आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

८ मार्च, दिवस ६७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ७९३ ते ८०४
“८ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ८ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ८ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७९३ ते ८०४ चे पारायण आपण करणार आहोत.
८ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३२६ ते ३५०,
326-6
आम्ही साधन हे जे सांगितले । तेचि शरीरी जिही केले । ते आमुचेनि पाडे आले । निर्वाळलेया ॥326॥
आम्ही हे जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले, ते स्वतः शरीराने जे करितात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात.
327-6
परब्रह्माचेनि रसे । देहाकृतीचिये मुसे । वोतीव जाहले तैसे । दिसती आंगे ॥327॥
त्या योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या मुशींत ओतल्यासारखी सतेज दिसतात.
328-6
जरि हे प्रतीति हन अंतरी फाके । तरी विश्वचि हे अवघे झाके । तव अर्जुन म्हणे निके । साचचि जी हे ॥328॥
जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला, तर हे सर्व विश्व त्याला मावळते. तेव्हा अर्जुन म्हणाला ” देवा, आपण बोललां, ते सत्य आहे.
329-6
का जे आपण आता देवो । हा बोलिलो जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥329॥
देवा, आपण आता जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणुनच त्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार होतो.
330-6
इये अभ्यासी जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती । हे सांगतियाची रीती । कळले मज ॥330
आपण जो हा मार्ग सांगितला, त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात, हे आपल्या सांगण्यावरून मला समजले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-6
देवा गोठीचि हे ऐकता । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवे तल्लीनता । नव्हेल केवी ॥331॥
देवा, आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच चित्तांत ज्ञान उत्पन्न होते, तर मग तिचा अनुभव घेणाराला तद्रूपता कशी बरे प्राप्त होणार नाही ?
332-6
म्हणऊनि एथ काही । अनारिसे नाही । परि नावभरी चित्त देई । बोला एका ॥332॥
म्हणुन, हे जे आपण सांगितले, यात काही संशय नाही. परंतु क्षणभर मी जी विनंति करतो, तिकडे लक्ष द्यावे.
333-6
आता कृष्णा तुवा सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करु पांगु । योग्यतेचा ॥333॥
कृष्णा, आता तुम्ही जो मला योग सांगितला, तो माझ्या मनाला फार आवडला; परंतु माझी योग्यता कमी असल्याकारणाने माझ्या हातून काही तो होणार नाही.
334-6
सहजे आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये । तरी हाचि मार्ग सुखोपाये । अभ्यासीन ॥334॥
माझ्या हातून काही तो होणार नाही. माझ्या अंगात जेवढी शक्ति आहे, तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटाला जाईल, तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करीन.
335-6
नातरी देवो जैसे सांगतील । तैसे आपणपा जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेचि पुसो ॥335॥
किंवा, देवा, तुम्ही जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल, तर आपल्या योग्यतेच्या मानाने आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे,
336-6
जीवीचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहले कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥336॥
अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले. अर्जुन म्हणतो, ” तर मग देवा, आपण इकडे लक्ष द्यावे
337-6
हा हो जी अवधारिले । जे हे साधन तुम्ही निरुपिले । ते आवडतयाहि अभ्यासिले । फावो शके ॥337॥
महाराज, आपण हे जे योगसाधन सांगितले ते ऐकले; परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ति होईल काय ?
338-6
की योग्यतेवीण नाही । ऐसे हन आहे काही । तेथ कृष्णा म्हणती तरी काई । धनुर्धरा ॥338॥
किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय ? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे तू काय विचारतोस ?
339-6
हे काज कीर निर्वाण । परि आणिकही जे काही साधारण । तेही अधिकाराचे वोडवेविण । काय सिध्दि जाय ॥339॥
हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे; पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली, तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाईल काय ?
340-6
पै योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे । का जे योग्य होऊनि कीजे । ते आरंभी फळे ॥340॥
परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात, ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही. कारण, अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काल फलद्रप होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-6
तरी तैसी एथ काही । सावियाचि केणी नाही । आणि योग्यांची काई । खाणी असे ॥341॥
तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही; आणि दुसरे असे पहा की, योग्यतेची एखादी खाण आहे की काय ?
342-6
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥342॥
जो थोडासा विरक्त किंवा विहित धर्म आचरण्यात जो नियमित झाला आहे, इतकेच नव्हे, तर सामान्यतः व्यवस्थेशीर वागणारा जो आहे; तो देखील अधिकारी होतो.
343-6
येतुलालिये आयणीमाजि येवढे । योग्यपण तूतेही जोडे । ऐसे प्रसंगे सांकडे । फेडिले तयाचे ॥343॥
अशा युक्तीने इतकी योग्यता तुझे ठिकाणींही आहे. याप्रमाणे अर्जुनाचा त्या समयाला संशय फेडला.
344-6
मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाही ॥344॥
मग श्रीकृष्ण म्हणाले :- पार्था, या योगप्राप्तीची अशी व्यवस्था आहे, परंतु अव्यवस्थित मनुष्याला त्याची प्राप्ति होण्याचा कधीही संभव नाही.
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥6. 16॥
345-6
जो रसनेद्रियाचा अंकिला । का निद्रेसी जीवे विकला । तो नाही एथ म्हणितला । अधिकारिया ॥345॥
या जिव्हेचा अंकित झाला, किंवा सर्वथैव झोपेच्या आधीन झाला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही.
346-6
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहाराते तोडी । मारुनिया ॥346॥
अथवा, दुराग्रहाच्या आवेशांत जो भूक आणि तहान मारतो, आणि जेवन कमी करतो,
347-6
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणे नाचे । ते शरीरचि नव्हे तयाचे । मा योगु कवणाचा ॥347॥
आणि झोपेचे नांव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या आधीन राहत नाही, मग त्याला योग कोठून साध्य होणार ?
348-6
म्हणोनि अतिशये विषयो सेवावा । तैसा विरोधु न व्हावा । का सर्वथा निरोधु करावा । हेही नको ॥348॥
म्हणून विषयांचे अति सेवन करण्याची किंवा त्यांच्या अगदीच त्याग करण्याची इच्छा करु नये, अर्थात् सर्व गोष्टी नियमित असाव्या.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥6. 17॥
349-6
आहार तरी सेविजे । परि युक्तीचेनि मापे मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥349॥
अन्न ग्रहण तर करावे, पण ते युक्तियुक्तीने परिमित करावे; त्याचप्रमाणे, जी जी कामे करावयाची तीही सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावी.
350-6
मितला बोली बोलिजे । मितलिया पाउली चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरे एके ॥350॥
भाषण परिमित असावे, त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा; व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ६७ वा, ८, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७९३ ते ८०४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ७९३
विचार नाही नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणे त्यासी तोचि वरी । गुखाडीची चाड सरे तोचि बाहेरी ॥धृपद॥
सौभाग्यसंपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठ । छी करूनि सांडी पाया लागली ते विष्ठ ॥२॥
नाही याति कुळ फासे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥
अर्थ
जो मनुष्य विचार शून्य आहे तो गाढवासमान आहे तो ब्रम्हज्ञानी जरी असला तरी त्याचे शब्दज्ञान हे बैलाच्या पाठीवरी ओझ्या प्रमाणे आहे. त्याला वादावाद करणे आवड असून कायम बाह्यारूपी विष्ठा खाण्याची सवय असते. तो कितीही श्रीमंत असला, विद्वान असला तरी पायाला लागलेली घाण जशी छी करून काढून टाकावी त्याप्रमाणे त्याचा त्याग करावा. तुकाराम महाराज म्हणतात त्याचे कुळ कितीही उच्च असले तरी लक्षात घेवू नये आणि त्याची माळ मुद्रा इत्यादी लक्षणे खोटी आहेत हे समजावे, ती काय जाळायची आहेत ?
अभंग क्र. ७९४
देव होसी जरी आणिकाते करिसी । संदेह येविशी करणे न लगे ॥१॥
दुष्ट होती तरी अणिकाते करिसी । संदेह येविशी करणे न लगे ॥२॥
तुका म्हणे जे दर्पणी बिंबले । ते तया बाणले निश्चयेसी ॥३॥
अर्थ
जर तू देव झालास तर तू दुसऱ्याला देव करशील यात कोणतीही शंका नाही. जर तू दृष्ट झाला तर तू दुसऱ्याला हि दृष्ट करशील यातही काही शंका नाही. तुकाराम महाराज म्हणतात जसे आरश्यात दिसते तसेच बाहेर असते त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव कसा असतो हे त्याच्या वागण्यावरू समजते यात काही शंका नाही.
अभंग क्र. ७९५
कलिधर्म मागे सांगितले संती । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
तेचि कळो आता येतसे प्रचिती । अधर्मा टेकती धर्म नव्हे ॥धृपद॥
तप व्रत करिता लागती सायास । पाळिता पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी का नव्हे ॥३॥
तुका म्हणे मज धरिता गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥
अर्थ
कलयुगामध्ये भ्रष्ट ब्राम्हण आपला आचार विचार टाकतील असे पूर्वी संतानी सांगितले आहे. त्याचीच प्रचीती आता येत आहे सर्वानीच अधर्माचा आश्रय घेतला आहे. शास्त्रात सांगितलेली तप, साधना, तपश्चर्या, व्रते करण्यात खूप कष्ट पडतात म्हणून हे लोक आपला देह पाळतात. आपणच स्वतः देव आहे असे समजून देवळात जात नाहीत, मग ते संसारा वेगळे का राहत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात मी जर यांची परवा करून गप गुमान राहिलो तर ते योग्य नाही कारण हे प्राणी नरकात जातील.
अभंग क्र. ७९६
नमो विश्वरूपा विष्णुमायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितो रंक दास मी सेवक । वचन ते एक आइकावे ॥धृपद॥
तुझी स्तुति वेद करिता भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥२॥
ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णिता तुझे गुण न सरती ॥३॥
तुका म्हणे तेथे काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥४॥
अर्थ
हे विश्वरूप असणाऱ्या विष्णू मायबापा मी तुला वंदन करतो तू अनंत आणि अपार आहेस मी तुझा रंक दास तुला विनंती करतो ते तू ऐकावे. तुझी स्तुती करताना वेद देखील थकला “नेती नेती” म्हणत स्वस्त बसला. बहुत ऋषी, मुनी, संत कविजन तुझे गुणगाण गात आहेत वर्णन करत आहेत परंतु त्यांनाही पूर्ण पणे तुझे वर्णन सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुझी कीर्ती वर्णन करता येईल अशी माझ्या वाणीची काय शक्ती ?
अभंग क्र. ७९७
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥
घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥धृपद॥
मज याचकाची पुरविली आशा । पंढरी निवासा मायबापा ॥२॥
नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥
तुका म्हणे आता केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥
अर्थ
माझ्या अंतरीचा गुजभाव या पांडुरंगाने जाणला व तशी कृती केली. आम्ही जे शब्द तुझी स्तुती करण्यासाठी वापरले ते खाली पडले नाही तू आम्हा अनाथांची माऊली आहेस. हे पंढरीनाथा मायबापा माझ्या याचकाची तू अशा पुरविली. माझ्या मनात जी भेदाची शंका होती तू तिचा नाश केला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या कृपेने तू मला निर्भय केले आहेस आता मी तुझे अपार गुणगान गात राहील.
अभंग क्र. ७९८
उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागता ॥१॥
सर्व भार माथा चालविसी त्यांचा । अनुसरली वाचा काया मने ॥धृपद॥
पाचारिता उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळी पुरवावे ॥२॥
चालता ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील काटे खडे हाते ॥३॥
तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा । तू त्यांचा कोंवसा सर्वभावे ॥४॥
अर्थ
तू हे विठ्ठला तू उदार आहेस, कृपाळू आहेस, तू अनाथांचा नाथ आहेस. तुला जे शरण येतात त्यांचे म्हणणे तू ऐकतोस तू त्यांचा सर्व भार आपल्या माथ्यावर घेतोस कारण ते तुला काया वाचा मनाने शरण आले आहेत. त्यांनी तुला पाचारीता (हाक मारली) तर तू लगेच धवत त्यांच्या जवळ उभा राहतोस त्यांना पाहिजे त्यावेळेस, पाहिजे ते पुरवतोस ते मार्गाने चालत जरी असले तरी त्यांचा सांभाळ हि तूच करतोस त्यांच्या मार्गाचे काटे खडे वैगरे तू तुझ्या हाताने बाजूला सारतोस. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझ्या दासांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही. कारण तू त्यांची सर्व प्रकारे रक्षण करतोस.
अभंग क्र. ७९९
काय कीर्ती करू लोक दंभ मान । दाखवी चरण तुझे मज ॥१॥
मज आता ऐसे नको करू देवा । तुझा दास जावा वाया विण ॥धृपद॥
होईल थोरपणे जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायी ॥२॥
अंतरीचा भाव काय कळे लोका । एक मानी एका देखोवेखी ॥३॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । त्या मज विपत्ती गोड देवा ॥४॥
अर्थ
मान सम्मान कीर्ती व लौकिक याचे काय करावे ? मला तू तुझे चरण दाखव. देवा मी तुझा दास आहे मी वाया जाईन असे काही तू करू नकोस मला ज्ञानाचा भार देवून थोर पण येईल. असे झाले तर मी तुझ्या चरणापासून दूर जाईल. माझ्या अंतरीचा भाव हा लोकांना काय कळणार ? तुकाराम महाराज म्हणतात मला साधू समजून एक पाया पडतो व ते पाहून दुसरा पण माझ्या पाया पडतो ज्या योगाने तुझे पाय मला सापडतील असे तू कर मग मी दरिद्री राहिलो तरी चालेले.
अभंग क्र. ८००
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाही हे माझिया जीवा चाड ॥१॥
तुझ्या पायासाठी केली आराणूक । आता काही एक नको दुजे ॥धृपद॥
करूनिया कृपा करी अंगीकार । न लवी उशीर आता देवा ॥२॥
नव्हे साच काही कळो आले मना । म्हणोनि वासना आवरीली ॥३॥
तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥४॥
अर्थ
मला समाजात मन सम्मान मिळावा माझ्याकडे द्रव्य असावे असे मला वाटत नाही याचि मला इच्छा हि नाही. तुझ्या पायासाठी तर मी सर्व अराणुक (आपेक्षांना शांत) केली आहे. आता मला दुसरे काही नको. आता तू माझ्यावर कृपा कर व माझा अंगीकार कर उशीर लावू नकोस. तुझ्या शिवाय दुसरे काही खरे नाही हे मला कळले आहे म्हणून माझी वासना आवरली आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपानिधे आता माझे मनोरथ तूच पूर्ण करा.
सार्थ तुकाराम गाथा ७०१ ते ८०० समाप्त
सार्थ तुकाराम गाथा 801 ते 900
सार्थ तुकाराम गाथा ८०१ ते ९००
अभंग क्र. ८०१
आता माझा सर्वभावे हा निर्धार । न करी विचार आणिकासी ॥१॥
सर्वभावे नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥धृपद॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणी । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणी । येऊ नेदी मनी शंका काही ॥३॥
अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥
अर्थ
आता पूर्ण पणे मी निर्धार केला आहे, मी कोणाचाही विचार करणार नाही फक्त तुझे नाम मी प्रेमाने व आवडीने गाईन हरीचे चरण हेच माझे ध्येय आहे. तुझ्या अंगणात मी लोटांगण घालीन आणि तुझे मुख डोळे भरून पाहीन. निर्लज्ज होऊन मी तुझ्या अंगणात नाचेल, मनात कुठल्याही प्रकारची शंका धरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तुझा दास आहे तुझी आज्ञा पाळणारा सेवक आहे हाच संकल्प माझ्या मानत नांदत आहे.
अभंग क्र. ८०२
जनी जनार्दन ऐकतो हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा ॥१॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखे ॥धृपद॥
पापपुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे । ही कोणा कारणे कवणे केली ॥२॥
आम्हा मरण नाश तू तव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानू ॥३॥
तुका म्हणे तूचि निवडी हा गुढार । दाखवी साचार तेचि मज ॥४॥
अर्थ
जगात जनार्धन अंर्तबाह्यरूपाने भरला आहे हे आम्ही सर्वानी एकले आहे पण खरे काय ते आम्हाला ठाउक नाही. मग असे अज्ञान असण्याचे कारण काय म्हातारा कोण होतो व मरते कोण ? जन्म मरण सुख दुख ते कोण भोगतो ? पाप पुण्य कर्म शुद्ध अशुद्ध आचरण हे कोणी कोणासाठी केले ? आम्हा जर मरण आहे, मग तू अविनाशी आहे यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा. तुकाराम महाराज म्हणतात याचे गुढ तूच उलगडावे ते कोडया सारखे आहे आणि खरे तत्वे काय ते आम्हाला दाखवावे.
अभंग क्र. ८०३
यथार्थवाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरिता सांगे कुठोऱ्याचे नांव । दोघाचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणी निवाड । माझी हे बडबड नव्हे काही ॥३॥
अर्थ
यथार्थवाद सोडून म्हणजे जे खरे आहे ते सोडून समोरच्याला जे आवडेल ते बोलून त्यांना खुश करणे किंवा खुश करण्याचा प्रयत्न जो करतो तो नरकात जातो. जर एखाद्या चोराला पकडले आणि त्याला चोरी कोणी करायला सांगितली त्याचे नांव त्यांने सांगितले तर दोघाच्याही हात पायात बेड्या पडतात. तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व म्हणजे मी जे काही सांगत आहे त्या सर्व गोष्टी पुराणात सांगितलेल्या आहे व तेच निर्णय मी सांगत आहे, माझे बोलणे काही वायफळ नव्हे.
अभंग क्र. ८०४
धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊ सीण । वाहो चिंता दासांसी ॥१॥
सुखे करावे कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥धृपद॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होता । तो तो नव्हे दाता । प्राकृता या सारिखा ॥२॥
हे तो माझ्या अनुभवे । अनुभवा आले जीवे । तुका म्हणे सत्य व्हावे । आहाच नये कारण ॥३॥
अर्थ
परमार्थात जो धीर धरून राहतो त्याला नारयण साह्य करतो. त्याला कुठल्याही प्रकारचे शीण येवू देत नाही तो आपल्या सर्व दासांची चिंता वाहून नेतो आपण सुखाने हरीचे कीर्तन करावे आनंदाने हरीचे गुणगान गावे म्हणजे देवाचे सुदर्शन चक्र काळाचे निवारण करते. लहान मुलाला दुखणे आले तर आई त्याला बरे वाटण्यासाठी आपला जीव देण्यास तयार होते हि संसारातील प्राकृत गोष्ट झाली पण नारायण हा दाता प्राकृत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हि माझ्या अनुभवाची गोष्ठ आहे मात्र आपण खरी भक्ती केली पाहिजे. वर वर भक्ती काही उपयोगाची नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















