आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

३१ मार्च, दिवस ९० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १०६९ ते १०८०
“३१ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३१ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३१ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १०६९ ते १०८० चे पारायण आपण करणार आहोत.
३१ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २०१ ते २२५,
201-8
लोहाचे कनक जहाले । हे एके परिसेचि केले । आता आणिक कैचे ते गेले । लोहत्व आणी ॥201॥
लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे, की त्याचे गेलेले लोखंडपण परत आणील ?
202-8
म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दूधपण न येचि निरूते । तेवि पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही ॥202॥
म्हणून, तुपाचे ज्याप्रमाणे पुनः खरोखर दूध होत नाही, त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असता पुनः जन्म नाही,
203-8
ते माझे परम । साचोकारे निजधाम । हे आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥203॥
त्याप्रमाणे, ज्याप्रत गेले असता पुनः जन्म नाही, ते माझे खरोखर उत्तम ठिकाण होय. हे गुह्य वर्म तुला स्पष्ट करून सांगितले आहे.
यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥8. 23॥
204-8
तेवीचि आणिकेही एके प्रकारे । जाणता आहे सोपारे । तरि देह सांडितेनि अवसरे । जेथ मिळती योगी ॥204॥
त्याचप्रमाणे, देहावसानानंतर ज्या स्वरुपाला योगी प्राप्त होतात, ते गुह्य वर्म आणखी एक प्रकाराने समजण्याला सोपे आहे.
205-8
अथवा अवचटे ऐसे घडे । जे अनवसरे देह सांडे । तरि माघौते येणे घडे । देहासीचि ॥205॥
अथवा अकस्मात् असे घडते की, जे योगी अकाली देह सोडतात, त्यांना पुनः देह धारण करावा लागतो.
206-8
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती । तरी ठेवितखेवी ब्रह्मचि होती । एऱ्हवी अकाळी तरी येती । संसारा पुढती ॥206॥
त्यांना पुनः देह धारण करावा लागतो. म्हणून, शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले, तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात येरव्ही अकाली देहावसान झाल्यावर पुनः जन्मास येतात.
207-8
तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ति । या दोन्ही अवसराअधीन आहाती । तो अवसरू तुजप्रती । प्रसंगे सांगो ॥207॥
त्याचप्रमाणे, मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. असा जो काल, तो प्रसंगानुसार तुला सांगतो.
208-8
तरि ऐके गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती ॥208॥
तर हे महावीरा अर्जुना, ऐक. मरणकाल समीप आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात.
209-8
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी । बुद्धीते भ्रमु न गिळी । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥209॥
असा मरणकाल प्राप्त झाला असता बुद्धीला भ्रांति गिळीत नाही, स्मरणशक्ती अंधळी होत नाही, व मनही मरत नाही.
210-8
हा चेतनावर्गु आघवा । मरणी दिसे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गवसणी होऊनि ॥210॥
ज्याने ब्रह्मभावाचा अनुभव घेतला आहे, तोच त्या ब्रह्माचा अंतर्यामी उपभोग घेतो. म्हणून हा सगळा प्राणसमुदाय मरणसमयी टवटवीत दिसतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-8
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेऱ्ही निर्वाहो । हे तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥211॥
अशा रीतीने हा समुदाय सावध असतो; व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते, असे साह्य जठराग्नि प्रदीप्त असला म्हणजेच मिळते.
212-8
पाहे पा वारेन का उदके । जै दिवियाचे दिवेपण झाके । तै असतीच काय देखे । दिठी आपुली ॥212॥
पहा की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्या वेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्या वेळेस आपली दृष्टि विद्यमान असतांही तिला काही दिसते का ?
213-8
तैसे देहातींचेनि विषमवाते । देह आतबाहेरि श्लेष्माआते । तै विझोनि जाय उजिते । अग्नीचे ते ॥213॥
त्याचप्रमाणे देहावसानाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आंतबाहेर कफाने व्याप्त होते, त्या वेळेस जठराग्निचे तेज विझून जाते,
214-8
ते वेळी प्राणासि पाणु नाही । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणोनि अग्नीवीण देही । चेतना न थरे ॥214॥
त्या वेळेस प्राणाला अवसान नसते, मग बुद्धि असुनही काय करणार ? म्हणून अग्नीशिवाय देहांत चेतना रहात नाही.
215-8
अगा देहीचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वाया आयुष्यवेळु आपुला । अंधारे गिंवसी ॥215॥
हे पहा, शरीरांतील जठाराग्नि जर नाहीसा झाला, तर तो देह नसून ओला चिखलच होय. अशा वेळेस साधक आपल्या आयुष्याची वेळ अंधारांत शोधीत बसतो.
216-8
आणि मागील स्मरण आघवे । ते तेणे अवसरे सांभाळावे । मग देह त्यजूनि मिळावे । स्वरूपी की ॥216॥
नंतर पाठीमागील सर्व गोष्टीचे मरतेसमयी स्मरण होते. मग देह टाकून स्वरूपाला मिळावे कसे ?
217-8
तव तया देहश्लेष्माचे चिखली । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण ॥217॥
इतक्यात त्या देहाती कफाच्या चिखलांत चेतना बुडून गेल्यामुळे मागील व पुढील गोष्टीचे स्मरण नाहीसे होते.
218-7
म्हणोनि आधी अभ्यासु जो केला । तो मरण न येता निमोनि गेला । जैसे ठेवणे न दिसता मालवला । दीपु हातीचा ॥218॥
म्हणून पूर्वी जो योगाभ्यास केला तो मरण येण्याच्या आधी नाश पावतो. ज्याप्रमाणे आपण ठेविलेली वस्तु दिवा हातात घेऊन शोधण्याकरिता गेले असता ती दृष्टीस पडण्याच्या अगोदर दिवा जावा,
219-8
आता असो हे सकळ । जाण पा ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचे प्रयाणी बळ । संपूर्ण आथी ॥219॥
त्याप्रमाणे, आता या सर्व गोष्टी राहू दे, तू हे समज की, ज्ञानाला जठराग्नि हा मूळ कारण आहे, आणि मरणसमयी सर्व बळ त्या अग्नीचेच असते.
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥8. 24॥
220-8
आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सा मासांमाजी मासु । उत्तरायण ॥220॥
शरीराच्या आत जठाराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्षाचा पंधरवडा असून उत्तरायणातील कोणत्याही महिन्यापैकी एक महिना,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-8
ऐशिया समयोगाची निरूती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मविदचि होती । परब्रह्म ॥221॥
अशा प्रकारे सर्व गोष्टीची तयारी असता जे आपला देह ठेवितात, ते ज्ञानी ब्रह्मस्वरूपी मिळतात.
222-8
अवधारी गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवीचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावया पै ॥222॥
धनुर्धरा, ऐक. या वेळेच्या योगाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे, म्हणून मोक्षप्राप्तीकरिता स्वस्वरूपी येण्यास हा सरळ मार्ग आहे.
223-8
एथ अग्नि हे पहिले पायतरे । ज्योतिर्मय हे दुसरे । दिवस जाणे तिसरे । चौथे शुक्लपक्ष ॥223॥
या मार्गात जठराग्नि ही पहिली पायरी होय, अग्नीचे सतेजपण ही दुसरी पायरी; दिवस ही तिसरी पायरी; शुक्लपक्ष ही चौथी पायरी असे समज.
224-8
आणि सामास उत्तरायण । ते वरचील गा सोपान । येणे सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥224॥
आणि उत्तरायणांतील सहा महीन्यांपैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी, अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्षसिद्धिरूप घराला पावतो.
225-8
हा उत्तम काळु जाणिजे । याते अर्चिरादि मार्गु म्हणिजे । आता अकाळु तोही सहजे । सांगेन आईक ॥225॥
हा उत्तम काल असे समज, आणि याला अर्चिरादि मार्ग (प्राणोत्क्रमणाचा मार्ग) असे म्हणतात. आता मरण्यास अयोग्य काल कोणता तो प्रसंगानुसार तुला सांगतो, ऐक.
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योती प्राप्य निवर्तते ॥8. 25॥
दिवस ९० वा, ३१, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०६९ ते १०८०
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग – १०६९
पंढरीये माझे माहेर साजणी । ओविये कांडणी गाऊ गीत ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥धृपद॥
उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाई नारदासी गौरवीन ॥२॥
गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचे कवतुक वाटे मज ॥३॥
मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥
नागो जगमित्रा नरहरी सोनारा । रोहिदास कबिरा सोईरिया ॥६॥
परिसा भागवता सुरदास सांवता । गाईन नेणता सकळिकासी ॥७॥
चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥
जीवीच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मिराबाई ॥९॥
आणीक हे संत महानुभव मुनि । सकळा चरणी जीव माझा ॥१०॥
आनंदे ओविया गाईन मी त्यासी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥
तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हर्षे नांदे राये घराचारी ॥१२॥
अर्थ
हे माझे सखे माझे बुद्धी पंढरी माझे माहेर आहे आणि दळताना कांडताना माझे माहेरा संबंधीच्या ओव्या तू गात जा. माझ्या माहेरी राई रखुमाबाई, सत्यभामा या माझ्या माता व पांडुरंग माझा पिता आहे उद्धव, अक्रूर, व्यास, अंबऋषी नारद मुनी हे माझे बंधू आहेत व मी त्यांचा गौरव करीत आहे. गरुड लाडका बंधू आहे. पुंडलिकाचे मला फार कौतुक वाटते. मला माझ्या माहेरा मध्ये संत आणि महंत असे भरपूर गणगोत आहे मी त्यांना माझ्या गोव्यातून नित्य आठवींन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव हे माझे जिवलग आहेत जगन मित्र नागो, नरहरी सोनार, रोहिदास, कबीर हे माझे सोयरे आहेत परसाे भागवत, सूरदास व सावतामाळी यांचे गुणगान मी गाईन. चोखामेळा व इतर सर्व संत हे माझ्या जीवाची सोयरे आहेत त्यांचा विसर मला एक क्षणभर देखील पडत नाही. माझ्या जीवाचे जीवन म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य श्री एकनाथ, कान्होबा पाटक व मीराबाई हे आहेत आणिकही संत महानुभव व मुनी आहेत त्यांच्या सर्वाच्या चरणी माझा जीव आहे. जे वारकरी आनंदाने पंढरी जातात मित्रांसाठी आनंदाने वोव्या गाईन. तुकाराम महाराज म्हणतात हे माझ्या सखे बुद्धी हा माझा मायबाप पांडुरंग तो सर्वात असून तो सर्वामध्ये चराचरामध्ये आहे व सर्वश्रेष्ठ आहे.
अभंग – १०७०
जातीचे ते चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरा । कागा न शोभे पिंजरा ॥धृपद॥
शिकविले ते सुजात सोसी । मग मोल चढे त्यासी ॥२॥
तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नव्हती त्या नारी ॥३॥
अर्थ
जे आपल्या जातिचे (हरी भक्ता विषयी महाराज बोलतात) असतात त्यांच्याविषयी प्रेम अधिकच वाढते. पोपट हा पक्षी आपण पाहिला आहे त्याला जर आपण राम राम म्हणा यास शिकवली तर तो राम राम म्हणतो म्हणून त्याविषयी अधिक आनंद वाटतो. आणि हे गुण इतरांना लागू पडणार आहे काय म्हणजे कावळ्याला जर सोन्याच्या पिंजर्यात ठेवले तर ते शोभणार आहे काय तर नाही. जे उत्तम जातीचे आहेत तेच चांगले गुण ग्रहण करतात त्यामुळे त्यांना महत्त्व वाढते. तुकाराम महाराज म्हणतात जरी हिजड्याने चांगल्या प्रकारच्या साड्या नेसल्या तरी ते उत्तम जातीची स्त्रि बनू शकत नाही.
अभंग – १०७१
बसणे थिल्लरी । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाही देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हावा ॥धृपद॥
फुगते काउळे । म्हणे मी राजहंसा आगळे ॥२॥
गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
मुलाम्याचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ॥४॥
अर्थ
डबक्यात बसलेला बेडूक सागराचा धिक्कार करतो कारण त्याला त्याचे डबके सरकारपेक्षा मोठी आहे असे वाटते. जे कधीही पाहिले नाही, जे माहितही नाही त्याचा तो बेडूक तोंडाने तिरस्कार करतो. कावळा स्वतःलाच फुगतो आणि अभिमानाने म्हणतो की मी राजहंस यापेक्षाही श्रेष्ठ आहे. एखादा गाढव म्हणतो मी हत्ती पेक्षाही फार चांगला आहे. तुकाराम महाराज म्हणतात नाण्याला सोन्याचा मुलामा जरी दिला तरी ते नाणे सोन्याचे नसते.
अभंग – १०७२
मुक्त होता परी बळे जाला बद्ध । घेउनिया छंद माझे माझे ॥१॥
पाप पुण्य अंगी घेतले जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण । जैसा मृगसीण मृगजळी ॥३॥
अर्थ
हा जीव मूळचा ब्रम्हस्वरूप आहे त्यामुळे तो नित्यमुक्त आहेच पण अविद्येमुळे देह माझा व देह संबंधी माझे या छंदाने मनुष्यजीव बद्ध झालेला आहे. मनुष्यजीव पाप-पुण्य स्वतःच्या अंगी जडवून घेतो व खरा कर्ता आणि भोक्ता कोण आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जसे हरिण मृगजळाच्या सत्यत्व भासामुळे, सत्यत्व भ्रमामुळे त्याच्या मागे धावून म्हणजे मृगजळाच्या मागे धावून कष्टी होते त्याप्रमाणे हे मनुष्य संसाराच्या बंधनात पडतात.
अभंग – १०७३
वरते करोनिया तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥
राग आळवितो नाना । गातो काय ते कळेना ॥धृपद॥
आशा धरोनि मनी । काही देईल म्हणऊनि ॥२॥
पोटा एका साठी । तुका म्हणे जाले कष्टी ॥३॥
अर्थ
काही लोक वरती तोंड करून देवाला प्रचंड हाक मारतात, काही लोक आपल्या गायन कलेतून वेगवेगळ्या रागाने देवाला आळवतात, पण देवाचे खरे स्वरूप काय आहे हे त्यांना काही कळत नाही. ऐकणारी लोक मला काही धन द्रव्य वगैरे देतील अशी अपेक्षा मनात धरून हे लोक इत्यादी क्रिया करतात. तुकाराम महाराज म्हणतात हे लोक पोटासाठी इतके कष्ट करतात परंतु परमार्थ हा त्यांचा मुख्य हेतू नसतो.
अभंग – १०७४
जाळी महा कर्मे । दावी नीजसुखवर्मे ॥१॥
ऐसे कळले आम्हा एक । झालो नामाचे धारक ॥धृपद॥
तपाचे सायास । न लगे घेणे वनवास ॥२॥
तुका म्हणे येणे । कळीकाळ हे ठेंगणे ॥३॥
अर्थ
महापातकांना जाळते व जे आत्मसुख दाखविते ते वर्म आम्हाला समजले आहे ते वर्म म्हणजे हरीचे नाम होय. आणि आम्ही नामाचे धारक झालो आहोत. नामाचे वर्म आम्हा हाती लागल्यामुळे आता तपाचे व वनवासात जायचे कष्ट सोसावे लागणार नाही तुकाराम महाराज म्हणतात नामजप केल्यामुळे कळिकाळा आम्हाला आता भीत आहे.
अभंग – १०७५
ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण ।
आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥
काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही ।
वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥धृपद॥
नाम अखंड हृदयी राहो वाणी । नको पडो विसर क्षण जागृती स्वप्नी ।
संत समागम ऐसा दे लाऊनि । आणीक दुजे काही नेणे तुज वाचुनी ॥२॥
पंथ पुरींचा रवी सुत पुरे आता । आड करावा भवसिंधू ऐसा नव्हता ।
नाही अडथळा त्रेकोल्या माजी सरता । विनवी तुकया बंधू चरणी ठेउनी माथा ॥३॥
अर्थ
हरी तू लवकर ये आणि मला तुझ्या कृपेचे दान दे. माझ्या जीवनातील अहंकाराचा अज्ञानाचा नाश कर आणि तुझे चरण मला दाखव. देवा माझी अार्त इच्छा माझ्या अंतकरणातील इच्छा तू पूर्ण कर. मी तुला शरण आलो आहे तू मला भेट दे आणि माझी उपेक्षा तू करू नको. हे देवा तू माझ्या देहामध्ये काम, क्रोध, आशा, तृष्णा, अहंकार, माया, लज्जा, चिंता काहीच राहू देऊ नको. सदासर्वकाळ पंढरी त राहीना असा जन्म दे बाकी अणिक दुसरे काही मागणे माझे तुझ्यापाशी नाही देवा. तुझे नांव माझ्या हृदयात, वाणीत अखंड राहू दे मला तुझा विसर जागृती व स्वप्नात देखील एक क्षणभरसुद्धा पडू देऊ नकोस. देवा मला असा संत समागम लाभू दे की तुझ्या वाचून मी दुसरे काहीच जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा रविपुत्रं जो यम त्याच्या गावी जाण्याचा रस्ता आहे तिकडे जाण्यास चालले नको त्या वाटेने जाणे नको व त्यामुळे या भवसिंधूला तू माझ्या पुढून नाहीसे कर देवा तुमच्या या कर्तव्याला त्रैलोक्या मध्ये कोणीही अडथळा करणार नाही त्यामुळे मीच तुमच्या चरणावर मस्तक ठेवून तुम्हाला हि विनंती करत आहे.
अभंग – १०७६
तट्टाचे जातीला नाही भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥
परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥धृपद॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलते चि ॥२॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातले । न विचारी आपुले तोंडी मुते ॥३॥
अर्थ
तट्टाच्या जातीला भीड नसते त्यामुळे तो कोणालाही वाटेल त्याला लाथ मारतो कारण लहान-थोर हे त्याला काहीच समजत नाही. परंतु विशेष असे की मनुष्य जन्म जरी मिळाला तरी काही मनुष्यांना ज्येष्ठ-श्रेष्ठ समजत नाही आणि समजत नसेल तर तो त्यांची मानखंडना करत असतो आणि असे असेल तर तो त्या तट्टा पेक्षाही नीच जातीचा आहे असे समजावे. जर एखादा मनुष्य आपल्या आईला व बहिणीला वाटेल तसे बोलून भुंकत असेल तर तो मनुष्य नाही तो गाढवच आहे असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की बोकड माजले तर कोणताही विचार न करता स्वतःच्या तोंडात मुततो.
अभंग – १०७७
मायझवा खर गाढवाचे बीज । ते ऐसे सहज कळो येते ॥१॥
आपमानिले जेणे श्रेष्ठाचे वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥धृपद॥
मद्यपीतो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वाया ॥२॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळले सुने । आप पर तेणे न विचारावे ॥३॥
अर्थ
या ठिकाणी महाराज एक अत्यंत घाण शिवी देतात व म्हणतात जो मनुष्य जेष्ठ श्रेष्ठांची मानखंडना करतो त्यांचा अपमान करतो तो मनुष्य गाढवाच्या पोटी जन्मला आहे असे समजावे म्हणजे तो मनुष्य गाढवाचे बीज आहे हे सहज लक्षात येते. ज्याने श्रेष्ठांच्या वचनांचा अपमान केलेला आहे त्या मनुष्याची हीच खून आहे की तो गाढवाच्या पोटी जन्माला आलेला आहे हे ओळखून घ्यावे. मद्यपी मनुष्य तोही त्याच जातीचा असतो त्याला जर कोणी चांगला उपदेश केला तर तो उपदेश करणाऱ्यावर व्यर्थच रागवत असतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की पिसाळलेले कुत्रे हे कोणालाही चावत सुटते त्याला आपले आणि परके हे कोणीही कळत नाही.
अभंग – १०७८
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥
काय धाक आम्हा कासयाची चिंता । ऐसा तो असता साहाकारी ॥धृपद॥
शंखचक्रगदा आयुधे अपार । वागवितो भार भक्तांसाठी ॥२॥
पांडवा जोहरी राखिले कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥
अर्थ
मत्स्य, कूर्म, शेष हे मोठे अवतार आहेत पण त्यांना पृथ्वीचा भार वाहण्यासाठी कोणाचा आधार आहे तर त्यांना या देवाचा आधार आहे. आणि असा देव आमचा सहाय्य करणारा असताना आम्हाला कोणाची व कशाची चिंता असणार आहे ? आमचा देव भक्तांसाठी शंख, चक्र, गदा असे आयुधे अनेक वागवीत असतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की पांडव लाखेच्या घरात सापडले होते त्यावेळी त्यांना युक्तीने ज्या देवाने बाहेर काढले तो देव माझा कैवारी झाला.
अभंग – १०७९
राम म्हणता कामक्रोधांचे दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥
राम म्हणता कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नासही ॥धृपद॥
राम म्हणता जन्म नाही गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधी ॥२॥
राम म्हणता यम शरणागत बापुडे । आढळ पद पुढे काय तेथे ॥३॥
राम म्हणता धर्म घडती सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥
राम म्हणता म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाही ॥५॥
अर्थ
राम नाम घेतले की काम, क्रोधाचे दहन होते ते जळून जातात. आणि अभिमान तर देशोधडीला जातो राम म्हटले तर भव बंधन हे देखील तुटून जातात आणि कोणत्याही प्रकारचे स्वप्नातही श्रम येत नाही. रामाचे नामस्मरण जरी केले, स्मरण केले तर जन्म-मृत्यू टळतो म्हणजे गर्भवास पुन्हा पुन्हा होत नाही. आणि तो मनुष्य कधीही दारिद्र्यास पात्र होत नाही. रामाचे नाम घेतले की यम देखील दरिद्री होऊन आपल्याला शरण येतो. आणि त्यामुळे अमरपणा आपल्याला प्राप्त होतो, ध्रुवाला जे अढळपदाची आपल्याला प्राप्त झालेल्या अमरपणा पुढे काय माहिती आहे ? राम नाम घेतले की सर्व धर्म घडतात आणि डोळ्यावर जे अज्ञानाचे पडळ आलेल्या आहे ते क्षणात नाहीसे होतात. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की रामाचे नाम अंतकरणापासून घेतले की हा भवसिंधु सहजच मनुष्य तरुण जाईल त्याचा उद्धार होईल यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही.
अभंग – १०८०
मरोनि जाईन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥
चुकविली दुःखे मायेचा वोळसा । तोडोनिया आशापाश तेणे ॥धृपद॥
केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाही ऐसी ॥२॥
काळे तोंड काळ करूनि राहिले । भूतमात्र जाले सज्जनसखे ॥३॥
तुकयाबंधु म्हणे अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्ये ॥४॥
अर्थ
हे चक्रपाणी मायबापा तुझ्या नामावरून व गुणावरून मी माझा देह देखील ओवाळून टाकीन, कारण तुझ्या गुणाने व नामाने माझी सर्व दुःखे चुकविले व मायेचा वळसा चुकविला आणि माझे सर्व आशा पाश त्याने तोडून टाकले आहे. मी त्रिविध तापाने तप्त झालो होतो त्यावेळी मला तुझ्या नावाने शितल केले त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता आणि तळमळ मला राहिलेली नाही. तुझ्या नामामुळे हा काळ देखील घाबरतो त्याचे तोंड काळे करून लपून तो बसलेला आहे व सर्व भूतमात्र माझे सखे सज्जन सोयरे झाले आहेत. तुकया बंधू कान्होबा म्हणतात हे परेशा तुझ्या नामचिंतनामुळे दाहीदिशा माझ्यासाठी मुक्त झाल्या आहे असे मला दिसू लागलेले आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















