२५ मार्च, दिवस ८४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ९९७ ते १००८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २५ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २५ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९९७ ते १००८ चे पारायण आपण करणार आहोत.


२५ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी ५१ ते ७५,

51-8
मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणे संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥
मग, मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी, इने, धुराशिवाय निर्दोप जो ज्ञानाग्नि त्याचा संतोष करितात.
52-8
ऐसेनि हे सकळ ज्ञानी समर्पे । मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे । पाठी ज्ञेयचि स्वरूपे । निखिल उरे ॥52॥
याप्रमाणे हे साहित्य ज्ञानात अर्पण करुन मग ते ज्ञान ब्रह्मांत लय पावते. नंतर निवळ जे ब्रह्म, तेच एकटे उरते.
53-8
तया नांव गा अधियज्ञु । ऐसे बोलिला जव सर्वज्ञु । तव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातले ते ॥53॥
त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे. असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले, त्या वेळेस महाबुद्धिमान अशा अर्जुनाला ते समजले.
54-8
हे जाणोनि म्हणितले देवे । पार्था परिसतु आहासि बरवे । याकृष्णाचिया बोलासवे । येरू सुखाचा जाहला ॥54॥
अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनीही जाणून ते म्हणाले, ‘ तू फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस. ‘ असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन संतोष पावला.
55-8
देखा बालकाचिया धणी धाइजे । का शिष्याचेनि जाहलेपणे होइजे । हे सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । का प्रसवतिया ॥55॥
पहा की, तान्ह्या मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे, किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे, हे एक आई किंवा सद्गुरूच जाणतात.


56-8
म्हणोनि सात्विका भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुनाआधी । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवे ॥56॥
म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णांच्या अंगी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनातसे झाले;
57-8
मग पिकलिया सुखाचा परिमळु । की निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला ॥57॥
परंतू देवांनी बुद्धि आवरली, व पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा थंडगार अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि रसाळ असे बोल ते बोलू लागले.
58-8
म्हणे परिसणेयांच्या राया । आइके बापा धनंजया । ऐसी जळो सरलिया माया । तेथ जाळिते तेही जळे ॥58॥
मग म्हणतात :- श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक. बाबारे, माया जळून गेली, म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते.

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥8. 5

59-8
जे आताचि सांगितले होते । अगा अधियज्ञ म्हणितला जयाते । जे आदीचि तया माते । जाणोनि अंती ॥59॥
अरे ! आत्तांच जे मी सांगीतले, ज्याला मी अधियज्ञ म्हटले, त्या मला जे अगोदर व प्राणान्तसमयीही जाणतात,
60-8
ते देह झोळ ऐसे मानुनी । ठेले आपणपे आपण होऊनी । जैसा मठ गगना भरूनी । गगनीचि असे ॥60॥
देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणीच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशाने भरुन आकाशांतच असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत.


61-8
ये प्रतीतीचिया माजघरी । तया निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥61॥
त्याप्रमाणे, अनुभवरूप माजघरात त्याची निश्चयरुप खोली असते, म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाहेरील वस्तुचे स्मरण नसते.
62-8
ऐसे सबाह्य ऐक्य संचले । मीचि होऊनि असता रचिले । बाहेरि भूतांची पांचही खवले । नेणताचि पडिली ॥62॥
अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे, तो बाहेरील पंचमहाभूतांची पांच कवचे (शरीर) पडून गेली तरी तो जाणत नाही.
63-8
आता उभया उभेपण नाही जयाचे । मा पडिलिया गहन कवण तयाचे । म्हणोनि प्रतीतीचिये पोटीचे । पाणी न हाले ॥63॥
जे शरीर जिवंत असतांही त्याची जो पर्वा बाळगीत नाही, ते पडल्यावर त्याचे दुःख कोणाला होणार ? म्हणून अनुभवाच्या पोटातले पाणी हालत नाही. (अंतकाली त्याचा ब्रह्माविषयींचा अनुभव ढळत नाही. )
64-8
ते ऐक्याची आहे वोतिली । की नित्यतेचिया हृदयी घातली । जैसी समरससमुद्री धुतली । रूळेचिना ॥64॥
तो अनुभव केवळ ऐक्याचा ओतून अविनाशीपणाच्या ह्रदयात घातलेला आणि तसाच पूर्णानंदसमुद्रात धुतलेला असतो म्हणून कामादि मळांनी तो मळत नाही.


65-8
पै अथावी घट बुडाला । तो आंतबाहेरी उदके भरला । पाठी दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ॥65॥
हे पहा की, अथांग पाण्यात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर पाणी असते; पण दैवगत्या जर तो मागाहून फुटला, तर उदकाचा नाश होतो का ?
66-8
ना तरी सर्पे कवच सांडिले । का उबारेने वस्त्र फेडिले । तरी सांग पा काय मोडले । अवेवामाजी ॥66॥
किंवा सर्पाने कात टाकली, अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले, तर अवयवांत काही बिघाड होतो का सांग बरे
67-8
तैसा आकार हा आहाच भ्रंशे । वाचूनि वस्तु ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आता ॥67॥
त्याचप्रमाणे, शरीर हे वरचेवर नाश पावले, तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेच आहे. त्याचप्रमाणे. त्या ठिकाणी बुद्धि जर निपूण झाली, तर भय कशाचे आहे ?
68-8
म्हणोनि यापरी माते । अंतकाळी जाणत सांते । जे मोकलिती देहाते । ते मीचि होती ॥68॥
म्हणून अशा रितीने अंतकाली माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात.
69-8
एऱ्हवी तरी साधारण । उरी आदळलिया मरण । जो आठव धरी अंतःकरण । तेचि होइजे ॥69॥
येऱ्हवी साधारण नियम असा आहे की, मरण प्राप्त असता अंतःकरणात ज्याचे स्मरण असते त्याप्रत तो पावतो.
70-8
जैसा कवण एक काकुळती । पळता पवनगती । दुपाउली अवचिती । कुहामाजी पडियेला ॥70॥
ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असता मार्गात अवचित विहीरीत पडतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


71-8
आता तया पडणयाआरौते । पडण चुकवावया परौते । नाही म्हणोनि तेथे । पडावेचि पडे ॥71॥
त्या स्थितीत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून, पडणे चुकविता येत नाही; म्हणून विहीरीत पडणे भाग पडते,
72-8
तेवि मृत्यूचेनि अवसरे एके । जे येऊनि जीवासमोर ठाके । ते होणे मग न चुके । भलतयापरी ॥72॥
त्याचप्रमाणे, मृत्युसमयी जीवासमोर जी वस्तु उभी राहते, तद्रूपच (मरणानंतर) त्यास व्हावे लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही
73-8
आणि जागता जव असिजे । तव जेणे ध्याने भावना भाविजे । डोळा लागतखेवो देखिजे । तेचि स्वप्नी ॥73॥
आणि मनुष्य जागा असता त्याच्या मनात ज्या कल्पना येतात, त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नात दिसू लागतात.

यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥8. 6॥

74-8
तेवि जितेनि अवसरे । जे आवडोनि जीवी उरे । तेचि मरणाचिये मेरे । फार हो लागे ॥74॥
त्याचप्रमाणे, जिवंत असतांना जी जी गोष्ट आवडीने अंतःकरणात उतरते, त्याविषयीचीच आवड अंतकालचे समयी वृद्धिंगत होते;
75-8
आणि मरणी जया जे आठवे । तो तेचि गतीते पावे । म्हणोनि सदा स्मरावे । मातेचि तुवा ॥75॥
आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टीची आठवण असते, त्याच्याच गतीला तो (मरणानंतर) पावतो. म्हणून तू नेहमी मलाच स्मरत जा.

तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥8. 7॥

दिवस ८४ वा, २५, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९९७ ते १००८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ९९७
देवासाठी जाणा तयासीच आटी । असेल ज्या गाठी पुण्यराशी ॥१॥
निर्बळा पाठवी बळे वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥धृपद॥
कथे निद्राभंग करावा भोजनी । तया सुखा धणी पार नाही ॥२॥
यागी ऋण घ्यावे द्यावे सुख लाही । बुडता चिंता नाही उभयता ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणोनि करावे । एक न घालावे एकावरी ॥४॥
अर्थ

ज्याच्या जवळ पुण्याची राशी असेल तोच हरी कर्मासाठी खटपट करतो. एखाद्या गरिबाला जर कोणी मदत करून वाराणसी काशीस पाठविले तर त्या यात्रेकारुचे पाठविनार्‍यास अर्धे पुण्य मिळते मग तो यात्रेकारुचे तेथे मेला तरी त्याचे पुण्या पाठविनार्‍यास अर्ध्ये पुण्य मिळते. कथेवेळी जर झोपानार्‍याची झोप मोडली तरी त्याचे पाप लागत नाही पण सुख अपर लागते. यज्ञासाठी जर कर्ज जर घेतले आणि ते बुडाले तर दुख मानून नये कारण त्या दोघानाही दोष लागेलच असे नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी जे हे तुम्हाला दोष सांगितले आहे पाप पुण्याचे त्या प्रेमाने वागावे पापाचा नियम पुण्यावर व पुण्याचा नियम पापावर लादु नये.
अभंग क्र. ९९८
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पावे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥
बाह्यरंगाचे कारण । मिथ्या अवघेचि भाषण । गर्व ताठा हे अज्ञान । मरण सवे वाहातसे ॥धृपद॥
पुरे मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधी भंगेना ॥२॥
हस्ती परदळ जो भंगी । तया पायी न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयाच्या ॥३॥
पिटिता घणे वरी सैरा । तया पोटी राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥
लीन दीन हेचि सार । भव उतरावया पार । बुडे माथा भार । तुका म्हणे वाहोनि ॥५॥
अर्थ

अग्नीत जर सोने किंवा धातू पडले तर ते त्यात लीन होतात. म्हणून ते अंती तसेच राहुण शुध्द होतात पण त्याच ठिकाणी वस्त्र किंवा धागा अग्नीत पडला तर त्यांचा नाश होतो. त्या प्रमाणे बाह्य रंग हि खोटी असतात मिथ्या असतात गर्व व अज्ञान हे मिथ्या असते पण जीव गेला तरी अज्ञान त्याच्या बरोबर असते. पूर जर आला तर लव्हाळे नम्र होऊन तसेच राहतात पण वृक्ष उन्मळून पडतात. आहो हत्ती शत्रूंना मारतो पण त्याच्या पाया खाली एक छोटी मुंगीही मरत नाही म्हणून हत्तीच्या मागोमाग त्याच्याशी लढण्यासाठी कोण जाणार ? हिरा घणा खाली फुटत नाही तो त्याच्या पोटात घुसतो मग गाराही तश्याच असतात पण त्या घानाच्या खाली टिकतात काय ? तुकाराम महाराज म्हणतात लीन दिन होऊन राहावे तरच आपण भवसागर तरू शकतो पण जो ऐटीत राहतो तो या भवसागारातच वाहतो.
अभंग क्र. ९९९
आम्ही वीर झुंझार । करू जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषाचा ॥१॥
जाला हाहाकार । आले हाकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठी हार तुळसीचे ॥धृपद॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरुडटके पताका ॥२॥
तुका म्हणे काळ । जालो जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हा आमुचा ॥३॥
अर्थ

आम्ही या हरीचे वीर शूर योद्धे आहोत या यमावर आम्ही वार करून त्याचे दात पाडू अनेक दोषावर आम्ही हल्ला करून त्यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे हाहाकार झाला आहे व सर्व योद्धे एका ठिकाणी आले आहेत त्यांनी गळ्यात तुळशीचे हार आणि शख चक्र आदी मुद्रा धारण केले आहेत. त्या झुंजार शूर विराणी हातात राम नामांकित बाण धरला आहे कपाळाला गोपी चंदन लावला आहे व गरुड चिन्ह असलेले पताका त्यांच्या हातात झळकत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे आम्ही काळाला जिंकून आम्ही निश्चिंत झालो आहोत व आम्हाला आमचे संपूर्ण ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे.
अभंग क्र. १०००
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहे ते अधीन आपुले हाती । आणिका ठेविती काय बोला ॥धृपद॥
जाणतिया पाठी लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥
तुका म्हणे भय बांधले गाठी । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥
अर्थ

जो आशेने बांधलेला आहे तो जगाचाचा दास आहे व जो उदास असतो तो सर्व लोकांना पूज्य असतो. आहो या गोष्टी आपल्या हातील आहेत दुसऱ्यांनादोष देण्यात काय अर्थ ? ज्याच्या मध्ये ज्ञानी पणाचा अहंकार असतो त्याच्या मागे उपाधी लागतात आणि जो नेणता असतो त्याला केंव्हाही जेवायला बस म्हंटले तो केंव्हाही भोजनास तयार असतो. तुकाराम महाराज म्हणतात जो आशाने बद्ध व अहंकाराने मोठा असतो त्याच्या मागे काम क्रोध आदी चोर लागलेले असतात म्हणून त्याच्या पदरी मोठे भय असते.
सार्थ तुकाराम गाथा ९०१ ते १००० समाप्त
सार्थ तुकाराम गाथा १००१ ते ११००
सार्थ तुकाराम गाथा 1001 ते 1100
अभंग – १००१
आणिकासी तारी ऐसा नाही कोणी । धड ते नासोनि भलता टाकी ॥१॥
सोने शुद्ध होते अविट ते घरी । नासिले सोनारी अळंकारी ॥धृपद॥
ओल शुद्ध काळी काळे जिरे बीज । कैचे लागे निज हाता तेथे ॥२॥
एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसी क्षीर घुगरिया ॥३॥
तुका म्हणे विषा रुचि एका हाती । पाधानी नासिती नवनीत ॥४॥
अर्थ

या जगामध्ये अनेकांना तारणारा असा कोण आहे तर कोणीही नाही या उलट एखादा ढोंगी मनुष्य चांगल्या मनुष्याला वाईट मार्गाला नेतो. आपल्याजवळ शुद्ध सोनेच असते पण आपण ते सोनाराकडे घेउन जातो व तो सोनार त्या सोन्याला डाग देऊन त्याचा अलंकार तयार करतो त्यामुळे सोन्याचा कस कमी होतो. जमिन पेरणी युक्त झाली चांगली झाली आणि त्यामध्ये एखाद्या मुर्खाने काळे जिरे पेरले तर त्याला जे पिक अपेक्षित आहे ते पिक त्याला कसे मिळेल. एखादी सुगरण स्त्री असेल तर तिला गव्हाचे अनेक प्रकार करता येतात गव्हाचा सांजा दिवसे गव्हाची खीर तयार करता येते. तुकाराम महाराज म्हणतात चांगल्या स्त्रीला विशापासुनही गोडी कशी तयार करवी हे समजते परंतु एखाद्या मूर्ख स्त्रीला नवनीता पासूनही चांगला पदार्थ तयार करता येत नाही याउलट ती त्याचा नास करते.
अभंग – १००२
वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य । न करिती विचार का हिताचा ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटी । येईल शेवटी कोण कामा ॥धृपद॥
काय मानुनिया राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूता ॥२॥
का ही विसरली मरण बापुडी । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥
काय हाती नाही करील तयासी । काय जाले यांसी काय जाणो ॥४॥
का ही नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनिया ॥५॥
काय मोल यासी लागे धन वित्त । का हे यांचे चित्त घेत नाही ॥६॥
तुका म्हणे का ही भोगितील खाणी । का त्या चक्रपाणी विसरती ॥७॥
अर्थ

मला या लोकांचे फार आश्चर्य वाटते कारण हे लोक स्वतःच्या हिताचा विचार का बरे करत नाही ? त्यांच्या अंतःकरणामध्ये असा कोणता विश्वास आहे ? हे लोक नेमके कोणाच्या आधारावर ऐवढे निश्चिन्त राहिले आहेत शेवटी हे लोक आपल्या पापाचा जाब यामदुता पुढे कसा देणार ? हे लोक आपन मरनार आहोत हे विसरले की काय आणि यांना या भाव सागरामध्ये अशी कोणती गोडी लागली ? आहो यांच्या हातामध्ये नेमके काय नाही काय म्हंटले तर हे लोक करणार नाही परन्तु यांना काय झाले आहे हे हे काही कळत नाही. ह्या संसारबंधनातून सोडण्याकरता हे लोक देवकीनंदन श्रीकृष्णाचे चिंतन का करत नाहीत त्याला का आठवत नाहीत. हरिचिंतन करण्याकरता कोणत्याही प्रकारचे मोल लागत नाही हे या लोकांच्या चित्तात का बरे येत नाही हे चित्ता हे लोक का बरे घेत नाहीत ? तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही या कृष्णाचे चिंतन केले नाही तर पुढे नरकयातना भोगाव्या लागतील हे मात्र निश्चिंत मग हे लोक त्याचक्र्पानी कृष्णाला श्रीकृष्णाला विसरले आहेत कि काय ?
अभंग – १००३
काय एका जाले ते का नाही ठावे । काय हे सांगावे काय म्हुण ॥१॥
देखतील डोळा ऐकती कानी । बोलिले पुराणी ते ही ठावे ॥धृपद॥
काय हे शरीर साच की जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
का हे कळो नये आपुले आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
का हे आवडले प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आले ॥४॥
का हे जन्म वाया घातले उत्तम । का हे रामराम न म्हणती ॥५॥
काय भुली यांसी पडली जाणता । देखती मरता आणिकासी ॥६॥
काय करिती हे बांधलिया काळे । तुका म्हणे बळे वज्रपाशी ॥७॥
अर्थ

या संसाराची संगती करून एकेकाची काय दुर्दशा झाली आहे हे लोकांना ठाऊक नाही काय ? या लोकांना काय काय म्हणून समजून सांगावे ? या संसाराची दुर्दशा हे डोळ्यांनी पाहतात कानाने ऐकतात आणि पुराणात काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत आहे. हे शरीर खरे आहे की जाणार आहे हेही सगळ्यांना माहीत आहे. आपले स्वहित कशात आहे हे सगळ्यांना का बरे करू नये आणि बालक व तारुण्य वृद्धावस्था यामध्ये किती दोष आहेत हेही सर्वाना माहीत आहे. आप्तइष्ट हे यांना इतके का आवडले आहेत अखेरीस कोणी कोणाच्या कामाला आले आहे काय ? हा उत्तम असा जन्म या लोकांनी का बरे वाया घातला आहे का बरे हे लोक राम राम म्हणत नाहीत ? कित्येक लोकं मरताना हे पाहत असतात तरीही या लोकांना या संसाराच्या शाश्वत पानाचा भ्रम पडलेला का आहे ? तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपल्या बलाने या लोकांना वज्रपशाशी बांधले तर हे लोक काय करतील. त्यामुळे नेहमी हरिभजन करावे असे महाराज सांगतात व हरिभजन केल्यानेच आपण तरू शकतो.
अभंग – १००४
झुंजार ते एक विष्णुदास जगी । पापपुण्य अंगी नातळे त्या ॥१॥
गोविंद आसनी गोविंद शयनी । गोविंद त्या मनी बैसलासे ॥धृपद॥
ऊर्ध्वपुंड्र भाळी कंठी शोभे माळी । कापिजे कळिकाळ तया भेणे ॥२॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥
अर्थ

या जगामध्ये एक विष्णुदास असे एक योद्धे आहेत की ते या भवसिंधु रूप शत्रूशी युद्ध करू शकतात. त्यांना पाप-पुण्याची बाधा कधीही होत नाही. ते गोविंदाचे सारखे चिंतन करत असतात नेहमी करत असतात बसताना झोपल्यावर ते सारखे गोविंदाचे चिंतन करतात त्यामुळेच त्यांचे मनही गोविंद मय झालेले आहे. त्याच्या कपाळी ऊर्ध्वपुंड्र व कंठामध्ये तुळशीचे माळ असते त्यामुळे त्यांच्या कडे काळ देखील पाहण्यास थरथर कापतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्या विष्णुदासांच्या अंगावर शंख चक्र इत्यादी मुद्रांचे शृंगार आहेत आणि ज्या लोकांमध्ये सतत नामामृत आहे ते वैष्णव केव्हाही कधीही कळीकाळाला भीत नाहीत.
अभंग – १००५
जेणे नाही केले आपुले स्वहित । पुढिलाचा घात इच्छीतसे ॥१॥
संचितासी जाय मिळोनिया खोडी । पतनाचे जोडीवरी हाव ॥धृपद॥
बांधले गाठी ते लागले भोगावे । ऐसियासी देवे काय कीजे ॥२॥
तुका म्हणे जया गावा जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥३॥
अर्थ

जो आपल्या स्वहिताचा विचार करत नाही आणि पुढच्या व्यक्तीचा घात करण्याचा विचार करतो. अशा माणसाला वाईट प्रवृत्ती ती करण्याकरता त्याचे पूर्वकर्म असते व त्या माणसाला अशा साधनांची सवय लागते की ज्या कारणामुळे त्याचे अधपतन होणार असते. जसे ज्याचे संचित असते ते त्याला भोगावेच लागते त्याला ते संचित हरिनामाच्या साह्याने जाळावे एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ज्या गावाला जायचे असेल त्याने त्या गावाची वाट विचारूनच चालावे तसेच ज्याला आपले हित कशात आहे हे समजून घ्यायचे असेल आपले हित कोणत्या मार्गाला आहे हे माहीत करून घ्यायचे आहे त्याने संतांना विचारूनच चालावे.
अभंग – १००६
मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणी आकार । कीर्त मुखे वर्णिता ॥१॥
म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥धृपद॥
अंबॠषीकारणे । जन्म घेतले नारायणे । एवढे भक्तीचे लहणे । दास्य करी हा दासाचे ॥२॥
म्हणिये करिता शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारी । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥
अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवढे भक्तीचे उपकारु । मागे मागे हिंडतसे ॥४॥
पुंडलिकाचे द्वारी । सम पाउली विटेवरी । न वजे कट करी । धरूनि तेथे राहिला ॥५॥
भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥
अर्थ

हा देव आपल्या भक्तांचा उपकार निरंतर मानत असतो आणि तो त्याभक्तांचा निरंतर ऋणी आहे असेही म्हणतो. कारण भक्ताने हा निर्गुणनिराकार आहे त्याला आपल्या मुखाने त्याची कीर्ति वर्णन करून सगुण साकार केले आहे. म्हणूनच त्याच्या भक्तांना जी काही मना मध्ये इच्छा आहे ती सर्व इच्छा आहे हा पंढरीराणा पूर्ण करतो. व भक्तांचे हे ऋण फेडण्याचा करता तो भक्तांचा पोसना दास झालेला असतो. अंबऋषीला वाचवण्याकरता त्याला मिळालेल्या शापामुळे या नारायणाने त्याचा शाप स्वतःवर घेऊन अनेक जन्म घेतले आहे. भक्तांनी केलेल्या सेवेमुळे तो त्यांच्या दासांचाही आणि दास होतो. भक्ताने कोणतेही काम सांगितले तरीही तो त्याची लाज बाळगत नाही म्हणूनच तर तो पाताळामध्ये बळीचा द्वारपाल म्हणून उभा आहे. तो त्याच्या भक्तांच्या भक्तीचा आभारी आहे त्यामुळे भक्तांचे घर सोडून कुठेही एक दुसरीकडे कडेला तो जात नाही. सर्वेश्वर अर्जुनाचा रथांच्या घोड्यांची काळजी घेतो कारण अर्जुनाने भक्ती केली आहे त्यामुळे या रथाचे घोडे वागवितो त्यांना लागणारा चारा खरारा सर्वकाही हा सर्वेश्वर करतो. भक्तांच्या भक्तीचे हाइतके उपकार मानतो की तो सतत त्या भक्तांच्या मागे मागे फिरतो. भक्तांची तो तेवढी काळजी घेतो अर्जुनाने त्याची भक्ती केली म्हणूनच तर तो त्याच्या मागे मागे फिरतो त्याच्या घोड्यांचा चारा खरारा वगैरे इत्यादी करतो. हा हरी पुंडलिकाच्या दारामध्ये त्याने फेकलेल्या विटेवर त्याचे समचरण घेऊन उभा आहे. हा हरी कमरेवर त्याचे दोन्ही कर ठेवून वीटेवर उभा आहे तेथून तो कोठेही जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा देव भक्तीचा अंकित आहेम्हणूनच तर त्याला दीनानाथ हे नांव शोभते. म्हणूनच तर मी त्याचे दोन्ही चरण धरून निवांत राहिलो आहे.
अभंग – १००७
सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥
त्यांचा आम्हासी काटाळा । पाहो नावडती डोळा ॥धृपद॥
रिद्धीसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥२॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षये अधोगती ॥३॥
अर्थ

काही ज्योतिषीलोक भूत-भविष्य-वर्तमान या कालातील शुभशकुन सांगतात. परंतु आम्हाला त्या लोकाचा कंटाळा आहे व त्यांना डोळ्यांनी पाहणे हेही आम्हाला आवडत नाही. काही लोक तर रिद्धी सिद्धीचे साधक आहेत ते वाचणे जे बोलतात ते खरे होते. तुकाराम महाराज म्हणतात असे हे रिद्धी सिद्धी जाणणारे लोक ज्योतिष जाणणारे लोक यांच्या पुण्याचा क्षय झाला की ते अधोगतीला जातात.
अभंग – १००८
ठाकलोसे द्वारी । उभा याचक भीकारी ॥१॥
मज भीक काही देवा । प्रेमभातुके पाठवा ॥धृपद॥
याचकाचा भार । घेऊ नये येरझार ॥२॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वाचून ॥३॥

अर्थ नाही टाका तपासा

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading