४ मार्च, दिवस ६३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २२६ ते २५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ७४५ ते ७५६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“4 मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ४ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७४५ ते ७५६ चे पारायण आपण करणार आहोत.


XX मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी XXX ते XXX,

226-6
तेथ नक्षत्र जैसे उलंडले । की सुर्याचे आसन मोडले । तेजाचे बीज विरुढले । अंकुरेशी ॥226॥
त्या वेळी नक्षत्र तुटून पडतेवेळी जसे तेजस्वी दिसते अथवा सूर्याने आपले आसन सोडून खाली यावे, अथवा तेजाचे बीज अंकुरासहित विकसित व्हावे,
227-6
तैशी वेढियाते सोडती । कवतिके आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥227॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती आपले वेटोळे सोडीत, लीलेने अंग मोडीत नाभिस्थानाजवळ स्वधिष्ठानचक्रावर उठलेली दिसते.
228-6
सहजे बहुता दिवसांची भूक । वरी चेवविली ते होय मिष । मग आवेशे पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥228॥
सहजच तिला अनेक दिवसांची; आणि तशातच वज्रसनाच्या उष्णतेने जागृत केलेली भूक हे एक कारण होते. त्यामुळे ती कुंडलिनी शक्ती सहजच आवेशाने सरळच वर तोंड पसरते.
229-6
तेथ हृदयकोशातळवटी । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥229॥
अर्जुना ! ! तेंव्हा हृद्यकमळाच्या खाली जो अपान वायू भरलेला असतो, त्या वायूंच्या सर्वागाला मिठी मारून पोटात घालते.
230-6
मुखीच्या ज्वाळी । तळी वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगु लागे ॥230॥
मुखातील ज्वालाने खालचा- वरचा भाग व्यापते आणि मासांचे घास खाऊ लागते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

231-6
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घास । हियाही भरी ॥231॥
ज्या ज्या ठिकाणी मांसल भाग असेल, त्या त्या ठिकाणचा घास तिला वरवरच मिळतो आणि नंतर ती राहिलेल्या भागाचेही घास घेते.
232-6
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वीचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥232॥
मग पायाचे तळवे आणि तळहात यांचा शोध घेत, तेथील मांसल भाग खाऊन प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते.
233-6
आधार तरी न संडी । परि नखींचेही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशी ॥233॥
ती शक्ती आपली मूळ जागा न सोडता तेथेच राहून नखांतले सत्वदेखील बाहेर काढते. त्वचा धुऊन हाडांच्या सापळ्याशी चिकटवून देते.
234-6
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥234॥
हाडांचे नळे निरपून घेते. शिरांच्या कड्यांना ओरपुन काढते, तेंव्हा बाहेरच्या केसांच्या मुळांची वाढ करपून जाते.
235-6
मग सप्तधांतूच्या सागरी । ताहानेली घोट भरी । आणि सवेचि उन्हाळा करी । खडखडीत ॥235॥
तहानेने व्याकुळ झालेली ती शक्ती रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंच्या समुद्रात येऊन एका घोटाने पिऊन टाकते. त्यामुळे सर्व शरीर खडखडीत कोरडे होऊन जाते.

236-6
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥236॥
दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जो बारा बोटे लांब वारा वाहत असतो, त्याला गच्च धरून पुनः आत घालते. ( नासापुटौनि म्हणजे नाकपुड्यातून)
237-6
तेथ अध वरौते आकुंचे । ऊर्ध्व तळौते खाचे । तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥237॥
त्यावेळी खालचा अपाणवायू वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली जातो. त्या प्राण-अपानवायूच्या भेटीमध्ये शटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात.
238-6
एऱ्हवी तरी दोन्ही तेव्हाचि मिळती । परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती । ते तयाते म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथे ॥238॥
प्राण व अपान वायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळाले असते; परंतु कुंडलिनी शक्ती क्षणभर तेथे क्षोभलेली असते; म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम आहे ?
239-6
आइके पार्थिव धातु आघवी । आरोगिता काही नुरवी । आणि आपाते तव ठेवी । पुसोनिया ॥239॥
अर्जुना, ऐक. पृथ्वीपासून निर्माण झालेले शरीरातील जे धातू आहेत, ते खाऊन ती शक्ती काहीही शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर चाटून पार पुसून टाकते.
240-6
ऐसी दोनी भुते खाये । ते वेळी संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशी ॥240॥
याप्रमाणे शरीरातील पृथ्वी आणि जल ही दोन्ही भुते ज्यावेळी ती खाते, त्यावेळी ती पूर्णपणे तृप्त होते, मग सौम्य बनते आणि सुषुम्नेजवळ स्थिर होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

241-6
तेथ तृप्तीचेनि संतोषे । गरळ जे वमी मुखे । तेणे तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये ॥241॥
त्यावेळी तृप्त होऊन संतोषाने तोंडाने गरळ ओकते. ते गरळ अमृत होऊन त्यामुळेच प्राण जगत असतो.
242-6
तो अग्नि आतूनि निघे । परि सबाह्य निववूचि लागे । ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती ॥242॥
शक्तीच्या तोंडातून तो गरळरूपी अग्नी बाहेर निघतो आणि शरीराला आतून – बाहेरून शांत करू लागतो, त्यावेळी शरीराच्या गात्रांची गेलेली शक्ती पुनः येऊ लागते.
243-6
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचे । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाही ॥243॥
नाडीची गती बंद पडते. शरीरातील (अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, देवदत्त, कृकल आणि धनंजय) स्नानभेदाने असणारे नऊ प्रकारचे वायू नष्ट होतात, त्यामुळे तहान भूक वगैरे शरीराचे धर्म नाहीसे होतात.
244-6
इडा पिंगळा एकवटती । गाठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥244॥
इडा आणि पिंगळा या दोन नाड्या एक होतात. (हृदयस्थानाची ब्रम्हग्रंथी, कंठस्थानाची विष्णूग्रंथी आणि भृमध्यस्थानी असलेली रुद्रग्रंथी) या तीन गाठी सुटतात. व सहा चक्राचेहि पदर फुटतात.
245-6
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिवसिता न दिसे ॥245॥
डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला चंद्र असे म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य असे म्हणतात. अशा अनुमाणिक कल्पनेने ठरवलेले दोन प्रकारचे वायू नाका पुढे कापसाची वात धरून पहिले, तरी ते सापडत नाहीत.

246-6
बुध्दीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे । तोही शक्तिसवे संचरे । मध्यमेमाजी ॥246॥
बुद्धीची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती विरून जाते. नाकामध्ये गंध घेण्याची जी शक्ती असते, ती कुंडलिनी शक्तीबरोबर सुषुम्नेमध्ये प्रवेश करते.
247-6
तव वरिलेकडोनि ढाळे । चंद्रामृताचे तळे । कानवडोनि मिळे । शक्तिमुखी ॥247॥
त्यावेळी वरच्या बाजूस आलेले चांद्रमृताचे तळे हळूहळू कलते होते आणि ते चांद्रमृत कुंडलिनी शक्तीच्या मुखात पडते.
248-6
तेणे नाळके रस भरे । तो सर्वागामाजी संचरे । जेथिचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥248॥
त्यामुळे शक्तीरूपी नळीत अमृतसर भरून जातो आणि तो रस सर्वागामध्ये पसरत राहतो. प्राणवायू जिथल्या तिथेच लय पावतो.
249-6
तातलिये मुसे । मेण निघोनि जाय जैसे । कोंदली राहे रसे । वोतलेनि ॥249॥
तापलेला रस मुशीमध्ये ओतला म्हणजे मुसदेखील तप्त होते आणि आतील मेण आपोआप निघून जाते; मग ती मुस ओतलेल्या रसानेच भरलेली राहते,
250-6
तैसे पिंडाचेनि आकारे । ते कळाचि का अवतरे । वरी त्वचेचेनि पदरे । पांगुरली असे ॥250॥
त्याप्रमाणे ते शरीर एवढे तेजुयक्त दिसते की, जणू काही त्वचेचे पदर पांघरलेले तेजच प्रकट झालेले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ६३ वा, ४, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७४५ ते ७५६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ७४५
साजे अळंकार । तरि भोगिता भ्रतार ॥१॥
व्यभिचारीचा टाकमटिका । उपहास होती लोका ॥धृपद॥
शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणी ॥२॥
तुका म्हणे जिणे । शर्त्ती विण लाजिरवाणे ॥३॥
अर्थ
जर पती त्याच्या पत्नीचा उपभोग घेत असेल तर, त्या स्त्रीचे दागिने शोभून दिसतो. परंतु तोच दागिना एखाद्या व्यभिचारिण स्त्रीने परिधान केला तर तिचा उपहास होतो. ज्याचे वागणे हि शूरत्वाचे आणि बोलणे हि शूरत्वाचे असते तो दिसतोही शूर आणि असतोही शूर. तुकाराम महाराज म्हणतात निर्धारावाचून (हरी भक्तीचा निर्धारा वाचुन) जगणे हे लाजिरवाणे जिणे आहे.
अभंग क्र. ७४६
मानामान किती । तुझ्या क्षुल्लक संपत्ती ॥१॥
जा रे चाळवी बापुडी । कोणी धरितील ती गोडी ॥धृपद॥
रिद्धीसिद्धी देसी । आह्मी चुंभळे नव्हो तैसी ॥२॥
तुका म्हणे ठका । ऐसे नागविले लोका ॥३॥
अर्थ

हे देवा मान आणि अपमान या तुझ्या किती शुल्लक संपत्ती आहेत ? ज्या लोकांना याची गोडी आहे त्या वेड्यांना ती तू देत जा. तू आम्हाला रिद्धी सिद्धी देशील पण आम्ही तसे लोभी नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा असे मान आणि अपमानाची संपत्ती देऊन तू किती लोकांना फसविले आहेस.
अभंग क्र. ७४७
पाहातोसी काय । आता पुढे करी पाय ॥१॥
वरी ठेवू दे मस्तक । ठेलो जोडूनि हस्तक ॥धृपद॥
बरवे करी सम । नको भंगो देऊ प्रेम ॥२॥
तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥
अर्थ

हे देवा तू काय पाहतोस तुझे चरणकमल पुढे कर. मी हात जोडून उभा आहे, तुझ्या चरणावर मला माझे मस्तक ठेऊ दे. तुझे दोन्ही पाय जोडून उभा राहा माझे प्रेम भंगू देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात आता चला देवा विठ्ठला मी तुमच्या अगदी समोर उभा आहे मला पाया पडू द्या.
अभंग क्र. ७४८
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥धृपद॥
निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । काहीच साकडे पडो नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलिया भय नरका जाणे ॥३॥
अर्थ

जे देहा विषयी उदास आहेत तेच भक्त जाणावे. त्यांचि आशापाश निवारण झालेले आहे. त्यांचा विषय म्हणजे फक्त नारायण झालेला असतो. त्यांना या संसारातील जन, धन, सगे काहीच आवडत नाहि, अश्या भक्तांच्या मागे पुढे देंव त्यांचे सर्व कष्ट निवारण करण्या साठी उभा असतो. यांना तो कधी संकटात सापडू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सत्य काम जे असेल त्याला सहकार्य करावे नाही तर जो कोणी सत्य कर्मात अडथळा आणतो त्याला नरकात जावे लागते.
अभंग क्र. ७४९
तोचि ही क्षुल्लके सखी सहोदरे । नाही विश्वंभरे वोळखी तो ॥१॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होता सकळ मिथ्या ॥धृपद॥
रवि नुगवे तो दीपिकाचे काज । प्रकाशे ते तेज सहज लोपे ॥२॥
तुका म्हणे देहसंबंधे संचिते । कारण निरुते नारायणी ॥३॥
अर्थ
विश्वंभरची ओळख आपल्याला तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत आपण संसारातील सगळे नाते सगे सोयरे जन धन याला विसरत नाही, तो पर्यंत त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. आपण त्याला ओळखू शकत नाहि. जेंव्हा आपल्याला समजते किंव्हा अनुभव येतो की, नारायणच या विश्वाचे पालन पोषण करतो, तेंव्हा जग हे मिथ्या वाटू लागते. सूर्य उगवत नाही तो पर्यंत दीपकाचे काम असते, व नंतर सूर्य उगवला कि त्या दीपकाचे काम संपते. तुकाराम महाराज म्हणतात हा देह आपल्याला संचीताने प्राप्त झालेला असतो, त्यामुळे याच उपयोग हा नारायणाच्या मिळण्यासाठी करावा.
अभंग क्र. ७५०
यज्ञ भूताच्या पाळणा । भेद कार्य कारणा ।
पावावया उपासना । ब्रम्हस्थानी प्रस्थान ॥१॥
एक परी पडिले भागी । फळ बीजाचिये अंगी ।
धन्य तोचि जगी । आदि अंत सांभाळी ॥धृपद॥
आवश्यक तो शेवट । येर अवघी खटपट ।
चालो जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥
तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा ।
पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादे ॥३॥
अर्थ

यज्ञाने पाउस पडतो, त्यामुळे सर्व प्राणी मात्रांचे पालन पोषण होते हे कार्य कारणाचा संबंध असला तरी हरीची उपासना केली पाहिजे व जीवाने ब्रम्ह स्थिती प्राप्त केली पाहिजे. ईश्वर स्वरूपाचे बीज हे वेगवेगळ्या ठिकाणी वाटले गेले आहे, ते फळ अव्यक्त स्वरूपाचे असते. या फळाच्या व बीजाच्या आदी व अंती जो परमेश्वर आहे त्याचे अनंत रूप आहे तोच सांभाळ करणारा आहे व जो हरीची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो तो जगामध्ये धन्य आहे. हा श्रीहरी प्राप्त करून घेणे महत्वाचे आहे इतर खटपट हि व्यर्थ आहे त्या हरीशी एक्य पावणारा क्वचितच एखादा असतो. तुकाराम महाराज म्हणतात मी क्षर आणि अक्षर याहून वेगळा झालो आहे, विठ्ठलाच्या कृपाप्रसादानेच मी तुम्हाला उपदेश करत आहे.
अभंग क्र. ७५१
वेदपुरुष तरि नेती का वचन । निवडूनि भिन्न दाखविले ॥१॥
तुझी वर्मे तूचि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणे ॥धृपद॥
यज्ञाचा भोक्ता तरि का नव्हे सांग । उणे पडता अंग क्षोभ घडे ॥२॥
वससील तू या भूताचे अंतरी । तरि का भेद हरी दावियेला ॥३॥
तपतिर्थाटणे तुझी मूर्तीदान । तरि का अभिमान आड येतो ॥४॥
आता क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनिया हाका उभा द्वारी ॥५॥
अर्थ

हे देवा तुम्ही तर साक्षात वेद रूप आहात तरी हि तुम्हाला “नेती नेती” या शब्दाने जगापेक्षा वेगळे का बरे केले ? हे अनंता तुझे जे काही वर्म आहेत ते तूच दाखविले आहे, मग हे वर्म दाखवून तू कोणत्या गुणामुळे नेणता होतोस ? तू तर यज्ञाचा भोक्ता आहेस, मग तो यज्ञ का पूर्ण होत नाहि ? त्यात काही उणे असल्यावर क्षोभ का होतो ? हे देवा तू सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वसतोस मग हा भेद का निर्माण केलास ? तप करणे, तीर्थाटन करणे, दान करणे हे जर सर्व तुझीच मूर्ती आहेत मग हे सर्व करणारे लोकांच्या मानत अभिमान का निर्माण होतो ? तुकाराम महाराज म्हणतात आता मला क्षमा करावी देवा कारण हि सर्व गाऱ्हाणी मी तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्या दारात उभा राहून मी तुम्हाला विनंती करत आहे व हाक मारत आहे.
अभंग क्र. ७५२
जळे माझी काया लागला वोणवा । धाव रे केशवा मायबापा ॥१॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जाले ॥धृपद॥
फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे । पाहातोसी काय हृदय माझे ॥२॥
घेऊनि जीवन धावे लवलाही । कवणाचे काही न चले येथे ॥३॥
तुका म्हणे माझी तू होसी जननी । आणीक निर्वाणी कोण राखे ॥४॥
अर्थ

हे केशवा माझ्या शरीराला वानवा लागला आहे तू लवकर धावत ये. माझ्या शरीराची कांती व तेज हे जळू लागले आहे, माझ्या शरीराचा दाह होत आहे तो मला सहन होत नाही. अरे पांडुरंगा माझ्या शरीराचे आता फुटून दोन भाग होऊ लागले आहेत, आणि हे केशव तू अजून माझे हृदय काय पाहतोस ? तू दाह शांत करण्यासाठी पाणी घेऊन लवकर ये, तुझ्या वाचून येथे कोणाचे काहीच चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात तूच माझी जननी आहे मग तुझ्यावाचून कोण माझे रक्षण करणार ?
अभंग क्र. ७५३
नामदेवे केले स्वप्नमाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृपद॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटी लावी तुका ॥३॥
अर्थ

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले. देवाचे वर्णन केलेले कवित्व करावे, उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले व त्यांनी मला अभंग तयार करावयास लावले आहे. मी झोपेत होतो निद्रा अवस्थेत असताना संत नामदेव माझ्या स्वप्नात आले व त्यांनी मला थोपटून जागे केले व म्हणाले, तू अभंगाचे माप पुरपूर टाक, असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की, ”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”
अभंग क्र. ७५४
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायापाशी ॥१॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून । आता उदासीन न धरावे ॥धृपद॥
शेवटील स्थळ निच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवा पायी तुकया स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
अर्थ

ज्या वेळी संत नामदेव महाराज व श्री विठ्ठल माझ्या स्वप्नात येऊन मला अभंग रचना करण्यास त्यांनी आज्ञा केली त्यावेळी मी त्यांना म्हणालो की जर तुम्ही मला तुमच्या पायाजवळ आश्रय दिला तर मी तुमच्या संगतीत राहील संतांच्या पंगतीत मी बसू शकेल मग मला अभंग रचना करण्याचा अधिकार प्राप्त होईल. तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी माझ्या आवडीचे ठिकाण सोडून तुमच्या कडे आलो आहे. आता तुम्ही माझ्या विषयी उदासीन असू नये. मी शेवटच्या जागी बसतो, माझी वृत्ती नीच आहे, परंतु आता मला तुमच्या आधारे विश्रांती मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेव यांच्या पायी माझी स्वप्नात भेट झाली आहे. त्यामुळे अभंग कवित्व करण्याच्या स्फुर्तीचा प्रसाद माझ्या पोटी म्हणजे हृदया मध्ये भरून राहिलेला आहे.
अभंग क्र. ७५५
अभक्त ब्राम्हण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कुळ याती ॥धृपद॥
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥२॥
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥
अर्थ

अभक्त ब्राम्हण असेल तर त्याच्या तोंडाला आग लागो, त्याच्या आईने तरी त्याला का जन्म दिला असेल ? जर एखादा वैष्णव चांभार असेल तर त्याचि माता शुध्द असून त्याचे संपूर्ण सर्व कुळ शुध्द असते. माणसाचे हृदय हे शुध्द पाहिजे हे मी सांगत नसून त्याचा निवडा हा पुराणतच झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे स्वतःला मोठे म्हणतात अश्या या थोरपणाला आग लागो, आणि ते दृष्ट माझ्या समोर कधीही दिसू नये.
अभंग क्र. ७५६
त्रिपुटीच्या योगे । काही नव्हे कोणा जोगे ।
एक जाता लागे । एक पाठी लागते ॥१॥
मागे पुढे अवघा काळ । पळो नये न चले बळ ।
करिता कोल्हाळ । कृपे खांदा हरी वाहे ॥धृपद॥
पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती ।
यावे काकुलती । तेथे सत्तानायका ॥२॥
तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकार निवडी ।
घातल्या सांगडी । तापे पेटे हाकारी ॥३॥
अर्थ

त्रिपुटीच्या योगाने हे जग चालते. या चक्रात जो कोणी गुंतला, तर तो एकातून सुटला की दुसऱ्या चक्रात गुंततो. मागे पुढे काळ वाट पाहत आहे, त्यातून पळून जाणे फार अवघड आहे, पण जर अंतःकरणापासून विठ्ठलाचे नांव घेतले, तर तो आपल्यावर कृपा करून आपला भार वाहून नेतो. पाप पुण्याच्या शक्ती या देवानेतर योजल्या आहेत, म्हणून त्याला सर्व काकुळती येऊन सर्वभावे त्या सत्तानायकाला शरण जावे. तुकाराम महाराज म्हणतात मी पहिलेच या भाव सागरातून तरलो आहे, या भवसागरात हे बुडतील म्हणून मी त्यांना तरण्या साठी हरीनामरूपी सांगड, तराफा व पेट्या देऊन लोकांना हाक मारत आहे.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading