आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ फेब्रुवारी, दिवस ५९ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ६९७ ते ७०८
“२८ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 28 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक २८ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
126-6
यावरी बाप पुण्यपवित्र । जगी भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागी ॥126॥
याप्रमाणे तो अर्जुन पुण्याने धन्य असून पवित्र आहे, या जगात भक्तिरूप बीज पेरण्यासाठी त्याची हृदयरुपी भूमी उत्तम आहे; आणि म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला आहे.
127-6
हो का आत्मनिवेदनातळीची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिची । मातृका गा ॥127॥
अथवा आत्मनिवेदनाच्या अलीकडची सख्य नावाची जी आठवी भक्ती मानली जाते, त्या ठिकाणची अर्जुन हा प्रमुख देवता आहे.
128-6
पासीचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुने तो सहजे । पढिये हरी ॥128॥
जवळच असलेल्या प्रभूंचे वर्णन न करता भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे, इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो.
129-6
पाहा पा अनुरागे भजे । जे प्रियोत्तमे मानिजे । ते पतीहून काय न वर्णिजे । पतिव्रता ॥129॥
पहा, असे बघ की, जी पतीची प्रेमभावाने सेवा करते आणि प्रियोत्तम हा जिला अतिशय मानतो, त्या पतीव्रतेचे पतीपेक्षाही अधिक केले जात नाही का ?
130-6
तैसा अर्जुनचि विशेषे स्तवावा । ऐसे आवडले मज जीवा । जे तो त्रिभुवनाचिया दैवा । एकायतनु जाहला ॥130॥
त्याप्रमाणे देवापेक्षही अर्जुनाची विशेष स्तुती करावी, असे माझ्या मनाला भावते, कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-6
जयाचिया आवडीचेनि पांगे । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥131॥
ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन निराकार परमात्मा (सगुण रूप घेऊन) आकाराला आला आहे, आणि तो परिपूर्ण असूनही त्याला अर्जुनाचा वेध लागला आहे.
132-6
तव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादाते हन बरव । जिणोनी आली ॥132॥
हे अर्जुनाचे वर्णन ऐकून श्रोते म्हणाले, ” आमचे काय भाग्य आहे, ते पाहा. उत्तमोत्तम शब्दांची रचना करून बोलण्याची शोभा वाढवली आहे. (काय बोलण्याचा रंग आहे). या बोलण्याच्या शैलीने नादब्रम्हालाही जिंकले आहे.
133-6
हा हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणे उमटताहे आकाशी । साहित्यरंगाचे ॥133॥
अशी ही परिशुद्ध मराठी भाषा बोलली जाते, हे सुद्धा आश्चर्य नाही का ? या भाषेच्या रस- अलंकारांत विविध रंगाचे प्रकार उसळतात.
134-6
कैसे उन्मेखचांदिणे तार । आणि भावार्था पडे गार । हेचि श्लोकार्थ -:कुमुदी तरी फार । साविया होती ॥134॥
या भाषारूपी आकाशात ज्ञानरूपी स्वच्छ टपोरे चांदणे पडले आहे. गूढ अशा अभिप्रायाचा गारवाही यामध्ये आहे. तसेच श्लोकाचा अर्थ हीच जणू काही चांद्रविकासी कमळे सहजच प्रफुल्लित होत आहेत.
135-6
चाडचि निचाडा करी । ऐसी मनोरथी ये थोरी । तेणे विवळले अंतरी । तेथ डोलु आला ॥135॥
त्या बोलण्याची थोरवी श्रेष्ठ आहे. ब्रम्हविद्या ऐकणाऱ्याची इच्छा या भाषेच्या श्रवणाने तृप्त होत असते. ” अशा या बोलांतून श्रोते अंतःकरणात प्रसन्न होऊन डोलू लागले.
136-6
ते निवृत्तिदासे जाणितले । मग अवधान द्या म्हणितले । नवल पांडवकुळी पाहले । कृष्णदिवसे ॥136॥
निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर माऊलीनी हे जाणले. मग ते श्रोत्यास म्हणाले, ” आता इकडे लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी प्रकाशमान दिवस उगवला आहे.
137-6
देवकीया उदरी वाहिला । यशोदा सायासे पाळिला । की शेखी उपेगा गेला । पांडवासी ॥137॥
देवकीने श्रीकृष्णाला आपल्या पदरात वाढविले, यशोदेने मोठ्या कष्टाने याचे लालन-पालन केले; आणि तो शेवटी पांडवांच्या उपयोगी पडला.
138-6
म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । का अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥138॥
म्हणून खूप दिवस श्रीकृष्णाची सेवा करावी आणि योग्य वेळ पाहून उपदेश करण्यासंबंधी विनंती करावी, येवढेदेखील श्रम त्या भाग्येवंत अर्जुनाला पडले नाहीत.
139-6
हे असो कथा सांगे वेगी । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इये संतचिन्हे हन आंगी । न ठकती माझा ॥139॥
श्रोते म्हणाले, हे असू द्या. आता श्रीकृष्ण-अर्जुनाची कथा लवकर सांगावी. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सांगतो, ऐका. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा ! आपण सांगितलेली संतांची लक्षणे माझ्या अंगी प्राप्त होत नाहीत.
140-6
एऱ्हवी या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडे कीर अपुरा । परि तुमचेनि बोले अवधारा । थोरावे जरी ॥140॥
एरव्ही लक्षणांचा सारभूत विचार केला, तर मी त्या मानाने खरोखर अयोग्य, अपूर्ण आहे; परंतु हे भगवंता ! तुमच्या उपदेशानेच जर मला योग्यता आली, तर येऊ शकेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-6
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल । काय जाहले अभ्यासिजेल । सांगाल जे ॥141॥
महाराज, तुम्ही जर माझे हित करण्याकडे लक्ष द्याल, तर मी ब्रम्ह होईन, तुम्ही मला जो अभ्यास करावयास सांगाल, तो करणे मला अशक्य आहे का ?
142-6
हा हो नेणो कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असो अंतःकरणी । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥142॥
आहो, देवा ! आपण कोणाची कथा सांगत आहात हे कळत नाही; परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी, असे वाटते. अशी श्रेष्ठ लक्षणे ज्याच्या अंतःकरणात प्रकट झाली असतील, त्याचे महत्व केवढे बरे असेल.
143-6
हे आंगे म्या होइजो का । येतुले गोसावी आपुलेपणे कीजो का । तव हासोनि श्रीकृष्ण हो का । करु म्हणती ॥143॥
हे देवा ! याप्रमाणे माझ्या अंगी योग्यता प्राप्त होईल, एवढे आपण करू शकाल काय ? त्या वेळी भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, तुला आम्ही अवश्य ब्रम्हरूप करू.
144-6
देखा संतोषु एक न जोडे । तवचि सुखाचे सैंघ सांकडे । मग जोडलिया कवणीकडे । अपुरे असे ॥144॥
असे पहा की, जोपर्यंत संतोष प्राप्त होत नाही, तोपर्यंत चोहोकडे सुखाचा दुष्काळ असतो. एकदा का संतोष प्राप्त झाला, की मग सुखाला कुठे कमतरता आहे ?
145-6
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवके । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुके । परि कैंसा भारे आतला पिके । दैवाचेनि ॥145॥
त्याप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्णपणे सेवक बनला आहे, (येथे अर्जुन सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णाचा सेवक बनला आहे, हे आपण जाणले पाहिजे) तो सहजच ब्रम्हरूप होईल. परंतु अर्जुनाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण तो भाग्यरूपी पिकाच्या भाराने कसा भारावला आहे, ते पाहा.
146-6
जो जन्मसहस्रांचियासाठी । इंद्रादिकाही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे ॥146॥
इंद्रादिकांनी हजारो जन्म घेतले, तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे, ते पाहा. जो अर्जुनाने प्रश्न विचारण्यापूर्वीच अधीर होऊन प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रवृत्त होत आहे.
147-6
मग ऐका जे पांडवे । म्हणितले ब्रह्म म्या होआवे । ते अशेषही देवे । अवधारिले ॥147॥
मग आता ऐका. अर्जुनाने मी ब्रम्ह व्हावे असे जे म्हटले, ते सर्व भगवान श्रीकृष्णांनी ऐकले.
148-6
तेथ ऐसेचि एक विचारिले । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आले । बुध्दीचिया ॥148॥
आणि त्याविषयी देवाने असे अनुमान काढले की, अर्जुनाला ब्रम्हस्वरूप होण्याचे डोहाळे लागले आहेत, याचे कारण त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्यरूपी गर्भ राहिला आहे.
149-6
एऱ्हवी दिवस तरी अपुरे । परि वैराग्यवसंताचेनि भरे । जे सोंहभाव महुरे । मोडोनि आला ॥149॥
एरव्ही अर्जुनरूपी वृक्षला ब्रम्हप्राप्तीचे फळ येण्यासाठी अपुरे दिवस होते, तरीपण वैराग्यरूपी वसंत बहरून आल्यामुळे मी ब्रम्ह व्हावे, या इच्छेचा मोहराने तो फुलून आला आहे.
150-6
म्हणोनि प्राप्तिफळी फळता । यासि वेळु न लागेल आता । हो विरक्तु ऐसा अंनता । भरवसा जाहला ॥150॥
म्हणून ब्रम्हप्राप्ती हे फळ येण्यास आता याला फार काळ लागणार नाही. कारण, हा आता विरक्त झाला आहे, अशी भगवंताची पूर्ण खात्री झाली आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ५९ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६९७ ते ७०८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ६९७
आता जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥
कैसे असोनि ठाउके नेणा । दुःख पावाल पुढिले पेणा ॥धृपद॥
आता नका रे भाई नका रे । आहे गाठी ते लुटवू लोका रे ॥२॥
तुका म्हणे एकाच्या घाये । का रे जाणोनि न धरा भये ॥३॥
अर्थ
हे बाबांनो आता तुम्ही जागा रे तुम्ही जागा रे कारण तुमच्या मध्ये कामक्रोधादी चोर जो पर्यंत निजला आहे तो पर्यंत तुम्ही लवकर देवा कडे पळा. तुमच्या जीवनात पुढे दुखः आहे हे तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही देवाकडे धाव का घेत नाही ? आता तरी असे नका करू रे, नका करू रे तुमच्या जवळ जो काही वेळ आहे तो तरी तुम्ही असे लोकांमध्ये लुटवू नका रे. तुकाराम महाराज म्हणतात अरे या प्रपाच्यात दुसऱ्याला दुःख होत आहे हे पाहून तरी तुम्हाला भय का वाटत नाही ?
अभंग क्र. ६९८
मुदल जतन झाले । मग लाभाचे काय आले ॥१॥
घरी देउनि अंतर गाठी । राख्या पारिख्या न सुटे मिठी ॥धृपद॥
घाला पडे थोडेच वाटे । काम मैंदाचे चपेटे ॥२॥
तुका म्हणे वरदळ खोटे । फासे अंतरिच्या कपटे ॥३॥
अर्थ
आपली मुदल जर जतन झाली तर मग लाभ होणे सहज शक्य आहे. हृदयमंदिरात भक्ती भाव हा ठेव आहे त्याला गाठ मारून ठेवा. त्याचे तुम्ही रक्षण करा त्याला मिठी मारून ठेवा. कामरूपी मैंद शत्रूचा घाला पडेल, त्या पासून तुम्ही सावध राहा. तुकाराम महाराज म्हणतात अंतरात कपटपणा ठेऊन बाहेर दंभ मिरविणे खोटे आहे.
अभंग क्र. ६९९
मज अंगाच्या अनुभवे । काही वाईट बरे ठावे ॥१॥
जालो दोहीचा देखणा । नये मागे पुढे ही मना ॥धृपद॥
वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥
तुका म्हणे घेऊ देवा । सवे करूनि बोळावा ॥३॥
अर्थ
मला माझ्या स्वतःच्या अनुभवाने काय बरे आणि काय वाईट हे समजले आहे. या गोष्टींपासून मी वेगळाच राहणार आहे कारण मागे झालेले आणि पुढे काय होणार या विचाराचा मनावर काहीच परिणाम होत नाही. हे जग ओस आहे हे माहित असून देखील त्याच्याकडे पुन्हा जाणे म्हणजे एक प्रकारचे दुखणेच ओढुन घेतल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून आपण देवालाही आपल्या बरोबर घेऊन जाऊ म्हणजे तो आपल्याला योग्य ठिकाणी पाहोचविल.
अभंग क्र. ७००
पाववावे ठाया । असे सवे बोलो तया ॥१॥
भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणे वाखे ॥धृपद॥
न ठेवू अंतर । काही भेदाचा पदर ॥२॥
तुका म्हणे जीवे भावे । सत्या मानविजे देवे ॥३॥
अर्थ
आम्हाला तू आमच्या ठिकाणी पोहोचव असे आपण देवाला म्हणूया. ज्याचा जसा भक्तिभाव देव विषय असेल तसा देव त्याच्याशी वर्तन करत असतो जो खोटेपणाने दिवशी वागतो त्याचा खोटेपणा मुळे त्याच्यापुढे दुःख होते. म्हणून आम्ही देवाशी काही अंतर न ठेवता काहीच भेद आम्ही ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचे हे जीवा भावाचे सत्य वागणे देवाला मानवते.
सार्थ तुकाराम गाथा ६०१ ते ७०० समाप्त
सार्थ तुकाराम गाथा ७०१ ते ८००
अभंग क्र. ७०१
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविले तेचि द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥धृपद॥
सोडिलिया जग निंद । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणे धीर केला । तेणे याला गोविले ॥३॥
अर्थ
माझा अनुभव तुम्ही पहा, मी देव आपला केला आहे. मी ज्यावेळी देवाला बोलतो त्यावेळी तो लगेच माझ्यापुढे येतो. जग निंदा सोडून दिले म्हणजे गोविंद आपण म्हणेल ते करतो. तुकाराम महाराज म्हणतात मी धैर्याने भक्ती करतो म्हणून देव माझ्या मध्ये गुंतला आहे.
अभंग क्र. ७०२
मोल देऊनिया सांठवावे दोष । नटाचे ते वेष पाहोनिया ॥१॥
हरीदासा मुखे हरीकथा कीर्तन । तेथे पुण्या पुण्य विशेषता ॥धृपद॥
हरीतील वस्त्रे गोपिकांच्या वेशे । पाप त्यासरिसे मात्रागमन ॥२॥
तुका म्हणे पाहा ऐसे जाले जन । सेवाभक्तीहीन रसी गोडी ॥३॥
अर्थ
नाटकातील वेष धरण करणार्यांचे तोंड पाहणे म्हणजे मोल म्हणजे, धन देऊन दोष साठवणे. हरिदासाच्या मुखाने देवाचे चिंतन ऐकणे तेच विशेष पुण्य आहे. नाटकातील लोक हरीचे व गोपिकांचे वेश घेऊ वस्त्र हरणाचे खेळ खेळतात त्यांना तर मोठेच पाप लागते. तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक आहेत यांच्या अंगी भक्ती नाही परमार्थाविषयी गोडी नाही देवाची सेवा करण्याचे यांच्या मनात येत नाही.
अभंग क्र. ७०३
विठोबा विसांविया विसांविया । पडो देई पाया ॥१॥
बहु खेद क्षीण । आलो सोसुनिया वन ॥धृपद॥
बहुता काकुलती । आलो सोसिली फजिती ॥२॥
केली तुजसाठी । तुका म्हणे येवढी आटी ॥३॥
अर्थ
हे विठोबा तुझ्या ठायी विश्रांती आहे, मला तुझ्या पाया पडू दे. अविद्येच्या वनातील दुःख सुसून मी फार कष्टी झालो. देवा मी खूप काकुलती चालू आहे कारण मी आजपर्यंत खूप फजिती सहन करत इथपर्यंत आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी एवढी आटाआटी तुझ्यासाठी केली आहे देवा.
अभंग क्र. ७०४
का गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥१॥
उभाउभी पाय जोडी । आता फांको नेदी घडी ॥धृपद॥
नको सोडू ठाव । आता घेऊ नेदी वाव ॥२॥
तुका म्हणे इच्छा । तैसी करीन सरसा ॥३॥
अर्थ टाका तपास कार
अभंग क्र. ७०५
तुमची तो भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडेच बोली ब्रम्हज्ञान ॥१॥
आता न बोलावे ऐसे वाटे देवा । संग न करावा कोणासवे ॥धृपद॥
तुम्हा निमित्यासी सापडले अंग । नेदावा हा संग विचारिले ॥२॥
तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाचीच होती ॥३॥
अर्थ
हे हरी तुमची मला अजून भेट झाली नाही त्यामुळे मला असे वाटते कि माझ्या मुखातून जे ब्रम्हज्ञानाचे बोल येतात ते अजून कोरडेच आहे. आता मला असे वाटते की, कोणाही संगे न बोलावे व कोणाच्या संपर्कात फार रहू नये. देवा मी ब्रम्हज्ञान सांगतो म्हणून तुम्ही असे ठरवले आहे कि काय कि आता तुला दर्शन द्यायची गरज राहिली नाही हे निमित्त साधून माझ्याबरोबर संगच करायचा नाही असेच असे तुम्ही ठरविले आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात आता मला एकच वासना आहे ती तुम्ही पूर्ण करा, ती वासना म्हणजे तुमच्या दर्शनाची आवड मला आहे ते दर्शन तुम्ही मला द्या.
अभंग क्र. ७०६
आहे तेचि आम्ही मागो तुजपाशी । नव्हो तुज ऐसी क्रियानष्ट ॥१॥
न बोलावी तेची वर्मे बरे दिसे । प्रकट ते कैसे गुण करू ॥धृपद॥
एका ऐसे एका द्यावयाचा मोळा । का तुम्हा गोपाळा नाही ऐसा ॥२॥
तुका म्हणे लोका नाही कळो आले । करावे आपुले जतन तो ॥३॥
अर्थ
हे देवा तुझ्या जवळ जे आहे तेच तर आम्ही मागत आहोत, तरी तू देत नाहीस असा तू क्रियानष्ट होऊ नकोस. तुझ्यावर आम्ही प्रेम करून देखील तू आम्हाला भेटत नाहीस हे वर्म आम्हाला सांगणे बरे दिसत नाही. तुझे हे गुण आम्ही कसे प्रकट करू ? आज पर्यंत तुम्ही एका भक्ताचा उद्धार केला मग आता हे गोपाळा तुम्ही दुसऱ्या एका भक्ताचाअव्हेर का ? तुकाराम महाराज म्हणतात आजून पर्यंत लोकांना तुझे हे र्दुगुण कळून आले नाहीत त्यामुळे आपल्या ब्रीदाचे रक्षण तू करून घे.
अभंग क्र. ७०७
आह्मी याची केली सांडी । कोठे तोंडी लागावे ॥१॥
आहे तैसा असो आता । चिंते चिंता वाढते ॥धृपद॥
बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावे ॥२॥
तुका म्हणे आम्हापाशी । धीराऐसी जतन ॥३॥
अर्थ
तू आमच्या कडे लक्ष देत नाहीस त्यामुळे आम्ही तुझ्याशी संबंध तोडले आहे कुठे तुझ्या तोंडी लागावे ? आता देव आहे तसा असेल त्याच्या विषयी चिंता केल्याने चिंता वाढत जाईल त्यामुळे चिंता करणे सोडून दिले आहे. आम्ही जे काही देवाला बोलतो त्याचा त्रास होतो, त्यामुळे आपण दोघानी भिन्न भिन्न राहावे हे बरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू आमच्याशी कसाही वागलास तरी आम्ही तुझी भक्ती सोडणार नाही.
अभंग क्र. ७०८
आम्हापाशी याचे बळ । कोण काळवरी तो ॥१॥
धरूनि ठेलो जीवेसाठी । होय भेटी तोवरी ॥धृपद॥
लागलो तो न फिरे पाठी । पडिल्या गाठी वाचूनि ॥२॥
तुका म्हणे अवकाश । तुमच्या ऐसे व्हावया ॥३॥
अर्थ
देवाचे बळ आमच्यापाशी किती काळ चालणार आहे ? जोपर्यंत देवाची आणि आमची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला आमच्या हृदयात भरून ठेवू. गाठ झाल्या शिवाय आम्ही याची पाठ सोडणार नाहीत तोवर आम्ही देवाच्या मागे फिरणार. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या सारखे होण्यास आजून काही काळ बाकी आहे. त्यानंतर आपले ऐक्य होईलच.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















