आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ मार्च, दिवस ६८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ८०५ ते ८१६
“९ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ९ March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८०५ ते ८१६ चे पारायण आपण करणार आहोत.
९ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी ३५१ ते ३७५,
351-6
जागणे जरी जाहले । तरी व्हावे ते मितले । येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सहजे ॥351॥
जाग्रण जरी करावयाचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरांतील रक्तादिक सप्तधातू समतोल राहतील.
352-6
ऐसे युक्तीचेनि हाते । जे इंद्रिया वोपिजे भाते । तै संतोषासी वाढते । मनचि करी ॥352॥
अशा प्रकारे बेताबाताने इंद्रियांची तृप्ति केली, म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धि करिते.
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥6. 18॥
353-6
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तव आत सुख वाढे । तेथे सहजचि योगु घडे । नाभ्यासिता ॥353॥
याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेविली, तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन, त्या मनुष्याला अभ्यास न करिता योग सहज घडतो.
354-6
जैसे भाग्याचिये भडसे । उद्यमाचेनि मिसे । मग समृध्दीजात आपैसे । घर रिघे ॥354॥
ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते.
355-6
तैसा युक्तीमंतु कौतुके । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीची पिके । अनुभवु तयाचा ॥355॥
त्याप्रमाणे, जो नियमशील आहे, तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला, तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच.
356-6
म्हणोनि युक्ती हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गाचिये राणिवा । अळंकरिजे ॥356॥
म्हणुन, अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे साह्य असते, तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो.
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥6. 19॥
357-6
युक्ती योगाचे आंग पावे । ऐसे प्रयाग जे होय बरवे । तेथ क्षेत्रसंन्यासे स्थिरावे । मानस जयाचे ॥357॥
नियमित वागणाराला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली, तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयागतीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरुपी प्रयागाचे ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्रसंन्याशाप्रमाणे कायम राहते
358-6
तयाते योगायुक्त म्हण । हेही प्रसंगे जाण । ते दीपांचे उपलक्षण । निर्वातीचिया ॥358॥
त्याच मनुष्याला तू योगी म्हण. आणि प्रसंगानुरोधाने हेही पण लक्षात ठेव की, त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते.
359-6
आता तुझे मनोगत जाणोनि । काही एक आम्ही म्हणोनि । ते निके चित्त देउनी । परिसावे गा ॥359॥
आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्ट सांगतो ती चित्त देऊन ऐक,
360-6
तू प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासी दक्ष नव्हसी । ते सांग पा काय बिहसी । दुवाडपणा ॥360॥
तू योगप्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही; तर तो अभ्यास कठिण आहे अशी तुझ्या मनात भीति वाटते की काय, ते सांग.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-6
तरी पार्था हे झणे । सायास घेशी हो मने । वाया बागूल इये दुर्जने । इंद्रिये करिती ॥361॥
पार्था, कदाचित तू ही भीति मनात बाळगशील; पण तसे करू नको हो ! कारण, ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबोवा करून भीति दाखवितात !
362-6
पाहे पा आयुष्याचा अढळ करी । जे सरते जीवित वारी । तया औषधाते वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥362॥
पहा की, जे आयुष्य स्थिर करते, वाढविते, आणि संपणाऱ्या जीविताला मागे आणते मृत्यु टाळते, त्या औषधाला देखील जिव्हा शत्रु समजत नाही का ?
363-6
ऐसे हितासि जे जे निके । ते सदाचि या इद्रिंया दुःखे । एऱ्हवी सोपे योगासारिखे । काही आहे ॥363॥
त्याचप्रमाणे, परलौकीक हितास जे चांगले, ते नेहमी इंद्रियांना दुःखदायक वाटते; येरवी या योगसाधनाइतके दुसरे काही सोपे साधन आहे का ?
यत्रोपरमते चित्तं निरुध्दं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥6. 20॥
सुखमात्यन्तिकं यत् तद् बुध्दीग्राह्यमतीद्रिंय ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥6. 21॥
364-6
म्हणोनि आसनाचिया गाढीका । जो आम्ही अभ्यासु सांगितला निका । तेणे होईल तरी हो का । निरोधु यया ॥364॥
म्हणून आसनाच्या बळकटीने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला, त्या योगानेच झाला तर या इंद्रियांचा निग्रह होईल.
365-6
एऱ्हवी तरी येणे योगे । जै इद्रिंया विंदाण लागे । तै चित्त भेटो रिगे । आपणपेया ॥365॥
येरवी या योगसाधनाने जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो, तेव्हा आपले आपणच चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरिता जाते.
366-6
परतोनि पाठिमोरे ठाके । आणि आपणियाते आपण देखे । देखतखेवो वोळखे । म्हणे तत्त्व हे मी ॥366॥
चित्ताची धाव नेहमी पुढे असते; ती मागे फिरून ज्या वेळेस त्या आत्म्याकडे पाहते, त्या वेळेस त्याला आत्मा व आपण हे दोन्ही एकच आहो अशी ओळख पटते.
367-6
तिये ओळखीचिसरिसे । सुखाचिया साम्राज्यी बैसे । मग चित्तपण समरसे । विरोनि जाय ॥367॥
ती ओळख झाल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते, आणि मग ब्रम्हानंदाने आपल्या ठिकाणीच लय पावते;
368-6
जयापरते आणिक नाही । जयाते इद्रिंये नेणती कही । ते आपणचि आपुलिया ठायी । होऊनि ठाके ॥368॥
आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही व ज्याला इंद्रिये कधी जाणत नाहीत असे जे ब्रह्म, ते ते स्वतःच होऊन राहते.
यं लब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥6. 22॥
369-6
मग मेरुपासूनि थोरे । देह दुःखाचेनि डोंगरे । दाटिजो पा परि भरे । चित्त न दटे ॥369॥
मग अशी स्थिती झाल्यावर, मेरु पर्वतापेक्षांही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या चित्ताला दुःख होत नाही;
370-6
का शस्त्रे वरी तोडिलिया । देह अग्निमाजी पडलिया । चित्त महासुखी पहुडलिया । चेवोचि नये ॥370॥
किंवा शस्त्राने जरी देह तोडला, अथवा अग्नीत जरी पडला, तरी महासुखात निमग्न झालेले त्यांचे चित्त जागृत होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-6
ऐसे आपणपा रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥371॥
याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो, आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टीचा त्याला विसर पडतो.
तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स् निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥6. 23॥
372-6
जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडी । गुंतले जे ॥372॥
ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन वासनेची आठवणच सोडते,
373-6
जे योगाची बरव । संतोषाची राणीव । ज्ञानाची जाणीव । जयालागी ॥373॥
जे योगाची शोभा, संतोषाचे केवळ राज्य आणि ज्याच्याकरिता ज्ञानाची आवश्यकता,
374-6
ते अभ्यासिलेनि योगे । सावयव देखावे लागे । देखिले तरी आंगे । होईजेल गा ॥374॥
ते ब्रह्मसुख अभ्यासाचे योगाने मुर्तिमंत दिसु लागल्यावर ते पाहणारा तद्रूपच बनतो.
संकल्पप्रभवान् कामास्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेद्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥6. 24॥
375-6
तरि तोचि योगु बापा । एके परि आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥375॥
तथापि अर्जुना, एका परी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे कामक्रोधादिक, त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल, तेव्हाच तो साध्य होतो.
दिवस ६८ वा, ९, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८०५ ते ८१६
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ८०५
पुढे आता कैचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥
सर्वथाही फिरो नये । ऐसी सोय लागलिया ॥धृपद॥
पांडुरंगा ऐसी नांव । तारू भाव असता ॥२॥
तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥
अर्थ
आता या पुढे संसार रुपी जन्म मृत्यूचे निवारण होण्यासाठी मनुष्याचा या पुढे जन्म कसा मिळेल ? त्यामुळे मानव जन्म आपणास लाभला आहे व अशी सोय असताना इतर कुठेही फिरू नये पांडुरंगा सारखी नांव आपल्याला भक्ती भावाने या भावसागरातून तारणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबांनो तुम्हाला पुढे प्राप्त होणार्या जन्म-मृत्यूच्या सर्व खेपा चुकतील फक्त तुम्ही एकनिष्ठ भक्तिभावाने पांडुरंगाची भक्ती करा.
अभंग क्र. ८०६
दुध दही ताक पशूचे पाळण । त्या मध्ये कारण घृतसार ॥१॥
हेचि वर्म आम्हा भाविकांचे हाती । म्हणऊनि चित्ती धरिला राम ॥धृपद॥
लोह कफ गारा अग्नीचिया काजे । येऱ्हवी ते ओझे कोण वाहे ॥२॥
तुका म्हणे खोरी पाहारा जतन । जोवरी हे धन हाती लागे ॥३॥
अर्थ
दूध दही ताक हे मिळावे यासाठी लोक गाई-म्हशी इत्यादी पशूंचे पालनपोषण करतात परंतु या सर्व म्हणजे दही दूध ताक या सर्वाचे सार तूप आहे. त्याप्रमाणेच परमार्थामध्ये अनेक साधने आहेत परंतु सर्वाचे मुख्य सार म्हणजे रामाची नाम आहे व तेच आम्हा भक्तांच्या हाती तूप सारखे सारभूत असलेले राम नाम लागले आहे. म्हणून आम्ही त्याला चित्तात धरले आहे. लोखंड, गारगोटी, कापूस अग्नी उत्पन्न करण्यासाठी जवळ ठेवाव्यात नाही तर इतर वेळेस त्यांचे ओझे कोण वागवित बसेल ? तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत भूमीतील धन हाती लागत नाही तो पर्यंत आपल्याला टिकाव, पहार, घमेले यांची मदत घ्यावी लागते. म्हणजे रामाच्या प्राप्ती साठी आपल्याला नाम, जप, कीर्तन या साधनांची गरज लागते वर्माची प्राप्ती झाली कि मग या साधनांची गरज लागत नाही.
अभंग क्र. ८०७
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥१॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषाचे डोंगर ॥धृपद॥
क्षमा दया शांति । बाण अभंग हे हाती ॥२॥
तुका म्हणे बळी । तेचि एक भू मंडळी ॥३॥
अर्थ
विठ्ठलाचे सेवक हे वीर आहेत त्यामुळे कळी काळ त्यांच्या पाया पडतो. ते नेहमी विठ्ठल नामाचा घोष करतात त्यामुळे त्याचे दोषाचे डोंगर जाळून जातात. दया क्षमा शांती नामक अभंग म्हणजे न भंगणारे बाण त्या सेवकांच्या हाती कायम असतात. तुकाराम महाराज म्हणतात या संपूर्ण पृथ्वीवर तेच खरे बलाढ्य व बलवान आहे.
अभंग क्र. ८०८
ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥
मग कैचे रे बंधन । वाचे गाता नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥धृपद॥
दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥
सकळशास्त्रांचे सार । हे वेदांचे गव्हर । पाहाता विचार । हाचि करिती पुराणे ॥३॥
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळाहि अधिकार । बाळे नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥
तुका म्हणे अनुभवे । आह्मी पाडियले ठावे । आणीक ही दैवे । सुख घेती भाविके ॥५॥
अर्थ
हे लोकांनो तुमच्या स्वहिताची खूण तुम्हाला जाणायाची असेल तर त्या पांडुरंगाचे मनात स्मरण करत राहा. वाचेने तुम्ही जर कायम नारायणाचे गुणगान करात राहाल तर मग तुम्हाला कसले बंधन आले. भवसागर हा पैलतीरालाच नाहीसा होईल. सर्व काळी काळ तुमचे दास्यत्व करेल. मायाजळाचे तुमचे बंधन तुटेल, आणि रिद्धी सिद्धी तुमचे दास्यत्व करेल. विठ्ठलाचे नामस्मरण हे सर्व शास्त्रांचे सार आहे, आणि पुराणे देखील या नामस्मरणाचेच गुणगान गातात. नामस्मरण करण्याचा अधिकार हा सर्वानाच असतो. मग तो ब्राम्हण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शुद्र असो, चांडाळ किंवा बालक असो, नर असो, नारी असो एवढेच नाही वेश्यांना देखील या नामस्मरणाचा अधिकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आलेला अनुभव आम्ही तुम्हाला सांगत आहे, आणि जो कोणी दैववान भाग्यवान भाविक आहे तोच या नामस्मरणाचे सुख घेईल.
अभंग क्र. ८०९
न करी तळमळ राहे रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥
अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥धृपद॥
आणिकिया जीवा होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥
आहिक्य परत्री होसील सरता । वाचे उच्चारीता रामराम ॥३॥
तुका म्हणे सांडी संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥४॥
अर्थ
हे मानवा तू कसल्याही प्रकारची तळमळ करू नकोस तू निश्चळ राहा. अहो आमचा स्वामी कृपाळू आहे दया घन आहे. आपले मन तू स्थिर ठेव. आमचा विठ्ठल परमात्मा हा अविनाशी सुख देणारा आहे. त्यामुळे तू त्याचे चिंतन करशील तर तो तुला चौऱ्यांशीच्या खाणीतून वाचवील. त्यामुळे तुझा तर उध्दार होईलच पण इतरही जीवाचा तुझ्यामुळे उद्धार होईल आणि कोट्यावधी जीवांवर तुझे उपकार होतील. तू जर तुझ्या मुखाने रामराम नामाचा उच्चार करशील तर तुझा ऐहिक आणि पारलौकिक उद्धार होईल. या करता तू रामराम मंत्राचा जप करत जा. तुकाराम महाराज म्हणतात या संसाराचा छंद तू सोडून दे मग तुला परमानंद नक्कीच मिळेल.
अभंग क्र. ८१०
का रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरी । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥धृपद॥
आणीक ही भोग आणिका इंद्रियांचे । नाही ऐसे साचे जवळी काही ॥२॥
रूप दृष्टि धाय पाहाता पाहाता । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥
तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी । देवासवे तुटी करितोसी ॥४॥
अर्थ
अरे गाढवा तू संसाराचा दास का होत आहे. त्या संसाराचे दास्यत्व पत्करल्यामुळे तुला दुःखाचे डोंगर भोगावे लागत आहे. जिभेच्या शेंड्यावर आपल्याला मिष्टांन्नाची गोडी कळत असते पण एकदा कि पोट भरले तर मग आपल्याला स्वाद कळत नाही. एका इंद्रियाचे भोग दुसऱ्या इंद्रियांना भोगता येत नाही. आणि सुखही भोगता येत नाही. हरी रूप आपण वारंवार पहिले तर दृष्टी तृप्त होते. आणि दुसरी कुठलीही तृष्णा राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे या संसारासाठी देवा पासून का दूर गेलास ?
अभंग क्र. ८११
बैसोनि निश्चळ करी त्याचे ध्यान । देईल तो अन्न वस्त्रदाता ॥१॥
काय आम्हा करणे अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥धृपद॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागता लळा राखो जाणे ॥२॥
न लगे सांगणे मागणे तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥
तुका म्हणे लेई अळंकार अंगी । विठ्ठल हा जगी तूचि होसी ॥४॥
अर्थ
तू एका जागेवर बसून देवाचे चिंतन करत रहा निश्चिंत राहा तो ईश्वर तूला अन्न वस्त्र बसल्या जागेवर देईल. आम्हाला उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गोष्टी अधिक साचवून काय करायचे आहे. सर्व काही पुरविणार तो देवच आमचा ऋणी झाला आहे त्यामुळे आम्हाला कसली कमतरता नाही. तो मोठा दयाळू आहे, मयाळू आहे, जो कोणी त्याला अनन्य भावाने शरण जातो त्याचे सर्व लाड तो पुरवितो. त्याला काही सांगावेही लागत नाही काही मागवेही लागत नाही कारण ज्याची मनात जशी इच्छा आहे त्याची ती इच्छा तो हरी पुरवितो. तुकाराम महाराज म्हणतात तू आपल्या अंगी विठ्ठल रुपी अलंकार परिधान कर म्हणजे तू देखील विठ्ठल मयच होऊन जाशील.
अभंग क्र. ८१२
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥
काय करावे प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥धृपद॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥२॥
तुका म्हणे हित । ते मज सांगावे त्वरित ॥३॥
अर्थ
हे संत जनहो जर सोन्याच्या पत्रात दारू भरली तर ते सोन्याचे पात्र कितीहि चांगले असले तरी त्या सोन्याच्या पत्राला काही किंमत आहे का ?. त्या प्रमाणे मातीच्या मडक्यात अमृताचा साठा केला तर त्या अमृताला मडक्यामुळे काही दोष लागेल का किंवा ते अमृत अपवित्र होईल का ? तुकाराम महाराज म्हणतात आता माझे हित ज्याच्या मध्ये आहे ते कृपा करून लवकरात लवकर हे संत जनहो तुम्ही मला सांगा.
अभंग क्र. ८१३
सेत करा रे फुकाचे । नाम विठोबारायाचे ॥१॥
नाही वेठी जेवा सारा । जाहाती नाही म्हणियारा ।
सरिक नाही रे दुसरा । धनी सारा तुझा तू ॥धृपद॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥
कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥
ज्ञानपाभारी तीफणी । न लगे करावी पेरणी ॥४॥
बीज न लगे संचिताचे । पीक पिकले ठायीचे ॥५॥
नाही यमाचे चोरटे । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटे ॥६॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥
सराई सर्व काळ । वाया न वजे घटिकापळ ॥८॥
प्रेम पिकले अपार । नाही सांठावावया थार ॥९॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥
अर्थ टाका :
अभंग क्र. ८१४
वोणव्या सोंकरी । सेत खादले पाखरी ॥१॥
तैसा खाऊ नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥धृपद॥
चोरासवे वाट । चालोनि केले तळपट ॥२॥
डोळे झांकुनि राती । कूपी पडे दिवसा जोती ॥३॥
पोसी वांज गाय । तेथे कैची दुध साय ॥४॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥
अर्थ
शेती कडे दुर्लक्ष केले तर त्या मालकाचे शेतातील धान्य पाखरे खातात. त्या प्रमाणे हे मानवा तू पर्माथाच्या ठिकाणी जागा राहा, तेथे तू दगा खाऊ नकोस. चोरांच्या संगतीत राहून ज्यांनी ज्यांनी आपले वाटोळे करून घेतले, व जे डोळे झाकून भर दिवसा आपल्या जीवनात अंधार करून घेतात, म्हणजे कर्तव्याकडे दुर्लक्ष करता. ते पापाच्या कुपीत पडतात म्हणजे विहिरीत पडतात. या संसार रुपी वांज गाईचे जे पोषण करतात त्यांना दुधाची व साय याची प्राप्ती कशी होईल ? तुकाराम महाराज म्हणतात फुटक्या नावेच्या सहाय्याने पैलतीराकडे जाणे शक्य होणार नाही. त्या प्रमाणे च संसाराच्या नादी लागून जमणार नाही.
अभंग क्र. ८१५
सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण । पिक आले परी केले पाहिजे जतन ॥१॥
सोंकरी सोंकरी सोहंकरी । विसावा तो वरी नको उभे आहे तो ॥धृपद॥
गोफणेसी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटे । पळती आहाकारे अवघी पाखरांची थाटे ॥२॥
पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि । पडिलिया मानी बळ बुद्धी व्हावी दोनी ॥३॥
खळे दाते विश्व सुखी करी होता रासी । सारा सारूनिया ज्यांचे भाग देई त्यासी ॥४॥
तुका म्हणे मग नाही आपुले कारण । निज आले हाता भूस सांडिले निकण ॥५॥
अर्थ
आपले देह हे शेत आहे हे सुगीला आले असून त्याचे जे चार कोपरे आहेत ते म्हणजे इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे सांभाळावे. पिक आले आहे तरी ते चांगल्या प्रकारे जतन केले पाहिजे. त्याला तू चांगल्या प्रकारे सांभाळ, तू चांगल्या प्रकारे सांभाळ, तू चांगल्या प्रकारे सांभाळ. गोफण म्हणजे मुखात तू हरी नामचे गोफण गुंडा घालून तू फेक जेणे करू तुझ्या या शेतातील म्हणजे शरीरातील काम क्रोध रुपी पाखरे उडून जातील. तू तुझ्यातील आगटी पेटवून जागा सोडून दुसरीकडे म्हणजे देहबुद्धीची जागा सोडू दुसरीकडे राहा, तू तुझ्यातील अभिमानाचा हल्ला परतवण्यासाठी बळ व बुद्धी यांचे सहाय्य घ्यावे. या पिकाच्या खळ्यावर तू सर्वाना उपदेश रुप दान देऊन सुखी कर. तू तुझा सारा भरून ज्याचा त्याचा भाग त्याला देऊन टाक. तुकाराम महाराज म्हणतात असे जर तू केलेस तर मग तुला काहीच कर्तव्य राहणार नाही, व तुझ्या हातातील संसार रुपी भूस सांडून फक्त नीज स्वरूप प्राप्त होईल.
अभंग क्र. ८१६
नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥
अर्थ
तुम्हाला दुध (त्या मध्ये सर्व सार आहे) असे दुध नसेल द्यायचे तर नका देऊ, पण निदान ताक देऊन तरी थोडे उपकार करा. अहो अन्न नसेल देत तर नका देऊ पण निदान पाणी तरी पाजा. तुकाराम महाराज म्हणतात मला या सगुण रुपाची चाड म्हणजेच आवड आहे, तरी मला कोणी तरी त्या हरीचे दर्शन घडवा एवढे कोणी तरी माझी दुर्बळाची इच्छा पूर्ण करा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















