२५ जानेवारी, दिवस २५, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी ३२६ ते ३५०, सार्थ तुकाराम गाथा अभंग २८९ ते ३००

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२५ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 25 January

राम कृष्ण हरी आज दिनांक २५ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

326-2
जैसे जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धावे । तैसे बुद्धीसि होती भवे । धनुर्धरा ॥326॥
जसे जन्मांधाला काही कारणामुळे पळण्याची वेळ आली की तो अगतिकपणे (गोंधळुन जातो) दीन होऊन सैरावैरा (दिशाहीन)धावू लागतो. त्याप्रमाणे अर्जुना बुद्धिला भ्रांती होते.
327-2
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हे उपडे । ज्ञानजात ॥327॥
अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजुंनी (घोटाळ्यात पडते, कुचंबणा होते) चक्रात सापडते. त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते.
328-2
चैतन्याचा भ्रंशी । शरीरा दशा जैशी । पुरुषा बुद्धिनाशी । होय देखे ॥328॥
शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे देहाची शरीराची जशी दशा होते. तशीच स्थिती बुद्धी नष्ट झाल्यावर त्या जिवाची होते.
329-2
म्हणोनि आइके अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना । मग प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरो शके ॥329॥
म्हणून अर्जुना ! ऐक. जळणाला (ज्वलनशील पदार्थाला) एखादी लहान ठिनगी (मनात एखादा दुष्ट विचार, अविचार, ) जर लाकडाला लागली व ती एकदा का भडकली (मोठा अग्नी प्रज्वलित होतो) मग तीच लहान ठिनगी त्रिभुवनाला देखील जाळण्यास समर्थ होते.
330-2
तैसे विषयांचे ध्यान । जरी विपाये वाहे मन । तरी येसणे हे पतन । गिंवसीत पावे ॥330॥
त्याच प्रमाणे मनाकडून नकळत देखील विषयांचे स्मरण, चिंतन अंतःकरणात (चुकून यत्किंचितही जरी झाले, ) तरी एवढा (अनर्थ, ) पतन त्यास शोधित येते.
331-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥2. 64॥

भावार्थ :-

ज्या पुरुषाने आपले अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, जो प्रीति व द्वेष रहित आहे, त्याने (त्याने म्हणजे कोण ? आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी असा तो) विषयाचा उपभोग घेतला असता अशा पुरुषास अंतःकरणाची (मनाची) प्रसन्नता अखंड राहते.

म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावे । नाशतील ॥331॥
म्हणून (साधकाने) हे सर्व विषय मनातून काढून टाकावे. (अर्थातच विषयातील अनित्यत्व, जडत्व, मिथ्यात्वादि दोषदर्शनाने त्यापासून परावृत्त व्हावे. ) म्हणजे राग, प्रिती, आणि द्वेष हे आपोआपच नाहीसे होतील.
332-2
पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष । तरी इंद्रिया विषयी बाधक । रमता नाही ॥332॥
पार्था ! आणखी एक गोष्ट ऐक. राग आणि द्वेष नाहिसे झाल्यावर, जरी इंद्रिये विषयाचे ठिकाणी कदाचित रममाण झाली तरी ते विषय साधकाला बाधक होत नाही.
333-2
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरी जगाते स्पर्शतु । तरी संगदोषे काय लिंपतु । तेथिचेनि ॥333॥
ज्याप्रमाणे सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी सार्‍या जगाला स्पर्श करतो, परंतु त्यांच्या संगदोषाने सूर्य लिप्त होतो काय ? (तर नाही)
334-2
तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥334॥
त्याप्रमाणे जो (ज्ञानी) विविध विषयांचे ठिकाणी उदासीन, अनासक्त असतो, आत्मनंदात रंगून गेलेला असतो, कामक्रोधा पासून अलिप्त असतो,
335-2
तरी विषयातुही काही । आपणपेवाचुनि नाही । मग विषय कवण कायी । बाधीतील कवणा ॥335॥
आणि ज्याला सर्व विषयामध्ये आपल्या आत्मस्वरूपाहून भिन्न असे दुसरे काही दिसत नाही, मग त्याला विषय कोणते, कोणाला आणि कशी बाधा करतील ?

