१० मार्च, दिवस ६९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३७६ ते ४०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ८१७ ते ८२८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१० मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १० March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १० मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८१७ ते ८२८ चे पारायण आपण करणार आहोत.

१० मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३७६ ते ४००,

376-6
हा विषयाते निमालिया आइके । इंद्रिये नेमाचिया धारणी देखे । तरी हिये घालूनि मुके । जीवितासी ॥376॥
विषय लय पावले असे या संकल्पाने ऐकले, व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहीले, म्हणजे त्याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो.
377-6
ऐसे वैराग्य हे करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखे धृतीचिया धवळारी । बुद्धी नांदे ॥377॥
अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात, आणि धैर्याच्या मंदीरांत बुद्धिही सुखाने वास करते.

शनैः शनैरुपरमेत् बुध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥6. 25॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥6. 26॥

378-6
बुद्धी धैया होय वसौटा । तरी मनाते अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनी ॥378॥
बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला, म्हणजे मग ती मनाला हळू हळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते.
379-6
याही एके परी । प्राप्ती आहे विचारी । हे न ठके तरी सोपारी । आणिक ऐके ॥379॥
या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते, आणि हेही घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो तो ऐक.
380-6
आता नियमुचि हा एकला । जीवे करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे ॥380॥
साधकाने आपला एक नियम करावा की, एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

381-6
जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरी काजा आले स्वभावे । नाही तरी घालावे । मोकलुनी ॥381॥
अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले, तर अनायासेंच काम झाले; पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वर्तू द्यावे.
382-6
मग मोकलिले जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे यया ॥382॥
मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथुन निश्चय त्याला परत घेऊन येईल, आणि अशा रितीने ते तत्काल स्थिर होऊन राहील.

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम् ॥6. 27॥

383-6
पाठी केतुलेनि एके वेळी । तया स्थैर्याचेनि मेळे । आत्मस्वरुपाजवळे । येईल सहजे ॥383॥
नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरुपाजवळ येईल.
384-6
तयाते देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैती द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजे उघडेल । त्रैलोक्य हे ॥384॥
आणि त्या आत्मस्वरुपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल, आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. (त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू लागेल. )
385-6
आकाशी दिसे दुसरे । ते अभ्र जै विरे । तै गगनचि का भरे । विश्व जैसे ॥385॥
आकाशात उत्पन्न झालेली अभ्रे ज्या वेळेस नाहीतशी होतात, त्या वेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते;

386-6
तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवे होये । ऐसी प्राप्ति सुखोपाये । आहे येणे ॥386॥
त्याचप्रमाणे, चित्त लयाला जाऊन जीवात्मा ब्रह्मस्वरुप होणे ही प्राप्ति या उपायापासून सहज होते.

युञ्जन्नेवं सदात्मनं योगीविगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥6. 28॥

387-6
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुती । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनिया ॥387॥
मनातील संकल्पविकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले
388-6
ते सुखाचेनि सांगाते । आले परब्रह्मा आंतौते । तेथ लवण जैसे जळाते । सांडु नेणे ॥388॥
ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन पोहोचले. मिठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही,
389-6
तैसे होय तिये मेळी । मग साम्यरसाचिया राऊळी । महासुखाची दिवाळी । जगेसि दिसे ॥389॥
त्याप्रमाणे, जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्यांची स्थिती होते; आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे तो सर्व जग पहातो.
390-6
ऐसे आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हे पार्था नागवे तरी । आन ऐके ॥390॥
याप्रमाणे आपलेच पाय आपले पाठीवर घेऊन योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल, तर आणखी दुसरा उपाय सांगतो
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥6. 29॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥6. 30॥

391-6
तरी मी तव सकळ देही । असे एथ विचारु नाही । आणि तैसेति माझ्या ठायी । सकळ असे ॥391॥
मी सर्वाच्या देहांत आहे याविषयी शंका नाही; आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व आहे. अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकांत मिसळलेली आहेत.
392-6
हे ऐसेचि संचले । परस्परे मिसळले । बुद्धी घेपे एतुले । होआवे गा ॥392॥
अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकांत मिसळलेली आहेत. परंतु साधकाने आपल्या बुद्धीचा निश्चय मात्र करावा.
393-6
अर्जुना, येरवी तरी, जो एकत्वभावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून मला भजतो,
394-6
भूतांचेनि अनेकपणे । अनेक नोहे अंतःकरणे । केवळ एकत्वचि माझे जाणे । सर्वत्र जो ॥394॥
व्यक्तीमात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतःकरणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो,
395-6
मग तो एक हा मिया । बोलता दिसतसे वाया । एऱ्हवी न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहे ॥395॥
तो आणि मी एक असे बोलनेच व्यर्थ होय. येरवी धनंजया, बोलून दाखविले नाही, तरी तो आणि मी एक आहो.

396-6
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा । तो माझ्या ठायी तैसा । मी तयामाजी ॥396॥
ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्या एकत्वाची योग्यता असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याचे ठिकाणी आहे.
397-6
जैसा उदकाचेनि आयुष्ये रसु । का गगनाचेनि माने अवकाशु । तैसा माझेनि रुपे रुपसु । पुरुष तो गा ॥397॥
जसे पाण्याचे योगाने गोडी किंवा गगनाच्या योगाने पोकळी यांचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो.

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥6. 31॥

398-6
जेणे ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटी । तंतु एकु ॥398॥
अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रांत तंतु एक असतात, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याचे दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले,
399-6
का स्वरुपे तरी बहुते आहाती । परि तैसी सोनी बहुवे न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणे ॥399॥
किंवा पुष्कळ जरी अलंकार घातले तरी अनेकत्व नसणाऱ्या सोन्याप्रमाणे ज्याने ऐक्यरुप पर्वताची स्थिती बनविली आहे,
400-6
ना तरी वृक्षांची पाने जेतुली । तेतुली रोपे नाही लाविली । ऐसी अद्वैतदिवसे पाहली । रात्री जया ॥400॥
अथवा, जितकी झाडाची पाने तितकी रोपे लाविलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञानरात्र उजाडली आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ६९ वा, ९, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८१७ ते ८२८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ८१७
म्हणसी नाहीरे संचित । न करी न करी ऐसी मात ॥१॥
लाहो घेई हरीनामाचा । जन्म जाऊ नेदी साचा ॥धृपद॥
गळा पडेल यमफासा । मग कैचा हरी म्हणसी ॥२॥
पुरलासाठी देहाडा । ऐसे न म्हणे मूढा ॥३॥
नरदेह दुबळा । ऐसे न म्हणे रे चांडाळा ॥४॥
तुका म्हणे सांगो किती । सेखी तोंडी पडेल माती ॥५॥
अर्थ
देवाचे भजन हे माझ्या संचितात नाही असे तू म्हणू नकोस रे, म्हणू नकोस. तू घाई कर आणि हरी नाम घे तू तुझा जन्म वाया जाऊ देऊ नकोस. अंतः काळी यमाचा फासा गळ्याला लागल्यावर मग हरीनाम कसा घेशील ? हे मुर्खा आपला हा देह हा भोग पुरविण्यासाठी आहे असे म्हणू नकोस. हे चांडाळा हा नर देह दुबळा आहे असे हि तू मानू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात यांना किती सांगावे नाही ऐकले तर यांच्या तोंडात माती पडेल.
अभंग क्र. ८१८
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाही येथे ॥१॥
बहु दुधड जरी जाली म्‍हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥३॥
अर्थ

संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही. कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही. म्हैस अथवा गाय हि मोठी चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी ती काय कामधेनु होईल ? म्हणूनच आपण स्वतःसंत झालो तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल
अभंग क्र. ८१९
नाही संतपण मिळत ते हाटी । हिंडता कपाटी रानी वनी ॥१॥
नये मोल देता धनाचिया राशी । नाही ते आकाशी पाताळी ते ॥१॥
तुका म्हणे मिळे जिवाचिये साठी । नाही तरी गोष्टी सांगो नये ॥३॥
अर्थ
संतपणा बाजारात विकत मिळत नाही, किंवा रानात, वनात, गीरीकापाटात हिंडण्याने मिळत नाही संतपणा कितीही मोठी किंमत दिली, पैसा ओतली तरी मिळत नाही. तो आकाशात किंवा पाताळात कोठेही मिळत नाही. हरीला आपला जीव अर्पण करण्यातच संतपणा मिळत असतोअशी स्थिती जर नसेल, तर संतपणाची गोष्ठच काढू नये.
अभंग क्र. ८२०
नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह काही मनी ॥१॥
ऐसे मी हे नाही बोलत नेणता । आणोनि संमता संताचिया ॥धृपद॥
नाम म्हणे तया आणीक साधन । ऐसे हे वचन बोलो नये ॥२॥
तुका म्हणे सुख पावे या वचनी । ज्याची शुद्ध दोन्ही मायबापे ॥३॥
अर्थ

ज्याला देवाचे नांव आवडते, तोही देव आहे असे समजा. याविषयी मनामध्ये काही संशय धरू नका. हि माझी मूर्खपणा बडबड नाही. संतांचेही असेच मत आहे. जो हरीनाम घेतो, त्याला इतर साधने करण्याची आवश्यकता आहेअसे समजू नये कारण ते एकच साधन पुरेसे आहे. मी जे काही म्हणतो, ते माझे बोलणे त्यानांच गोड वाटेल कि, जे शुद्ध वंशात जन्माला आले आहेत.
अभंग क्र. ८२१
सुखे होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हाती ॥१॥
काय करू बहु गुंतलो आता । नयेचि सरता मागे पुढे ॥धृपद॥
होते गाठी ते सरले आता । आणीक माथा ऋण जाले ॥२॥
सोंकरोलियाविण गमाविले पिक । रांडापोरे भिके लावियेली ॥३॥
बहुतांची बहु घेतली घरे । न पडे पुरे काही केल्या ॥४॥
तुका म्हणे काही न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकुनीया ॥५॥
अर्थ

मुळात मी सुखी होतो. पण देहादी प्रपंचाचा लोभ धरून मी माझा गळा उगाच अडकवून घेतला असे झाले आहे. काय करू ? मी ह्या प्रपंचात इतका काही गुंतून गेलो आहे किजरासुद्धा मागे-पुढे हलता येत नाही. माझ्या पदरी जी काही संचित पुंजी होती, ती प्रपंच अंगावर येताच सरली, आणि डोक्यवर आणखी कर्ज झाले. शेत होते, त्याची राखण करता आली नाही, पिक गमविले, बायकोमुळे भिकेस लागली. व्यवहारामध्ये अनेकांची घरे लटपटी करून घेतली. पण संसारात काहीच पुरे पडले नाही. आता असे वाटते कि, या सर्वस्वाचा त्याग करून हरीला शरण जावे.
अभंग क्र. ८२२
न मनावे तैसे गुरूचे वचन । जेणे नारायण अंतरे ते ।
आड आला म्हणूनि फोडियेला डोळा । बळिने आंधळा शुक्र केला ॥१॥
करी देव तरी काय नव्हे एक । का तुम्ही पृथक सिणा वाया ॥धृपद॥
उलंघुनि भ्रताराची आज्ञा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या ।
अवघेचि त्यांचे देवे केले काज । धर्म आणि लाज राखियेली ॥२॥
पितयासी पुत्रे केला वैराकार । प्रल्हादे असुर मारविला ।
बहुत विघ्ने केली तया आड । परि नाही कैवाड सांडियेला ॥३॥
गौळणी करिती देवाशी व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती ।
तया दिले ते कवणासी नाही । अवघा अंतर्बाही तोचि जाला ॥४॥
देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे ते कर्म नाचरावे ।
तुका म्हणे हा जाणतो कळवळा । म्हणोनि अजामेळा उद्धरिले ॥५॥
अर्थ

ज्या वचना मुळे नारायण आपल्यापासून अंतरेल ते वाचन गुरुचे जरी असेल तरी ते वचन ऐकू नये. चांगले कर्म कारायला जाणार तर वामनाच्या हातातील झारीने दानाचे बळी राजा पाणी सोडणार तेवढ्यात शुक्राचार्य झारीच्या तोटीत सूक्ष्म रूपाने जावून बसले. तर बळीराज्याने तोटीत काही गुतले आहे हे समजून तोटीत काडी घातली व आपले गुरु शुक्राचार्य यांचा एक डोळा फुटला. देवाला अशक्य असे काहीच नाही मग तुम्ही भगवंताला सोडून इतर साधनांच्या मागे का फिरता ? आपल्या भ्राताराची (पतीची) आज्ञा उल्लंघून ऋषींच्या पत्नी कृष्णाकडे अन्न घेवून गेल्या देवाने हि त्यांचे धर्म आणि लाज यांचे रक्षण केले. पिता आणि पुत्र यांच्यात वैर (प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप) तेव्हा त्याला भगवंताकडून मारविले, कारण त्या पित्याने हरीकार्‍यात अनेक विघ्न्य आणली पण प्रल्हादाने आपला निर्धार सोडला नाही गवळणीने कृष्णाशी व्याभिचार केला. स्वतःचा आचार धर्म सोडला व त्या देवाशी एकरूप झाल्या त्यांना जे भागवंताने देलेते कोणालाही दिले नाही तो त्यांच्याशी अंतबाह्य एक झाला. देवाच्या प्राप्तीसाठी अधर्म करावा लागला तरी करावा हरीचे व आपले अंतर पडेल असे कर्म करू नये. तुकाराम महाराज म्हणतात हाच भगवंताविषयी असलेलेला कळवळा तो हरी जाणतो म्हणूनच तर पापी अजामेळ त्याने त्याचा उद्धार केला.
अभंग क्र. ८२३
अरे गिळिले हो संसारे । काही तरि राखा खरे । दिला करुणाकरे । मनुष्यदेह सत्संग ॥१॥
येथे न घली न घली आड । संचितसा शब्द नाड । उठाउठी गोड । बीजे बीज वाढवी ॥धृपद॥
केले ते क्रियमाण । झाले ते संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरवरीत उरले ते ॥२॥
चित्त खोटे चालीवरी । रोग भोगाचे अंतरी । रसना अनावरी । तुका म्हणे ढुंग वाहे ॥३॥
अर्थ

अरे तुम्हाला संसाराने गिळले हो काही तरी सत्तेचे रक्षण करा कारण तो हरी का दयावंत आहे त्याने तुम्हाला मनुष्य देह व सत्संगत दिला आहे. हरिभजन परमार्थ हा माझ्या प्रारब्धात नाही असे काही आड घालू नकोस घालू नकोस. ज्याप्रमाणे बिजने बीज वाढवतात त्याप्रमाने उठता बसता हरिभजन करा जे काही कर्म घडत आहे ते क्रियामान आहे व जे घडले ते संचित समज. पुढे ज्याचा भोग अटळ आहे ते प्रारब्ध आहे असे समजतुकाराम महाराज म्हणतात चित्त जेव्हा भरकटते तेव्हा भोगाचे अंतरात लपलेले रोग उत्त्पन्न होतात. अति सेवन करशील तर ते अपचन होवून त्याचा अतिसार होईल.
अभंग क्र. ८२४
अग्नि तापलिया काया चि होमे । तापत्रये संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथे ।
न चुके संसारस्थिति । राहाटघटिका जैसी फिरता चि राहिली । भरली जाली होती एके रिती ।
साधी हा प्रपंच पंचाय अग्न । तेणे पावसील निजशांती रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नित्य करी काम जिव्हामुखे ।
जन्म जरा व्याधि पापपुण्य तेथे । नासती सकळ ही दुःखे रे ॥धृपद॥
शीत उष्ण वन सेविता कपाट । आसनसमाधी साधी । तप तीर्थ व्रत दान आचरण ।
यज्ञा नाना मन बुद्धी । भोगा भोग तेथे न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि ।
साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमी अविनाश साधी रे ॥२॥
घोकिता अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करिता निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति ।
दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे । सांडी मिथ्या खंती । रिघोनि संता शरण सर्वभावे । राहे भलतिया स्थिती रे ॥३॥
अर्थ

मृत्युं नंतर कायला या देहाला अग्नीने जळतात हे खरे आहे परंतु जिवंत पणे मनुष्य देह नव्हे तर मन व बुद्धी हे त्रिविध तापाने तप्त होतात. संसारता संचित, प्रारब्ध, क्रियमाण, हे चुकत नाहि. रहाटाच्या माळेत मडके फिरत असते, पण त्यात एक मडके फिरत असते आणि दुसरे मडके रिकामे होत असते. प्रपाच्याचे हि तसेच आहे. तू प्रपंच रुपी पंचाग्नी सध्या करून घे म्हणजे तुला शांती मिळेल. तुझ्या जीव्हाने नित्य नारायण नाम स्मरण करत राहा. म्हणजे तुझी जन्म जरा व्याधी पाप पुण्य या सर्वाचा नाश होईल. तुझे दुःख नाश पावतील. शीत उष्ण सेवन केलेस आसना पासून समाधी पर्यंत योग साधना केली ताप तीर्थ योग दान आचरण या सर्वाचे तू अंगीकार केलेस तरी तुझे भोग सुटणार नाही त्या मुळे तू जन्म जरा व्याधी सहन करून काम क्रोध सहन करून अविनाशी आत्मसुख प्राप्त करून घे. तू कितीही वेद पठन केले तरी तुझ्या मागे अभिमान अहंकार हे मागे लागतात आणि शास्त्र विषयी वाद करण्यात कायम निंदा घडत असते, म्हणून हि जी भूषणे आहेत ती दुशानांची करणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात तू संतांना सर्व भावे शरण जा आणि ज्या स्थितीत तुला सहज राहत येईल त्या स्थितीत तू राहा.
अभंग क्र. ८२५
नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेणे कापे विषया । तैसे नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥
म्हणोनि गोड सर्वभावे । आंघोळी न लगे तोंड धुवावे । अर्थचाड जीवे । न लगे भ्यावे संसारा ॥धृपद॥
कर्मा तव न पुरे संसारिक । धर्म तव फळदायक । नाम विठ्ठलाचे एक । नाशी दुःख भवाचे ॥२॥
न लगे सांडणे मांडणे । आगमनिगमाचे देखणे । अवघे तुका म्हणे । विठ्ठलनामे आटले ॥३॥
अर्थ

गुरुदास्य कारणे हे संसारीकांना करणे फार कठीण आहे, कारण अंगी वैराग्य येत नाही आणि आले तरी संसारात तो पडत नाही. विषयांना पाहू थरथर कापतो. पण या पंढरीरायाचे नाम तसे नाही येथे कसलेही प्रकारचे कष्ट लागत नाही. हे विठ्ठल परमात्म्याचे नाम सर्व भावे गोड आहे. त्या साठी तुम्हाला अंघोळ करणे किंवा तोंड धुणे या कशाची गरज लागत नाही. ते नाम आपण केंव्हाही घेऊ शकतो. याला कुठल्याही प्रकारची चाड लागत नाही संसारिक लोकही हे नाम घेण्यास भीत नाही. संसारिक लोकांनी कितीही कर्म केले तरी ते पूर्ण होतच नाही. पण धर्म हे फळदायक आहे आणि धर्म म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण आहे, त्याने संपूर्ण भाव दुखाच नाश होतो. तुकाराम महाराज म्हणतात येथे कसलीही खटाटोप करण्याची आटाआटी करण्याची गरज नाही. विठ्ठल हे आगम निगमचे स्थान आहे कि ज्या नामा मध्ये सर्व रस अतीव झाले आहे त्या नामात सर्व काही सामावलेले आहे.
अभंग क्र. ८२६
नये इच्छू सेवा स्वइच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणे ॥१॥
देहाच्या निग्रही त्याचा तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥धृपद॥
आपुलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणे क्षोभे ॥२॥
तुका म्हणे सांडा देखीचा दिमाख । मोडसीचे दुःख गांड फाडो ॥३॥
अर्थ

जगातील लोकांची सेवा करावी हि इच्छा धरू नये कारण त्या मुळे आपले देवाकडे लक्ष लागत नाही. या देहाचा सांभाळ हा तोच करत असतो, जर हा देह त्याच्या स्वाधीन केला तर कोणतीही कटकट आपल्यावर येत नाही. स्वतःच्या इच्छेने आई पुत्राची सेवा करत असते, परंतु तिचा हा मोठे पण तिला बाधक होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात वरवरचे दिमाखदार वागणे सोडून द्या कारण मोडसीचे दुखणे झाले तर ढुंगणाचे स्नायू फाटतात.
अभंग क्र. ८२७
सत्य सत्य देततो फळ । नाही लागतचि बळ ॥१॥
ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥धृपद॥
करावीच चिंता । नाही लागत तत्वता ॥२॥
तुका म्हणे भावे । होते सकळ बरवे ॥३॥
अर्थ

सत्य हेच सत्याने फळ देत असते. त्यसाठी इतर बळाची जरुरी लागत नाही. देवाच्या चरणाचे स्मरण हे धैर्‍याने करावे हाच सर्वोत्तम उपाय आहे. मग कोणत्याही प्रकारची चिंता करवी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या चरण जवळ श्रद्धा ठेवली कि सर्व चांगलेच होते.
अभंग क्र. ८२८
साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥
पची पडे मद्यपान । भांगभुर्का हे साधन ॥धृपद॥
अभेदाचे पाठांतर । अति विषयी पडिभर ॥२॥
चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भगपाळ ॥३॥
सेवा मानधन । बरे इच्छेने संपन्न ॥४॥
सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनिया सोडी ॥५॥
अर्थ

कलीयुगामध्ये असे काही ढोंगी साधू आहेत कि ते गुरगुडी ओढतात. मध्यपान भांग दारू इत्यादी मद्यापाचे सेवन करतात. अद्वैताचे वर्णन मोठ्या नाटकी स्वरूपाने सांगतात, पण खरे तर तेच विषयांच्या मध्ये पडलेले असतात. अश्या या साधुंचे शिष्य हि खूप असतात पण ते आडदांड असतात, काहीगुरू शिष्यांकडू मान आणि धन मिळवतात, तुकाराम महाराज म्हणतात असे सोंग आणणारे साधू नरकात नक्कीच जातात आणि हा तुकाराम त्यांची फजिती करतो.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading