६ जानेवारी, दिवस ६, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ६१ ते ७२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“६ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 January

राम कृष्ण हरी आज दिनांक 6 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

126-1
तो गाजत असे अद्‍भुतु । दोन्ही सैन्याआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥1-126॥
तो प्रचंड नाद दोन्ही सैन्यात दुमदुमून गेला. त्या नादाचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना; आणि आकाशातून पुनः पुन्हा नवीन नाद निर्माण होऊ लागले. ॥126॥
127-1
तयाचि तुलगासवे । वीरवृत्तीचेनि थावे । दिव्य शंख भीष्मदेवे । आस्फुरिला ॥1-127॥
भीष्माचार्यानी आपल्या वीर वृत्तीप्रमाणे त्या पहिल्या नादाबरोबर आपला दिव्य शंख वाजविला. ॥127॥
128-1
ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले । जैसे आकाश का पडिले । तुटोनिया ॥1-128॥
ते दोन्ही महानाद एकत्र झाले, त्या वेळी त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्या वेळी आता जणू काय आकाश तुटून पडते की काय, असे वाटू लागले. ॥128॥
129-1
घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभले चराचर । कांपत असे ॥1-129॥
त्या प्रचंड नादामुळे आकाश भीतीने थडथडू लागले, समुद्रातील लाटा उसळल्या; आणि सर्व चराचर भीतीने कापू लागले. ॥129॥
130-1
तेणे महाघोषगजरे । दुमदुमिताती गिरिकंदरे । तव दळामाजी रणतुरे । आस्फुरिली ॥1-130॥
त्या प्रचंड नादाने डोंगर-दऱ्यातून प्रतिध्वनी निर्माण होऊ लागले. त्याच वेळी सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. ॥130॥


131-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥1. 13॥

भावार्थ :-
त्यानंतर इतर शूरवीरांनी शंख, नगारे, ढोल, मृदूंग, गोमुख ही रणवाद्ये एकदम वाजवली. त्यांचा अतिशय भयानक असा नाद उत्पन्न झाला. ॥13॥
उदंड सैंघ वाजते । भयानखे खाखाते । महाप्रळयो जेथे । धाकडांसी ॥1-131॥
जिकडे तिकडे रणवाद्ये कर्कश व भयानक स्वरूपात वाजू लागली. बलशाही लोकांना देखील तो महाप्रलय वाटला. ॥131॥
132-1
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥1-132॥
नौबती, डंके, ढोल, शंख, मोठं-मोठया झान्जा, कर्णे इत्यादी रणवाद्यांचा गजर सुरु झाला; आणि त्यात वीरांच्या भयानक रनगर्जना मिसळून गेल्या. ॥132॥
133-1
आवेशे भुजा त्राहाटिती । विसणेले हाका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥1-133॥
कोणी युद्धातील विरश्रीच्या आवेशाने दंड ठोकू लागले आणि अतिशय त्वेषाने युद्धासाठी एकमेकांना हाका मारू लागले. त्यामुळे हत्तीदेखील बेफाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले. ॥133॥
134-1
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणे दचकला कृतांतु । आंग नेघे ॥1-134॥
तेथील भित्रा माणसाचे तर काय सांगावे ? ते कस्पटासारखे दूर गेले. यमालादेखील दहशत बसली आणि तो इकडे पाहण्यास तयार होईना. ॥134॥
135-1
एका उभयाचि प्राण गेले । चांगांचे दात बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥1-135॥
कित्येकांचे तिथेच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दातखिळी बसली. जे नामवंत वीर होते, ते थरथर कापू लागले. ॥135॥


136-1
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥1-136॥
अशा प्रकारचा महाभयंकर वाद्यनाद ऐकून ब्राम्हदेवदेखील व्याकुळ झाले. आपला प्रलयकाळ जवळ आला आहे, असे देव म्हणू लागले. ॥136॥
137-1
ततः श्वेतैहयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥1. 14॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥1. 15॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥1. 16॥

भावार्थ :-
त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम मोठ्या रथात बसलेले ” भगवान श्रीकृष्ण ” आणि ” अर्जुन ” यांनी दिव्य शंख वाजविले. ॥14॥
ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तव पांडवदळाआंतु । वर्तले कायी ॥1-137॥
तो आकांत पाहून स्वर्गलोकामध्ये प्रलयकालाची साशंकता निर्माण झाली. त्या वेळी इकडे पांडवसैन्यामध्ये काय घडले, ते श्रवण करा. ॥137॥
138-1
हो का निजसार विजयाचे । की ते भांडार महातेजाचे । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥1-138॥
जे का विजयाचे केवळ सार, महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील, असे चार घोडे जुंपले असून, ॥138॥
139-1
की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजे कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥1-139॥
पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा, त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत, असा तो अतिवेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता. ॥139॥
140-1
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णू ॥1-140॥
अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा (अधिपती) भगवान श्रीकृष्ण घोडे हाकीत होता, त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत ? ॥140॥


141-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु । सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसी ॥1-141॥
त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्येक्ष शंकराचा अवतार मारुती होता. अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. ॥141॥
142-1
देखा नवल तया प्रभूचे । अद्‍भुत प्रेम भक्ताचे । जे सारथ्यपण पार्थाचे । करितु असे ॥1-142॥
त्या विश्वचालक प्रभूंचे नवल पाहा. प्रभूच्या मनात भक्तांविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे; म्हणून तो विश्वनियंता असूनदेखील अर्जुनाचे सारथ्य करत होता. ॥142॥
143-1
पाइकु पाठीसी घातला । आपण पुढा राहिला । तेणे पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥1-143॥
त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला. ॥143॥
144-1
परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु । जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांते ॥1-144॥
ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला की नक्षत्रे लोप पावतात, त्याप्रमाणे शंखांचा ध्वनी सर्वत्र घुमत राहिला. ॥144॥
145-1
तैसे तुरबंबाळु भंवते । कौरवदळी गाजत होते । ते हारपोनि नेणो केउते । गेले तेथ ॥1-145॥
त्यामुळे कौरवांचा सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते, ते कोठे नाहीसे झाले, ते कळाले नाही. ॥145॥


146-1
तैसाचि देखे येरे । निनादे अति गहिरे । देवदत्त धनुर्धरे । आस्फुरिला ॥1-146॥
त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला. ॥146॥
147-1
ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हो पाहत असे ॥1-147॥
ह्या दोन शंखांचा अद्भुत नाद जेंव्हा एकत्र झाला, त्या वेळी ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होतात की काय, असे सर्वाना वाटू लागले. ॥147॥
148-1
तव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणे पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥1-148॥
त्यावेळी भीमाला आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला. त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. ॥148॥
149-1
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु । तव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥1-149॥
त्या शंखांचा ध्वनी प्रलयकालचा मेघ गर्जावा, त्याप्रमाणे अतिगंभीर पणाने सर्वत्र पसरला. इतक्यात धर्मराजने ‘अनंतविजय’ नावाचा शंख वाजविला. ॥149॥
150-1
नकुळे सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु । जेणे नादे अंतकु । गजबजला ठाके ॥1-150॥
नकुलाने ‘सुघोष’ आणि सहदेवाने ‘मणीपुष्पक’ शंख वाजविला. त्या महाभयंकर नादाने यमदेखील गोंधळून आश्चर्यचकित झाला. ॥150॥


दिवस ५ रा, ५ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ६१ ते ७२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. ६१
मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळी ॥१॥
आधी घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम ॥धृपद॥
नाही तरी यम । दात खातो करकरा ॥२॥
धन मेळविले कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥
तववरी तुमचे बळ । जव आला नाही काळ ॥५॥
तुका म्हणे बापा । चुकवी चौर्‍याशीच्या खेपा ॥६॥
अर्थ

महाबलवान मित्र जोडलेस तरि ते अंत:काळी उपयोगी पडत नाही. तेव्हा मृत्यु येण्याआधी रामनाम संपत्ति तू जमवुन ठेव. रामनामाचि संपत्ति नसेल तर यम (काळ) कराकरा दात खाईल. धन-संपत्ति कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे. तुझ्याजवळ सैन्य, परिवार, नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाहीत. जो पर्यन्त काळाचा आघात होणार नाही तो पर्यंत तुझी शक्ती कामे करील. तुकाराम महाराज म्हणतात, अहोबापानो चौर्‍यांशीचा फेरा चुकविण्यासाठी, तुला राम नामाचे साधन जमविले पाहिजे.
अभंग क्र. ६२
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥१॥
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ॥धृपद॥
नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे ॥२॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥३॥
अर्थ

जीवनात सुख हे फार थोडे असते, दुःख मात्र पर्वतायेवढे असते. ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन, संत सहवास आवश्यक असतो. मानवाच्या आयुष्याचि अर्धी वर्ष रात्री झोपण्यात जातात, बाकीचे बालपन, म्हतारपणात, आजारपणात जातात. तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म-मृत्युच्या घाण्यामध्ये तू बैलासरखा फिरत राहशील
अभंग क्र. ६३
कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥१॥
तैसे मज नको करू कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥धृपद॥
तिने पाचारिले इल बा म्हणोन । येरु पळे आण झाली आता ॥२॥
तुका म्हणे येर येरा जे विच्छिन्न । तेथे वाढे सीण सुखा पोटी ॥३॥
अर्थ

एका कानडी भाषा बोलणार्‍या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला, त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याणे विपर्‍यास निर्माण होत असे. तशी माझी स्थीति हे कमलापती, तू करू नकोस, मला संतसहवास घडू दे. त्या कानडी स्त्रीने त्याला ‘इल बा ” (इकडे या) म्हंटले. त्याने बा ” म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात अशी परिस्थीती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते.
अभंग क्र. ६४
बोलायाचा त्यासी । नको संबंध मानसी ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥धृपद॥
जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ॥२॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
अर्थ

जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये. हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात. अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव.
अभंग क्र. ६५
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसेचि खळ ॥१॥
का रे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ॥धृपद॥
मान दंभ पोटासाठी । केली अक्षरांची आटी ॥२॥
तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥
वाटिले ते धन । केली अहंता जतन ॥४॥
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ॥५॥
अर्थ

हे साधका, समाज्यात कर्मकांडाला महत्त्व देणारे तीळ, तांदूळ यज्ञ करुण तू होमामधे जाळतोस, पण स्वत:च्या स्वभावातील काम-क्रोधादी शत्रु मात्र तू तसेच ठेवतोस. यज्त्रयागादि कर्मकांडामध्ये व्यर्थ का स्त:ला शिणुन घेतोस, त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करात नाहीस ?. समाजात मानसन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठण, विद्याअध्यायन करण्याचे कृत्य तू करतोस. तीर्थाटन करुण स्वत:विषयी अभिमान वाढविलास. दानधर्म करुण आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करुण, अहंकार बाळगलास. तुकाराम महाराज म्हणतात, की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे.
अभंग क्र. ६६
संसारच्यातापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥धृपद॥
बहुता जन्मींचा झालो भारवाही । सुटिजे हे नाही वर्म ठावे ॥२॥
वेढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥३॥
बहु पागविलो बहु नागविलो । बहु दिस झालो कासाविस ॥४॥
तुका म्हणे आता धाव घाली वेगी । ब्रीद तुझे जगी दीनानाथा ॥५॥
अर्थ

कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रपंचिक त्रासाने त्रासुन गेलो आहे. म्हणून मी तुझे चिंतन करत आहे, हे पांडुरंगा, मला भेटायला ये. अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, यातून सुटण्याचा उपाय माला सापडत नाही. कामक्रोधादिक षडरीपुंनी मला चहुबाजूंनी वेढले आहे, माझी दया कुणालाच येत नाही. त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे, सर्वानी मला लुटले आहे, माझी तळमळ होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे दिनानाथ, आता तूच माझा तारणहार आहेस, अनाथांचा तू नाथ आहेस, अशी जगी तुझी ख्याति आहे, तेव्हा तूच अता माझे रक्षण कर.
अभंग क्र. ६७
भक्तॠणी देव बोलती पुराणे । निर्धार वचने साच करी ॥१॥
मागे काय जाणो अइकिली वार्ता । कबिर साते जाता घडया वाटी ॥धृपद॥
माघारिया धन आणिले घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणे ॥२॥
नामदेवाचिया घरासि आणिले । तेणे लुटविले द्विजा हाती ॥३॥
प्रत्यक्षासि काय द्यावे हे प्रमाण । व्यंकोबाचे ॠण फेडियेले ॥४॥
बीज दळोनिया केली आराधना । लागे नारायणा पेरणे ते ॥५॥
तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार । नाडेल साचार तोचि एक ॥६॥
अर्थ

देव भक्तांचा ऋणी आहे, भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे, असे पुराणाने सांगितलेले आहे. पूर्वीची अशी गोष्ट सांगितली, की संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेउन वाटली तेव्हा एक माणूस वस्त्रा साठी विणवनी करीत असताना कबीरांनी आपल्या आंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले. तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता. संत नामदेवांना पण असाच अनुभव अला त्यांचेही धन परमेश्वराने ब्राम्हणाकडून लुटविले. या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत, एकनाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठीसुध्दा विठ्ठलाने नाथांच्या घरी पानी भरले, कष्ट केले. शेतात पेरण्यासाठी आलेले बी दळून नाथांचे पणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठला बद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार पडू शकत नाही.
अभंग क्र. ६८
भोगे घडे त्याग । त्यागे अंगा येती भोग ॥१॥
ऐसे उफराटे वर्म । धर्मा अंगीच अधर्म ॥धृपद॥
देव अंतरे ते पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटी ॥३॥
अर्थ:-

विवेकरुपी बुध्दी ठेउन प्रपंच्यातील विषयभोग भोगले त्याचे तर त्याचे त्यागत रूपातर होते, पण अविचाराने भोगाचा त्याग केला तर तो सफल होत नाही. खरे तर हे ऊफराटेच दिसते भेगाचा त्याग करणे हा धर्म आहे तरीही कधी कधी अधर्मच होतो आणि भोग भोगल्याने धर्म होतो. धर्मामधेच अधर्म लपलेला असतो. ज्या कर्मामुळे परमेश्वर व् भक्त यांच्यामध्दे द्वैतभाव निर्माण होतो, ती सर्व पापकर्मे ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, शुध्द अतःकरणाने भिडेचा(कोणाच्‍याही भिडे पोटी) सर्व त्याग करावा म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते.
अभंग क्र. ६९
भोरप्याने सोंग पालटिले वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसे ॥१॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी । देखो नेदि जगी फासे जैसे ॥धृपद॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फासा कळो नेदी ॥२॥
खाटिक हा स्नेहवादे पशु पाळी । कापावया नळी तया साठी ॥३॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकात । परी तू कृपावंत पांडुरंगा ॥४॥
अर्थ

बहुरूपी वरवर विविध सोंग घेऊन दखवितो अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे सोंग करतो. त्या प्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा, माळ, मुद्रा लाऊन जगाला फसवित असतो. कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो, त्या खादयामधील फासा माश्याला समजून येत नाही. खाटिक बकर्‍याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझा अव्हेर करू नको; कारण तू दयाळू, प्रेमळ असा तारणहार आहेस.
अभंग क्र. ७०
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणिता ॥धृपद॥
भंगलिया चित्ता । न ये काशाने सांदिता ॥२॥
तुका म्हणे धीर । भंगलिया पाठी कीर ॥३॥
अर्थ

एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही एखादी क्षुद्र स्त्रीसुद्धा त्याला मारते. एकदयाची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही. एखादी व्यक्ती मना मधुन उतरली म्हणजे पुन्हा चित्तामधे ती बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमवला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्कारावि लागते.
अभंग क्र. ७१
युक्ताहार न लगे आणिक साधने । अल्प नारायणे दाखविले ॥१॥
कलियुगामाजी करावे कीर्तन । तेणे नारायण देईल भेटी ॥धृपद॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावे वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेविण ॥३॥
अर्थ

परमार्थ साधन्यासाठी युक्त्ताहार, साधानांची गरज नाही; कारण परमार्थ थोडक्याश्या कष्टाने साध्य होतो, हे नारायणाने सांगितले आहे. या कलियुगात कीर्तना सारखे दूसरे साधन नाही, त्यामुळे भगवंतची भेट घडते. त्यासाठी प्रपंच्याचा त्याग करून, वनामधे जावुन, भस्म-दंड धारण करण्याची काहीही आवशकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरनाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही.
अभंग क्र. ७२
कंठी कृष्णमणी । नाही अशुभ ते वाणी ॥१॥
हो का नर अथवा नारी । रांड तये नावे खरी ॥धृपद॥
नाही हाती दान । शूरपणाचे कांकण ॥२॥
वाळियेली संती । केली बोडोनि फजिती ॥३॥
तुका म्हणे ताळा । नाही त्याची अवकळा ॥४॥
अर्थ

ज्यांच्या कंठातून कृष्णनाम येत नाही ती वाणी अशुभ आहे. अशी व्यक्ति परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते. जे हात दान देण्यास पुढे होत नाही अश्या नास्तिक मनुष्यास संत जवळ करीत नाहीत, त्याला कडक शब्दात सुनावितात त्याची चांगलीच फजीती करतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या आचारणामध्ये ताळमेळ नाही, त्याला अवकळा प्राप्त होते.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading