आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२३ जानेवारी, दिवस २३, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी २७६ ते ३०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २६५ ते २७६
“२३ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 23 January
राम कृष्ण हरी आज दिनांक २३ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
276-2
म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनि करी अव्हेरु । फळहेतूचा ॥276॥
म्हणून हे अर्जुन ! बुद्धीयोगच श्रेष्ठ आहे, म्हणुन फलेच्छा न धरता या योगाचे ठिकाणी तू निश्चल हो. (स्थिर हो. ) आपले मन स्थिर कर.
277-2
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इही उभय संबंधी सांडिले । पापपुण्यी ॥277॥
ज्यांची बुद्धीयोगाकडे प्रवृत्ती झाली, तेच (संसार रुपी)भवांतून पार पडले. आणि तेच पाप व पूण्य या दोन्हीच्या बंधनातून सुटले.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥2. 51॥
भावार्थ :-
बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करतात. म्हणून ते ते जन्म- मृत्यू च्या बंधनातून मुक्त होऊन व परमपदाला प्राप्त होतात.
278-2
ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति लोपती । अर्जुना तया ॥278॥
अर्जूना, त्यांनी कर्म जरी केली, तरी त्यांच्या मनात कर्माच्या फलाची इच्छा धरीत नाहीत. त्यामुळे त्यांची जन्ममरणाच्या फेर्यातुन नेहमीचीच सुटका होते.
279-2
मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥279॥
हे धनुर्धरा ! मग हे बुद्धीयोगी लोक सर्वोपद्रव रहित, ब्रम्हानंद भरित, अढळ, अविनाशी, अशा परमात्म-स्वरूपाला प्राप्त होतात.
यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति ।
तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥2. 52॥
भावार्थ :-
जेंव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरुन जाईल, त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि जे तुला ऐकावयाचे आहे, त्याबद्दल तू सहज विरक्त होशील.
280-2
तू ऐसा तै होसी । जै मोहाते या सांडिसी । आणि वैराग्य मानसी । संचरेल ॥280॥
अर्जुना, ज्या वेळी (तू स्वजनांचा) मोहाचा त्याग करशील, त्या वेळी (तुझ्या मनात) आपोआपच वैराग्य (उत्पन्न) संचार होईल आणि तू मुक्त होशील. (मगच तू बुद्धीयोगयुक्त स्थितीत प्राप्त होशील. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-2
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणे निचाडे होईल मन । अपैसे तुझे ॥281॥
त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान (तुझ्या ठिकाणी) उत्पन्न होईल व तुझे अंतःकरण सर्वप्रकारे सहजच निरिच्छ होईल. (कोणतीच इच्छा नसलेले)
282-2
तेथ आणिक काही जाणावे । का मागिलाते स्मरावे । हे अर्जुना आघवे । पारुषेल ॥282॥
अर्जूना ! अशी तुझ्या मनाची स्तिथी झाल्यावर आणखी काही मिळवावे, काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे, या सर्वच (क्रिया) गोष्टी थांबतात.
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥2. 53॥
भावार्थ :-
वेदांतील विविध कर्मफलाच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याचे स्वरूपी ज्या वेळी स्थिर होईल, त्या वेळी तुला समत्वरूप प्राप्त होईल.
283-2
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु असे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपी ॥283॥
इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी विषयाकडे पसरलेली असते. , ती बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त झाली, की सहजपणे स्थिर होते.
284-2
समाधिसुखी केवळ । जै बुद्धि होईल निश्चळ । तै पावसी तू सकळ । योगस्थिति ॥284॥
समाधीसुखात(शुद्ध आत्मसुखाचे) ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेंव्हा तुला योगस्थिती (निष्काम कर्मयोग) प्राप्त होईल.
अर्जुन उवाच:
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥2. 54॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, हे केशवा ! अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत ? तो स्थिरबुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो ? कसा असतो ? आणि कर्म कसे करतो ?
285-2
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आता सांगावा । कृपानिधि ॥285॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा ! हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो; हे करूणासागरा, आपण तो स्पष्टपणे सांगावा.
286-2
मग अच्युत म्हणे सुखे । जे किरीटी तुज निके । ते पूस पा उन्मेखे । मनाचेनि ॥286॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, ” अर्जुना ! जे तुला विचारायचे आहे, ते समाधानी मनाने विचारावे. “
287-2
या बोला पार्थे । म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते । काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते । वोळखो केवी ॥287॥
हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा ! स्थितप्रज्ञ (ज्याची बुद्धी स्थिर आहे तो) कोणाला म्हणावे. व त्यास ओळखावे कसे ? हे उघड करून सांगा बरे !
288-2
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसा चिन्ही जाणिजे । जो समाधिसुख भुंजिजे । अखंडित ॥288॥
ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली आहे. (ज्याला स्थिरबुद्धी म्हणतात), व जो नेहमी समाधीसुखात रममाण झाला आहे, (असतो) त्याला कोणत्या लक्षणानी ओळखावे.
289-2
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे । देवा सांगावे हे ऐसे । लक्ष्मीपती ॥289॥
हे लक्ष्मीपती देवा ! तो कोणत्या स्थितीत असतो ? व कोणत्या प्रकारे आचरण करत असतो ? हे कृपा करून मला सांगावे.
290-2
तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥290॥
तेव्हा षड्गुण एश्वर्य संपन्न 【यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आणि ऎश्वर्य 】 या सहा गुणांचा (अधिष्ठान व परब्रम्ह) आश्रयस्थान असा जो भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. (ते ऐकावे)
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रीभगवानुवाच:
प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥2. 55॥
भावार्थ :-
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना जेंव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो व स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, तेंव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात.
291-2
म्हणे अर्जुना परियेसी । हा अभिलाषु प्रौढ मानसी । तो अंतराय स्वसुखेसी । करीत असे ॥291॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! ऐक, मनामध्ये जी उत्कट विषयासक्ती असते, तीच आत्मनंदानुभवाला प्रतिबंध (विघ्ने)निर्माण करते.
292-2
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु । परि विषयामाजि पतितु । जेणे संगे कीजे ॥292॥
जो सर्वदा सुखतृप्त असतो, ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते; परंतु अशा जिवात्म्याचेही ज्याच्या (कामाच्या) संगतीने पुरूष विषयासक्त होऊन पतन होते.
293-2
तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषी मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥293॥
ज्याचा मनातुन कामेच्छा पूर्णपणे निघून जाते, ज्याचे मन आत्मसंतोषात रममाण असते, तोच पुरूष स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धि होय असे जाण.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥2. 56॥
भावार्थ :-
दुःखे आली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्याच्या विषयी निरिच्छ असतो. ज्याच्या अंथकरणातून काम, भय आणि क्रोध गेलेली असतात, असा जो मुनी, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे.
294-2
नाना दुःखी प्राप्ती । जयासी उद्वेगु नाही चित्ती । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥294॥
नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या मनात उद्वेग्न उत्पन्न होत नाही, आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकला जात नाही,
295-2
अर्जुना तयाच्या ठायी । कामक्रोधु सहजे नाही । आणि भयाते नेणे कही । परिपूर्ण तो ॥295॥
अर्जुना, त्या सत्पुरूषाचे अंतःकरणात काम क्रोध सहजच नाहिसे झालेले असतात, तो सर्वकाळी भयमुक्त असतो. विश्वचैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो.
296-2
ऐसा जो निरवधि । तो जाण पा स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥296॥
असा जो अमर्याद आणि सर्व प्रकारच्या उपधींचा त्याग करून भेदराहित झालेला असतो, तो स्थिरबुद्धी होय, असे समज.
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2. 57॥
भावार्थ :-
ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.
297-2
जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु का जैसा । अधमोत्तम प्रकाशा – । माजी न म्हणे ॥297॥
(स्थिरबुद्धी पुरूष लक्षणे) पौर्णिमेचा चंद्र जसा आपला प्रकाश देताना चांगला अथवा वाईट असा भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने (प्रेमाचा वर्षाव करीत) वागत असतो.
298-2
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामत्री सदयता । आणि पालटु नाही चित्ता । कवणे वेळे ॥298॥
अशी ज्याची सर्व भूतमात्राविषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो. त्याच्या शुद्ध चित्ताची स्थिती कधीही बदलत नाही.
299-2
गोमटे काही पावे । तेणे संतोषे तेणे नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥299॥
काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्टी प्राप्त झाल्यामुळे तो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही. (प्रतिकूल विषयाच्या प्राप्ती नंतरही दुःखाच्या तावडीत सापडत नाही)
300-2
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो पा जाण प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥300॥
याप्रमाणे जो हर्षशोक रहित असतो व नेहमी आत्मानुभिती संपन्न असतो. तोच स्थिरबुद्धी होय, असे अर्जुना जाण.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः ।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2. 58॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजुंनी आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढुन घेतो, त्याप्रमाणे (तो) पुरुष जेंव्हा आपली इंद्रिये, इंद्रियांच्या विषयापासून आवरून धरतो, तेंव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.
दिवस २३ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६५ ते २७६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 265
पोटाचे ते नट पाहो नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥
अर्थी परमार्थ कैसा घडो सके । चित्त लोभी भीके सोंग वाया ॥धृपद॥
देवाची चरित्रे दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥
तुका म्हणे चित्ती राहे अभिळास । दोघा नरकवास सारिखाचि ॥३॥
अर्थ
नाटकामध्ये लोक स्त्री किंवा पुरूष या पात्राची सोंग घेतात परंतु ते विषय असून विषयाचेच प्रकार आहेत त्यामुळे ते पाहू नये. पैसे कमावण्याकरता धन कमविण्याकरता जर परमार्थ केला जात असेल तर मग तो परमार्थ कसा होऊ शकेल आणि नट धनाच्या लोभाने देवाचे सोंग घेत असेल तर ते व्यर्थच आहे. कथेमध्ये हे असे लोक देवाने लीला कसे केले हे दाखवण्या करिता लोकांना मोहित करण्याकरता सोंग धारण करतात पण त्यांचे ते चातुर्य व्यर्थ असते. तुकाराम महाराज म्हणतात चित्तामध्ये पैसे अभिलाषा ठेवून कथा सांगणारे आणि पैसे देऊन ती पहाणारे दोघेही नरकवासाच भोगतात.
अभंग क्र. 266
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥१॥
भाविकांनी दुर्जनाचे । काही मानू नये साचे ॥धृपद॥
होईल तैसे बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥३॥
अर्थ
काही दुर्जन लोक असे असतात की ते कुत्र्यासारखे सारखे भुंकत असतात त्यांना भुंकू द्यावे व त्यांचे काहीही बोलण्या पण मनाला लावून घेऊ नये. भाविकांनी दुर्जनांचे कोणतेही बोलणे मनावर घेऊ नये. अशा खळांची आपल्या बलाने जितकी फजित करता येईल तितकी करावे. तुकाराम महाराज म्हणतात या दुर्जनांना आपण ताडण केले म्हणजे कठोर शिक्षा दिली तरीही आपल्याला पाप लागत नाही.
अभंग क्र. 267
जप करिता राग । आला जवळी तो मांग ॥१॥
नको भोवताले जगी । पाहो जवळी राख अंगी ॥धृपद॥
कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥
तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥
अर्थ
हरी भजन करताना राग आला तर समजावे आपल्याजवळ अस्पृश्य असा मांगच आलेला आहे त्यामुळे देवाचे जप करताना कधीही राग येऊ देऊ नये. अरे तू या भोवतालच्या लोकांचे वर्तन पाहू नकोस आणि तुझ्या अंतःकरणामध्ये जो राग राहतो त्याला तुला स्पर्शही होऊ देऊ नकोस. राग रूप जो मांग आहे, तू त्याच्या पंगतीत बसून भोजन करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू कर्म अकर्म बाजूला ठेव आणि खर्या ब्रह्माची प्राप्ती करून घे.
अभंग क्र. 268
का रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१॥
अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणा कंठस्फोट ॥धृपद॥
का हे चित्त नाही पावत विश्रांती । इंद्रियांची गति खुंटेचि ना ॥२॥
तुका म्हणे का हो धरियला कोप । सरले नेणो पाप पांडुरंगा ॥३॥
अर्थ
हे हृदयस्था नारायणा तू माझ्या इतक्या जवळ आहेस तरीही तुला माझा कळवळा का बरे येत नाही ? हे निर्गुणा नारायणा निष्ठुरा अरे तुझ्या प्राप्तीकरता मी कंठ शोक कुठेपर्यंत केला तरी तुला कसे समजत नाही ? माझ्या इंद्रियांना विषयाकडे धावण्याची गती लागलेली आहे ती अजूनही का थांबत नाही आणि माझ्या चित्ताला अजूनही विश्रांती म्हणजे समाधान का मिळत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू माझ्यावर एवढा राग का धरलेला आहे माझे पाप अजूनही संपलेली नाही की काय ?
अभंग क्र. 269
दीनानाथा तुझी ब्रिदे चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥
पुराणी जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हा रोकडे कळो आले ॥धृपद॥
आपुल्या दासांचे न साहासी उणे । उभा त्याकारणे राहिलासी ॥२॥
चक्र गदा हाती आयुधे अपारे । न्यून तेथे पुरे करू धावे ॥३॥
तुका म्हणे तुज भक्तीचे कारण । करावया पूर्ण अवतारा ॥४॥
अर्थ
हे देवा तुझी या जगामध्ये अनेक ब्रीदे आहेत ते म्हणजे तू दिनानाथ आहेस कृपा घन आहेस कृपा वत्सल आहेस आणि तू शरणागत आलेल्या तुझ्या भक्तांना तारणारा आहेस तू त्यांची बाजू घेणारा आहे हे मात्र निश्चित आहे. पुराणामध्ये तुझी कीर्ती वाखाणलेली आहे आता त्याचा मला अनुभव आलेला आहे. आणि भक्तांचे कार्य तत्परतेणे करता यावे यासाठी तुम्ही विटेवर उभे आहात. तुमच्या हातामध्ये चक्र गदा असे अपार आयुधे आहेत आणि भक्तांना काहीही न्यून म्हणजे कमी पडले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही लगेच धाव घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला अवतार घेण्याकरता भक्तांची भक्ती हे कारणच पुरे आहे.
अभंग क्र. 270
वर्णु महिमा ऐसी नाही मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥
ठायीची हे काया ठेविली चरणी । आता ओवाळुनि काय सांडू ॥धृपद॥
नाही भाव ऐसा करू तुझी सेवा । जीव वाहू देवा तो ही तुझा ॥२॥
मज माझे काही न दिसे पाहाता । जे तुज अनंता समर्पावे ॥३॥
तुका म्हणे आता नाही मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥
अर्थ
देवा तुझा महिमा वर्णन करू शकेल अशी माझी वाणी समर्थ नाही आणि तुझ्या स्वरूपाचा अंतपार माझ्या वाणीला सांगता येणार नाही. देवा तुझ्या चरणांवर तर मी आधीच माझा देह ओवाळून टाकलेला आहे आता तुझ्यावर मी काय ओवाळून टाकू ? देवा माझा भक्तीभाव हि असा नाही की मी तुमची सेवा करू शकेल आणि तुमच्या वरून जीव ओवाळून टाकावा तर तो मुळातच तुमचा आहे. देवा पाहिले गेलं तर माझे माझ्याकडे काहीच नाही जे तुला मी अर्पण करावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे उपकार फेडण्याकरीता माझ्याकडे माझे काहीच नाही.
अभंग क्र. 271
नाही सुख मज न लगे हा मान । न राहे हे जन काय करू ॥१॥
देहउपचारे पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न ते ॥धृपद॥
नाइकवे स्तुति वाणिता थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥
तुज पावे ऐसी सांग काही कळा । नको मृगजळा गोवू मज ॥३॥
तुका म्हणे आता करी माझे हित । काढावे जळत आगीतूनि ॥४॥
अर्थ
देवा मला कोणत्याही प्रकारचे सुख किंवा या लोकांकडून मान सन्मान मिळावा अशी इच्छा नाही पण हे लोक मला मान दिल्याशिवाय राहत नाहीत त्याला मी काय करू ? हे लोक माझ्या देहाला सुख होईल असे उपचार करतात पण त्यामुळे माझे शरीर पोळते आणि कोणी मला जर मिष्टान्न खायला दिले तर ते मला विषाप्रमाणे कडू वाटते. कोणीही माझी स्तुती केली तर ती मला आहे ऐकावीशी वाटत नाही त्यामुळे माझा जीव कासावीस होतो. देवा मला तुझी प्राप्ती कशी होईल याबद्दल मला उपायसांग पण मृगजळाप्रमाणे असलेल्या या संसारात मला गुंतवून नकोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझे आता एवढेच हित करावे या त्रिविध तापाच्या अग्नीतून मला बाहेर काढावे.
अभंग क्र. 272
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणामोल ॥१॥
पायरी प्रतिमा एकचि पाषाण । परि ते महिमान वेगळेचि ॥२॥
तुका म्हणे तैसा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥
अर्थ
तलवार वस्तारा आणि विळा हे सर्वकाही लोखंडापासून तयार झालेले असतात परंतु प्रत्येकाचे गुण हे भिन्न भिन्न असल्यामुळे मोलही भिन्नभिन्न आहेत. पायरी आणि देवाची प्रतिमा ही एकाच दगडापासून बनलेली असते परंतु देवाची प्रतिमा ही पायरीपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्याचा महिमा हि अधिक श्रेष्ठ असतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच संत आणि सामान्य माणसे ही दिसण्यास जरी सारखी असली तरी संतांचा महिमा हा सामान्य माणसापेक्षा श्रेष्ठ असतो.
अभंग क्र. 273
काहीच मी नव्हे कोणिये गावीचा । एकट ठायीचा ठायी एक ॥१॥
नाही जात कोठे येत फिरोनिया । अवघेचि वायाविण बोले ॥धृपद॥
नाही मज कोणी आपुले दुसरे । कोणाचा मी खरे काही नव्हे ॥२॥
नाही आम्हा ज्यावे मरावे लागत । आहो अखंडित जैसे तैसे ॥३॥
तुका म्हणे नामरूप नाही आम्हा । वेगळा या कर्मा अकर्मासी ॥४॥
अर्थ
मी काहीही नाही मी कोणत्याही गावाचा नाही मी एकटाच आहे जे ठायीच्या ठायी म्हणजे सर्वत्र आहे असे ब्रम्ह ते मी आहे. मी कोठे जातही नाही आणि फिरुन परत येत नाही मी जे काही बोलतो आहे ते सर्व व्यर्थ आहे. माझे या जगतामध्ये कोणी आपले नाही कोणीही परके नाही व खरोखर पाहायला गेले तर मीही कोणाचा नाही. आम्हाला कधी जगावे किंवा मरावे लागत नाही आणि अखंड जसे आहोत तसेच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नावही नाही व रूपही नाही आम्ही या कर्म अकर्मापासून वेगळे आहोत.
अभंग क्र. 274
न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥
काय तुम्ही येथे नसालसे झाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥धृपद॥
परचक्र कोठे हरीदासांच्या वासे । न देखिजेत देशे राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणे झाले ॥३॥
अर्थ
हे देवा माझ्या डोळ्याने मला लोकांचे दुःख पाहवत नाही माझे चित्त त्यांच्या दुखाने दुखी होत आहे. हे देवा अरे तुम्ही येथे नाही की काय कारण तुम्ही असताना आम्हाला हे दुःख दिसले नाही पाहिजे. आहो देवा हरिदासांवर असे परचक्र येणे हे बरोबर नाही एवढेच काय जेथे हरी दास राहतात तेथे कुठल्याही प्रकारचे आक्रमण होणे हे बरोबर नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतके दिवस मी तुझी भक्ती करून देखील संकटकाळी तू मदतीला येत नाहीस याचा अर्थ माझ्या भक्तीला तू लाजविले आहेस म्हणजेच माझे जगणे ही हिनच आहे.
अभंग क्र. 275
काय म्या मानावे हरीकथेचे फळ । तरिजे सकळ जनी ऐसे ॥१॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडे विठ्ठला परचक्र ॥धृपद॥
पापाविण नाही पाप येत पुढे । साक्षसी रोकडे साक्ष आले ॥२॥
तुका म्हणे जेथे वसतील दास । तेथे तुझा वास कैसा आता ॥३॥
अर्थ
हे देवा हरीकीर्तन केल्याने सर्व जण तरतात असे मी मानावे का ? हे देवा आमच्यावर संकट येणे म्हणजे सरळसरळ परमार्थाचा उच्छेद चालू आहे असे वाटते. पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही याचा प्रत्यय प्रसंगाने समोर येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात जेथे तुझे भक्त राहतात तेथे तुमचा वास आहे हे तुमचे म्हणणे आम्ही खरे कसे मानावे ?
अभंग क्र. 276
भीत नाही आता आपुल्या मरणा । दुःखी होता जना न देखवे ॥१॥
आमची तो जाती ऐसी परंपरा । का तुम्ही दातारा नेणा ऐसे ॥धृपद॥
भजनी विक्षेप तेचि पै मरण । न वजावा क्षण एक वाया ॥२॥
तुका म्हणे नाही आघाताचा वारा । ते स्थळी दातारा ठाव मागे ॥३॥
अर्थ
मी आता माझ्या मरणाला भीत नाही पण परंतु या लोकांचे दुःख पाहून मला त्यांचे दुःख सहन होत नाही. व देवा आम्हा हरिदासांची अशी परंपरा आहे कि कितीही संकट आले तरीही भ्यायचे नाही हे देवा तुम्हाला हे कसे समजत नाही ? भजनांमध्येविक्षेप येणे हेच खरे मरण आहे तुझ्या नामचिंतणा वाचून एक क्षणही वाया जाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला असे निर्भय स्थान दे कि ज्या ठिकाणी तुझ्या भजनात कुठल्याही प्रकारचा विक्षेप होणार नाही कुठल्याही प्रकारचे भय राहणार नाही व आता जे संकट आले आहे त्याचे तू निवारण कर.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















