आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२२ नोव्हेंबर, दिवस ३२६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९२६ ते ९५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९०१ ते ३९१२
“२२ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 22 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २२ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२२ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ९२६ ते ९५० ,
926-18
तेवी स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला की ॥926॥
त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्षसुखाला अंतरलाचकी की ? 926
927-18
आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये ते नोहे । स्नेह कुऱ्हे की ॥927॥
आणि आपली आई जरी कुरूप असली तरी ज्या तीच्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे प्रेम काही वाकडे नाही. 927
928-18
येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया । तिया काय कराविया । बाळके तेणे ? ॥928॥
एरव्ही दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावयाच्या आहेत ? 928
929-18
अगा पाणियाहूनि बहुवे । तुपी गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणे तेथ ॥929॥
अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, हे खरे; पण माशाला तुपात ठेवले असतो जगेल का ? 929
930-18
पै आघविया जगा जे विख । ते विख किडियाचे पीयूख । आणि जगा गूळ ते देख । मरण तया ॥930॥
हे पहा, जो बचनाग सर्व जगाला विष आहे, तोच त्यातील किड्याला अमृत आहे; आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे, तोच त्या किड्याला मृत्यु आहे ! 930
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
931-18
म्हणौनि जे विहित जया जेणे । फिटे संसाराचे धरणे । क्रिया कठोर तऱ्ही तेणे । तेचि करावी ॥931॥
म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की, ज्याच्या आचरणाने संसाराची बंधन तुटते, ते कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने त्याचे आचरण करावे. 931
932-18
येरा पराचारा बरविया । ऐसे होईल टेंकलया । पायांचे चालणे डोइया । केले जैसे ॥932॥
पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर, पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दु:खाला मात्र कारण होईल. 932
933-18
यालागी कर्म आपुले । जे जातिस्वभावे असे आले । ते करी तेणे जिंतिले । कर्मबंधाते ॥933॥
याकरिता आपल्या जातीस्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आलेले आहे, त्याचे जो आचरण करतो, त्याने कर्मबंधला जिंकले; (तो कर्मबंधापासून मुक्त झाला) 933
934-18
आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥934॥
आणि म्हणूनच अर्जुना, पर धर्माचा त्याग करून स्वधर्माचेच आचरण करण्याविषयी नियम नको का करावयाला ? 934
935-18
तरी आत्मा दृष्ट नोहे । तव कर्म करणे का ठाये ? । आणि करणे तेथ आहे । आयासु आधी ॥935॥
तर आत्मा जोपर्यंत दृष्ट झाला नाही, तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय ? नाही, ते अवश्य केलेच पाहिजे, आणि कर्म करावयाचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेत. 935
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥18. 48॥
936-18
म्हणौनि भलतिये कर्मी । आयासु जऱ्ही उपक्रमी । तरी काय स्वधर्मी । दोषु । सांगे ? ॥936॥
याचकरिता, कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात, तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल सांगा बरे ? 936
937-18
आगा उजू वाटा चालावे । तऱ्ही पायचि शिणवावे । ना आडराने धावावे । तऱ्ही तेचि ॥937॥
अरे, सरळ वाटेने चालावयाचे झाले, तरी पायालाच शीण द्यावयाचा, आणि आडरानात भटकावयाचे झाले, तरी तीच स्थिती ! 937
938-18
पै शिळा का सिदोरिया । दाटणे एक धनंजया । परी जे वाहता विसांवया । मिळिजे ते घेपे ॥938॥अर्जुना, हे बघ, वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी(फराळाचे) ही दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते; परंतु हे विसाव्याचे (मुक्कामाचे) ठिकाणी सुखकर होईल, तेच घ्यावे.
939-18
येऱ्हवी कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वान मांसा । तेचि हवी ॥939॥
बाकी धान्य आणि भुस कांडताना श्रम सारखेच पडतात; अथवा श्वानाचे मास खाण्याचे किंवा होमाकरिता मास शिजविण्याचे श्रम सारखेच आहेत, 939
940-18
दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणे एक ॥940॥
हे विचक्षणा, दही किंवा पाणी यांच्या घुसळण्याचे श्रम सारखेच; अथवा वाळू किंवा तिळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच, 940
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
941-18
पै नित्य होम देयावया । का सैरा आगी सुवावया । फुंकिता धू धनंजया । साहणे तेचि ॥941॥
हे बघ, अर्जुना, नित्य होम देण्याकरिता किंवा एरव्ही विस्तव पेटविण्याचे वेळी धुर हा दोघासही सोसावा लागतोच; 941
942-18
परी धर्मपत्नी धांगडी । पोसिता जरी एकी वोढी । तरी का अपरवडी । आणावी आंगा ? ॥942॥
अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो, तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा ? 942
943-18
हा गा पाठी लागला घाई । मरण न चुकेचि पाही । तरी समोरला काई । आगळे न कीजे ? ॥943॥
अरे, पाठीकडच्या बाजूला घाव लागून जर मरण चुकत नाही, तर शत्रुसमोर युद्ध करून मेलो असता मरणाहून अधिक वर्गाची प्राप्ति होणार नाही का ? 43
944-18
कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे । तरी स्वपतीते वाये । सांडिले की । ॥944॥
कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरूनहि जर तिला दांडक्याचा मार, सोसावा लागतो, तर तिने आपला पति व्यर्थ सोडला असे नाही का होत ? 44
945-18
तैसे आवडतेही करणे । न निपजे शिणल्याविणे । तरी विहित बा रे कोणे । बोले भारी ? ॥945॥
त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असताहि जर दुःख सोसावे लागतं तर बापा, स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल ? 45
946-18
वरी थोडेचि अमृत घेता । सर्वस्व वेचो का पंडुसुता । जेणे जोडे जीविता । अक्षयत्व ॥946॥
हे पंडुसुता, ज्या अमृतसेवनाते अमरत्व प्राप्त होते, त्याच्या अल्प प्राप्तीकरिता हि सर्वत्र का खर्च करू नये ? 46
947-18
येर काह्या मोले वेचूनि । विष पियावे घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणे ॥947॥
आणि ज्या विषाचे सेवन केले असता सर्व सुखांचा नाश होऊन आत्महत्येचे पातकं लागते, ते विकत घेऊन का प्यावे ? 47
948-18
तैसे जाचूनिया इंद्रिये । वेचूनि आयुष्याचेनि दिये । सांचले पापी आन आहे । दुःखावाचूनि ? ॥948॥
त्याप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संचय केला असता दुःखावाचुन दुसरे फल आहे काय ? 48
949-18
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करिता हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥949॥
म्हणून स्वधर्माचेच आचरण करावे. तो आपल्या श्रमांचा परिहार करून, उचित अशा परमपुरुषार्थाची—सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ति करून देईल49
950-18
याकारणे किरीटी । स्वधर्माचिये राहाटी । न विसंबिजे संकटी । सिद्धमंत्र जैसा ॥950॥
या करिता, ज्याप्रमाणे संक्रटसमयी सिद्धमंत्र विसरु नये, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण सोडू नये. 950
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३२६ वा. २२, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९०१ ते ३९१२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
३९०१
अभंग क्र. ३९०१ (बाळकोडेचेअभंग)
गाती ओंव्या कामे करिता सकळे । हालविता बाळे देवावरी ॥१॥
ॠद्धिसिद्धी दासी द्वारी ओळंगती । सकळ संपत्ति सर्वा घरी ॥२॥
घरी बैसलिया जोडले निधान । करिती कीर्तन नरनारी ॥३॥
नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयासि संगति गोविंदाची ॥४॥
गोविंदे गोविंद केले लोकपाळ । चिंतने सकळ तुका म्हणे ॥५॥
अर्थ
कोणतेही काम करत असताना पाळण्यातील बाळ हलवत असताना देखील व्दारकेतील लोक देवाचेच गीत व ओव्या गात होते. देवाने स्थापन केलेल्या व्दारका नगरीमध्ये सर्वाच्या घरी सर्व प्रकारची संपत्ती असून रिध्दी, सिध्दी त्यांच्या दारामध्ये दासी होती व लोटांगण घेऊन त्यांची सेवा करत होती. कृष्णरुपी निधान त्यांना घरी बसल्या बसल्याच प्राप्त झाले होते व कृष्णाचेच कीर्तन व्दारकेतील स्त्री, पुरुष करत होते. ज्यांना गोविंदाची संगती झाली ते स्त्री, पुरुष कोणत्याही जातीचे असो ते धन्य धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “गोविंदाने सर्व लोकांना गोविंदरुप केले कारण सर्व लोक गोविंदाचेच चिंतन करत होते. ”
1:03
अभंग क्र. ३९०२ (बाळकोडेचेअभंग)
काही चिंता कोणा नाही कोणेविशी । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥
द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म ॥२॥
पाळी वेदआज्ञा ब्राम्हणांचा मान । अतीतपूजन वैष्णवाचे ॥३॥
अतीत अलिप्त अवघिया वेगळा । नाही या गोपाळा अभिमान ॥४॥
अभिमान नाही तुका म्हणे त्यासि । नेदी आणिकासि धरू देव ॥५॥
अर्थ
व्दारकेमध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण राज्य करत होता त्यामुळे कोणालाही कोणत्याही विषयी कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. व्दारकेमध्ये स्वत: नारायण राज्य करत होता दुष्टांचा संहार करुन धर्माचे रक्षण तो करत होता. भगवंत स्वत: व्दारकेत राज्य करत होता तरी देखील वेदाची आज्ञा तो पाळत होता, ब्राम्हणांचा मान ठेवीत होता, अतिथींचे पूजन करत होता तसेच वैष्णवाचे देखील पूजन देव करत होता. एवढे मोठे राज्य, एवढी मोठी संपत्ती अवाढव्य यादव परिवार असून देखील देव सर्वापासून अलिप्त होता त्याच्या ठिकाणी “मी आणि माझे” हा अभिमान नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात, “मुख्यत: देवाच्याच ठिकाणी अभिमान नाही त्यामुळे तो इतर कोणालाही अभिमान धरुच देत नाही. ”
1:03
अभंग क्र. ३९०३ (बाळकोडेचेअभंग)
धरियेले रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रम्ह क्षिती उतरले ॥१॥
उत्तम हे नाम राम कृष्ण जगी । तरावयालागी भवनदी ॥२॥
दिनानाथब्रिदे रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥३॥
ॠषी मुनी भेटी दिली नारायणे । आणीक कारणे बहु केली ॥४॥
बहु कासावीस झाला भक्तांसाठी । तुका म्हणे आटी सोसियेली ॥५॥
अर्थ
परब्रम्हाने अवतार धारण करुन स्वत:ला कृष्ण नावाची उपाधी लावून पृथ्वीवर अवतार धारण केला आहे. जगामध्ये राम कृष्ण नाम हे साधन उत्तम असून भव नदी तरुन जाण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचे साधन आहे. त्याच्या चरणाच्या ठिकाणी दिनानाथ पतित पावन हे ब्रीदे रुळत होती देव, मुनी, ऋषी त्याला वंदन करण्यासाठी येत होते. देवाने ऋषी, मुनींना भेट दिली तसेच अनेक ही कार्य श्रीकृष्ण अवतारात देवाने केले. तुकाराम महाराज म्हणतात, “देव भक्तांसाठी फार कासावीस झाला होता त्यामुळे तर त्याने श्रीकृष्ण अवतार धारण करण्याचे कष्ट घेतले होते. ”
1:03
अभंग क्र. ३९०४ (बाळकोडेचेअभंग)
सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागविता ॥१॥
वाहोनि सकळ आपुलिये माथा । भार दासा चिंता वाहो नेदी ॥२॥
नेदी काळाचिये हाती सेवकासि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥
अर्थ
आपल्या निजदासांचे व भक्तांचे रक्षण करण्यासाठी देवाने विविध प्रकारचे गर्भवास अवतार घेण्याचे कष्ट सोसले व भक्तांचे रक्षण करण्यासाठी व दैत्यांचा नाश करण्यासाठी त्याने हातात शस्त्र वागविले. देवाने त्याच्या दासांचा सर्व योगक्षेमाचा भार स्वत:च्या माथ्यावर वागविला व त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करु दिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देव आपल्या भक्तांना, दासांना कधीही काळाच्या हाती जाऊ देत नाही हीच त्याची ब्रीदावळी आहे. ”
1:03
अभंग क्र. ३९०५ (बाळकोडेचेअभंग)
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणी । पाउले मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चाली । कुंकुमे शोभली होय रेखा ॥२॥
होउनि भ्रमर पाउलांचे सुख । घेती भक्त मुख लावूनिया ॥३॥
याचसाठी धरियेला अवतार । सुख दिले फार निजदासा ॥४॥
निज सुख तुका म्हणे भक्ता ठावे । तींहीच जाणावे भोगू त्यासि ॥५॥
अर्थ
ज्याच्या चरणाच्या ठिकाणी पतित पावन, दिनानाथ, भक्त वत्सल, सदाशिव असे विविध प्रकारची ब्रिदे शोभून दिसत होती अशा देवाच्या पावलाने, श्रीकृष्णाच्या पावलाने पृथ्वी सुखावली होती. अशा त्या देवाच्या पृथ्वीवर चालण्याने त्याच्या कुंकूंमंडित चरणाची पावले पृथ्वीवर उमटत होती त्या योगाने पृथ्वी फार सुखावत होती. सर्व भक्तजण भ्रमर होऊन कृष्णाच्या पावलांचे सुख, त्यांचे मुख लावून घेत होते, चाखीत होते. त्याने त्याच्या निजदासांना फार सुख दिले व याचसाठी त्याने अवतार धारण केला होता. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाचे निजसुख कसे आहे हे केवळ देवाच्या निजदासांनाच माहित आहे त्याच्या भक्तांनाच माहित आहे आणि ते भोगावे कसे हे देखील त्याच्या भक्तांनाच माहित आहे. ”
1:03
अभंग क्र. ३९०६ (बाळकोडेचेअभंग)
भोगिला गोपिका यादवा सकळा । गौळणीगोपाळा गाईवत्सा ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥
भक्ति नवविधा तयासि घडली । अवघीच झाली कृष्णरूप ॥३॥
रूपे दाखविले होता भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाही ॥४॥
नाही राहो दिले जाता निजधामा । तुका म्हणे आम्हासहित गेला ॥५॥
अर्थ
श्रीकृष्णाचा सुख भोग सर्व गवळणी, गोपीका, गोप, यादव, गाई, वत्स या सर्वानी भोगला. सर्व गोपाळांनी देवाचा अंगसंग केला त्या श्रीरंगराला प्रत्यक्ष डोळे भरुन त्या सर्वानी पाहिले व तृप्ती होईपर्यंत आनंदाने त्याचे गीत गाईले. त्या सर्वाना नवविधा भक्ती घडली व सर्वजण कृष्णरुपच झाले. जोपर्यंत भक्तांच्या मनामध्ये मी भक्त तो देव असा भिन्न भेद होता तोपर्यंतच देवाने आपले सगुण रुप भक्तांना दाखवले आणि एकदा की, भक्तांचे व देवाचे ऐक्य झाले मग त्यांच्यामध्ये भेद राहातच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यावेळी श्रीकृष्ण निज धामाला गेला त्यावेळी आम्हाला कोणालाही खाली राहू दिले नाही आमच्या सहीत तो निजधामाला गेला होता. ”
1:04
अभंग क्र. ३९०७ (बाळकोडेचेअभंग)
गेला कोठे होता कोठुनिया आला । सहज व्यापला आहे नाही ॥१॥
आहे साच भावे सकळव्यापक । नाही अभाविक लोका कोठे ॥२॥
कोठे नाही ऐसा नाही रिता ठाव । अनुभवी देव स्वये झाले ॥३॥
जातो येतो आम्ही देवाचे सांगांत । तुका म्हणे गात देवनाम ॥४॥
अर्थ
भगवंत श्रीकृष्ण कोठून आला व कोठे गेला हे कोणालाही माहित नाही परंतु तो सहजच सर्वत्र व्यापक आहे. ज्यांचा देवाविषयी खरा भक्तिभाव आहे त्यांच्यासाठीच देव सर्वत्र व्यापक आहे. अभाविकांसाठी तो कोठेही नाही. देव कोठे नाही देव सर्वत्रच व्यापलेला आहे असा ज्याचा अनुभव आहे ते स्वत: देवरुपच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही देवाचे नाम गात वैकुंठाला जातो व पुन: त्याच्याबरोबरच येतो म्हणजे आम्ही नेहमी देवाबरोबरच असतो. ”
1:04
अभंग क्र. ३९०८
मना वाटे तैसी बोलिलो वचने । केली धिटपणे सलगी देवा ॥१॥
वाणी नाही शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणे भाव नाही मनी ॥२॥
नाही झाले ज्ञान पाहिले अक्षर । मानी जैसे थोर थोरी नाही ॥३॥
नाही मनी लाज धरिली आशंका । नाही भ्यालो लोका चतुरांसि ॥४॥
चतुरांच्या राया मी तुझे अंकित । झालो शरणागत देवदेवा ॥५॥
देवा आता करी सरती ही वचने । तुझ्या कृपादाने बोलिलो ती ॥६॥
तुझे देणे तुझ्या समर्पूनि पायी । जालो उतरायी पांडुरंगा ॥७॥
रंकाहुनि रंक दास मी दासांचे । सामर्थ्य मज कैचे बोलावया ॥८॥
बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका म्हणे पायी ठाव द्यावा ॥९॥
अर्थ
देवा मनाला येईल तसे तुमच्या बाललीलेचे वर्णन मी केले आहे आणि तुमच्याशी सलगी केली आहे अगदी धीटपणाने मी तुमच्या बाललीलेचे वर्णन केले आहे. देवा माझी वाणीही शुध्द नाही, माझी जातही शुध्द नाही आणि माझ्या मनामध्ये भक्तिभावही नाही तरी देखील मी तुमच्या बाललीलेविषयी वर्णन केले आहे. देवा मला कोणत्याही प्रकारचे ज्ञान झाले नाही किंवा शास्त्र उत्पत्ती मला झाली नसून कोणत्याही शास्त्रांचे अक्षर देखील मी पाहिलेले नाही आणि थोर, श्रेष्ठ संतांनी मला मान दयावा एवढा माझा अधिकारही नाही. देवा मी तुझे वर्णन करताना कोणतीही शंका मनामध्ये धरली नाही आणि चर्तुपंडित लोकांना देखील भ्यालो नाही. हे चतुरांच्या राजा मी तुझा अंकित असून मी तुझा शरणागत झालो आहे. देवा आता मी जे काही शब्द तुझ्या वर्णनपर बोललो आहे ती तू मान्य करुन घे कारण हे शब्द मी तुझ्या कृपादानामुळेच बोललो आहे. हे पांडुरंगा तु मला दिलेले दान पुन: तुलाच देऊन मी आता
1:04
अभंग क्र. ३९०९
पांडुरंगा करू प्रथम नमन । दुसरे चरणा संताचिया ॥१॥
त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवू चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरीनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण झाला मज संवसारसंभ्रमे । सीतळ या नामे झाली काया ॥५॥
या सुखा उपमा नाही द्यावयासी । आला आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धावे तेथे नामाचा गजर । घोष जयजयकार आइकता ॥७॥
तांतडी ते काय हरीगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचे राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसे गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जाता । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणतयांनी सांगितले करा । अहंतेसी वारा आडूनिया ॥१२॥
यांसी आहे ठावे परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चित्त ज्याचे पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसे जाणा ॥१५॥
जाणते नेणते करा हरीकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणी तरी काही केले आचरण । मज या कीर्तनेंविण नाही ॥१८॥
नाही भक्ता भय तराया पोटाचे । देवासी तयाचे करणे लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायाकडे । पीतांबर खडे वाट झाडी ॥२०॥
डिंकोनिया का रे राहिले हे लोक । हेचि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयाने तारिले पाषाण सागरी । तो घ्या रे अंतरी स्वामी माझा ॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हाचि माझा नेम हाचि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबा�
1:05
अभंग क्र. ३९१०
गाईन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगले हे चित्त माझे तया पायी । म्हणउनि घेई हाचि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हाचि संवसारी । राम कृष्ण हरी नारायण ॥३॥
नारायण नाम चालिता तुकासी । न येती या रासी तपतीर्थे ॥४॥
तीर्थे माथा रज वंदिती संतांचे । जे गाती हरीचे गुणवाद ॥५॥
गुणवाद ज्याचे गाता पूज्य झाले । बडिवार बोले कोण त्याचा ॥६॥
त्याचा नाही पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारिता ॥७॥
विचारिता तैसा होय त्यांच्या भावे । निजसुख ठावे नाही कोणा ॥८॥
कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिव करी धंदा ॥९॥
करुनि कवतुक खेळे हीच लीळा । व्यापूनि वेगळा पाहातसे ॥१०॥
सेवटी आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥
लावियेले चाळा मीपणे हे जन । भोग-तया कोण भोगवितो ॥१२॥
विषयी गुंतली विसरली तुज । कन्या पुत्र भाज धनलोभे ॥१३॥
लोभे गिळी फासा आमिषाच्या आशा । सांपडोनि मासा तळमळी ॥१४॥
तळमळ याची तरीच शमेल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥
आठवे तरी देव संतांच्या सांगाते । किंवा हे संचित जन्मांतरे ॥१६॥
जन्मांतरे तीन भोगिता कळती । केले ते पावती करिता पुढे ॥१७॥
पुढे जाणोनिया करावे संचित । पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥
जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥
करा जप तप अनुष्ठान याग । संती जे मारग स्थापियेले ॥२०॥
लावियेली कर्मी शुद्ध आचरणी । कोणा एका जन्मी केले पावे ॥२१॥
पावले सत्वर निष्काम उद्धार । जिंकिली अपार वासना हे ॥२२॥
वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥
न म्हणावे झालो पंडित वाचक । करूनि मंत
1:05
अभंग क्र. ३९११ (डांकाचेरूपक)
चौक भरियेला आसनी पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धावोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझे श्रीमुख साजिरे ते मी केधवा देखेन ॥धृपद॥
रजतम धुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धावती झडकरी ॥२॥
मन मारोनिया मेंढा मुठी । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटी । भरोनि केला हाकारा ॥३॥
डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करी तुकयासी ॥४॥
अर्थ
अंत:करणरुपी आसनावर मी चौकभरणी करुन कुलस्वामीनीला पाचारण केले आहे. ते असे की, “हे वैकुंठवासीनी तू लवकर माझ्याकडे धावत यावेस. हे श्रीरंगे विठाबाई तू लवकर ये तुझे सावळे स्वरुप मी माझ्या डोळयाने, तुझे साजिरे गोजिरे श्रीमुख मी माझ्या डोळयाने केव्हा पाहिन असे झाले आहे. ” रजतमाची धूपारती, पंचप्राणांची आरती, इत्यादी सर्व सामग्रीची तयारी मी करुन ठेवली आहे त्यामुळे तू लवकर माझ्याकडे धावत यावेस. मनरुपी मेंढा म्हणजे बोकड एका बुक्कीत मारुन त्यातील आशा, मनीषा, तृष्णा या बाजूला फेकून दिल्या आहेत. आणि भक्तिभावपूर्वक मी ताटामध्ये नैवेद्य ठेवून तुला हाकारा दिला आहे. हाकारा दिला म्हणजे तुला हाक मारीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या कानामध्ये अनुहात ध्वनीचा डंका अखंड चालू आहे त्यामुळे तू माझ्या अंगामध्ये येऊन संचार कर. तू तुझी पूजा आणि नैवेद्य घेऊन मला निरोगी कर भवरोगातून मुक्त कर. ”
1:05
अभंग क्र. ३९१२ (डांकाचेरूपक)
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतो ॥१॥
माझे दैवत हे रंगी । नाचे वैष्णवांच्या संगी । भरले मग अंगी । निवाड करी दोहीचा ॥धृपद॥
तुझे आहे तुजपासी । परि तू जागा चुकलासी । निवडुनिया नासी । तुझ्या घरिच्यांनी केली ॥२॥
आता न पडे ठावे । वाचूनिया माझ्या देवे । अंधकार व्हावे । नासु ठाव शोधावा ॥३॥
आंधळ्यासी डोळे । देते पागुळासी पाय । वांजा पुत्र होय । नवस पुरविते विठाई ॥४॥
उगविली कोडी । मागे कित्येकाची बापुडी । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधी ॥५॥
अर्थ
माझा देव्हारा अगदी खरा आहे हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे माझ्या देव्हा-यावर तुम्ही तुमचा खरा भक्तिभाव ठेवा. त्या देव्हा-याला बांधण्यासाठी तुम्ही त्रिगुणाचा फुलोरा घेऊन यावे अशी मी तुम्हाला विनंती करुन सांगत आहे. माझे दैवत वैष्णवांच्या संगतीत कीर्तनाच्या रंगात नाचत आहे. एकदा की दैवताने माझ्या अंगामध्ये संचार केला तर ते आतमध्ये आत्मा आणि अनात्मा यांचा निवाडा करते. तुझे स्वस्वरुप तुझ्याजवळच आहे परंतु तू जागा चुकला आहेस. परंतु तुझ्या ह्दयरुपी घरामध्ये राहणा-या मन आणि बुध्दीने विविध प्रकारच्या विषयांची चिवडाचिवड करुन तुझ्या स्वस्वरुपाचा नाश केला. आता माझ्या दैवतावाचून तुला खरे सुख कशात आहे ते माहित होणार नाही. सुरवातीला तुला अज्ञानाचा, अंधकाराचा नाश करावा लागेल मग स्वस्वरुप शोधावा लागेल. माझी विठाबाई आंधळयाला डोळे देते, पागळयांना पाय देते. वांझेला पुत्र देते अशा प्रकारे जो ज्याचा नवस करेल त्याचा नवस माझी विठाबा�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















