आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

११ मार्च, दिवस ७० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४०१ ते ४२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ८२९ ते ८४०
“११ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ११ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ११ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
११ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ४०१ ते ४२५,
401-6
तो पंचात्मकी सापडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडे । मजसी तुके ॥401॥
तो पंचमहाभुतात्मक शरीरांत जरी सापडला, तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल ? कारण, अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो,
402-6
माझे व्यापकपण आघवे । गवसले तयाचेनि अनुभवे । तरी न म्हणता स्वभावे । व्यापकु जाहला ॥402॥
ज्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे, मग ‘ तो सर्वव्यापक झाला ‘ असे म्हटलेच पाहीजे असे नाही.
403-6
आता शरीरी तरी आहे । परि शरीराचा तो नोहे । ऐसे बोलवरी होये । ते करु ये काइ ॥403॥
हे पहा की, ह्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही. ही गोष्ट बोलून दाखविता येण्यासारखी नव्हे. तेव्हा तिचे वर्णन करिता येईल काय ?
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥6. 32॥
404-6
म्हणोनि असो ते विशेषे । अथवा आपणपेयासारिखे । जो चराचर देखे । अखंडित ॥404॥
अर्थात् या विषयाबद्दल जास्त सांगणे नको. जो सदोदित आपल्यासारखेच सर्व जग मानतो.
405-6
सुखदुःखादि वर्मे । का शुभाशुभे कर्मे । दोनी ऐसी मनोधर्मे । नेणेचि जो ॥405॥
जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनात समजत नाही
406-6
हे समविषम भाव । आणिकही विचित्र जे सर्व । ते मानी जैसे अवयव । आपुले होती ॥406॥
हे सम आणि विषम असा मनात भाव न धरता, याशिवाय इतर सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत, असे समजतो;
407-6
हे एकैक काय सांगावे । जया त्रैलोक्यचि आघवे । मी ऐसे स्वभावे । बोधा आले ॥407॥
यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगाव्या ? ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे,
408-6
तयाही देह एकु कीर आथी । लौकिकी सुखदुःखी तयाते म्हणती । परि आम्हाते ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥408॥
त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी, आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात; तथापि आमच्या अनुभवाने तो परब्रह्म आहे.
409-6
म्हणोनि आपणपा विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे । ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥409॥
म्हणून अर्जुना, ज्याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल, आणि आपणा स्वतःसच विश्वरूप होता येईल, त्या समदृष्टीची तू उपासना कर.
410-6
हे तूते बहुती प्रसंगी । आम्ही म्हणो याचिलागी । जे साम्यापरौति जगी । प्राप्ति नाही ॥410॥
आम्ही तुला पुष्कळ प्रसंगी याच कारणाकरिता असे सांगितले आहे की, समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्ति नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अर्जुन उवाच –
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थित्तिं स्थिराम् ॥6. 33॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥6. 34॥
411-6
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरो जी स्वभावा । मनाचिया ॥411॥
मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, देवा, तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही.
हे मन कैसे केवढे । ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे । एऱ्हवी राहाटावया थोडे । त्रैलोक्य यया ॥412॥
हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सांपडत नाही. येरवी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे होत नाही.
412-6
म्हणोनि ऐसे कैसे घडेल । जे मर्कट समाधी येईल । का राहा म्हणितलिया राहेल । महावातु ॥413॥
म्हणुन, माकडाला समाधि लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणतांच तो थांबणे ह्या गोष्टी कशा घडतील.
414-6
जे बुध्दीते सळी । निश्चयाते टाळी । धैर्येसी हातफळी । मिळऊनि जाय ॥414॥
जे मन बुद्धीला हलवते, निश्चय मोडते, आणि धैर्याचे हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघुन जाते
415-6,
जे विवेकाते भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥415॥
जे विचाराला चकविते, संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दशदिशा हिंडविते,
416-6
जे निरोधले घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । ते मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥416॥
ज्याला कोंडले असता ते उसळून बाहेर येते, आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला साह्य करतो, असे हे मन आपला स्वभाव सोडील का ?
417-6
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हासी साम्य होईल । हे विशेषेही न घडेल । तयालागी ॥417॥
म्हणून, एक मन जर स्थिर राहील, तर मग आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल; परंतु मनाची अशीच चंचल वृत्ति असल्यामुळे ती प्राप्त होणे दुर्घट आहे.
श्रीभगवानुवाच –
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥6. 35॥
418-6
तव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि ते तैसेचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥418॥
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात :- तू जे बोललास, ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे.
419-6
परि वैराग्यचेनि आधारे । जरि लाविले अभ्यासाचिये मोहरे । तरि केतुलेनि एके अवसरे । स्थिरावेल ॥419॥
परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले, तर काही अवकाशाने हे स्थिर होईल.
420-6
का जे यया मनाचे एक निके । जे देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिके । दावीत जाइजे ॥420॥
कारण, या मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे. ज्याची याला चटक लागेल, त्याच ठिकाणी राहावयास हे सोकावते ! म्हणून कौतुकाने आत्मसुखाकडेसच याला वळवावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥6. 36॥
421-6
एऱ्हवी विरक्ती जयासि नाही । जे अभ्यासी न रिघती कही । तया नाकळे हे आम्हीही । न मनू कायी ॥421॥
येरवी ज्याला वैराग्य नाही व जो अभ्यासही करीत नाही, त्याला हे मन आवरणार नाही असे आम्ही देखील कोठे मानीत नाही ?
422-6
परी यमनियमांचिया वाटा न वंचिजे । कही वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळी ठाकिजे । बुडी देऊनी ॥422॥
आणि जो यम, नियम, प्राणायाम, वैगेरेचा अभ्यास करीत नाही, ज्याला वैराग्याची कधी आठवण होत नाही, आणि जो केवळ विषयरूप जलात माशासारखी बुडी देऊन राहीला आहे,
423-6
यया जालिया मानसा कही । युक्तीची कांबी लागली नाही । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगे ॥423॥
आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीचा चिमटा कधी लागला नाही, त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे ?
424-6
म्हणोनि मनाचा निग्रह होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभी मग नोहे । कैसा पाहो ॥424॥
म्हणून, मनाचा निग्रह करणे हा जो उपाय आहे त्याला तू आरंभ कर; मग ते कसे निश्चल होत नाही ते पांहू !
425-6
तरी योगसाधन जितुके । के अवघेचि काय लटिके । परि आपणया अभ्यास न ठाके । हेचि म्हण ॥425॥
तर योगसाधने म्हणून जेवढी आहेत, तेवढी सर्व काय खोटी आहेत ? परंतु, आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण.
दिवस ७० वा, ११, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८२९ ते ८४०
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ८२९
मज पाहाता हे लटिके सकळ । कोठे मायाजाळ दावी देवा ॥१॥
कोणाचा कोणासी न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायीचे ठायी ॥धृपद॥
काढा जी मोह बुंथी जाळे । नका लावू बळे वेड आम्हा ॥२॥
जीव शिव काही ठेवियेली नावे । सत्य तुम्हा ठावे असोनिया ॥३॥
सेवेच्या अभिळासे न धराचि विचार । आम्हा दारोदार हिंडविले ॥४॥
आहे तैसे आता कळलियावरी । परते सांडा दुरी दुजेपण ॥५॥
तुका म्हणे काय छायेचा अभिळासे । हंस पावे नाश तारागणी ॥६॥
अर्थ
हे देवा मि जे काही पाहिले आहे ते मला आता सगळे खोटे आहे हे माहित झाले आहे. आता मला तुमचे मायाजाळ दाखवा. ह्या जगामध्ये कोणाचा ही कोणाशी ही काहीही संबंध नाही. सर्व जग हे शुद्ध बुद्धिचेच स्वरुप आहे हे मला आता माहित झाले आहे. तुम्ही आमच्यावर जे मोह रूपी पाघरूंन घातले आहे ते तू काढून टाका. आता उगाच आम्हाला या मोहाने वेड लावू नका. तुम्ही एकच स्वरुप आहात मग जिव अणि शिव ही दोन नावे का पडली आहेत तुम्ही सर्व जाणता आहात. हे देवा तुम्हाला आमच्याकडून सेवेची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही याचा विचार करत नाही आम्हाला तुम्ही दारोदार हिंड़ायला लावले आहे दारोदार म्हणजे जन्म मृत्युच्या फेरयात. आता आम्हाला वास्तविक स्थिती कळली आहे त्यामुळे तुम्ही आता जो तुमचा खोटा द्वैतभाव आहे तो तुम्ही बाजूला सारा. तुकाराम महाराज म्हणतात थोड्याश्या पाण्याचे प्रतिबिंब पडले की ते मोत्यासारखे दिसते आणि त्या लालसेने हंसाला ते मोती वाटते हंस त्या मोत्या जवळ गेला की ते नाश पावते आणि त्याने त्याची फसगत होते.
अभंग क्र. ८३०
पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायी मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठी ॥१॥
तेथे काय मी ते माझे । कोण वागवी ते ओझे । देहा केवी रिझे । हे काळाचे भातुके ॥धृपद॥
जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥२॥
इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका म्हणे मोल । झाकले ते पावेल ॥३॥
अर्थ
पंचमहाभुतांचा एकत्रित मिळून हा देह तयार झाला आणि तो देह म्हणजे मीच आहे हा अहंकार त्या जिवाला लागला. तसे पाहिले येथे माझे काय आहे जीवचा देहाशी काय संबंध आहे ? देह हा काळाचे भातुके खादय आहे तरी पण जीव मोह का धरतो ? जिव हा अमर आहे ज्याप्रमाणे आपण जुने वस्र टाकून नवे वस्र धारण करतो त्या प्रमाने हा देह टाकून नवीन जीव म्हणजे आत्मा नविन देह आपल्या संचिताप्रमाणे धारण करतो. आपल्या कर्माचे भोग भोगन्यासाठीच तो नविन जिव धारण करतो. आणि शेवटीतुकाराम महाराज म्हणतात इच्छाचा वेल वाढत जातो त्यामुळे जसे कर्म तशी इच्छा करुन तसेच कर्म आपल्याला भोगवे लागतात म्हणून मी खरे सांगतो त्या इच्छेला आपण खुंटित केले पाहिजे आपली इच्छा नाहिशी जो कोणी करेल तोच ब्रम्हस्थितिला प्राप्त होईल.
अभंग क्र. ८३१
पुसावेसे हेचि वाटे । जे जे भेटे तयासी ॥१॥
देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥धृपद॥
अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥२॥
तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसे ॥३॥
अर्थ
मला जे जे कोणी भेटेल त्यांना मला एवढेच विचारवेसे वाटते की देव माझ्यावर कृपा करील काय तो माझी लाज राखिल काय आता मला साऱ्या गोष्टींचा विसर पडला असून एवढा एकच उदयोग मला लागला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला एवढीच एक चिंता लागली आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा असा मला कोणी भेटेल का ?
अभंग क्र. ८३२
जाळा तुम्ही माझे जाणते मीपण । येणे माझा खुण मांडियेला ॥१॥
खादले पचे तरिच ते हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥धृपद॥
तरि भले भोगे जोडिले ते धन । पडिलिया खाने जीवनासी ॥२॥
तुका म्हणे मज तारी गा विठ्ठला । नेणताचि भला दास तुझा ॥३॥
अर्थ
हे देवा माझे मोठेपण माझा अभिमान झाला आहे तो माझा खून म्हणजे माझा घात करेल. त्याकरता तुम्ही माझा मोठेपणा जाळून टाका. एखादा पदार्थ जर आपण खाल्ला तो पदार्ध आपल्याला पचला तर ठीक आहे नाही तर तो पदार्थ पचला नाही तर तो शरीराला त्रास होतो. त्याप्रमाणे आपण साचवलेल धन या धनाचा चांगला उपयोग केला तर ठीक नाही तर ते चोरी होवून आपल्या जिवाला त्रास होईल. ते चोरी होवून उपाशी मरण्याची वेळ येईल. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही सर्व खरे जाणत आहात तुम्ही मला या सर्व रोगांणपसून तारा मी तुमचा अज्ञानी दास आहे.
अभंग क्र. ८३३
याती मतिहीन रूपे लीन दीन । आणीक अवगुण जाणोनिया ॥१॥
केला त्या विठ्ठले माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनिया ॥धृपद॥
जे काही करितो ते माझे स्वहित । आली हे प्रचित कळो चित्ता ॥२॥
जाले सुख जीवा आनंद अपार । परमानंदे भार घेतला माझा ॥३॥
तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । म्हणोनि शरण तारी बळे ॥४॥
अर्थ
हे देवा मि शुद्र जातीचा मतिमंद बुद्धिचा रूपाने कुरूप दीन लीन आहे. असे अनेक अवगुण माझ्या मध्ये आहेत. हे तुम्ही जाणता तरीही या विठ्ठलाने माझा अंगीकार केला. पांडुरंग जे काही करीत आहे त्यात माझे स्वहितच आहे आता याची खात्री मला आली आहे. या परमानदंने माझा भार आपल्या माथी घेतला आहे याचा मला अपार आनंद झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जिवाला याचे सुख वाटते आहे देवाला स्वःताच्या नावाचा अभिमान आहे त्याचे नामस्मरण जो कोणी करतो म्हणून तो शरनागताना तारतो.
अभंग क्र. ८३४
बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥
तुझ्या पायी मज जालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥धृपद॥
ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यासी तुझा ॥२॥
नाही नास ते सुख दिले तयास । जाले जे उदास सर्वभावे ॥३॥
तुका म्हणे सुख न माये मानसी । धरिले जीवेसी पाय तुझे ॥४॥
अर्थ
हे केशव राजा हे मायबापा तू भक्तांचे काम करण्यासाठी बहुउताविळच असतोस. तूझ्या पायी आता मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी सर्व आशा टाकून दिलेली आहे. ऋषीमुनी सिद्ध साधक असे अपार जन यांना तुझे स्वरूप समजले आहे. जे सर्व भावे देहाविषयी उदास झालेले त्यांना तू अपार असे सुख अविनाशी सुख दिलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा त्या साधू संता प्रमाणे मी ही तुझे चरण आता माझ्या जीवाशी हृदयाशी घट्ट धरून राहिलो आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये सुख मावेनसे झाले आहे.
अभंग क्र. ८३५
माया मोहोजाळी होतो सापडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥
काढूनि बाहेरि ठेविलो निराळा । कवतुक डोळा दाखविले ॥धृपद॥
नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखे साच केली ॥२॥
रडे फुंदे दुःखे कुटितील माथा । एकासी रडता ते ही मरे ॥३॥
तुका म्हणे मज वाटते नवल । मी माझे बोल ऐकोनिया ॥४॥
अर्थ
मी मोह जाळामध्ये सापडलो होतो पण या पांडुरंगाला माझी दया आली. त्याने मला यातून बाहेर काढले आणि इतर जन या जाळ्यात कसे अडकलेले आहेत याचे आश्चर्य दाखवले. या संसारातील लोक मायेने नाचतात उड्या मारतात व नाशिवंत जे सुख आहे त्यालाच ते खरे मानतात. त्या योगाने हे रडतात दुःख मानतात आणि दुसरा एखादा मेला की त्याविषयी चर्चा करतात पण नंतरही तसेच मरतात हे त्यांना समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या मायेच्या जाळ्यात अडकलेला जीव मी आणि माझे म्हणतो हे बोल ऐकून मला नवल वाटते.
अभंग क्र. ८३६
देहभाव आम्ही राहिलो ठेवूनि । निवांत चरणी विठोबाच्या ॥१॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढे देव करीतसे ॥धृपद॥
म्हणउनी नाही सुख दुःख मनी । ऐकिलिया कानी वचनाचे ॥२॥
जालो मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनिया ॥३॥
तुका म्हणे जालो जयाचा अंकित । तोचि माझे हित सर्व जाणे ॥४॥
अर्थ
आम्ही विठोबाचे चरणी देहभाव अर्पण केलेला आहे त्यामुळे आम्ही निवांत राहिलो आहोत. आमच्या हिताचा उपाय देवच जाणत आहे ते पुढचेही देवच करत आहे. हे वचन आम्ही संतांचे मुखातून ऐकलेले आहे त्यामुळे सुखदुःख मी जाणत नाही. मी माझा सर्व भार त्या विठ्ठलावर घालूनच निसंग निवांत एकटा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी ज्याचा सर्वभावे सेवक झालेलो आहे तोच माझे सर्व हित जाणत आहे.
