२९ जानेवारी, दिवस २९, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३३७ ते ३४८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२९ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 29 January

राम कृष्ण हरी आज दिनांक २९ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

51-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे । की त्यजिले हे कर्म सांडे । ऐसे आहे ॥51॥
आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते घडते आणि कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसंन्यास घडतो, असे आहे का ?
52-3
हे वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखो पाहिजे । परी त्यजिता कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥52॥
हे उगीच काहीतरी (अयोग्य) बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले, तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे ते टाकले जात नाही, हे तू निःसंशय समज.

53-3
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥3. 5॥


भावार्थ :-
कारण कोणीहि (काहीतरी) कर्म न करता क्षणभारदेखील केंव्हाही राहत नाही, प्रत्येकजण प्रकृतिजन्य गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवीतच असतात. (करवून घेत असतात)

जव प्रकृतीचे अधिष्ठान । तव सांडी मांडी हे अज्ञान । जे चेष्टा गुणाधीन । आपैसी असे ॥53॥
जोपर्यंत जीवाला शरीराचा, प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यन्त मी कर्माचा त्याग करीन अथवा कर्म करीन असे म्हणणे अज्ञानपणाचे आहे. कारण, जेवढे म्हणून कर्म घडत असते, तेवढे स्वभावतः (सात्विक, राजस, तामस) प्रकृतीक गुणांच्या अधीन असते.
54-3
देखे विहित कर्म जेतुले । ते सळे जरी वोसंडिले । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥
पाहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे, तेवढे जरी करावयाचे सोडून दिले, तरी इंद्रियांचे स्वभाव नष्ट झाले आहे काय ?

55-3
सांगे श्रवणी ऐकावे ठेले । की नेत्रीचे तेज गेले । हे नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ॥55॥
सांग, कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय ? अथवा, डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय ? या नाकपुड्या बुजून वास येईनासा झाला आहे काय ?



56-3
ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥
किंवा प्राण व अपान, या दोन्ही वायूच्या क्रिया थांबल्या आहेत काय ? किंवा बुद्धीचा कल्पना विलास थांबला आहे काय ? किंवा भूक-तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत काय ?

57-3
हे स्वप्नावबोधु ठेले । की चरण चालो विसरले । हे असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥57॥
स्वप्न व जागृत अवस्था बंद पडल्या आहेत का ? अथवा पाय चालणे विसरले काय ? हे सर्व असु दे. जन्म आणि मरण संपली आहेत काय ?
58-3
हे न ठकेचि जरी काही । तरी सांडिले ते कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंता ॥58॥
हे जर काहीचं बंद पडले नाही, तर मग कर्मत्याग कसला ? म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाला कर्म त्याग करता येत नाही.
59-3
कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणे । येरी धरी मोकली अंतःकरणे । वाहिजे वाया ॥59॥
मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे (सत्व, रज, तम्) शरीरातील सत्वादि प्रकारचे गुण त्याच्याकडून कर्म घडवीतच असतात; म्हणून एखाद्याने मी हे कर्म करतो अथवा या कर्माचा त्याग करतो, असा अंतःकरणात अभिमान बाळगणे, हे व्यर्थ आहे.
60-3
देखे रथी आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे । मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥60॥
पाहा, एखादा मनुष्य रथावर आरूढ झाला, काही न करता स्तब्ध झाला (स्वस्थ बसला), तरी तो मनुष्य (रथावर बसलेला) रथाच्या अधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याचाहि प्रवास हा घडतोच.


61-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
का उचलिले वायुवशे । चळे शुष्क पत्र जैसे । निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥61॥
एखादे वाळलेले झाडाचे पान काही न करता पडलेले असते; परंतु जोरात वारा सुटला, की ते वाऱ्यामुळे (स्वतः हालचाल न करता) आकाशात इकडे तिकडे फिरत(उडत) असते.
62-3
तैसे प्रकृतिआधारे । कर्मेंद्रियविकारे । मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥62॥
त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधारे (कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला मनुष्य) आणि कर्मेंद्रियांच्या विकाराने निष्काम माणूसही नेहमी कर्म करीत असतो.
63-3
म्हणऊनि संगु जव प्रकृतिचा । तव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करू म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥63॥
म्हणून जो पर्यंत प्रकृतीचा (जो पर्यंत शरीराशी) संबंध आहे, तोपर्यन्त कर्माचा त्याग करणे शक्य नाही, असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात, त्यांचा तो केवळ बोलण्याचा आग्रह असतो.
64-3
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते ॥3. 6॥
भावार्थ :-

जो केवळ कर्मेंद्रियांना जबरदस्तीने ताब्यात घेतो आणि मनात विषयांचे चिंतन करीत असतो, त्याला अज्ञानी किंवा ढोंगी असे म्हणतात.
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊ पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि ॥64॥
जे उचित (आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म) कर्माचा त्याग करतात आणि कर्मेंद्रियप्रवृत्तीचा निरोध करूनच नैष्कर्म्य होऊ पाहतात, (कर्मातीत अवस्थेला पोहचू पाहतात),

65-3
तया कर्मत्यागु न घडे । जे कर्तव्य मनी सापडे । वरी नटती ते फुडे । दरिद्र जाण ॥65॥
त्यांना कर्माचा त्याग घडत नसतो; कारण त्यांच्या अंतःकरणात कर्तव्यबुद्धी (म्हणजे विष्यप्राप्तीचे कर्तव्य) दडलेली असते. त्यामुळे कर्मत्यागाचे त्याचे सोंग वरवरचे असते; आणि ते कर्मत्यागाचे दारिद्रच असते, असे समज.

66-3
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाही ॥66॥
हे अर्जुना ! असे ते लोक खरोखरच विषयासक्त (विषयाची आसक्ती) असतात. त्यांचा विषयाच्या आसक्तीबद्दल काही संशय घेण्याचे काही कारण नाही.

67-3
आता देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा ॥67॥
हे अर्जुना ! प्रसंग आला आहे, म्हणून निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे.
68-3

यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥3. 7॥
भावार्थ :-

पण हे अर्जुना ! जो पुरुष मनाने सर्व इंद्रियांना ताब्यात घेऊन (नियमन करून), (आसक्त न होता) अनासक्त बनून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. (कर्मेंद्रिय कर्मात राबवतो)

जो अंतरी दृढु । परमात्मरूपी गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥
जो अंतःकरणात सात्विक निश्चयाने दृढ असतो आणि परमात्म्याच्या स्वरूपात रंगून गेलेला असतो; तथापि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करत असतो;
69-3
तो इंद्रिया आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जे जे ॥69॥
तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही. विषय त्यास बाधा करतील अशी भीती (त्याच्या मनात) नसते आणि ज्यावेळी जी कर्मे करायची असतात, त्या वेळी त्या कर्माचा त्याग करीत नाही
70-3.
(अधिकारानुसार प्राप्त झालेली विहित कर्माचा त्याग न करणारा)
तो कर्मेंद्रिये कर्मी । राहाटता तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥70॥
कर्मेंद्रिय कर्म करीत असताना तो पुरुष त्यांना आवरीत नाही, परंतु त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारांच्या बंधनात तो सापडत नाही.


71-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
(उत्पन्न होणाऱ्या विचारांनी तो लिप्त होत नाही)
तो कामनामात्रे न घेपे । मोहमळे न लिंपे । जैसे जळी जळे न शिंपे । पद्मपत्र ॥71॥
ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेकरूपी (किंवा मोहरूपी) मळाने मालिन होत नाही.
72-3
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसे तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥72॥
(त्या कमळाप्रमाणे) त्याप्रमाणे तो प्रपंचामध्ये राहतो. तो दिसण्यास सामान्य लोकांप्रमाणे दिसतो; पण मनाने असंग असतो, जसे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनहि, पाण्याच्या संगतीत राहताना दिसतो.
73-3
तैसा सामन्यत्वे पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवी निर्धारिता नेणिजे । सोय जयाची ॥73॥
त्याप्रमाणे वरवर पहिले तर, तो सामान्य माणसासारखा दिसतो. त्याच्या संबंधी निश्चित विचार करू लागलो, तर त्याचे वास्तव स्वरूप काही कळू शकत नाही. (कल्पना करता येत नाही. )
74-3
ऐसा चिन्ही चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पा ॥74॥
अशा लक्षणांनी युक्त असलेला (मनुष्य) जो तुला दिसेल, तो आशा-पाशरहित व मुक्त आहे, असे तू जण.
75-3
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगी । म्हणोनि ऐसा होय यालागी । म्हणिपे तूते ॥75॥
हे अर्जुना ! तोच खरा कर्मयोगी होय. या जगात त्याचीच स्तुती होत असते. म्हणून, तू असा कर्मयोगी हो, असे मी तुला म्हणत आहे.

दिवस २९ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३३७ ते ३४८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. 337
स्तुति करू तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा धंदा कोणीकडे ॥१॥
परी हे वैखरी गोडावली सुखे । रसना रस मुखे इच्छीतसे ॥धृपद॥
रूप वर्णावया कोठे पुरे मती । रोमी होती जाती ब्रम्हांडे ही ॥२॥
तुका म्हणे तू ऐसा एक साचा । ऐसी तव वाचा जाली नाही ॥३॥
अर्थ

तुमची स्तुती करायला मी करेन पण देवा जिथे वेदाला ही तुमची स्तुती करण्यासाठी शब्दच सुचत नाही तेथे माझ्या स्तुतीचा काय प्रभाव पडणार आहे. पण काय करणार देवा तुझी स्तुती करण्यासाठी माझी जिव्हा लाचावली आहे तुझी स्तुती करण्यासाठी माझी इच्छा होत आहे. पण देवा तुमची स्तुती करण्याइतकी माझी बुद्धी पुरेशी नाही कारण तुमच्या एका रोमा वर अनेक ब्रह्मांडे होतात आणि जातात. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आहो तुम्ही या जगतामध्ये तुम्हीच खरे व्यापक आहात आणि तुमच्या स्वरूपाचे वर्णन कोणी करू शकेल अशी कोणाची वाचा असू शकत नाही.


अभंग क्र. 338
तुज वर्णी ऐसा तुज विण नाही । दुजा कोणी तीही त्रिभुवनी ॥१॥
सहस्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥धृपद॥
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चिदानंद नारायणा ॥२॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणे ॥३॥
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा कळो येसी ॥४॥
अर्थ

तुझे वर्णन हे विठ्ठला तूच ते करू शकतो पण तुझे वर्णन करू शकेल असा या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. सहस्र मुख असलेला शेष बापुडा तुझे वर्णन करून करून थकला शेवटी त्याच्या जीव्हाला चिरा पडल्या पण तो तुझे वर्णन पूर्ण करू शकला नाही. कारण हे नारायणा तू अव्यक्त अलक्ष अनंत आनंदरूप निर्गुण सच्चिदानंदरुप आहेस. ज्याचा जसा तुझ्याविषयी भाव असेल तसे रुप घेऊन तू सगुणसाकार होतो. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तू जर आम्हाला स्वतः तिचे रूप दाखवले तरच आम्हाला कळून येईल.


अभंग क्र. 339
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधू विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊ पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥धृपद॥
हे तो नाही सर्वकाळ । अमुप अमृतांचे जळ ॥२॥
तुका म्हणे थोरा पुण्ये । ओघ आला पंथे येणे ॥३॥
अर्थ

हरी भजनाचा आनंद घेताना आनंदाचा महापूर आला आहे व या महापुरात हरी प्रेमा विषयी लाटा उसळत आहे. या विठ्ठलनामाचे सांगडी आपण आपल्या कमरेला बांधून या भवसागराच्या पलीकडे पोहून जाऊ. अरे माझ्या भाईनों तुम्ही सर्वजण यामध्ये उडी मारा. आता सुदिन पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या भजन नदीत आनंदाने उडी मार येथे अमृत रुपआनंदाचे पाणी कमी पडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अनेक जन्मीची पुण्याई आहे त्यामुळे हा भक्तीमार्गाचा ओघ आपल्याकडे आला आहे.


अभंग क्र. 340
आणीक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्ता पासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥धृपद॥
पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥३॥
अर्थ

माझ्या चित्तामध्ये पांडुरंगा वाचून दुसरे काहीही नाही या गोष्टीचा मी आता मनापासून निश्चय केला आहे. माझ्या ध्यानामध्ये ही पांडुरंग आहे आणि मनामध्येही पांडुरंग आहे जागृतीत पांडुरंग आहे स्वप्नामध्ये पांडुरंग आहे. माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण लागले आहे एका पांडुरंगा वाचून दुसरीकडे माझे इंद्रिय धावत घेत नाही दुसरा कोणताही विषय माझे इंद्रिय जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांनी मला ज्याची ओळख करुन दिली आहे त्याचे ते सगुणरूप विटेवर उभे आहे.


अभंग क्र. 341
आता मी अनन्य येथे अधिकारी । होइन कोणे परी नेणे देवा ॥१॥
पुराणीचा अर्थ आणिता मनास । होय कासावीस जीव माझा ॥धृपद॥
इंद्रियांचे आम्ही पागिलो अंकित । त्यांच्यारगे चित्त रंगलेसे ॥२॥ (तपास करा, रगे, )
एकाचे ही मज न घडे दमन । अवघी नेमून कैसी राखो ॥३॥
तुका म्हणे जरी मोकलिसी आता । तरी मी अनंता वाया गेलो ॥४॥
अर्थ

मी कोणत्या साधनेने तुमच्या भक्तीचा अनन्याधिकारी होईन हे मला समजत नाही. पुराणातील अर्थ मनात आणला कि भक्तीमध्ये किती मन विरक्त करावे लागते याचा विचार केला की माझे मन कासावीस होते. कारण आम्ही इंद्रियाचे पूर्णपणे अंकित झालो आहोत त्या इंद्रियांच्या विषयातच आम्ही रंगून गेलो आहोत. हे देवा मला एकाच इंद्रियांचे दमन करता येत नाहीतर सर्व इंद्रियांना मी ताब्यात कसे ठेवू ? तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता तुम्ही जर आता उपेक्षा बुद्धीने माझा त्याग कराल तर मी पूर्णपणे वाया गेलो असे समजा.


अभंग क्र. 342
लक्षूनिया योगी पाहाती आभास । ते दिसे आम्हास दृष्टीपुढे ॥१॥
कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥धृपद॥
व्यापूनि वेगळे राहिलेसे दुरी । सकळा अंतरी निर्वीकार ॥२॥
रूप नाही रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसी शिव ध्याय ॥३॥
अंत नाही पार वर्णा नाही थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥
अचेत चेतले भक्तीचिया सुखे । आपुल्या कौतुके तुका म्हणे ॥५॥
अर्थ

योगी लोक जे प्रयत्न करुन ध्यानधारणा करून हरीचे अस्पष्ट रूप पाहतात या स्वरूपाचा त्यांना फक्त आभास होतो हे स्वरूप आम्हा भक्तांना साक्षात स्पष्ट दिसते. दोन्ही कर कटेवर ठेवून तो विटेवर उभा आहे व त्याची अंगकांती ही सावळी व दैदीप्यमान आहे. त्याने सर्व व्यापूनही तो सर्वापेक्षा वेगळा आहे व सर्वाच्या आत राहूनही तो निर्विकार आहे. ज्याला कसले ही नाम नाही रूप नाही अशा स्वरूपाचे मी मनामध्ये ध्यान करतो. ज्याला अंत नाही पार नाही कोणत्याही प्रकारचे वर्ण नाही जाती नाही कुळ नाही हात नाही पाय नाही कोणत्याही प्रकारचे अवयव नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे असे परब्रम्ह भक्तांच्या सुखा करिता सगुणसाकार झाले आहे.


अभंग क्र. 343
कैसे करू ध्यान कैसा पाहो तुज । वर्म दावी मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा । कोण्या भावे देवा आतुडसी ॥धृपद॥
कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणू । जाणू हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती । कैसी स्थिती मती दावी मज ॥३॥
तुका म्हणे जैसे दास केले देवा । तैसे हे अनुभवा आणी मज ॥४॥
अर्थ

संत तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझं कसं ध्यान करू, आणि तुला कसा पाहु, देवा मी तुझं कसं ध्यान करू, आणि तुला कसा पाहू कृपया तुला पाहायचं आणि तुझा ध्यान करण्याचं वर्म मला या याचकास तू दाखव.
तुझी भक्ती कशी करू, तुझी सेवा कशी करू, कोणत्या भावाने तुझी सेवा कशी करू कोणत्या भावाने तू मला प्राप्त होशील तेही मला तू सांग. तुझ्या विषयी मी कसं गाऊ, तुझी कीर्ती कशी वर्णन करू, आणि तुला कसं ध्यान करून लक्षात आणू, आणि माझ्या बुद्धीची स्थिती कशी असावी तो मार्ग तू मला दाखव. तू मला जसे तुझे दास केलेस तसा तुझा अनुभव मला तू आणून दे असे संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात.


अभंग क्र. 344
निगमाचे वन । नका शोधू करू सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरी । बांधले ते दावे वरी ॥धृपद॥
पीडलेती भ्रमे । वाट न कळता वर्मे ॥२॥
तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥
अर्थ

निगमाचे वन म्हणजे वेद रुपी आरण्य व त्यामध्ये हरीला शोधण्याचा व्यर्थ शिण करून घेऊ नका. तुम्हाला जर तो देव पाहायचाच असेल तर मी त्याचा पत्ता तुम्हाला सांगतो त्याने दही व दुधाची मटकी फोडली म्हणून यशोदा मातेने त्याला उखाळशी बांधून ठेवले आहे. हरी ची प्रति कशी करून घ्यावी याचे वर्म तुम्हाला न कळल्यामुळे तुम्ही व्यर्थ हे गोंधळात पडलेले आहात. तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो तुम्ही तुमच्या चित्तात असलेला अहंकार टाकून द्या मग तुम्हाला सुखाने हरीची प्राप्ती होईल.


अभंग क्र. 345
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणा ॥१॥
मीच मज राखण जालो । ज्याणे तेथेचि धरिलो ॥धृपद॥
जे जे जेथे उठी । ते ते तया हाते कुंटी ॥२॥
भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥
अर्थ

माझे मन माझ्या मनाला व बुद्धी बुद्धीला वळवीत आहे. अशाप्रकारे मीच माझा राखणदार झालो आहे व इंद्रिय विषयांकडे धाव घेणार तोच मी त्यांना थांबवीत आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या ठिकाणी जे काही विकार निर्माण होतात त्याचे मन व बुद्धी हेच त्यांना खुंटी घालतात. तुकाराम महाराज म्हणतात मनातील विचारांची भरती आणि ओहोटी उदय आणि विलय यांचा मी साक्षी राहिलो आहे


अभंग क्र. 346
ब्रम्ह न लिंपे त्या मळे । कर्माअकर्मा वेगळे ॥१॥
तोचि एक तया जाणे । पावे अनुभविले खुणे ॥धृपद॥
शोच अशौचाचे संधी । तन आळा तनामधी ॥२॥
पापपुण्या नाही ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥
अर्थ

ब्रम्‍ह कधीही पाप आणि पुण्य या मलाने लिप्त होत नाही कारण ते कर्म आणि अकर्म यापासून वेगळे आहे. ज्याने कोणी ब्रम्‍ह स्वरूपाचा अनुभव घेतला आहे तोच त्याचे स्वरूप जाणू शकतो. जसे गवताचे आळे असून त्यातच गवत असते तसेच ते ब्रम्‍ह शुद्ध आणि अशुद्ध यांच्या पलीकडील आहे जरी त्याचा यांच्याशी संबंध असला तरी. तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी सहजच ब्रम्‍ह भाव असतो त्या ठिकाणी पापपुण्यला जागा नसते.


अभंग क्र. 347
काय दरा करील वन । समाधान नाही जव ॥१॥
तरी काय तेथे असती थोडी । काय जोडी तयांसी ॥धृपद॥
रिगता धावा पेवामध्ये । जोडे सिद्धी ते ठायी ॥२॥
काय भस्म करील राख । अंतर पाख नाही तो ॥३॥
वर्णआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥४॥
तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस ते हित ॥५॥
अर्थ
जोपर्यंत मनामध्ये पूर्णपणे समाधान पूर्वक अंतकरण तयार होत नाही तोपर्यंत मग तो मनुष्य कितीही वनांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन राहिला तरी काय उपयोग आहे काय ? जर तसे काही असते तर जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी आहेत त्यांना त्याचा लाभ झाला नसता ? जर धान्याचे कोठार म्हणजे पेवे मध्येशिरले तर लगेच अन्न खाता येईल काय ? अंतःकरण जर शुद्ध नसेल तर कितीही यज्ञकुंडातील राख अंगाला लावली असली तरी काही उपयोग आहे काय ? वर्णाश्रम धर्माचा मनुष्याला कंटाळा आला तर तो त्याचा त्याग करतो. तुकाराम महाराज म्हणतात साधकावस्थेमध्ये असताना आशेचा पूर्णं निरास होणे महत्त्वाचे असते बाकी सर्व प्रयत्न म्हणजे एक प्रकारचे सोंग होय.


अभंग क्र. 348
तेही नव्हे जे करिता काही । ध्याता ध्यायी तेही नव्हे ॥१॥
ते ही नव्हे जे जाणवी जना । वाटे मना तेही नव्हे ॥धृपद॥
त्रास मानिजे काटाळा । अशुभ वाचाळा तेही नव्हे ॥२॥
तेही नव्हे जे भोवते भोवे । नागवे धावे तेही नव्हे ॥३॥
तुका म्हणे एकचि आहे । सहजि पाहे सहज ॥४॥
अर्थ

तू जे काही करशील ती भक्ती नाही आणि ज्याचे ध्यान करत आहेस त्यातही भक्ती नाही कारण भक्ती करशील तर त्यात कर्तेपणा आणि ध्यान करशील तर त्यामध्ये ध्याता हा अहंकार उत्पन्न होतो. लोकांना ब्रम्‍हज्ञान सांगणे हि भक्ती नाही आणि मानाने तूला ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रमाणे भक्ती करणे ही भक्ती खरी नाही. लोकांना त्रासून काटाळणे व अशुभ बडबड करणे ही भक्ती नाही. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे किंवा नागवे फिरणे यालाही भक्ती म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे एकच लक्षण आहे ते म्हणजे तू कोणतेही कर्म कर पण त्या कर्माकडे तू अभिमानाने नाही तर सहजतेने लक्ष देऊन पहा.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading