आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ नोव्हेंबर, दिवस ३३२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०७६ ते ११०० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९७३ ते ३९८४
“२८ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 28 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २८ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२८ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १०७६ ते ११००,
1076-18
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हे जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥1076॥
ह्याप्रमाणे शत्रुसमुदायाला (अहंकारादि) जिंकून, सर्वात्मभावाने जगताचा पारमार्थिक अभाव पटल्यावर त्याच्या राजयोगरूप अश्वाची धाव सहजच थांबते 76
1077-18
वैराग्याचे गाढले । अंगी त्राण होते भले । तेही नावेक ढिले । तेव्हा करी ॥1077॥
(संसारशत्रूशी झुंजण्यासाठी) अंगांत जे वैराग्याचे मजबूत चिलखत घातलेले होते तेही (आत्म-बोधानंतर ) क्षणभर ढिले केले जातं. (अगर होते) 77
1078-18
आणि निवटी ध्यानाचे खांडे । ते दुजे नाहीचि पुढे । म्हणौनि हातु आसुडे । वृत्तीचाही ॥1078॥
आणि ज्या ध्यानखड्गाने द्वैत नाश करण्याचे योजिले होते, ते द्वैतच बोधोत्तर पुढे येत नसल्यामुळे त्या ध्यानाच्या वृत्तीलाही मांद्य येते. 78
1079-18
जैसे रसौषध खरे । आपुले काज करोनि पुरे । आपणही नुरे । तैसे होतसे ॥1079॥
जसे खरे रसायन रोगबीज नष्ट करून आपणही शरीरत उरत नाही, तशी (साधनांची) स्थिति होते. 79
1080-18
देखोनि ठाकिता ठावो । धावता थिरावे पावो । तैसा ब्रह्मसामीप्ये थावो । अभ्यासु सांडी ॥1080॥
मुक्कामाचे ठिकाण जवळ आलेले दिसतांच, जलद पडणारे जसे पाऊल मंदावते, त्याप्रमाणे ब्रह्मसामीप्यस्थितीची जाणीव होताच तत्प्राप्त्यर्थ चाललेले) सर्व अभ्यास ढिले पडतात1080
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1081-18
घडता महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी । का कामिनी कांतापासी । स्थिर होय ॥1081॥
समुद्राची भेट झाल्यावर जसा गंगेचा प्रवाह थांबतो किंवा कांतसमागमांत कामिनी जशी अचल (शांत) होते. 81
1082-18
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे । का गावापुढे वळे । मार्गु जैसा ॥1082॥
केळ व्याली (फलवती झाली) म्हणजे तिची वाढ जशी खुंटते किवा गाव आला म्हणजे मार्ग जसा संपतो. 82
1083-18
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु । ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥1083॥
याप्रमाणे, आत्मसाक्षात्कार होण्याचा समय जाणतांच, साधनरूप हत्यारे हळूच बाजूस सारतो. 83
1084-18
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया । होतसे तै उपाया । वोहटु पडे ॥1084॥
म्हणून, अर्जुना, त्याला ब्रह्मस्थिति बाणू लागण्याच्या वेळी, साधनांना ओहोटी लागते. (शिथिल, कमी होतात. ) 84
1085-18
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे का ॥1085॥
मग, वैराग्याची सांजवेळ, (मावळती दशा) ज्ञानाभ्यासाची वृद्धावस्था, (दृढपणा) योगफलाची परिपूर्णावस्था, अशी स्थिति, 85
1086-18
ते शांति पै गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तै ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥1086॥
जी शान्ति, ती हे अर्जुना, त्याचे ठिकाणी संपूर्णतया बाणते, व मग तो साधक ब्रह्मरूप होण्याच्या योग्यतेचा होतो. 86
1087-18
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुले उणेपण शशी । का सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥1087॥
तेव्हां, पौणिमेचा पूर्ण चंद्र व चतुर्दशीचा चंद्र ह्यांच्या कलांत जितका फरक असतो, अथवा सोळाकशी सोन्यापेक्षां पंधराकशी सोने जितक्या अंशाने कमी भावचे असते. 87
1088-18
सागरीही पाणी वेगे । संचरे ते रूप गंगे । येर निश्चळ जे उगे । ते समुद्रु जैसा ॥1088॥
गंगेने समुद्रात प्रवेश केल्यावर, तिचा वेग दृष्टीला अगर स्पर्शाला जेथवर जाणवतो तेथवर तिला गंगापण आहे; जेथे अस फरक जाणवत नाही तेथे ती समुद्र झाली असे समजावे. 88
1089-18
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे । तेचि शांतीचेनि लवलाहे । होय तो गा ॥1089॥
याप्रमाणे ब्रह्मरूप झालेला व ब्रह्मरूप होण्याच्या स्थितीत असलेला ह्यात अंतर आहे; ते अंतर शांतीच्या योगे तो तोडतो. 89
1090-18
पै तेचि होणेनवीण । प्रतीती आले जे ब्रह्मपण । ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥1090॥
कारण, ब्रह्म व्हावयाचे नसते, तर, ब्रह्मरूपच आपण केव्हाही आहो व मुळचे होतो अशी जी प्रतीति, तीच त्याची ब्रह्म होण्याची योग्यता असे तू समज. 1090
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥18. 54॥
1091-18
ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता । आत्मबोधप्रसन्नता- । पदी बैसे ॥1091॥
अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता पावलेला पुरुष, आत्मबोधप्रसन्नतेच्या पदावर सहजच आरूढ होतो. 91
1092-18
जेणे निपजे रससोय । तो तापुही जै जाय । तै ते का होय । प्रसन्न जैसी ॥1092॥
ज्या अग्निसहाय्याने पाकसिद्ध होते, ती उष्णता मुरली म्हणजे ते अन्न जसे रुचीस व प्रसन्नतेस कारण होते. 92
1093-18
नाना भरतिया लगबगा । शरत्काळी सांडिजे गंगा । का गीत रहाता उपांगा । वोहटु पडे ॥1093॥
किंवा शरद् ऋतूत, गंगेचा पावसाळयातील चढ उतार जसा थांबतो अथवा गायनसमाप्तीनंतर, तत्प्रीत्यर्थ आणलेल उपकरणे जशी आपोआप बाजूस रहातात 93
1094-18
तैसा आत्मबोधी उद्यमु । करिता होय जो श्रमु । तोही जेथे समु । होऊनि जाय ॥1094॥
त्याचप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीकरिता केलेल्या साधनादि उद्योगाने जो श्रम होतो त्याचाही त्या प्रसन्नतेमुळे परिहार होतो. 94
1095-18
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती । ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥1095॥
अशा स्थितीलाच आत्मबोधाची प्रसन्नता असे म्हणतात; व ती भोगण्याची असा जो योगी साधक, त्याचीच अर्जुना, योग्यता आहे. 95
1096-18
तेव्हा आत्मत्वे शोचावे । काही पावावया कामावे । हे सरले समभावे । भरिते तया ॥1096॥
ज्याची वृत्ति साम्यभावाने (विषमता-रहित) परिपूर्ण आहे, असा तो योगी, अमुक एक गोष्ट माझी होती म्हणून तिजबद्दल शोक करील अगर अमुक एक गोष्ट मला असावी असे इच्छील, ह्या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत. (संपतात) 96
1097-18
उदया येता गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती । हारवीजती दीप्ती । आंगिका जेवी ॥1097॥
सूर्योदय होताच, नाना नक्षत्रे आपापले तेज जसे टाकतात ( निस्तेज होतात). 97
1098-18
तेवी उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था । मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥1098॥
त्याप्रमाणे अपरोक्ष आत्मानुभवाच्या उदयाबरोबर, त्याच्या दृष्टीने भूतांतील भेदभाव लयास जाऊन, त्याला सर्वत्र आत्मदर्शनच होत असते. 98
1099-18
पाटियेवरील अक्षरे । जैसी पुसता येती करे । तैसी हारपती भेदांतरे । तयाचिये दृष्टी ॥1099॥
पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसली जातात, तसा, त्याच्या दृष्टीने वस्तूवस्तूंमधील भेदभाव नाहीसा होतो. 99
1100-18
तैसेनि अन्यथा ज्ञाने । जिये घेपती जागरस्वप्ने । तिये दोन्ही केली लीने । अव्यक्तामाजी ॥1100॥
त्याप्रमाणे, अज्ञानाच्या विक्षेपशक्तीने दाखविलेल्या ज्या जागर व स्वप्न ह्या अवस्था त्या त्यांचे कारण जे अव्यक्त (अज्ञान) त्यात प्रथम लीन होतात. 1100
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३३२ वा. २८, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९७३ ते ३९८४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
दिवस ३३२ वा. २८, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९७३ ते ३९८४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३९७३
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥
परी तू आपुलिया सत्ता । मज करावे सरता ॥धृपद॥
नाही चित्तशुद्धि । स्थिर पायापाशी बुद्धि ॥२॥
अपराधाचा केलो । तुका म्हणे किती बोलो ॥३॥
अर्थ
मी त्रिवार सांगतो की, मी पतित आहे. परंतू हे देवा तू आपल्या सत्याने मला सरते (मान्य) करावे. माझे चित्त शुध्द नाही माझे बुध्दी तुमच्या पायाजवळ स्थिर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी अपराधाचा पुतळाच आहे आता तुला हे माहितच आहे मी पतित आहे तर हे तुला किती म्हणून सांगावे ? ”
1:19
अभंग क्र. ३९७४
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥
नको जाऊ देऊ भंगा । गात्रे माझी पांडुरंगा ॥धृपद॥
आयुष्य करी उणे । परी मज आवडो कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणी ॥३॥
अर्थ
जोपर्यंत देह अवसानावर आहे तोपर्यंतच हरीच्या कथेची सामग्री आहे. त्यामुळे हे पाडूरंगा माझी गात्रे म्हणजे इंद्रिये भंगू देऊ नको म्हणजे शक्तीहीन होऊ देऊ नकोस. देवा हवे असेल तर तुम्ही माझे आयुष्य कमी करा परंतू माझ्या मनात कीर्तनाची आवड कायम राहू दया एवढेच माझे मागणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा कीर्तनाला विसरणे यापेक्षा दुसरी हानी कोणतीही नाही आणि दुसरी हानी माझ्या मनातही येत नाही. ”
1:19
अभंग क्र. ३९७५
गळित झाली काया । हेचि लळित पंढरिराया ॥१॥
आले अवसानापासी । रूप राहिले मानसी ॥धृपद॥
वाहिला कळस । तेथे स्थिरावला रस ॥२॥
तुका म्हणे गोड झाले । नारायणी पोट धाले ॥३॥
अर्थ
हे पंढरीराया शरीराला वृध्दावस्था प्राप्त होणे म्हणजेच लळीत (उत्सवाच्या शेवटी होणारा खेळ) आहे. आता माझा देह अवसानात म्हणजेच शेवटास आला आहे त्यामुळे हरीचेच रुप माझ्या मनामध्ये राहिले आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी भजनाचा कळस गाठला आहे त्यामुळे माझे प्रेम तेथेच स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “नारायणाच्या चिंतनाने ब्रम्हरसाचे भोजन अतिशय गोड झाले असून माझे पोट भरले आहे. ”
1:19
अभंग क्र. ३९७६
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥
कुंचे ढळती दोही बाही । जवळी राही रखुमाई ॥धृपद॥
नाना उपचारी । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥
हाती घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥
अर्थ
रत्नजडित सिंहासनावर देव स्वत: बसला आहे. देवाच्या दोन्ही बाजूनी कुंचे ढाळीत असून म्हणजेच चौ-या ढाळीत असून जवळ राही रखुमाई आहे. अष्टमहासिध्दी नाना प्रकारचे उपचार करत असून तेथे दास्यत्व करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हातामध्ये हरीच्या पादूका घेऊन मी उभा आहे. ”
1:19
अभंग क्र. ३९७७
हिरा शोभला कोंदणी । जडित माणिकांची खाणी ॥१॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥धृपद॥
कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥
अर्थ
हिरा जसा सोन्यामध्ये सुशोभीत होऊन दिसावा किंवा रत्नजडित खाण जशी असावी, अगदी तसाच नारायण दिसत आहे आणि त्याचे मुख म्हणजे सुखाचे भूषणच आहे. कोटयावधी पौर्णिमेच्या पूर्ण असलेल्या चंद्राच्या तेजाप्रमाणे हरीची लीला म्हणजे तेज दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा प्रकारे हरीचे रुप दृष्टीने पाहिले की दृष्टी तृप्त होते ती पुन्हा परत माघारीच येत नाही. ”
1:19
अभंग क्र. ३९७८
उभारिला हात । जगी जाणविली मात ॥१॥
देव बैसले सिंहासनी । आल्या याचकासी पुरे धनी ॥धृपद॥
एकाच्या कैवाडे । उगवे बहुतांचे कोडे ॥२॥
दोही ठायी तुका । नाही पडो देत चुका ॥३॥
अर्थ
हात उभारुन जगामध्ये मी ही गोष्ट सांगितली गेलेली आहे, की देव सिंहासनावर बसले आहेत आणि जो कोणी याचक त्यांच्याकडे येईल त्याची तृप्ती होत आहे. एका पुंडलिकामुळेच व पुंडलिकाच्या निर्धारामुळेच देव पंढरीत आले असून खूप जणांचे कोडे सुटले गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाच्या ठिकाणी देवा सेवा करण्याच्या कर्तव्यात आणि भूतलावर लोकांना देवाची सेवा करण्यासाठी प्रवृत्त करण्यात मी माझे कर्तव्य करीत आहे दोन्ही ठिकाणी मी काहीच चूक घडू देत नाही. ”
1:19
अभंग क्र. ३९७९
जीवेसाठी यत्नभाव । त्याची नांव बळकट ॥१॥
पैल तीरा जाता काही । संदेह नाही भवनदी ॥धृपद॥
विश्वासाची धन्य जाती । तेथे वस्ती देवाची ॥२॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥
अर्थ
प्रयत्न करण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न करण्याची तयारी असावी त्याचेच नांव “बळकट प्रयत्न” असे आहे. बळकट प्रयत्न करण्याची तयारी असेल तर पैलतीराला म्हणजे भवनदीच्या पार जाता येते यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. विश्वास ठेवणा-यांची जात धन्य आहे आणि तेथेच देवाची वस्ती नेहमी आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, “भोळया भक्तांचा देव खरोखरच अंकित असतो. ”
1:19
अभंग क्र. ३९८०
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्ती देवाची ॥१॥
कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळे ॥धृपद॥
भक्तिभाग्यगाठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥
तुका म्हणे हरीचे दास । तेथे आस सकळ ॥३॥
अर्थ
ज्यांच्या चित्तामध्ये देवाविषयी आवड आहे अशा लोकांना देवाचा आर्शिवाद असो. त्यांचे क्षेमकल्याण असो आणि देवाविषयी त्यांचे प्रेम वाढत राहो. ज्या जीवाच्या पदरामध्ये भक्तिभाग्याचे धन बांधलेले आहे त्यांना माझा नमन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हरीचे दास जेथे असतील तेथेच माझ्या आशा, अपेक्षा, इच्छा आहेत. ”
1:20
अभंग क्र. ३९८१
तया साठी वेचू वाणी । अइको कानी वारता त्या ॥१॥
क्षेम माझे हरीजन । समाधान पुसता त्या ॥धृपद॥
परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारी ॥२॥
तुका म्हणे धैर्यवंते । निर्मळ चित्ते सखी ती ॥३॥
अर्थ
संतांसाठीच आम्ही आमची वाणी खर्च करु आणि त्यांचीच वार्ता आम्ही आमच्या कानांनी ऐकू. माझ्या सर्व हरीजण वैष्णवाचे क्षेम म्हणजे चांगले आहे का हे विचारण्यातच माझे समाधान आहे. जे लोक माझ्या परलोकीचे सोबती आहेत त्यांची जात कुळ मी विचारणार नाही केवळ त्यांच्याकडे हरीभक्त म्हणूनच मी पाहात आहे आणि म्हणूनच त्यांच्या क्षेम समाचाराची वार्ता मी विचारीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे धैर्यवंत आहेत आणि निर्मळ चित्ताचे आहेत तेच माझे सखे आहेत. ”
1:20
अभंग क्र. ३९८२
अभय उत्तरी संती केले दान । झाले समाधान चित्त तेणे ॥१॥
आता प्रेमरसे न घडे खंडण । द्यावे कृपादान नारायणा ॥धृपद॥
आले जे उचित देहविभागासी । तेणे पायापासी उभी असो ॥२॥
तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडया उत्तरी गातो गीत ॥३॥
अर्थ
“तू भिऊ नकोस” असे अभयाचे उत्तर वचन संतांनी मला दिले त्यामुळे माझ्या चित्ताला समाधान झाले. नारायणा आता तुमच्या प्रेमरसामध्ये खंडन पडू नये हेच कृपादान तुम्ही मला दयावे. देवा आमच्या देहाच्या वाटेला जो काही उचित भाग आलेला आहे त्यामुळे खरे तर आम्ही तुमच्या पुढे उभे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी माझ्या वाणीने तुमच्या गुणवर्णनाचे गीत गाऊन तुमची पूजा करीत आहे आणि बोबड्या वाणीनेच तुमचे गीत गात आहे. ”
1:20
अभंग क्र. ३९८३
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारू ॥१॥
सेवेमधी जमा धरा । कृपा करा शेवटी ॥धृपद॥
विचारूनि ठाया ठाव । येथे भाव राहिला ॥२॥
आता तुकयापाशी हेवा । नाही देवा तांतडी ॥३॥
अर्थ
देवा आम्ही मंत्रहीन व क्रियाहीन आहोत त्यामुळे आमच्या आचाराविषयी तुम्ही विचारच करु नका. देवा आम्ही तुमची मंत्रहीन व क्रियाहीन प्रकारे जी पूजा केली ती तुम्ही तुमच्या सेवेच्या खात्यामध्ये जमा करुन घ्या आणि शेवटी आमच्यावर तुम्ही कृपा करा. मी खूप ठिकठिकाणांचा विचार केला आणि शेवटी माझा भक्तिभाव एक तुमच्या पायाजवळच स्थिर झाला. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता माझ्या ठिकाणी आता कोणताही हेवा राहिला नाही आणि मनुष्य देहातील कर्तव्य पूर्ण करण्याविषयी कोणत्याही प्रकारची तातडी राहिली नाही. ”
1:20
अभंग क्र. ३९८४
ऐके वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितो कथेकाळी । आपण असावे जवळी ॥धृपद॥
घेई ऐसी भाक । मागे न जरि काही एक ॥२॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाचि राखावा ॥३॥
अर्थ
हे कमळापती माझे एक वचन तुम्ही ऐका माझी रंकाचीही तुम्हाला विनंती आहे. हरीकथेच्या काळी मी तुम्हाला हात जोडीत आहे कृपया करुन तुम्ही माझ्या जवळच असावे असे मला वाटत आहे. मी तुम्हाला परत काहीही मागणार नाही असे तुम्ही माझ्याकडून वचन घ्यावे. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की, “देवा इतकाच माझा शब्द तुम्ही राखावा म्हणजे झाले. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















