९ नोव्हेंबर, दिवस ३१३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६०१ ते ६२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७४५ ते ३७५६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“९ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 9 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ९ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७४५ ते ३७५६ चे पारायण आपण करणार आहोत.
९ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६०१ ते ६२५,

601-18
तैसी फळे देखोनि पुढे । काम्यकर्मे दुवाडे । करी परी ते थोकडे । केलेही मानी ॥601॥
त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो. परंतु ती थोडीच केली असे मानतो. 601
602-18
तेणे फळकामुके । यथाविधी नेटके । काम्य कीजे तितुके । क्रियाजात ॥602॥
याप्रमाणे फळाची इच्छा धरून, काम्यकर्मे जितकी असतील, इतकी यथाविधि करतो 602
603-18
आणि तयाही केलियाचे । तोंडी लावी दौंडीचे । कर्मी या नांवपाटाचे । वाणे सारी ॥603॥
आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करीतो व ‘ मी मोठा कर्मठ आहे ‘ या नावाची ख्याती चोहीकडे पसरवितो. 603
604-18
तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसे ॥604॥
त्या पुरुषांमध्ये असा कर्म अहंकार भरतो की, काळ ज्वर जसा कोणत्याच औषधाला जुमानीत नाही, तसा तो पिता आणि गुरू यांचीही पर्वा करीत नाही. 604
605-18
तैसेनि साहंकारे । फळाभिलाषिये नरे । कीजे गा आदरे । जे जे काही ॥605॥
तशा कर्माभिमानी फळाभिलाशी पुरुषाकडून हे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते, 605


606-18
परी तेही करणे बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो का जैसा । कोल्हाटियांचा ॥606॥
ते ते पुष्कळ आयासानेही केलेले कर्म कोल्हाट्याच्या उपजीविकेसाठी केलेल्या कर्माप्रमाणे नुसते कष्टाला कारण होते. 606
607-18
एका कणालागी उंदिरु । आसका उपसे डोंगरु । का शेवाळोद्देशे दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥607॥
एका कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरीता बेडूक समुद्र ढवळतो; 607
608-18
पै भिकेपरते न लाहे । तऱ्ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येका ॥608॥
भिक्षे शिवाय दुसरी काही प्राप्ति न होता गारुडी जसे सापाचे ओझी वाहतो; काय करावे ! या लोकांना खटपटत प्रिय आहे. 608
609-18
हे असो परमाणूचेनि लाभे । पाताळ लंघिती वोळंबे । तैसे स्वर्गसुखलोभे । विचंबणे जे ॥609॥
हे असो; एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीकरीता जे श्रम करणे. 609
610-18
ते काम्य कर्म सक्लेश । जाणावे येथ राजस । आता चिन्ह परिस । तामसाचे ॥610॥
तेच क्लेशयुक्त काम्यकर्म राजस आहे असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण सांगतो, ते ऐक. 610
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥18. 25॥
611-18
तरी ते गा तामस कर्म । जे निंदेचे काळे धाम । निषेधाचे जन्म । सांच जेणे ॥611॥
जे निंदेचे काळे(पापमय) घराच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे, ते तामस कर्म होय. 611
612-18
जे निपजविल्यापाठी । काहीच न दिसे दिठी । रेघ काढलिया पोटी । तोयाचे जेवी ॥612॥
जशी पाण्यावर काढलेली रेघ दुसऱ्याचक्षणी दिसत नाही, त्याप्रमाणे जे कर्म केल्यानंतर उत्तरक्षणी त्याचे काहीच स्वरूप दिसत नाही, 612
613-18
का कांजी घुसळलिया । का राखोंडी फुंकलिया । काही न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥613॥
किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाहीत, अथवा वाळू घाण्यात घातली असता जसे तिजपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही, 613
614-18
नाना उपणिलिया भूंस । का विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥614॥
अथवा भूस उपणपने किंवा आकाशात बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता फांस टाकणे, 614
615-18
हे आवघेंचि जैसे । वांझे होऊनि नासे । जे केलिया पाठी तैसे । वायाचि जाय ॥615॥
या गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ आहेत, त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते; 615


616-18
येऱ्हवी नरदेहाही येवढे । धन आटणीये पडे । जे कर्म निफजविता मोडे । जगाचे सुख ॥616॥
एऱ्हवी नरदेह एवढेही अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते, त्याच्या योगाने जगाला सुख न देता दुःख मात्र होते. 616
617-18
जैसा कमळवनी फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळा करी ॥617॥
ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरिता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपल्यास श्रम होऊन कमळाचाहि नाश होतो; 617
618-18
का आपण आंगे जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळे । दीपाचेनि ॥618॥
किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करितो, 618
619-18
तैसे सर्वस्व वाया जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणे ॥619॥
त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले, तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो, 619
620-18
माशी आपणयाते गिळवी । परी पुढीला वांती शिणवी । ते कश्मळ आठवी । आचरण जे ॥620॥
माशी ही स्वतःला गीळविते, (पोटात जाऊन स्वतः मरते) पण दुसऱ्याला वांति करून शिणविते, तशा प्रकारचे जे आचरण ते सदोष आहे असे तू लक्षात ठेव. 620
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


621-18
तेही करावयो दोषे । मज सामर्थ्य असे की नसे । हेही पुढील तैसे । न पाहता करी ॥621॥
बरे, तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही, यापुढील विचार तर करावा पण तसे काही न करता कर्म करू लागतो; 621
622-18
केवढा माझा उपावो । करिता कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ॥622॥
माझा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे, आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे, 622
623-18
इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पाये । पुसोनिया होये । साटोप कर्मी ॥623॥
या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो, आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो; 623
624-18
आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । का स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥624॥
अग्नि ज्या वेळूपासून उत्पन्न होतो, ती आपली रहाण्याची जागा (वेळूंचे बेट) जाळून पसरतो, अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला, 624
625-18
मग नेणे बहु थोडे । न पाहे मागे पुढे । मार्गामार्ग येकवढे । करीत चाले ॥625॥
म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करिता व मागेपुढे न पाहता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो; 625

दिवस ३१३ वा. ९, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७४५ ते ३७५६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३७४५ (काला)
धन्य ते गोधने कांबळी काष्ठिका । मोहरी पावा निका ब्रीद वांकी ॥१॥
धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य झाल्या ॥धृपद॥
धन्य ते देवकी जसवंती दोहीचे । वसुदेवनंदाचे भाग्य झाले ॥२॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवा सकळा धन्य झाले ॥३॥
धन्य म्हणे तुका जन्मा तीचि आली । हरीरंगी रंगली सर्वभावे ॥४॥
अर्थ

श्रीकृष्णच्या स्पर्शाने पानव झालेले गोकुळातील गोधन, कांबळि, काठ्या, पावा, वाक्या खरेच धन्य होत. गोकुळातील नर-नारी, गोपाल धन्य होत, सारे गोकुळच धन्य होत. देवकी, यशोदा या दोघी धन्य आहेत. वासुदेव, नंद हे सर्वात भाग्यवान आहेत. त्या साऱ्या गोपीका, रुक्मिणी, सोळा हाजार एकशे आठ नारी आणि सर्व यादव धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरिच्या रंगात रंगून गेलेली ती सारी माणसे मनुष्यजन्माला येवून धन्य झाली.
12:47
अभंग क्र. ३७४६
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥
धावोनिया मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठी ॥धृपद॥
तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी । भोळेपणालागी भीक मागे ॥२॥
अर्थ

गौळणींनी गळ्यात बांधलेले ते सगुन, सुकुमार ब्रम्ह गोपाळांमध्ये खेळत होते. यशोदे मातेच्या मागे धावत जावून जेवायला मागत होते आणि गाईंच्या मागे रानोमाळ हिंडत होते. तुकाराम महाराज म्हणतात, कृष्णच्या आंगी सर्व कला होत्या, परंतु भोळेपनाचे ढोंग आणून तो भिक्षा मागत होता.
12:48
अभंग क्र. ३७४८
हा गे माझे हाती । पाहा कवळ सांगाती ॥१॥
देवे दिला खातो भाग । कराल तर करा लाग ॥धृपद॥
धाले ऐसे पोट । वरी करूनिया बोभाट ॥२॥
तुका म्हणे घरी । मग कैंच्या या परी ॥३॥
अर्थ

हा पहा, माझ्या हातात काल्याचा घास आहे. भगवंताने जो वाटा मला दिला, तो मी सेवन करत आहे. तुम्हालाही घास हवा असेल तर त्याच्या मागे धावा. माझे पोट या प्रकारे भरले आणि वर इतरांना वाटण्यासाठी मी बोभाटाहि करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे गोपालांनो, घरी बसून राहिलात तर या प्रकारचा (आनंददायी) भोजनाचे घास कसे बरे मिळणार ?
12:52
अभंग क्र. ३७४९
अवघे अवघीकडे । दिले पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥
का रे धरिला अबोला । माझा वाटा देई मला । सिदोरीचा केला । झाडा आता निवडे ना ॥धृपद॥
भूक लागली अनंता । का रे नेणसी जाणता । भागलो वळिता । गाई सैरा ओढाळा ॥२॥
तुका करुणा भाकी । हरी पाहे गोळा टाकी । घेता झाला सुखी । भीतरी वाटी आणीका ॥३॥
अर्थ

देवा तू जिकडे तिकडे सर्वाना काही दयायचे आहे ते दिले आहे आता माझ्याकडेही पाहा. हे कृष्णा आता माझ्या मित्रांना व मला तुझ्याकडून मोठी अपेक्षा लागली आहे. हे कान्होबा तू माझ्याविषयी अबोला का धरला आहेस माझा वाटा मला देऊन टाकावा. आता मी माझ्या पाप पुण्यात्मक कर्मरुपी शिदोरीचा झाडा केला आहे माझ्याजवळ आता निवडण्यासारखे काहीच राहिले नाही. हे अनंता आता मला भूक लागली आहे खूप भूक लागली आहे हे तू सर्व जाणत आहे तरी देखील कारे तू न जाणल्यासारखे करतोस ? ओढाळ व सैरवैर धावणाऱ्या गाईंना वळता वळताच मी दमलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “भगवान श्रीकृष्णाबरोबर मीही त्यावेळी गोपाळाच्या रुपाने त्यांच्याबरोबर होतो व हरीला मी करुणा भाकीत होतो आणि त्यावेळी माझी करुणा ऐकून हरीने मला एक काल्याचा गोळा दिला. आणि हरीने माझ्याकडे ज्यावेळी काल्याचा गोळा दिला त्यावेळी तो मी ग्रहण केला व ग्रहण केल्यानंतर माझा जीव सुखी झाला व माझ्या वाटयाला जो काल्याचा गोळा आला तो मी ग्रहण केला व इतरांनाही वाटला. ”
12:52
अभंग क्र. ३७५०
अवघिया दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥
फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥धृपद॥
आवडती थोर मोटे । मी रे पोरटे दैन्यवाणे ॥२॥
तुका म्हणे जाणो भाव । जीविंचा देव बुझावू ॥३॥
अर्थ

एक बोबडा गोपाळ म्हणतो की सर्वाना हरीने काल्याचा गोड गोड गोळा दिला परंतू तो माझ्याकडे काही पाहीना. असे म्हणत तो डोळे चोळत रडू स्फंदू लागला आणि ढुंगणावर व तोंडावर चापटया मारु लागला. तो म्हणू लागला बरोबर आहे हरीला तर मोठे मोठे मुले आवडतात मी तर दैन्य आहे पोरटा आहे मग तो माझ्याकडे कशासाठी पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, “त्या बोबडया गोपाळाचे शुध्द अंत:करण पाहून देवाने त्याचा शुध्द भक्तीभाव पाहून देवाने त्याची समजूत काढण्याचे ठरविले. ”
12:52
अभंग क्र. ३७५१ (मृदंगपाट्या)
मागे पुढे पाहे सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियासि ॥१॥
मुरडे दंडा दोही तोंडा गडिया सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥धृपद॥
गडिया गडी वांटुनि देई । ज्याचा सोडी तेचि ठायी ॥२॥
अगळ्या बळे करील काय । तुज देणे लागे डाय ॥३॥
नवा घरी पाउला करी । सापडे तो तेथे धरी ॥४॥
जिंकोनि डाव करी । टाहो सत्ता आणिकावरी ॥५॥
सांपडोनि डाई बहु । काळ गुंतलासी ॥६॥
बळिया गडी फळी । फोडी न धरिता त्यासी ॥७॥
चुकांडी जो खाय मिळोनि अंगी जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥८॥
अर्थ

मागच्या (निवृत्ति) आणि पुढचा (प्रवृत्ती) हे दोन डाव सांभाळून गाड़ी गडयांना राखतात. त्याचा डोळा चुकवून जा दोन्ही तोंडावर दंड थोपट आणि गाड्यांना सावध कर (प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही बाजूंकडे वळून गड्याना सावध कर) जे गडी पुढे येतील त्यांना थोपविणे हे तुझे काम आहे. दोन्ही बाजूला सारखे गाड़ी वाट जो ज्या पक्षाचा असेल, तो त्याला दे. ते अधिक बलावन असल्यास प्रति पक्षातील गाड़ी काय करतील ? तुला डाव दिला पाहिजे. नऊ घरातून (इंद्रिय) चाल कर ते तुला तेथे सापडेल त्याला धर डाव जिंकून घे व इतरांवर सत्ता गाजव. आत्ता पर्यंत डावात सापडुन तू दीर्घ काळ गुंतला आहेस. जो गड़ी बलवान असतो ; तो डावात न अडकता प्रतिपक्षांची फळी फोडतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो झोकांडि मारून जातो, तो देवामध्ये मिसळुन जातो तू अजुन का गुंतून पडला आहेस.
12:52
अभंग क्र. ३७५२
आम्ही गोवळी रानटे । नव्हो जनांतील धीटे ॥१॥
सिदोरीचा करू काला । एक वाटितो एकाला ॥धृपद॥
खेळो आपआपणांशी । आमची ती आम्हापाशी ॥२॥
म्हणे मिळाले नेणते । तुका कान्होबा भोवते ॥३॥
अर्थ

रानातील गाई वोळणारे आम्ही रानटी गूराखी आहोत. समाज्यात वागण्याइतके धीट आम्ही नाहीत. शिदोरिचा काला करुण एकेकाला वाटु. एकमेकांशी खेळु. आमचे गड़ी आमच्याकडे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भोळे, भाबड़े गोपाळ श्रीकृष्णच्या भोवती जमलेले आहेत.
12:52
अभंग क्र. ३७५३
पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥
जागा रे गोपाळानो ठायी ठायी जागा । चाहुलीने भागा दूर मजपासूनि ॥धृपद॥
न रिघता ठाव आम्हा ठावा पाळतिया । भयाभीत वाया तेथे काय चांचपाल ॥२॥
तुका म्हणे हाता चडे जीवाचिये साठी । मिटक्या देता गोड मग लागते शेवटी ॥३॥
अर्थ

अरे सावळ्या गोपाळांनो, तुमचे प्रयत्न येथे उपयोगी ठरणार नाहीत. तो देव बाहेर आल्यावर तुमचा वाटा तुम्हाला देइल. गोपाळांनो, तुम्ही आहात त्या ठिकानिच सावध रहा जागे रहा. त्याची चाहूल लागली की, माझ्यापासून दूर जाल तर तुम्हाला असावध पण आणि त्रास होईल. आम्हाला येथे प्रवेश नाही म्हणून आम्ही बाहेर राखन करण्याचे काम करतो. भय बाळगलेत तर फक्त चाचपडत राहवे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर जीवावर उदार झालात तर तो काल्याचा घास तुम्हाला प्राप्त होइलच मिटक्या मारत खाताना तो अखेरीस फार गोड लागतो.
12:52
अभंग क्र. ३७५४
डाई घालुनिया पोरे । त्यांची गुरे चुकवीली ॥१॥
खेळ खेळता फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥धृपद॥
मारिती माया घेती जीव । नाही कीव अन्याया ॥२॥
तुका कान्होबा मागे । तया अंगे कळो आले ॥३॥
अर्थ

सोबत्यांना खेळात गुंतवून श्रीकृष्णने त्यांची इंद्रियरूपी गुरे पंचविषयांच्या आरण्यात पळवून नेली. त्या वेळी ते सारे संसाराचा खेळ खेळत होते. तो खेळ खेळतांना दोन्ही पक्षातील गोपाळांची भांडने विकोपाला गेली. भांडणे झाली डोकी फुटली. या सर्व घटना श्रीकृष्ण दूर उभा राहून अलगद पणे पाहत होता. या अपराधामुळे मायारूपी मातेने जीवघेणा दम दिला; तिला त्यांची जराहि दया आली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कान्होबा नेहमीच त्यांच्या मागे असतो, म्हणून हा प्रकार कळुन आला.
12:53
अभंग क्र. ३७५५
आता हेचि जेऊ । सवे घेऊ सिदोरी ॥१॥
हरीनामाचा खिचडी काला । प्रेमे मोहिला साधने ॥धृपद॥
चवी चवी घेऊ घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥
तुका म्हणे गोड लागे । तो तो मागे रसना ॥३॥
अर्थ

आता आपण आपल्या बरोबर हरिनामाची शिदोरी घेऊ आणि त्याचे सेवन करून जेवण करू. आता आम्ही हरीनामाचा खिचडीकाला करून त्यामध्ये प्रेमाची मोहन घालू हेच साधन आमच्याजवळ आम्ही ठेवू. आता हरिनामाचा घास आम्ही चवीचवीने घेऊ आणि ब्रम्‍हरस आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही हरीनामाचा खिचडी काल्याचे ब्रम्हरसाचे जसेजसे सेवन करत आहोत तसे तसे आमच्या रचनेला तृप्ती मिळत नाही तिला समाधानच प्राप्त होत नाही अशी चटक रसनेला लागली आहे.
12:53
अभंग क्र. ३७५६
अवघेचि गोड झाले । मागीलये भरी आले ॥१॥
साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥धृपद॥
थडिये पावता तो वाव । मागे पाहाता ठाव ॥२॥
तुका म्हणे गेले । स्वप्नीचे जागे झाले ॥३॥
अर्थ

माझे पूर्व पूण्य फळाला आले आणि आज सारे काहि गोड झाले आहे मागिल सुखाची उणीव आता भरून निघाली आहे. पांडुरंगाने मदत केली अभ्यंतरि (आमच्या हृदयात) राहून त्याने सोबत केलि. नदी पार करताना बुडनारा कुणी त्यातून वाचून पैलतिरावर सुखरूप पोहचला कि त्याच्या बुडण्याची घटनाच राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जाग आल्यावर स्वप्नातील भीति उरलीच नाही.

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading