आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१३ मार्च, दिवस ७२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४५१ ते ४७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ८५३ ते ८६४
“१३ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan XX March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १३ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८५३ ते ८६४ चे पारायण आपण करणार आहोत.
१३ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४५१ ते ४७५,
451-6
जे विवेकग्रामींचा मुळी । बैसले आहाति नित्य फळी । तया योगियांचिया कुळी । जन्म पावे ॥451॥
आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळाचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलांत तो (योगभ्रष्ट)पुरुष जन्म घेतो.
452-6
मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहाट फुटे । सूर्यापुढे प्रगटे । प्रकाशु जैसा ॥452॥
जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो; व ज्याप्रमाणे सुर्य उगवण्याच्या अगोदर चहुकडे प्रभा फाकते,
453-6
तैसी दशेची वाट न पहाता । वयसेचिया गावा न येता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥453॥
त्याचप्रमाणे, पौढ वयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते.
454-6
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वते दुभे । मग सकळ शास्त्रे स्वयंभे । निघती मुखे ॥454॥
पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातुन सर्व शास्त्रे स्वयमेव निघू लागतात.
455-6
ऐसे जे जन्म । जयालागी देव सकाम । स्वर्गी ठेले जप होम । करिती सदा ॥455॥
असे जे उत्तम कुली जन्म, ते प्राप्त होण्याकरिंता स्वर्गवासी देव देखील मनात हेतु धरुन नेहमी जप, होम करीत असतात.
456-6
अमरी भाट होईजे । मग मृत्युलोकाते वानिजे । ऐसे जन्म पार्था गा जे । ते तो पावे ॥456॥
पार्था देवांनी स्तुतिपाठक होऊन मृत्युलोकाचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म, ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो.
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥6. 44॥
457-6
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥457॥
आणि ज्या पूर्वजन्मांत आयुष्याचा शेवट झाला होता, त्या वेळची सद्बुद्धि त्याला पुन्हा प्राप्त होते.
458-6
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळा । मग देखे जैसी अवलीळा । पाताळधने ॥458॥
त्या समयी, दैववान, पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भुमीतील धन सहज दृष्टीस पडते,
459-6
तैसे दुर्भेद जे अभिप्राय । का गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेवीण जाय । बुद्धी तयाची ॥459॥
त्याप्रमाणे, गुरूमुखाशिवाय न कळणाऱ्या कठिण अशा अभिप्रायांच्या ठिकाणी त्याची बुद्धि अनायासे जाऊन पोहोचते.
460-6
बळिये इंद्रिये येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजे गगना । मिळोचि लागे ॥460॥
इंद्रिये ही आपण होऊन मनाच्या आधीन होतात, मन प्राणवायुंत ऐक्य पावते व तो प्राणवायु चिदाकाशांत मिळतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-6
ऐसे नेणो काय आपैसे । तयातेचि कीजे अभ्यासे । समाधी घर पुसे । मानसाचे ॥461॥
आणखी काय गोष्टी असतील त्या असोत, परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो, आणि समाधिही त्याच्या मनाचे घर विचारीत येते.
462-6
जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय आरंभरंभेचा गौरवु । की वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रुपा आला ॥462॥
असे वाटते की, हा पुरुष योगस्थानाचा शंकर किंवा योग्याच्या आरंभीचे वैभवच अथवा वैराग्यरूप सिद्धीचा मुर्तिमंत अनुभवच आहे
463-6
हा संसारु उमाणिते माप । का अष्टांगसामग्रीचे द्वीप । जैसे परिमळेचि धरिजे रुप । चंदनाचे ॥463॥
हे संसार मोजण्याचे मापच, अथवा अष्टांगयोगसाहित्याचे बेटच होय. सुगंधानेच ज्याप्रमाणे चंदनाचे रुप धारण करावे,
464-6
तैसा संतोषाचा काय घडिला । की सिद्धिभांडारीहूनि काढिला । दिसे तेणे माने रुढला । साधकदशे ॥464॥
त्याचप्रमाणे, साधकदशेतच हा इतका धैर्ययुक्त झालेला असतो की, संतोषाचा पुतळा बनविल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारांतून काढल्यासारखा दिसतो.
प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥6. 45॥
465-6
जे वर्षशताचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी । लंघिता पातला थडी । आत्मसिद्धीची ॥465॥
कारण कोट्यवधि वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करुन तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला असतो.
466-6
म्हणोनि साधनजात आघवे । अनुसरे तया स्वभावे । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥466॥
म्हणून सर्व साधने त्याला स्वभावतःच प्राप्त होतात; आणि मग सहजच तो विचारांच्या गादीवर बसतो.
467-6
पाठी विचारितया वेगा । तो विवेकुही ठाके मागा । मग अविचारणीय ते आंगा । घडोनि जाय ॥467॥
नंतर, विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो, आणि अविचारणीय असे जे ब्रह्म, ते तो स्वतःच होतो.
468-6
तेथ मनाचे मेहुडे विरे । पवनाचे पवनपण सरे । आपणपा आपण मुरे । आकाशही ॥468॥
त्या ठिकाणी मनाचे ढग नाहीतसे होतात, प्राणवायूचे हालणे बंद होते व तो आपल्या ठिकाणीच चिदाकाशांत लीन होऊन,
469-6
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणोनि आधीचि बोलु बहुडे । तयालागी ॥469॥
ॐकाराच्या अर्धबिंदूत निमग्न होतो. अशा रीतीचे त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते, म्हणून त्या ठिकाणी बोलनेच बंद होते.
470-6
ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळा गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ॥470॥
मग सगळ्या गतींना गति देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे रूपच तो बनून राहतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-6
तेणे बहुती जन्मी मागिली । विक्षेपांची पाणिवळे झाडिली । म्हणोनि उपजतखेवो बुडाली । लग्नघटिका ॥471॥
त्याने मागल्या अनेक जन्मांत, विक्षेप हाच कोणी पाण्यावरील मळ, तो झाडून टाकलेला असतो, म्हणून त्याची लग्नघटिका त्याचा जन्म होताच बुडते
472-6
आणि तद्रूपतेसी लग्न । लागोनि ठेले अभिन्न । जैसे लोपले अभ्र गगन । होऊनि ठाके ॥472॥
आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. अभ्रे नाहीतशी झाली म्हणजे ती ज्याप्रमाणे आकाशरूपच होऊन राहतात,
473-6
तैसे विश्व जेथ होये । मागौते जेथ लया जाये । ते विद्यमानेचि देहे । जाहला तो गा ॥473॥
त्याप्रमाणे (विक्षेपादि विघ्ने नाहीतशी झाली म्हणजे, ) ज्यापासून विश्वाची उत्पत्ति होते, व ज्या ठिकाणी ते पुनः लय पावते, ते ब्रह्म, तो या विद्यमान देहांत असतांनाच बनतो.
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥6. 46॥
474-6
जया लाभाचिया आशा । करुनि धैर्यबाहूंचा भरवसा । घालीत षट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ ॥474॥
ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुबलाच्या भरंवशावर कर्ममार्गाच्या प्रवाहांत उडी घालतात
475-6
का जिये एकी वस्तुलागी । बाणोनि ज्ञानाची व्रजांगी । झुंजत प्रपंचेशी समरंगी । ज्ञानिये गा ॥475॥
किंवा ज्या एका वस्तुसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरुप कवच धारण करुन समरांगणात प्रपंचशत्रुशी झगडतात,
दिवस ७२ वा, १३, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८५३ ते ८६४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ८५३
संतापाशी बहु असावे मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥
बासर तो भुंके गाढवाचेपरी । उठे पाठीवरी यम दंड तेणे ॥धृपद॥
समयो नेणे ते वेडे चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥
तुका म्हणे काय वाया चाळवणी । पिटपिटघाणी हागवणीची ॥३॥
अर्थ
संतांपाशी असताना मर्यादा धरून वागावे, जर आपण वाईट पणाने वागलो तर आपला घात होण्याचि संभावना असते. वाईट बोलणारा माणूस हा भुंकणारा गाढवच आहे. म्हणून त्याच्या पाठीवर मार खाल्लेले वळ उठत असतात. वेळ समय न समजणाऱ्या व्यक्तीला चहाटळ व मूर्ख म्हणावे त्यास ओंगळ हि पदवी प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात अश्या या मूर्ख माणसांचे बोलणे व ते मनुष्य हे घाण हगवणी सारखे आहेत.
अभंग क्र. ८५४
पोटापुरते काम । परि अगत्य तो राम ॥१॥
कारण ते हे चि करी । चित्ती पांडुरंग धरी ॥धृपद॥
प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका म्हणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥
अर्थ
पोटापुरते काम करावे परंतु काम करत करता राम नाम स्मरावे. तू कार्य हि हेच कर की आपल्या चित्तात हरी नामचे साठवण व्हावे. देवाचि सेवा करून प्रारब्धा प्रमाणे इच्छा तयार करावी. तुकाराम महाराज म्हणतात हरी प्राप्ती साठी तू तुझे बळ बुद्धी सर्व काही खर्च कर.
अभंग क्र. ८५५
घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥
सर्वभावे त्यांचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥धृपद॥
करिसील तो करी संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥२॥
बैससील तरी बैस संतांमधी । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥
जासी तरि जाई संताचिया गावा । होईल विसावा तेथे मना ॥४॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेई ॥५॥
अर्थ
हे मना अरे तुला भेट घ्यायचीच असेल तर संतांची घे इतरांच्या गोष्टी तू करू नकोस. संतांचे सर्व बोल सर्व भाव हे देवाचे भांडवल असते ते देवाशिवाय इतर गोष्टी बोलत नाही. हे मना अरे तुला संग जर कोणाचा करायचा असेल तर तो संतांचा कर इतरांकडे तू जाऊ नको, तुला बसायचे असेल तर संतान मध्ये बस आणिकाची संगत तुझ्या बुद्धीत येऊ देऊ नकोस. तुला कोठे बाहेर जावयास वाटत असेल तर तू संतांच्या गावाला जा तेथे तुझ्या मनाला विश्रांती मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात हे मना संत हे सुखाचे सागर आहेत म्हणून तू निरंतर सुखाची तृप्ती करू घे.
अभंग क्र. ८५६
संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दुःखलेश ॥१॥
तेथे मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥धृपद॥
संताचिये गावी वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साठी घेती देती ॥४॥
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी । म्हणोनि भिकारी झालो त्यांचा ॥५॥
अर्थ
संतांच्या गावाला प्रेमाचा सुकाळ असतो तेथे कसल्याही प्रकारचे तळमळ दुःख नसते. म्हणून मी तेथे त्यांचा याचक म्हणून राहीन आणि ते हि मला प्रेमरूपी भिक्षा घालतील. संतांच्या गावाला श्री विठ्ठ्लाचेच भांडवल आहे. त्यांचे सर्व धन वित्त हे श्री विठ्ठलच आहे संताचे भोजन हे हरीनाम रुपी अमृताचे सेवन असते ते सदैव हरी कीर्तनात रंगलेले असतात. संतांचा उदीम (व्यापार) हा सदाचाराचाच उपदेश असतो ते नेहमी प्रेम सुखासाठी या उपदेशाचे घेणे देणे देवाण घेवाण करतात. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या घरी दुसरे कोणतेही विचार नसतात म्हणून मी त्यांचा भिकारी म्हणून राहिलो आहे.
अभंग क्र. ८५७
बहुता जन्मां अंती । जोडी लागली हे हाती ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरी पांडुरंगी भाव ॥धृपद॥
बहु केला फेरा । येथे सापडला थारा ॥२॥
तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥३॥
अर्थ
भरपूर जन्म नंतर तुला मनुष्य देह हाती लागला आहे. म्हणून तू पांडुरंगाच्या ठिकाणी दृढ भाव ठेव. अरे अनेक फेरे मारल्यानंतर आता आपल्याला खरे विश्रांतीचे स्थान लाभले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देह हा दुर्लभ आहे असे जाणणारा हा सुद्न्य होय.
अभंग क्र. ८५८
लेकराची आळी न पुरवावी कैसी । काय तयापाशी उणे जाले ॥१॥
आम्हा लडिवाळा नाही ते प्रमाण । काही ब्रम्हज्ञान आत्मस्थिती ॥धृपद॥
वचनाचा घेईन अनुभव पदरी । जे हे जनाचारी मिरविले ॥२॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटी कौतुक हे ॥३॥
अर्थ
विठाबाई माऊली लेकराचा हट्ट का पूर्ण करत नाही ? तिच्या पाशी काय उणे आहे ? या विठाईच्या भक्तांना ब्रम्हज्ञान किंवा आत्मस्थिती भाव आवडत नाही. विठाई हि पतितांना पावन करणारी आहे याचा अनुभव मी घेणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा हा भोळे पणाचा प्रयत्न आहे पण याचे खरे कवतुक मी तुम्हाला शेवटी दाखवीन.
अभंग क्र. ८५९
रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥
सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवी समजती ॥धृपद॥
पोटा आले तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंती चित्ती ॥२॥
तुका म्हणे भक्तीसाठी हरीहर । अरूपीचे क्षरविभाग हे ॥३॥
अर्थ
देवाला या परब्रम्हाला नांव व रूप नाही परंतु ब्रम्ह हे सगुण रूपाने आले म्हणून आम्हा भक्तांची हि उत्तम सोय झाली त्या ब्रम्हाच्या ठिकाणी आमचा सद्भाव ठेवणे आणि त्याच्या बरोबर बोलावयास आधार मिळाला. पुथ्वीवरती अनेक ठिकाणी शिव म्हणजे कुंपणे घातली हि मर्यादित लोकांची कल्पना आहे परंतु शहाण्या विचारवंत लोकांना पृथ्वी हि अखंड आहे हे सहज समजते. आईच्या मांडीवर बालके लोळतात कावतुकाने खेळतात त्या विषयी लोकांना कोणत्याही प्रकारचा संशय येत नाही अर्थात त्या बालकाचा भाव निरागस आहे हे लोक जाणत असतात. तुकाराम महाराज म्हणतात देवाची भक्ती करता यावी म्हणून हा ब्रम्ह हरी आणि हर हे या पृथ्वीवर सगुण रूपाने साकार झाले आहेत.
अभंग क्र. ८६०
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती ॥१॥
फळ आणि समाधान । तेथे उत्तम कारण ॥धृपद॥
अल्प तो संतोषी । स्थळी सापडे उद्देसी ॥२॥
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥३॥
अर्थ
एखाद्या पीडितांना अन्न पैसे वगैरे देऊन आपल्या शक्तीचा योग्य तो उपयोग करावा. त्यामुळे आपल्याला समाधान मिळते, त्याचे फळही मिळते त्या पिडीताला मदतही होते यामुळे उत्तम कार्य हि घडते. एक अल्प संतुष्ट माणसाला एखाद्याने दान दिले तर आणि सत्पात्र मनुष्य भेटला तर तुकाराम महाराज म्हणतात तो सहज आणि उत्तम तऱ्हेचा योगायोगच होय.
अभंग क्र. ८६१
मुळाचिया मुळे । दुःखे वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥धृपद॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥
तुका म्हणे थीते । दुःख पाववावे चित्ते ॥३॥
अर्थ
योग मार्गात अनेक वर चढ पायऱ्या असतात त्यात श्रम जास्त असतात असा योग मार्गाचा धर्म आहे मग तो योग मार्ग श्रम वाढविणारा नाही काय ? कोणती वेळ कशी येते हे आसक्तीच्या भरात समजत नाही. व नको त्या भानगडीत गुंतण्याचा प्रसंग येतो. तुकाराम महाराज म्हणतात या योग मार्गात चित्ताला मात्र दुःख भोगावे लागते.
अभंग क्र. ८६२
भाग्यवंता हेचि काम । मापी नाम वैखरी ॥१॥
आनंदाची पुष्टि अंगी । श्रोते संगी उद्धरती ॥धृपद॥
पिकले तया खाणे किती । पंगतीस सुकाळ ॥२॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचार्या ॥३॥
अर्थ
भाग्यवंत लोकांना आपल्या वैखरीने आपल्या वाणीने हरीनाम उच्चारणे हरीनाम रुपी माप मोजत बसने ऐवढेच काम असते. त्यांच्या अंगी आंनदाची पुष्टी असते आणि त्यांच्या संगतीत असणारे श्रोते त्यांच्यामुळे यांचाही उद्धार होतो. ज्याने धन्य पिकविले तो किती खाणार आहे ? खरा फायदा तर त्याच्या पंगतीत बसलेल्या लोकाचा. तुकाराम महाराज म्हणतात अश्या महंतांना माझा साष्टांग नमस्कार आहे.
अभंग क्र. ८६३
लटिके ते रुचे । साच कोणाही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगे कळो येईल सीण ॥धृपद॥
वाढवी ममता । नाही वरपडला तो दूता ॥२॥
न मनी माकड । काही तुका उपदेश हेकड ॥३॥
अर्थ
खोटे सर्वाना आवडते कारण याला फक्त मस्ती कारण आहे. अश्या या व्यक्तींना भोग भोगण्याची वेळ आली कि मग शीण येतो. अश्या माजलेल्या लोकांचे आहे तो पर्यंत देहावर ममता असते मग यम दूतांच्या तडाख्यात सापडला कि त्याला समजते. तुकाराम महाराज म्हणतात अश्या या हेकड (हट्टी) माकडाला किती हि उपदेश केला तरी ते ऐकत नाही.
अभंग क्र. ८६४
कौतुकाची सृष्टी । कौतुकेचि केले कष्टी ॥१॥
मोडे तरी भले खेळ । फाके फांकिल्या कोल्हाळ ॥धृपद॥
जाणणियासाटी । भय सामावले पोटी ॥२॥
तुका म्हणे चेता । होणे ते तूच आयता ॥३॥
अर्थ
या सृष्टीची निर्मिती माये पासून झाली आहे. व या मायेच्या कवतुकाने जीव कष्टी होतो. हा मायेचा खेळ दृढ निश्चयाने मोडला तर मोडतो. अहंकारामुळे द्वैत भाव निर्माण होऊन त्यामुळेच भय निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या आत्म जागृतीच्या स्थितीत तुला यायचे आहे ती स्थिती तुझ्या ठिकाणी आहे तूच ब्रम्ह आहे तूच चेता आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















