥
जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगले व वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टीही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते, ॥268॥
269-18
तै तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडे जैसी पश्चिमा । पूर्वेसि का ॥269॥
तेव्हा हे सुवर्मा अर्जुना, आत्मा व कर्म यांचे ठिकाणी पूर्व व पश्चिम या प्रमाणे द्वैत विशेष असते. ॥269॥
270-18
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥270॥
आकाश व आभाळ, सूर्य आणि मृगजळ व पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला, तरी ते फार दूर आहेत. ॥270॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-18
पांघरौनि नईचे उदक । असे नईचिमाजी खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥271॥
नदीचे पाणी पांघरूण नदीत खडक असतो परंतु त्या दोहोंत जशी एक कोटपट अंतर असते;
272-18
हो का उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणो ये ? ॥272॥
पाण्यावर असलेले शेवाळ हे पाणी यापासून वेगळे असते; काजळाचा दिव्याची संबंध आहे, म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय ?
273-18
जरी चंद्री जाला कलंकु । तरी चंद्रेसी नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्या विवेकु । अपाडु जेतुला ॥273॥
जरी चंद्राला कलंक लागला आहे, तरी त्यांचे चंद्राची ऐक्य नाही, तसेच दृष्टी व डोळे यामध्ये जितका भेद आहे;
274-18
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघी वाहातया । आरसा आरसा पाहातया । अपाडु जेतुला ॥274॥
अथवा वाट व तिजवरून चालणारा वाटसरु, ओघ व ओघांत वाहणारे पाणी आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे,
275-18
पार्था गा तेतुलेनि माने । आत्मेनिसी कर्म सिने । परी घेवविजे अज्ञाने । ते कीर ऐसे ॥275॥
तितक्याच मानाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे; परंतु अर्जुना, अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत, असे वाटते.
दिवस २९९ वा. २६, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५७७ ते ३५८८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३५७७ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
परि तो आहे कृपेचा सागर । तोवरी अंतर पडो नेदी ॥१॥
बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनिया जना उरलासे ॥धृपद॥
सांगितल्याविणे जाणे अंतरिचे । पुरवावे ज्याचे तैसे कोड ॥२॥
बहुमुखे कीर्ती आइकिली कानी । विश्वास ही मनी आहे माझ्या ॥३॥
तुका म्हणे नाही जात वायाविण । पाळितो वचन बोलिलो ते ॥४॥
अर्थ
पण माझा विठोबा कृपेचा सागर आहे तो त्याच्यामध्ये व माझ्यामध्ये अंतर पडू देणार नाही. माझ्या पाडूरंगाला खूप कान आहेत अनेक डोळे आहेत तो सर्वाना एके वेळी पाहू शकतो एवढे नाही तर जेवढे भक्तमंडळी त्याच्यापुढे उभे आहेत त्यांना पाहून इतरासाठीही तो शिल्लक राहील. अहो माझ्या विठोबाला जरी काही सांगितले नाही तरी तो सर्वाच्या अंत:करणातील ओळखतो आणि ज्याच्या अंत:करणामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करुन त्याचे सर्व कोडकौतूक तो पूर्ण करतो. देवाची किर्ती मी खूप संतांच्या मुखातून माझ्या कानाने ऐकली आहे व खूप जनांनी त्याची किर्ती केली आहे व देवाविषयीही माझ्या मनामध्ये पूर्णपणे विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाने दिलेले वचन देव पाळतोच त्याने कोणतेही वचन दिले तरी ते कधीही वाया जात नाही. ”
12:09
अभंग क्र. ३५७८ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
यावरी न कळे संचित आपुले । कैसे वोढवले होईल पुढे ॥१॥
करील विक्षेप धाडिता मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥धृपद॥
जोवरी हे डोळा देखे वारकरी । तो हे भरोवरी करी चित्त ॥२॥
आस वाढविते बुद्धीचे तरंग । चित्ताचे ते वेग वावडती ॥३॥
तुका म्हणे तेव्हा होतील निश्चळ । इंद्रिये सकळ निरोपाने ॥४॥
अर्थ
आता एवढे होऊन देखील माझे संचित कसे आहे ते मला काही कळत नाही पुढे माझे कसे होईल हे ही कळत नाही. माझे संचित कर्म मला मूळ पाठवण्यासाठी मध्येच विक्षेप करीत आहे की मला तत्परतेने मूळ पाठवण्यासाठी तातडी करीत आहे ते काही कळत नाही. जोपर्यंत माझे डोळे वारकऱ्यांना पाहात नाही तोपर्यंत माझे चित्त असेच काहीतरी चित्र विचित्र गोष्टी मनामध्ये आखणार आहेत. माझे बुध्दीचे तरंग तर अनेक प्रकारचे विचार वाढवित आहेत आणि चित्त तर वाऱ्याच्या वेगाप्रमाणेच वावरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी पंढरीहून वारकऱ्यांच्या हाती मला निरोप येईल त्याच वेळी मी निश्चिंत होईल. ”
12:10
अभंग क्र. ३५७९ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरी जाऊनिया ॥१॥
करूनिया दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्ते ॥धृपद॥
होतील दाटले सद्गदित कंठी । भरते त्या पोटी वियोगाचे ॥२॥
येरयेरा भेटी क्षेम आलिंगने । केली समाधान होती संती ॥३॥
तुका म्हणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परतोंनी ॥४॥
अर्थ
आज आषाढीपौर्णिमा आहे गोपाळपूरचा कालाही झाला असेल माझ्या वारकऱ्यांनी विठोबाच्या देवळात जाऊन देवाचे दर्शन घेऊन त्याचा निरोपही घेतला असेल. माझ्या वारकऱ्यांनी दहीभाताचा काला व मंगळभोजन केले असेल आणि शुभ मुर्हूत पाहून पंढरीतून ते मागे फिरतील. आपल्याला आता पंढरीतून मागे फिरावे लागेल या विचाराने वारकऱ्यांचे कंठ सद्गतीत झाले असेल व या विचारानेच त्यांचे कंठ दाटून आले असतील हरीचा व आपला वियोग होईल या विचारानेच त्यांच्या पोटामध्ये भरते आले असेल. देवाने व संतानी एकमेकांना क्षेम आलिंगन दिले असेल आणि एकमेकांचे समाधान केले असेल. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या वारकऱ्यांना पुन्हा मागे फिरुन घराकडे येताना सहन होत नसेल पुन्हा पुन्हा ते मागे वळून देवाच्या देवळाचा कळस पाहात असतील. ”
12:10
अभंग क्र. ३५८० (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येत वारकरी होत वाटे ॥१॥
देखिले सोहळे होती आठवण । चालती ते मात करूनिया ॥धृपद॥
केली आइकिली होईल जे कथा । राहिले ते चित्ता होईल प्रेम ॥२॥
गरुडटके टाळ मृदंग पताका । सांगताती एकाएक सुख ॥३॥
तुका म्हणे आता येती लवलाही । आळिंगूनि बाही देईन क्षेम ॥४॥
अर्थ
पंढरीहून मागे फिरल्यानंतर वारकऱ्यांची मी वरती सांगितलेल्याप्रमाणे अवस्था झाली असेल व आता ते देहूच्या वाटेने माघारी येत असतील. पंढरीला जात असताना जो भजन कीर्तनाचा सुखसोहळा वारकऱ्यांनी अनुभवला त्याविषयीच ते आठवण काढीत असतील व वाटेने चालत असताना त्याचविषयी गप्पागोष्टी आता करत असतील. वारकऱ्यांनी पंढरीला जाताना व पंढरीत गेल्यानंतर ज्या कथा केल्या असतील किंवा ऐकल्या असतील त्या कथेविषयीच त्यांच्या चित्तामध्ये दृढ प्रेम उत्पन्न् झाले असेल. पंढरीला जात असताना वारकऱ्यांच्या हातामध्ये गरुड टके, टाळ, मृदुंग, वीणा, पताका यांच्यापासून त्यांना जे सुख झाले आहे ते सुख ते एकमेकांना सांगत असतील. तुकाराम महाराज म्हणतात, “आता वारकरी लवकरच देहूमध्ये येतील मग मी त्यांना माझे दोन्ही बाहू पसरुन त्यांना क्षेम आलिंगन देईन. ”
12:10
अभंग क्र. ३५८१ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
क्षेम मायबाप पुसेन हे आधी । न घली हे मधी सुख दुःख ॥१॥
न करी तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानी सांगती ते ॥धृपद॥
अंतरीचे संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥२॥
पायावरी डोई ठेवीन आदरे । प्रीतिपडिभरे आळींगून ॥३॥
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडी त्यांवरून ॥४॥
अर्थ
पंढरीहून वारकरी मागे आले की मी त्यांना प्रथम माझ्या मायबापाचे क्षेम समाचार विचारीन त्यामध्ये मी माझे सुख दु:खमध्ये घालणार नाही. वारकरी आल्यानंतर त्यांना कोणतेही प्रश्न विचारण्याची मी तातडी करणार नाही ते जे काही सांगतील ते ते मी ऐकून घेईल. संत माझ्या अंत:करणातील जे गुह्य प्रश्न आहेत ते जाणून घेतील आणि देवाचा निरोप मला सांगतील. सर्व वारकरी आल्यानंतर मी त्यांच्या पायावर माझे मस्तक अगदी आदराने ठेवीन आणि त्यांना प्रेमाने आलिंगन देईन. तुकाराम महाराज म्हणतात, “मी माझ्या शरीराची कुरवंदी करीन आणि सर्व वारकऱ्यांवरुन ओवाळून टाकीन. ”
12:10
अभंग क्र. ३५८२ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
होईल माझी संती भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनी बैसे ॥१॥
शृंगारूनि माझी बोबडी उत्तरे । होतील विस्तारे सांगितली ॥धृपद॥
क्षेम आहे ऐसे होईल सांगितले । पाहिजे धाडिले शीघ्र मूळ ॥२॥
अवस्था जे माझी ठावी आहे संता । होईल कृपावंता निरोपिली ॥३॥
तुका म्हणे सवे येईल मुऱ्हाळी । किंवा काही उरी राखतील ॥४॥
अर्थ
माझ्याविषयी नारायणाच्या मनामध्ये अगदी चांगली प्रकारची भावना ठसेल अशीच करुणा संतांनी माझ्याविषयी नारायणाजवळ भाकली असेल. पत्रामध्ये मी जे काही बोबडे शब्द लिहिले आहेत त्या शब्दांना श्रृंगारिक करुन अगदी व्यवस्थितपणे संतांनी देवाजवळ त्या शब्दाचा विस्तार करुन सांगितला असेल. माझा क्षेम समाचार संतांनी देवाजवळ सांगितलाच असेल परंतू मला बोलावण्यासाठी लवकरच मूळ धाडावे लागेल असेही देवाला संतांनी सांगितले असेल. सध्या माझी अवस्था कशी आहे हे संतांना चांगल्याच प्रकारे माहितच आहे व माझ्या अवस्थेविषयी संतांनी कृपावंत हरीच्याजवळ निरोप देखील दिला असेल. तुकाराम महाराज म्हणतात, “वारकरी परत येत असताना देवाने वारकऱ्यांबरोबर मला नेण्यासाठी कोणीतरी मुरारी पाठविलाच असेल किंवा काही दिवस थांब असा निरोप तरी पाठविला असेल. ”
12:10
अभंग क्र. ३५८३ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
दोहींमध्ये एक घडेल विश्वासे । भातुके सरिसे मूळ तरी ॥१॥
करिती निरास निःशेष न घडे । काही तरी ओढे चित्त माये ॥धृपद॥
लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणे ॥२॥
अथवा कोणाचे घेणे लागे रीण । नाही तरी हीनकर्मी काही ॥३॥
व्यालीचिये अंगी असती वेधना । तुका म्हणे मना मन साक्ष ॥४॥
अर्थ
देवाने वारकऱ्यांसोबत एखादया प्रकारचा खाऊ किंवा मला बोलावण्यासाठी मूळ तरी नक्कीच पाठवले असेल. मला निराश करेल असे तरी निश्चिंतच घडणार नाही कारण मातेचे थोडे का होईना चित्त मुलाकडे आपोआप ओढले जातेच. मातेला पुत्राची काळजी घेणे हे स्वाभाविकच आहे त्यामुळे देवाला लौकिकाची थोडी फार तरी लाज वाटेलच आणि मी कसाही वागलो तरी त्याच्याशी देवाला काय कर्तव्य आहे. माझे पालनपोषण करण्यासाठी देवाला एखादे ऋण जरी काढावे लागले तरी ते काढेलच त्यासाठी तो कर्तव्यहीन ठरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जिणे मुलाला जन्म दिला आहे त्या मातेला आपल्या मुलाला जर काही वेदना झाल्या तर तिच्या अंगावर त्या वेदना आपोआप उमटतात याविषयी मुलाचे व आईचे मनच साक्ष आहे. ”
12:10
अभंग क्र. ३५८४ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
बैसता कोणापे नाही समाधान । विवरे हे मन तेचि सोई ॥१॥
घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी ॥धृपद॥
नो बोलावे ऐसा करितो विचार । प्रसंगी तो फार आठवते ॥२॥
इंद्रियांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली येचि ठायी ॥३॥
एकसरे सोस माहेरासी जावे । तुका म्हणे जीवे घेतलासे ॥४॥
अर्थ
कोणाच्याही जवळ बसलो तरी माझ्या मनाला काही समाधान मिळत नाही ते नेहमी माझ्या आईबापाकडेच ओढ घेत आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला मला माहेरची आठवण येत आहे एक क्षणभर देखील मला त्याचा विसर पडत नाही. माहेरासंबंधी कोणाजवळ काहीच बोलू नये असा मी निर्धार तर करतो परंतू प्रसंग आला की पुन्हा ते सर्वकाही मी विसरुन जातो. माझ्या इंद्रियांना माहेराकडे जाण्याची ओढ लागली आहे ती सारखी तिकडे चाल घेत आहे ज्यावेळी माझे इंद्रिय माहेराला जातील त्याचवेळी ते विश्रांत होऊन हरीच्या ठिकाणी निवांत होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदाचे माहेराला जावेच असा सोसच माझ्या जीवाने घेतलाय. ”
12:11
अभंग क्र. ३५८५ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
नाही हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करू ॥१॥
पुसाविसी वाटे मात कापडिया । पाठविती न्याया मूळ मज ॥धृपद॥
आणीक या मना नावडे सोहळा । करिते टकळा माहेरींचा ॥२॥
बहु कामे केले बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाही ॥३॥
तुका म्हणे त्याचे न कळे अंतर । अवस्था ते फार होते मज ॥४॥
अर्थ
मी काही जरी केले नाही तरी माझी काही हानी होणार नाही हे निश्चिंत आहे पण मला माझ्या माहेरचा विसर पडत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना केवळ मला एकच विचारावेसे वाटते ते म्हणजे जे माझे मायबाप मला न्यावयासाठी मूळ पाठविणार आहेत की काय ? दुसरा कोणताही सोहळा मनाला आवडत नाही केवळ माहेरच्याच गोष्टी मन करत आहे. मी संसारातील कामे खूप दिवस झाले तसे करतो आहे त्यामुळे खूप कासावीसही झालो आहे आणि माझ्या आईबापाची भेट मला खूप दिवस झाले तसे आमच्या दोघाची गाठभेटच झाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाच्या मनात नेमका काय आहे ते काही नेमके कळत नाही परंतू माझ्या मनाला तर फार तळमळ लागत आहे. ”
12:11
अभंग क्र. ३५८६ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
तोवरी म्या त्यास कैसे निषेधावे । जो नाही बरवे कळो आले ॥१॥
कोणाचिया मुखे तंट नाही मागे । वचन वाउगे बोलो नये ॥धृपद॥
दिसे हानि परी निरास न घडे । हे तव रोकडे अनुभव ॥२॥
आपुलिया भोगे होईल उशीर । तोवरी का धीर केला नाही ॥३॥
तुका म्हणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायी आहे ॥४॥
अर्थ
देवाला पाठविलेल्या निरोपाचे जोपर्यंत मला उत्तर कळत नाही तोपर्यंत मी देवाचा निषेध तरी कसा करावा बरे ? मी अजून कोणाच्या मुखाने देवाविषयी तंटा करताना ऐकले नाही मग मीच देवाविषयी वावगे बोलू नये असे मला वाटते. मी पाठवलेल्या निरोपाचे अजूनही मला उत्तर मिळाले नाही ही हानी प्रत्यक्ष दिसत आहे परंतू निराश होऊन चालणार नाही देव खूप चांगला आहे या गोष्टीचा मला समोरच चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. आपल्या प्रारब्ध भोगामुळेच आपल्याला फळ मिळण्यास थोडा उशीर लागणारच आहे तर मग तोपर्यंत आपण धीर का धरु नये ? तुकाराम महाराज म्हणतात, “देव शेवट गोडच करणार आहे यामागेही त्याने अनेक भक्तांचा उध्दार केला आहे ही गोष्ट मला माहित आहे. ”
12:11
अभंग क्र. ३५८७ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
माहेरींचे आले ते मज माहेर । सुखाचे उत्तर करिन त्यासी ॥१॥
पायावरी माथा आळीगीन बाही । घेईन लवलाही पायवणी ॥धृपद॥
सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥
आपुले जीवीचे सुखदुःख भावे । सांगेन अघवे आहे तैसे ॥३॥
तुका म्हणे वीट नेघें आवडीचा । बोलिलीच वाचा बोलवीन ॥४॥
अर्थ
माझ्या माहेराहून आलेले वारकरी हे माझ्या आईबापाप्रमाणेच आहेत मी त्यांच्याशी सुखाने बोलेन. माझे वारकरी माझ्या माहेराहून आले की मी त्यांच्या पायावर माझा माथा ठेवीन आणि त्यांना माझ्या बाहूने आलिंगन देईन व त्वरेने त्यांचे पाय धुवून त्यांचे चरणतीर्थ घेईन. वारकऱ्यांना पंढरपूरला जाताना सर्व पर्वकाळ कसा गेला याबद्दल मी सुख समाचार त्यांना विचारीन. मी माझ्या जीवाला काय सुख दु:ख आहे ते भावपूर्वक त्यांना जसे आहे तसे सांगेन व त्यांना कळवेन. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्या गोष्टीचा कधीही वीट येत नाही आवडती गोष्ट आपण जरी बोललो तरी वाचा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट आपल्याला बोलायला भाग पाडते. ”
12:11
अभंग क्र. ३५८८ (वारकऱ्यांनबरोबरपत्रपाठविलेवपत्रोत्तरआलेनाहीम्हणूनतुकाराममहाराजदुखीझाले)
वियोग न घडे सन्निध वसले । अखंड राहिले होय चित्ती ॥१॥
विसरु न पडे विकल्प न घडे । आले ते आवडे तया पंथे ॥धृपद॥
कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिके ॥२॥
निरोपासी काज असो अनामिक । निवडिता एक नये मज ॥३॥
तुका म्हणे हित चित्ते ओढियेले । जेथे ते उगले जावे येणे ॥४॥
अर्थ
देवाचा वियोग जर झाला नाही तर देव सतत आपल्याजवळच राहतो परंतू जर देवाचा वियोग जर झाला तर आपल्याला एक लाभ होतो तो लाभ म्हणजे देव आपल्या चित्तामध्ये अखंड राहातो. त्यानिमित्ताने देवाचा विसर घडत नाही मनात विकल्प उत्पन्न होत नाही आणि जे माझ्या माहेराहून येतात ते मला फार आवडतात. देव अखंड चित्तामध्ये राहिला की कामाचा विसर पडतो शरीराची आठवण राहात नाही कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाताना ते मधूर आहे की फिके आहे हे कळत नाही. देवाकडून माझ्यासाठी निरोप घेऊन येणारा व्यक्ती अत्यंज म्हणजे हीन जातीचा जरी असला तरी मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही तो कोणत्याही जातीचा असो मी त्याच्यामध्ये चांगला किंवा वाईट असा भेद निवडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवापासून अलिप्त परंतू अखंड देवाचे चिंतन ज्याच्या चित्तामध्ये चालू असते त्याच्याजवळ हित आपोआप ओढले जाते जेथे हरीचे चिंतन नेहमी चालू असते तेथे हित त्याच्याकडे आपोआप ओढले जाते. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















