आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ मार्च, दिवस ८७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १०३३ ते १०४४
“२८ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २८ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २८ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १०३३ ते १०४४ चे पारायण आपण करणार आहोत.
२८ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १२६ ते १५०,
126-8
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजशी लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासैती ॥126॥
अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपले अंतःकरणात माझ्याशी तल्लीन झालेले, व मद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत,
127-8
तया देहावसान जै पावे । तै तिही माते स्मरावे । मग म्या जरी पावावे । तरि उपास्ति ते कायसी ॥127॥
त्यांचा अंतकाल समीप यावा, त्यांनी माझे स्मरण करावे, आणि मग जर मी त्यास पावावे; तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग ?
128-8
पै रंकु एक आडलेपणे । काकुळती अंती धावा गा धावा म्हणे । तरि तयाचिये ग्लानी धावणे । काय न घडे मज ॥128॥
हे पहा की संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेंही मोठ्या काकुळतीने ‘ देवा, धावरे धाव ‘ म्हणून माझा धावा केला, तर त्याचे दुःख निवारण करण्याकरिता मला जावे लागत नाही काय ?
129-8
आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥129॥
आणि माझे जे भक्त आहेत, त्यांची जर तीच दशा झाली तर त्यांनी मग माझ्या भक्तीचे श्रम तरी का करावे ? म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको.
130-8
तिही जे वेळी मी स्मरावा । ते वेळी स्मरला की पावावा । तो आभारूही जीवा । साहवेचि ना ॥130॥
ते ज्या वेळी स्मरण करितात त्या वेळीच त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. (ते माझी भक्ति करितात) हे देखील मला सहन करवत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-8
ते ऋणवैपण देखोनि आंगी । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागी । भक्ताचिया तनुत्यागी । परिचर्या करी ॥131॥
अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहो हे पाहून, त्यातून उतराई होण्याकरिंता मी आपल्या भक्ताच्या अंतकाली त्याची सेवा करतो.
132-8
देहवैकल्याचा वारा । झणे लागेल या सकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरा । सूये तयाते ॥132॥
देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवितो; त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची थंडगार अशी सावली करतो;
133-8
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हीवाऐसी करी साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणी तयाते ॥133॥
आणि अशा प्रकारे, ज्यांची बुद्धि नेहमी मजकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरुपी आणितो.
134-8
म्हणोनि देहातीचे सांकडे । माझिया कहीचि न पडे । मी आपुलियाते आपुलीकडे । सुखेचि आणी ॥134॥
म्हणून, देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तांस कधीही होत नाही, व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखाने आपल्याकडे आणतो
135-8
वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणापा मेळवी ॥135॥
आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून व त्यातला अहंकाररूप धुरळा झाडून केवळ भगवत्प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो;
136-8
आणि भक्ता तरी देही । विशेष एकवंकीचा ठाव नाही । म्हणऊनि अव्हेरू करिता काही । वियोग ऐसा न वाटे ॥136॥
आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी प्रेम नसल्यामुळे, त्याचा त्याग करतांना, त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही.
137-8
ना तरी देहातीचि मिया यावे । मग आपणपे याते न्यावे । हेही नाही जे स्वभावे । ते आधीचि मज मीनले ॥137॥
कारण, देहाच्या अंतसमयी भगवंतांनी पावावे आणि आपलेजवळ न्यावे, असेही त्यांच्या मनात येत नाही; का की, ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात.
138-8
येरी शरीराचिया सलिली । असतेपण हे साउले । वाचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीचि आहे ॥138॥
याशिवाय त्यांचे जे शरीर राहीले त्या शरीररुप पाण्यात आत्मा असतो खरा; परंतु तो सावलीप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी खरोखर पांहू गेले असता ते चंद्राचेचे ठिकाणी आहे.
139-8
ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । म्हणाऊनि देहाती निश्चित । मीचि होती ॥139॥
असे जे माझे नेहमी स्मरण करणारे आहेत, त्यांना मी नेहमी जवळच आहे. म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात.
140-8
मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥140॥
मग, जे (शरीर)क्लेशरूप झाडाचे वन, जे तापत्रयरूप अग्नीची शेगडी, जे मृत्युरूप कावळ्यास बळी दिले आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-8
जे दैन्याचे दुभते । जे महाभयाते वाढविते । जे सकळ दुःखाचे पुरते । भांडवल ॥141॥
जे दैन्य वाढविते, जे मृत्युचे भय वाढविणारे, जे सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल,
142-8
जे दुर्मतीचे मूळ । जे कुमार्गाचे फळ । जे व्यामोहाचे केवळ । स्वरूपचि ॥142॥
जे वाईट बुद्धिचे मूळ, जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ, जे भ्रांतीचे केवळ स्वरुपच,
143-8
जे संसाराचे बैसणे । जे विकाराचे उद्याने । जे सकळ रोगांचे भाणे । वाढिले आहे ॥143॥
जे संसाराची बसण्याची जागा, जे अहंकारादि विकरांची बाग, जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच होय;
144-8
जे काळाचा खिचउशिटा । जे आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावे जे ॥144॥
जे काळाने चघळुन टाकलेली उष्टी खिचडी, जे आशेचे अंगबळ; जे स्वभावतः जन्ममरणाला ओल देणारे,
145-8
जे भुलीचे भरीव । जे विकल्पाचे वोतीव । किंबहुना पेव । विंचुवाचे ॥145॥
देणारे, जे भ्रांतीने भरलेले, जे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबहुना विंचवाचे पेवच होय,
146-8
जे व्याघ्राचे क्षेत्र । जे पण्यांगनेचे मैत्र । जे विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥146॥
जे वाघाची जाळी, जे वेश्यांचे मित्र म्हणजे मनाला वेश्येप्रमाणे मोह घालणारे, जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय;
147-8
जे लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जे विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥147॥
जे (राक्षसी) जखिणीच्या दयेचे ठिकाण, व विषयरूपी थंड पाण्याचा घोट, जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय;
148-8
जे कोढियाचे खेंव । जे काळसर्पाचे मार्दव । गोरियाचे स्वभाव । गायन जे ॥148॥
जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ, जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर,
149-8
जे वैरियाचा पाहुणेर । जे दुर्जनाचा आदर । हे असो जे सागर । अनर्थाचा ॥149॥
जे वैऱ्याच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगतस्वागत, फार काय सांगावे ? जे अनर्थाचा समुद्रच होय,
150-8
जे स्वप्नी देखिले स्वप्न । जे मृगजळे सासिन्नले वन । जे धूम्ररजांचे गगन । ओतले आहे ॥150॥
जे अनर्थाचा समुद्रच होय, जे स्वप्नात पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन, व धुराच्या रजांनी भरलेले आकाश,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ८७ वा, २८, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०३३ ते १०४४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग – १०३३
तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥
जेथे ते च नाही जाले । झाडा घेतला विठ्ठले ॥धृपद॥
वास वासनेसी नाही । मन पागुळले पायी ॥२॥
शेष उरला तुका । जीवी जीवा जाला चुका ॥३॥
अर्थ
या विठ्ठलाच्या कृपेने मला असे झाले की तहानेनेच तहान प्यावून घ्यावी आणि भूकेनेच भूक खावी. तहान व भूक ज्या जीवाचे धर्म आहेत तो जीवच आता जीवत्वदशेने नाहीसा झाला आहे व या सर्वाचा झाडा या विठ्ठलाने केला आहे. आता वासनेला आश्रयच राहीला नाही कारण ज्या मनात वासना राहाते ते मनच आता हरीच्या चरणाच्या ठिकाणी पागुळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझ्या जीवाचा जीवदशेचा बाद झाला असून मी आता कुठस्थ ब्रम्हरुपाने उरलो आहे. ”
अभंग – १०३४
पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥१॥
आवश्यक देव मनी । चिंतनीच सादर ॥धृपद॥
भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशी शयन ॥२॥
पाघरोनि तुका दिशा । केला वास अलक्षी ॥३॥
अर्थ
वैराग्य, ज्ञान आणि भक्ती हे ज्याच्या ठिकाणी आहे आणि अष्टदिशा ज्याचे वस्त्र झालेले आहेत असा जो कोणी दिगंबर आहे त्याचे हातच खाण्यापिण्याकरता पात्रासारखे आहेत. असे जे कोणी दिगंबर आहेत त्याचे मन हरीचिंतनासाठी नेहमी तत्पर असते त्यांना कोणत्याही पदार्थाची गरज वाटत नाही. भिक्षासारखी कामधेनू त्यांच्याजवळ असते आणि ते आकाशाखाली झोपत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा या दिगंबराने दहाही दिशांचे पाघरुन करुन अंगावर घेतलेले असतात व ते अलक्ष अशा परमात्माच्या ठिकाणी वास करतात. ”
अभंग – १०३५
विषयी विसर पडिला निःशेष । अंगी ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥धृपद॥
लाभाचिया सोसे पुढे चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥
तुका म्हणे गंगासागरसंगमी । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥
अर्थ
मला आता विषयांचा विसर पडला आहे कारण आता माझ्या अंगी पूर्णपणे ब्रम्हरस ठसवला आहे. आता माझी वाचा मला अनावर झाली आहे कारण तिने हरीनामाचा छंद घेतला आहे. ज्याप्रमाणे कृपण मनुष्य धनाच्या हव्यासाने वेगवेगळे प्रयत्न करुन धन प्राप्त करुन घेतो त्याप्रमाणे माझ्या मनानेही आता या हरीचा आनंद मिळवण्याकरता या हरीनामाचा छंद घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याप्रमाणे गंगा आणि सागर यांचा संगमा नंतर ते दोन्ही एकरुप होतात त्याप्रमाणे मीही या भक्ती आणि ज्ञानाच्या आनंदात तद्रूप झालो आहे. ”
अभंग – १०३६
रामकृष्णनाम मांडी पा वोळी । तेणे होईल होळी पापा धुनी ॥१॥
ऐसा मना छंद लावी रे अभ्यास । जया नाही नास ब्रम्हरसा ॥धृपद॥
जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढे आस नुरे मागुताली ॥२॥
तुका म्हणे ऐसे धरा काही मनी । यातायाती खाणी चुकतील ॥३॥
अर्थ
तू फक्त आपल्या जीभेने रामकृष्ण नाम हे ओळीने बसव त्यामुळे तुझ्या पापाची होळी होईल. अरे तू तुझ्या मनाला या ओळीचा छंद लाव या ओळीच्या अभ्यासाचा छंद लाव त्यामुळे तुला “ज्याचा नाश होत नाही अशा ब्रम्हरसाचा काढा मिळेल”. मनुष्याने अशा धनाची प्राप्ती करुन घ्यावी की जे धन कधीही संपणार नाही व पुढेही आपल्याला असेच हेच धन मिळावे अशी तळमळ धरावी. तुकाराम महाराज म्हणतात, “असेच अविनाशी धन मिळवण्याचा विचार तुम्ही मनात धरा की ज्यामुळे तुमच्या जन्ममरणाच्या खाणी भोगायच्या चुकतील. ”
अभंग – १०३७
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळू नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढता इंधनी वाढविला ॥धृपद॥
पितियाने तैसा वंदावा कुमर । जयाचे अंतर देवे वसे ॥२॥
तुका म्हणे शिरी वाहावे खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
अर्थ
जो परमार्थी आहे, ब्रम्हनिष्ठ आहे, हरीभक्त आहे त्याला आपण कोणतेही नाते जोडू नये त्याला आपला म्हणू नये त्याच्याशी लहान असला म्हणून त्याची अवहेलना करु नये कारण त्याचा अधिकार मोठा असतो. अग्नीची ठिणगी थोडी लहान जरी असले तरी लाकडाच्या संयोगाने ती मोठया अग्नीत रुपातर करते त्याचप्रमाणे हा परमार्थी मनुष्य लहान जरी असला ज्ञान आणि भक्तीच्या साहाय्याने तो मोठा अधिकारी असतो. ज्याच्या अंत:करणात नित्य देव वसलेला असतो अश्या पुत्राला बापानेही नमस्कार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “खापराच्या भांडयामध्ये नवनीत म्हणजे लोणी असेल तर त्या खापराला सुध्दा आपल्या डोक्यावर वाहावे लागते. जरी ते खापर मातीचे असले तरीही तसेच त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ब्रम्हनिष्ठ माणसाला परमार्थामध्ये किंमत असते त्यामुळे त्याचा देह, वय, कुळ, जात ही जरी हीन असली तरी तो सर्वाना पूज्य आहे. ”
अभंग – १०३८
ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वे ॥१॥
देव तया जवळी असे । पाप नासे दर्शणे ॥धृपद॥
कामक्रोधा नाही चाली । भूती जाली समता ॥२॥
तुका म्हणे भेदाभेद । गेला वाद खंडोनि ॥३॥
अर्थ
या जगामधे सर्वत्र देवच आहे असा ज्याचा दृढनिश्चय असतो. देव त्याच्याजवळ राहात असतो व त्याच्या दर्शनाने पाप नाहीसे होते. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा क्राम क्रोध वास्तव्य वास करत नाही व त्याच्या अंत:करणामध्ये सर्वत्र देव आहे सर्व भूतमात्रांविषयी समान भावना प्राप्त झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा या ब्रम्हरुप झालेल्या माणसांच्या मनामधून भेदाभेद व वादविवाद खंडीत झालेले असतात.
अभंग – १०३९
सेवा ते आवडी उच्चारावे नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥
न लगे हालावे चालावे बाहेरी । अवघे चि घरी बैसलिया ॥धृपद॥
देवाची च नामे देवाचिये शिरी । सर्व अळंकारी समर्पावी ॥२॥
तुका म्हणे होय भावे चि संतोषी । वसे नामापाशी आपुलिया ॥३॥
अर्थ
सर्व भेद अभेद बाजूला सारुन हरीचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरी हरीची सेवा आहे. हरीचे नाम घेण्याकरता कोठे बाहेर यावे जावे लागत नाही फक्त घरी बसूनच हरीचे नाम घेतल्याने सर्व लाभ होतात. देवाचे नाम हेच गंध, पुष्प, अलंकार सर्व साधने पूजेचे साधने समजून देवाच्या शीरावर अर्पण करावेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरी राहात असतो. ”
अभंग – १०४०
ज्ञानियांचे घरी चोजविता देव । तेथे अहंभाव पाठी लागे ॥१॥
म्हणोनिया अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥धृपद॥
वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकामधी ॥२॥
पाहो गेलो भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथे देखे चेष्टा विपरीत ॥३॥
आपुलिया नाही निवाले जे अंगे । योगी करती रागे गुरगुरु ॥४॥
तुका म्हणे मज कोणांचा पागिला । नको बा विठ्ठला करू आता ॥५॥
अर्थ
ज्ञानी मनुष्याच्या घरी मी देव पाहाण्यास गेलो तर मला तेथे फक्त शब्दज्ञानाचा अहंकार त्याच्या पाठी लागलेला आहे असे दिसले. म्हणूनच देवा आता मी सर्व उपाय टाकून दिलेले आहेत आणि तुझे पाय दृढ धरलेले आहे. वेदपठन करणारे पंडीत वाचक यांच्यामधे जाऊन पाहिले तर ते त्यांचे मत मांडतात व प्रत्येकाचे मत वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे एकमेकांमधे मत मिळत नाही. हरीभक्तीमध्ये भक्तीभाव कसा असतो आत्मनिष्ठा त्यांची कशी असते हे पाहाण्याकरीता गेलो पण तेथे सारा त्यांचा दंभ स्वैराचार चेष्टा हे विपरीत प्रकार दिसून आले. योगी यांच्याकडे गेलो तर समाधी स्थितीने शांत ते झाले नाही असे मला दिसले तर याउलट ते लोकांवरच गुरगुर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “म्हणून हे विठ्ठला मला या सर्वाचे परीक्षण केल्यानंतर यापैकी कोणाचाही अंकीत करु नकोस. ”
अभंग – १०४१
पंढरीची वाट पाहे निरंतर । निढळावरी कर ठेवूनिया ॥१॥
जातिया निरोप पाठवी माहेरा । का मज सासुरा सांडियेले ॥धृपद॥
पैल कोण दिसे गरुडाचे वारिके । विठ्ठलासारिके चतुर्भुज ॥२॥
तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा । भेटसी केधवा पांडुरंगा ॥३॥
अर्थ
मी माझ्या कपाळावर हात ठेउन कोणीतरी पंढरपूर वरून येत आहे का यांची वाट पाहात आहे. करण पंढरीकडे जाणाऱ्या म्हणजे माझे माहेरकडील जाणाऱ्या भक्तांकडे मला असा निरोप पाठवायचा आहे की या संसाराच्या सासुरवाडीत देवा मला का सोडले ? मला पलीकडे कोणीतरी विठ्ठला सारखागरुडावर बसलेला चतुर्भुज दिसत आहे कोण आहे ते ? तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तू मला आता केंव्हा भेटशील मला आता धीर राहिलेला नाही तरी तू लवकर ये.
