१८ जानेवारी, दिवस १८, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी १५१ ते १७५, सार्थ तुकाराम गाथा अभंग २०५ ते २१६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“१८ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 18 January

राम कृष्ण हरी आज दिनांक १८ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

151-2
अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा ॥151॥
हे अर्जुना, (आत्मा) हा असा आहे हे लक्षात घे. हे जाणावे आणि (आत्मा) हा सर्वत्र समप्रमाणात आहे, हे पाहावे. म्हणजे तुझा हा सगळा शोक की आपोआप नाहीसा होईल.

अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥2. 26॥


भावार्थ :-
हे महाबाहो अर्जुना ! ! हा आत्मा नेहमी जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो, असे जरी तू मानलेस तरीदेखील शोक करणे उचित नाही.

152-2
अथवा ऐसा नेणसी । तू अंतवंतचि हे मानिसी । तर्‍ही शोचू न पवसी । पंडुकुमरा ॥152॥
अर्जुना हा आत्मा अविनाशी (अमर) आहे, हे तुला समजत नसेल तर; हा आत्मा नाशवंत आहे असे जरी तू मानत असशील, तरीदेखील अर्जुन तूला शोक करण्याचे कारण नाही.

153-2
जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥153॥
कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्या प्रमाणे अविच्छिन्न (अखंड) आहे, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा क्रम अखंडच (नित्य घडत आहे) आहे.

154-2
(या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य आहे. )
ते आदि नाही खंडले । समुद्री तरी असे मिनले । आणि जातचि मध्ये उरले । दिसे जैसे ॥154॥
ते गंगेचे पाणी उगमाचे ठिकाणी खंड पावलेले नसते. पुढे ते समुद्रात जाऊन एकसारखे मिळत असते. (उगम आणि संगम यामध्ये असलेले जल) सदैव वाहत असलेले दिसते.

155-2
इये तिन्ही तयापरी । सरसीच सदा अवधारी । भूतांसी कवणी अवसरी । ठाकती ना ॥155॥
त्या प्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही (प्राणिमात्राच्या ठिकाणी) नेहमी बरोबरच असतात. हे लक्षात ठेव आणि ह्या तिन्हीचा प्रवाह कोणालाही थांबविता येत नाही.

156-2
म्हणोनि हे आघवे । एथ तुज न लगे शोचावे । जे स्थितीची हे स्वभावे । अनादि ऐसी ॥156॥
म्हणून हे अर्जुना, तुला या सर्वाबद्दल (कोणा विषयीच) शोक करण्याची गरजच नाही, कारण स्वभावतःच (उत्पत्ती आणि लय) असा सृष्टीचा क्रम आनादि कालापासून चालत आलेला आहे.

157-2
ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥157॥
या विश्वातील सर्व प्राणीमात्र जन्ममरण च्या आधिन आहेत, असे पाहून (ऐकून सुद्धा) (वरील म्हणणे) जर हे म्हणने तुझ्या मनाला पटत नसेल तर;

158-2
तरी येथ काही । तुज शोकासि कारण नाही । जे जन्ममृत्यु हे पाही । अपरिहर ॥158॥
तरीपण (यातील कोणा विषयीच) तुला शोक करण्याचे कारण नाही; कारण हे जन्ममृत्यु चे हे चक्र (अटळ) टाळता न येणारे आहे.

जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥2. 27॥


भावार्थ :-
कारण जो जन्मला आहे, त्याला मृत्यू निःश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे, त्याला निःसंशय जन्म आहे. म्हणून (हे पार्थ) या अटळ गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही.

159-2
उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे । हे घटिकायंत्र तैसे । परिभ्रमे गा ॥159॥
जे उत्पन्न होते (जन्मास आले) ते नाश पावणारच आणि जे नाश पावले ते पून्हा नवीन रूपात (जन्माला येणारच) दिसू लागते. हे रहाडगाडग्याप्रमाणे सतत हा क्रम सुरु असतो.

160-2
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे । हे जन्ममरण तैसे । अनिवार जगी ॥160॥
अथवा, (सूर्याचा, दिवसाचा) उदय आणि अस्त हे आपोआप निरंतर होत असते, त्याप्रमाणे या (देहाचे, पाणीमात्राचे) जन्म-मरण अखंड होत असते, या विश्वात जन्म -मरण (अपरिहार्य आहे) चुकविता येणारे नाही.

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

161-2
महाप्रळय अवसरे । हे त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥
महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होतो, म्हणून (हे अर्जुना लक्षात घे कोणत्याही वस्तूची) उत्पत्ती व नाश हा क्रम टळत नाही.

162-2
तू जरी हे ऐसे मानसी । तरी खेदु का करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥162॥
हे जर तुला पटत असेल, (हे म्हणजे आत्म्याला अदि व अंत असेलच)तर मग व्यर्थ शोक का करतोस ? अर्जुना तू शहाणा असून वेड्यासारखे असे का बरे करतोस ?

163-2
एथ आणिकही एक पार्था । तुज बहुती परी पाहता । दुःख करावया सर्वथा । विषो नाही ॥163॥
हे अर्जुना ! तूला आणखी एक गोष्ट सांगतो, कोणत्याही बाजूने विचार करून पहिले, तरी तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही.

अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥2. 28


अर्जुना, सर्व प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. मध्येच फक्त व्यक्त (दृश्य) (पंचमहाभूतात्मक शरीर मूर्त होऊन दिसते) होतात व पुन्हा मृत्यू नंतर अव्यक्तच बनतात. तर मग शोक कसला ?
164-2
जे समस्ते इये भूते । जन्मा आदि अमूर्ते । मग पातली व्यक्तीते । जन्मलेया ॥164॥
(भगवान श्रीकृष्ण अर्जुनास आता दुसऱ्या पद्धतीने समजावतात ते कसे, पाहा ! )कारण, सर्व जीव हे जन्मापूर्वी निराकार होते, मग जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला,

165-2
तिये क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती । देखे पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥165॥
(मृत्यूनंतर) हे नाश होऊन जेथे कोठे जातात, तेथे ते निःसंशय वेगळे नसतात, तर ते आपल्या मूळ (निराकार, अव्यक्त) अवस्थेला प्राप्त होतात.

166-2
येर मध्ये जे प्रतिभासे । ते निद्रिता स्वप्न जैसे । तैसा आकारु हा मायावशे । सत्स्वरूपी ॥166॥
आता मध्यंतरी (म्हणजे जन्म-मृत्यू या दोन अवस्थांच्या मधे जो व्यक्त प्रत्यक्ष धारण केलेला आकार, मूर्त शरीर) दिसतो, तो झोपेतल्या स्वप्नसारखेच होय. त्याप्रमाणे सत्स्वरूपाच्या (निराकार रूपाच्या) ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार दिसतो.

167-2
ना तरी पवने स्पर्शिले नीर । पढियासे तरंगाकार । का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकी ॥167॥
(वाऱ्यामुळे ज्याप्रमाने) वाऱ्याच्या स्पर्शाने पाण्यावर लाटा तयार होतात, किंवा सोनाऱ्याच्या स्पर्शाने सोन्याला दागिन्यांचा आकार येतो.

168-2
तैसे सकळ हे मूर्त । जाण पा मायाकारित । जैसे आकाशी बिंबत । अभ्रपटल ॥168॥
ज्याप्रमाणे आकाशात ढगांचे आवरण तयार होते, त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत, असे समज.

169-2
तैसे आदीचि जे नाही । तयालागी तू रुदसि कायी । तू अवीट ते पाही । चैतन्य एक ॥169॥
जे मुळात उत्पन्नच होत नाही, त्याबद्दल तू का दुःखाने रडत बसला आहेस ? त्यापेक्षा निर्विकार, नित्य असे जे ब्रम्ह चैतन्य आहे, त्याकडे तू पूर्ण लक्ष दे.

170-2
जयाचि आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत । जयालागी विरक्त । वनवासिये ॥170॥
ज्या विश्व चैत्यन्याच्या प्राप्तीची (प्रत्येक्ष अनुभव घेण्यासाठी)तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच, त्या संतांना विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत, ते त्या आत्म्याचा लाभाकरिता वनवास स्वीकारतात.

171-2
दिठी सूनि जयाते । ब्रह्मचर्यादि व्रते । मुनीश्वर तयाते आचरताती ॥171
त्याच्यावर (ब्रम्हचैतण्याकडे) दृष्टी एकाग्र करून श्रेष्ठ मुनि-महात्मे ब्रम्हचर्यादि व्रतांचे आणि तापाचे आचरण करतात.
आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥2. 29॥


भावार्थ :-
कोणी एखादा या आत्म्याला अदभुत समजतो, तर दुसरा कोणी आश्चर्यकारक आहे, असे वर्णन करतो. (म्हणजे देहाला विसरतो). तर कोणी त्याचे अलौकिक गुणगान ऐकतो. पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून, ऐकुनहि (यापैकी) कोणी जाणत नाही.

172-2
एक अंतरी निश्चळ । जे निहाळिता केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥172॥
कित्येक जण तर (आत्म्याचा) विचार करत करत अंतःकरण शांत करतात आणि संसार विसरून जातात.
173-2
एका गुणानुवादु करिता । उपरती होऊनि चिता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥173॥
कित्येकांना तर त्याचे (परब्रम्हाचे) वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होवून, अमर्याद व अखंड तन्मयता पावतात. (चित्तात दीर्घकाळ तल्लीनता प्राप्त होणे)
174-2
एक ऐकताचि निवाले । ते देहभावी सांडले । एक अनुभवे पातले । तद्रुपता ॥174॥
कित्येक साधक तर त्या ब्रम्हचैतन्याचे स्वरूपाचे वर्णन ऐकूनच शांत होतात. (देहाचे भान) देहभाव संपून जातो. ते अनुभवाने तद्रुपता प्राप्त करतात. (त्याच ठिकाणी एकरूप तेचा अनुभव)
175-2
जैसा सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत । परी माघौते न समात । परतले नाही ॥175॥
ज्या प्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात; परंतु समुद्रात पाणी मावत नाही म्हणून, नदीचे पाणी परत (माघारी) फिरले नाही.
(म्हणजे, या ओवी मध्ये समुद्र हा परमात्मा आहे आणि नदी आत्मा) एकरूप झाल्यावर येणारा अनुभव.


दिवस १८ वा, १८ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०५ ते २१६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 205
याजसाठी भक्ति । जगी रूढवावया ख्याति ॥१॥
नाही तरी कोठे दुजे । आहे बोलाया सहजे ॥धृपद॥
गौरव यासाठी । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकी खरा ॥३॥
अर्थ

या जगातील सामान्य जीवांना तारण्यासाठी साधा-सोपा भक्तीमार्ग दृढ करण्याची गरज आहे. नाही तरी या जगामध्ये एका विठ्ठला शिवाय दूसरे दैवत कोठे आहे ? या साध्या सोप्या भक्तीचा गौरव होण्यासाठी किर्तीसाठी स्वामीसेवेचि कसोटी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव व भक्त हा समाजातील एक खरा अलंकार आहे.


अभंग क्र. 206
अमंगळ वाणी । नये ऐको ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥धृपद॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥
अर्थ

अमंगळ वाणी कानानि कधीही एकु नये. जो हरिकथेचा द्वेष करतो, त्याला क्षयरोगाची व्याधि होते. असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा. तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे, त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाही.


अभंग क्र. 207
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥धृपद॥
कैसा निरयगावा । जाऊ न पवे विसावा ॥२॥
तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥
अर्थ

ज्याची वाणी अमंगळ आहे, तो निश्चिंतच जारिणीपोटि जन्माला आला आहे. तो नेहमी परनिंदा करतो, त्याची वाणी कधीही गोविंदाचे नामस्मरण करीत नाही. त्यामुळे तो अंती नरकाला जातो आणि तिथे गेल्यावर त्याला विश्रांती कशी मिळणार ? तुकाराम महाराज म्हणतात, असा तो धर्मद्वेशी यमाच्या दंडास पात्र ठरणाराच ना.


अभंग क्र. 208
गर्भाचे धारण । तिने वागविला सिण ॥१॥
व्याली कुर्‍हाडीचा दांडा । वर न घालीच तोंडा ॥धृपद॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥
अर्थ

नास्तिकाचा गर्भ धारण करून त्याच्या मातेने निष्कारण कष्ट केले. तिने जणू काही कुर्‍हाडीच्या दांडयाला जन्म दिला आहे, जन्मल्या बरोबर तिने त्याला मारून का टाकले नाही ? तिच्या पोटी जणूकाही काळ जन्माला आला आहे आणि त्याने कुळाला बट्टा लावला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या अभक्ताची आई नरकात जाते.


अभंग क्र. 209
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥
विधीपुरते कारण । बहु वारावे वचन ॥धृपद॥
सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । राखता हे तेचि बरी ॥३॥
अर्थ

एखादी स्त्री खोटा स्नेह व प्रितिचे सोंग करते आणि आपल्या पतीला अधोगतिला नेते. तिच्या बरोबर धर्मशास्त्रानुसार संबंध राखावा आणि कारणापुरतेच बोलावे. ती खोटे-खोटे गोड बोलते, लडिगोडी लावते, संसारात गुंतवते आणि सर्वस्व लूटते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुराग्रह स्त्रीला दूर अंतरावर ठेवणेच सुखाचे आहे.


अभंग क्र. 210
देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभ अशुभाचा ॥१॥
जीवशिवाचे भातुके । केले क्रीडाया कौतुके । कैची येथे लोके । हा आभास अनित्य ॥धृपद॥
विष्णुमय खरे जग । येथे लागतसे लाग । वाटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ ॥२॥
अवघी एकाचीच वीण । तेथे कैचे भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणे केला निवाडा ॥३॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशी वास । निकट नव्हे निराळा ॥४॥
अर्थ

देवच आड होऊन सर्व भोग भोगत आहे आणि शुभ व अशुभाचा जो विचार आहे त्याचे निवारण झाले आहे. जीव व शिव यांचे भातुकली प्रमाणे क्रीडा करण्या करिताच देवाने लीलेने यांची निर्मिती केली आहे मग येथे हा सर्व आभास अनित्य आहे. खरे तर हे सर्व जग विष्णूमय आहे आणि वर्ण आणि धर्म हे वाटणी जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे. आहो हे सर्व एका देवा पासूनच निर्माण झाले आहे मग तेथे भिन्नतेचा प्रश्नच कोठे ? हा निर्णय वेद पुरुष नारायण यानेच केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात प्रसाद रुपी आंनद मला लाभला असून मी या हरीच्या पायाशी निरंतर राहून तेथुन निराळा होणार नाही.


अभंग क्र. 211
आचरणा ठाव । नाही अंगी स्वता: भाव ॥१॥
करवी आणिकाचे घात । खोडी काढूनि पंडित ॥धृपद॥
श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥
तुका म्हणे ऐसा । सटवेचि ना पाचा दिसा ॥३॥
अर्थ

ज्याचे आचरण शुद्ध नाही, ज्याच्या मनात देवाविषयी भक्ती-श्रद्धा नाही. असे मुर्ख पंडित इतरांच्या शुद्ध आचरणात दोष काढतात व त्यांचा घात करतात. ते मिष्टान्नाला शिवून विटाळ करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात. तुकाराम महाराज म्हणतात, असा पाखंडी इतके दिवस जिवंत कसा राहिला ? पाच दिवसातच कसा मेला नाही ?


अभंग क्र. 212
ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पाठोवाटी तयाचिया ॥१॥
तहान भुक त्यांचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥धृपद॥
कोण तया सखे आणीक सोयरे । असे त्या दुसरे हरीविण ॥२॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाही राज्यमद घडी तया ॥३॥
तुका म्हणे विषय अमृतासमान । कृपा नारायण करिता होय ॥४॥
अर्थ

योगी, तपस्वी, साधू ईश्वर चिंतन करीत डोंगरकपारित ध्यानस्त बसलेले आहेत, त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे. त्यांची तहान-भूक भागऊन, त्यांचे चित्त देहभावाविषयी उदासीन करीत आहे. त्यांना हरी शिवाय कोणतेही सगे-सोयरे नाहीत. तेथे त्यांच्या जीवाला आनंद वाटत आहे, राज्याभिलाशा त्यांच्या मनात शिवतहि नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्या नारायणाची कृपा झाली म्हणजे विष अमृतासमान होते.


अभंग क्र. 213
न व्हावे ते जाले देखियेले पाय । आता फिरू काय मागे देवा ॥१॥
बहुत दिस होतो करीत हे आस । ते आले सायासे फळ आजि ॥धृपद॥
कोठवरी जिणे संसाराच्या आशा । उगवो हा फासा येथूनिया ॥२॥
बुडले तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनिया ॥३॥
पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर । नाही अंतपार गर्भवासा ॥४॥
तुका म्हणे कास धरीन पीतांबरी । तू भवसागरी तारू देवा ॥५॥
अर्थ

हे देवा तुमचे चरण दर्शन होणे फार दुर्मिळ ते होणे शक्य नव्हते पण आता ते दर्शन मला झाले मग मी मागे कसा फिरू ? ज्या गोष्टीची मला आस होती इच्छा होती ती गोष्ट मला सायासाने मिळाली आहे. या संसाराची आशा किती दिवस धरावी तुमच्या दुर्मिळ चरणांचे दर्शन झाले या चरणांच्या आश्रयाने मी संसाराचा फासा तोडून टाकीन. या संसार रुपी सागरात बुडालेल्या लोकाचा मागमूस देखील नाही. या नर देहाला दुखाचे डोंगर गर्भवास भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पितांबराची कास धरीन कारण तुम्ही मला या भाव सागरातून तरून नेणारे आहात.


अभंग क्र. 214
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणे जीवा नाश करणे बहु ॥१॥
तया पुंडलिके केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥२॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
अर्थ

पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्‍यासारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे. पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तीमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला. तुकाराम महाराज म्हणतात, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे.


अभंग क्र. 215
शोके शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥
येथे केले नव्हे काई । लडीपण खोटे भाई ॥धृपद॥
करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥
तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥
अर्थ

एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो वाढतच जातो, त्याकारता धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे. हे माझ्या बंधुंनो या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखी नाही, येथे भित्रेपणा वाईट आहे. परमार्थ करण्यास तुम्ही सहाय्य कराल काय ? हा प्रश्न मी कित्तेकांना विचारला असता ते म्हणतात, करू हो ! असे केवळ हो म्हणणारे लोक खुप आहे ; पण प्रत्यक्ष मदतीला धाउन येणारे लोक कमी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या क्षणभंगुर जीवनात भक्तीचा एक जरी क्षण साधला तरी जीवन सफल होईल.


अभंग क्र. 216
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाही कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥
माझिया गोते हे वसले सकळ । न देखिजे मूळ विटाळाचे ॥धृपद॥
करूनि ओळखी दिली एकसरे । न देखो दुसरे विषमासी ॥२॥
तुका म्हणे नाही काळापाशी गोवा । स्थिति मति देवा वाचूनिया ॥३॥
अर्थ

परमार्थाच्या या मांडलेल्या खेळात कोणतीही दिशा मी वगळलेली नाही. माझ्या परमार्थाचे हे गणगोत विठोबा आहे, त्यामुळे तिथे विटाळाला, भेदभावाला थारा नाही. त्याने मला माझी खरी ओळख करुण दिली आहे, मी विठ्ठलस्वरूपच असल्यामुळे इतर काही पाहतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठालाशी बांधला गेल्यामुळे मला काळाची भीती नाही.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading