आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

११ जानेवारी, दिवस ११, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी २५१ ते २७५, सार्थ तुकाराम गाथा अभंग १२१ ते १३२
“११ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 11 January
॥ एकूण भग्वद्गीतगीता श्लोक :- 47॥
॥ एकूण ज्ञानेश्वरी ओव्या :- 275॥
राम कृष्ण हरी आज दिनांक 1 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
251-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळी । तैसी महापापे कुळी । संचरती ॥251॥
ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापे (अशा) कुळात सर्व बाजूनी प्रवेश करतात. ॥251॥
252-1
सङ्करो नरकायैव कुलघ्नाना कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥1. 42॥
भावार्थ :-
वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना आणि सर्व कुळाला नरकात टाकण्यास कारण होतो; कारण पिंडदान आणि तर्पणादि इत्यादी क्रियांचा लोप(लुप्त) झाल्यामुळे त्यांचे पितरसुद्धा पतन पावतात ॥42॥
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातका । येरयेरा नरका । जाणे आथी ॥252॥
मग त्या (वर्णसंकर) संपूर्ण कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या अशा दोघांनाही नरकात जावे लागते. ॥252॥
253-1
देखे वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥253॥
पाहा या प्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते; आणि स्वर्गात असलेले पूर्वज सहजच पतन पावतात. ॥253॥
254-1
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे । तेथ कवणा तिळोदके । कवण अर्पी ? ॥254॥
ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कार्य (कृत्यें) बंद पडतात, विशेष प्रकारची करावयाची कर्मेही बंद पडतात. अशा परिस्थितीत पितरांना कोण बरे तिलोदक देणार ? ॥254॥
255
तरी पितर काय करिती ? । कैसेनि स्वर्गी वसती ? । म्हणौनि तेही येती । कुळापासी ॥255॥
असे झाल्यावर पितर तरी काय करणार ? ते स्वर्गात कसे राहणार ? म्हणून ते देखील नरकात पडलेल्या आपल्या (भ्रष्ट) कूळाजवळ येतात. ॥255॥
256-1
जैसा नखाग्री व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगे । तेवी आब्रह्म कुळ अवघे । आप्लविजे ॥256॥
ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष ताबडतोब (हा हा म्हणता) शेंडीपर्यंत सर्वत्र पसरते, त्याप्रमाणे एका कुळात पाप घडले, तर (ब्रम्हदेवापासूनचे पुढील सर्व) ते मूळ पुरुषापर्यंत सर्वास पापात बुडविते. ॥256॥
257-1
दोषैरेतैः कुलघ्नाना वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥1. 43॥
उत्सन्नकुलधर्माणा मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥1. 44॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥1. 45॥
भावार्थ :-
कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर करणाऱ्या दोषांनी शाश्वत अशा जातीधर्माचा आणि कुलधर्मचा नाश होतो. ॥43॥
हे जनार्दना ! ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहे त्यांना निश्चितच नरकवास भोगावा लागतो, असे आम्ही ऐकले आहे. ॥44॥
अहो, ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास तयार (उदुक्त) झालो आहोत (त्या अर्थी खरोखरच) मोठे पाप करण्यास सिद्ध (तयार) झालो आहोत. ॥45॥
देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषे हा लौकिक । भ्रंशु पावे ॥257॥
हे देवा ! आणखीन एक गोष्ट ऎक, या वर्णसंकरामुळे आणखी एक महापातक घडते ते असे की, पतितांच्या संसर्गदोषाने इतर लोकांचे आचार-विचार भ्रष्ट होतात. ॥257॥
258-1
जैसा घरी आपुला । वानिवसे अग्नि लागला । तो आणिकाही प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥258॥
ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नि लागला (आग लागली) म्हणजे तो भडकलेला अग्नि दुसऱ्या घरांनाही जाळून भस्म करते. ॥258॥
259-1
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्ते येणे ॥259॥
त्याप्रमाणे दुष्ट कुळाचा (संसर्गाने) संगतीमध्ये राहून जे जे लोक आपली कर्मे करतात, ते देखील त्या संसर्गदोषाने दूषित होऊन जातात. ॥259॥
260-1
तैसे नाना दोषे सकळ । अर्जुन म्हणे ते कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥260॥
अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषामुंळे मग त्या सर्व कुळाला भयंकर अशा नरकयातना भोगावे लागतात. ॥260॥
261-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पडिलिया तिये ठायी । मग कल्पांतीही उकलु नाही । येसणे पतन कुळक्षयी । अर्जुन म्हणे ॥261॥
अर्जुन पुढे म्हणाला, एकदा त्या नरकयातना भोगाव्या लागल्यानंतर (त्या ठिकाणी पडल्यानंतर) कल्पांतदेखील त्यांची सुटका होत नाही. इतके या कलक्षयापासून पतन होते. ॥261॥
262-1
देवा हे विविध कानी ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचे हे काय कीजे । अवधारी पा ॥262॥
हे देवा ! नानाप्रकारची बोलणी कानांने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला काही त्रास (शिसारी येत) होत नाही. तू आपले हृदय वज्रसारखे कठोर केले आहेस काय ? ॥262॥
263-1
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागी ते तव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ? ॥263॥
ज्या शरीरकरिता राज्यसुखाची इच्छा करायची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे, असे कळत असतांनाही, अशा या घडणाऱ्या महापातकाचा त्याग करू नये काय ? ॥263॥
264-1
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पा काय थेंकुले । घडले आम्हा ? ॥264॥
हे जे समोर सर्व वाड-वडील जमले आहेत, त्यांचा वध करावा, या दृष्टीने त्यांच्या कडे पहिले, तरीसुद्धा थोडे पाप घडले काय ? हे तूच सांगावे. ॥264॥
265-1
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥1. 46॥
भावार्थ :-
जर हातात शस्त्रे धारण करणारे कौरव प्रतिकार न करणाऱ्या आणि निःशत्र अशा मला, रणांगणावर ठार मारतील, तर माझे अधिक कल्याण होईल. ॥46॥
आता यावरी जे जियावे । तयापासूनि हे बरवे । जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥265॥
असे करून जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून कौरवाचे वार सहन करावेत, हे उत्तम ! ॥265॥
266-1
तयावरी होय जितुके । ते मरणही वरी निके । परी येणे कल्मषे । चाड नाही ॥266॥
असे केल्याने जितके दुःख भोगावे लागले तितके सहन करावे इतकेच काय; शेवटी मृत्यू जरी प्राप्त झाला, तरी (तथापि) तो अधिक चांगला; परंतु यांचे (तिथे जमलेल्या आप्तजनांचे) वध करून पातक करण्याची माझी इच्छा नाही. ॥266॥
267-1
ऐसे देखून सकळ । अर्जुने आपुले कुळ । मग म्हणे राज्य ते केवळ । निरयभोगु ॥267॥
याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हंटले की, यांचा नाश करून मिळविलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥267॥
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥1. 47॥
भावार्थ :-
संजय म्हणाला, ” रणांगणावर याप्रमाणे बोलून शोकाकुल चित्ताने धनुष्य व बाण टाकून देऊन अर्जुन रथाखाली उडी टाकून रथामागच्या भागाजवळ बसला. ॥47॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः ॥1॥
268-1
ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरी । संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्राते ॥268॥
संजय म्हणाला, हे धृतराष्टरा ! इकडे लक्ष दे. याप्रमाणे रणांगणावर उभा असलेला अर्जुन असे बोलला. ॥268॥
269-1
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला । तेथ उडी घातली खाला । रथौनिया ॥269॥
मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहिवर आवरता आला नाही; मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥269 ! !
270-1
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । का रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥270॥
ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व दृष्टीने (प्रकारांनी) निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो; ॥270॥
271-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
नातरी महासिद्धिसंभ्रमे । जिंतिला तापसु भ्रमे । मग आकळूनि कामे । दीनु कीजे ॥271॥
अथवा, महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलून जातो (भुलतो) आणि मग तप सोडून कामनेच्या तडाक्यात सापडून दीन होतो. ॥271॥
272-1
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखे जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणे ॥272॥
त्याप्रमाणे अर्जुनाने जेंव्हा रथाचा त्याग केला, तेंव्हा तो धनुर्धारी अर्जुन दुःखाने फार पीडलेला (व्याप्त झालेला) दिसला. ॥272॥
273-1
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसे ऐक राया वर्तले । संजयो म्हणे ॥273॥
संजय म्हणाला, हे राजा (धृतराष्टरास) ! ऎक. तेथे (रणांगणावर) अशी गोष्ट घडली की, अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले त्याला रडू आवरेनासे झाले. (म्हणजेच त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या) ॥273॥
274-1
आता यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥274॥
आता यावर (पुढे) तो वैकुंठपती श्रीकृष्ण अर्जुनाला खिन्न, (दुःखी) झालेले पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करतील, ॥274॥
275-1
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकता । ज्ञानदेव म्हणे आता । निवृत्तिदासु ॥275॥
ती आता पुढे येणारी सविस्तर कथा श्रवण करण्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. ॥275॥
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां – अर्जुनविषादयोगोनाम् प्रथमोऽध्यायः ॥1॥
॥ एकूण भग्वद्गीतगीता श्लोक :- 47॥
॥ एकूण ज्ञानेश्वरी ओव्या :- 275॥
-: सार्थ श्रीज्ञानेश्वरी: : :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
Sartha Dnyaneshwari 1 Adhyay Arujvishadyog End
दिवस ११ वा, ११ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १२१ ते १३२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 121
संतांचे गुण दोष आणिता या मना ।
केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ ।
चिरोनि केळी केळ गाढव तो ॥धृपद॥
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ ।
लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
अर्थ
संतसज्जनांचे बाह्यात्कारि वर्तन पाहुन एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याई नष्ट होते. जसे एखादा मनुष्य फुलाचा सुगंध हुंगन्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि केळयांचा घड पाहण्यासाठी केळीचे झाड मोडतो. तुकाराम महाराज म्हणतात, गंगा आणि अग्नी यांना जो विटाळ मानतो, तो चंडाळ समजावा.
अभंग क्र. 122
चुंबळीशी करी चुंबळीचा संग ।
अंगी वसे रंग क्रियाहीन ॥१॥
बीजा ऐसे फळ दावी परिपाकी ।
परिमळ लौकिकी जाती ऐसा ॥धृपद॥
माकडाच्या गळा रत्न कुळांगना ।
सांडूनिया सुना विधी धुंडी ॥२॥
तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी ।
फजिती ते व्हावी आहे पुढे ॥३॥
अर्थ
हीन वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तिला हीन लोकांची संगती आवडते. जसे बीज तसे फळ मिळते, त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असेलत्याचा सुगंध त्रिलोकात पसरतो. जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किम्मत नसते तसेच सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येचे घर शोधतो. तुकाराम महाराज म्हणतात अश्या मनुष्याला जन्म देणारी माता गाढवी आहे, त्याची पुढे फजीती होण्यासाठीच तिने त्याला जन्माला घातले आहे.
अभंग क्र. 123
सापडला संदी । मग बळिया पडे बंदी ॥१॥
ऐसी कोणी वाहे वेळ । हाती काळाच्या सकळ ॥धृपद॥
दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥
तुका म्हणे नेणा । काय सांगो नारायणा ॥३॥
अर्थ
एखादा सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो. त्या वेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही. एखादी दानशूर व्यक्ती सुद्धा वेळ आल्यावर भीक मागु लागते. तुकाराम महाराज म्हणतात, ही काळाची गति त्या नारायणाला काय सांगावे ? त्यानेच ती निर्माण केली आहे.
अभंग क्र. 124
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यासि कवळ । तेणे मळले उजळ ॥धृपद॥
अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥
तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥
अर्थ
पूर्वजांनी पुरावुन ठेवलेले गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या हाती आल्यावर त्यामध्ये त्याला सर्प, विंचु, कोळसे दिसतात. जसे काविळ झालेल्या मनुष्याला सर्व वास्तु या पिवळ्याच दिसतात. आपल्याच शरीरा भोवती गोल-गोल फिरल्यास भोवतालचि झाडे, दागडधोंडेही गोल फिरताना आढळतात व् घेरी येते. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या आडवे येते.
अभंग क्र. 125
न देखोनि काही । म्या पाहिले सकळ ही ॥१॥
झालो अवघियांपरी । मी हे माझे ठेले दुरी ॥धृपद॥
न घेता घेतले । हाते पाये उसंतिले ॥२॥
खादले न खाता । रसना रस झाली घेता ॥३॥
न बोलोनि बोले । केले प्रगट झाकिले ॥४॥
नाइकिले कानी । तुका म्हणे आले मनी ॥५॥
अर्थ
काही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे. कारण मी माझा देहभान, देहबुध्दी विसरलो आणि विश्वतत्त्वाशी एकरूप झालो आहे. म्हणून मी विश्वातील सर्व वास्तु पाहू शकलो व् स्थुल देहाच्या हात व पायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरुपात मिळाले आहे. काही न खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे. कुणाशी न बोलता सर्वाशि बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कानांनी जे एकता नाही आले ते सर्व आइकले आहे. ही आत्मस्वरूपाची ओळख आहे.
अभंग क्र. 126
शरणागत झालो । तेणे मीपणा मुकलो ॥१॥
आता दिल्याचीच वाट । पाहो नाही खटपट ॥धृपद॥
नलगे उचित । काही पाहावे संचित ॥२॥
तुका म्हणे सेवा । माने तैसी करू देवा ॥३॥
अर्थ
हे देवा आहो मी तुम्हला पूर्ण पणे सर्व भावे शरणागत झालो आहे त्यामुळे मी माझ्या मीपणाला मुकलो आहे. आता तुम्ही मला जे काही दिले आहे त्याची वाट पाहणे व दुसरी कोणतीही खटपट न करणे. माझ्या संचिता प्रमाणे काय होईल ते होईल यात उचीत काय ते पाहण्याची जरुरी नाही. तुकाराम महाराज म्हणतात जशी तुला मान्य होईल तशीच सेवा मी आता करेल.
अभंग क्र. 127
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकले ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाही ॥धृपद॥
अवघा झाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरीदासांच्या पडती पाया । म्हणती तया नागवावे ॥३॥
दोही ठायी फजीत झाले । पारणे केले अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जेणे ॥५॥
अर्थ
एक कर्मठ ब्रम्हच्याऱ्याच्या बगलेत हरणाचे कातडे होते. वाटेत अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला. तो ब्रम्हचारी, अश्या फजितखोरांना मुळात लाज लज्याच नाही वा त्याची तूम्ही काही तरी दाद करा त्याची चांगली फजीती करा. तो ब्रम्हचारी म्हणु लागला की, देहु मध्ये सर्व जण मुखाव्दारे रामराम असेच म्हणतात कुणीही कर्माचरण आचरित नाही. तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात, त्यांना नागवावे. दोन्ही ठिकाणी(संसार व परमार्थ) फजीती झाल्यामुळे त्यांना अवकाळा प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या ब्रम्हचारी लोकांनी ब्रम्हचारी वेषाची वीटंबना केली आहे आणि स्वत:चा नाश करून घेतला आहे.
अभंग क्र. 128
कुटुंबाचा केला त्याग । नाही राग जव गेला ॥१॥
भजन ते वोंगळवाणे । नरका जाणे चुके ना ॥धृपद॥
अक्षराची केली आटी । जरी पोटी संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागे पाय । तया जाय स्थळासि ॥३॥
अर्थ
जोवर मनातून विषयकसक्ती दूर झाली नाही, तो पर्यंत स्त्री-पुत्र यांचा प्रपंच्याचा त्याग केला तरी काही अर्थ नाही. दुराचारी माणसाने केलेले भजन पाप युक्त असल्यामुळे वाईटच होय. त्यामुळे तो नरकवासच भोगणार, ते चुकणार नाही. अंत:करणात जर संतांची निंदा करण्याचा कितीही खटाटोप केली तरी ते व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या माणसांची प्रगति होणार नाही. त्याचे पाय नाराकात ओढले जातील.
अभंग क्र. 129
तारतिम वरी तोंडाच पुरते ।
अंतरा हे येते अंतरीचे ॥१॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी ।
दिसते लौकिकी सत्य ऐसे ॥धृपद॥
भोजनात द्यावे विष कालवूनि ।
मोहचाळवणी मारावया ॥२॥
तुका म्हणे मैंद देखो नेदी कुडे ।
आदराचे पुढे सोंग दावी ॥३॥
अर्थ
कपटी माणूस तोंडावर तारतंम्याने गोड बोलतो. त्याच्या अतःकरणातील भाव मला समजत आहे. लोकांमध्ये तुझो वागणे खरे आहे असे दिसून येते पण अशी फसवेगिरि बरी दिसती काय ? भोजनात विष कालवावे तसे तुझे गोड-गोड बोलने आहे. मनात मात्र मारण्याचा मोह आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कपटी माणसाच्या अतःकरणातील कपट दिसून येत नाही वरवर आदराचे सोंग दाखवित असतो.
अभंग क्र. 130
ब्रम्हनिष्ठ काडी । जरी जीवानावे मोडी ॥१॥
तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥धृपद॥
सांगितले कानी । रूप आपुले वाखाणी ॥२॥
भूताच्या मत्सरे । ब्रम्हज्ञान नेले चोरे ॥३॥
शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटी ॥४॥
निंदास्तुति स्तवनी । तुका म्हणे वेची वाणी ॥५॥
अर्थ
स्वता:ला जो ब्रम्हनिष्ठ म्हणवून घेतो त्याने प्राणिमात्रांच्या नावे हिरव्या गवताची काडी जरी मोडली तरी त्याला गुरु हत्येचे पातक लागते. गुरुने केलेला उपदेश खोटा ठरतो. गुरुने त्याच्या कानात ज्या ब्रम्हज्ञानाचा उपदेश केलेला असतो, त्या ब्रम्हरूपाची तो लोकांजवळ वाच्यता करतो. स्वतःला ब्रम्हज्ञानी महानवुन घेतो आणि भुत मात्रांचा द्वेष करतो. अश्या माणसांचे ब्रम्हज्ञान चोर पळवून नेतात. शिकलेल्या गोष्टी तो लोकांना सांगतो, पण भेदामुळे, क्रोध त्याच्या मनात वाहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची वाणी नेहमी लोकनिंदा, स्तुति-स्तवने यातच आपला वेळ व शक्ती तो खर्च करतो.
अभंग क्र. 131
इहलोकीचा हा देह । देव इच्छिताती पाहे ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ॥धृपद॥
आयुष्याच्या या साधने । सच्चिदानंद पदवी घेणे ॥२॥
तुका म्हणे पावठणी । करू स्वर्गाची निशाणी ॥३॥
अर्थ
पृथ्वीतलावर नरदेह धारण करण्यास स्वर्गातील देवहि उत्सुक आहेत. आम्ही मात्र नरदेहाच्या प्राप्तिने धन्य झालो आणि कारण आम्ही विठोबाचे दास झालो. या नरदेहच्या प्राप्तिने भक्ती करावी व भक्तिमार्गातील सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात, या नरदेहप्राप्तीने जीवनाचे सार्थक करून आम्ही स्वर्गात जागा मिळवू.
अभंग क्र. 132
पंडित वाचक जरी जाला पुरता ।
तरी कृष्णकथा ऐके भावे ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी ।
तैसी पडे मिठी गोडपणे ॥धृपद॥
जाणोनिया लाभ घेई हा पदरी ।
गोड गोडावरी सेवी बापा ॥२॥
जाणिवेचे मूळ उपडोनी खोड ।
जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार ।
अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार ।
तैसी गोडी हरीकथेविण ॥५॥
ज्याकारणे वेदश्रुति ही पुराणे ।
तेचि विठ्ठलनाणे तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाची पेवे ।
खळखळिचे अवघे मूळ तेथे ॥७॥
अर्थ
तू जगात पंडित अथवा प्रवचन कार झाला असलास तरी कृष्णकथा भक्तीभावाने ऐक. दूध, तूप आणि साखर यांच्या मिश्रण गोड होते प्रमाणे पंडित आणि श्रीकृष्ण कथा असेल तर कथा अधिक मधुर आहे. तुझ्या विद्वत्तेत कृष्णकथा मिसळून ती अधिक मधुर बनेल. तुला जर आपले हित साधायचे असेल तर जाणिवेच्या अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करुण टाक. देहाच्या शृंगारासाठी सुगंधियुक्त चंदनऊटी उपयुक्त आहे. पण पोट भरले नसेल तर देहशृंगाराचा काही उपयोग नाही, तसे हरिकथेवाचुन विद्वत्ता काहीच कामाची नाही. ज्या प्रमाणे वेद, श्रुती, पुराणे यामध्ये विठ्ठलरूपाची संपत्ती समावली आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तसे हरिकथेवाचून पाडित्य म्हणजे फक्त दगडांचे पेव आहे, ते उपसने म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















