२४ मार्च, दिवस ८३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ९८५ ते ९९६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २४ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २४ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९८५ ते ९९६ चे पारायण आपण करणार आहोत.


२४ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २६ ते ५०,

26-8
तैसे समविषमत्व नेणो कैचे । वायाचि चराचर रचे । पाहता प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥26॥
त्याचप्रमाणे, स्थावरजंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यात अधिकउणेपणा कसा होतो, हे समजत नाही; परंतु पाहू गेले असता लक्षावधि जाति उत्पन्न झालेल्या दिसतात.
27-8
येरी जीवभावाचिय पालविये । काही मर्यादा करू नये । पाहिजे कवण हे आघवे विये । तव मूळ ते शून्य ॥27॥
या व्यतिरीक्त, नानाप्रकारच्या जीवांच्या विस्ताराची मर्यादा करता येत नाही. ह्यांची कोणापासून उत्पत्ति होते हे पाहू गेले तर त्याचे मूळ अव्यक्तच आहे.
28-8
म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखी कारणही काही नसे । माजी कार्यचि आपैसे । वाढोचि लागे ॥28॥
म्हणून, मूळांत कर्त्याचा ठिकाण नसून आणि शेवटी काही कारणही नसता मध्येच कार्याची आपोआप वृद्धि होते.
29-8
ऐसा करितेनवीण गोचरू । अव्यक्ती हा आकारू । निपजे जो व्यापारू । तया नाम कर्म ॥29॥
अशा प्रकारे, अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यावाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार त्याला कर्म असे म्हणतात.

अधिभूतं क्षरो भावःपुरुषश्चाधिदैवतम ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृता वर ॥8. 4॥

30-8
आता अधिभूत जे म्हणिपे । तेहि सांगो संक्षेपे । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसे ॥30॥
आता, ‘ अधिभूत ‘ ज्याला म्हणतात ते संक्षेपाने सांगतो; ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात आणि लय पावतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-8
तैसे असतेपण आहाच । नाही होइजे हे साच । जयाते रूपा आणिती पांचपांच । मिळोनिया ॥31॥
त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व लटके असुन खरोखर पाहू गेले असता जे होत नाही व ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन रूपाला आणतात,
32-8
भूतांते अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगे तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक ॥32॥
जे पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते त्यांच्याच संयोगाने दृष्टीस पडते, व विनाशकाली लय पावते, असे जे नामरूप, त्याला अधिभूत म्हणतात.
33-8
तयाते अधिभूत म्हणिजे । मग अधिदैवत पुरूष जाणिजे । जेणे प्रकृतीचे भोगीजे । उपार्जिले ॥33॥
मग अधिदैवत म्हणजे जीव असे समजावे. तो प्रकृतिजन्य भोगांचा उपभोग घेतो.
34-8
जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनी वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥34॥
जो बुद्धिचा द्रष्टा, इंद्रियरूप देशाचा अधिपति, व शरीराच्या अंतकाली मनोरथरूप पक्ष्यांचा विसावा घेण्याचा वृक्ष,
35-8
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नीचिया बोरबारा । संतोषे शिणे ॥35॥
जो प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे, परंतु अहंकाररूप निद्रेत निजल्यामुळे ज्याला स्वप्नाच्या खटपटीने संतोष व शीणही होतो,


36-8
जीव येणे नांवे । जयाते आळविजे स्वभावे । ते अधिदैवत जाणावे । पंचायतनीचे ॥36॥
आणि ज्याला जीव या नांवाने हाक मारतात, त्याला ‘ अधिदैवत ‘ असे म्हणतात; व तो पंचमहाभुतांनी बनलेल्या शरीरांतील मुख्य दैवत आहे.
37-8
आता इयेचि शरीरग्रामी । जो शरीरभावाते उपशमी । तो अधियज्ञु एथ गा मी । पांडुकुमरा ॥37॥
आता, पंडुकुमरा, याच शरीररुप गावात जो शारीरिक उपाधीचा लय करितो, तो ‘ अधियज्ञ ‘ मी होय.
38-8

येरवी, अधिदैव व अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कसाचे सोने हिणकसाला मिळविल्यावर ते डाकलग होत नाही का ?
39-8
तरि ते पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि जव असे तयाचेनि मेळे । तव सांकेंचि म्हणिजे ॥39॥
तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही, व ते हिणकस सोन्यातही मिळत नाही; परंतु जोपर्यत त्याच्याशी एकत्र असते, तोपर्यंत त्याला डाकलगच म्हणतात,
40-8
तैसे अधिभूतादि आघवे । हे अविद्येचेनि पालवे । झाकले तव मानावे । वेगळे ऐसे ॥40॥
त्याचप्रमाणे अधिभूतादि सर्व हे अज्ञानाच्या पदराने जोपर्यत झाकले आहेत, तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-8
तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवघि तुटे । मग म्हणो एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥41॥
तोच अज्ञानाचा पदर काढून आणि भेदभावाची मर्यादा तोडून जर एकत्र करून आणले तर ते दोन वेगळे आहेत काय ?
42-8
पै केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा । ते वरि पाहिजे डोळा । तव भेदिली गमती ॥42॥
परंतू केसांची गुंडाळी करुन त्यांवर स्फटिकाची शिळा ठेवल्यावर ती वरच्या दृष्टीने पांहू गेले असता जशी भंगलेली दिसते,
43-8
पाठी केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणो जाहाले । तरि डांक देऊनि सांदिले । शिळेते काई ॥43॥
पाठीमागुन ते केस बाजुस केल्यावर तिच्या चिरा कोणीकडे गेल्या हे समजत नाही; म्हणुन ती शीळ डाक लावून जोडली आहे का ?
44-8
ना ते अखंडचि आयती । परि संगे भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी का तैसी ॥44॥
नाही; तर ती मुळची अखंडीतच होती; परंतू (केसांच्या संगतीने) भंगलेली भासत होती, परंतू ते केस एके बाजुस केल्यावर ती शीळ जशी होती तशीच दिसते;
45-8
तेवीचि अहंभावो जाये । तरी ऐक्य ते आधीचि आहे । हेचि साचे जेथ होये । तो अधियज्ञु मी ॥45॥
त्याचप्रमाणे, अहंभाव नाहीसा झाला म्हणजे ऐक्य हे मुळचेच आहे; व हेच ऐक्य जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच.


46-8
पै गा आम्ही तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगीतले का जे काज । मनी धरूनि ॥46॥
हे पहा, जो हेतू मनात धरून, ‘सर्व यज्ञ कर्मापासून झालेले आहेत ‘ म्हणून आम्ही पूर्वी (चौथ्या अध्यायात) तुला सांगितले, तोच हा अधियज्ञ होय.
47-8
तो हा सकळ जीवांचा विसावा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडव । दाविजत असे ॥47॥
हा सर्व जीवांचा विसावा असून ब्रह्मसुखाचा ठेवा आहे. पण अर्जुना, तुला तो स्पष्ट करून सांगतो
48-8
पहिले वैराग्याइंधनपरिपूर्ती । इंद्रियानळी प्रदीप्ती । विषयद्रव्याचिया आहुती । देऊनिया ॥48॥
प्रथम वैराग्यरूप इंधनाच्या पूर्णतेने इंद्रियरूप अग्नि पेटवून त्यात विषयरूप द्रव्याची आहुति देतात;
49-8
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी । वेदिका रचे मांडवी । शरीराच्या ॥49॥
मग वज्रासन हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळबंधमुद्रेचा ओटा करतात, त्यावर शरीराचा मांडव उभा करतात.
50-8
तेथ संयमाग्नीची कुंडे । इंद्रियद्रव्याचेनि पवाडे । यजिजती उदंडे । युक्तिघोषे ॥50॥
त्या ठिकाणी इंद्रियनिग्रहरूप अग्नीच्या कुंडांत इंद्रियरूप होमद्रव्ये घालून योगमंत्राने हवन करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ८३ वा, २४, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९८५ ते ९९६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ९८५
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनिया ॥१॥
धन्य तो जगी धन्य तो जगी । ब्रम्ह तया अंगी वसतसे ॥धृपद॥
न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळी रामराम ॥२॥
जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु जो भूती दयावंत ॥३॥
तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥४॥
अर्थ

फक्त कुशल वक्ता किंवा श्रोता तुम्ही होऊ नका तर चित्तात हरी विषयी दृढ भाव धरा. ज्याच्या अंगी कायम स्वरूपी ब्रम्ह स्वरूप ब्रम्हच असतो तो जगात धन्य आहे धन्य आहे. तू एक वेळेस तोंड धुऊ नको किंवा अंघोळी हि करू नकोस पण सदा सर्वकाळ रामनाम जप करीत जा. जो या भूतलावर प्राणी मात्रांवर दया दाखवितो त्याला जप तप ध्यान योग याची माहिती नसली तरी चालते. तुकाराम महाराज म्हणतात सर्व जाणून जो न जाणता असतो तो भक्तच देवाला स्वतःच्या प्राणा पेक्षा जास्त प्रिय असतो.
अभंग क्र. ९८६
म्हातारपणी थेटे पडसे खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥
खोबरियाची वाटी जाले असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥धृपद॥
बोलो जाता शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥
सेजारी म्हणती मरेना का मेला । आणिला काटाळा येणे आम्हा ॥३॥
तुका म्हणे आता सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥
अर्थ

म्हातारपणी माणसाला सर्दी, पडसे, खोकला असे विविध प्रकारचे रोग जडतात व याच विचाराने तो मनुष्य म्हातारपणी आपल्या कपाळाला हात लावून विचार करत बसतो. त्याचे तोंड खोबर्‍याच्या वाटीप्रमाणे झालेले असते आणि नाकातून नेहमीच शेंबडाचा पूरच गळत असतो. त्याच्या मुखाद्वारे व्यवस्थित शब्दही बाहेर पडत नाही कारण त्याच्या कंठामध्ये खूप कफ साठलेला असतो आणि तो सारखा गडगड वाजत असतो. आणि त्याचे असे रूप बघून शेजारचे म्हणतात हा मेला मरेना का म्हणुन याने आम्हाला कंटाळा आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता त्यामुळेच तुम्ही सर्व काम बाजूला सारा आणि मुखाने क्षणाक्षणाला राम राम असे स्मरण करा.
अभंग क्र. ९८७
बाळपणी ऐसी वरुषे गेली बारा । खेळता या पोरा नानामते ॥१॥
विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडी । चंपे पेंड घडी एकीबेकी ॥धृपद॥
हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाळी धोंडी अंगबळे ॥३॥
तुका म्हणे ऐसे बाळपण गेले । मग तारुण्य आले गर्वमूळ ॥४॥
अर्थ

बालपणी खेळता खेळता अनेक मित्रांना बरोबर वर्षे निघून जातात. विटी दांडू चेंडू लगोऱ्या चंपे कुरघोडी पेंडघडी ऐकी बेकी हमामा हुंबरी हुगल्याचीवारे मोठे भोवरे शिवाशिव सेल डेरा निसर भोवंडी हे सर्व खेळ तसेच मोठे धोंडी बळाने उचलणे अश्या प्रकारची अनेक प्रकरची खेळ तो खेळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात असे अनेक प्रकारचे खेळ खेळून बाळ पण जाते व मग सर्व गर्वाचे मूळ असलेले तारुण्य पण त्याला येत.
अभंग क्र. ९८८
तारुण्याच्या मदे न मानी कोणासी । सदा मुसमुसी धुळे जैसा ॥१॥
अंठोनी वेठोनी बांधला मुंडासा । फिरतसे म्‍हैसा जनामधी ॥धृपद॥
हाती दीडपान वरती करी मान । नाही तो सन्मान भलियांसी ॥२॥
श्वानाचिया परी हिंडे दारोदारी । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥
तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करिता टवाळी जन्म गेला ॥४॥
अर्थ

तारुण्य लागले कि त्या तारुण्याच्या मदात मनुष्य कोणालाही मानत नाही सोडलेल्या वळू प्रमाणे आपल्या मस्तीत तो मुसमुसत असतो म्हणजे अहंकाराच्या मस्तीत तो मुसमुसत असतो. चापून चोपून डोक्याला पागोटे बांधून रेड्या प्रमाणे तो लोकांना मध्ये भरकटत असतो. हातात दीड पान घेतो आणि अभिमानेने वर तोंड करून चालतो मोठ्या माणसांस सन्मान देत नाही. असी माणसे कुत्र्या प्रमाणे दारोदार हिंडतात परनारी कडे पाप दृष्टीने पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात या अश्या माणसांची मोठी हानी होते कारण त्याचा जन्म इतरांची टवाळी करण्यात गेला.
अभंग क्र. ९८९
काय माझे नेती वाईट म्हणोन । करू समाधान काशासाठी ॥१॥
काय मज लोक नेतील परलोका । जाता कोणा एक निवारील ॥धृपद॥
न म्हणे कोणासी उत्तम वाईट । सुखे माझी कूट खावो मागे ॥२॥
सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझे जगासवे काज ॥३॥
तुका म्हणे माझे सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचे ॥४॥
अर्थ

मी जर लोकांना वाईट म्हणू लागलो तर लोक माझे काय नेतील ? म्हणून मी या लोकांचे समाधान कशा साठी करू. आणि समजा मी त्यांचे समाधान करू लागलो तर हे लोक मला परलोकी नेतील काय किंवा मी परलोकी चाललो तर मला थांबवतील काय ? मी कोमालाही उत्तम किंवा वाईट म्हणणार नाही मग माझ्या मागे माझी कोणीही खुशाल निंदा करोत. माझा सर्व भार पांडुरंगावर आहे या जगाशी माझे काय काम ? तुकाराम महाराज म्हणतात एक विठोबाचे नामसंकीर्तन हे च माझे सर्व साधन आहे.
अभंग क्र. ९९०
काळाचिया सत्ता ते नाही घटिका । पंढरीनायका आठविता ॥१॥
सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाही ॥धृपद॥
याकारणे माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगती थोर वाट ॥२॥
तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ । स्मरावा गोपाळ तेचि खरे ॥३॥
अर्थ

आपण ज्या वेळेस पांडुरंगाचे स्मरण करतो त्या वेळे पर्यंत काळाची सत्ता आपल्यावर चालत नाही. काळ हा सतत आयुष्याची गणना करत असतो जेवढा वेळ कथेत जातो त्या वेळेची गणना करण्याची त्याला आज्ञा नसते. म्हणूनच माझ्या या विठोबाची कीर्ती आकाश पृथ्वी पाताळ या ठिकाणी श्रेठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात जन्माला आल्याचे फळ म्हणजे सदा सर्व काळ या हरीचे स्मरण करा.
अभंग क्र. ९९१
घरोघरी बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥
लंडा भूषणांची चाड । पुढे न विचारी नाड ॥धृपद॥
काढावे आइते । तेचि जोडावे स्वहिते ॥२॥
तुका म्हणे कळे । अहाच झांकतील डोळे ॥३॥

अर्थ नाही टाका तपासा
अभंग क्र. ९९२
नये पाहो मुख मात्रागमन्याचे । तैसे अभक्ताचे गुरुपुत्रा ॥१॥
म्हणऊनि बरे धरिता एकांत । तेणे नव्हे घात भजनासी ॥धृपद॥
नये होऊ कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटी चांडाळाच्या ॥२॥
तुका म्हणे नका बोलो त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥३॥
अर्थ

जो नालायक प्रत्येक्ष मात्रा गमान्य म्हणजे आईशी संबंध ठेवणारा असतो त्याच्याशी संबंध ठेऊ नये तसेच गुरूची निंदा करणाऱ्या शिष्याचे हरी भक्ताची निंदा करणाऱ्याचे तोंड पाहू नये. म्हणून एकांत धरणे केंव्हाही चांगले त्यामुळे आपल्याला भजनास व्यत्येय येत नाही. कधीही निंदकाची भेट होऊ नये कारण त्या चांडाळाच्या पोटी कपट असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला पाहिल्यावर पाप वाढते अश्या माणसाशी कधी बोलू नये.
अभंग क्र. ९९३
जैसी तैसी तरी । शरणागते तुझी हरी ॥१॥
आता न पाहिजे केले । ब्रीद लटिके आपुले ॥धृपद॥
शुद्ध नाही चित्त । परी म्हणवितो भक्त ॥२॥
मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझे तुका ॥३॥
अर्थ

हे हरी आम्ही जसे आहोत तसे तुम्हाला शरण आलो आहोत. हे हरी आता तुम्ही पतितांना पावन करता हे ब्रीद तुमचे आहे ते खोटे होऊ देऊ नका. माझे चित्त जरी शुध्द नसले तरी मी मला तुमचा भक्त म्हणवितो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या सारख्या गरिबाला कोण विचारीन म्हणून मी लोकांना मी तुझा भक्त आहे असे सांगतो.
अभंग क्र. ९९४
नाशीवंत देह नासेल हा जाणा । का रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥
नामेचि तारिले कोटयान हे कोटी । नामे हे वैकुंठी बैसविले ॥धृपद॥
नामापरते सार नाही त्रिभुवनी । ते का तुम्ही मनी आठवाना ॥२॥
तुका म्हणे नाम वेदांसी आगळे । ते दिले गोपाळे फुकासाठी ॥३॥
अर्थ

हे लोकांनो आहो हा देह नाशिवंत आहे हे ओळखून तुम्ही मुखाने हरीनाम का घेत नाही ? नामामुळे आज पर्यंत अनेक कोट्यावधी लोक तरले गेले आहे या नामामुळे कित्येक लोकांना वैकुंठ प्राप्त झाले आहे. या त्रिभुवनात नामासारखे सार काश्यातही नाही हे तुम्ही मनात का आठवत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात नाम हे वेद पेक्षा आगळे आहे ते या गोपालाने आपल्याला फुकट दिले आहे.
अभंग क्र. ९९५
आळविती बाळे । मातेते सुख आगळे ॥१॥
द्यावे आवडी भातुके । पाहे निवे कवतुके ॥धृपद॥
लेवूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥
आपुलिये पदी । बैसवूनि कोडे वंदी ॥३॥
नेदी लागो दिठी । उचलोनि लावी कंठी ॥४॥
तुका म्हणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥५॥
अर्थ
मुलांनी आई प्रेमाने आळविले कि त्या आईचे सुख हे वेगळे च असते. त्ती मुलांना आवडीने खाऊ घालते मग ते कवतुक पाहून समाधनी होते. मुलांना आवडीने अलंकार घालून मग दृष्टीनी मुलांना पाहून समाधाणी होते. आपल्या जागी बसून त्या विनंती करते बस रे बाबा मी तुला विनंती करते. मुलाला कुठल्याही प्रकारची दृष्ट लागू नये म्हणून त्या ला उचलून मिठी मारते. तुकाराम महाराज म्हणतात हे पद्मनाभा जशी ती आई सर्व लाड पुरवते कौतुक करते त्याप्रमाणे तू तसे आमच्याशी वागावे.
अभंग क्र. ९९६
तप तीर्थ दान व्रत आचरण । गाता हरीगुण वारू नये ॥१॥
कोटि कुळे त्याची वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥धृपद॥
आपुलिया पापे न सुटे सायासे । कोणा काळे ऐसे निस्तरेल ॥२॥
व्हावे साह्य तया न घलावे भय । फुकासाठी पाहे लाभ घात ॥३॥
तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥
अर्थ

जर कोणी तप तीर्थ व्रत दान आचरण करीत असेल तर त्याला त्या पासून परावृत्त करू नये. कारण हे सर्व साधन करणाऱ्याचे अनेक पूर्वज त्यांचा उद्धार व्हावा म्हणून वाट पाहत असतात व जे हे कोणी करत असेल त्याला कोणी परावृत्त करत असेल तर त्याला ब्रम्ह हत्येचे पाप लागते. आपल्याला आपल्या पापापासून सुटका करून घेता येत नाही मग हे असले पाप केंव्हा दूर होणार म्हणून असे कर्म करणार्यांना साह्य करावे त्यांना कुठलेही भय घालू नये कारण असे केल्याने तुमचाही लाभ होईल व असे न केल्यास तुम्हाला फुकट त्रास होईल. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही तुम्हाला सांगत आहे यातच तुमचे हित समजा व कोणतेही चांगले कर्म करणाऱ्यांना परावृत्त केले तर तुम्हाला दुख होईल हे मात्र नक्की.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading