आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

७ मार्च, दिवस ६६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ७८१ ते ७९२
“७ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ७ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ७ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७८१ ते ७९२ चे पारायण आपण करणार आहोत.
७ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३०१ ते ३२५,
301-6
ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसे नाम होये । परि शक्तीपण ते आहे । जव न मिळे शिवी ॥301॥
त्या वेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला मरुत म्हणजे वायूमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच.
302-6
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडी । पैठी होय ॥302॥
मग ती शक्ती जालंधर बंधाचे उल्लंन्घन ककार जाच्या अंती आहे, अशा कृकाटिकेचे तालुस्थानाचा भेद करून मुर्धन्याकाशाच्या पहाडावर प्रवेश करते.
303-6
ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागा घाली ॥303॥
ती ओंकाराच्या पाठीवर त्वरित पाय देऊन पश्यन्ती वाणीची पायरी मागे टाकते.
304-6
पुढा तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचा अंतरी । भरती गमे सागरी । सरिता जेवी ॥304॥
पुढे ज्याप्रमाणे सागरात नद्या मिसळलेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रपर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मुर्धन्य – आकाशात मिळतात.
305-6
मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी । सोहंभावाच्या बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धावोनि । आंगा घडे ॥305॥
मग ती शक्ती ब्रम्हरंधराचे ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रम्ह मी आहे, या ज्ञानाच्या जणू बाह्या पसरून परब्रम्हरूपी लिंगाला अलिंगन देते, म्हणजे त्याच्याशी एकरूप होते.
306-6
तव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहीसि होय झटे । तेथ गगनासकट आटे । समरसी तिये ॥306॥
त्या वेळी पंचमहाभूताचा पडदा नाहीसा होतो आणि शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ऐक्यामध्ये मुर्धन्याकाशात शक्तीचे रूप लोप पावते.
307-6
पै मेघाचेनि मुखी निवडिला । समुद्र का वोघी पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेया ॥307॥
ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे समुद्रापासून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडून पुनः नदीच्या रूपाने समुद्रास मिळते,
308-6
तेवी पिंडाचेनि मिषे । पदी पद प्रवेशे । ते एकत्व होय तैसे । पंडुकुमरा ॥308॥
त्याप्रमाणे हे अर्जुना ! शरीराच्या द्वारे जेंव्हा शक्तीरूप त्यागून शिवच शिवात मिळते, ते अकत्वही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय.
309-6
आता दुजे हन होते । की एकचि हे आइते । ऐशिये विवंचनपुरते । उरेचिना ॥309॥
या अवस्थेमध्ये पूर्वी द्वैत होते का मुळातच अद्वैत होते, असा विचार करण्यापूर्वी काही राहत नाही.
310-6
गगनी गगन लया जाये । ऐसे जे काही आहे । ते अनुभवे जो होये । तो होऊनि ठाके ॥310॥
आकाशदेखील ज्या महशून्यामध्ये लय पावते, असे जे काही परमात्मतत्व आहे, तो अनुभवाने जो कोणी होतो, म्हणजे त्या तत्वाशी एकरूप होतो, त्यालाच ही अवस्था प्राप्त होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-6
म्हणोनि तेथिची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणे संवादाचिया गावाआंतु । पैठी कीजे ॥311॥
म्हणून ज्या शब्दांनी कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते, त्या शब्दांचे हात तेथील अवस्थेचे वर्णन करण्यापर्यंत पोचत नाहीत. (म्हणजे त्या स्थितीचे वर्णन शब्दात सांगताच येत नाही)
312-6
अर्जुना एऱ्हवी तरी । इया अभिप्रायाचा गर्वु धरी । ते पाहे पा वैखरी । दुरी ठेली ॥312॥
अर्जुना ! एरवी तरी ” या अलौकिक अवस्थेचे मर्म मी सांगू शकेन ” असा अभिमान धरणारी वैखरी वाणी त्या अवस्थेपासून दूरच राहते.
313-6
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडे । गगना येता ॥313॥
भिवयांच्या आतल्या बाजूस म्हणजे आज्ञानचक्रात ओंकरातील मकार मात्राचादेखील प्रवेश होत नाही. इतकेच नाही, तर एकट्या प्राणवायूला गगणास येण्याला संकट पडते,
314-6
पाठी तेथेचि तो भासळला । तव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥314॥
नंतर तो प्राणवायू मुर्धन्य-आकाशात विरून जातो, तेंव्हा शब्दाचा दिवस मावळतो म्हणजे शब्दाचे बोलणे खुंटले जाते. मग त्यांनतर आकाशाचाही लय होतो.
315-6
आता महाशून्याचिया डोही । जेथ गगनसीचि ठावो नाही । तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ॥315॥
परब्रम्हरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही, तेथे वर्णन करण्याची नौका पलीकडे नेण्यासाठी या वैखरी वेळूचा लाग लागेल काय ?
316-6
म्हणोनि आखरामाजी सापडे । की कानावरी जोडे । हे तैसे नव्हे फुडे । त्रिशुध्दी गा ॥316॥
म्हणून ही ब्रम्हस्थिती शब्दाने वर्णन करता येईल अथवा कानांनी ऐकता येईल, अशी नाही, हे त्रिवार सत्य आहे.
317-6
जै कही दैवे । अनुभविले फावे । तै आपणचि हे ठाकावे । होऊनिया ॥317॥
जे दैवयोगाने अनुभवास येते, त्या वेळी तो तद्रूप होऊन जात असतो.
318-6
पुढती जाणणे ते नाहीचि । म्हणोनि असो किती हेचि । बोलावे आता वायाचि । धनुर्धरा ॥318॥
ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे जाणायचे असे काही शिल्लक राहत नाही. म्हणून हे अर्जुना ! आता उगीच किती बरे बोलावे ?
319-6
ऐसे शब्दजात माघौते सरे । तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥319॥
याप्रमाणे सर्व शब्द जेथून माघारी फिरतात, त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि विचारांचा वारा देखील तेथे प्रवेश करू शकत नाही.
320-6
जे उन्मनियेचे लावण्य । जे तुर्येचे तारुण्य । अनादि जे अगण्य । परमतत्व ॥320॥
ते प्ररमतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे, जे चौथ्या ज्ञानरूप तुर्या अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध अमर्याद आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-6
आकाराचा प्रांतु । जे मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले ॥321॥
तेथे आकाशाचा शेवट होतो; ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असुन समाधि अवस्थेचे तारुण्य होय; आणि ज्याला आदि नाही व जे मापता येत नाही,
322-6
जे विश्वाचे मूळ । जे योगद्रुमाचे फळ । जे आनंदाचे केवळ । चैतन्य गा ॥322॥
ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असुन ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय.
323-6
जे महाभूतांचे बीज । जे महातेजाचे तेज । एवं पार्था जे निज । स्वरुप माझे ॥323॥
ते ब्रह्म पंचमहाभुतांचे मूळ कारण व महातेजाचे तेज होय. सारांश, पार्था, ते ब्रह्म माझे मुळस्वरूप होय.
324-6
ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रुपा आली । देखोनि नास्तिकी नोकिली । भक्तवृंदे ॥324॥
साधुवृंदांचा नास्तिकांनी जेव्हा छळ केला, तेव्हा हीच चतुर्भुज मुर्ति या स्वरुपापासुन आकाराला आली.
325-6
ते अनिर्वाच्य महासुख । पै आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे का निष्कर्ष । प्राप्तीवेरी ॥325॥
अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच, परंतु याची प्राप्ति होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहत चालले, ते पुरुष स्वयमेव सुखरूप झाले.
दिवस ६६ वा, ७, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७८१ ते ७९२
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ७८१
ज्या ज्या आम्हापाशी होतील ज्या शक्ती । तेणे हा श्रीपती अळंकारू ॥१॥
अवघा पायापाशी दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥धृपद॥
ज्याचे देणे त्यासी घातला संकल्प । बंधनाचे पाप चुकविले ॥२॥
तुका म्हणे येथे उरला विठ्ठल । खाये बोल बोल गाये नाचे ॥३॥
अर्थ
आमच्यात असलेल्या सामर्थ्याच्या शक्तीने आम्ही श्रीपतीला अलंकार घालू. आम्ही त्या श्रीपतीच्या पायापाशी जीवभाव अर्पण केला आहे त्या योगाने आम्ही जन्ममरणाचा ठावठिकाणा पुसून टाकला आहे. आम्ही जो संकल्प केला होता तो संकल्प देवाला अर्पण केला असून बंधनाचे सर्व पाप चुकविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता विठ्ठलाचा सर्व काही अर्पण केले त्यामुळेच केवळ विठ्ठलाच भरलेला आहे, तो देईल ते आम्ही खातो त्याचेच बोल बोलतो त्याचीच गाणी गातो आणि त्याच्याच छंदात नाचतो.
अभंग क्र. ७८२
आम्ही आळीकरे । प्रेमसुखाची लेकरे ॥१॥
पायी गोविली वासना । तुच्छ केले ब्रम्हज्ञाना ॥धृपद॥
येता पाहे मुळा । वास पंढरीच्या डोळा ॥२॥
तुका म्हणे स्थळ । मग मी पाहेन सकळ ॥३॥
अर्थ
आम्ही देवा जवळ हट्टाने मागणी मागणारे प्रेम सुख मागणारे लेकरे आहोत. आमच्या सर्व काही वासना या हरीच्या ठिकाणी असून ब्रम्हज्ञान देखिल आम्हाला तुच्छ आहे. पांडुरंग आम्हाला पंढरीवरून केव्हा बोलवील ह्याची आम्ही वाट पाहत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात एकदा कि मला देवाने पंढरी क्षेत्राला नेले तर मग मी सर्व क्षेत्र स्थळ पाहीन.
अभंग क्र. ७८३
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशी ॥१॥
आता सोडोनि भोजन । भिके जावे वेडेपण ॥धृपद॥
उसंतिली वाट । मागे परतावे फुकट ॥२॥
तुका म्हणे वाणी । वेचो बैसोन ठाकणी ॥३॥
अर्थ
एखाद्या माणसासमोर आयते चालून पक्वनाचे ताट वाढून आले व तो ते ताट सोडून भिक मागावयास गेला तर तो मनुष्य वेडा ठरेल. एखादी वाट चालून आल्यावर परत मागे चालून जाणे हे व्यर्थ असते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एका ठिकाणी बसून आवडीने हरीचे नाम घेवू.
अभंग क्र. ७८४
धन्य शुद्ध जाती । धरी लौकरी परती ॥१॥
ऐकिले तोचि कानी । होय परिपाक मनी ॥धृपद॥
कळवळा पोटी । सावधान हितासाठी ॥२॥
तुका म्हणे भाव । ज्याचा तोचि जाणा देव ॥३॥
अर्थ
जो मनुष्य संसारातून परतीची वाट लवकर धरतो तो मनुष्य धन्य आहे, त्याची जाती व कुळ धन्य आहे. या आश्या मनुष्याच्या कानी परमार्थाचे नुसते काही विचार जरी पडले तर ते विचार त्याच्या मनात व हृदयात पूर्ण पणे ठसतात. त्याच्या हृदयात इतरा साठी कळवळा उत्पन्न होऊन तो इतरांच्या हितासाठी जागा होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये सं रविषयी आदर आहे आणि परमार्थ विषयी चांगले विचार आहे तोच देव आहे असे समजावे.
अभंग क्र. ७८५
जीवित्व ते किती । हेचि धरिता बरे चित्ती ॥१॥
संत सुमने उत्तरे । मृदु रसाळ मधुरे ॥धृपद॥
विसांवता कानी । परिपाक घडे मनी ॥२॥
तुका म्हणे जोडी । होय जतन रोकडी ॥३॥
अर्थ
आपले आयुष्य ते किती आहे, हे आपल्या चित्तात धरले तर बरे. संतांची शब्दरूपी सुमने म्हणजे फुले हि मृदु रसाळ आणि मधुर आहेत. ती वचने ऐकली तर मनतृप्त होऊन परिपक्व होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने रोकड हातात येते ते साधन संग्रहात ठेवावे हे बरे.
अभंग क्र. ७८६
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व येती सकळ ॥१॥
कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥धृपद॥
सर्व सत्ता धरिता धीर । वीर्या वीर आगळा ॥२॥
तुका म्हणे तिखट तिखे । मृद सखे आवडी ॥३॥
अर्थ
अभिमानाची निवृत्ती हि शांतीनेच होत असते, त्यामुळे एका शांतीने सर्वाना महत्व मिळते. सर्वाना हे माहित असून त्याचे अनुकरण कोणीही करत नाही, त्यामुळे सर्वाना कष्ट होतात. परमार्थात धीर जो कोणी धरतो तोच सर्वा मध्ये महावीर आहे असे समजलेच पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात संत हे जे कोणी त्यांच्याशी तिखट प्रमाणे वागतात त्यांच्याशी ते कठोर वागतात आणि जे त्यांच्याशी कोमल प्रमाणे वागतात ते त्यांच्याशी अति कोमलतेने वागतात असतात आणि तितकेच मृदू आणि मधुर असतात, म्हणूनच तर ते माझी सखी आहेत, मला फार आवडतात.
अभंग क्र. ७८७
भोजन पा शांतीचे । उंच निच उसाळी ॥१॥
जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥धृपद॥
कल्पना ते देवाविण । करी भिन्न इतरी ॥२॥
तुका म्हणे पावे भूती । ते निश्चिंती मापली ॥३॥
अर्थ
भोजन असे सेवन करावे जेणे करून मनाला शांती लाभली पाहिजे, मनात शांतीच्या लाटा उसळल्या पाहिजे. ज्या प्रमाणे कारंज्याचे पाणी हे उंचच उंच उडते तसा प्रेमाचा जिव्हाळा मनात हवा म्हणजे स्वहित लाभेल. देवाविण इतर कोणतेही विचार मानत येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात शांतीचे स्वरूप मी तुमच्या समोर आता मांडले आहे.
अभंग क्र. ७८८
दास झालो हरीदासांचा । बुद्धीकायामने वाचा ॥१॥
तेथे प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ ।
नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनी ॥धृपद॥
ऐकता हरीकथा । भक्ती लागे त्या अभक्ता ॥२॥
देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥३॥
हे सुख ब्रह्मादिका । नाही नाही म्हणे तुका ॥४॥
अर्थ
काय, वाचा, मानाने व बुद्धीने मी हरी दासांचाही दास झालो आहे. जेथे प्रेमाचा सुकाळ आसतो, टाळ मृदुंगाचा जय घोष असतो, तेथे दुष्ट बुद्धी नाहीशी होते, व हरी कीर्तनात समाधी लागते. हरी कथा ऐकल्याने अभक्तालाही भक्ती उत्पन्न होते. कीर्तनाचा रंग पाहून पांडुरंग तेथे कसा उभा राहतो ते पहा ? अश्या प्रकारचे सुख हे देवादिकांनाही मिळत नाही असे महाराज दोन वेळा सुचवतात.
अभंग क्र. ७८९
गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावी एकाती साधुसंगे ॥१॥
जतन करा जतन करा । धावते सैरा ओढाळ ते ॥धृपद॥
मान अपमान मनाचे लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥२॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥३॥
अर्थ
गती अधोगती हि मनाचीच युक्ती आहे, त्यामुळे मन हे एकाती व साधूच्या संगतीत लावावे. या मनाचे जतन करा या मनाचे जतन करा ते ओढाळ जनावरा प्रमाणे सैरावैरा इतस्तः धावत आहे. मान आणि अपमान हे मनाच्या वृत्तीचे लक्षण आहेत, त्यामुळे मनाला ज्या प्रकारचे ध्यान लावावे तेच ते करते. तुकाराम महाराज म्हणतात अहो माझे बंधुंनो हे मनच आहे की जे आपल्याला भवसागरातून उतरवते आणि हे मनच आपल्याला चौर्यांशी लक्ष योनीच्या फेऱ्यात बांधून टाकते.
अभंग क्र. ७९०
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥
पुंडलिके हाट भरियेली पेठ । अवघे वैकुंठ आणियेले ॥धृपद॥
उदिमासी तुटी नाही कोणा हानि । घेऊनिया धणी लाभ घेती ॥२॥
पुरले देशासी भरले सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥३॥
तुका म्हणे संता लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥४॥
अर्थ
पंढरीस दुखः हे औषधालाही मिळत नाही कारण सुख पांडुरंग रूपाने तेथे असल्या मुळे. पंढरीत पेठ हि पुंडलीकाने वसवली असून त्याने सर्व वैकुंठच या पृथ्वीवर आणले आहे. या ठिकाणी कोणत्याही धंद्याला काहीच तोटा नाही, सर्वाना फायदाच फायदा आहे. या पेठेत सर्व देशाला पुरेल एवढा माल आहे तो माल शीग पर्यंत भरलेला आहे. या मालाने सर्व पंचक्रोशी दुमदुमून गेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात संतांना पंढरीत तृप्ती मिळाली आहे, कारण कारण त्यांना येथे पाडूरंगाच्या प्रेम सुखाचा लाभ प्राप्त झाला आहे म्हणून ते पंढरीत बसून राहिले आहेत.
अभंग क्र. ७९१
द्वारकेचे केणे आले याचि ठाया । पुढे भक्तराया चोजवीत ॥१॥
गोविले विसारे माप केले खरे । न पाहे माघारे अद्यापवरी ॥धृपद॥
वैष्णव मापारी नाही जाली सळे । पुढे ही न कळे पार त्याचा ॥२॥
लाभ जाला त्यांनी धरिला तो विचार । आहिक्य परत्र साठविले ॥३॥
तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरी संताचिया ॥४॥
अर्थ
भक्त राज पुंडलिक हा लोकांना सांगत आहे कि द्वारकेतून श्री कृष्ण रुपी माल या पंढरीच्या बाजारात आला आहे. भक्तांनी विसार देवून श्री कृष्ण रुपी माल हा ताब्यात घेतला आहे. त्याचे माप खरे केले आहे व त्याची किंमत मोजली आहे त्या कारणाने तो परमात्मा अजून माघारी पाहत नाही. वैष्णव जन त्याचे माप घेतात, परंतु त्याचे काही मोज माप च होवू शकले नाही आणि पुढे त्याचा काही पत्ता लागत नाही. ज्यांनी तो माल घेतला त्यांनी त्या मालाचा विचार करून इहलोक व परलोकी तो माल साठविला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला मजुरी मिळाली आहे आणि माझा संतांवर पूर्ण विश्वास आहे.
अभंग क्र. ७९२
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥धृपद॥
पंचक्रोशीमाजी रीग नाही दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरी ब्रह्मानंदु ॥३॥
तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥
अर्थ
सर्व देवी देवता हि या पंढरपुरी तीर्थी चंद्रभागारूपी शुद्ध पेठेत येतात. हि गोष्ट सांगू वांगी नसून प्रत्यक्ष माझा अनुभव आहे या पेठेचा अद्भूत महिमा वर्णानच करता येत नाही. या पंचक्रोशीमध्ये दोषाचा विषय येतच नाही आणि जरी फार मोठा दोष असला तरी तो इथे आल्यावर अपोआप जळून जातो. येथील सर्व पुरुष आणि स्त्रीया चतुर्भुज व निर्विषय देवा प्रमाणे विषयहीन आहेत. येथे सर्व घरोघरी ब्रम्हानंद आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या जवळ पुण्याचा लवलेश हि नाही त्यांनी पंढरीस जावून कोटी कोटी पुण्य घावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