अभंग क्र. ८३७
आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरी ते जतन होय देठी ॥१॥
नामेचि सिद्धी नामेचि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवता ॥धृपद॥
चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया नये काही ॥२॥
तुका म्हणे मध्ये पडती आघात । तेणे होय घात हाणी लाभ ॥३॥
अर्थ
एखाद्या वृक्षाला फळ आले आणि ते देठाला चिटकून राहिले तर ते चांगल्या प्रकारे पीकेल. नामाने सर्व काही सिद्ध होते पण दुसरीकडे कोठेही मन जाऊ देऊ नये. तुला ज्या मार्गाने मुक्कामाला जेथे जायचे असेल तेथे जाण्यासाठी तू त्या मार्गाने चालला आहे त्या मार्गाने चालत राहा जरी तुला काही प्रतिबंध होत असेल तरीही तू त्या मार्गाने चालत रहा म्हणजे मुक्कामाला पोहोचशील. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ मार्गांमध्ये अडचण येत असतात कोणत्याही प्रकारचा लाभ आणि याचा विचार करू नये.
अभंग क्र. ८३८
विरोधाचे मज न साहे वचन । बहु होते मन कासावीस ॥१॥
म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसता एकांती गोड वाटे ॥धृपद॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥
तुका म्हणे देव अंतरे यामुळे । आशामोहोजाळे दुःख वाढे ॥३॥
अर्थ
परमार्थाच्या विरोधामध्ये कोणीही काहीही बोलले मला ते बोलणे सहन होत नाही ते शब्द ऐकून माझे मन कासावीस होते. या कारणामुळे मला कोणाचीही संगती आवडत नाही मला एकांतच गोड वाटतो. मला देहाची भावना वासनेचा संग हे काहीही आवडत नाहीत मला त्याचा अगदी कंटाळा आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळे देह मोहजाळात अडकतो आणि देव आपल्यापासून अंतरतो व आपल्याला दुःख वाढते.
अभंग क्र. ८३९
तुजशी संबंध खोटा । परता परता रे तू थोटा ॥१॥
देवा तुझे काय घ्यावे । आप आपणा ठकावे ॥धृपद॥
जेथे मुद्दल न ये हाता । व्याज मरावे लेखिता ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनी तुझा ठसा ॥३॥
अर्थ
अरे थोटा लबाडा तुझ्याशी संबंध नसलेला बरा आमच्यापासून दूर राहिलेला बरा. देवा तुझ्या पासून आम्ही काय घ्यावे तुझ्या पासून मी काही घ्यावे तरते आपणच आपल्याला फसविल्या सारखे होते. जेथे कुळाकडून मुद्दलच हाताला येत नाही पण व्याजाचाहिशोब करता करताच मरण येण्याचा प्रसंग येतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तजनांना तू फासावितोस अशी कीर्ती तुझी त्रिभुवनात झालेली आहे.
अभंग क्र. ८४०
याचि हाका तुझे द्वारी । सदा देखो ऋणकरी ॥१॥
सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तू लंड ॥धृपद॥
सुखे गोविसी भोजना । लपवूनिया आपणा ॥२॥
एके एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥
अर्थ
देवा तुझ्या द्वारा मध्ये ऋण करी भक्त आरोळ्या देत असतात आणि तू त्यांना आषाढी वारीला या कार्तिकी वारीला या असे सांगतो असा तो लंड म्हणजे लबाड आहे. कोणी भक्त तुझ्याकडे त्याची इच्छित वस्तू मागण्यास आला तर त्याला तू भोग रूप जेवणात गुंतवितो आणि स्वतः माया रूप आवरणात लपून बसतोस. तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे तू तुझ्या भक्तांना काहीतरी देऊन त्यांचीसमजूत काढतो आणि त्यांना वाटे लावतो असा तू ठक आहेस म्हणजे लबाड आहेस.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















