आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२७ जानेवारी, दिवस २७, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१३ ते ३२४
“२७ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 27 January
राम कृष्ण हरी आज दिनांक २७ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
सार्थ श्रीज्ञानेश्वरी
॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ तृतीयोऽध्यायःअध्याय तीसरा॥कर्मयोगः ।
गीता श्लोक :- 43 ज्ञानेश्वरी ओव्या :- 276
अध्याय तीसरा
1-3
अर्जुन उवाच:
ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥3. 1॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, ” हे जनार्दना ! कर्मा पेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे असे तुमचे मत आहे, तर मग हे केशवा, मला हे घोर कर्म का करावयास सांगता. ? “
मग आइका अर्जने म्हणितले । देवा तुम्ही जे वाक्य बोलिले । ते निके म्या परिसले । कमळापती ॥1
(ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाने कोणत्या प्रकारे शंका विचारली ते आता ऐकावे, ) मग अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! तूम्ही जे काही बोललात, ते, हे कमलापति, मी लक्षपूर्वक (चांगले) ऐकले.
2-2
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहता । ऐसे मत तुझे अनंता । निश्चित जरी ॥2॥
श्रीअनंता, (भगवंतांनी या पूर्वीचे सांगितलेले आत्मज्ञानाचा विचार केला) तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता, हे उरतच नाहीत व हेच जर तुझे मत निश्चित असेल,
3-3
तरी माते केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करी । इये लाजसीना महाघोरी । कर्मी सुता ॥3॥
तर मग श्रीकृष्णा, ‘मला का म्हणता की, ” पार्था तू युद्ध कर ” . या भयंकर कर्मात मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय ?
4-3
हा गा कर्म तूचि अशेष । निराकारासी निःशेष । तरी मजकरवी हे हिंसक । का करविसी तू ॥4॥
अरे, तूच जर सर्व कर्माचा निषेध करतोस, तर मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का करवुन घेतोस ? (घेत आहेस. देवा हे योग्य आहे का ?)
5-3
तरी हेचि विचारी हृषीकेशा । तू मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी ॥5॥
हे ऋषीकेशा ! याचा तू विचार करून पाहा की, आत्मज्ञानापुढे तू अल्पशा कर्मालादेखील मान देतोस आणि माझ्याकडुन एवढी मोठी हिंसा करवून घेत आहेस; (या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालावा. )
6-3
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥3. 2॥
भावार्थ :-
आपल्या या घोटाळ्याच्या, दुपट्टी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे. तरी तू ज्याच्या योगाने (जे केल्याने) मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित वचन सांग.
देवा तुवाचि ऐसे बोलावे । तरी आम्ही नेणती काय करावे । आता संपले म्हणे पा आघवे । विवेकाचे ॥6॥
देवा ! तुम्हीच जर असे संदेह उत्पन्न होणारे विचार बोलू लागलात, तर आमच्या सारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे ? तर मग आता विवेकाची गोष्टच संपली, असच म्हणाव लागेल ?
7-3
हा गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आता पुरला आम्हा धिंवसा । आत्मबोधाचा ॥7॥
अहो ! यालाच जर (अज्ञान नाशाचा) उपदेश म्हणावे, तर मग याहून भ्रम (उत्पन्न करणारे) तो निराळा कोणता ? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पूर्ण झाली म्हणावयाची.
8-3
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥8॥
वैद्य हा (प्रथम रोग्याला औषध देऊन त्याने) काय खावे, काय खाऊ नये, हे पथ्य सांगून, मग नंतर जर त्याच वैद्याने रोग्यास (खाण्यासाठी) विष दिले तर तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे !
9-3
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । का माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हा ॥9॥
जसे एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पदार्थ पिण्यास द्यावा, तसा हा तूझा उपदेश आम्हा अज्ञानी लोकांना चांगलाच लाभला आहे.
10-3
मी आधीचि काही नेणे । वरी कवळिलो मोहे येणे । कृष्णा विवेकु या कारणे । पुसिला तुज ॥10॥
अहो ! मला आधीच काही समजेनासे झाले आहे, त्यात मी या मोहाच्या चक्रात आडकलो आहे, म्हणून हे कृष्णा ! खरे काय आणि खोटे काय, ही गोष्ट तुला विचारली आहे. (हा सारासार विचारले आहे. )
11-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजी गावाई । तरी अनुसरलिया काई । ऐसे कीजे ॥11
तो तुझे एकेक पहावे, ते सर्वच आश्चर्य ! इकडे उपदेश करतोस आणि त्यात आम्हाला (अज्ञानी) घोटाळ्यात घालतोस ! आम्ही तुला शरण आलो, तुझे विचार ऐकतो; तर तु शरणांगताशी असे वागावे का ?
12-3
आम्ही तनुमनुजीवे । तुझिया बोला वोटंगावे । आणि तुवाचि ऐसे करावे । तरी सरले म्हणे ॥12॥
आम्ही शरीराने, मनाने व जीवाभावाने तुझ्यावर विश्वास ठेवावा (त्या नुसार जगावे) आणि तूच जर असे वागू (भ्रम निर्माण करणारे बोलू लागलास असे अर्जुन म्हणतोय) लागलास तर सगळे काही संपलेच, असे म्हणावे लागेल.
13-3
आता ऐसियापरी बोधिसी । तरी निके आम्हा करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥13॥
” आता आशाच प्रकारे उपदेश करणार असशील, तर मग आमचे चांगले कल्याण करतोस म्हणावयाचे ! अर्जुन येथे (उपहासाने म्हणाला) आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची ? “
14-3
तरी ये जाणिवेचे कीर सरले । परी आणिक एक असे जाहले । जे थिते हे डहुळले । मानस माझे ॥14
ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरीच संपली, पण यात आणखी एक असे झाले की, माझे स्थिर असलेले मन घोटाळ्यात पडले ! (संशयाने गोंधळून गेले)
15-3
तेवीचि कृष्णा हे तुझे । चरित्र काही नेणिजे । जरी चित्त पाहसी माझे । येणे मिषे ॥15॥
पुन्हा अर्जुन (जास्तच बोलला अस वाटुन चपापला आणि स्वर बदलून बोलू लागला) त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा
! तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही. (तुझी लिला मला काही कळत नाही, ) कदाचित या उपदेशाच्या निमित्ताने तू माझी परीक्षा घेत आहेस काय ?
16-3
ना तरी झकवितु आहासी माते । की तत्वचि कथिले ध्वनिते । हे अवगमता निरुते । जाणवेना ॥16॥
किंवा तू आम्हाला भ्रमित करत आहेस, का गूढ शब्दांनी तत्वज्ञान सांगत आहेस, याचा सूक्ष्म विचार केला, तरी मला निश्चित असे काही कळत नाही.
17-3
म्हणोनि आइके देवा । हा भावार्थु आता न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥17॥
म्हणूण हे देवा ! आपण माझे ऐकावे. हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत, मला समजेल असा सोपा करून सांगावा. (आडाण्यालाही समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगा)
18-3
मी अत्यंत जड असे । परी ऐसाही निके परियसे । कृष्णा बोलावे तुवा तैसे । एकनिष्ठ ॥18॥
हे श्रीकृष्णा ! मी अतिशय मंदबुद्धी आहे, पण अशाहि मला उत्तम प्रकारे समजेल, असे निश्चयात्मक सांग.
19-3
देखे रोगाते जिणावे । औषध तरी द्यावे । परी ते अतिरुच्य व्हावे । मधुर जैसे ॥19॥
हे पाहा, रोग नाहिसा होण्यासाठी वैद्याने औषध तर द्यावे; परंतु ते मधुर व रुचकर असावे; (रोगी ते आनंदाने पिला पाहिजे)
20-3
तैसे सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित । परी बोधे माझे चित्त । जयापरी ॥20॥
त्याप्रमाणे अर्थाने परिपूर्ण व आचरणास उचित योग्य असे तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की, जेणेकरून माझ्या मनाला निःसंशय कळेल. (त्याचा निःसंदिग्धपणे पूर्ण बोध होईल. )
21-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी का न करू । एथ भीड कवणाची धरू । तू माय आमुची ॥21॥
हे देवा, तुमच्यासारखा सद्गुरू आज लाभला आहे, तर मी माझ्या मनाची इच्छा तृप्त का बरे करून घेऊ नये ? तू आमची आई आहेस (तर मग) येथे भीड का बरे धरावी ?
22-3
हा गा कामधेनूचे दुभते । देवे जाहले जरी आपैते । तरी कामनेची का तेथे । वानी कीजे ॥22॥
अहो, दैवयोगाने कामधेनुचे दुभते जर प्राप्त झाले, तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास संकोच का करावे ?
23-3
जरी चिंतामणि हाता चढे । तरी वांछेचे कवण सांकडे । का आपुलेनि सुरवाडे । इच्छावे ना ॥23॥
किंवा चिंतामणी जर हाती लागला, तर आपणास इच्छित वस्तू मागण्याची अडचण का वाटावी ? आपणास हवी तशी इच्छा का करू नये ?
24-3
देखे अमृतसिंधूते ठाकावे । मग तहाना जरी फुटावे । मग सायासु का करावे । मागील ते ॥24॥
असे पाहा की, अमृताच्या सागराजवळ यावे, आणि अमृताचे प्राशन न करता तहानेने व्याकुळ व्हावे, तर मग (अमृत सागराजवळ) येथे येण्याचे कष्ट तरी का बरे घ्यावेत ?
25-3
तैसा जन्मांतरी बहुती । उपासिता लक्ष्मीपती । तू दैवे आजि हाती । जाहलासी जरी ॥25॥
त्याचप्रमाणे हे कमळापती ! तुझी जन्मोजन्मी मनोभावे उपासना केली, (अर्थात निष्काम सेवा केल्यामुळे) त्यामुळे आज दैवयोगाने तू आम्हाला लाभला आहेस.
दिवस २७ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१३ ते ३२४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 313
दोष पळती कीर्तने । तुझ्या नामे संकीर्तने ॥१॥
हे का करू आदरिले । खोटे वचन आपुले ॥धृपद॥
तुम्ही पापा भीता । आम्हा उपजावया चिंता ॥२॥
तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी देवा ॥३॥
अर्थ
तुझ्या नामसंकीर्तनाने सर्व दोष पळतात. देवा हे वचन खोटे तर नाही ना ? आमच्या हातून काही पाप होवू नये याची भीती तुम्हाला वाटते तर आम्हाला जन्माला येण्याची भीती वाटते. तुकाराम महाराज म्हणतात तुमचे नामसंकीर्तन केल्याने भक्ताला कळीकाळाची भीती नसते त्यामुळे मी तुमचे नामस्मरण कायम करत असतो.
अभंग क्र. 314
मी तो दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥
मी तो आलो शरणागत । माझे करावे स्वहित ॥धृपद॥
दिनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नावा ॥२॥
तुका म्हणे आता । भले नव्हे मोकलिता ॥३॥
अर्थ
देवा मी तर दिना पेक्षाही दिन आहे तरी पण तुला माझा अभिमान आहे. मी तुला शरण आलेलो आहे त्यामुळे हे देवा तू माझे स्वहित म्हणजे कल्याणकर. हे दीनानाथा कृपा घना तुझे ब्रीद, तू दयाळू आहेस याचे पालन केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तू जर माझ्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला हे असे शोभणार नाही.
अभंग क्र. 315
नाही दुकळलो अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥
देव केला सकळसाक्षी । काळी आणि शुद्धपक्षी ॥धृपद॥
भोगी भोगविता । बाळासवे तोचि पिता ॥२॥
कर्म अकर्म जळाले । प्रौढे तुका ते उरले ॥३॥
अर्थ
मी फक्त अन्न खाण्याकरता जगण्याला स्थान दिले असे नाही मी अन्न खातो कारण या जनार्दनाचा मान राखावा म्हणून. सर्व चांगले कर्म करताना व इतर वेळेस देवाला मी साक्षी केले आहे. भोगी आणि भोगविता तोच आहे जसे बाळका बरोबर त्याचा पिता असल्यावर तोचं त्याला खाण्यापिण्याचे व्यवस्था करतो त्याप्रमाणे हा देव माझी सर्व व्यवस्था करतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात चांगले व वाईट कर्मे ज्या ठिकाणी जळून जातात अशा उच्च ठिकाणी मी विराजित झालो आहे.
अभंग क्र. 316
काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गाविचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृपद॥
आता येणे चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणात ॥२॥
भल्या लोकी यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊ आता ॥४॥
अर्थ
आता काय खावे कोणाच्या आधारावर रहावे कोठे जावे ? गावचा पाटील आणि गावातील लोक माझ्यावर रागावले आहेत क्रोधित झाले आहेत त्यामुळे आता कोण मला भिक घालणार ? हे लोक मला म्हणतात की मी मर्यादा सोडली आहे आणि त्याचा निवाडा करण्यासाठी मला न्यायालयात दाखल केले आहे व मला दोषी ठरविण्यात येत आहे. गावातील प्रस्तापित लोकांनी मी वाईट आहे असे सर्वाना सांगितले आहे व माझा गरिबाचा यांनी सर्वानी घात केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता यांचा संग चांगला नाही या विठ्ठलाचे भजन करणे हेच उत्तम आहे व आता त्याला शोधीत जाणे हेच चांगले.
अभंग क्र. 317
संत मागे पाणी नेदी एक चूळी । दासीस आंघोळी ठेवी पाणी ॥१॥
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥धृपद॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावे धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
अर्थ
संतांनी जर थोडे पाणी प्यायला मागितले तर चूळ भरण्या इतके पाणी देखील हा एखादा मनुष्य देत नाही पण एखाद्या दासी करता अंघोळ करण्याकरता पाणी तापवून ठेवतो. संत जर दिसले तर तो संतांना पाहून त्यांच्याकडे पाठ करतो आणि दासीच्या मुलांना जर पाहिले तर मुके घेतो. संतांचे त्यांच्या पाठीमागे तो टवाळ्या करण्याचे काम करतो पण मात्र दासीच्या चोळ्या मात्र आवडीने धुतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका तो माणूस मेल्यानंतर यमलोकात त्याचे भोग भोगण्या करिता जातो.
अभंग क्र. 318
आशाबद्ध वक्ता । धाक भय श्रोतयाच्या चित्ता ॥१॥
गातो तेची नाही ठावे । तोंड वासी काही द्यावे ॥ध्रु. ॥
जाले लोभाचे मांजर । पोट भरी दारोदार ॥२॥
वाया गेले ते भजन । उभयता लोभी मन ॥३॥
बहिरे मुके एके ठायी । तैसे जाले तया दोही ॥४॥
माप आणि गोणी । तुका म्हणे रिती दोन्ही ॥५॥
अर्थ
एखादा वक्ता हरिकीर्तन करण्याकरता हरी कथा करण्याकरता एखाद्या गावात जर आला आणि त्याच्या मनात द्रव्याची आशा असेल तर त्या गावातील श्रोतेत्यांच्या चित्तात हा आपल्याला द्रव्य मागेल असाच धोका निर्माण होतो. ज्या भगवंताविषयी तो गातो त्या भगवंताविषयी त्याला काहीच ज्ञान नसते परंतु तो आवेश धरून तोंड वासून गाणी गातो पण त्याच्या मनात चाललेले विचार म्हणजे यांनी मला माझे गाणे ऐकून मला पैसे द्यावे असे असते. तो वक्ता म्हणजे लोभाचे झालेले मांजर होय पोट भरण्याकरता तो दारोदार फिरत असतो. त्याने गायलेले भजन आणि श्रोत्यांनी ऐकलेले भजन हे दोन्हीही वयाला जाते, कारण दोघाचेही मन लोभी असते. बहिरा आणि मुका हे जसे एकत्र आल्यावर व्यर्थ होय, तसेच आशाबद्ध वक्ता व त्याच्या कथेला भूललेला श्रोता हे दोन्ही एकत्र येणे म्हणजे तसेच होय. तुकाराम महाराज म्हणतात गोणीतून धान्य मापाने बाहेर काढल्यावर जसे गोणी आणि माप दोन्हीही मोकळेच राहतात तसेच आशा बद्ध वक्ता आणि त्याला भूललेला श्रोता हे दोन्हीही तसेच रिकामे राहतात.
अभंग क्र. 319
विठ्ठला रे तू उदाराचा राव । विठ्ठला तू जीव जगाचा या ॥१॥
विठ्ठला रे तू उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशी सकळसिद्धी ॥धृपद॥
विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले । विठ्ठला लागले ध्यान मनी ॥३॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सोस घेतला जीवे ॥४॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तू ये का झडकरी ॥५॥
अर्थ
विठ्ठला तू सर्व जगाचा राजा आहेस आणि जगाला जीवन देणारा जीव आहेस. हे विठ्ठला तुझ्या जवळ सर्व औदार्याची राशी आहे तुझ्याजवळ सर्वप्रकारच्या सिद्धी आहेत. विठ्ठला तुझे हे नांव किती गोड आहे आणि तू भक्तांचे सर्व लाड पुरावितोस. हे विठ्ठला तुझे श्रीमुख अतिशय चांगले आहे सुंदर आहे त्यामुळे मला तुझे ध्यान लागले आहे. विठ्ठला तुझे नाम घेतल्यावर वाणी अशी रसभरीत वाटते माझ्या जीवाने तुझा ध्यास घेतला आहे. विठ्ठला तुला भेटण्या करता मी तुकाराम शोक करीत आहे तेव्हा तू त्वरेने मला भेटण्याकरिता ये.
अभंग क्र. 320
बाहिर पडिलो आपुल्या कर्तव्ये । संसारासि जीवे वेटाळिलो ॥१॥
एकामध्ये एक नाही मिळो येत । ताक नवनीत निवडीले ॥धृपद॥
जाली दोनी नामे एकाचि मथनी । दुसरिया गुणी वेगळाली ॥२॥
तुका म्हणे दाखविली मुक्ताफळी । शिंपलेचि स्वस्थळी खुंटलिया ॥३॥
अर्थ
आतापर्यंत या संसाराला मी कवटाळून बसलो होतो पण आता आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी यातून बाहेर पडलो. दह्यातून निघलेले ताक जसे पुन्हा दह्यात मिसळले जात नाही तसा मी या संसारात पुन्हा मिसळणार नाही. दह्यातून जसे ताक आणि लोणी हे दोन नावं निर्माण होतात पण त्यांचे गुण वेगवेगळे असतात तसेच आत्म विचाराने देह आणि आत्मा हे वेगळे वेगळे आहे असे लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्यातून जरी मोती वेगळा केला व नंतर पुन्हा त्याला शिंपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते शिपल्या संगे जोडले जात नाही.
अभंग क्र. 321
बरवा बरवा बरवा देवा तू । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तू ॥१॥
पाहाता वदन संतुष्ट लोचन । जाले आइकता गुण श्रवण रे देवा ॥धृपद॥
अष्ट अंगे तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णिता लक्षण रे देवा ॥२॥
मन जाले उन्मन अनुपम गहण । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणे रे ॥३॥
अर्थ
देवा तू खूपच चांगला आहेस, खूपच चांगला आहेस, खूपच चांगला आहेस. त्यामुळे तु मला जीवापेक्षाही जास्त आवडतोस देवा. तुझे मुख डोळ्याने पाहिल्यानंतर व तुझे गुण कानाने ऐकल्यानंतर डोळे व कान दोन्ही संतुष्ट होतात देवा. तुझे लक्षण वर्णन केले असता माझ्या आठही अंगातून शीण आणि सर्व भाग नाहीसा होतो. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात देवा तुझ्या अनुपम्य आणि गहण अशा रूपाने माझे मन उन्मन झाले व तुझा महिमा मला काही कळत नाही रे देवा.
अभंग क्र. 322
सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥
गाईसी देखोनि बदाबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥धृपद॥
फुले पाने वेश्येसी नेतसे उदंड । देऊ नेदी खांड ब्राम्हणासी ॥२॥
बाइलेच्या गोता आवडीने पोसी । मातापितयांसी दवडोनी ॥३॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥४॥
अर्थ
नास्तिक मनुष्य जर घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी मोठी मेजवानी करतो पण जर संत घरी आले तर त्यांच्यासाठी मात्र ठोमरा म्हणजे जाड तांदळाचा भात करतो. त्याच्या दारात जर गाय आली तर तो त्या गाईला बदाबदा मारतो पण त्याला घोड्याचे लीद काढणे खरारा करणे यातच गोडपणा वाटतो. नास्तिक मनुष्य वैश्येला फुले, खाण्यासाठी पाने नेऊन देतो मात्र ब्राम्हणाला सुपारीचे एक खांड देत नाही. सासरकडच्या माणसांना तो अतिशय जीव लावतो पण आई-वडीलांना घराच्या बाहेर काढून देतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका त्याचा धिक्कार करा असा माणूस नरकातच जाणार कारण तेथेच त्याचे भोग त्याला मिळणार आहे.
अभंग क्र. 323
सोलीव जे सुख अतिसुखाहुनि । उभे ते अंगणी वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनिया ॥धृपद॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठी ॥२॥
नामओघ मुखी अमृताचे सार । मस्तक पवित्र सहित रजे ॥३॥
तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥
अर्थ
जे सोलीव सुख म्हणजे आत्यंतिक सुखाचा गाभा आहे तो विठ्ठल वैष्णवांच्या दारामध्ये उभा असतो. वैष्णवांच्या दारातच तुळशीवृंदावन आहे सडा घातलेला आहे रांगोळ्या काढलेल्या आहेत व अशा पवित्र वातावरणातच तो परमात्मा नाचत असतो. वैष्णवांच्या गळ्यात नेहमी तुळशीची माळ असते असते व त्यांच्या अंगावर गंध लावलेले असतात असे ते वैष्णव सुशोभित असतात. वैष्णवाचे मुख म्हणजे नेहमी हरीचे गुणगान गात असतात आणि त्याचे कपाळ हरी चरण धुळीने माखलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात आशा वैष्णवांना मोक्ष प्राप्तीची इच्छा नसते तर मोक्षाला त्यांची इच्छा होते.
अभंग क्र. 324
तीर्थे केली कोटीवरी । नाही देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचे ज्यालेपण । न देखे चि समचरण ॥धृपद॥
योग याग अनंत केले । नाही समचरण देखिले ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलपायी । अनंत तीर्थे घडिली पाही ॥३॥
अर्थ
कोट्यावधी तीर्थे केली आणि जर पंढरी नाही पाहिली, तर त्याच्या जगण्याला आग लागो कारण त्याने विटेवर उभे असलेले पांडुरंग परमात्म्याचे समचरण पाहिले नाही. त्याने योगा आणि योग अनेक केले पण जर विटेवरील समचरण पाहिले नाहीतर त्याचा काय उपयोग ? तुकाराम महाराज म्हणतात विटेवर उभा असलेला पांडुरंग याचे तुझे दर्शन घेतले तरच सर्व प्रकारचे तीर्थे घडले असे जाण.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















