आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१० जानेवारी, दिवस १०, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी २२६ ते २५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १०९ ते १२०
“१० जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 10 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 10 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
226-1
त्रैलोक्यीचे अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हे अनुचित । नाचरे मी ॥226॥
त्रैलोक्याचे / त्रिभूवनाचे राज्य जरी मिळणार असेल, तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही. ॥226॥
227-1
जरी आजि एथ ऐसे कीजे । तरी कवणाच्या मनी उरिजे ? । सांगे मुख केवी पाहिजे । तुझे कृष्णा ? ॥227॥
जर असे अनुचित कृत्य आम्ही केले, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील ? अशा पापकर्मामुळे तुझे मुख तरी कसे पाहणार ? ॥227॥
228-1
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥1. 36॥
भावार्थ :-
हे जनार्दना ! धृतराष्टराच्या पुत्रांचा वध करून आम्हाला कोणते बरे सुख लाभणार ? ह्या आततायींना मारले असता (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल. ॥36॥
जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तु हातीचा । दूरी होसी ॥228॥
जर मी गोत्रजांना ठार केले, तर मी सर्व दोषांचा आश्रयस्थान बनेन. असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दूर केल्यासारखे होईल. ॥228॥
229-1
कुळहरणी पातके । तिये आंगी जडती अशेखे । तये वेळी तु कवणे के । देखावासी ? ॥229॥
कुळाचा नाश केल्यामूळे सर्व पातके लागतात. अशा प्रसंगी तुला कोणी कोठे शोधावे ? ॥229॥
230-1
जैसा उद्यानामाजी अनळु । संचारला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥230॥
ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळा तेथे क्षणभारहि थांबत नाही; ॥230॥
231-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥231॥
चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर पक्षी तेथील पाण्याचे सेवन न करता त्या सरोवराचा त्याग करून तेथून निघून जातो; ॥231॥
232-1
तयापरी तु देवा । मज झकवू न येसी मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥232॥
त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या हृदयातील पुण्याचा (प्रेमाचा) ओलावा नाहीसा झाला, तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. ॥232॥
233-1
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥1. 37॥
भावार्थ :-
म्हणून हे माधव ! कौरव आमचे बांधव आहेत. त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही. कारण स्वजनांनाच ठार मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ ? ॥37॥
म्हणोनि मी हे न करी । इये संग्रामी शस्त्र न धरी । हे किडाळ बहुती परी । दिसतसे ॥233॥
म्हणून मी हे कृत्य करणार नाही; या लढाईमध्ये शस्त्र धरणार नाही. कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य आहे, असे मला दिसत आहे. ॥233॥
234-1
तुजसी अंतराय होईल । मग सांगे आमुचे काय उरेल ? । तेणे दुःखे हिये फुटेल । तुजवीण कृष्णा ॥234॥
हे श्रीकृष्णा ! युद्धाच्या पापामुळे तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग तुझ्यावाचून आमचे या जगात काय राहील ? त्या वियोग-दुःखानेच आमचे हृदय विदीर्ण होईल. ॥234॥
235-1
म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥235॥
ऐवढ्याकरिता या कौरवांचा वध करून आम्ही राज्याचे भोग भोगावेत, हे राहू दे; ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला. ॥235॥
236-1
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥1. 38॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥1. 39॥
भावार्थ :–
अतिलोभामुळे अंतःकरण भ्रष्ट झालेल्या यांना (कौरावांना) कुलक्षयाने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक जरी दिसत नाही, ॥38॥
तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष ढळढळीत दिसत असताना आम्हालादेखील, ” हे जनार्दना ” , या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव का असू नये ! ॥39॥
हे अभिमानमदे भुलले । जरी पा संग्रामा आले । तर्ही आम्ही हित आपुले । जाणावे लागे ॥236॥
कौरव हे अभिमानांच्या मदाने बहकून गेले आहेत, त्यामुळे ते संग्राम करण्यासाठी आले आहेत; तरी पण आम्ही आपले हित (कशांत) आहे हे पहिले पाहिजे. ॥236॥
237-1
हे ऐसे कैसे करावे ? । जे आपुले आपण मारावे ? । जाणत जाणताचि सेवावे । काळकूट ? ॥237॥
आपलेच आप्तसंबंधी मारावे ? हे असे भलतेच कसे करावे ? काळकूट विष आहे, हे कळाले, तर ते कसे घ्यावे ? ॥237॥
238-1
हा जी मार्गी चालता । पुढा सिंहु जाहला आवचिता । तो तव चुकविता । लाभु आथी ॥238॥
महाराज रस्त्याने चालत असता अकस्मात सिंह आडवा आला, तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे. ॥238॥
239-1
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ? ॥239॥
प्रकाशाचा मार्ग सोडून अंधकारमय विहिरीत जाऊन बसणे, यामध्ये कोणता लाभ आहे ? हे देवा ! तूच सांग बरे. ॥239॥
240-1
का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळू सके ॥240॥
किंवा समोर अग्निज्वाला प्रज्वलीत आहेत हे पाहून आपण बाजूने गेलो नाही, तर त्या अग्निज्वाला एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकतील. ॥240॥
241-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसे दोष हे मूर्त ॥ अंगी वाजो असती पाहात । हे जाणताही केवी एथ । प्रवर्तावे ? ॥241॥
तसेच कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील, हे कळल्यावरही, आम्ही हे संहाराचे काम कसे बरे करावे ? ॥241॥
242-1
ऐसे पार्थु तिये अवसरी । म्हणे देवा अवधारी । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥242॥
त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐका. मी तुम्हाला या पापाचे भयंकर परिणाम सांगतो. ॥242॥
243-1
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥1. 40॥
भावार्थ :-
कुलक्षय झाला, की वंशपरंपरेने चालत आलेले म्हणजे सनातन कुलाचार (कुलधर्म) नाहीसे होऊन जातात. त्यामुळे अधर्म सर्व कुल व्यापून टाकतो. ॥40॥
जैसे कष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणे काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥243॥
ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तेथे अग्नी निर्माण होतो. तो अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. ॥243॥
244-1
तैसा गोत्रींची परस्परे । जरी वधु घडे मत्सरे । तरी तेणे महादोषे घोरे । कुळचि नाशे ॥244॥
त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने(द्वेषाने) परस्पराचा नाश केला, तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावते. ॥244॥
245-1
म्हणौनि येणे पापे । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजी ॥245॥
म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या कुलधर्मचा लोप होतो आणि मग कूळामध्ये अधर्मच वाढत जातो. ॥245॥
246-1
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥1. 41॥
भावार्थ :-
हे कृष्णा ! अधर्म वाढला, म्हणजे कुलस्त्रिया दुराचारी बनतात. हे वृष्णिकुलोत्पन्न कृष्णा ! कुलस्त्रिया बिघडल्या, की वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥41॥
एथ सारासार विचारावे । कवणे काय आचारावे । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥246॥
तेथे सारासार विचार नाहीसा होतो, कोणी कोणते आचरण करावे व कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी लोप पावतात. ॥246॥
247-1
असता दीपु दवडिजे । मग अंधकारी राहाटिजे । तरी उजूचि का अडळिजे । जयापरी ॥247॥
आपल्या जवळ असलेला दिवा विझवून अंधारात चालू लागलो, तर चांगल्या जागीही माणूस अडखळतो. ॥247॥
248-1
तैसा कुळी कुळक्षयो होय । तये वेळी तो आद्यधर्मु जाय । मग आन काही आहे । पापावाचुनी ? ॥248॥
त्याप्रमाणे ज्या वेळी कुलक्षय होतो त्या वेळी कुळात परंपरागत चालत असलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापवाचून दुसरे काय असणार. ? ॥248॥
249-1
जै यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥249॥
ज्या वेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर (व्यवहार करतात) सुटतात म्हणून कुळस्त्रियाकडून व्यभिचार घडतो. ॥249॥
250-1
उत्तम अधमी संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥250॥
उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकात संचार होतो. अशा रीतीने वर्णसंकर निर्माण होतो. त्यामुळे जातीधर्म मुळापासून उखडले जातात. ॥250॥
दिवस १० वा, १० जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १०९ ते १२०
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 109
बाळ बापा म्हणे काका । तरी तो का निपराध परिखा ॥१॥
जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥धृपद॥
साकरेसि म्हणता धोंडा । तरी का तोंडा न रुचे ॥२॥
तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥
अर्थ
लहान मूल अज्ञानामुळे बपाला काका म्हणते, म्हणून बापाचे त्याच्यावरील प्रेम कमी होत नाही. भक्तही असाच प्रेमाने नामस्मरण करतो, नाम त्याने वेडेवाकडे जरी घेतले तरी ते भगवंताला आवडते. खडीसाखर दगड म्हणून जरी तोंडात घातली तरी गोडच लागणार नाही काय ? त्याप्रमाणे देव कोणत्याही भक्ताची इच्छापूर्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिपूर्वक वेडयावाकडया शब्दात केलेले नामस्मरण कधीच वाया जात नाही.
अभंग क्र. 110
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळा ॥१॥
तुज पापचि नाही ऐसे । नाम घेता जवळी वसे ॥धृपद॥
पंच पातकांच्या कोडी । नामे जळता न लगे घडी ॥२॥
केली मागे नको राहो । तुज जमान आम्ही आहो ॥३॥
करी तुजसी करवती । आणिक नामे घेऊ किती ॥४॥
तुका म्हणे काळा । रीघ नाही निघती ज्वाळा ॥५॥
अर्थ
अरे तू आता हरिभक्ती करण्यास सज्ज झाला आहेस तर चल तुला आता सर्व गोष्टींपासून म्हणजे मायिक पदार्थांपासून मोकळे केले आहे, त्यामुळे वेळोवेळा कायमस्वरूपी विठ्ठल असे बोलत जावेस. असे एकही पाप नाही की जे विठ्ठलाचे नाम घेतल्यावर तुझ्याजवळ राहील. पंचक पतकांच्या सारख्या, कोट्यावधी पथकांच्या राशी असतील तरी विठ्ठल नामाने ते जळून जाण्यास एक घटका देखील लागणार नाही. अरे तू मागे कितीही पाप केले असशील तरी त्या विषयी विचार करू नकोस विठ्ठल नामाने तुझे कल्याण होईल याविषयी आम्ही जामीनदार आहोत. अरे तुला यापुढे देखील जेवढी काही पातके करायचे असतील तेवढी कर अनेक पातके आहेत त्यांचे नांव तरी तुला किती सांगू तेवढे देखील पातके कर परंतु वेळोवेळा विठ्ठलाचे नामस्मरण कर तुला ती पातके बाधा करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात अरे हरीच्या नामाग्नी मध्ये इतकी ताकत आहे की तेथे काळाला देखील जागा नाही व पातके तर ते भस्म करून टाकते. (या अभंगाचा तात्पर्य अर्थ पाप करावे असे नाही तर हरीच्या नामाचा महिमा सांगण्याचा खरा तात्पर्य आहे.
अभंग क्र. 111
चित्ती नाही ते जवळी असोनि काय । वत्स सांडी माय तेणे न्याये ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनिया ॥२॥
तुका म्हणे अवघे फिके भावाविण । मीठ नाही अन्न तेणे न्याये ॥३॥
अर्थ
जे मनातच नाही, ते जवळ असूनही उपयोग नाही, गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही अगदी त्या न्यायाने. अंतर्यामि जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ती एकमेकंपासून दूर असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते. तुकाराम महाराज म्हणतात, की अन्न जसे मिठावाचुन बेचव असते, तसे चित्तामधे भक्तीभाव नसेल तर परमार्थ होने कठिण असते.
अभंग क्र. 112
काय काशी करिती गंगा । भीतरि चांगा नाही तो ॥१॥
अधणी कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥धृपद॥
काय टिळे करिती माळा । भाव खळा नाही त्या ॥२॥
तुका म्हणे प्रेमे विण । अवघा शीण बोले भुंके ॥३॥
अर्थ
ज्याचे अंत:करण शुद्ध नाही त्याने काशिक्षेत्र, गंगाजल केले तरी त्याचा काय उपयोग ? एखादा कुचर दाणा पाकात टाकला तरी तो शिजत नाही. ज्याच्या मनामधे भक्तिभाव नाही, त्याने कपाळि गंधटिळा, गळ्यात तुळशिचि माळ घातली तरी त्याचा काय उपयोग ?. तुकाराम महाराज म्हणतात, की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही, त्याचे बोलने कुत्र्याच्या भुकण्यासारखे व्यर्थ आहे.
अभंग क्र. 113
शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥धृपद॥
तुका म्हणे जया चित्ती जे वासना । तयाची भावना तयापरी ॥२॥
अर्थ
वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा स्वत:च्या पत्नीवरहि विश्वास नसतो, तिच्या भावावरहि नसतो, म्हणून तो तिला तिच्या भावाबरोबर माहरी पाठवित नाही. चोरी करणाऱ्याला इतर व्यक्ती चोरच वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनात जसा भाव असेल तसेच त्याला जग दिसते.
अभंग क्र. 114
अनुसरे तो अमर झाला । अंतरला संसारा ॥१॥
न देखती गर्भवास । कधी दास विष्णूचे ॥धृपद॥
विसंभेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥२॥
त्रिभुवनी ज्याची सत्ता । तो रक्षीता जालिया ॥३॥
अर्थ
जो हरी चरणाशी अनुसरून राहतो तो अमर होऊन त्याचे संसारबंधन तुटते. विष्णू दासांना कधी पुनर्जन्म म्हणजे गर्भवास नसते. ज्या प्रमणे माता बाळाला विसंबत नाही त्याप्रमाणे देव भक्तांचे लाड पुरवतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे असा भगवंत त्याच्या भक्तांचे रक्षण करतो.
अभंग क्र. 115
आता केशीराजा हेचि विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
देह असो माझा भलतिये ठायी । चित्त तुझ्या पायी असो द्यावे ॥धृपद॥
काळाचे खंडण घडावे चिंतन । तनमनधन विन्मुखता ॥२॥
कफवातपित्त देहअवसानी । ठेवावी वारूनि दुरिते ही ॥३॥
सावध तो माझी इंद्रिये सकळ । दिली एका वेळे हाक आधी ॥४॥
तुका म्हणे तू या सकळांचा जनिता । येथे ऐक्यता सकळांसी ॥५॥
अर्थ
हे केशीराजा तुझ्या चरणी मस्तक ठेऊन मी अशी विनंती करीत आहे की, माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्त फक्त तुझ्या चरणी असू द्यावे. तन मन धन या बाबतीत माझे मन विन्मुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा. कफ वात व पित्त हे माझ्या देहात असून अंतःकाळी तुम्ही ते निवारण करावे. जो पर्यंत माझी इंद्रिये सावध आहे तो पर्यंतच एक वेळा तुम्ही मला हाक मारा. तुकाराम महाराज म्हणतात देवा सकळांचा जनिता निर्माता तुच आहे आणि सगळे तुझ्यातच ऐक्य पावणार आहे.
अभंग क्र. 116
चित्त ते चिंतन कल्पनेची धाव । जे जे वाढे हाव इंद्रियांची ॥१॥
हात पाव दिसे शरीर चालता । नावे भेद सत्ता जीवाची ते ॥धृपद॥
रवीचिये अंगी प्रकाशक सकळा । वचने निराळा भेद दिला ॥२॥
तुका म्हणे माप वचनाच्या अंगी । सौख्य काय रंगी निवडावे ॥३॥
अर्थ
इंद्रियांचे जेणे हाव वाढते ते म्हणजे कल्पना करून चिंतन करते तेच चित्त आहे. हात पाय शरीर हे चालताना दिसते देवाण घेवाण करताना दिसते पण जीवाची त्या ठिकाणी सत्ता असते. सूर्या पासून सर्वाना प्रकाश मिळतो पण सूर्य आणि किरण असे उच्चार होते. तुकाराम महाराज म्हणतात कि, शब्द निर्माण होते व अस्तित्वाला काल्पनिक मर्यादा व माप पडते पण जर मौन धरले तर त्या मधील भेद कसे निवडणार.
अभंग क्र. 117
बोलोनिया काय दावू । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥
हेचि आता माझी सेवा । चिंतन देवा करितो ॥धृपद॥
विरक्तासी देह तुच्छ । नाही आस देहाची ॥२॥
तुका म्हणे पायापाशी । येईन ऐसी वासना ॥३॥
अर्थ
देवा मी तुम्हाला काय बोलून दाखवू ? तुम्हीच सर्व जगाचे जीवन आहात. तुमची सेवा म्हणजे तुमचे चिंतन आहे देवा. महाराज म्हणतात विरक्त देहाला देह तुच्छ वाटतो त्याला देहाची आसक्ती नसते. तुकाराम महाराज म्हणतात माझी अशी वासना आहे कि मी तुमच्या पाया पाशी येईन.
अभंग क्र. 118
धाकुटयाच्या मुखी घास घाली माता । वरी करी सत्ता शाहाणिया ॥१॥
ऐसे जाणपणे पडिले अंतर । वाढे तो तो थोर अंतराय ॥धृपद॥
दोन्ही उभयता आपणचि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळे । निवडिले बळे रडते स्तनी ॥३॥
अर्थ
आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरवते, तर मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते. मुलाचे जाणतेपण वाढु लागले की त्याची समज पाहुन आई त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करते. दोन्ही मुलांना तिनेच जन्म दिलेला असतो; पण दोन्ही मुलांच्या प्रेमात मात्र फरक पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई राडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते.
अभंग क्र. 119
उपदेश तो भलत्या हाती । झाला चित्ती धरावा ॥१॥
नये जाऊ पात्रावरी । कवटी सारी नारळे ॥धृपद॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
अर्थ
उपदेश करणारी व्यक्ति ही कोण आहे ते न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवा. जसे नाराळाच्या कारवंटीच्या आतिल मधुर चविचे पाणी व खोबरे खाऊन करवंटि टाकून देतो, त्याप्रमाणेच पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्ती मार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा. तुकाराम महाराज म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंधिमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ती सामान्य जरी असली तरी श्रेष्ट मानावा.
अभंग क्र. 120
देवाचे म्हणोनि देवी अनादर । हे मोठे आश्चर्य वाटतसे ॥१॥
आता येरा जना म्हणावे ते काई । जया भार डोई संसाराचा ॥धृपद॥
त्यजुनी संसार अभिमान सांडा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥२॥
तुका म्हणे अळस करूनिया साहे । बळे कैसे पाहे वाया जातो ॥३॥
अर्थ
देवाच्या भक्तीचे ढोंग करणार्या मानसांण बद्दल मला आचार्य वाटते. अशा ढोंगी भक्तांची अवस्ता तर प्रापंचिक मनुष्याला परमार्थासाठी सवडच मिळत नाही. परमार्थासाठी संसाराचा त्याग करुन, त्यांच्या मनात अहंकार जातच नाही उलट वाढताच होतो. तुकाराम महाराज म्हणतात, की जगात असे काही लोक आहेत, की प्रमार्थही व्यवस्तीत करत नाहीत, ते फक्त आळसात वेळ वाया घालवतात असे मणुष्य आळसामुळे बळेच कसे वाया जातात ते पहा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