336-2
जरी उदके उदकी बुडीजे । का अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो ॥336॥
जसे पाण्यात पाणी बुडाले (बुडत नाही) किंवा अग्नीच्या ज्वालेने अग्नी पोळला गेला, (अग्नित अग्नि जळत नाही). तसेच परिपूर्ण (आत्मज्ञानाने परिपूर्ण) अवस्थेला पावलेला पुरूष विषयांचे संगतीने लिप्त होत नाही.
337-2
ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ । तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानी ॥337॥
असा जो विश्वचैतन्याशी एकरूप होऊन राहतो (शुद्ध आत्मस्वरूप) होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, (स्थिरबुद्धि) असे तू निःसंशय समज.

338-2
प्रसादे सर्वदुःखाना हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥2. 65॥

भावार्थ :-

चित्त प्रसन्न झाले, म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्या साधकाची बुद्धी प्ररमात्मास्वरूपी लवकर स्थिर होते.

देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथे रिगणे नाही समस्ता । संसारदुःखा ॥338॥
असे पहा की, ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता (मनाची निरंतर पूर्ण शांती) भरलेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारचे संसार सुखदुःखांचा प्रवेश होत नाही.
339-2
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहीचि नाही ॥339॥
अरे ! ज्याच्या उदरात अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला कधीही तहान-भुकेची (कधी पीडा अथवा) भीती नसते.
340-2
तैसे हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचे के आहे । तेथ बुद्धि आपैसी राहे । परमात्मरूपी ॥340॥
त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, त्याला दुःख कसले, आणि कोणाला होणार ? कारण तेथे त्याची बुद्धी आपोआपच परमात्मस्वरूपी स्थिर झालेली असते.

341-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥341॥
ज्याप्रमाणे निवार्यातील दिव्यांची ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त म्हणजे जो स्थिरबुद्धि पुरुष (आत्मस्वरूप समाधीमध्ये) सत्स्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला असतो.

342-2
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥2. 66॥
भावार्थ :-

जो साधना करीत नाही, त्या पुरुषाच्या अंतःकरणात सद्बुद्धी नसते, आस्तिकभाव नसतो. अशा पुरुषाला शांती नसते; त्यामुळे त्याला सुख तरी कोठून मिळणार. (म्हणजेच ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती लाभणार नाही मग समाधान कसे प्राप्त होईल. )

ये युक्तीचि कडसणी । नाही जयाचा अंतःकरणी । तो आकळिला जाण गुणी । विषयादिकी ॥342॥
योगयुक्त होऊन राहण्याचा (म्हणजे योगबुद्धीचा) विचार ज्याच्या अंतःकरणात नाही, त्याला शब्दादिक विषय आपले पाशाने जखडून टाकतात.
343-2
तया स्थिरबुद्धि पार्था । कही नाही सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥343॥
हे अर्जुना ! स्थिरतेची इच्छा ज्याचा अंतःकरणात कधी उत्पन्न होत नाही, त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. (स्थिरता लाभावी असे त्याची बुद्धी इच्छा सुद्धा करत नाही)
344-2
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखे मना । तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥344॥
ज्या स्थिरपणाची नुसती भावनाही ज्याच्या मनाला शिवत नाही, तर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार ? (शांतीच लाभणार नाही)
345-2
आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाही । तेथ सुख विसरोनि न रिगे कही । जैसा पापियाचा ठायी । मोक्षु न वसे ॥345॥
जसे पापी मनुष्याकडे मोक्ष चुकूनदेखील पाहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये शांती नाही, तेथे सुख नजर चुकीने सुद्धा (नकळत सुद्धा) प्रवेश करत नाही.

346-2
देखे अग्निमाजी धापती । तिये बीजे जरी विरुढती । तरी अशांत सुखप्राप्ती । घडो शके ॥346॥
असे पहा की ! विस्तवावर घातलेली (भाजलेली, करपलेली) धान्याची बी जर उगवली (नाही उगवणार) तसच हृदयात शांती नसलेल्या मनुष्यास सुखप्राप्ती होऊ शकेल. (तर नाहीच घडणार)
348-2
म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे । या कारणे इंद्रियांचे । दमन निके ॥347॥
म्हणूनच मनाचे चंचलत्व (त्यांचे नियमन न करणे) हेच सर्वतोपरी दुःखाचे कारण आहे. ह्या करीता (साधकाने) इंद्रियांचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे. (करणे हे चांगले आहे)

348-2
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥2. 67॥
भावार्थ :-

कारण जे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या मागे धावत राहते, ते मन पाण्यातील नावेला वारा ज्याप्रमाणे भलतीकडे घेऊन जात असतो, त्याप्रमाणे मानवाच्या बुद्धीला वेगळ्याच मार्गाकडे घेऊन जातो.

ये इंद्रिये जे जे म्हणती । ते तेचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु ॥348॥
(जे पुरूष) इंद्रिये जे जे म्हणतात तेच ते पुरुष करत असतात. (इंद्रियांच्या इच्छेनुसार वागतात), ते या विषयरूपी सागरातून आपण तरलो आहोत, असे त्यांना वाटते (असे म्हणत असतील) तरी, ते तरले नाहीत, असे समजावे.
349-2
जैसी नाव थडिये ठाकिता । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥349॥
जर एखादी नाव तीराजवळ आली आणि (त्याच वेळी प्रचंड वादळात सापडली गेली), त्याच वेळी प्रचंड वादळ उत्पन्न झाले, ती ज्या संकटांना चुकवून तीरापर्यंत आली त्याच आपत्तीत (संकटात) पुन्हा सापडते. (तोच अपाय तिला पोचतो)
350-2
तैसी प्राप्तेही पुरुषे । इंद्रिये लाळिली जरी कौतुके । तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिके ॥350॥
पाहा, आत्मप्राप्ती झालेल्या (पारमार्थिक पुरुषाने)(ज्ञानसंपन्न) पुरूषाने सहजपणे इंद्रियांचे कौतुकाने लाड केले, लाड पुरविले तरी तो पुन्हा संसार दुःखाच्या चक्रात पुन्हा सापडला जातो, असे समज.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2. 68॥

भावार्थ :-

म्हणून हे महाबाहो, ज्या मानवाची इंद्रिये, इंद्रियांच्या विषयापासून संपूर्णपणे आवरलेली (अलिप्त) असतात, त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली, असे समज.

दिवस २५ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८९ ते ३००
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. 289
शांतीपरते नाही सुख । येर अवघेची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥धृपद॥
खवळलिया कामक्रोधी । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३॥
अर्थ

चित्तात शांती असेल तर सुख प्राप्त होते बाकी सर्वत्र दुखच आहे. म्हणून तुम्ही चित्तात शांती धारण करा मग तुम्ही भवसागर तरून जाताल. चित्तात काम क्रोध जर खवळले तर शरीरात व्याधी निर्माण होतात. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चित्तात शांती धारण करा मग तुमचे त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतील.


अभंग क्र. 290
गोडीपणे जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आता भजो कवणे परी । देव सबाह्य अंतरी ॥धृपद॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामी । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥
अर्थ
जसा गुळामध्ये सर्वत्र गोडपणा असतो तसाच देव आमच्यासाठी सर्वत्र झाला आहे. आता मी देवाचे भजन कसे करु कारण देवच माझ्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापक आहे आत आणि बाहेर तोच आहे. पाण्याहून वेगळे पाण्याचे उठणारे तरंग नसतात. तुकाराम महाराज म्हणतात तसेच सोने आणि अलंकार हे जरी वेगळे वेगळे आहेत पण आहेत ते एकच तसेच देव आणि भक्त हे जरी वेगवेगळे असले तरी ते एकच आहेत.


अभंग क्र. 291
परमेष्ठिपदा । तुच्छ मानिती सर्वदा ॥१॥
हेचि ज्यांचे धन । सदा हरीचे स्मरण ॥धृपद॥
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥
सार्वभौमराज्य । त्यासि काही नाही काज ॥३॥
पाताळीचे आधिपत्य । ते तो मानिती विपत्य ॥४॥
योगसिद्धिसार । ज्यासि वाटे ते असार ॥५॥
मोक्षा येवढे सुख । सुख नव्हेचि ते दुःख ॥६॥
तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥
अर्थ

परमपदाला देखील हरिभक्त तुच्छ मानतात. त्यांचे धन म्हणजे सदा सर्वकाळ हरीचे चिंतन करणे होय. त्यांना इंद्रपद म्हणजे भोग नाही तर भवरोग वाटते. सार्वभौम राज्य जरी असले तरी त्यांना त्याच्याशी काहीही कर्तव्य नसते. पाताळातील अधिपत्य म्हणजे अंगावर आपत्ती ओढून घेणे असे ते मानतात. योग केल्यावर त्यात सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धी तर भक्तांना असार वाटतात. मोक्षा सारखे सुख देखील त्यांना दुख वाटते. तुकाराम महाराज म्हणतात हरी वाचून त्यांना सर्व शीण वाटतो.


अभंग क्र. 292
मोहीऱ्याच्या संगे । सुत नव्हे आगी जोगे ॥१॥
नाही तरी त्याचे भक्ष । काय सांगणे ते साक्ष ॥धृपद॥
स्वामीचिया अंगे । रूप नव्हे कोणाजोगे ॥२॥
तुका म्हणे खोडी । देवमणी नेदिती दडी ॥३॥
अर्थ
मोहरा नावाच्या मण्याला दोरा सुत गुंडाळले तर ते अग्नीत जरी टाकले तरी ते जळत नाही. नाहीतर सुताला जर अग्नीत टाकले तर ते जळणारच हे सांगायला कोणाची साक्ष जरुरी नाही. तसेच त्या मण्याप्रमाणे माझा स्वामी म्हणजे विठ्ठल परमात्मा याचा माझ्याशी संग असला कि मला कसलीही भीती नाही. तुकाराम महाराज म्हणतात घोड्याच्या गळ्यात जर देव मणी घातला तर तो घोडा कितीही खट्याळ असला तरी त्याचा तो दोष लपून जातो.


अभंग क्र. 293
मजसवे नको चेष्टा । नव्हे साळी काही कोष्टा ॥१॥
बैस सांडोनि दिमाख । जाय काळे करी मुख ॥धृपद॥
येथे न सरे चार । हीण आणीक व्यापार ॥२॥
तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥
अर्थ

भजनात व्यत्यय आणणाऱ्या दुर्जनाला महाराज म्हणतात अरे तु माझी चेष्टा करू नकोस मी काही साळी किंवा कोष्टी सामान्य नाही. तुझ्या मोठेपणाचा दिमाख सोडून इथे उगाच बस नाहीतर येथून चालता हो तुझे तोंड काळे कर. तुझा हा व्यापार वाईट वागणे हे माझे जवळ चालायचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्हाला सरस काय आणि निरास काय हे चांगले माहीत आहे.


अभंग क्र. 294
भाव देवाचे उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥
धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैचा तेथे चित्ती ॥धृपद॥
बहुत बराडी । देवा वरी आवडी ॥२॥
तुका म्हणे हे रोकडे । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥
अर्थ

भगवंत भक्तीमध्ये भावच सर्वश्रेष्ठ आहे किंबहुना भक्तीभावच देव आहे. शुद्ध भाव असणारे भक्त खरोखर धन्य धन्य आहेत कारण त्यांच्या मनात भगवंताविषयी संदेह कसा असू शकतो. जे खरे भक्त असतात ते वाच्या प्रेमा विषयी हावरे असतात त्यांचे देवांवर अतिशय प्रेम असते. तुकाराम महाराज म्हणतात असेच भक्त भगवंत प्राप्तीचे खरे अधिकारी आहेत हे उघड आहे.


अभंग क्र. 295
गौरव गौरवापुरते । फळ सत्याचे संकल्प ॥१॥
कठिण योगाहुनि क्षेम । ओकलिया होतो श्रम ॥धृपद॥
पावले मरे सिवेपाशी । क्लेश उरतती क्लेशी ॥२॥
तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणी ॥३॥
अर्थ

मान सन्मान हा त्यावेळी गौरवा पुरता असतो पण खरे फळ म्हणजे सत्यसंकल्प करणे म्हणजे हरी नाम घेणे यातच आहे. प्राप्तीपेक्षा प्राप्त झालेली कोणतीही गोष्ट असेल तर त्याचे रक्षण करणे अवघड आहे जसे एखाद्याने सुग्रास जेवण केले पण त्याला ते पचन न होता वांती झाली तर ते व्यर्थ श्रम होय. एखादा मनुष्य वनातून जात असताना त्याच्या मागेच चोर लागले म्हणून धावत सुटतो आणि गावाच्या शिवा जवळ जाऊन मरण पावतो म्हणजे त्याने सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला पण त्याच्या पदरात शेवटी श्रममिळून तो शेवटी मरण पावतो. तुकाराम महाराज म्हणतात शूर पणाचा आव आणणारे लोक हे प्रत्यक्ष रणांगणात गेले तर त्यांना कठीण वाटते.


अभंग क्र. 296
न संडी अवगुण । वर्मे मानीतसे सिण ॥१॥
भोग देता करिती काई । फुटता यमदंडे डोई ॥धृपद॥
पापपुण्यझाडा । देता तेथे मोठी पीडा ॥२॥
तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
अर्थ

दुष्ट माणसे कधी ही आपला अवगुण टाकीत नाहीत पण त्यांचा दोष त्यांना दाखवला कि मग त्यांना राग येतो. साधे त्यांना दोष जरी सांगितले तरी त्यांना सहन होत नाही पण पुढे मात्र यमाच्या स्वाधीन झाल्यावर डोक्यात यम दंड पडल्यावर हे काय करणार आहेत. यमलोकात पाप-पुण्याचा झाडा करताना फार मोठे दुख भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात मी अशा लोकांना बोललोतर हे कष्टी होतात पण हे विठ्ठला मी हे त्यांच्या भल्या करतात बोलतो आहे..


अभंग क्र. 297
पावे ऐसा नाश । अवघिया दिला त्रास ॥१॥
अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥धृपद॥
आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥
तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥
अर्थ

मीआता पर्यंत कोणाला जर त्रास दिला असेल तर त्याचा आता नाश होईल, ते अशा प्रकारे म्हणजे मला जे त्रास होणार आहेत ते त्रास सर्व तो विठ्ठलच भोगत आहे कारण तो अवीट आहे. त्या पांडुरंग संग केल्यामुळे आमचा सर्वाशी संबंध आला आहे व त्या योगाने प्रेमसंबंधाचा स्वयंपाक मला खाण्यास मिळाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मला मिळालेल्या तृप्तीची काही सीमाच नाही.


अभंग क्र. 298
दुर्बळ हे अवघे जन । नारायणी विमुख ॥१॥
सांडोनिया हात जाती । पात्र होती दंडासी ॥धृपद॥
सिदोरी ते पापपुण्य । सवेसिण भिकेचा ॥२॥
तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥
अर्थ

सर्व लोक या नारायणाच्या ठिकाणी विन्मुख झाले आहेत त्यामुळे ते दुर्बळ आहेत. या मृत्यू लोकांमध्ये स्वतःचे स्वहित न जाणता मरण पावतात व नंतर यम दंडास पात्र होतात. नंतरच त्यांच्याबरोबर पापपुण्याची शिदोरी असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या योनीत फिरण्याचे दुःख प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात खोट्याचा प्रवाह या जगामध्ये कसा वाहत आहेत ते पहा.


अभंग क्र. 299
वाजतील तुरे । येणे आनंदे गजरे ॥१॥
जिंकोनिया अहंकार । पावटणी केले शिर ॥धृपद॥
काळा नाही वाव । परिश्रमा कोठे ठाव ॥२॥
तुका म्हणे आता । सोपे वैकुंठासी जाता ॥३॥
अर्थ

मला हरिप्राप्ती झाली आहे त्यामुळे मी आनंदाने मोठ्या गजराने नगारे वाजवीत आहे. मी अहंकाराला जिंकले आहे व त्या अहंकाराचा डोक्याची पायरी केले आहे व ती चढुन मी वर गेलो आहे. या ठिकाणी जर काळालाच वाव नाही तर जन्ममरणाच्या परिश्रमाला कोठे ठाव असणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात जर अहंकारच राहिला नाही मग आता आम्हाला वैकुंठाला जाण्यास कसलीही भीती नाही.


अभंग क्र. 300
झाड कल्पतरू । न करी याचकी आव्हेरू ॥१॥
तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरता धर्म ॥धृपद॥
परिसा तुमचे देणे । तो त्या जागे अभिमाने ॥२॥
गाऱ्हाण्याने तुका । गर्जे मारुनिया हाका ॥३॥
अर्थ

कल्पतरू हे झाड असून ते कोणत्याही याचकाचा कधीही अव्हेर करीत नाही. आणि देवा तुम्ही तर सर्वोत्तम असूनही याचिका ची इच्छा पूर्ण करत नाहीत याला काय म्हणावे ? लोखंडाला सोने बनवणे हे परिसाचे अंगी तुम्ही गुण दिला आहे तो बिचारा त्याचे काम करतो आहे तेही न विसरता व अभिमानाने करतो. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्यापुढे गाह्रणे मोठ्या आवाजात गर्जुन पुढे मांडत आहे.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading