आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

४ जानेवारी, दिवस ४, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३७ ते ४८
” दिवस ४ था, ४ जानेवारी”
सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
वार्षिक नित्य पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 January
राम कृष्ण हरी
आज दिनांक 4 जानेवारी असून आजचे पारायणात
“सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग ३६ ते ४८ असे एकूण १२ अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
76-1
येर्हवी तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तर्ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥1. 76॥
एरव्ही तरी मी अज्ञानी आहे, माझ्याकडून भाष्य लिहिताना अविवेक होत आहे. तरीपण संतकृपेचा प्रकाशमान दीप प्रज्वलित आहे. ॥1-76॥
77-1
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसीच आहे । की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥1. 77॥
लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य परिसात आहे. किंवा अमृताची प्राप्ती झाली की, मृतसुद्धा जिवंत होतो. ॥1-77॥
78-1
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥1-78॥
सरस्वती देवता प्रसन्न झाली, तर मुक्यालाही भावमधुर वाचा फुटते. असा बदल होण्याविषयी वस्तूचे सामर्थ्य किंवा शक्ती कारण आहे, यात आश्यर्य ते काय आहे ? ॥1-78॥
79-1
जयाते कामधेनु माये । तयासी अप्राप्य काही आहे । म्हणौनि मी प्रवर्तो लाहे । ग्रंथी इये ॥1-79॥
ज्याची आई कामधेनू आहे, त्याला या जगात दुर्लभ असे काही नाही; म्हणून मी या गीता ग्रंथावर भाष्य करण्यास प्रवृत्त झालो. ॥1-79॥
80-1
तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते । करूनि घेयावे हे तुमते । विनवितु असे ॥1-80॥
माझ्या या भाष्यामध्ये काही कमतरता असेल, तर ती पूर्ण करून घ्या आणि अधिक असेल, तर समजून घ्या, अशी तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे. ॥1-80॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-1
आता देईजो अवधान । तुम्ही बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥1-81॥
आता आपण भाष्या कडे लक्ष द्या. तुम्ही जसे मला बोलवाल, त्या प्रमाणे मी बोलेन. सूत्रधार ज्या प्रमाणे दोरी हलवीत असतो, तशी दोरीच्या आधीन असलेली कळसूत्री बाहुली नाचत असते. ॥1-81॥
82-1
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥1-82॥
त्याप्रमाणे मी साधूंच्या अनुग्रहित असून साधूंचा निरोप सांगणार आहे. त्यामुळे त्यांनी मला भाष्य करताना हवे तेवढे अलंकृत करावे. ॥1-82॥
83-1
तव श्रीगुरु म्हणती राही । हे तुज बोलावे नलगे काही । आता ग्रंथा चित्त देई । झडकरी वेगा ॥1-83॥
तेंव्हा सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणले, ज्ञानदेवा ! आता विनवणीचे बोलणे थांबवावे आणि गीतेवर भाष्य करण्यास प्रारंभ करावा. ॥1-83॥
84-1
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनिया ॥1-84॥
सद्गुरूंची आज्ञा ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव यांना परम उल्हास झाला आणि ते म्हणाले, माझ्या मुखातून प्रकट होणारे शब्द आपण शांत मनाने श्रवण करावेत. ॥1-84॥
धृतराष्ट्र उवाच । 1. 1
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥1. 1॥
संदर्भित अन्वयार्थ
धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च= आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम् = काय, अकुर्वत = केले ॥1-1॥
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले ? ॥1-1॥
85-1
तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रीची ॥1-85॥
पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, ” हे संजय ! कुरुक्षेत्रांवर काय घडत आहे, ती हकीकत मला सांग. ॥1-85॥
86-1
जे धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजे । जुंझाचेनि ॥1-86॥
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात, तेथे पंडुचे पुत्र आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत. ॥1-86॥
87-1
तरी तेचि येतुला अवसरी । काय किजत असे येरयेरी । ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥1-87॥
तरी ते परस्परात एवढा वेळ काय करीत आहेत, हे मला लवकर सांग. ॥1-87॥
संजय उवाच ॥
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥1. 2॥
पश्यैता पाण्डुपुत्राणामाचार्य महती चमूम ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥1. 3॥
संदर्भित अन्वयार्थ
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम् = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम् = पांडवाचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम् = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम् = असे वचन, अब्रवीत = बोलला ॥1-2॥
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥1-2॥
88-1
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचलले । जैसे महाप्रळयी पसरले । कृतांतमुख ॥1-88॥
संजय म्हणाला तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते, त्याप्रमाणे पांडवाचे सैन्य युद्धासाठी प्रक्षुब्ध झाले आहे. ॥1-88॥
89-1
तैसे ते घनदाट । उठावले एकवाट । जैसे उसळले काळकूट । धरी कवण ॥1-89॥
त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकत्रितपणाने उठाव केला आहे. काळकूट नावाचे विष उचळले, तर त्याला कोण बरे शांत करू शकणार ? ॥1-89॥
90-1
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवाते पोखला । सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥1-90॥
किंवा वडवानल पेटून प्रज्वलित होऊन वाऱ्याच्या साहाय्याने वाढत चालला, तर तो जसा सागरालाही शोषून आकाशापर्यंत धडकतो, ॥1-90॥
91-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसे दळ दुर्धर । नानाव्यूही परीकर । अवगमले भयासुर । तिये काळी ॥1-91॥
त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्युहांची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे. ॥1-91॥
92-1
ते देखोनिया दुर्योधने । अव्हेरिले कवणे माने । जैसे न गणिजे पंचानने । गजघटांते ॥1-92॥
ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाळा मोजत नाही, त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केली नाही. ॥1-92॥
93-1
मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला । कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥1-93॥
नंतर दुर्योधन द्रोणाचर्याजवळ जवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवाचे हे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे, ते पहिले का ? ॥1-93॥
94-1
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते । रचिले आथी बुद्धिमंते । द्रुपदकुमरे ॥1-94॥
बुद्धिवंत असा जो द्रुपदपुत्र धृष्टदुउम त्याने विविध प्रकारचे विशाल व्यूह सभोवार रचले आहेत. ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ॥1-94॥
95-1
जो हा तुम्ही शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणे हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥1-95॥
ज्याला तुम्ही शिकविले, विद्या देऊन शहाणे केले, त्या धृष्टदुउमनाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे, तो आपण पाहा. ॥1-95॥
96-1
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥1. 4॥
भावार्थ :-
तेथे युद्धात महाधनुर्धारी भीम व अर्जुन यासारखे अनेक शूरवीर आहेत, युयुधान आणि विराट, त्याप्रमाणे महापराक्रमी द्रुपद राजा आहे. ॥4॥
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्री प्रवीण । क्षात्रधर्मी निपुण । वीर आहाती ॥1-96॥
आणखी जे शस्त्रात्रांत अतिप्रवीन आणि शस्त्रधर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत, ॥1-96॥
97-1
जे बळे प्रौढी पौरुषे । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुके । प्रसंगेची ॥1-97॥
हे शक्तीने, महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यासारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला म्हणून कौतुकाने म्हणून सांगतो. ॥1-97॥
98-1
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥1-98॥
या रणांगणामध्ये महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि महारथ्यात श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले आहेत. ॥1-98॥
99-1
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥1. 5॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥1. 6॥
भावार्थ :-
चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज, पुरुजित, कुंतीभोज नरश्रेष्ठ, शैब्य, ॥5॥
पराक्रमी युधामन्यु, शक्तिशाली उत्तमौजा, सुभाद्रपुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥6॥
चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥1-99॥
चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज, नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा पाहा. ॥1-99॥
100-1
हा कुंतिभोज पाहे । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख ॥1-100॥
हा कुंतीभोज पाहा, येथे युधामन्यु आलेला आहे. आणखी हे पुरुजित वगैरे सर्वच राजे आलेले आहेत, ते पाहा. ॥1-100॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ४ था, ४ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७ ते ४८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ३७
शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ॥१॥
मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ॥धृपद॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ॥३॥
अर्थ
बिज शुद्ध असले तर येणारे फळ पण उत्तम उपजते. ज्याच्या मुखी हरिणामामृत असते, त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो. जो देह-चित्त-बुद्धिने निर्मळ आहे, त्याचे चित्त गंगाजलाप्रमाने पवित्र असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणी जीव विसावा घेतो.
अभंग क्र. ३८
चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ॥१॥
बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ॥धृपद॥
मनाच्या तळमळे । चंदने ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
अर्थ
चित्त समाधानी असेल तर सोने सुध्दा विषासमान भासते. विषयलोलुपता जीवनाला घातक ठरते, तुम्ही विचारी गृहस्थ हे सर्व काहि जाणता. मनामध्ये प्रपंच्याविषयीची भोगलालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटिनेही कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्याविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरि तो मनुष्य असंतृष्ट राहतो.
अभंग क्र. ३९
परिमळ म्हणूनी चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडते ॥१॥
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहू नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोका ॥३॥
अर्थ
फुले सुगंधी असता त्याचा वास घेण्या करता त्याचा चोळामोळा करू नये, गोजिरे मूल आपल्याला आवडते तर ते आपण खात नाही. मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखु नये, विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडुन पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात तसेच कर्म केल्या नंतर त्याच्या फलाची अपेक्षाहि करू नये, हेच भक्तीचे वर्म आहे.
अभंग क्र. ४०
माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेचि माया । अंग आणि छाया जयापरी ॥१॥
तोडिता न तुटे सारिता निराळी । लोटांगणातळी हारपती ॥धृपद॥
दुजे नाही तेथे बळ कोणासाठी । आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणे । ठेंगणी लवणे जैसी तैसी ॥३॥
अर्थ
माया म्हणजे ब्रम्ह आहे आणि ब्रम्ह म्हणजेच माया आहे यांचा संबंध देह आणि सावली यांच्या सारखा आहे. देहाचि सावली शस्त्राच्या अघाताने तुटत नाही, ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही, लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते. ब्रम्ह आणि माया एकरूप असतील तर तेथे विचाराच्या बळाचा वापर कश्यासाठी करायचा. तुकाराम महाराज म्हणतात जसा देह उंच बुटका असेल तशी सावली असते, लोटांगनाने ती नाहिशी होते तशे ब्रम्हाला लोटांगण घातले, शरण गेले असता मायाही नाहिशी होते.
अभंग क्र. ४१
दुर्जनासि करी साहे । तो ही लाहे दंड हे ॥१॥
शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥धृपद॥
येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥
तुका म्हणे कापू नाके । पुढे आणिके शिकविती ॥३॥
अर्थ
दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी ( दुर्वर्तन) करू लागते. दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्निचि निर्मिति होते. वाईटाच्या संगतिने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते; तुकाराम महाराज म्हणतात की, अशा दृष्टांचि नाके आम्ही कापून काढू म्हणजे त्यांच्या पासुन इतरांचे नुकसान होणार नाही.
अभंग क्र. ४२
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिंती देव नाही ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरीचे सार लाभ नाही ॥धृपद॥
देवपूजेवरी ठेवूनिया मन । पाषाणा पाषाण पूजी लोभे ॥२॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदरे । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥
अर्थ
भूमी, राज्य, द्रव्य यांच्या लोभान जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही हे निश्चीत जाणावे. हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तुचा त्याला लाभ होत नाही. मनामधे इच्छा-आकांक्षा ठेउन देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात मनामधे विषयाचि लालसा धरून केलेले कर्मे हे वेष्याच्या शिंदळकि प्रमाणे असतात.
अभंग क्र. ४३
पवित्र सोंवळी । एक तीच भूमंडळी ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥धृपद॥
तीच भाग्यवंते । सरती पुरती धनवित्ते ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
अर्थ
या भुमंडळी संतसज्जनच एक पवित्र, शुद्ध आहेत. त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम, भक्ति असते. धनद्रव्याने समृद्ध, बुद्धिने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अशा संतसज्जनाची सेवा केली तर ती देवाला पावते.
अभंग क्र. ४४
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥धृपद॥
भ्रमले चावळे । तैसे उचित न कळे ॥२॥
तुका म्हणे विषे । अन्न नाशियले जैसे ॥३॥
अर्थ
प्रपंच्याविषयी आसक्त असणारे जिव परमेश्वराला काय जाणून घेऊ शकतात ? त्यांना स्वता::च्या इंद्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो. तो भ्रमिष्ट स्वता::च्या जीवनाचे हित जाणु शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते, त्या प्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते.
अभंग क्र. ४५
ढेकरे जेवण दिसे साचे । नाही तरि काचे कुंथाकुंथी ॥१॥
हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥धृपद॥
गव्हाचिया होती परी । फके वरी खाऊ नये ॥२॥
तुका म्हणे असे हातीचे कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥
अर्थ
भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता दिलेली ढेकर हे ढोंग असते. भोजन करुन तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करताच दिलेली ढेकर हे फोलपटा प्रमाणे असते. गव्हाच्या पीठाची पुरणपोळी बनते, म्हणून केवळ पीठ खल्याने पुराणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हातात कंकण दिसत आहं तरी आरसा पाहणे हे निरर्थ असते.
अभंग क्र. ४६
करावी ते पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असे ॥१॥
कळावे तयासि कळे अंतरीचे । कारण ते साचे साच अंगी ॥धृपद॥
अतिशया अंती लाभ किंवा घात । फळ देते चित्त बीजा ऐसे ॥२॥
तुका म्हणे जेणे राहे समाधान । ऐसे ते भजन पार पावी ॥३॥
अर्थ
देवाची पूजा करायची असेल तर मनोभावे करावे चांगल्याप्रकारे करावे तेथे उगाचच पूजेचे साहित्य वगैरे ठेवून पूजा करायचा लौकिक दाखवायचे त्याचा काय उपयोग आहे ? आपल्या अंतःकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतःकरणातील खरा भक्तिभाव समजतो कारण भक्ताच्या अंतःकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच त्याला आवडते. काहीतरी उगाचच आगोचर पने कर्म केले तर त्याच्या पासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो जसे बीज असेल तसे फळ मिळते त्या प्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्ता मध्ये जसे असेल तसा त्याला लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्या भजनाने आपले अंतकरण समाधान पावते असे भजन आपल्याला भवसागरच्या पलीकडे पोहोचवत असते.
अभंग क्र. ४७
नव्हे आराणूक संवसारा हाती । सर्वकाळ चित्ती हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदी पडिले सकळ । विषयी गोंधळ गाजतसे ॥धृपद॥
रात्रि दीस न पुरे कुटुंबाचे समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचे ॥२॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणी ॥३॥
अर्थ
सदा-सर्वकाळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभराचिसुद्धा विश्रांति मिळत नाही. देव धर्म त्यांनी कोपर्यात टाकले आहेत, संसारातील कामपुर्तिसाठी जेव्हा हवे तेव्हा त्यांचा उपयोग करतात. रात्रंदिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही, त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्ष जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा विषयी त्यांची मोठी चूक होते असे प्रापंचिक लोक स्वत:च स्वत:ची हत्या करतात.
अभंग क्र. ४८
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोटे श्वानाचिया परी । वस्ति दिली घरी यमदूता ॥धृपद॥
अपूज्य लिंग तेथे अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरा कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाही ठावी स्थिति मती । यमाची निश्चिंती कुळवाडी ॥३॥
अर्थ
ज्या गावामधे परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत व तेथील रहिवाशी प्रेतरूप असतात. कुत्र्याप्रमाने भटकुन ते पोट भारतात, त्यामुळे त्यांच्या घरामधे यमदूताचि वस्ती असते. जेथे हरिहरांची पूजा भक्ति घडत नाही, ते स्थान चोरांचे, नास्तिकांचे वस्तीस्थान बनते. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठलभक्तीत आहे हे न कळाल्यामुळे ते यमाचे कुळे बनले आहेत.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















