आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

९ जानेवारी, दिवस ९, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ९७ ते १०८
“९ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 9 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 1 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
201-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे । परि कळिकेमाजी सापडे । कोवळिये ॥201॥
भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येंच अडकून पडतो. ॥201॥
202-1
तेथ उत्तीर्ण होईल प्राणे । परि ते कमळदळ चिरू नेणे । तैसे कठिण कोवळेपणे । स्नेह देखा ॥202॥
तो त्याठिकाणी प्राणास मूकेल; परंतु कमळाविषयीच्या स्नेहामूळे तो कमळ-कळी कोरून बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे आपल्या आप्त लोकांची मोह-ममता कोवळी असली, तरी त्यातून बाहेर पडणे महाकठीण आहे. ॥202॥
203-1
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया । म्हणौनि भुलविला ऐके राया । संजयो म्हणे ॥203॥
संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा ! हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळली जात नाही; म्हणूनच या मायेने अर्जुनालाही मोहित केले आहे. ॥203॥
204-1
अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥
हे राजा ! मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून, लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥04॥
205-1
कैसी नेणो सदयता । उपनली तेथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥205॥
तेथे त्याच्या मनात कोठून दयाभाव उत्पन्न झाला कोण जाणे ! मग तो म्हणाला, हे कृष्णा, आपण येथे राहू नये, हे बरे. ॥05॥
206-1
माझे अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणे नांवे ॥206॥
ह्या सर्वास मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळु लागते. ॥06॥
207-1
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥1. 31॥
भावार्थ :–
हे केशवा ! मला ही सर्व लक्षणे विपरीत दिसत आहेत; आणि युद्धामध्ये स्वजनांना मारिले असता कोणतेही श्रेय (प्राप्त होईल असें) मला दिसत नाही. ॥31॥
या कौरवा जरी वधावे । तरी युधिष्ठीरादिका का न वधावे । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥207॥
या कौरवाना मारणे जर योग्य असेल, तर धर्मराजादिकाचा वध करण्याला काय हरकत आहे ? कारण की हे सर्व आणि आम्ही एकमेकांचे नातलग आहोत. ॥07॥
208-1
म्हणोनि जळो हे झुंज । प्रत्यया न ये मज । एणे काय काज । महापापे ॥208॥
याकरिता आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे ? ॥08॥
209-1
देवा बहुतापरी पाहता । एथ वोखटे होईल झुंजता । वर काही चुकविता । लाभु आथी ॥209॥
हे देवा ! अनेक दृष्टीनी विचार केला असता (असे वाटते की) या वेळी युद्ध केले, तर (त्याचा परिणाम) वाईट होईल; पण ते जर टाळले तर काही लाभ होईल. ॥09॥
210-1
न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥1. 32॥
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥1. 33॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥1. 34॥
भावार्थ :-
हे श्रीकृष्णा ! मला विजयाची आकांशा नाही किंवा राज्याची आणि सुखाची आत्ता इच्छा उरलेली नाही. हे गोविंदा ! राज्य, सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग ? अथवा आंम्हाला जगुन तरी काय उपयोग ? ॥32॥
जांच्याकरिता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे स्वजन संपत्ती आणि जीवाची पर्वा न करता युद्धासाठी उभे टाकले आहेत. ॥33॥
आचार्य, वडील, पुत्र, त्याप्रमाणे आजोबा, मामा, सासरे, नातू, मेव्हणे, आणि इतर नातलग येथे युद्धासाठी जमले आहेत. ॥34॥
तया विजयवृत्ती काही । मज सर्वथा काज नाही । एथ राज्य तरी कायी । हे पाहुनिया ॥210॥
अशा प्रकारे विजय प्राप्त करण्याची मला मुळीच इच्छा नाही. गोत्रजांना ठार मारून मिळविलेले राज्य तरी काय करायचे ? ॥210॥
211-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
या सकळांते वधावे । मग हे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥211॥
अर्जुन म्हणाला, या सर्वाना मारून जे भोग भोगावयाचे, त्या सगळ्यांना आग लागो ! ॥211॥
212-1
तेणे सुखेविण होईल । ते भलतैसे साहिजेल । वरी जीवितही वेचिजेल । याचिलागी ॥212॥
त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखांच्या अभावी, जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असेल तरीहि सहन करता येईल. इतकेच काय ? त्यांच्या करिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल; ॥212॥
213-1
परी यासी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हे स्वप्नीही मन माझे । करू न शके ॥213॥
परंतु त्यांचे प्राण घ्यावे आणि आपण राज्यसुख भोगावे, ही गोष्ट स्वप्नातदेखील माझ्या मनात येणार नाही. ॥213॥
214-1
तरी आम्ही का जन्मावे । कवणलागी जियावे । जरी वडिला या चिंतावे । विरुद्ध मने ॥214॥
जर या वडील माणसांचे अहित मानाने चिंतवायचे, तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय व आम्ही जगावे तरी कोणासाठी ? ॥214॥
215-1
पुत्राते इच्छी कुळ । तयाचे कायि हेचि फळ । जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुले ॥215॥
कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की, त्याने आपल्या आप्तेष्ठांचा केवळ वधच करावा ? ॥215॥
216-1
हे मनीचि केवि धरिजे । आपण वज्राचेया होईजे । वरी घडे तरी कीजे । भले इया ॥216॥
यांच्या वधाचा विचार आपण मनात तरी कसा आणावा ? यांच्यासाठी वज्रासारखे कठोर तरी कसे व्हावे ? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितचं करांवे. ॥216॥
217-1
आम्ही जे जे जोडावे । ते समस्ती इही भोगावे । हे जीवितही उपकारावे । काजी यांच्या ॥217॥
आम्ही जे जे मिळवावे, ते ते या सर्वानी (वास्तविक) भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणहि खर्च करावेत. ॥217॥
218-1
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुले जे ॥218॥
आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकावे आणि आपल्या कुळास संतुष्ट करावे. ॥218॥
219-1
तेचि हे समस्त । परी कैसे कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥219॥
परंतू कर्माची गती किती विपरीत आहे, ते पाहा. तेच आमचे सर्व गोत्रज आपसात लढावयास तयार झाले आहेत ! ॥219॥
220-1
अंतौरिया कुमरे । सांडोनिया भांडारे । शस्त्राग्री जिव्हारे । आरोपुनी ॥220॥
बायका, मुले, आपली सर्व संपत्ती या सर्वाना सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन जे युद्धासाठी तयार झाले आहेत. ॥220॥
221-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एसियाते कैसेनि मारू ? । कवणावरी शस्त्र धरू ? । निजहृदया करू । घातु केवी ? ॥221॥
अशांना मी मारू तरी कसा ? मी कोणावर शास्त्रांचा प्रहार करू ? (हे कौरव म्हणजे आम्हीच. आम्ही सारे एकाच कुळातील आहोत, त्यामुळे यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो) आपल्या काळजाचा घात कसे करू ? ॥221॥
222-1
हे नेणसी तू कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हा बहुत ॥222॥
हे श्रीकृष्णा ! युद्धासाठी आमच्यासमोर कोण उभे आहेत, तू जाणत नाहीस काय ? ज्यांचे आमच्यावर अनन्यसाधारण (असामान्य) उपकार आहेत, असे पितामह भीष्म व गुरू द्रोणचार्या, ते पलीकडे आहेत पाहा. ॥222॥
223-1
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु की हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥223॥
या ठिकाणी मेव्हणे, सासरे, मामा आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि आप्तही आहेत ॥223॥
224-1
अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि दोष आथी वाचे । बोलिताचि ॥224॥
हे देवा ऐक, येथे आमचे अतिशय जवळचे असे हे आमचे सोयरे आहेत; आणि म्हणूनच यांचा वध करावा, असे वाणीने नुसते बोलणे, हे सुद्धा पाप होईल. ॥224॥
225-1
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥1. 35॥
भावार्थ :–
हे मधुसुदना ! हे स्वजन मला ठार मारण्यासाठी येथे आले आहेत. त्रैलोक्याचे राज्य मिळालं तरीही, मी यांना ठार मारण्याची इच्छा करीत नाही. मग पृथ्वीच्या राज्याची कथा काय ? ॥35॥
हे वरी भलते करितु । आताचि येथे मारितु । परि आपण मने घातु । न चिंतावा ॥225॥
उलटपक्षी हे वाटेल ते करोत अथवा आम्हास मारोत; परंतु यांचा घात करण्याचा विचारदेखील मनातही आणणे बरे नाही. ॥225॥
दिवस ९ वा, ९ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९७ ते १०८
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ९७
काही नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार । जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥धृपद॥
अखंड अशुभ वाणी । खरे न बोले स्वप्नी । पापी तयाहुनी । नाही आणीक दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूती दया नाही ज्याला । पाठी लागे आल्या । अतिताचे द्वारेशी ॥३॥
काही संतांचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण । यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनी । गेली म्हणता मी माझे ॥५॥
अर्थ
दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल असतो. त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवास भोगत असतात. त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुध्दा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडणार नाही. तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलुन देतो. त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्ती जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यात ते रमुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही.
अभंग क्र. ९८
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावे ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशी कारण नाही देवा ॥२॥
आशाबद्ध नये करू ते करिती । तुका म्हणे जाती नरकामधी ॥३॥
अर्थ
जी व्यकि आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करुन धन मिळवतो, ती वृत्तीने चांडाळ आहे. मनुष्या मधील गुण-अवगुण परमेश्वर पाहतो, जात पाहत नाही. ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थ गुण आहे, ती व्यक्ती भगवंतला अतिप्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचे गुण नाही; ती व्यक्ती देवाल अप्रिय आहे; मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे आश्यावादि लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात.
अभंग क्र. ९९
हरीहरा भेद । नाही करू नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ॥धृपद॥
भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥२॥
उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥३॥
अर्थ
हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये. कारण ते दोन्ही एकच आहे, जसे साखर आणि तिची गोडी. फरक करणार्यांच्या डोळ्याला केवळ एका वेलांटिचा फरक दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात, उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे सारखेच आहे.
अभंग क्र. १००
वक्त्या आधी मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाही उचित ॥१॥
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचे पाळण । सकळी सत्य करावे ॥धृपद॥
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळी । ते मर्यादा करावी ॥२॥
वरासनी पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणे । सोनियाची परी नीच ॥३॥
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचे कारण । तया ठायी अळंकार ॥४॥
सेवका स्वामीसाठी मान । त्याचे नाम त्याचे धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत यदर्थी ॥५॥
अर्थ
परमार्थाविषयी बोलणाऱ्यास आगोदर गंध, फुल, अक्षतादि पुजेचा मान दिला पाहिजे. श्रोता जरी संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मानसन्मान करू नये. ज्याप्रमाणे देहामधे मस्तक श्रेष्ट आहे, म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे; नंतर क्रमशः हात, पाय यांचे पूजन करावे; असा धर्मादेश आहे आणि तोच सर्वानी पाळावा. ज्याप्रमाणे पुत्र वयाने जरी बापापेक्षा लहान असला आणि तो राज्याच्या आसनावरती बसलेला असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो; त्या प्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठत्व पहावी आणि त्यांनाच प्रमाण मानावे. देवाची मूर्ति जरी पाषाणांची असेल तरी ती देव्हार्यातच ठेवावी, देवाची उपकरन चांदी, सोन्याची असली तर ती खाली ठेवावित. देव्हार्यात देव ठेवतात, मौल्यावान भांडी नव्हे. एकान सोन्याचे पैजनी केले आणि काचेचा मुकुटमणि केला तरी पैंजन पायातच आणि मुकुट डोक्यावरच घातला पाहिजे. जेथला अलंकार त्या जागीच घातला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात सेवकांना मालकामुळे नावलौकिक मिळतो, तेच त्याचे धन आहे; त्याच प्रमाणे संतहो तुम्ही मालक आहात आणि मी तुकचा सेवक आहे.
सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200
अभंग क्र. 101
घरी रांडा पोरे मरती उपवासी । सांगे लोकापासी थोरपण ॥१॥
नेऊनिया घरा दाखवावे काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
तुका म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नव्हो ॥३॥
अर्थ:-
समाज्यात काही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशी असतात; पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात. कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोंड चुकवितात. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही.
अभंग क्र. 102
जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलो वेसकर ॥१॥
मागील पुढील करा झाडा । नाही तरी खोडा घालिती जी ॥धृपद॥
फांकु नका रुजू जालिया वाचून । सांगा जी कोण घरी ती धण्या ॥२॥
आजि मायबाप करा तडामोडी । उद्या कोणी घडी राहेना हो ॥३॥
तुका म्हणे काही न चले ते बोली । अखरते साली झाडा देती ॥४॥
अर्थ:-
मायबापहो, जोहार करतो. मी आपणास जोहार करतो. मी वेसकर तुमच्याकडील कर्म-आकर्मचा सारा मागण्यांसाठी आलो आहे. तुम्हाला नम्र विनंती अशी की, मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियमाण कर्माचा प्रमेश्वरासमोर झाडा करावा. सारे भगवंतार्पण करावे. स्वत:जवळ काहीही ठेवण्याचा मोह धरु नये; नाहीतर आमचे धनि तुम्हाला जन्ममृत्युच्या खोड्यात अडकवतील जी, मायबाप ! . तुम्ही धन्यासमोर हजर न होता इतरत्र पळु नका. हा कर (सारा) भरला नाही तर धनि शिक्षा करतील. आमच्या धन्याचा हात धरु शेकेल असा जगात कोण आहे का सांगा ! . तरी मायबापहो, आज तुम्ही संचितकर्माचे किडूकमिडूक मोडून तडजोड करावी; कारण उद्या आजचि वेळ राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अखेरीस जर भगवंताला शरण झले नाही तर सारा भरण्याचे राहून जाईल आणि खोडा घातल्या जाण्याचे चुकणार नाही; म्हणून लगेच सारा भरुन टाका.
अभंग क्र. 103
येऊ द्या जी काही वेसकरास । आतून बाहेर वोजेचा घास ॥१॥
जो यावे तो हातचि रिता नाही । कधी तरी काही द्यावे घ्यावे ॥२॥
तुका म्हणे उद्या लावीन मनेरा । जे हे दारोदारा भोवती फिरा ॥३॥
अर्थ
यमाचा एक प्रेषित वेसकराच्या रूपाने, कधीही दानधर्म न करणाऱ्या, हरिनाम न घेणाऱ्या, सदैव संसारात आसक्त असणाऱ्या मांणसास उपदेश करतो. ” अहो, मायबापहो, वेसकरासाठी कही पक्कन्नाचा, हरिनामाचा, दानधर्मचा घास आपल्या घरातून बाहेर येऊ द्या. मी जेव्हा-जेव्हा येथे येतो, तेव्हा-तेव्हा (तुम्ही काहीतरी कामात व्यस्त असतात); तुमचा हात रिकामा नसतोच, कधीतरी काहीतरी द्यावे, घ्यावे हे चांगले असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवा कडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करिन. मग तुम्ही पशु-पक्षाच्या देहाच्या दारा सभोवति फिरत राहल (जन्ममृत्युच्या फेऱ्यात फिरत राहल ) मायबापा ! .
अभंग क्र. 104
देती घेती परज गेली । घर खाली करूनिया ॥१॥
धावणियाचे न पडे हाती । खादली राती काळोखी ॥धृपद॥
अवघियांचे अवघे नेले । काही ठेविले नाही मागे ॥२॥
सोंगे संपादुनि दाविला भाव । गेला आधी माव वरी होती ॥३॥
घराकडे पाहू नयेसेचि जाले । अमानत केले दिवाणात ॥४॥
आता तुका कोणा न लगेचि हाती । जाली ते निश्चिंती बोलो नये ॥५॥
अर्थ:-
जी देती-घेती बुध्दी होती, ती घर खाली करून देहरुपी घर टाकुन निघुन गेली. अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली. आता माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही. त्याने सर्वच सर्वकाही नेले, काहीही मागे ठेवले नाही. स्वस्वरुपावर पडदा टाकणार्या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता, तो गेला. आता पुन्हा वळून देह रुपी घराकडे वळुन पाहू नये, असे झाले आहे आतासर्व उपाध्धीची अनामत रक्कम दिवाणात (हरी) जमा झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही त्याविषयी मी निच्छित झालो आहे. या अवस्थेचे वर्णनहि करता येत नाही.
अभंग क्र. 105
शुकसनकादिकी उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसा साता ॥१॥
उठा उठी करी स्मरणाचा धावा । धरवत देवा नाही धीर ॥धृपद॥
त्वरा झाली गरुडा टाकियेला मागे । द्रौपदीच्या लागे नारायणे ॥२॥
तुका म्हणे करी बहुत तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥
अर्थ
शुक-सनकादिक ऋषींनी आपले दोन्ही ही बाहु उभारुन सांगितले कि, पण परिक्षिति त्याच्या साधनेमुळे मात्र सात दिवसात कृतांत झाला. तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा, मग तुमच्या भेटिसाठी हरी धीर धरणार नाही. द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण गरुडाची चाल देखिल मंद आहे, हे जानवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्यावर नीतांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे.
अभंग क्र. 106
बोलिलो ते काही तुमचिया हिता । वचन नेणता क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावे । अतित्याई जीवे नाश पावे ॥धृपद॥
निंब दिला रोग तुटाया अंतरी । पोभाळिता वरी आत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासी कळे । पडती आंधळे कूपामाजी ॥३॥
अर्थ
मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगतांना अधिक-उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा. जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसु नये; नाहीतर आपलेच नुकसान होते. वैद्याने पोटशूळावर कडूनिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता पोटा वर चोळला तर रोग बरा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मुर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात.
अभंग क्र. 107
माकडे मुठीसी धरिले फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथे ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुले ते ॥धृपद॥
शुके नळिकेशी गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव काही तेथे ॥३॥
अर्थ
एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले, माकडाने त्यात हात घालून फुटाण्याची मुठ भरली, त्यामुळे मुठ बाहेर निघेणा. मुठ सोडून हात बाहेर काढवा, हे त्या माकडाला सुचले नाही मग या मधे त्या माकडाचा काही अपराध आहे काय त्याला आपले हित समजले नाही. पारादयाने लावलेल्या नळितील खाद्य खान्यासाठी पोपट नळिवर बसतो, नळि उलटी फिरते, पोपटही उलटा होतो, आपण पडू, या भीतीने तो तसाच नळीला घटट धरुन बसून राहतो. तुकाराम महाराज म्हणतात जे लोक पशुपक्षांप्रमाने असतात, त्यांच्यापुढे काही उपाय नसतो.
अभंग क्र. 108
हरी तू निष्ठुर निर्गुण । नाही माया बहु कठिण । नव्हे ते करिसी आन । कवणे नाही केले ते ॥१॥
घेऊनि हरीश्चंद्राचे वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरी वोपविली ॥धृपद॥
नळा दमयंतीचा वियोग । विघडिला त्यांचा संग । ऐसे जाणे जग । पुराणे ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूती । तुळविले अंती । तुळे मास तयाचे ॥३॥
कर्ण भिडता समरंगणी । बाणी व्यापियेला रणी । मागसी पाडोनी । तेथे दात तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वे उदार । जेणे उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळी घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरी । धरणे मांडिले मुरारी । मारविले करी । त्याचे बाळ त्याहाती ॥६॥
तुज भावे जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाही रे पुढती । तुका म्हणे करिसी ते ॥७॥
अर्थ
हे हरी, तू फार कठोर आहेस तू निर्गुण, निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस, कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस. सत्यवचनि राजा हरीश्चंद्राला त्याच्या पत्नी व् पुत्रा पासून दूर केलेस, त्याचे राज्य वैभव हिरावुन घेतलेस, त्याला डोंबाघरी पाठविलेस. पुराणात संगीतल्या प्रमाणे नल-दमयंतीच्या प्रेमसंमंधात विघ्न आणून नल-दमयंतीचा वियोग घडून आणलास. कृपाळू, दयाळु शिबिराजाला स्वतःच्या मंडीचे मास कापायला लाउन त्याची परीक्षा घेतलीस. दानशुर कर्ण समरांगणात बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दात मागितलेस. ज्या बलिराज्याने तुला पृथ्वीचे, आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिल, त्याला कपटिने पाताळात गाडलेस. श्रीयाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मांस मागीतलेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















