आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३ ऑक्टोबर, दिवस २७६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १०१ ते १२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३०१ ते ३३१२
“३ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 3 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ ऑक्टोबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३३०१ ते ३३१२ चे पारायण आपण करणार आहोत.
३ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी १०१ ते १२५,
101-17
का वैद्याते करी सळा । रसु सांडी पाय खोळा । तो रोगिया जेवी जिव्हाळा । सवता होय ॥101॥
किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेने उडवितो असा रोगी जसा मरणार जसे निश्चित. 1
102-17
नाना पडिकराचेनि सळे । काढी आपुलेचि डोळे । ते वानवसा आंधळे । जैसे ठाके ॥102॥
किंवा डोळस माणसाचा द्वेष करून जो स्वतःचेच डोळे फोडून घेतो, तो जसा घरात आंधळा होऊन बसतो. 2
103-17
तैसे तया आसुरा होये । निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धावताती मोहे । आडवी जे का ॥103॥
त्याप्रमाणे, शास्त्रीय मार्गाची निंदा करून स्वैराचाररूपी अरण्यात जे भटकतात त्या आसुरांची तशी स्थिति होते. 3
104-17
कामु करवी ते करिती । क्रोधु मारवी ते मारिती । किंबहुना माते पुरिती । दुःखाचा गुंडा ॥104॥
इच्छेस येईल ते करतात, ज्यावर क्रुद्ध होतील त्याला मारतात किंबहुना नसती पीडा म्हणून माझी मूर्तीही गाडून टाकतात. 4
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्ध्यासुरनिश्चयान् ॥17. 6॥
105-17
आपुला परावा देही । दुःख देती जे जे काही । मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥105॥
स्वतःच्या व दुसऱ्याच्या देहाला ते ह्याप्रमाणे जी पीडा करितात, ती सर्व सर्वातर्यामी जो मी, त्या मलाच होते. 5
106-17
पै वाचेचेनिही पालवे । पापिया तया नातळावे । परी पडिले सांगावे । त्यजावया ॥106॥
ह्या पाप्यांच्या वर्णनाने वाणी विटाळणेही बरे नव्हे; पण, त्यांचा त्याग करावा हे सांगण्यासाठी वर्णन करावे लागले. 6
107-17
प्रेत बाहिरे घालिजे । का अंत्यजु संभाषणी त्यजिजे । हे असो हाते क्षाळिजे । कश्मलाते ? ॥107॥
प्रेत घराबाहेर काढावे लागते, ‘दूर हो ” असे बोलूनच अंत्यजापाशी भाषण टाळावे लागते किंवा घाण ही हातनेच धुवून टाकावी लागते. 7
108-17
तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयाते सांडावया तैसा । अनुवादु हा ॥108॥
येथे शुद्धतेचा हेतु असल्यामुळे ह्या अमंगल गोष्टी केल्या असे जसे कोणी समजत नाही, म्हणून त्यांच्या त्यागार्थ केलेला अनुवाद (वर्णन) दूषणीय म्हणता येत नाही. 8
109-17
परी अर्जुना तू तयाते । देखसी तै स्मर हो माते । जे आन प्रायश्चित्त येथे । मानेल ना ॥109॥
तर अर्जुना, तुला त्यांचे दर्शन झाले (असुर=तामस) तर माझे स्मरण करत जा; येथे दुसरे प्रायश्चित्त कामाचे नाही. 9
110-17
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पै येकी । जतन करावी निकी । सर्वापरी ॥110॥
तरी जी एक सात्विक श्रद्धा तिचेच इतःपर दक्षतेने सर्वाच्यावर जतन करावे. 110
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-17
तरी धरावा तैसा संगु । जेणे पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपे ॥111॥
म्हणून ज्यायोगे सत्वबुद्धीची वाढ होईल असाच संग धरावा आणि आहारही सत्वाची वृद्धि करील असाच सेवन करावा. 11
112-17
एऱ्हवी तरी पाही । स्वभाववृद्धीच्या ठाई । आहारावाचूनि नाही । बळी हेतु ॥112॥
अरे, पाहू गेले तर स्वभावामध्ये पालट अगर वृद्धि व्हावी अशी इच्छा असेल तर त्याला आहारावाचून अन्य बलवान हेतु नाही. 12
113-17
प्रत्यक्ष पाहे पा वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणी ॥113॥
ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, शुद्धीवर असलेला जो मनुष्य त्याने दारूचे सेवन केले तर तो तत्क्षणी माजून बरळतो. 13
114-17
का जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावी । काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ? ॥114॥
किंवा जो मर्यादेबाहेर अन्नसेवन करतो त्याला वात व कफ ह्यांचा विकार होतो किंवा ज्वर आला असता दुधाच्या सेवनाने तो निघेल काय ? 14
115-17
नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । का आपुलिया{ऐ}से करी । जैसे विष ॥115॥
नाहीतर, अमृतसेवनाने जसे मरण टळते, किंवा विष घेतले असता त्याने मृत्यु येतो. 15
116-17
तेवी जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥116॥
त्याप्रमाणे जसा किंवा ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारची धातु शरीरांत उत्पन्न होते व जशी धातु असेल त्याप्रमाणे अंतःकरणाचा (मनाचा) स्वभाव पोसला जातो. 16
117-17
जैसे भांडियाचेनि तापे । आंतुले उदकही तापे । तैसी धातुवशे आटोपे । चित्तवृत्ती ॥117॥
भांडे तापले म्हणजे आतले उदकही जसे तापते, त्याप्रमाणे धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ति बनत असते. 17
118-17
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तै सत्त्वाची वाढी पाविजे । राजसा तामसा होईजे । येरी रसी ॥118॥
म्हणून सात्विक अन्नसेवनाने सत्वगुणाची व दुसऱ्या दोन जातीच्या अन्नाने रजोगुण व तमोगुण ह्यांची वाढ होते. 18
119-17
तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु । हे सांगो करी आदरु । आकर्णनी ॥119॥
तरी, कोणता आहार सात्विक आहे, राजस व तामस आहाराचे स्वरूप अगर लक्षण काय ते सांगतो, नीट श्रवण कर. 19
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥17. 7॥
120-17
आणि एकसरे आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेही वीरा । रोकडे दाऊ ॥120॥
आणि अर्जुना, सामान्य अन्नाचे तीन प्रकार (सत्व, रज, तम) कसे झाले ते स्पष्ट करून दाखवितों. 120
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-17
तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति की बोनियांची । आणि जेविता तव गुणांची । दासी येथ ॥121॥
हे पहा, भोक्त्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार होत असते आणि भोक्ता तर, गुणांचा ताबेदार आहेच. 21
122-17
जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनिया त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥122॥
कर्ता भोक्ता जो जीव, तो स्वभावतःच तीन गुणांप्रमाणे तीन प्रकारचा व्यवहार करीत असतो. 22
123-17
म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥123॥
म्हणून आहार तीन प्रकारचा आहे; यज्ञही तीन प्रकारचे आहेत व तप, दान व इतर क्रियाही तीन प्रकारच्या आहेत. 23
124-17
पै आहार लक्षण पहिले ? । सांगो जे म्हणितले । ते आईक गा भले । रूप करू ॥124॥
परंतु आधी प्रथम सांगितलेल्या आहाराचे लक्षण सांगतो, ते नीट श्रवण कर. 24
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥17. 8॥
125-17
तरी सत्त्वगुणाकडे । जे दैवे भोक्ता पडे । तै मधुरी रसी वाढे । मेचु तया ॥125॥
तरी, दैवयोगाने, जेव्हा भोक्ता सत्वगुणी असतो तेव्हां, मिष्टान्न सेवनाकडे त्याचा विशेष ओढा असतो. 25
दिवस २७६ वा. ३, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३०१ ते ३३१२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३३०१
आग्रहा नावे पाप । योगी सारावे संकल्प ॥१॥
सहजा ऐसे भांडवल । असोनि का सारा बोल ॥धृपद॥
तै न भेटे ते काय । मना अंगींचे उपाय ॥२॥
तुका म्हणे धरी सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥
अर्थ
कोणत्याही मनुष्याने आग्रह करणे म्हणजेच पाप आहे आणि योगी मनुष्याने तर कोणत्याही प्रकारचा संकल्पच करु नये. अशा प्रकारचे सोपे भांडवल आपल्याजवळ असताना उगीचच का बोलत राहावे ? अहो मनाच्या अंगामध्ये सर्व उपाय आहेत मग आपल्याला या जगामध्ये भेटणार नाही अशी कोणती गोष्ट आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “जे योग्य आहे तेच करण्याचा मनामध्ये निग्रह धरा आणि वासनेचे डोके फोडा. ”
3:54
अभंग क्र. ३३०२
न करी पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥
सर्वकाळ नामचिंतन मानसी । समाधान मनासी समाधि हे ॥धृपद॥
न करी भ्रमण न रिघें कपाटी । जाईन तेथे दाटी वैष्णवांची ॥२॥
आन नेणे काही न वजे तपासी । नाचे दिंडीपाशी जागरणी ॥३॥
उपवास व्रत न करी पारणे । रामकृष्ण म्हणे नारायण ॥४॥
आणिकाची सेवा स्तुती नेणे वाणू । तुका म्हणे आणु दुजे काही ॥५॥
अर्थ
कोणत्याही प्रकारचे वेदपठण किंवा अक्षरांचा घोष आम्ही करत नाही कारण आमचा बीजमंत्र पाडूरंगच आहे. सर्वकाळ पाडूरंगाचे नामस्मरण मनामध्ये केले तर समाधान प्राप्त होते आणि मनाला समाधान प्राप्त झाले तर मनासाठी तीच समाधी असते. मी कोणत्याही तीर्थक्षेत्राला भ्रमण करत नाही किंवा ध्यान करण्यासाठी डोंगर रानामध्ये जाऊन पर्वताच्या कपारीमध्ये जाऊन बसत नाही केवळ जेथे वैष्णवांची दाटी आहे तेथेच मी जाईन. वैष्णव जेथे हरीजागरण करतील जेथे दिंडी काढतील तेथेच मी आनंदाने नाचेन यावाचून मी जपतप इतर काही जाणत नाही. मी उपवास व्रत कोणत्याही प्रकारचे पारणे करत नाही केवळ मुखाने रामकृष्ण नारायण असे म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, “एका पाडूरंगावाचून मी दुसऱ्या कोणाचीही सेवा किंवा स्तुती थोडी देखील करणार नाही. ”
3:54
अभंग क्र. ३३०३
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धावे बराडी ॥१॥
आपुले थोरपण । नारायण विसरला ॥धृपद॥
उभा कटी ठेवुनि कर । न म्हणे पर बैससे ॥२॥
तुका म्हणे जगदीशा । करणे आशा भक्तांची ॥३॥
अर्थ
पुंडलिकाची भक्ती व सेवा पाहून हा देव त्याच्याजवळ कसा भिकाऱ्यासारखा धावत आला आहे ते पाहा. पुंडलिकाच्या सेवा व भक्तीपुढे नारायण आपला थोरपणा विसरुन गेला आहे. पुंडलिकाच्या भक्ती व सेवेच्या पुढे हा नारायण आपले दोन्हीही कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे मी थोडे दुसरीकडे जाऊन येतो किंवा थोडया वेळ बसतो असे देखील तो म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हा जगदीश नेहमी भक्तांची आशा अपेक्षा पूर्ण करत असतो. ”
3:56
अभंग क्र. ३३०४
बाळ काय जाणे जीवनउपाय । वाहे मायबाप सर्व चिंता ॥१॥
आइते भोजन खेळणे अंतरी । अंकिताच्या शिरी भार नाही ॥ध्रु॥
आपुले शरीर रक्षिता न कळे । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥
तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । आमुची ते सत्ता तयावरी ॥३॥
अर्थ
लहान मुलाला जीवन जगण्यासाठी कोणते उपाय करावे लागतात हे माहित असते काय परंतू त्याचे आईवडिलच त्याची सर्व चिंता वाहत असतात. त्यासाठी आयते भोजन येते त्याला जेवण देखील आयते मिळते फक्त खेळणे एवढेच त्याचे लक्ष्य असते आणि तो दुसऱ्याचा अंकीत असतो त्यामुळे त्याच्या माथ्यावर कोणत्याही प्रकारचा भार नसतो. आपल्या शरीराचे रक्षण कसे करावे हे देखील त्याला कळत नाही त्याचे सर्व पालनपोषण त्याची आई बाप करुन त्याचे सर्व लाड देखील तेच पूर्ण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा जनिता माझा जन्मदाता हा विठ्ठलच आहे आणि आमची सत्ता त्याच्यावर आहे. ”
3:56
अभंग क्र. ३३०५
काय करतील केली नित्य पापे । वसे नाम ज्यापे विठोबाचे ॥१॥
तृणी हुताशन लागला ते रासी । जळतील तैसी क्षणमात्रे ॥धृपद॥
विष्णुमूर्तीपाद पाहता चरण । तेथे कर्म कोण राहू शके॥२॥
तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथे होय घोष कीर्तनाचा ॥३॥
अर्थ
ज्याच्या मुखामध्ये नेहमीच विठोबाचे नाम आहे त्याने दररोज जरी पापे केली तरी ते पापे काय करणार आहेत ? गवताच्या गंजीला एक अग्नीची ठिणगी जरी लागली तरी संपूर्ण गवताची गंजी क्षणमात्रात जळून जाते त्याप्रमाणे कितीही मोठे पाप असले परंतू श्रध्दापूर्वक विठोबाचे नाम घेतले तरी कसलेही पाप असले तरी ते क्षणमात्रात जळून जाते. अहो विष्णूमुर्तीचे केवळ चरण जरी पाहिले तर मग तेथे कोणत्याही प्रकारचे कर्म कसे राहू शकेल ? तुकाराम महाराज म्हणतात, “जो व्यक्ती विठोबाचे नाम घेतो त्याचे महादोष जळून जातात आणि जेथे कीर्तनाचा व हरीनामाचा घोष होतो तेथे पाप वस्ती देखील करत नाही सारांश असा आहे कितीही महादोष महापाप असले तरी पूर्वीच्या सर्व कर्माविषयी पश्चात्ताप ज्याच्या मनामध्ये निर्माण होतो त्या साधकाने जर विठोबाचे नाम श्रध्दापूर्वक घेतले तर त्याचे पूर्वीचे सर्व दोष जळून जातील. ”
4:00
अभंग क्र. ३३०६
माकडा दिसती कंवटी नारळे । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥
एका रस एका तोंडी पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥धृपद॥
सुनियांसी क्षीर चारील्या ओकवी । भोक्ता तो पोसवी धणीवरी ॥२॥
तुका म्हणे मूर्ख वागविती भार । नेतील ते सार परीक्षक ॥३॥
अर्थ
वानराला केवळ नारळाची वरची कवटी दिसते परंतू नारळाविषयी पूर्ण माहिती असणाराच ते नारळ फोडून खातो. पहा म्हणजे एकाच्या मुखामध्ये नारळाचा स्वाद पडतो तर एकाच्या मुखात माती पडते म्हणजे त्याला नारळच खायलाच मिळत नाही. सारांश असा की, जो तो आपल्या ज्ञानानुसार आपापला विभाग नेत असतो. कुत्र्याला जर खीर टाकली तर तो खीर खातो परंतू पुन्हा ओकून ती खीर बाहेर टाकतो परंतू तो खरोखर खीर खाऊन तृप्त होतो व त्या खीरीचा भोग घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, “जे लोक मूर्ख आहेत ते व्यर्थ भार वाहात असतात आणि जे खरे परीक्षक असतात ते मुख्य सारच घेऊन जातात. ”
4:00
अभंग क्र. ३३०७
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेसे ध्यान जीवी जीवा ॥१॥
आता आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥धृपद॥
नेत्र उन्मळित राहिले ताटस्थी । गंगा अश्रुपाती वहावली ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या भेटीविषयी माझ्या मनाला आवड लागली आहे आणि माझे मन तुमची भेट घेण्याविषयी उतावीळ झाले आहे आणि तुमच्या रुपाचेच ध्यान माझ्या जीवाला लागले आहे. हे गोपाळा माझ्या आवडीचा सोहळा तुम्ही पूर्ण करा आणि मला येऊन तुम्ही आलिंगन दयावे. देवा तुमची भेट व्हावी यासाठी माझे नेत्र तटस्थ झाले आहे आणि तुमची भेट होत नाही म्हणून माझ्या डोळयामधून गंगेसारखे अश्रु वाहात आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमच्या मूळच्या वचनाला तुम्ही खरे करुन दाखवा. ”
4:00
अभंग क्र. ३३०८
धवळले जगदाकार । आंधार तो निरसला ॥१॥
लपोजाता नाही ठाव । प्रगट पाही पसारा ॥धृपद॥
खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥२॥
तुका म्हणे जिवे साठी । पडिली मिठी धुरेसी ॥३॥
अर्थ
संपूर्ण जग ब्रम्हस्वरुप आहे या प्रकाशाने संपूर्ण जग ढवळून गेले असून अज्ञानाचा अंध:कार नाहीसा झाला आहे. आता लपण्यास कोठे जागा शिल्लक राहिलेली नाही कारण कोठे लपावे सर्वत्र आता ब्रम्ह हेच प्रगटले असून सर्व जगच ब्रम्हमय झाले आहे. आजचा दिवस खरा उगला आहे असेच म्हणावे लागेल कारण आज मला सर्वत्र ब्रम्हस्वरुपच दिसू लागले आहे ब्रम्हाचा साक्षात्कार मला सर्वत्र होऊ लागला आहे आणि याचे कितीही वर्णन मी करावयास गेलो तरी त्याला शब्द पुरणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी जीव आहे या भावनेचा मी बाद केला आहे त्यामुळे मला ब्रम्हस्वरुपाचा साक्षात्कार होऊन ब्रम्हाशी माझी मिठी पडली आहे. ”
4:01
अभंग क्र. ३३०९
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तो सकळ चिंता त्याची ॥१॥
ऐसे परस्परे आहेचि विचारा । भोपळ्याचा तार दगडासी ॥धृपद॥
भुजंग पोटाळी चंदनाचे अंग । निवे परि संगे नव्हे तैसा ॥२॥
तुका म्हणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥
अर्थ
मातेची अवस्था काय असते हे ते बाळा काय जाणत असते काय परंतू बाळाची सर्व चिंता माताच वाहात असते. असा हा परस्पराच्या नात्याचा संबंधाचा प्रकार आहे अहो भोपळा दगडाला तारु शकतो परंतू दगड भोपळयाला तारु शकत नाही. चंदनाच्या झाडाला सर्प वेटोळे घालून बसतात आणि ते शांत देखील होतात परंतू चंदनरुप मात्र होत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही परीस व्हा आणि मला लोखंड करा म्हणजे एकदा की मला तुमचा स्पर्श झाला मग माझे देखील सोनेच होईल. ”
4:01
अभंग क्र. ३३१०
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥
ऐसे बहुतांचे संधी । सापडला खोळेमधी ॥धृपद॥
पाहातील उणे । तेथे देती अनुमोदने ॥२॥
तुका म्हणे रिघ । पुढे नाही झाले धींद ॥३॥
अर्थ
अहो हे दुष्ट लोक माझ्या अंगाला कोलीत लावून माझा घात करतील. अशा खूप दुष्ट प्रकारच्या लोकांच्या मध्ये मी सापडलो आहे. माझ्यामध्ये काही कमीपणा आहे काय तो शोधतील आणि माझा घात करण्यासाठी हे अनुमोदन देतील. तुकाराम महाराज म्हणतात, “यापुढे माझे आयुष्य सुखाने जाईल की नाही काय माहित नाही कारण या दुष्ट लोकांनी माझी खूप फजिती केली आहे. ”
4:01
अभंग क्र. ३३११
ऐसी एका अटी । रीती सिणती करंटी ॥१॥
साच आपुल्या पुरते । करून न घेती का हिते ॥धृपद॥
का ही वेचितील वाणी । निरर्थक चि कारणी ॥२॥
तुका म्हणे देवा । काही समर्पूनि सेवा ॥३॥
अर्थ
या संसारामध्ये जन्माला येऊन कितीतरी लोक प्रपंचाचा खटाटोप करीत असतात परंतू हे करंटे लोक व्यर्थ श्रम करत आहेत. आपले हित व्हावे यासाठी हे लोक प्रयत्न का करत नाहीत ? आपली वाणी व्यर्थ वाया घालवितात काही कारण नसताना व्यर्थ बडबड करतात त्यापेक्षा हे लोक हरीनाम घेऊन आपली वाणी का खर्च करत नाहीत ? तुकाराम महाराज म्हणतात, “परमार्थिक सत्कार्य करुन किंवा सत्विचार चांगले वर्तन करुन झालेली सेवा देवाला हे लोक का समर्पण करत नसतील ? ”
4:01
अभंग क्र. ३३१२
चालिले सोबती । काय मानिली निश्चिंती ॥१॥
काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥धृपद॥
काही सावध तो बरवा । करी आपुला काढावा ॥२॥
चालिले अगळे । हळूच कान केश डोळे ॥३॥
वोसरले दात । दाढा गडबडल्या आत ॥४॥ @
एकली तळमळ । जिव्हा भलतेचि चावळे ॥५॥ @
तुका म्हणे यांणी । तुझी मांडिली घालणी ॥६॥
अर्थ
एकेक सोबती चालले आहेत म्हणजेच शरीराचे अवयव थकले आहेत. तू असा निष्काळजीपणाने स्वस्थ का बसला आहेस ? मृत्यू तुझ्याजवळ आलेला आहे. तू एकटा आता काय करशील ? आता सावध हो व यातून सुटका होण्यासाठी काहीतरी चांगले कर्म कर. हळूहळू तुझे कान, केस, डोळे तुला सोडून चालले आहेत. दात पडले दाढा नाहीशा झाल्या. एकटी जीभ तेवढी तळमळत आहे. दु:खित होऊन भ्रमाने वाटेल ते बडबडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या सगळ्या अवयवांनी तुला घालविण्याची तयारी केली आहे. यासाठी तू वेळेवर सावध हो.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















