आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

८ नोव्हेंबर, दिवस ३१२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५७६ ते ६०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७३३ ते ३७४४
“८ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 8 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ८ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७३३ ते ३७४४ चे पारायण आपण करणार आहोत.
८ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ५७६ ते ६००,
576-18
नाना उंसांची कणसे । का नपुंसके माणुसे । वन लागले जैसे । साबरीचे ॥576॥
अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुंसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन, ही सर्व जशी निरुपयोगी आहेत; 576
577-18
नातरी बाळकाचे मन । का चोराघरीचे धन । अथवा गळास्तन । शेळियेचे ॥577॥
अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोरांनी चोरून आणलेली धन जसे त्याला राजरोस वापरता येत नाही, अथवा शेळीचे गळ्यात असणारी स्तन जसे निरुपयोगी असतात, 577
578-18
तैसे जे वायाणे । वोसाळ दिसे जाणणे । तयाते मी म्हणे । तामस ज्ञान ॥578॥
तसे ते निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. 578
579-18
तेही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा का जैसा । डोळा वाडु ॥579॥
त्यालाही ज्ञानाचा शब्दाने वर्णन करण्याचा अभिप्राय हाच कि, मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्यांचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत, असे विरुद्ध आर्थाने म्हणतो 579
580-18
का बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसे आडनांव ज्ञान । तामसा तया ॥580॥
किंवा बहिऱ्याचे कान काय मोठे आहेत, असे त्यास ऐकू येत नसतानाही वाखाणतो अथवा न पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान (पिण्याची वस्तू) असे म्हणतो, तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय ! 580
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-18
हे असो किती बोलावे । तरी ऐसे जे देखावे । ते ज्ञान नोहे जाणावे । डोळस तम ॥581॥
हे असो; आणखी किती वर्णन करावे तर ? तर असे हे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष डोळस तमोगुणच समजावे. 581
582-18
एवं तिही गुणी । भेदले यथालक्षणी । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविले तुज ॥582॥
याप्रमाणे, हे श्रोतृश्रेष्ठा, तीन गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान, त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली. 582
583-18
आता याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशे होती गोचरा । कर्तयाच्या क्रिया ॥583॥
हे धनुर्धरा, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात. 583
584-18
म्हणौनि कर्म पै गा । अनुसरे तिही भागा । मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥584॥
म्हणून पाण्याला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते, तसे कर्म हे ज्ञानाच्या तीन भागांनी निरनिराळे घडते. 584
585-18
तेचि ज्ञानत्रयवशे । त्रिविध कर्म जे असे । तेथ सात्विक तव ऐसे । परीसे आधी ॥585॥
तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे तीन प्रकारचे कर्म होते, त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम ऐक. 585
नियतं संगरहितमरागद्वेषतः कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥18. 23॥
586-18
तरी स्वाधिकाराचेनि मार्गे । आले जे मानिले आंगे । पतिव्रतेचेनि परीष्वंगे । प्रियाते जैसे ॥586॥
तर पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीस जसे आलिंगन देते, तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल, ते कर्म जो आचरण करितो; 586
587-18
सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनी अंजन । तैसे अधिकारासी मंडण । नित्यपणे जे ॥587॥
सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते, तसेच अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय, 587
588-18
ते नित्य कर्म भले । होय नैमित्तिकी सावाइले । सोनयासि जोडले । सौरभ्य जैसे ॥588॥
ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली असता, सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा येते, त्याप्रमाणे होय 588
589-18
आणि आंगा जीवाची संपत्ती । वेचूनि बाळाची करी पाळती । परी जीवे उबगणे हे स्थिती । न पाहे माय ॥589॥
जशी शरीराने, जीवन व संपत्ती ने माता आपल्या बालकाचे रक्षण करते, तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटत नाही, 589
590-18
तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मीचि करी ॥590॥
तसे सर्वपरि कर्माचे अनुष्ठान फळाची इच्छा न धरिता करितो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करितो; 590
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-18
आणि प्रिय आलिया स्वभावे । शंबळ उरे वेचे ठाउवे । नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे । पारुषे जरी ॥591॥
आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाच्या समयी आपल्यास जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतीव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही, तसे कर्म करीत असता साधुजन घरी आल्यावर त्याचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले, 591
592-18
तरी अकरणाचेनि खेदे । द्वेषाते जीवी न बांधे । जालियाचेनि आनंदे । फुंजो नेणे ॥592॥
तरी तो कर्म करण्याचे राहिले, असा खेद मनास होऊ देत नाही व रागावत नाही, ते कर्म शेवटास गेले असतानाही जो आनंदाने गर्व मानीत नाही; 592
593-18
ऐसेऐसिया हातवटिया । कर्म निफजे जे धनंजया । जाण सात्विक हे तया । गुणनाम गा ॥593॥
या युक्तीने जे कर्म होते, त्याला अर्जुना, सात्विक कर्म म्हणतात, हे नाव त्यांच्या गुणामुळे त्यास प्राप्त होते, असे समज. 593
594-18
ययावरी राजसाचे । लक्षण सांगिजेल साचे । न करी अवधानाचे । वाणेपण ॥594॥
यापुढे राजस कर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो, ते ऐकण्यास हयगय करू नको. 594
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥18. 24॥
595-18
तरी घरी मातापितरा । धड बोली नाही संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥595॥
तर घरी मातापितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करत नाही, परंतु मुर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करितो; 595
596-18
का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापे सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥596॥
किंवा तुळसीच्या झाडास दुरून शिंतोडा पडू देत नाही, कारण त्यापासून फळ किंवा पुष्प यांची प्राप्ती नाही; परंतु द्राक्षाच्या झाडास दुध घालतो, 596
597-18
तैसी नित्यनैमित्तिके । कर्मे जिये आवश्यके । तयांचेविषयी न शके । बैसला उठू ॥597॥
त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्यनैमित्तिक कर्मे, त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही, 597
598-18
येरा काम्याचेनि तरी नांवे । देह सर्वस्व आघवे । वेचितांही न मनवे । बहु ऐसे ॥598॥
एऱ्हवी काम्यकर्माविषयी सर्व देह जरी झिजला, तरी त्यास शीण येत नाही. (थोडकेच केले असे मानतो). 598
599-18
अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देता न धाइजे । पेरिता पुरे न म्हणिजे । बीज जेवी ॥599॥
अरे, वाढीदिढीच्या व्यापारांत पैसे करण्यास ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही; 599
600-18
का परीसु आलिया हाती । लोहालागी सर्वसंपत्ती । वेचिता ये उन्नती । साधकु जैसा ॥600॥
किंवा परीस हाती आल्यावर तो लोखंडाचे सोने करण्याकरीता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो, 600
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३१२ वा. ८, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७३३ ते ३७४४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३७३३
गोपाळ म्हणती कान्होबा या रे काही मागो । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगो ।
एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेचि लागो । निजो नका कोणी घरी रे आजि अवघेचि जागो ॥१॥
जाणोनि नेणता हरी रे मध्ये उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे ।
एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसे । पोटीचे होटा आणवी देतो तयासि तैसे ॥धृपद॥
एक म्हणति बहु रे आम्ही पीडिलो माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया ।
तापलो वळिता गोधने नाही जीवन छाया । आता मागो पोटभरी रे याच्या लागोनि पाया ॥२॥
एक म्हणति तुमचे अरे पोट ते किती । मागो गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति ।
हाती देव गडी कान्होबा आमुचा आम्हा काय विपत्ती । कन्याकुमरे दासी रे बाजावरी सुपती ॥३॥
एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसेचि घोडे रे कोण तयाचा मान ।
लागे भवरोग वाहता खांदी चवघे जण । हाती काठ्या डोया बोडक्या हिंडो मोकळे राण ॥४॥
एक म्हणती रानी रे बहु सावजे फार । फाडफाडू खाती डोळे रे पाय नेतील कर ।
राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहो घरी रे कोण करी हे चार ॥५॥
घरी बैसलिया बहुते बहु सांगती काम । रिकामे कोणासि नावडे ऐसे आम्हासि ठावे ।
चौघांमध्ये बरे दिसेसे तेथे नेमक व्हावे । लपोनि सहज खेळता भले गडियासवे ॥६॥
एक म्हणती गडी ते भले मळिती मत्ता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ।
नसावे ते तेथे तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकी गेलिया गोंधळ उडती लाता ॥७॥
एक म्हणती खेळता उगी राहती पोरे । ऐसे काय घडो शकेरे कोणी लहान थोरे ।
अवघी येती रागा रे एका म्हणता बरे । स�
अभंग क्र. ३७३४
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानी । गाई जाल्या श्वापदे ॥धृपद॥
जे या देवाचे दैवत । उभे आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥
जया सुखाची शिराणी । तीच पाऊले मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांही न लभती ॥३॥
अर्थ
स्वर्गातील इंद्राची अमरावती आज ओस पडली. काला पाहण्यासाठी सर्व देव अंतरीक्षात जमले. देहहभान विसरून काल्याचा सोहळा पाहू लागले. काल्याचा आनंद पृथ्वीवरती मावेनासा झाला. गाई गुरे चारा खान्याचे, पानी पिण्याचे विसरून गेली. हिंस्र प्राणी कृष्णच्या ध्यानाने तटस्त बसले. इंन्द्रादिक देवाचे आराध्य दैवत काल्याच्या सोहळ्यात उभे होते. श्रीकृष्ण गोपाळांच्या समवेत अनेक लीला करीत होता. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखांचा शिरोमणि अशी, वृषिमुनींनी शोध करुणही ज्यांची प्राप्ति होत नाही, अशी श्रीकृष्णचि सुकुमार पावले काल्याच्या प्रसंगी पृथ्वीवर होती.
अभंग क्र. ३७३५
चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी । मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदे कवळ देती एकामुखी एक । न म्हणती सान थोर अवघी सकळिक ॥धृपद॥
हमामा हुंबरी पावा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनिया हरी ॥२॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरली देहभाव शंका नाही चित्ती ॥३॥
पुष्पाचा वरुषाव झाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनिया माळा घालितील कंठी ॥४॥
यादवाचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनिया मना ॥५॥
अर्थ
बायांनो, चला चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊ तेथे पांडुरंगाला पाहू गोपाळांचा मेळा तिथे भरला आहे. काल्याचा खेळ मांडला आहे. ते एकमेकांना काल्याचा प्रासादिक घास भरवत आहेत. आपला मोठेपणा विसरून सारे आनंद लहरित नाचत आहेत. श्रीकृष्णला मध्य भागी बसवून सर्वानी त्याच्यासोबत फेर धरला होता. हमामा, हुंबरि असा खेळ चालला होता. श्रीकृष्ण मधे बासरी वाजवित होता. त्या खेळात सर्व स्त्री – पुरुषं लुब्द्ब झाले होते. पशु-पक्षीहि देहभान विसरले होते. त्यांच्या अंत:करणात कसलिच शंका उरली नव्हती. पुष्पवृष्टि चलली होती. आरती करणार्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यानी गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या. तुकाराम महाराज म्हणतात, यादवाचा राजा, गोपीजन-गोपी यांचे हरन कारनारा कान्होबा – त्याला पाहुन माझ्या मनालाही मोठे सुख प्राप्त झाले.
अभंग क्र. ३७३६
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यातुनी ॥१॥
आपआपणामध्ये मिळो । एक खेळो एकाशी ॥धृपद॥
घाबरियांच्या मीडा काड्या । धाडा भ्याडा वळतिया ॥२॥
तुका म्हणे देवापाशी । विटाळशी नसावी ॥३॥
अर्थ
येथे जमलेल्या खेळगाड्यांपैकी माझे गाड़ी कोण, ते निवडून वेगळे करा. आपण आपल्या स्वभावाशि जुळणारे एकत्र येवू व एकमेकांशि खेळु. जे जे भक्तिचा खेळ खेळायला घाबरतात, त्यांच्याशी काडीमोड करा, त्यांना खेळातून बाहेर काढ़ा. तूकाराम महाराज म्हणतात, देवाला भ्याडपणाचा विटाळ नको.
अभंग क्र. ३७३७
हेचि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनिया गोपाळकाला सेवू ॥१॥
वोरसले कामधेनूचे दुभते । संपूर्ण आइते गगनभरी ॥धृपद॥
संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥२॥
तुका म्हणे मधी घालू नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळे ॥३॥
अर्थ
एक गोपाळ म्हणतो, भगवंताच्या लिलेचा सदा अनुवाद करून आपण गोपाळ काल्याचे अनुवादन करू आपण गोपाळकाल्याचे सेवन करू. कृष्णरूपी कामधेनुचे सुखरुपी दूध साऱ्याना पुरेसे होईल ते त्रैलोक्यात पसरले आहे. सनकादिक संतांच्या चांगल्या पंक्तीने आपल्या इछ्येनुसार त्यांचा वाटा घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाला अंत:करणात स्थापित केले की कोणत्याही खेळाच्या योगाने दुःख होणार नाही.
अभंग क्र. ३७३८
अधिकाचा मज काटाळा । तुम्हा गोपाळा संगति ॥१॥
काय नाही तुम्हापाशी । सकळांविशी संपन्न ॥धृपद॥
उद्वेगाचा नेघें भार । भागल्या सार पुरते ॥२॥
तुका म्हणे अधीर जिणे । नारायणे न करावे ॥३॥
अर्थ
आम्ही तुम्ही गोपाळाच्या संगतित असलो की इतर गोष्टींचा कंटाळा येतो. हे देवा तुमच्या जवळ काय नाही ? तुम्ही सर्वच बाबतीत संपन्न आहात. तुम्ही कोणत्याही उद्वेगाचा भार घेत नाही तुझ्याजवळ जो माझा श्रमपरिहार होतो तोच सर्व सार आहे देवा. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा माझे जीवन अधीर करू नकोस रे बाबा.
अभंग क्र. ३७३९
झालो आता एके ठायी । न वंचू काही एकमेका ॥१॥
सरलो हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥धृपद॥
सोडोनिया गाठी पाहे । काय आहे त्यात ते ॥२॥
तुका म्हणे झालो निराळा । आता गोपाळा देऊ बोभा ॥३॥
अर्थ
कृष्ण आणि आम्ही आता एकरुप झालो आहोत यापुढे आम्ही एकमेकापासून वंचित राहाणार नाहीत. देहरुपी मोट आम्ही देऊन टाकले आहे आमचा देहभाव बाद झाला आहे त्यामुळे कटकट कशाची राहिली आहे ? अहंकाराची गाठ सोडून त्यामध्ये काय आहे ते पाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्ही सर्वापेक्षा वेगळे होऊन राहिलो आहोत आणि गोपाळाला हाका देऊ म्हणजे त्याचे नाम घेत राहो. ”
अभंग क्र. ३७४०
या रे करू गाई । जमा निजलेती काई । बोभाटाने आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणेचि मोहरे । एवढेचि पुरे । केलियाने सावध ॥धृपद॥
नेणोनिया खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥
तुका म्हणे शीक । न धरिता लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धावा वळतिया ॥३॥
अर्थ
सवंगड्यानो, या झोपला काय रे ? आपण इंद्ररूपी गाई एकत्र करू या. गाई उधळल्या असा बोभाटा केला आणि जो तर मायारूपी आईला ऐकु गेला ती आपल्याला मारेल. गाईंना बोलाविन्यासाठी हाका मारा, ज्याची गाय असेल ती त्या हाकेने परत फिरेल. तू सावध केले तर एवढे काम पुरेसे होईल. योग्य काय, अयोग्य काय हे पाहुन खेळावे हे तुम्हाला कळत नाही. वाईटाशि खेळता आणि स्वतः वाईट होऊन बसता. तुकाराम महाराज म्हणतात, संगीतलेले निट ध्यानात ठेवा; नाहीतर भिक मागायची पाळी येईल. मनेरी (मनरूपी) गाय वळायला लागल्यास ति धावत सुटते, हे सर्वानी लक्षात ठेवावे.
12:47
अभंग क्र. ३७४१
वोळलीचा दोहू पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥
घ्या जि हेंगे क्षीर हाती । निगुतीने वाढावे ॥धृपद॥
केले सांगितले काम । नव्हे धर्म सत्तेचा ॥२॥
तुका म्हणे नवे जुने । ऐसे कोणे सोसावे ॥३॥
अर्थ
भक्तरूपि गाय ही प्रेमाचा पान्हा सोडून ज्ञानरूपी दूध देते. तीच्या स्तनांचे दूध काढा, असे कान्होबाने आम्हाला सांगितले आहे. सवंगड्यांनो, हे दूध तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि निगुतिने ते वाढावा. कान्होबाने सांगितलेले काम मी केले आहे. हा माझा सत्ता धर्म नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जूने टाकून नवे घ्यावे आणि होणारे त्रास कोणी सोसावे ?.
12:47
अभंग क्र. ३७४२
येईल ते घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥
आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणासारिखी ॥धृपद॥
मज घेती डांगवरी । सवे हरी नसलिया ॥२॥
तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥
अर्थ
माझ्या वाट्याला जेवढे दूध येईल तेवढेच मी घेइन. मी इतरासारखी आसक्ति ठेवनार नाही. माझी आवड अंगी सदगुण असणार्यांवर अवलंबून आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाचे गुण पाहुन, त्या प्रमाणात भक्तिज्ञान वैराग्याचे दूध देत आहे. दूध देताना हरीचे जर साहाय्य नसते तर मला सर्वानी काठ्यानी मारले असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला राबवून घ्या. कोणतेही काम मला सांगा ते मी करिन.
12:47
अभंग क्र. ३७४३
अंतरली खुटी मेटी । भय धरूनिया पोटी । म्हणता जगजेठी । धावे करुणाउत्तरी ॥१॥
बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनी । पडलिया कानी । धावा न करी आळस ॥धृपद॥
बळ दुनी शरणागता । स्वामी वाहो नेदी चिंता । आइतेचि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥
वाहे खांदी पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
अर्थ
संसाराचे भय मनी बाळगुण जे साधक ‘जगजेठि’ अशा भगवंताला आर्त स्वरात साद घालतात, त्यांच्या प्रपंच्याचे दुःख सरते. सर्व बलवानांमध्ये हा देव श्रेष्ट आहे. साधकांची आर्त हाक ऐकून तो उत्साहाने धाव घेतो. आळस करत नाही. शरण जाणार्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होते. माझा स्वामी साधकांना कसलिच चिंता पडू देत नाही. हा भगवंत साधकाला संतांच्या पंगतित बसवातो. तुकाराम महाराज म्हणतात, हा भगवंत साधकाला स्वता:च्या खांद्यावर घेतो, त्याला कष्ट पडू देत नाही. स्वतः एरझार्या घालतो व त्याला नीजस्वरूपाच्या घाराला पोहचवितो. त्या भक्ताचे बोबडे बोल त्याला खुप आवडतात.
12:47
अभंग क्र. ३७४४ (अडसणअभंग)
शुद्धीचे सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाश केले ॥१॥
आडसोनि शुद्ध करी वो साजणी । सद्धि का पापिणी नासियेले ॥धृपद॥
सुपी तोचि पाहे धड उगटिले । नव्हता नासिले जग झोडी ॥२॥
सुपी तोचि आहे तुज ते आधीन । दळिल्या जेवण जैसे तैसे ॥३॥
सुपी तोचि संग घेई धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥
दळिता आदळे तुज का न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥
सुपी तोचि वोज न करिता सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥
अर्थ
शुध्द परमार्थाचे दळण बाजूला सारुन एका विषयासक्त स्त्रीने आपल्या बुध्दीरुपी जात्याच्या पाळीमध्ये विषयरुपी घाण टाकून ते भरडून मनुष्य जन्माला येऊन देहरुपी भांडवलाचा नाश केला. हे सखे तू आत्मा आणि अनात्मा यांना सुपामध्ये घालून आडसून घे म्हणजे त्यांना निवडून शुध्द कर अगे हे पापीनी पूर्वीचा सिध्द असलेल्या आत्मस्थितीचा तू अविचाराने का नाश केला आहेस ? हे जगझोडी झोंड स्त्री तू जोपर्यंत तुझ्या हातामध्ये देहरुपी सूप आहे तोपर्यंतच याचा विचार करीत याचा फायदा करुन घे विनाकारण शुध्द अशा परमार्थाचा व आत्मस्थितीचा नाश करु नकोस. अगे जोपर्यंत तुझ्या हातामधे हा देहरुपी सूप आहे तोपर्यंतच तू चांगल्या कर्माचे दळण दळ नंतर तू तसे कर्म करशील त्याप्रमाणेच तुला सुख दु:खरुपी जेवण मिळेल. जोपर्यंत तुझ्या हातामध्ये नरदेहरुपी सूप आहे तोपर्यंतच त्याचा संग करुन तू तुझा फायदा करुन घे हे गधडे तू विनाकारण तुझ्या आत्मस्थितीचा शुध्द परमार्थाचा नाश का करुन घेतला आहेस ? तुझ्या बुध्दीरुपी जात्याच्या पाळयामध्ये विषयरुपी घाणेरडे दळण दळत असताना त्या पाळया एकमेकां�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