अभंग – १०४२
ऐसी जोडी करा राम कंठी धरा । जेणे चुके फेरा गर्भवास ॥१॥
नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तेचि फळ ॥धृपद॥
नांव धड करा सहस्र नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरीरामबाणी ॥३॥
अर्थ
कंठा मध्ये राम नाम राहील अशी जोडी (लाभ) तुम्ही धरा त्यामुळे तुमचा गर्भ वासाचा फेरा चुकेल. हा संसार नाशिवंत आहे व त्याचे मूळ म्हणजे दुःख देणारे आहे. स्त्री पुत्र धन यांच्या साठी केलेले खटाटोप व्यर्थ ठरेल. सहस्रनामाची नांव मजबूत करा की, जेणेकरून ती नांव तुम्हाला या भवसागरातून पार करेल. तुकाराम महाराज म्हणतात हरी नामाची तुम्ही हृदयात भाते भरा आणि त्या काळाच्या तोंडावर मारा.
अभंग – १०४३
पाहे मजकडे भरोनिया दृष्टी । बहुत हिंपुटी जालो माते ॥१॥
करावेसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हे वचन श्रुंगाारिक ॥धृपद॥
सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचे ते नव्हे ॥२॥
तुका म्हणे माझी कळवळ्याची कीव । भागलासे जीव कर्तव्याने ॥३॥
अर्थ
हे विठाबाई, हे माझे आई मी फार कष्टी झालो आहे तरी तू माझ्याकडे डोळे भरून पहा. माझ्या जीवाला तुझे प्रेम रस स्तनपान करावेसे वाटत आहे, माझे हे बोलणे अलंकारिक नसून किंवा खोटेपणाचे नसून अगदी खरे आहे माझे हे बोलणे विचारपूर्वक आहे आणि ते केवळ सत्य साठीच आहे ते केवळ शब्दाला शब्द जोडून केलेले वाक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठाबाई माझी आई ही प्रार्थना कळकळीची आहे कारण माझा जीव या भव सागरातील कर्तव्य करून थकला आहे.
अभंग – १०४४
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि का केला धीर पांडुरंगा ॥१॥
आझुनि का नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥धृपद॥
आळवितो जैसे पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनी तानभूक ॥२॥
प्रेमरसपान्हा पाजी माझे आई । धावे वो विठाई वोरसोनि ॥३॥
तुका म्हणे माझे कोण हरील दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा, तुम्ही कृपेचे सागर आहात तरी मला भेटण्यासाठी तुम्ही एवढा उशीर का केलास ? हे देवराया तू काय पाहतोस तुला अजूनही माझी दया का येत नाही ? देवा अरण्यांमध्ये हरिणीचे पाडस जसे त्याच्या आईला हाक मारते तसे मी तुला आळवित आहे. हे विठाई तुझ्या प्रेम रसाचा पान्हा तू मला पाज तू धावत माझ्याकडे लवकर ये. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंग राया तुझ्या वाचून कोण माझे दुःख हरण करीन ?
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















