आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२१ ऑक्टोबर, दिवस २९४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३५१७ ते ३५२८
“२१ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 21 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २१ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३५१७ ते ३५२८ चे पारायण आपण करणार आहोत.
२१ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२६ ते १५०,
126-18
यया कर्म फळत्यागाते । त्यागु म्हणती पै जाणते । एवं त्याग संन्यास तूते । परीसविले ॥126॥
अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्मांचे फळांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष ‘त्याग ” असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगतील. ॥126॥
127-18
हा संन्यासु जै संभवे । तै काम्य बाधू न पावे । निषिद्ध तव स्वभावे । निषेधे गेले ॥127॥
या प्रमाणे जेंव्हा संन्यास घडतो, तेंव्हा काम्य कार्मापासून बाधा होवू शकत नाही. आणि निषिद्ध कर्म तर निषेधांच्या योगे स्वभावत:च नाहीसे होते; ॥127॥
128-18
आणि नित्यादिक जे असे । ते येणे फलत्यागे नसे । शिर लोटलिया जैसे । येर आंग ॥128॥
आणि ज्याप्रमाणे शीर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होवून खाली पडते, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा आता सांगितल्या रीतीने त्याग केला असता, त्यापासून बाधा होत नाही. ॥128॥
129-18
मग सस्य फळपाकांत । तैसे निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसीत । अपैसे ये ॥129॥
मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते, तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होवून शोधीत येते. ॥129॥
130-18
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानी । पडले गा आत्मज्ञानी । बांधती पाटु ॥130॥
अश्या युक्तीने नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलांचा त्याग व काम्यकर्मांचा संन्यास जे करतात, ते आत्मज्ञानाचे प्राप्तीला योग्य होतात. ॥130॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-18
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुके । तै काही न त्यजे अधिके । गोवीचि पडे ॥131॥
किंवा हि युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील तर, कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. ॥131॥
132-18
जे औषध व्याधी अनोळख । ते घेतलिया परते विख । का अन्न न मानिता भूक । मारी ना काय ? ॥132॥
रोगाची चिकित्सा न करिता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते, अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर मरणार नाही काय ? ॥132॥
133-18
म्हणौनि त्याज्य जे नोहे । तेथ त्यागाते न सुवावे । त्याज्यालागी नोहावे । लोभापर ॥133॥
म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे, तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे, तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. ॥133॥
134-18
चुकलिया त्यागाचे वेझे । केला सर्वत्यागुही होय वोझे । न देखती सर्वत्र दुजे । वीतराग ते ॥134॥
त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधांत सापडतो, म्हून वैराग्यसंपन्न जे आहेत, ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करीत नाहीत. ॥134॥
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥18. 3॥
135-18
एका फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधके । जैसे आपण नग्न भांडके । जगाते म्हणे ॥135॥
कित्येकास फालाभिलाषा सोडवत नाही, म्हणून ‘कर्म बंध आहे. ” असे ते म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो. ॥135॥
136-18
का जिव्हालंपट रोगिया । अन्ने दूषी धनंजया । आंगा न रुसे कोढिया । मासिया कोपे ॥136॥
किंवा हे धनजंया, जिव्हेचा अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो, आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो, किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुसता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागावतो, ॥136॥
137-18
तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णयो देती केवळ । त्यजावे ऐसा ॥137॥
त्याप्रमाणे कर्मफळत्यागाविषयी अशक्त आहेत म्हणून कर्मच वाईट असे ते म्हणतात आणि मग कर्मत्याग करवा असा सिद्धांत ठरवितात. ॥137॥
138-18
एक म्हणती यागादिक । करावेचि आवश्यक । जे यावाचूनि शोधक । आन नसे ॥138॥
कोणी असे म्हणतात कि, यज्त्रयागादी हे अवश्य केलेच पाहिजे, कारण त्यावाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही. ॥138॥
139-18
मनशुद्धीच्या मार्गी । जै विजयी व्हावे वेगी । तै कर्म सबळालागी । आळसु न कीजे ॥139॥
जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल, तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. ॥139॥
140-18
भांगार आथी शोधावे । तरी आगी जेवी नुबगावे । का दर्पणालागी सांचावे । अधिक रज ॥140॥
सोनी शुध्द करावयाचे असेल, तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये, किंवा आरशात पहावयाचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून तो साफ करावा लागतो; ॥140॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-18
नाना वस्त्रे चोख होआवी । ऐसे आथी जरी जीवी । तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥141॥
अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल, तर ती परटाच्या गलिच्छ सतेल्यात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये; ॥141॥
142-18
तैसी कर्मे क्लेशकारे । म्हणौनि न न्यावी अव्हेरे । का अन्नलाभे अरुवारे । रांधितिये उणे ॥142॥
किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत, म्हणून त्यांची हेळसांड करू नये. ॥142॥
143-18
इही इही गा शब्दी । एक कर्मी बांधिती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादी । पडोनि ठेला ॥143॥
याप्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात; अशा प्रकारे कर्म त्यागाविषयी वाद पडला आहे, ॥143॥
144-18
तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसे बोलो गोमटे । अवधान देई ॥144॥
तर ह्या वादाचा निकाल करून, कर्मचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रितीने सांगतो तिकडे लक्ष दे. ॥144॥
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥18. 4॥
145-18
तरी त्यागु एथे पांडवा । त्रिविधु पै जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभाग करू ॥145॥
तर अर्जुना, असे पहा की, हा त्याग तीन प्रकारचा आहे समजलास ? आता तिन्ही प्रकार निट वर्णन करून सांगतो; ॥145॥
146-18
त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर । तरी तू इत्यर्थाचे सार । इतुले जाण ॥146॥
त्यागाचे तीन प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्याचे तात्पर्य एव्हढेच आहे असे तु समज. ॥146॥
147-18
मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जे अलोट माने त्रिशुद्धी । निश्चयतत्व ते आधी । अवधारी पा ॥147॥
मज सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते, आणि ज्याविषयी माझे मनाचा निश्चय ठरला आहे, तो निश्चय कोणता तो एक. ॥147॥
148-18
तरी आपुलिये सोडवणे । जो मुमुक्षु जागो म्हणे । तया सर्वस्वे करणे । हेचि एक ॥148॥
संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षु दक्ष असतो, त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे; त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा. ॥148॥
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥18. 5॥
149-18
जिये यज्ञदानतपादिके । इये कर्मे आवश्यके । तिये न सांडावी पांथिके । पाउले जैसी ॥149॥
पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे (मार्ग चालण्याचे) सोडता कामा नये, त्याप्रमाणे, यज्ञ, दान व तप हि जी आवश्यक कर्मे ती सोडू नये. ॥149॥
150-18
हारपले न देखिजे । तव तयाचा मागु न सांडिजे । का तृप्त न होता न लोटिजे । भाणे जेवी ॥150॥
हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा मार्ग सोडता येत नाही; अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही. ॥150॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २९४ वा. २१, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३५१७ ते ३५२८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३५१७ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
नाही आइकत तुम्ही माझे बोल । कासया हे फोल उपणू भूस ॥१॥
येसी ते करीन बैसलिया ठाया । तूचि बुझावया जवळी देवा ॥धृपद॥
करावे ते केले सकळ उपाय । आता पाहो काय अझुनि वास ॥२॥
तुका म्हणे आला आज्ञेसी सेवट । होऊनिया नीट पाया पडो ॥३॥
अर्थ
देवा मी काव्यरुपाने जी काही बडबड करतो ते तुम्ही ऐकतच नाही तर भुस उपणल्यासारखे व्यर्थ बडबड तरी मी कशासाठी करु ? देवा मी असा उपाय करीन की मी स्वत: जागेवर बसून राहील पण तू माझी समजूत काढण्यासाठी माझ्याजवळ येशील. देवा तू माझ्याकडे येशील मला तुझे दर्शन देशील यासाठी मी जेवढे काही उपाय करायचे होते ते सर्व केले आहे परंतू आता यापुढे किती तुझ्या दर्शनाची अपेक्षा पाहावी किती तुझी वाट पाहावी ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता माझ्या अपेक्षा आशाचा शेवट झाला आहे आता मी नीट होऊन तुझ्या पाया पडत आहे आता तरी तुम्ही मला दर्शन दयावे. ”
11:57 am –
अभंग क्र. ३५१८ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
नोंहे तुम्हा जरी । येवढे कारण मुरारी ॥१॥
मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥धृपद॥
स्वामींचे ते सांडे । पुत्र होता काळतोंडे ॥२॥
शब्दा नाही रुची । मग कोठे तुका वेची ॥३॥
अर्थ
हे मुरारी तुम्हाला माझे एवढेसे कामही करवत नाही काय ? आता जसा काळ येईल जसे माझ्या आयुष्यात घडेल तसे सोसत राहावे. राजपुत्राचे जर का तोंड काळे झाले तर त्यामध्ये राजाचाही कमीपणा होऊन त्याची मानहानी होते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी बोललेले शब्द तुम्हाला आवडत नाही तुम्हाला पसंतीस पडत नाही तर मग मी माझे शब्द व्यर्थ का खर्च करु ? ”
11:57 am –
अभंग क्र. ३५१९ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
केल्यापुरती आळी । काही होते टाळाटाळी ॥१॥
सत्यसंकल्पाचे फळ । होता न दिसेचि बळ ॥धृपद॥
दळणांच्या ओव्या । रित्या खर्या मापे घ्याव्या ॥२॥
जाती उखळे चाटू । तुका म्हणे राज्य घाटू ॥३॥
अर्थ
देवा मी तुमच्याजवळ काही हट्ट केला की तेवढयापुरते माझे समाधान करुन तुम्ही माझे हित करण्याचे टाळता आहात. मी जो काही सत्य संकल्प करत आहे त्याचे फळ मला प्राप्त करुन देण्याचे बळ माझ्या काव्यात मला तरी दिसत नाही. दळण दळताना बाया ज्या ओव्या गातात त्या खऱ्या नसतात त्या पोकळ असतात मग त्या ओव्या खऱ्या अर्थाच्या मापाने घेता येतील काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “जाते उखळ चाटू यांच्या साहाय्याने राज्य स्थापन करण्याचा विचार केला तर त्यांच्या साहाय्याने राज्य स्थापन होईल काय ? ”
11:57 am –
अभंग क्र. ३५२० (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
पावावे संतोष । तुह्मी यासाठी सायास ॥१॥
करी आवडी वचने । पालटूनि क्षणक्षणे ॥धृपद॥
द्यावे अभयदान । भुमी न पडावे वचन ॥२॥
तुका म्हणे परस्परे । काही वाढवी उत्तरे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही संतुष्ट व्हावे यासाठी मी अभंग रचनेचा सायास केला आहे. तुम्हाला संतोष व्हावा यासाठी मी आलटून पालटून क्षणाक्षणाला वेगवेगळया पध्दतीचे अभंग रचना केली आहे. देवा मी आवडीने काव्यरचना केली आहे ते असे खाली जमिनीवर पडू देऊ नका आणि मला तुम्ही अभयाचे दान दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपले दोघाचे कोणत्याही निमित्ताने का होईना पण उत्तर प्रतिउत्तर वाढत राहावे. ”
11:58 am –
अभंग क्र. ३५२१ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
बोलता वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळो आले ॥१॥
मागतिले नये अरुचीने हाता । नाही वरी सत्ता आदराचीअ॥धृपद॥
समाधानासाठी लाविलासे कान । चोरलेंसे मन दिसतसा ॥२॥
तुका म्हणे आम्हा तुमचेचि फंद । वरदळ छंद कळो येती ॥३॥
अर्थ
मी तुमच्याशी काहीही बोलू लागलो की तुम्ही माझ्याकडे पाठ करुन उभे राहाता परंतू देवा तुमचा माझ्याविषयी काय भाव आहे ते मला कळून आले आहे हे फार बरे झाले. मी तुम्हाला जे आवडीने मागतो ते तुम्ही कधीही माझ्या हातात आवडीने देत नाहीत माझ्या शब्दाचा आदरही तुम्ही करत नाही त्यामुळेच तर मला जे हवे आहे ते तुमच्याकडून मिळत नाही. देवा अहो तुम्ही केवळ माझे समाधान करण्यासाठी माझ्याकडे कान लावलेले आहेत परंतू मला काही देण्याविषयी तुम्ही तुमचे चोरुन ठेवले आहे असेच मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमचे वरवरचे छंद फंद आम्हाला चांगलेच कळून येतात. ”
11:58 am –
अभंग क्र. ३५२२ (कवित्वाचानिषेधवत्याचापरिहार)
काशासाठी बैसो करूनिया हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥
काय आले एका जिवाच्या उद्धारे । पावशी उच्चारे काय हो ते ॥धृपद॥
नेदी पट परी अन्ने तो न मरी । आपुलिये थोरीसाठी राजा ॥२॥
तुका म्हणे आता अव्हेरिले तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥
अर्थ
देवा तुम्हाला मी केलेले काव्यरचना आवडतच नसेल तर व्यर्थ मी माझ्या काव्यरचनेचा का बाजार करत बसू कशाला व्यर्थ बोभाट व डांगोरा करत बसू. देवा एका जीवाचा उध्दार केल्याने तुझे काय जाणार आहे तुझ्या नावाचा उच्चार जरी आम्ही केला तरी तू आम्हाला मिळशीलच. कोणताही राजा असो आपली सत्ता तो प्रजेला तर देणार नाही परंतू आपला मोठेपणा राखण्यासाठी प्रजेला उपाशीही मरु देणार नाही तो त्यांना खाण्यासाठी अन्न तरी नक्की देईल. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही माझा अव्हेरच केला आहे तर मग काव्यरचनेचे दुकान कोण मांडीत बसेल ? ”
11:58 am –
अभंग क्र. ३५२३
माझा मज नाही । आला उबेग तो काही ॥१॥
तुमच्या नामाची जतन । नव्हता थोर वाटे सीण ॥धृपद॥
न पडावी निंदा । कानी स्वामींची गोविंदा ॥२॥
तुका म्हणे लाज । आम्हा स्वामीचे ते काज ॥३॥
अर्थ
माझा कंटाळा मला आलेला नाही. पण देवा तुमच्या नामाची थोरवी तुमच्याकडूनच होत नाही त्यामुळे मला फार मोठा त्रास होत आहे. हे गोविंदा स्वामीची निंदा कानी पडू नये असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, “स्वामीच्या लज्जेचे रक्षण करणे हेच आमचे काम आहे. ”
11:58 am –
अभंग क्र. ३५२४
काही मागणे हे आम्हा अनुचित । वडिलांची रीत जाणतसो ॥१॥
देह तुच्छ जाले सकळ उपाधी । सेवेपाशी बुद्धि राहिलीसे ॥धृपद॥
शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाही अंगी ॥२॥
तुका म्हणे देह फांकिला विभागी । उपकार अंगी उरविला ॥३॥
अर्थ
देवा तूझ्याजवळ काही मागणे हे आमच्यासाठी अनुचित आहे कारण पूर्वीच्या संतांची रीत आम्ही जाणत आहोत. देवा देहाबरोबरच सर्व उपाधी आमच्यासाठी तुच्छ झाल्या आहेत त्यामुळेच तर आमचे मन तुझ्या सेवेच्या ठिकाणी आम्ही एकनिष्ठ केले आहे. कोणतेही शब्द उच्चारणे म्हणजे एक प्रकारची उपाधीच आहे त्यापेक्षा अचल होऊन शांत बसणे हाच निश्चय मी केला आहे आणि मौन धारण करुन बसण्याचा अनुभव माझ्या अंगी नाही की काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “हा देह पंचमहाभूतांचा आहे व ज्याचा त्याचा विभाग मी पंचभूताकडे देऊन टाकला आहे आता केवळ परोपकार करण्याचाच निर्णय मी माझ्या अंगी ठेवलेला आहे. ”
11:58 am –
अभंग क्र. ३५२५
मागितल्यास पसरी कर । पळता भरी वाखती ॥१॥
काय आम्ही नेणो वर्म । केला श्रम नेणता ॥धृपद॥
बोलता बरे येता रागा । कठीणा लागा मागेमागे ॥२॥
तुका म्हणे येथे बोली । असे चाली उफराटी ॥३॥
अर्थ
देवा जे भक्त तुला दान मागतात उलट त्यांच्यापुढेच तू तुझे हात पसरवतोस आणि जे भक्त काहीही मागत नाही त्यांच्यापुढे मागे पळत जाऊन त्यांचे पोट भरण्याचे काम तू करतोस. एवढे दिवस आम्हाला तुझे हे वर्म माहितच नव्हते त्यामुळे आम्ही उगीचच व्यर्थ श्रम केला. देवा तुमच्याशी जे चांगले बोलतात त्यांचा तुम्ही रागराग करता आणि जे संत जनाबाई सारखे कठोर शब्द बोलतात त्यांच्या मागे मागे तुम्ही पळता. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमचे बोलणे चालणे जरा उरफाटेच वाटत आहे. ”
11:59 am –
अभंग क्र. ३५२६
असो तुझे तुजपाशी । आम्हा त्यासी काय चाड ॥१॥
निरोधे का कोंडू मन । समाधान असोनी ॥धृपद॥
करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥२॥
तुका म्हणे येउनि रागा । का मी भागा मुकेन ॥३॥
अर्थ
देवा तुझे वागणे कसेही असले तरी ते तुझ्याजवळच असू दे आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य आहे ? माझे मन समाधानी असताना तुझ्याशी विरोध करुन मनाची कोंडी का करत बसू ? जेवढी आम्ही आटाआटी करावी तेवढी खटपट मात्र वाढते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुझ्यावर रागवून माझ्या मिळणाऱ्या वाटयाला का मुकेन ? ”
11:59 am –
अभंग क्र. ३५२७
आहे तेचि पुढे पाहो । बरे आहो येथेंचि ॥१॥
काय वाढवूनि काम । उगाच श्रम तृष्णेचा ॥धृपद॥
स्थिरावता ओघीं बरे । चाली पुरे पडेना ॥२॥
तुका म्हणे वळिता मन । आम्हा क्षण न लगे ॥३॥
अर्थ
आम्ही आता ज्या स्थितीत आहोत त्याच स्थितीत समाधान मानू पुढे कसे होईल याचा विचार करणार नाहीत. उगाचच इच्छेची तहान वाढवून व्यर्थ श्रम का वाढवावे ? ओघामध्ये स्थिर उभे राहाणे हेच चांगले उगाच वाहात जाणे हे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “इच्छेच्या तृष्णेपासून मनाला वळवण्यासाठी आम्हाला एक क्षण देखील लागणार नाही. ”
11:59 am –
अभंग क्र. ३५२८
सांगा दास नव्हे तुमचा मी कैसा । ऐसे पंढरीशा विचारूनि ॥१॥
कोणासाठी केली प्रपंचाची होळी । या पाया वेगळी मायबापा ॥धृपद॥
नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजू हीर उफराटे ॥२॥
तुका म्हणे आम्हा अहिक्य परत्री । नाही कुळगोत्री तुज विण ॥३॥
अर्थ
हे पंढरीराया मी तुमचा दास कसा नाही याचे तुम्ही विचार करुन उत्तर दयावे. हे मायबापा मी माझ्या संसाराची होळी केली ती कोणासाठी तुमच्या पायापेक्षा वेगळी माझी इच्छा कोणती दुसरी आहे काय ? देवा आम्ही सत्यकर्म करतो तर आम्ही सत्यकर्म करत असताना तुम्ही आम्हाला धीर दयावा. उलट धान्य भाजून ते जसे निर्बीज होते तसे तरी करु नये. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्यावाचून आम्हाला इहलोकात व परलोकात कोणीही कुळ व गोत्र नाही. ”
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















