२४ जानेवारी, दिवस २४, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २७७ ते २८८

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२४ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 24 January

राम कृष्ण हरी आज दिनांक २४ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

301-2
का कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना इच्छावशे आवरी । आपुले आपण ॥301॥
किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव जसे पसरते, अथवा मनाला वाटेल तेव्हा आपले अवयव आपणच आवरून घेते,
302-2
तैसी इंद्रिये आपैती होती । जयाचे म्हणितले करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥302॥
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन (स्वतःच्या ताब्यात) असतात व ही इंद्रिये त्याच्या इच्छेनुसार (आज्ञा करीन तशी) वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, असे समजावे.

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥2. 59॥
भावार्थ :-

आहार न घेणाऱ्या पुरुषांचे (रसविषय सोडून) विषय नाहीसे होतात. त्यांच्या ठिकाणी फक्त प्रीती उरते. पण परब्रह्मचे ज्ञान झाल्यावर (निर्माण झालेला हा रसविषय) विषयांची गोडीदेखील नाहीशी होते.
303-2
आता अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐके कवतिक । या विषयाते साधक । त्यजिती नियमे ॥303॥
अर्जुना ! , आता आणखी एक कौतुकाची गोष्ट सांगतो, ऐक, जे साधक नित्य नियमाने निग्रहाने विषयांचा त्याग करतात,
304-2
श्रोत्रादि इंद्रिये आवरती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयी इही ॥304॥
श्रोत्रादि विषयापासून इंद्रियांना आवरतात, परंतु जिभेला मात्र आळा घालीत नाहीत, त्यांना हर विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात.
305-2
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळी उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥305॥
ज्या प्रमाणे एखाद्या झाडाची फक्त वर वरची पाने, पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले; तर त्या झाडाचा संपूर्ण नाश कसा बरे होईल ?


306-2
तो उदकाचेनि बळे अधिके । जैसा आडवोनि आंगे फाके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारे ॥306॥
ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे जसा आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावू लागते त्या प्रमाणे ह्या (जिभेच्या) रसेंद्रियांच्या द्वाराने (हवा तसा अन्नरस घेतला असता) अंतःकरणात विषयवासना पोसल्या जाऊन अधिकच वाढत राहतात.
307-2
येरा इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमू न ये रस हटे । जे जीवन हे न घटे । येणेविण ॥307॥
ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय (निग्रहाने) प्रयत्नाने कमी करता येतात; पण त्याप्रमाणेच जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाही. कारण त्यावाचून (शरिराच्या क्रिया चालत नाहीत) जगणे शक्य नाही.
308-2
मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमाते पावे । जै परब्रह्म अनुभवे । होऊनि जाईजे ॥308॥
पण अर्जुना ! (मग या रसनेद्रियाचा (जिभेचा)विषय तुटावा कसा ? तर माऊली म्हणतात) जो साधक परब्रम्हाशी एकरूपतेचा (अनुभवाद्वारा) ब्रम्हरूप होईल, तेव्हाच रसनेद्रियाची लालसा शिथिल होईल. मग आशा वेळी रसनेचे नियमन होऊ शकते.
309-2
तै शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती । सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥309॥
ज्या वेळी ते ब्रह्म मीच आहे, असा साक्षात्कारात्मक अनुभव येतो. त्यावेळी शरिराचे व्यवहार नाहिसे होतात आणि इंद्रिये ही आपआपल्या विषयांना विसरुन जातात.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥2. 60॥

भावार्थ :-

कारण हे अर्जुना ! (रसबुद्धि शिल्लक राहिल्यामुळे) बुद्धिमान पुरुष इंद्रियांचा विषयांशी संयोग न होऊ देण्याकरिता (बुद्धी स्थिर होण्याकरिता) कितीही प्रयत्न करीत असला, तरी अतिशय बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने (विषयांकडे ओढतात) मोहित करतात.
310-2
येर्‍हवी तरी अर्जुना । हे आया नये साधना । जे रहाटताती जतना । निरंतर ॥310॥
एरव्ही अर्जुना ! (ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत) यांना (इंद्रियांना) जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात (स्वाधीन ठेवण्याकरिता खटपट करतात), त्यांनादेखील ही इंद्रिये स्वाधीन करता येत नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


311-2
जयाते अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती ॥311॥
जे साधक आपल्या भोवती (इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी) साधनेची घरटी बांधतात, यमनियमाचे मनाला कुंपन घालतात आणि मनाला सदैव मुठीत धरून बसतात,
312-2
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञाते विवसी । भुलवी का ॥312॥
अशा साधकाला सुद्धा ही इंद्रिये विषय (भोगण्याकरीता)व्याकुळ करतात, एवढा या इंद्रियांचा प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला एखादी हडळदेखील फसवीत असते,
313-2
देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषे । मग आकळती स्पर्शे । इंद्रियांचेनि ॥313॥
त्याप्रमाणे पाहा, हे विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने (साधनेच्या तपाच्या माध्यमातून) प्राप्त होतात. व इंद्रिया संबंधद्वारा योग्यांचीही मने गुरफटून टाकतात.
314-2
तिये संधी मन जाये । मग अभ्यासा ठोठावले ठाये । ऐसे बळकटपण आहे । इंद्रियांचे ॥314॥
अशा कचाट्यात मग हे मन (इंद्रियांच्या)सापडले की, (अभ्यास जागच्या जागी राहतो) अभ्यासदेखील जागृत होत नाही, इंद्रियांचा जोर हा असा आहे.

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2. 61॥

भावार्थ :-

कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्याकडे ” (परमात्मा श्रीकृष्णा) ” स्थिर करावे. ज्याने इंद्रियांवर विजय मिळविला आहे, त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.
315-2
म्हणोनि आइके पार्था । याते निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयी आस्था । सांडूनिया ॥315॥
म्हणून अर्जुना, ऐक. (अगदी मनापासून) अंतःकरणापासून जो सर्व विषयांची आसक्ती सोडून (इच्छा सोडून या इंद्रियांना सर्वतोपरी दमन करून)इंद्रियावर विजय मिळवतो, (इंद्रिये आपल्या स्वाधीन ठेवतो),


316-2
तोचि तू जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना ॥316॥
ज्याचे अंतःकरण विषयाचे सुखाने भूलुन (फसले) जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य अधिकारी आहे.
317-2
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो माते हृदयाआंतु । विसंबेना ॥317॥
त्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते, तो (नेहमी आत्मज्ञानाने संपन्न होवून राहतो) अंतःकरणात मला कधीच विसरत नाही.
318-2
एर्‍हवी बाह्य विषय तरी नाही । परी मानसी होईल जरी काही । तरी साद्यंतुचि हा पाही । संसारु असे ॥318॥
एर्‍हवी जरी एखाद्या साधकाने (शब्दादि) बाह्य़ विषयाचा त्याग केला, पण मनात जर विषयाची थोडीशीही वासना (विषय उपभोगण्याची लालसा) असेल, तर त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतात. (जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून विषयाची किंचित ही अभिलाषा नसावी)
319-2
जैसा का विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥319॥
ज्याप्रमाणे (मनात एखादा लालसा निर्माण करणारा विचार) विषाचा एक थेंब जरी घेतला, (फार होतो जीवन नष्ट करायला) तरी तो सर्व शरीरात पसरून जीवनाचा नाश करतो.
320-2
तैसी या विषयांची शंका । मनी वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥320॥
त्याप्रमाणे पाहा, या विषयातून सुख मिळते काय, (मनात विषयांची सूक्ष्म संस्काररूप थोडी जरी इच्छा राहिली) अशी शंका जरी मनात निर्माण झाली, तरी अंतःकरणातील विवेकाचा ती घात करते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते ।
सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते ॥2. 62॥
क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥2. 63॥

भावार्थ :-

विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्ती मूळे काम, (इच्छा) उत्पन्न होते, (इच्छेच्या आड) कामामुळे क्रोध उत्पन्न होतो, क्रोधापासून अविवेकी, संमोह, समोहापासून स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्यामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे मानवाचे पतन होऊन मानवाचा दानव बनतो. (त्या मानवाचा नाश होतो, दुष्ट विचार मनात उत्पन्न होतात)

321-2
जरी हृदयी विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥321॥
अरे ! अंतःकरणात जर विषयांची नुसती आठवण जरी असेल (किंवा झाली) (भोग घ्यावा अस फक्त वाटल) तरी, विरक्तालाही (जो सगळ्या गोष्टी पासून विरक्त झाला आहे असा तो) पुनः त्या विषयाची ओढ उत्पन्न होते. त्या आसक्तीमुळे (विषयसक्तीनेच काम), विषयप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते.
322-2
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधीचि आला । क्रोधी असे ठेविला । संमोह जाणे ॥322॥
जेथे काम उत्पन्न झाला, तेथे क्रोध आधिच आलेला असतो : (क्रोधाचे बिऱ्हाड आगोदरच ठेवलेले असते) आणि या दोहोंच्या बरोबरच तेथे अविचाराचा भ्रम निर्माण होतो.
323-2
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवाते ज्योति । आहत जैसी ॥323॥
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहिसा होतो, तसेच संमोह झाला की अविचाराने स्मृती नाश पावते,
324-2
का अस्तमानी निशी । जैसी सूर्यतेजाते ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशी । प्राणियांसी ॥324॥
सूर्य मावळण्यांची वेळ होताच रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते, त्या प्रमाणे स्मृतिभ्रंश झाल्यावर मनुष्याची तशी दयनीय (दुर्देशा) दशा होते.
325-2
मग अज्ञानांध केवळ । तेणे आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजी ॥325॥
मग सर्वत्र (ज्ञानाचा लोप होतो) अज्ञानाने केवळ अंधार होतो आणि तो शरीरातील सर्व गोष्टींना बुडविते. त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि अंतरातील बुद्धी ही व्याकुळ होऊन जाते.

दिवस २४ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७७ ते २८८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. 277
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥
आता माझा श्रोता वक्ता तूंची देवा । करावी ते सेवा तुझीच म्या ॥धृपद॥
कुशळ चतुर येथे न पवती । करितील रिते तर्क मते ॥२॥
तुका म्हणे केणे जाले एके घरी । मज आणि हरी तुम्हा गाठी ॥३॥
अर्थ

देवा कोण जाणे तुझी उपासना कोणाला घडेल आणि जरी उपासना कोणाला घडलीच त्याला जरी भक्ती ज्ञानाचे वेड लागले तरी त्याला भक्ती ज्ञान सांगणारा चांगला कोण भेटेल हे कोण जाणू शकते. देवा आता तुला ज्ञान सांगणारा वक्ता मीच आणि तुझ्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणारा श्रोता देखील मीच तूच माझा श्रोता आणि वक्ता आहेस आणि तुझी मी सेवा करावी हेच बरे. जगामध्ये कुशल आणि चतुर व्यक्ती श्रोता आणि वक्ता हे खूप आहेत ते भक्ती आणि ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी येथे येणार नाहीत आणि समजा जरी आले तरी आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी तर्क-वितर्क काढून आपले बोलले ते मान्य करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा हरी आपण दोघानीही श्रवण करावे आणि एकमेकांना प्रवचन करून भक्ती व ज्ञानाच्या गोष्टी सांगावे अशा पद्धतीने हरी तुझी व माझी गाठ पडत आहे.


अभंग क्र. 278
आमुचा विनोद ते जगा मरण । करिती भावहीण देखोवेखी ॥१॥
न कळे सतत हिताचा विचार । ते ही दारोदार खाती फेरे ॥धृपद॥
वंदिले वंदावे निंदिले निंदावे । एक गेले जावे त्याचि वाटा ॥२॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगता । होती यमदूता वरपडे ॥३॥
अर्थ

आमचा परमार्थ म्हणजे एक विनोद झाला आहे परंतु त्या विनोदाने या जगाचे मरण आहे आमचा पारमार्थिक भाव समजून न घेता फक्त त्याचा देखावा करणारे लोक या जगामध्ये आहेत. स्वतःच्या हिताचाविचार कशात आहे हे समजत नाही ते जन्म मृत्यूच्या दारात कायम ये-जा करत राहतील. जे लोक आमचे अनुकरण करतात ते एखाद्याला वंदन केले तर तेही त्याला वंदन करतात व एखाद्याने निंदिले तर त्यांची निंदा करतात एखादा जर त्या वाटेने पुढे गेला तर त्याच्या मागे तेही जातात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही सांगितले तरी ते लोक ऐकत नाही म्हणून ते यमदुतांच्या हाती जातात.


अभंग क्र. 279
दीप घेउनिया धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥
विष्णुदास आम्ही न भिओ कळिकाळा । भुलो मृगजळा न घडे ते ॥धृपद॥
उधळिता माती रविकळा मळे । हे कैसे न कळे भाग्यहीना ॥२॥
तुका म्हणे तृणे झाके हुताशन । हे तव वचन वाउगेचि ॥३॥
अर्थ

हातात दिवा घेऊन अंधार शोधण्यासाठी जाणे हे अघटीत आहे कारण अंधार दिव्याला फार भितो. आम्ही विष्णू दास कधीही कळीकाळाला भिणार नाही आणि या मृगजळ रूपी प्रपंचाला कधीही भुलणार नाही. हातात माती घेऊन वर उधळली म्हणजे सूर्य मलीन होईल काय ? तसेच आम्ही विष्णुदास या संसाराला भुलु काय ? भक्ती न करणाऱ्या भाग्याहीनांना हे काय कळणार ? तुकाराम महाराज म्हणतात गवत टाकल्यावर हुताशान म्हणजे अग्नीझाकला जाईल हे म्हणणे व्यर्थ आहे.


अभंग क्र. 280
नटनाट्य अवघे संपादिले सोंग । भेद दाऊ रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूपा । आपुले स्वरूप जाणतसो ॥धृपद॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करू ॥३॥
अर्थ

आम्ही जरी नट स्वरूप धारण केले तरीही आमची आत्मस्थिती बदलत नाही. आम्ही बहुरुप्याचे जरी सोंग घेतले असले तरी आम्ही आमचे खरे स्वरूप जाणतो. स्फटिकाचा दगड रंगाच्या संगतीने अनेक प्रकारचे रंग दाखवितो तो कोणताही रंग धारण करत नाही कारण तो कोणत्याही रंगाचा नसतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आत्म बोधाने इतर लोकापेक्षा वेगळे राहून निश्चिंतपणे संसार करू संसाररूपी खेळ खेळू.


अभंग क्र. 281
तुजविण वाणी आणिकाची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥धृपद॥
नेत्री आणिकासि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥२॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचे ॥३॥
तुका म्हणे काय वाचून कारण । तुज एक क्षण विसंबता ॥४॥
अर्थ

हे हरी तुझ्यावाचून माझी वाणी जर इतरांची स्तुती करील तर माझी जिव्हा झडो. देवा माझ्या चित्ताला जर तुझ्या वाचून दुसरे काही आवडत असेल तर माझे मस्तक फूठून जावो. तुझ्या वाचून जर माझ्या या डोळ्यांनी दुसऱ्या कोणाला आवडीने पाहिल तर त्याचवेळेला माझे चांडाळ डोळे आंधळे होवो. माझ्या कानांनी तुझी कथा श्रवण केले नाही तर मग त्या कानांचा काय उपयोग आहे ? तुकाराम महाराज म्हणतात तुला मी एक क्षणभर जरी विसरलो तरीही देवा तश्या जगण्याला काय अर्थ आहे.


अभंग क्र. 282
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुंस । खापरा परीस काय करी ॥धृपद॥
निंबाचिया झाडा साखरेचे आळे । बीज तैसी फळे येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
अर्थ

ज्याच्या मनात खरा भाव असेल तर त्याला दगडही तारू शकेल पण दुर्जनाला वळविणे सज्जनाला शक्य नाही. कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ केले तरीही ते सरळ होत नाही आणि खापरा पुढे परिस काय करू शकेल. कडू लिंबाच्या झाडाला जरी साखरेचे आळे केले तरी जसे बीज असेल तसेच फळ येणार. तुकाराम महाराज म्हणतात एक वेळेस वज्राचे ही तुकडे करता येतील पण दुर्जनांचे मन अतिशय कठीण आहे.


अभंग क्र. 283
इच्छावे ते जवळी आले । काय बोले कारण ॥१॥
नामरूपी पडिली गाठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥धृपद॥
मुकियाचे परी जीवी । साकर जेवो खादली ॥२॥
तुका म्हणे काय बोले । आता भले मौन्यची ॥३॥
अर्थ

ज्याची इच्छा होती तेच जवळ आले आहे मग आता बोलायचे काही कारणच राहिले नाही. हरी नामरूपी गाठ पडली आहे त्यामुळे आता काही मिळवायचे किंवा कमवायचे या गोष्टी सगळ्या सरल्या आहेत. एखाद्या मुक्या व्यक्तीने साखर खाल्ली तर त्या साखरेची गोडी त्याला सांगता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या सानिध्याने सर्व सुख मिळाले आहे आता मौन धारण करणे बरे आहे.


अभंग क्र. 284
साधने तरी हीच दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥
परद्रव्य परनारी । याचा धरी विटाळ ॥धृपद॥
देवभाग्ये घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥
तुका म्हणे ते शरीर । घर भांडार देवाचे ॥३॥
अर्थ

जर परमार्थात यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर एवढीच दोन साधने करा ती म्हणजे परद्रव्यआणि परनारी यांचा तु विटाळ कर. ही दोन साधने केले तर देव भाग्य हे दोन्ही तुझ्या घरी तसेच सर्व प्रकारची संपत्ती तुझ्या घरी येईल. तुकाराम महाराज म्हणतात ही दोन साधने करणार्‍याचे शरीर म्हणजे देवाचे घर आणि संपत्तीचे संपूर्ण देवाचे भांडार होय.


अभंग क्र. 285
आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहे धावे घाली पान्हा । नांव घेता पंढरीराणा ॥धृपद॥
कोठे न दिसे पाहता । उडी घाली अवचिता ॥२॥
सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणची घोटी ॥३॥
आम्हा घाली पाठीकडे । पुढे कळिकाळाशी भिडे ॥४॥
तुका म्हणे कृपानीधी । आम्हा उतरी नावेमधी ॥५॥
अर्थ

मत्स्य कूर्म वराह हे देवाचे अवतार आम्हा भक्तांसाठी देवाने धारण केले आहे. मोहाने या देवाला हाका मारली की तो लगेच धावत येतो आणि प्रितीचा पान्हा सोडतो. कोठे पाहिले तर दिसत नाही पण भक्तांवर संकट आले की तो लगेच अवचितपणे धावं घेऊन भक्तांचे संकट दूर करतो. आमच्यासाठी सुख ठेवतो आणि तो मात्र दुखाचे घोट घेतो. तो आम्हाला पाठीशी येतो आणि स्वतः मात्र कळीकाळाशी लढतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तो कृपानिधी नामरूपी नौकेत बसून भवसागरातून तारून नेतो.


अभंग क्र. 286
रवि रश्मीकळा । नये काढिता निराळा ॥१॥
तैसा आम्हा जाला भाव । अंगी जडोनि ठेला देव ॥धृपद॥
गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटी ॥३॥
अर्थ

जसे सूर्‍यापासून सूर्‍याची किरणे वेगळी करता येत नाही. तसेच आमचा देवाविषयी असलेला भाव आहे त्याचप्रमाणे देव आमच्या सर्वांगात वसलेला आहे. साखर आणि गूळ हे दोन्ही एकच आहेत त्यांना वेगवेगळे करता येईल काय ? तुकाराम महाराज म्हणतात उत्पन्न झालेला शब्द जसा आकाशात विलय पावतो तसेच देव आणि आमचे आहे.


अभंग क्र. 287
थोडे परी निरे । अविट ते घ्यावे खरे ॥१॥
घ्यावे जेणे नये तुटी । बीज वाढे बीजा पोटी ॥धृपद॥
चित्त ठेवी ग्वाही । उपचारे चाड नाही ॥२॥
आपले ते हित फार । तुका म्हणे खरे सार ॥३॥
अर्थ

आपणास व्यवहारात जे काही हवे असेल तेवढेच घ्यावे जे अवीट आहे जे घ्यावे खरे आहे ते घ्यावे. असे काही घ्यावे त्यापासून नुकसान होणार नाही आणि एका बीजापासून अनेकांची उत्पत्ती होईल असे घ्यावे. काहीही घेताना निरीक्षण करून आपल्या चित्ताला साक्षी ठेवून घ्यावे तेवढेच खूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मध्ये आपले हित आहे तेच घ्यावे तेच खरे आणि ते चांगले.


अभंग क्र. 288
अवघे देव साध । परी या अवगुणाचा बाध ॥१॥
म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥धृपद॥
ऊस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥
तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
अर्थ

सगळे देव साध्य करता येतील पण जर नीट पाहिले तर आपलेच अवगुण आपल्याला आडवे येतात. त्यामुळे कोणीही कोणाची बरोबरी करू शकत नाही ते एकमेकापासून वेगळे वेगळे राहतात. ऊस आणि कांदा एकाच आळीत लावले तरी त्या दोघाची चव वेगळी आहे. तुकाराम महाराज म्हणतात विष आणि अमृत हे दोन्ही जरी पाण्यापासून बनले असले तरीही त्या दोघाचे व्यवहार भिन्न आहेत.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading