आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

१२ जानेवारी, दिवस १२, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी १ ते २५, सार्थ तुकाराम गाथा अभंग १३३ ते १४४
“१२ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 12 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 1 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ द्वितीयोऽध्यायः अध्याय दुसरा॥साङ्ख्ययोगः ।
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय दुसरा
संजय उवाच :
तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवा च मधुसूदनः ॥2. 1॥
भावार्थ :-
संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले. ॥1॥
1-2
मग संजयो म्हणे रायाते । आइके तो पार्थु तेथे । शोकाकुल रुदनाते । करितुसे ॥1॥
(अर्जुनाची शोक-अवस्था) मग संजय धृतराष्टरास म्हणाला, ऐका. महाराज तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला.
2-2
ते कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनले अद्भुत । तेणे द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥2॥
तो आपल्या कुळातील सर्वाना पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर,
3-2
जैसे लवण जळे झळंबले । ना तरी अभ्र वाते हाले । तैसे सधीर परी विरमले । हृदय तयाचे ॥3॥
ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्याने मेघ हालतात, (नाहीसे होतात) त्याप्रमाणे अर्जुन धैर्यवान, (खंबीर) असून देखील त्याचे ह्रदय त्या वेळी करुणेने द्रवले.
4-2
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमी रुपला । राजहंस ॥4॥
म्हणून व्याकुळ झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेला होता.
5-2
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहे अतिजर्जरु । देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥5॥
पंडूचा पुत्र अर्जुन अतिमोहाने असा ग्रस्त झालेला पाहून शारंगधार (भगवान श्रीकृष्णा) काय म्हणाले, ते ऐका.
श्रीभगवानुवाच :
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥2. 2॥
भावार्थ :-
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ” हे अर्जुना ! श्रेष्ठ लोकांना अमान्य, स्वर्गप्राप्ती साठी विघ्न करणारा (आड येणारा), असलेली किर्ती नाहीशी (घालविणारा) हा मोह तुझ्या मनात या युधाच्या वेळी कोठून उद्भवला. (निर्माण झाला)
6-2
म्हणे अर्जुना आदि पाही । हे उचित काय इये ठायी । तू कवण हे कायी । करीत आहासी ॥6॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! , ह्या ठिकाणी असे करणे योग्य आहे का ? तू कोण आहेस, आणि काय करीत आहेस, याचा आगोदर (प्रारंभी) विचार कर.
7-2
तुज सांगे काय जाहले । कवण उणे आले । करिता काय ठेले । खेदु कायिस ॥7॥
( हे पार्थ ! )सांग, तुला काय झाले आहे ? कोणता कमीपणा आला आहे (कमी पडले) ? तुझे काय करायचे राहिले ? एव्हडा खेद कशाकरिता ?
8-2
तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी । तुझेनि नामे अपयशी । दिशा लंघिजे ॥8॥
तु अनुचित गोष्टीकडे लक्ष देत नाहीस; कधीही आपले (धैर्य) धीर सोडत नाहीस; आणि केवळ (अर्जूना) तुझ्या नावाचा उच्चारानेच अपयश दाही दिशांच्या पलीकडे निघून जाते.
9-2
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजी रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिही लोकी ॥9॥
तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. आणि तूझ्या शौर्याचा डंका (दबदबा) तर तिन्ही लोकात (त्रैलोक्यात) गाजत आहे.
10-2
तुवा संग्रामी हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवा केला । गंधर्वासी ॥10॥
तू युद्धामध्ये श्रीशंकरांनाही जिंकले आहेस. निवातकवचांचा ठावठिकाणा नाहीसा केलास; गंधर्वांनी पोवाडे गायिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-2
हे पाहता तुझेनि पाडे । दिसे त्रैलोक्यही थोकडे । ऐसे पौरुष चोखडे । पार्था तुझे ॥11॥
हे अर्जुना ! तुझ्या पराक्रमाचा विचार केला असता, हे त्रैलोक्यही लहान वाटते. असा तुझा पराक्रम उत्कृष्ट आहे.
12-2
तो तू की आजि एथे । सांडुनिया वीरवृत्तीते । अधोमुख रुदनाते । करितु आहासी ॥12॥
(पण) तोच तू, आज या ठिकाणी (रणांगणात) आपली वीरवृत्ती टाकून, खाली मान घालून रडत बसला आहेस. ! !
13-2
विचारी तू अर्जुनु । की कारुण्ये कीजसी दीनु । सांग पा अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥13॥
विचार कर, अर्जुना ! करुणेने तुला दीन करून सोडावे ! तूच सांग बरें, अंधकाराने सूर्याला कधी गिळले आहे काय ?
14-2
ना तरी पवनु मेघासी बिहे । की अमृतासी मरण आहे । पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकाते ॥14॥
वारा कधी मेघाला घाबरला आहे का ? अमृताला कधी मरण आहे का ? अरे विचार कर, लाकडाने कधी अग्नीला गिळून टाकले आहे का ?
15-2
की लवणेचि जळ विरे । संसर्गे काळकूट मरे । सांग महाफणी दर्दुरे । गिळिजे कायी ॥15॥
किंवा मिठाने पाणी कधी विरघळेल का ? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूठ वीष मरेल का ? तूच सांग ! ! बेडूक कधी महासर्पाला गिळील का ?
16-2
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी का जाहला । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥16॥
कोल्हा स्वतःहून सिंहा बरोबर झोंबी (लढाई, युद्ध) करील का ? अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाले आहेत का ? पण तू मात्र (अघटित गोष्ट) अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखविलास.
17-2
म्हणोनि अझुनि अर्जुना । झणे चित्त देसी या हीना । वेगी धीर करूनिया मना । सावधान होई ॥17॥
म्हणून हे अर्जूना ! अजून तरी या अनुचित (हीन) गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, तू लवकर मनाला धीर दे आणि सावध हो.
18-2
सांडी हे मूर्खपण । उठी घे धनुष्यबाण । संग्रामी हे कवण । कारुण्य तुझे ॥18॥
आता हा वेडेपणा सोडून दे, उठ, धनुष्यबाण हाती घे, कारण या युद्धाच्या प्रसंगी (रणभूमीवर तुझ्या) करूणेचा काय उपयोग. ?
19-2
हा गा तू जाणता । तरी न विचारीसी का आता । सांगे झुंजावेळे सदयता । उचित कायी ॥19॥
हे अर्जूना ! ! , तू जाणता आहेस; तर आत्ता विचार करून का पाहत नाहीस ? युद्धप्रसंगी क्षत्रिया कारुण्य (दया करणे हा गुण) योग्य आहे का तूच सांग बरें ?
20-2
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनाते ॥20॥
भगवान श्रीकृष्ण(जगन्निवास) अर्जुनास म्हणाले, हे युद्धाच्या प्रसंगीचे (दयाळूपणा) कारुण्य तुझ्या आजपर्यंतच्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकाला मुकविणारे आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥2. 3॥
भावार्थ ::ऱ्हे पार्था ! हा दुबळेपणा धरू नकोस; हे तुला शोभत नाही. असा मनाचा क्षुद्र ढिलेपणा (दुर्बलपणा) टाकून देऊन, हे अर्जुना, युद्धासाठी उठ. ॥3॥
21-2
म्हणौनि शोकु न करी । तू पुरता धीरु धरी । हे शोच्यता अव्हेरी । पंडुकुमरा ॥21॥
म्हणून हे अर्जुना ! तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर. खेदाचा त्याग कर. ॥21॥
22-2
तुज नव्हे हे उचित । येणे नासेल जोडले बहुत । तू अझुनी वरी हित । विचारी पा ॥22॥
तुला असा खेद करणे शोभा देत नाही. आज पर्यंत जी मोठी किर्ती तू संपादित केलीस, त्याचा यामुळे नाश होईल. म्हणून अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर. ॥22॥
23-2
येणे संग्रामाचेनि अवसरे । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आताचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥23॥
या युद्धप्रसंगी (संग्रमाच्या) प्रसंगी तुझा हा कृपाळूपणा (दयाळूपणा) काहीच कामाचा (उपयोगाचा)नाही. हे (कौरावांना उद्देशून) आत्ताच तुझे सोयरे(नातलग) झाले काय ? ॥23॥
24-2
तू आधीचि काय नेणसी ? । की हे गोत्रज नोळखसी ? । वायाचि काय करिसी । अतिशो आता ? ॥24॥
(हे अर्जुना ! ), हे तुझे नातलग (आप्तजन, गोत्रज) आहेत, तू येथे येण्यापूर्वी जाणत नव्हतास काय ? या भाऊबंधीची (संबंधाची) तुला ओळख नव्हती का ? तर आताच या तुझ्या (दयाळू) करुणेचा अतिरेक का बरे करतोस ? ॥24॥
25-2
आजिचे हे झुंज । काय जन्मा नवल तुज ? । हे परस्परे तुम्हा व्याज । सदाचि आथी ॥25॥
आजचा हा युद्धप्रसंग तुला जन्मल्यापासून नवीनच आहे काय ? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघांमध्ये (कौरव आणि पांडव) युद्ध करण्याची निमित्ते अनेक वेळा निर्माण झाली आहेत. ॥25॥
दिवस १२ वा, १२ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३३ ते १४४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 133
आणिकाच्या कापिती माना । निष्ठुर पार नाही ॥१॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥धृपद॥
सेंदराचे दैवत केले । नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरे । खोडिता येरे अंग दुखे ॥३॥
अर्थ
जगात काही लोक आपल्या फायदयासाठी इतर लोकांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरणाला सीमा नसते. त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीचि उसनवारि करतात. दगडाच्या देवाला शेंदुर फासुन त्याला नवस-सायास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, दुसर्याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून रडतात, त्याच प्रमाणे स्वता:च्या फायद्यासाठी इतरांना दुःखी करणारे लोक शेवटी दुःखच भोगतात.
अभंग क्र. 134
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठे चराचरी त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखे भक्षीतसे मळ । मिळाल्या वोहोळ गंगा ओघ ॥धृपद॥
कागाचिये विष्ठे जन्म पिंपळासि । पांडव कुळासि पाहाता दोष ॥२॥
शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामे नाश पातकासि ॥३॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहा पा विचार पिंगळेचा ॥४॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥
न व्हावी ती जाली कर्मे नरनारी । अनुतापे हरी स्मरता मुक्त ॥६॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥
अर्थ
अहो ज्या कुमारिकेचा पाच वर्षानंतर एक वर्ष गंधर्व, एक वर्ष अग्नी आणि एक वर्ष सोम या देवतांनी भोग घेतला त्यानंतर त्या कुमारिकेला व्याभिचारी म्हणून कुणी तिचा त्याग केला आहे का, चराचरामध्ये तिचा कोणीही त्याग केलेला दिसतो काय ? अहो गाय आपल्या मुखाद्वारे विष्टा घाणेरडे काहीही खाते आणि गंगेला मिळण्यापूर्वी ओढे, नाले या घाणेरड्या असतात परंतु गंगेला मिळाल्यानंतर त्या पवित्र होतात. अहो वड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळ्याच्या विष्टेतून होतो आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर तेथेदेखील दोष दिसून येतात कारण पांडवाचा जन्म पाच देवतांनी पासून झालेला असून पाचही पांडवांची एकच पत्नी होती. शकुंतला, सूत, कर्ण, शृंग व व्यास यांचा जर जन्माचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील परंतु यांचे नाम मुखाद्वारे घेतले असता पातकाचा नाश होतो. अहो गणिका, अजामेळ, कुब्जा, दासीपुत्र विदुर आणि पिंगळा वैश्या यांच्या जन्माचा तसेच कुळाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणेच दोष दिसून येतात. तसेच वाल्हा कोळी, विश्वामित्र, वशिष्ठ नारद यांचे पूर्व कुळ हे शुद्ध आहे काय ? अहो अनेक नरनारी कडून न व्हावी अशी कर्मे चुकून घडून गेली परंतु पश्चातापाने त्यांनी हरी नामाचे स्मरण केले व ते शुद्ध मुक्त होऊन शुद्ध झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी पश्चातापाने हरी नामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषाचा विचार करत नाही व जो कोणी यांच्या पूर्व कुळा विषयी किंवा पूर्वकर्मा विषयी उच्चार आपल्या मुखाद्वारे करील तो नरकाला जाईल.
अभंग क्र. 135
सोनियाचे ताट क्षीरीने भरिले । भक्षावया दिले श्वानालागी ॥१॥
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥धृपद॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥
तुका म्हणे ज्याचे तोचि एक जाणे । भक्तीचे महिमान साधु जाणे ॥३॥
अर्थ
कुत्र्याला सोन्याच्या ताटात खीर खायला दिली. मौल्यवान मोत्यांचा हार गाढवाच्या गळ्यात घातला किंव्हा डुकराला कस्तूरिचा सुवास दिला. एखाद्या बहिर्याला ब्रम्हज्ञान सांगितले तर त्याला ते समजणार आहे का ?. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे, त्यालाच त्याचे महत्त्व कळणार, भक्ताची योग्यता संतांनाच समजणार.
अभंग क्र. 136
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करिता म्हणती हा दोषी । टाकिता आळसी पोटपोसा ॥धृपद॥
आचार करिता म्हणती हा पसारा । न करिता नरा निंदिताती ॥२॥
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाही ॥३॥
धन नाही त्यासि ठायीचा करंटा । समर्थासि ताठा करिताती ॥४॥
बहु बोलो जाता म्हणति हा वाचाळ । न बोलता सकळ म्हणती गर्वी ॥५॥
भेटिसि नवजाता म्हणती हा निष्ठुर । येता जाता घर बुडविले ॥६॥
लग्न करू जाता म्हणती हा मातला । न करिता जाला नपुंसक ॥७॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचे मूळ पोरवडा ॥८॥
लोक जैसा लोक धरिता धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
तुका म्हणे आता ऐकावे वचन । त्यजुनिया जन भक्ति करा ॥१०॥
अर्थ
पतितपावना देवराया संतपदाचा लौकिक सदासर्वकाळ सांभाळने शक्य होत नाही. एखादा मनुष्य प्रपंच करताना “हा स्वार्थी दोषी आहे” आणि प्रपंच टाकून परमार्थ करू जावे “तर हा अळशी आहे”, असे लोक म्हणतात. धर्मा प्रमाणे आचारण केले तर दांभिक म्हणतात, नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात. संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात, नाही केला तर हा अभागी आहे, याला संत सहवास, शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात. दरिद्री माणसाला कमनाशिबि म्हणतात, तर श्रीमंताला अहंकार फार आहे, असे म्हणतात. बोललो तर बडबड करणारा आणि नाही बोललो तर गर्विष्ट म्हणतात. नातेवाइकाना भेटण्यास नाही गेलो तर निष्टुर आणि गेलो तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो एशे म्हणतात. लग्न करू पाहता मस्तिला आला म्हणतात आणि लग्न न करता राहीला तर ‘नपुंसक ” म्हणतात. निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवडा वाढला म्हणतात. लोक हे असे दोन्हीकडून बोलतात, जाशी ओकारी थांबवता येत नाही तसे लोकांचे बोलनेही थांबवता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की लोकांच्या बोलाण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवा.
अभंग क्र. 137
धर्म रक्षावया साठी । करणे आटी आम्हासि ॥१॥
वाचा बोलो वेदनीती । करू संती केले ते ॥धृपद॥
न बाणता स्थिति अंगी । कर्म त्यागी लंड तो ॥२॥
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥
अर्थ
या जगात आम्ही धर्मरक्षण करण्यासाठी श्रम करतो. आम्ही संतांप्रमाणे आचरण करून मुखाने वेदनीति बोलतो. परमार्थामध्ये ब्रम्हसस्थीतीला पोहचाण्यापूर्वीच कर्माचा त्याग केल्याचे जो ढोंग करतो, तो ढोंगी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो हरिभक्तीला दुषणे देतो, तो अधम समजावा
.
अभंग क्र. 138
चवदा भुवने जयाचिये पोटी । तोचि आम्ही कंठी साठविला ॥१॥
काय एक उणे आमुचिये घरी । वोळंगती द्वारी रिध्दिसिध्दी ॥धृपद॥
असुर जयाने घातले तोडरी । आम्हासी तो जोडी कर दोन्ही ॥२॥
रूप नाही रेखा जयासी आकार । आम्ही तो साकार भक्ती केला ॥३॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिये अंगी । समान तो मुंगी आम्हासाठी ॥४॥
तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालो हे निराळी ठेवुनि आशा ॥५॥
अर्थ
चौदा भुवनांचा जो जन्मदाता आहे, तो आमच्या कंठामध्ये नांदत आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, प्रत्यक्ष रिद्धि-सिद्धि आमच्या घरी नांदत आहे त्यामुळे आमच्या घरी काय कमतरता आहे. असुरांना बंदीवासात टाकणारा भगवंत आमच्यापुढे (भक्तापुढे) हात जोडून नम्रतेने उभा आहे. जो रंगरूपावाचुन निर्गुण निराकार आहे, त्याला आम्ही सगुन साकार बनविले आहे. जो अनेक ब्रह्मांडाचा जन्मदाता आहे, तो आमच्या साठी सूक्ष्मरूप धारण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही (भक्त) देवाहुन भाग्यशाली आहोत; कारण आम्ही आशारहित भक्ती करत आहेत.
अभंग क्र. 139
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हा संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हास ॥धृपद॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपे ॥२॥
केली कांशाची जगदंबा । परि कासे नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणे । कासे राहे कासेंपणे ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली काजी । ज्याची पूजा त्याणेचि घेणे । आम्ही पाषाणरूप राहणे ॥४॥
अर्थ
मातीचे शिवलिंग करून त्याची पूज्या केली ती शंकराला पावते त्यामध्यो मातीचे काय महत्व कारण, शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते. त्याच क्षणि तीच महत्त्व संपते, तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात, ती संतहृदयातील पुजा भगवंतास पावते, आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदविचा मोह आम्हाला नाही. दगडी विष्णुमूर्तिचि पूजा केलि असता पाषाण विष्णु होत नाही पुजा विष्णुला पावते, दगड दगडरुपच राहतो. काशाचि जगदंबेचि मूर्ति केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते, कासे हा धातु धातुच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, आशा प्रकारचे आपण ज्याची पुजा करु त्याची पुजा त्याला अर्पण होते संतांचा भक्तिभाव हा पुजेप्रमाने एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ति करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो.
अभंग क्र. 140
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥
येरा मान विधि पाळणापुरते । देवाची ती भूते म्हणोनिया ॥धृपद॥
सर्वभावे झालो वैष्णवाचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥
तुका म्हणे जैसे आवडती हरीदास । तैशी नाही आस आणिकाची ॥३॥
अर्थ
जे विठ्ठल चरणांची सतत सेवा करतात ते माझे सोयरे, सोबती नातेवाइक आहेत. विश्वातील सर्व चरा चरांना मी वंदन करतो; कारण त्यांच्या मध्ये विठ्ठलाचा अंश आहे. जे-जे वैष्णव आहेत त्यांचा मी जीवाभावाने दास झालो आहे, त्यांच्या उच्छिष्टाची अपेक्षा मी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे हरिचे दास आहे तेच मला आवडतात, इतरांची मला पर्वा नाही.
अभंग क्र. 141
दया तिचे नांव भूतांचे पाळण । अणीक निर्दळण कंटकांचे ॥१॥
धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार ते ॥धृपद॥
पाप त्याचे नांव न विचारिता नीत । भलते चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठी । देवासही आटी जन्म घेणे ॥३॥
अर्थ
सर्व जीवाचे पालन करणारी आणि दृष्टांचे निर्दालण करणारी जी आहे, तिचे नांव दया आहे. धर्मनितीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खूण पटली आहे ते निवडले आहे. अनितीने आचरण, उन्मातपना म्हणजेच पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अधर्माचरणी लोकांमुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो.
अभंग क्र. 142
करावे गोमटे । बाळा माते ते उमटे ॥१॥
आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हे ते जननी ॥धृपद॥
वियोग तो तिस । त्याच्या उपचारे ते विष ॥२॥
तुका म्हणे पाये । डोळा सुखावे त्या न्याये ॥३॥
अर्थ
आपल्या बालाचे कल्याण व्हावे, अशी मातेची इच्छा असते. तिला आपले बाळ स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असते. बाळाचा विरह झाले असता त्यावर केलेला सौख्यदायक उपचार तिला विषासमान वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी जसे तळपायाला लोणी लावतात, तसे आई-मुलाचे नाते आहे.
अभंग क्र. 143
कन्या सासुर्यासि जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे जाले माझ्या जिवा । केव्हा भेटसी केशवा ॥धृपद॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥
अर्थ
सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते. माझ्याही मनाची अवस्था अशीच झाली आहे. हे विठ्ठला, केशवा, मला केव्हा भेटशील ? आई पासुन चुकलेले बाळ हुरूहुरून पहात असते. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यावाचुन मासा जसा तडफडतो, तसा मी विठ्ठला वाचून तळमळत आहे.
अभंग क्र. 144
हाती होन दाविती वेणा । करिती लेकीची धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कली । पुण्य रंक पाप बळी ॥धृपद॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडी । लेती विजारा कातडी ॥३॥
बैसोनिया तक्ता । अन्नेविण पिडिती लोका ॥४॥
मुदबख लिहिणे । तेल तुप साबण केणे ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आत हिरवे वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ॥१०॥
अर्थ
काहीलोक मुलीचे लग्न लावताना अगोदर वराच्या लोकांकडून पैसे घेतात मग मुलीचे लग्न लावतात अशाप्रकारे ते मुलीची विक्रीच करतात. अशाप्रकारे कलियुगामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे धर्म नाश पावत चाललेला आहे पुण्य क्षीण होत आहे आणि पाप बलवंत होत आहे. अहो या कलियुगामध्ये ब्राम्हणाने तर आपले आचार सोडून दिले असून ते चोऱ्या देखील करू लागले आहेत व इतरांची चाहाडी ते लावतात. अहो ते कपाळाला टिळा देखील लावत नाही पंचांग पाहण्याच सोडून देत आहेत आणि योवनांप्रमाणे वर्तणूक करून कातडी विजार घालू लागले आहेत. अहो न्याय देणारा न्यायाधीशाच्या आसनावर बसणारा अन्याय न करणाऱ्या लोकांना देखील पीडा देत आहेत. तेल-तूप साबण हे आपल्याला किती लागतात ते लिहिण्यासाठी लोक वेळ वाया घालवत आहेत. अहो ब्राम्हण आता नीच माणसाच्या हाताखाली चाकर म्हणून काम करतात आणि त्यांच्याकडून काही चुकले तर नीच माणसांच्या हातचा मार देखील ते आता खातात. राजा प्रजेला पीडा देत आहे अगोदरच दुखी असलेला शेतकरी त्याने जर शेतसारा दिला नाही तर त्याच्याकडून त्याचे क्षेत्र हिसकावून घेत आहे. वैश्यशुद्र हे लोक तर अगोदरच नीच आहेत त्यांच्याहातून अधर्म झाला तर त्यात नवल काय आहे ? अंतर रंगांमध्ये लोक वाईट वृत्तीने व काळेबेरे पणा ठेवून हिरवट रंगाचे झालेले असतात व बाह्य रंगाने आम्ही खूपच स्वच्छ आहोत असे ते लोकांना दाखवतात व स्वज्वळ पणाचे सोंग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा अहो एवढा अन्याय होत आहे तरीही तुम्ही अजून काही का करत नाही तुम्ही निजला आहात की काय, उठा तुमचे ब्रीद आहे तुम्ही धर्माचे रक्षण करता मग आता धर्मरक्षणासाठी लवकर धावा. (या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये यौवनी राजसत्तेने किती बिकट परिस्थिती निर्माण केली आहे याचे वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदास यांनी देखील त्यांच्या काव्य रचनांमधून असेच वर्णन केलेले आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















