२ मार्च, दिवस ६१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ७२१ ते ७३२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 2 मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७२१ ते ७३२ चे पारायण आपण करणार आहोत.


2 मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी 176 ते 200,

176-6
बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउते नाही ॥176॥
ते स्थान बहुत करून निःशब्द असावे, तेथे हिंस्त्र पशुंचा प्रवेश नसावा, आवाज करणारे पोपट व इकडे तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत.
177-6
पाणिलगे हंसे । दोनी चारी सारसे । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥177॥
ज्या ठिकाणी जलाशयाजवळ राहणारे हंस, दोन चार चक्रवाक पक्षी आणि एखादे वेळेस एखादा कोकीळ येऊन बसलेला चालेल.
178-6
निरंतर नाही । तरी आली गेली काही । होतु का मयुरेही । आम्ही ना न म्हणो ॥178॥
नेहमी नाही; परंतु अधून-मधून काही दिवस मोर आले गेले तरी चालतील. आमची त्याला ना नाही.
179-6
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । का शिवालय ॥179॥
परंतु हे अर्जुना ! ! असले स्थान अवश्यही शोधून ठेवावे, की त्या ठिकाणी एखादा गुप्त मठ अथवा शिवालय असावे.
180-6
दोहीमाजी आवडे ते । जे मानले होय चित्ते । बहुतकरुनि एकांते । बैसिजे गा ॥180॥
या दोन्हीपैकी जे आवडेल आणि चित्ताला सुयोग्य वाटेल, असे असावे. विशेष करून त्या ठिकाणी एकांतात बसून साधना करता यावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

181-6
म्हणोनि तैसे ते जाणावे । मन राहाते पाहावे । राहेल तेथ रचावे । आसन ऐसे ॥181॥
म्हणून तसे स्थान पवित्र आहे की नाही, हे पाहावे. तेथे मन एकाग्र होते की नाही, हे पाहावे. मन एकाग्र व शांत होत असेल, तर तेथे असे आसन लावावे.
182-6
वरि चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी । तळवटी अमोडी । कुशांकुर ॥182॥
तळात साग्र कोवळे दर्भ घालावे व त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धूतवस्त्राची घडी घालावी
183-6
सकोमळ सरिसे । सुबध्द राहती आपैसे । एके पाडे तैसे । वोजा घाली ॥183॥
ते दर्भ कोवळे, सारखे आणि सहजपणे ऐके ठिकाणी राहील, अशा उत्तम प्रकारे असावे.
184-6
परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥184॥
ते आसन जमिनीपासून फार उंच झाले, तर शरीर हलु लागेल. तसेच ते आसन जर फारच खाली झाले, तर जमिनीतील दगड, माती, कीटक यांच्या संसर्गाने साधनेमध्ये दोष निर्माण होतील.
185-6
म्हणौनि तैसे न करावे । समभावे धरावे । हे बहु असो होआवे । आसन ऐसे ॥185॥
म्हणून आसन उंच अथवा सखल करू नये. सम प्रमाणाचे आसन तयार करावे. आता हे वर्णन पुरे. सारांश, योग्य प्रकारे आसन करावे.

तत्रैकाग्नं मनः कृत्वा यतचित्तेद्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद योगमात्मविशुध्दये ॥6. 12॥
भावार्थ :-

त्या आसनावर बसून मनाला एकाग्र करावे, चित्ताच्या आणि इंद्रयाच्या क्रियांशी वश करावे आणि अंतःकरण्याच्या शुद्धीसाठी योगाची साधना सुरु करावी.

186-6
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करुनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥186॥
त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि सद्गुरूंचे विनम्रभावे स्मरण करून आत्मनंदाच्या अनुभव घ्यावयास सुरुवात करावी.
187-6
तैसे स्मरतेनि आदरे । सबाह्य सात्विके भरे । जव काठिणपण विरे । अहंभावाचे ॥187॥
सद्गुरूंचे अत्यंत आदराने स्मरण करू लागलो, की अंतर्बाह्य अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि अहंकार विरळ होत जातो.
188-6
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजी ॥188॥
विषयांचा विसर पडतो, बाह्य गोष्टीत रममाण होणाऱ्या इंदर्यांची धाव कमी होते. अंतःकरणात मन हळूहळू विलीन होऊ लागते.
189-6
ऐसे ऐक्य हे सहजे । फावे तव राहिजे । मग तेणेचि बोधे बैसिजे । आसनावरी ॥189॥
अंतःकरण व मनाचे ऐक्य होईपर्यंत स्थिर रहावे. मग ऐक्य झालेल्या जाणिवेने आसनावरती बसलेले असावे.
190-6
आता आंगाते आंग करी । पवनाते पवनु धरी । ऐसी अनुभवाची उजरी । होचि लागे ॥190॥
अशा जाणिवेच्या आसनावर बसल्यानंतर अंगच अंगाला सावरते, प्राणवायू प्राणवायूला धारण करतो आणि अनुभवाचा उदय होऊ लागतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

191-6
प्रवृत्ती माघौति मोहरे । समाधि ऐलाडि उतरे । आघवे अभ्यासु सरे । बैसतखेवो ॥191॥
त्या ठिकाणी कर्म करण्याची प्रवृत्ती मागे फिरून समाधी कडे येते. आसनावर बसल्यानंतर जणू काही सर्व अभ्यास संपून जातो.
192-6
मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आता परियेसी । तरी उरु या जघनासी । जडोनि घाली ॥192॥
आसनमुद्रेचे महत्व अशा प्रकारचे आहे. तेच आता सांगत आहे, तरी त्याचे श्रवण कर. पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे.
193-6
चरणतळे देव्हडी । आधारद्रुमाचा बुडी । सुघटिते गाढी । संचरी पा ॥193॥
दोन्ही पायांच्या टाचा वर कराव्यात आणि आधारचक्ररुपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानाचे शिवणीपाशी दोन्ही टाचा घट्ट व स्थिर कराव्यात.
194-6
सव्य तो तळी ठेविजे । तेणे सिवणीमध्यु पीडिजे । वरी बैसे तो सहजे । वामचरणु ॥194॥
उजव्या पायाची टाच खाली घालावी व टाचेने शिवणीचा मध्यभाग दाबावा, म्हणजे उजव्या पायांवर स्वाभाविकच डावा पाय बसतो.
195-6
गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळे निगुती । तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनिया ॥195॥
गुद आणि शिश्न यामधील बरोबर जी चार बोटे जागा आहे त्यापैकी दीड बोटे खाली जागा सोडून.

196-6
माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तराभागे । नेहेटिजे वरि आंगे । पेललेनि ॥196॥
मध्ये जी एकबोट जागा जागा राहते, तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग तोलून घट्ट दाबावे.
197-6
उचलिले का नेणिजे । तैसे पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेचि माने ॥197॥
शरीर उचललेले न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धारावेत.
198-6
मग शरीर संचु पार्था । अशेषुही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥198॥
अर्जुना ! मग हे शरीर घोटाच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते.
199-6
अर्जुना हे जाण । मूळबंधाचे लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥199॥
अर्जुना ! हे मूलबंधाचे लक्षण जाणून घे. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे.
200-6
ऐसी आधारी मुद्रा पडे । आणि आधीचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतलीकडे । वोहोटो लागे ॥200॥
अशा प्रकारे आधारचक्रावर (मुळंबन्ध बरोबर लागला) वज्रसनाची मुद्रा पडते आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आतल्या आत वर सरकू लागतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥6. 13॥
भावार्थ :-

शरीराचा मधला भाग, मस्तक, मान तमाम सरळ रेषेत ठेऊन स्थिर व्हावे आणि आपल्या नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी ठेऊन अन्य दिशाकडे न पाहता योगाभ्यास करावा.

दिवस ६१ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७२१ ते ७३२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ७२१
रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरी । परि नाही भाकरी भक्षावया ॥१॥
लोडे बालिस्ते पलंग सुपत्ति । परि नाही लंगोटी नेसावया ॥धृपद॥
पुसाल तरि आम्हा वैकुंठीचा वास । परि नाही राह्यास ठाव कोठे ॥२॥
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाही कोणाचे उणे पुरे ॥३॥
अर्थ
आमच्या घरी समोर रिद्धी सिद्धी दासी आहेत, काय पाहिजे ते द्यायला कामधेनु आहे, पण आमच्या मनात कसलीही अपेक्षा आसक्ती नसल्यामुळे आम्हाला धड भाकरी देखील खायला मिळत नाही. आमच्या कडे लोड, तक्के, गाड्या, पलंग व सर्व सुखसोई आहेत, पण आम्ही इच्छा रहितआहोत त्यामुळे नेसायला वस्त्र देखील नाही. आम्हाला विचारले की, आम्ही कोठे आहोत तर आमचा निवास वैकुंठात आहे परंतु, आम्हाला राहावयास कोठेही जागा नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जगाचे या त्रैलोक्याचे राजे आहोत पण आम्हाला कोणाचेही उणे दुने नाही.
अभंग क्र. ७२२
घरोघरी अवघे जाले ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥
निरे कोणापाशी होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥धृपद॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आत काळकूट ॥३॥
निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारियला ॥४॥
तुका म्हणे तेथे काही हाता नये । आयुष्य मोले जाये वायाविण ॥५॥
अर्थ

घरोघरी सगळे ब्रम्हज्ञानी झालेले आहेत, परंतु त्यांच्यात दोषच दोष असतात. जर खरेच कोणाकडे ब्रम्हज्ञान असेल तर मला दुर्बळाला त्या मधील कण भर तरी द्या हो. अहो लोकांच्या मनामध्ये आशा, तृष्णा, माया यांचे मिश्रण झालेले असून त्याच्यातला दंभ लांबूनच दिसतो आहे. त्यांच्या आता मध्ये काम, क्रोध व लोभ हा भरलेला असून हे काळाकुट विष फारच त्रास दायक आहे. अहंकार, परनिंदा व द्वेष या काजळाने त्यांचे जीवन धुरकटलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारच्या ज्ञानाने हाती काहीच लागणार नाहीच परंतु, उलट अमोल असे मानवी जीवन हे वयाला जाते.
अभंग क्र. ७२३
अवघ्या भूताचे केले संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥१॥
अवघाचि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥धृपद॥
अवघीच तीर्थे व्रते केले याग । अवघेचि सांग जाले कर्म ॥२॥
अवघेचि फळ आले आम्हा हाता । अवघेचि अनंता समर्पीले ॥३॥
तुका म्हणे आता बोलो अबोलणे । काया वाचा मने उरलो नाही ॥४॥
अर्थ

आम्ही सर्व भूत मात्रांना अन्नाचे दान दिले आहे सर्व पृथ्वी आम्ही दान दिली आहे. सगळे दिवस व रात्र शुध्द स्वरूपाचे केला, त्याला पर्वकाळाचे स्वरूप दिले. आम्ही सर्व कर्म केले सर्व प्रकारची यथासांग कर्मे संपविले. या सर्व कर्माचे फळ आमच्या हातात आले पण आम्ही तेही फळ या हरीला समर्पण केले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही ब्रम्‍ह ज्ञानाविषयी बोललो तरी ते ब्रम्‍हज्ञान आहे बोलण्याचाही पलीकडचे आहे आता काय, वाचा, मानाने आम्ही उरलोच नाही.
अभंग क्र. ७२४
महुरा ऐसी फळे नाही । आली काही गळती ॥१॥
पक्वदशे येती थोडी । नास आढी वेचे तो ॥धृपद॥
विरळा पावे विरळा पावे । अवघड गोवे सेवटीचे ॥२॥
उंच निच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ॥३॥
झळके तेथे पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥४॥
पावेल तो पैल थडी । म्हणो गडी आपुला ॥५॥
तुका म्हणे उभाऱ्याने । खरे कोण मानितसे ॥६॥
अर्थ

जेवढा आंब्याच्या झाडला मोहोर येतो तेवढी फळे येत नाही आणि जेवढी फळे येतात त्यातलीही काही गळून जातात. आढी तयार केल्यानंतर त्यातली काही फळे नासतात व थोडीच फळे पक्के होतात पिकतात. त्याच प्रमाणे परमार्थाच्या मार्गावरून चालणारे फार आहेत पण त्यातील काही च लोक हरीशी एकरूप होतात. अनेक प्रकारचे उच्च नीच लोक हे देवाच्या परिवारात आहे परंतु ज्या प्रमाणे धन्याला चाकराची माहिती असते त्या प्रमाणे ह्या धन्याला (देवाला) या चाकराची (आपली) माहिती असते कोण कशी सेवा करतो या कडे त्याचे पूर्ण लक्ष असते. जो खऱ्या भावार्थाने सेवा करतो त्यालाच यांची प्राप्ती होते त्याची कृपा होते. असे थोडेच लोक असतात कि त्यांना देवाची प्राप्ती होते. अश्या या शुध्द भक्तीने जो भवसागरातून पार होतो तोच आमचा खरा मित्र होय. तुकाराम महाराज म्हणतात नाही तर फक्त भक्तीचा डामडौल करणाऱ्याला त्याच्या भक्तीला कोण मानेल ?
अभंग क्र. ७२५
अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा ॥१॥
घ्यावी घ्यावी माझी सेवा । दिन दुर्बळाची देवा ॥धृपद॥
अवघियाचा ठाव । पायावरी जीवभाव ॥२॥
चित्ताचे आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥
अर्थ

परमार्थात हरी प्राप्ती करून घेण्यासाठी सर्व श्रेष्ठ साधन म्हणजे मन होय हे दातार मी तुला माझे हे मन अर्पण केले आहे. माझी सेवा दिन दुर्बळाची आहे ती तू गोड मानून घे. तुला सर्व काही माहित आहे तू सर्व जाणता आहे, हे हरी मी तुझ्या पायावर माझा जीवभाव अर्पण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्ताचे आसन करून मी तुझे गुणगान गात आहे तुझे कीर्तन करतो आहे.
अभंग क्र. ७२६
आळी सलगी पायांपाशी । होईल तैसी करीन ॥१॥
आणीक आह्मी कोठे जावे । येथे जीवे वेचलो ॥धृपद॥
अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव उरलासे ॥२॥
तुका म्हणे पाळी लळे । कृपाळुवे विठ्ठले ॥३॥
अर्थ

हरी तुझ्या चरणांपाशी आम्ही आवडेल तसे हट्ट आम्ही पूर्ण करून घेऊ. तुला सोडून आम्ही दुसरे कोठे बरे जावे ? तुझ्या चरणांमध्ये आमचा जीव गुंतला आहे. आमचा भाव निरुपण करण्यास तुझेच एक स्थान उरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू कृपाळू आहेस तूच आमचे लाड पूर्ण करावेत.
अभंग क्र. ७२७
देह आणि देहसंबंधे निंदावी । इतरे वंदावी श्वानशूकरे ॥१॥
येणे नावे जाला मी माझ्याचा झाडा । मोह नावे खोडा गर्भवास ॥धृपद॥
गृह आणि वित्त स्वदेहा विटावे । इतरा भेटावे श्वापदाझाडा ॥२॥
तुका म्हणे मी हे माझे न यो वाचे । येणे नावे साचे साधुजन ॥३॥
अर्थ

देह आणि देह संबंधीचे जे कोणी आहेत त्या सर्वाची निंदा करावी व सर्व प्राणी मात्रांना वंदन करावे. यामुळे “मी व माझे” या भ्रमाचा नाश नक्की होईलच. देह मी आहे असे जो समजतो तो, गर्भवासाच्या चक्रात गुंतून पडतो. घर, धन, जागा, स्वतःला विसरावे व इतर प्राणीमात्र व निसर्गाशी संबंध जोडावा. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या कुणाच्या मुखातून “मी आणि माझे” असे शब्द येत नाही त्याचेच नांव साधू आहे असे मानावे.
अभंग क्र. ७२८
देवाचिये माथा घालुनिया भार । सांडी कलेवर ओवाळूनि ॥१॥
नाथिला हा छंद अभिमान अंगी । निमित्याचे वेगी सारी ओझे ॥धृपद॥
करुणावचनी लाहो एकसरे । नेदावे दुसरे आड येऊ ॥२॥
तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥
अर्थ

देवाच्या माथ्यावर सर्व भार घालून त्यावरून आपला जीव ओवाळून टाकावा. देहाभिमानाचा छंद नाद हा खोटा आहे, तो तू दूर कर. एकसारखे तू हरी नामाचा टाहो कर दुसरे काही आडे येऊ देवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू या लटिक्या (खोट्या) चा संग टाकून दे मग आंनद कसा प्रकट होतो ते बघ.
अभंग क्र. ७२९
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतने ॥धृपद॥
पाळणाची नाही चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥
तुका म्हणे जीवासाठी । देव पोटी पडेल ॥३॥
अर्थ

जेव्हा मी ब्रम्ह आहे हे समजते तेंव्हा जीव विठ्ठल रूप होतो. म्हणून त्वरा करून त्याच्याच चिंतनात वेळ घालवावा. देव सर्व ठिकाणी आहे म्हणून आपल्या पाळनाची म्हणजे पालनाची चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण जर देवाला आपला जीवच अर्पण केला तर तो परमात्माच आपल्या हृदयात प्रकट होईल.
अभंग क्र. ७३०
पृथक मी सांगो किती । धर्म नीती सकळा ॥१॥
अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठली ॥धृपद॥
क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥
तुका म्हणे आगमींचे । मथिले साचे नवनीत ॥३॥
अर्थ

मी सर्वाना धर्म आणि नीती बद्दल किती वेळा सांगू ? विठ्ठलाच्या ठिकाणी सर्वानी शुध्द भाव ठेवणे हेच धर्म आणि नीती आहे. क्षर आणि अक्षराचा भाग एक विठ्ठल आहे व तोच पंढरपूरलाच आहे, सर्वानी तेथे जावे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व मंथन केलेले वेदाचे सारभूत लोणी म्हणजे एक विठ्ठलच आहे.
अभंग क्र. ७३१
पुण्यविकरा ते मातेचे गमन । भाडी ऐसे धन विटाळ तो ॥१॥
आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावे ते नाभी करवी दंड ॥धृपद॥
नागवला अल्प लोभाचिये साठी । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥२॥
तुका म्हणे हात झाडिले परत्री । श्रम तोचि श्रोत्री ठेवी केली ॥३॥
अर्थ

हरी ची कथा गायत्री मंत्र इत्यादी पुण्यकर्म ची विक्री करणे म्हणजे प्रत्यक्ष मातेशी गमन केल्यासारखेच आहे आणि हे पुण्यकर्म करून मिळालेले धन म्हणजे भाड्याचे धन घेणे म्हणजे मातेचा विटाळच हातात घेण्यासारखे कर्म आहे. विषयांचा लोभ असणारा मनुष्य हा आत्महत्यारा आहे अशा मनुष्यास दंड करण्यास भिऊ नये त्याला निसंकोचपणे दंड करावा, त्याला (विषय लोभी) दंड करणाऱ्या व्यक्तीस तू “घेऊ नकोस खुशाल दंड कर” असे म्हणावे. विषय लोभी मनुष्य हरी कथेची विक्री करतात पुण्यकर्म ची विक्री करून ते परीस देऊन काचेचा तुकडा घेतल्यासारखे करतात आणि परमार्थातील मोठा लक्ष्मी द्रव्यरूप ठेवा घेण्यास ते मुकतात. तुकाराम महाराज म्हणतात या लोभीवेद संपन्न मनुष्यांनी यज्त्रयाग इत्यादी कर्म करून पुण्याचा साठा केलेला असतो त्यानिमित्ताने त्यांना स्वर्गप्राप्ती तर होते परंतु त्यांच्या पुण्याचा साठा संपला की ते पुन्हा आपले हात झाडून नागवे होतात म्हणजे शेवटी त्यांच्या हातात केवळ करत श्रमच उरतो.
अभंग क्र. ७३२
अंतरीचे ध्यान । मुख्य नांव या पूजन ॥१॥
उपाधि ते अवघे पाप । गोड निरसता संकल्प ॥धृपद॥
आज्ञा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । अविट हे सहज स्थिति ॥३॥
अर्थ

हरीचिंतन अंतःकरणामध्ये करणे यालाच मुख्य पूजन असे म्हणतात. इतर उपाधी हे पाप आहे त्यामुळे त्याचा संकल्प नष्ट करणे हेच बरोबर आहे. भगवंताची आज्ञा पालन करणे हाच धर्म आहे, हे तुम्ही सर्व जाणते मंडळीनी जाणून घ्या हो. तुकाराम महाराज म्हणतात सहज स्थितीत राहिल्या मुळे या स्थितीचा कधीच वीट येत नाही.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading