२ नोव्हेंबर, दिवस ३०६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी २४६ ते ४५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३६६१ ते ३६७२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 2 November
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३६६१ ते ३६७२ चे पारायण आपण करणार आहोत.
२ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ४२६ ते ४५०,

426-18
पै लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धावेचि तंववरी । जव भरली आथी उरी । बळाची ते ॥426॥
तसेच निशान मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो; 426
427-18
नाना चक्री भांडे जाले । ते कुलाले परते नेले । परी भ्रमेंचि ते मागिले । भोवंडिलेपणे ॥427॥
अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते, 427
428-18
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणे स्वभावे धनंजया । जाले ते अपैसया । चेष्टवीच ते ॥428॥
तसा आहे धनंजया, देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही, ज्या कर्मांनी देह उत्पन्न झाला आहे, ते कर्म त्या देहाकडून चेष्टा करविलच, त्याचे चेष्टा याचा इच्छेवर अवलंबून नसतात. 428
429-18
संकल्पेवीण स्वप्न । न लाविता दांगीचे बन । न रचिता गंधर्वभुवन । उठी जैसे ॥429॥
संकल्पा शिवाय स्वप्न दिसते, न लावता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्या शिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात, 429
430-18
आत्मयाचेनि उद्यमेवीण । तैसे देहादिपंचकारण । होय आपणया आपण । क्रियाजात ॥430॥
तशी आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादि पांच कारणे मागे सांगितली, ती क्रिया करण्यास कारणीभूत होतात. 430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


431-18
पै प्राचीनसंस्कारवशे । पांचही कारणे सहेतुके । कामवीजती गा अनेके । कर्माकारे ॥431॥
परंतु पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे व हेतू अनेक क्रिया करितात. 431
432-18
तया कर्मामाजी मग । संहरो आघवे जग । अथवा नवे चांग । अनुकरो ॥432॥
त्या कर्मात मग सर्व जगाचा संहार होवो, अथवा नवे जग उत्पन्न होवो; 432
433-18
परी कुमुद कैसेनि सुके । कैसे ते कमळ फाके । ही दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥433॥
परंतु, कुमुद कसे झुकते व कमळांची प्रभा कशी फाकते, हे आपल्या पासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात; 433
434-18
का वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करू शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥434॥
किंवा आकाशातून विज पडून जरी ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली, 434
435-18
तरी तया दोहीते जैसे । नेणिजेचि का आकाशे । तैसा देहीच जो असे । विदेहदृष्टी ॥435॥
तरी या दोन्हीलाही जसे आकाश जाणत नाही, तसा तो देहाभिमान रहित देहातच वास करतो, 435


436-18
तो देहादिकी चेष्टी । घडता मोडता हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥436॥
तो, तसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पहात नाही, तसा देहादीका पासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला, तरी जाणत नाही. 436
437-18
येऱ्हवी चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेचि मानिती ॥437॥
एरवी, हा देही आहे असे जे चर्मचक्षूंनी पाहतात, ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात. 437
438-18
का तृणाचा बाहुला । जो आगरामेरे ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥438॥
अथवा, गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेने उभे केले, म्हणजे कोल्हा त्याला खरा रखवालदार समजत नाही काय ? 438
439-18
पिसे नेसले का नागवे । हे लोकी येऊनि जाणावे । ठाणोरियांचे मवावे । आणिकी घाय ॥439॥
वेडा मनुष्य वस्त्र नेसलेल्या आहे, किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनी मोजावे लागतात, 439
440-18
का महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥440॥
अथवा एखादी महासती सती जाते वेळेस न्हाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी सौभाग्यशृंगार जरी करीत आहे असे लोकास दिसले तरी तिला अग्नी दिसत नाही, स्वतःच्या शरीराचे तिला भान नसते किंवा लोकांकडेही तिचे लक्ष नसते, तर ती पती स्वरूपी तल्लीन झालेली असते, 440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


441-18
तैसा स्वस्वरूपे उठिला । जो दृश्येसी द्रष्टा आटला । तो नेणे काय राहटला । इंद्रियग्रामु ॥441॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा द्रष्ट्यासह नष्ट झाला, (पाहणारा व पाहण्याची वस्तू हा भाव नाहीसा झाला), तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही 441
442-18
अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने । लोपता तिरीचेनि जने । एकी एक गिळिले हे मने । मानिजे जऱ्ही ॥442॥
अरे, समुद्राचे तीरावर असलेल्या लोकास जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटास एकदम गिळून टाकले आहे, 442
443-18
तऱ्ही उदकाप्रति पाही । कोण ग्रसितसे काई । तैसे पूर्णा दुजे नाही । जे तो मारी ॥443॥
तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटे खाऊन टाकते ? त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी तो द्वैत रहात नाही. 443
444-18
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥444॥
पहा, सोन्याच्या देवीने, सोन्याच्या त्रिशुळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला, 444
445-18
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वाचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि ते ॥445॥
हा सर्व प्रकार भक्तांच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु या दृष्टीने त्रिशूळ, महिषासुर व देवी हे सर्व सोनेच आहे; 445


446-18
पै चित्रीचे जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटी आगी वोलांशु । दोन्ही नाही ॥446॥
तसेच भिंतीवर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे; परंतु त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही व जळतही नाही; 446
447-18
मुक्ताचे देह तैसे । हालत संस्कारवशे । ते देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥447॥
त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्व कर्मानुसार असतो, परंतु हे न समजता वेडे लोक त्याला कर्मकर्ता असे म्हणतात; 447
448-18
आणि तया करणेया आंतु । घडो तिही लोका घातु । परी तेणे केला हे मातु । बोलो नये ॥448॥
आणि जो कर्म करीत असता जरी त्यायोगे त्रैलोक्याचा घात झाला, तरी त्याने केला असे म्हणू नये. 448
449-18
अगा अंधारुचि देखावा तेजे । मग तो फेडी हे बोलिजे । तैसे ज्ञानिया नाही दुजे । जे तो मारी । ॥449॥
अरे, सूर्याने अंधार पहावा आणि मग त्याला दूर करा, असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तू नाही की, जिचा तो नाश करील. त्याचे ठिकाणचा द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते; 449
450-18
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥450॥
म्हणून त्याच्या बुद्धीला पाप व पुण्य याचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो. 450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३०६ वा. २, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३६६१ ते ३६७२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३६६१ (घोंगडीचीरूपके)
घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥१॥
हा गे चोर धरा धावा कोणी । घरात राहाटे चहू कोणी ॥धृपद॥
नोळखवे म्या धरिला हाती । देह्यादिप माया लाविली वाती ॥२॥
न पावे धावणे मारितो हाका । जनाचारी तुका नागवला ॥३॥
अर्थ
या देवाने माझ्या घोंगडीला मिठी मारली आहे मी माझ्या देहावर उदास जरी झालो तरी काही केल्या देव काही माझ्या घोंगडीला सोडत नाही. हा देव चोर आहे अहो कुणीतरी धावा. त्याला कुणीतरी धरा हा माझ्या देहरुपी घरटयामध्ये मन, बुध्दी, चित्त, अहंकार या चारही कोपऱ्यामध्ये राहात आहे. काही केल्या हा देव मला ओळखला गेलाच नाही कारण माझ्या देहरुपी दिव्यामध्ये त्याने त्याची मायारुपी वात लावलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी लोकांना खूप हाका मारतो आहे परंतू माझ्या मदतीला काही कोणी येत नाही इतके देवाने मला चार लोकांमध्ये नागवून टाकले आहे.
12:28
अभंग क्र. ३६६२ (घोंगडीचीरूपके)
आता मी देवा पाघरो काई । भिकेचे ते ही उरेचि ना ॥१॥
सदैव दुबळे नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥धृपद॥
नाही मजपाशी फुटकी फोडी । पाचांनी घोंगडी दिली होती ॥२॥
तुका म्हणे जना वेगळे झाले । एकचि नेले एकल्याचे ॥३॥
अर्थ
देवा पंचमहाभूतांकडून भीक मागून आणलेला माल माझे देहरुपी घोंगडे तू चोरुन नेले आता मी काय पाघरावे ? हा चोर असा आहे त्याला गरीब आणि श्रीमंत काहीही कळत नाही एखादयाचे घर त्याला दिसले चांगले वाटले की तो त्याचे घरच फोडून त्याच्या घरात शिरुन चोरी करतो. देवा आता माझ्याजवळ फुटकी कवडी देखील शिल्लक राहिली नाही पंचभूतांनी जी मला घोंगडी दिली ती देखील तू घेऊन गेलास. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाने चोर होऊन माझे देहरुपी घोंगडी चोरली सर्व लोकापासून मला वेगळे करुन सर्वाच्या बंधनातून मुक्त केले. ”
12:28
अभंग क्र. ३६६३ (घोंगडीचीरूपके)
मी माझे करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले खान ॥१॥
मज आल्याविण आधीच होता । मज न कळता मज माजी ॥धृपद॥
घोंगडे नेले घोंगडे नेले । उघडे केले उघडेंचि ॥२॥
तुका म्हणे चोरटा चि झाला साव । सहज न्याय नाही तेथे ॥३॥
अर्थ
मी माझ्या घोंगडीचे आतापर्यंत चांगले जतन करत होतो परंतू अंत:करणात लपलेल्या देवानेच त्याच्यावर हल्ला चढवून सर्व लुटून नेले. मला जन्माला यायच्या आधीच तो माझ्यामधे लपून बसला होता हे देखील मला कळले नव्हते. मी जन्माला आलो त्यावेळीच उपाधीरहित होतो म्हणजे उघडा होतो परंतू मायेचे आवरण माझ्यावर पडले व मी पुन्हा उपाधीत गुंतलो व देवाने माझे घोंगडे नेले माझे घोंगडे देव घेऊनच गेला त्यामुळे मी उपाधीरहित होतो मायेच्या आवरणाने पुन्हा बंधनात गुंतलो व देवाने पुन्हा माझे घोंगडे चोरुन पुन्हा मला उपाधीरहित केले म्हणजे उघडे केले. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव साव चोर आहे याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा न्याय राहिला नाही. ” (तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपला कोणत्याही उपाधींशी संबंध राहिला नाही याविषयी समाधान व्यक्त केले आहे. )
12:29
अभंग क्र. ३६६४ (घोंगडीचीरूपके)
घोंगडे नेले सांगो मी कोणा । दुबळे माझे नाणीत मना ॥१॥
पुढे ते मज न मिळेती आता । जवळी सत्ता दाम नाही ॥धृपद॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥
घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जव भरला हाट ॥३॥
अर्थ
देवरुपी चोराने माझी घोंगडी चोरुन नेली माझ्या दुबळयाचे कोणीही मनावर घेत नाही आता मी कोणाला सांगू ? यापुढे आता पुन्हा मला देहरुपी घोंगडी मिळणार नाही म्हणजेच मला पुन्हा जन्ममरण भोगावे लागणार नाही माझे जन्ममरण खुंटले आहे आणि पुन्हा देहरुपी घोंगडी मिळवण्यासाठी माझ्याजवळ सत्ता किंवा दाम म्हणजेच पाप पुण्यरुपी धनच नाही त्यामुळे मला जन्ममरणच पुन्हा घडणार नाही. अहो शेटे महाजन कोणीतरी माझे ऐका माझ्या घोंगडीची कोणीतरी शोधणी करा. तुकाराम महाराज म्हणतात, “जोपर्यंत प्रपंचरुपी बाजार भरलेला आहे तोपर्यंतच तुम्ही माझी घोंगडी हरवली आहे याचा बोभाटा करा. ”
12:29
अभंग क्र. ३६६५ (घोंगडीचीरूपके)
माझे घोंगडे पडिले ठायी । माग तया पायी सापडला ॥१॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिके ॥धृपद॥
चोर कुठोरि एकेचि ठायी । वेगळे पाहावे नलगेच काही ॥२॥
आणिकाची चोरली आधी । माझे तयामधी मेळविले ॥३॥
आपल्या आपण शोधिले तीही । करीन मी ही तेचि परी ॥४॥
तुका म्हणे माझे हितचि झाले । फाटके जाउन धडके आले ॥५॥
अर्थ
माझे घोंगडे कोणत्या ठिकाणी पडले याचा मी मागमूस घेतला तर मला ते देवाच्या पायाजवळ पडलेले सापडले. तो चोर अगदी पक्का आहे व अशा चोराला पुंडलिकाने आपल्या पाठीशी घातले आहे. चोर आणि चोराला आश्रय देणारा पुंडलिक हे दोघेही एकाच ठिकाणी आहेत त्यांना वेगवेगळया ठिकाणी पाहाण्याची गरज नाही. अहो या चोराने तर या अगोदर खूप घोंगडया चोरुन आणल्या आहेत आणि त्याच घोंगडयामध्ये माझे देखील घोंगडे मिसळून टाकले आहे. इतर साधूसंतांनी आपला आपणच शोध केला त्याप्रमाणेच त्यांच्यासारखे मी वागेन व मी देखील आपला आपणच शोध करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे पंचमहाभूताच्या ठिगळांनी शिवलेले फाटके घोंगडे देवाने चोरुन नेऊन मला त्याने ब्रम्ह अवस्थेचे नवीन व तेजोमय घोंगडे दिले यामधे माझे खरे तर हितच झाले आहे. ”
12:29
अभंग क्र. ३६६६ (कलियुगामधीललोकांचेवर्तन)
पाहा हो कलिचे महिमान । असत्यासी रिझले जन ।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥
ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।
केले धर्माचे निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥धृपद॥
थोर या युगाचे आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
सांडूनिया द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ ।
नाही ऐसी झाली नीत । हा हा भूत पातले ॥३॥
शांति क्षमा दया । भावभक्ती सित्क्रया ।
ठाव नाही सांगावया । सत्त्वधैर्य भंगिले ॥४॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।
म्हणविता रामराम । महा श्रम मानिती ॥५॥
थेर भोरप्याचे विशी । धावती भूते आविसा तैसी ।
कथा पुराण म्हणता सिसी । तिडीक उठी नक त्याची ॥६॥
विषयलोभासाठी । सवार्थेसी प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठी । मागता उठती सुनींसीं ॥७॥
धनाढ्य देखोनि अनामिक । तयाते मनिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्त्विक संपन्न ॥८॥
पुत्र ते पितियापाशी । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनांचिया दासी । सासा झाल्या आंदण्या ॥९॥
खोटे झाले आली विंवसी । केली मर्यादा नाही.ी ।
भ्रतारे ती भार्‍यासी । रंक तैसी मानिती ॥१०॥
नमस्कारावया हरीदासा । लाजती धरिती काही गर्वसा ।
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छाया ॥११॥
बहुत पाप झले उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।
अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
कैसे झाले नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदने दासीची चुंबिती ।
सोवळ्याच्या स्फीती । जगी मिरविती पवित्रता ॥१४॥
मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी ।
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता ।
पुण्य धुडावोनी संता । तीर्था हरी आणिली ॥१६॥
भेणे मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कापे सृष्टि ।
देव रिगाले कपाटी । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
अपीक धान्ये दिवसे दिवसे । गाई म्हैसी चेवल्या गोरसे ।
नगरे दिसती उध्वंसे । पिकली बहुवसे पाखांडे ॥१८॥
होम हरपली हवने । यज्त्रयाग अनुष्ठाने ।
जपतपादिसाधने । आचरणें भ्रष्टली ॥१९॥
अठरा यातीचे व्यापार । करिती तस्कराई विप्र ।
सांडोनिया शुद्ध शुभ्र । वस्त्रे निळी पांघरती ॥२०॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्री ।
अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची ।
आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥
मुख्य सर्वोत्तम साधने । ती उच्छेदुनि केली दीने ।
कुडी कापटे महा मोहने । मिरविताती दुर्जन ॥२३॥
कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायी ।
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसी नाडली ॥२४॥
जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होता वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी ।
कामक्रोधे व्यापिले भारी । इच्छाकरी न सुटती ॥२५॥
कैसे विनाशकाळाचे कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघाते वर्त्तती ॥२६॥
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविले अवघे जन ।
याती अठरा चार्‍ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥
पूवा अहो ते भविष्य केले । संती ते यथार्थ जाले ।
ऐकत होतो ते देखिले ।प्रत्यक्ष लोचनी ॥२८॥
आता असो हे आघवे । गति नव्हे कळीमध्येवागवरावे ।
देवासी भाकोनि करुणावे । वेगे स्मरावे अंतरी ॥२९॥
अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका ।
धांव कलीने गांजिले लोका । देतो हाका सेवक तुकयाचा ॥

12:29
अभंग क्र. ३६६७ (सद्गतीआणिअधोगतीयांचेउपाय)
ऐका संतजन उत्तरे माझे बोबडे बोल । करी लाड तुम्हापुढे हो कोणी झणी कोपाल ॥१॥
उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावे चित्ती ॥धृपद॥
धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाही लाज ॥२॥
पुण्य ते जाणा रे भाइनो परउपकाराचे । परपीडा परनिंदा रे खरे पाप तयाचे ॥३॥
लाभ तयासी झाला रे मुखी देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥४॥
सुख ते जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख ते जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥५॥
साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुद्धि । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥६॥
मान पावे तो आगळा मुख्य इंद्रिये राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे ॥६॥
जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥८॥
भला तोचि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥९॥
आचारी अन्न काढी रे गाई अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसता संग ॥१०॥
स्वहित तेणे चि केले रे भूती देखिला देव । अनहित तयाचे झाले रे आणी अहंभाव ॥११॥
धन्य जन्मा ते चि आले रे एक हरीचे दास । धिग ते विषयी गुंतले केला आयुष्या नास ॥१२॥
जोहोरि तोचि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणे । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणे ॥१३॥
बिळयाढा तोचि जाणा रे भक्ती दृढ शरीरी । गांढ्या तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥१४॥
खोल तो वचन गुरूचे जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाही अंगी रे म्हणे होईल कैसे ॥१५॥
उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायी । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिठाई ॥१६॥
चांगलेपण ते चि रे ज्याचे अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरी वाणी वाहे दुगपध ॥१७॥
गोड ते चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौर्‍याशी जन्म ॥१८॥
तुका म्हणे मना घरी रे संतसंगतिसोईं । न लगे काही करावे राहे विठ्ठलपायी ॥१९॥

12:29
अभंग क्र. ३६६८ (एकाखडीचाअभंग)
करावा कैवाड । नाही तरी आला नाड ॥१॥
स्मरा पंढरीचा देव । मनी धरोनिया भाव ॥धृपद॥
खचविले काळे । उगवा लवलाहे जाळे ॥२॥
गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥
घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥
नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥५॥
चरणी ठेवा चित्त । म्हणवा देवाचे अंकित ॥६॥
छंदे नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥
जगाचा जनिता । भुक्तीमुक्तींचा ही दाता ॥८॥
झणी माझे माझे । भार वागविसी ओझे ॥९॥
यांची का रे गेली बुद्धि । नाही तरायाची शुद्धि ॥१०॥
टणक धाकुली । अवघी सरती विठ्ठली ॥११॥
ठसा त्रिभुवनी । उदार हा शिरोमणि ॥१२॥
डगमगी तो वाया जाय । धीर नाही गोता खाय ॥१३॥
ढळो नये जरी । लाभ घरिचिया घरी ॥१४॥
नाही ऐसे राहे । काही नासिवंत देहे ॥१५॥
तरणा भाग्यवंत । नटे हरीकीर्तनांत ॥१६॥
थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥
दया तिचे नांव । अहंकार जाय जीवे ॥१८॥
धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥
नाम गोविंदाचे । घ्या रे हे चि भाग्य साचे ॥२०॥
परउपकारा । वेचा शक्ती निंदा वारा ॥२१॥
फळ भोग इच्छा । देव आहे जया तैसा ॥२२॥
बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥
भविष्याचे माथा । भजन न द्यावे सर्वथा ॥२४॥
माग लागला न संडी । अळसे माती घाली तोंडी ॥२५॥
यश कीर्ती मान । तरी जोडे नारायण ॥२६॥
रवि लोपे तेजे । जरी हारप हे दुजे ॥२७॥
लकार लाविला । असता नसता चि उगला ॥२८॥
वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥
सारते न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥
खंती ते न धरा । होणे गाढव कुतरा ॥३१॥
सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥
हाती हित आहे । परि न करिसी पाहें ॥३३॥
अळंकार लेणे । ल्या रे तुळसीमुद्राभूषणे ॥३४॥
ख्याति केली विष्णुदासी । तुका म्हणे पाहा कैसी ॥३५॥

12:30
अभंग क्र. ३६६९ (काला)
झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचे गमावी तो पाठी खाय टोला ॥१॥
त्रिगुणाचा चेंडू हाते झुगारी निराळा । वरीलिया मुखे मन लावी तेथे डोळा ॥धृपद॥
आगळा होऊनि धरी वरीचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारी ॥२॥
हाती सापडले उभे बैसो नेदी कोणी । सोरीमागे सोरी घेती ओणवे करूनि ॥३॥
डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार उभा भोवताही फेर ॥४॥
तुका म्हणे सुख पाहे तयाचे आगळे । जिंकी तो हरीसी कोणी एका तरी काळे ॥५॥
अर्थ
मित्रांनो, त्रिगुणात्मक देहरूपि असा हा चेंडू वरचेवर झेला. त्याला वारंवार पमर्थाकडे फेका. हा चेंडु जो हातचा गमावेल तो पाठीवर जन्ममृत्युचा टोला खाइल. हा त्रिगुणाचा चेंडू (देह) विचारांच्या हाताने, आत्मबुद्धिने झुगारुन दया. “मी पण” सोडून अंतर्मुख दृष्टीने आत्मस्वरूपात स्थिर करा. आत्मस्वरूपाच्या अनुभवाने व्यापक आणि उंच होऊन हा त्रिगुणात्मक देहरूपी चेंडू वरचेवर झेला. जो चपळ असतो, प्रपंचयरूपि डाव जिंकतो आणि जो नामर्द, भित्रा असतो तो जन्ममृत्युच्या फे-यात अडकतो. संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण हे विसावा घेऊ देणार नाहीत. ओनवे करुन जन्ममृत्युचे एकामगे एक डाव घ्यायला लावतील. देहाविषयीच्या विचारात सापडल्यावर दुःखाचे डोंगर सोसावे लागतील. देह आणि त्यविषयीचे महत्त्व हे पाठीवर भाररूपाने राहतील. या डावात सहभागी असलेले आत्प-स्वकीय सभोतालि असतील. तुकाराम महाराज म्हणतात, जो एखादेवेळेस हरीला जिंकतो, तोच या खेळातील सुखाचा अनुभव घेतो.
12:30
अभंग क्र. ३६७० (काला)
अझुनि का थीर पोरा न म्हणसी किर । धरुनिया धीर लाजे बुर निघाला ॥१॥
मोकळा होतासि का रे पडिलासि डाई । वरीलांचा भार आता उतरेसा नाही ॥धृपद॥
मेळवूनि मेळा एकाएकी दिली मिठी । कवळिले एक बहु बैसविली पाठी ॥२॥
तळील ते वरी वरील ते येते तळा । न सुटे तोवरी येथे गुंतलिया खेळा ॥३॥
सांडिता ठाव पुढे सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥
तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावे तोच बरे वरी नये डाय ॥५॥
अर्थ
अरे पोरा, संसाराचि अभिलाषा धरल्यामुळे अनेक जन्ममृत्युचे दुःख भोगलेस तरी अजुन ‘कंटाळलो, वैतागलो असे म्हणत नाहीस लोकलज्जेस्तव धैर्‍याने हे ओझे वाहतोस, सोसतोस त्याने तू किती क्षीण झाला आहेस, थकला आहेस, याचा विचार कर. तू अगोदर मुक्तअवसस्थेत होतास विनाकारण या संसाराच्या मोहत का पडला आहेस ? तुझ्या पाठीवर हा संसार बसला आहे, तो काही केल्या उतरणार नाही. पंचमहाभूतांचा मेळा भरवुन आत्म्याने अनात्म वस्तुंना कवटाळले; त्यामुळे विकाररूपि अनेक पोरे तुझ्या पाठीवर बसून कुरघोड़ी करू लागली आहेत. जोवर तु या संसाराच्या मोहत गुंतून पडलेले आहात तोपर्यंत खालच्या पुण्याच्या बळावर स्वर्गगति प्राप्त करणार आणि पूण्य संपले की लगेच अधोगतिला येणार. पूर्वपुण्याइने मनुष्य सत्ता, धन भोगन्याच्या उच्च स्थानि आरूढ़ झाला तरी पुन्यक्षयाने खाली येणार. तुकाराम महाराज म्हणतात, या मनाचे हातपाय किती आवरावे ! म्हणून “माझेपणाच्या” मोहाने असे डाव न खेळलेलेच बरे, म्हणजे डाव अंगावर येणार नाही.
12:30
अभंग क्र. ३६७१ (कोडे)
पुसतसे सांगा मी हे माझे ऐसे काई । रुसू नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥
कोडे रे कोडे ऐका हे कोडे । उगवूनि फार राहे गुंतोनिया थोडे ॥धृपद॥
सांगतो हे मूळ काही न धरावी खंती । ज्याले जीवो मेले मरो प्रारब्धा हाती ॥२॥
तुका म्हणे अभिमान सांडावा सकळी । नये अंगावरी वाया येऊ देऊ कळी ॥३॥
अर्थ
हे लोकहो मी एक कोड विचारीत आहे ते म्हणजे या जगामध्ये “मी आणि माझे” असे काय आहे माझ्यावर कोणी रुसू नका आणि ज्याला कोडे सुटणार नाही त्याने आपल्या आईशी संबंध केला असे समजावे. हे मी सांगितलेले कोडे तुम्ही ऐका आणि ज्याला मी सांगितलेले कोडे समजले ज्याला ते सुटले मग त्याने प्रपंचामध्ये जरी थोडेफार गुंतून राहिले तरी त्याला कोणत्याही प्रकारचा बाध होणार नाही. या जगामध्ये जगले तर जगू दया मेले तर मरु दया प्रारब्धाने हे होणार आहे कारण प्रारब्धाच्या हाती सर्व आहे त्याविषयी तुम्ही खंत धरु नका हेच मुख्य मूळ मी तुम्हाला सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे सर्व प्रकारचा देहाभिमान टाकून दयावा आणि आपला अंगावर कोणत्याही प्रकारच्या गोष्टी येऊ देऊ नयेत. ” (काला)
12:30
अभंग क्र. ३६७२ (कोडे)
नुगवे ते उगवून सांगितले भाई । घालुनिया ताळा आता शुद्ध राखा घाई ॥१॥
आता काही नाही राहिले । म्या आपणा आपण पाहिले ॥धृपद॥
कमाईस मोल येथे नका रीस मानू । निवडू नये मज कोणा येथे वानू ॥२॥
तुका म्हणे पदोपदी कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळी ॥३॥
अर्थ
भावांनो, तुम्हाला स्वता:च्या बुद्धीने कोडे उलगडता आले नाही, ते मी उगडून सांगितले. आता अनुभवाशि ताळा घ्या व त्वरेने शुद्ध भाव ठेवा. मी आत्मरूप पाहिले आता काही कर्तव्य राहिले नाही. मोक्षाची कमाई मोलाची आहे म्हणून मोक्षप्राप्तिचा कंटाळा करू नका. या ठिकाणी मला कोणचीही निवड करण्याचा निर्णय घेता येत नाही. तुम्ही स्वता: आपण बद्ध आहोत की मुक्त आहोत हे अनुभवावरुन ठरवा. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक वेळी वनमाळी श्रीकृष्णचे स्मरण करा. कधीतरी तुमचा विजय होईल आणि शेवटी त्याचे दर्शन तुम्हाला होईल.

नोव्हेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading