२१ एप्रिल, दिवस १११ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४५१ ते ४७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १३२१ ते १३३२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२१ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २१ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २१ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.


२१ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओवी ४५१ ते ४७५,

451-9
तो प्रल्हादु गा मजसाठी । घेता बहुते सदा किरीटी । का जे मिया द्यावे ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥451॥
हे किरीटी, ज्या प्रल्हादाला माझ्याकरिता पुष्कळांनी नेहमी छळले, तो, एका भक्तीने, मजपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी दुसऱ्यास प्राप्त करून देण्यास समर्थ झाला.
452-9
एऱ्हवी दैत्यकुळ साचोकारे । परि इंद्रिही सरी न लाहे उपरे । म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥452॥
बाकी वास्तविक पाहता त्याने दैत्यकुळात जन्म घेतलेला, पण त्याच्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही; म्हणून माझी प्राप्ति करून घेण्याला एक भक्ति पूरे आहे; जात वैगेरेची काही एक चाड नाही
453-9
राजाज्ञेची अक्षरे आहाती । तिये चामा एका जया पडती । तया चामासाठी जोडती । सकळ वस्तु ॥453॥
राजाज्ञेची अक्षरे एका कातड्याचे तुकड्यावर जरी पडली; तरी त्या कातड्यापासून सर्व वस्तु प्राप्त होतात.
454-9
वाचूनि सोने रुपे प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेचि चाम एक जै लाहे । तेणे विकती आघवी ॥454॥
त्या अक्षरांवाचून सोन्यारूप्याला किंमत नाही, तर येथे राजाज्ञा हीच मुख्य होय, व त्याच राजशिक्क्याच्याकातड्याने सर्व वस्तु विकत मिळतात.
455-9
तैसे उत्तमत्व तैचि तरे । तैचि सर्वज्ञता सरे । जै मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमे ॥455॥
त्याचप्रमाणे, जेंव्हा मन व बुद्धि ही माझ्याच प्रेमाने युक्त होतात, तेव्हांच मोठेपणा व सर्वज्ञपणा यांचा डौल शोभतो.


456-9
म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे आघवेचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥456॥
म्हणून कुळ, जात, वर्ण हे निष्कारण आहेत. तर अर्जुना, फक्त माझी भक्ति केली असता सार्थक होते.
457-9
तेचि भलतेणे भावे । मन मजाआंतु येते होआवे । आले तरी आघवे । मागील वावो ॥457॥
ती माझी भक्ति वाटेल त्याने मनोभावाने केली असता, तो पुर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाही.
458-9
जैसे तवंचि वहाळ वोहळ । जव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारुप ॥458॥
ओढे जोपर्यंत गंगेस मिळाले नाहीत तोपर्यंतच त्यास ओहोळ, वहाळ वैगेरे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात,
459-9
का खैर चंदन काष्ठे । हे विवंचना तवचि घटे । जव न घापती एकवटे । अग्नीमाजी ॥459॥
किंवा लाकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत तोपर्यंतच त्यास खैर, चंदन अशी नावे असतात.
460-9
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । का शूद्र अंत्यादि इया । जाती तवचि वेगळालिया । जव न पवती माते ॥460॥
त्याचप्रमाणे, जोपर्यंत मद्रूपता प्राप्त झाली नाही, तोपर्यंतच क्षत्रिय, वैश्य, स्त्री, शुद्र, अंत्यज इत्यादि जाति वेगळाल्या असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


461-9
मग जाती व्यक्ती पडे बिंदुले । जेव्हा भाव होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजी ॥461॥
मनोभावाने मला शरण आल्यावर जाति, व्यक्ति वगैरे भेद नाहीसा होतो. ज्याप्रमाणे समुद्रांत मीठ घातल्यावरएकरूप होऊन जाते,
462-9
तंववरी नदानदीची नांवे । तवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जव न येती आघवे । समुद्रामाजी ॥462॥
जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाहीत, तोपर्यंत नद, नदी, पूर्ववाहिनी, पश्चिमपाहिनी वगैरे भेद असतो;
463-9
हेचि कवणे एके मिसे । चित्त माझा ठायी प्रवेशे । येतुले हो मग आपैसे । मी होणे असे ॥463॥
त्याचप्रमाणे, कोणत्याही निमीत्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे; मग सहजच मद्रूपत्व प्राप्त होते
464-9.
अगा वरी फोडावयाचि लागी । लोहो मिळो का परिसाचा आंगी । का जे मिळतिये प्रसंगी । सोनेचि होईल ॥464॥
अरे, परिसाला फोडण्याकरिता जरी लोखंडाने स्पर्श केला, तरी त्याचे लागलीच सोने होते.
465-9
पाहे पा वालभाचेनि व्याजे । तिया व्रजांगनांची निजे । मज मीनलिया काय माझे । स्वरुप नव्हतीचि ॥465॥
हे पहा, गोपींनी प्रीतीच्या मिषाने माझे ठिकाणी आपले चित्त ठेवले तरी त्या मद्रूप झाल्या नाहीत का ?


466-9
नातरी भयाचेनि मिसे । माते न पविजेचि काय कंसे । की अखंड वैरवशे । चैद्यादिकी ॥466॥
किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का ? किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने शिशुपालादिक मद्रूप झाले नाहीत का ?
467-9
अगा सोयरेपणेचि पांडवा । माझे सायुज्य यादवा । की ममत्वे वासुदेवा- । दिका सकळा ॥467॥
अरे, तसेच पांडव व यादव यास सोयरिकीच्या नात्याने व वासुदेवादिक यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का ?
468-9
नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा । या भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥468॥
हे धनुर्धरा, नारद, धृव, अक्रूर, शुक्र आणि सनतकुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे, .
469-9
तैसाचि गोपीसी कामे । तया कंसा भयसंभ्रमे । येरा घातकेया मनोधर्मे । शिशुपालादिका ॥469॥
तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने, व शिशुपालादिकांनावैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे, .
470-9
अगा मी एकुलाणीचे खागे । मज येवो ये भलतेनि मार्गे । भक्ती का विषये विरागे । अथवा वैरे ॥470॥
अरे, मीनिर्वाणीचे स्थान आहे, म्हणून मला वाटेल त्या मार्गाने – भक्तीने, विषयबुद्धीने, विरक्ततेने अथवा वैराने- कोणीही प्राप्त झाला असता हरकत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


471-9
म्हणोनि पार्था पाही । प्रवेशावया माझा ठायी । उपायांची नाही । केणि एथ ॥471॥
म्हणून पार्था, हे पहा की, मला येऊन मिळण्याकरिता येथे उपायांची उणीव नाही.
472-9
आणि भलतिया जाती जन्मावे । मग भजिजे का विरोधावे । परि भक्त का वैरिया व्हावे । माझियाचि ॥472॥
आणि वाटेल त्या जातीत जन्महोवो आणि माझी भक्ति करो अथवा वैर करो; परंतु भक्त किंवा वैरी जे व्हावयाचे, ते माझेच व्हावे.
473-9
अगा कवणे एके बोले । माझेपण जऱ्ही जाहाले । तरी मी होणे आले । हाता निरुते ॥473॥
अरे कोणत्याही निमीत्ताने जर मला कोणी शरण आला, तर मद्रूप होणे हे अगदी त्याच्या हातचे आहे.
474-9
यापरि पापयोनीही अर्जुना । का वैश्य शूद्र अंगना । माते भजता सदना । माझिया येती ॥474॥
यास्तव हे अर्जुना, पापयोनीत जन्म घेतलेले, किंवा वैश्य, शुद्र, स्त्रिया यांनी माझी भक्ति केली असता ते माझ्याजवळ येतात.

किं पुनर्ब्राह्मणा:पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥9. 33॥

475-9
मग वर्णांमाजी छत्रचामर । स्वर्ग जयांचे अग्रहार । मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥475॥
मग, स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनामगावच; आणि जे मंत्रविद्येचे माहेरघरच; जे सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण

दिवस १११ वा, २१, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३२१ ते १३३२
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १३२१
दिकची या नाही संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥
तांतडीत करी म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥धृपद॥
संकल्पाच्या बीजे इंद्रियांची चाली । प्रारब्ध ते घाली गर्भवासी ॥२॥
तुका म्हणे बीजे जाळुनी सकळ । करावे गोपाळ आपुले भाट ॥३॥
अर्थ

संसाराशी संबंध किती दिवस आहे याला मर्यादा नाही त्यामुळे संसारातील संसाराची भव रोगाची बाधा तुटेनाशी झाली आहे त्यामुळे मी तातडीने परमार्थ करीत आहे. जेवढा वेळ माझा परमार्थात जाईल तो एक वेळ म्हणजे माझ्यासाठी सोन्याचाच. संकल्प बीजाणे च इंद्रिये कर्म करत असतात व त्या क्रमानेच प्रारब्ध कर्म घडून पुन्हा गर्भवासाता नेऊन घालतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे हे गोपाळा तुम्ही माझे सर्व प्रारब्धाची कर्मे जाळून टाकून मला तुमचे गुणगान करणारा भाट करावे.
अभंग क्र. १३२२
आता होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥१॥
नाही केली जीवेसाठी । तो का गोष्टी रुचे ते॥धृपद॥
आधी निर्धार तो सार । मग भार सोसेना ॥२॥
तुका म्हणे खाऊ जेऊ । नेदुं होऊ वेगळा ॥३॥
अर्थ

देवा मी आता तुमच्या दारांमध्ये धरणे धरून बसेन आणि तुम्हाला आताच कोंडून ठेवीन. हे देवा मी माझ्या जीवावर उदार झालो नाही तर तुम्हाला माझ्या गोष्टी कोरड्या वाटतील आणि तुमचा त्यावर विश्वास कसा बसेल ? देवा आधी निश्चयाने वागणे हे महत्त्वाचा आहे मग एकदा की आमचा निश्चय तुम्ही पाहिला की आमचा भार तुम्हाला सोसणार नाही आणि मग आमची विचारपूस केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही, गत्यंतर नाही आमची विचारपूस तुम्हाला करावी लागेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुला भोजना सहित आमच्याशी एक रूप करू परंतु आम्ही तुला आमच्या पेक्षा वेगळे होऊ देणार नाही.
अभंग क्र. १३२३
होईल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावे ॥१॥
तोवरी मी पुढे काही । आपुले नाही घालीत ॥धृपद॥
जाणेनिया अंतर देव । जेव्हा भेव फेडील ॥२॥
तुका म्हणे धरिल हाती । करील खंती वेगळे ॥३॥
अर्थ

मी देवाच्या दारात धरणे धरून बसलो आहे त्यामुळे देवाकडून माझी विचारपूस होईल मग त्याला उत्तर काय द्यायचे याची योजना आतापासूनच तयार करून ठेवली पाहिजे, तेच योग्य राहील. जोपर्यंत माझी विचारपूस होत नाही तोपर्यंत देवाला मी काहीही सांगणार नाही. माझ्या अंतकरणातील देव जाणून घेईल आणि तोच माझी सर्व काही कष्ट भय नाहीसे करेन. तुकाराम महाराज म्हणतात हा देव माझ्या हाताला धरील आणि मला या भयातून मुक्त करीन.
अभंग क्र. १३२४
हा तो नव्हे काही निराशेचा ठाव । भले पोटी वाव राखिलिया ॥१॥
विश्वंभरे विश्व सामावले पोटी । तेथे चि सेवटी आम्ही असो ॥धृपद॥
नेणता चिंतन करितो अंतरी । तेथे अभ्यंतरी उमटेल ॥२॥
तुका म्हणे माझ्या स्वामी अबोलणा । पुरवू खुणे खुणा जाणतसो ॥३॥
अर्थ

भक्ती मार्गांमध्ये निराश होऊन चालत नाही आपल्या मनात धीर धरावा आणि केव्हा तरी आपल्याला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय दृढ धरावा. विश्वंभरा च्या पोटामध्ये सारे विश्व सामावले आहे म्हणजे आपणही त्याच्या पोटात आहेत आहोत शेवटी आपणही त्याच्या पोटात राहणार आहोत. देव माझी चिंता करत आहे हे मला कळत नाही. पण देवाच्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम उमटलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा स्वामी पांडुरंग अबोलच आहे परंतु त्याच्या इच्छेनुसार त्याला कशी सेवा आवडते हे मी जाणतो.
अभंग क्र. १३२५
निष्ठुर तो दिसे निराकारपणे । कोवळा सगुणे प्रतिपाळी ॥१॥
केला च करावा केला कइवाड । होईल ते गोड न परते ॥धृपद॥
मथिलिया लागे नवनीत हाता । नासे वितिळता आहाच ते ॥२॥
तुका म्हणे आता मनाशी विचार । करावा तो सार एकचित्ते ॥३॥
अर्थ

हा हरी निर्गुण आहे त्यामुळे लोकांना तो निष्ठुर असल्यासारखा वाटतो. परंतु तो सगुण साकार झाला की सर्व भक्तांवर कृपा करतो. तो कोवळा आहे दयावंत आहे आणि सर्वाचे तो पालन करतो असे दिसते. निर्गुण आणि सगुण हे दोन्ही रुप देवाचेच, त्यापैकी कोणत्याही एका रूपा वर भक्ती परम निष्ठा धरावी आणि त्याचीच पूजा करावी. असे केल्याने नक्कीच शेवट गोड होईल. दह्याचे मंथन केले तर लोणी हाताला लागते परंतु वरचेवर दह्याचे मंथन केले तर लोणीही नाश पावते. तुकाराम महाराज म्हणतात आता मनाशी एक चित्ताने असा विचार करावा की सगुण किंवा निर्गुण कोणत्याही एका देवाच्या रूपाचे चिंतन करावे व तेच सारभूत आहे असे लक्षात ठेवावे.
अभंग क्र. १३२६
बहु देवा बरे जाले । नसते गेले सोवळे ॥१॥
धोवटाशी पडिली गाठी । जगजेठीप्रसादे ॥धृपद॥
गादल्याचा जाला झाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥
तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥
अर्थ

देवा मीथ्या असणारे “सोवळे” नाहीसे झाले ते फार बरे झाले. जगात सत्य असणाऱ्या आत्म्याची मला गाठ पडली. त्रिविध गुणा ने माझे मन मलीन झाले होते त्यांचा झाडा झाला आहे आणि विकल्पाचीही पीडा आता गेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता जे निर्मळ आत्मतत्त्व आहे ते मला निर्मळ करीत आहे.
अभंग क्र. १३२७
स्वामित्वाची वर्मे असोनि जवळी । वाहो जावे मोळी गुणासवे ॥१॥
काबाडापासूनि सोडवा दातारा । काही नका भारा पात्र करू ॥धृपद॥
धनवंत्र्याचिये अंगी सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥
तुका म्हणे आले मोड्यासी कोंपट । सांडोव्याची वाट विसरावी ॥३॥
अर्थ

माझ्या स्वामीचे वर्म सच्चिदानंद माझ्या जवळ असूनही मी त्रिगुणाच्या संगतीने देहत्रयाची मोळी वाहत आहे. हे दातारा आम्हाला या‌ काबाडा पासून सोडवा आणि प्रपंचाचा भार वाहणारे आम्हाला करू नका. सर्व शरीराची व्याधी बरे करण्याचे सामर्थ्य धन्वंतरीच्या अंगी असते त्याप्रमाणे भवसागराचे बंधन तोडण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी आहे. हा भवसागर तोडणारे तुम्ही धन्वंतरी आहात. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझी देहरूपी खोपी मोडकळीस आली आहे आता यापुढे माझा गर्भवास फेरा बंद पडेल असे काहीतरी तुम्ही करा.
अभंग क्र. १३२८
ॠणाच्या परिहारा जालो वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥
जालो उतराई शरीरसंकल्पे । चुको द्यावी पापे सकळ ही ॥धृपद॥
आजिवरी होतो धरूनि जिवासी । व्याजे कासाविसी बहु केले ॥२॥
तुका म्हणे मना आणिला म्या भाव । तुमचा तेथे ठाव आहे देवा ॥३॥
अर्थ

हे नारायणा देवा तुमच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता मी तुमचा दास झालो आहे. आता तुम्ही मला हिशोब द्यावा. देवा आता मी तुमच्या उपकरातून मुक्त होण्यासाठी माझे शरीर तुम्हाला अर्पण करत आहे. या पुढचे माझे सर्व पाप तुम्ही नाहीसे करा. देवा मी आज पर्यंत कर्ज बाळगून होतो या जीव दशेला धरून होतो त्यामुळे माझे कर्ज वाढतच गेले. आणि माझा जीव त्यामुळे खूप कासावीस होत होता. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी मनात असा विचार केला की हे शरीर तुमचे राहण्याचे स्थान आहे, त्यामुळे आता हे शरीर मी तुम्हाला अर्पण करीत आहे.
अभंग क्र. १३२९
येणे पागे पायापाशी । निश्चयेंसी राहेन ॥१॥
सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥धृपद॥
बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हा ॥२॥
तुका म्हणे नव्हे क्षण । पायाविण वेगळा ॥३॥
अर्थ

देवा मी तुमचा सेवक आहे आणि निश्चयाने तुमच्या पाया जवळच राहणार आहे. देवा मी तुमचे सर्व प्रकारचे दास्यत्व पत्करले आहे. तेव्हा तुम्ही मला जी सेवा सांगायला ती सेवा मी करेन. देवा मी भवसागराची बंधने तोडली आणि तुझ्या पायाची प्राप्ती झाली तर हाच आमच्यासाठी मोठा लाभ असणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पायापासून मी एक क्षण देखील वेगळा राहणार नाही.
अभंग क्र. १३३०
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझे जड करुन घ्याल ॥१॥
उद्धारासी काय उधाराचे काम । वाढवूंचि श्रम नये देवा ॥धृपद॥
करा आता मजसाठी वाड पोट । ठावे नाही तंटे झाले लोकी ॥२॥
तुका म्हणे बाकी झडलियावरी । न पडे वेव्हारी संचिताचे ॥३॥
अर्थ

देवा तुम्ही या भवसागरातील उपाधी सोडवण्यासाठी काहीतरी करा, माझा उद्धार करण्याकरता माझ्या जडपणाशी, माझ्या मूर्खपणाशी काय काम ? देवा माझा उद्धार करण्यासाठी उधारीचे काय काम आहे, म्हणजे आज करतो उद्या करतो असे तुम्ही का करतात. असे करून तुम्ही माझे श्रम वाढवू नका. देवा आता तुम्ही तुमच्या पोटी माझ्याविषयी दया येऊ द्या. लोकांमध्ये माझी किती फजिती झाली आहे हे तुम्हाला माहित आहे, ही गोष्ट तुम्हाला माहित नाही काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा की माझ्या संचिताची बाकी भेटली ती पुन्हा मी कर्मच करणार नाही.
अभंग क्र. १३३१
सर्व संगी विट आला । तू एकला आवडसी ॥१॥
दिली आता पायी मिठी । जगजेठी न सोडी ॥धृपद॥
बहु जालो खेदक्षीण । येणे सीण तो नासे ॥२॥
तुका म्हणे गंगेवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
अर्थ

देवा मला सर्व गोष्टींविषयी कंटाळा आला आहे आणि फक्त तूच एक मला आवडतो आहेस. हे जगजेठी मी तुझ्या पायाला मिठी दिली आहे ती आता कधीच सोडणार नाही. देवा मी खूप दुखी झालो आहे आणि तुझ्या पाया च्या दर्शनाने हे सर्व दुःख नाहीसे होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या ठिकाणी गंगेचा वास आहे आणि त्या ठिकाणी वास करण्याची मला इच्छा आहे.
अभंग क्र. १३३२
शीतळ ते शीतळाहुनी । पायवणी चरणींचे ॥१॥
सेवन हे शिरसा धरी । अंतरी ही वरदळा ॥धृपद॥
अवघे चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचे ॥२॥
बैसोनिया तुका तळी । त्या कल्लोळी डौरला ॥३॥
अर्थ

देवा तुमच्या चरणांचे गंगा रुप तीर्थ हे जगातील शीतळ पदार्थ होऊनही शितळ आहे. हे देवा हेच ते तीर्थ मी सेवन करतो. माझ्या डोक्याने त्यालाच वंदन करतो. मी त्यालाच माझ्या डोक्यावर धारण करतो. पोटात ही तेच सेवन करतो आणि माझ्या बाह्य अंगावर, माझ्या सर्वांगावर हेच तीर्थ शिंपडतो. कारण माझा बाप हा विठ्ठल आहे याच्या तीर्थस्थाने सर्व पाप नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या चरण तीर्थाच्या ठिकाणी बसून मी स्नान केले आणि त्याच्या लाटांमध्ये बसूनच त्या लाटा अंगावर घेऊनच मी पावन झालो.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading