आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

२८ जानेवारी, दिवस २८, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३२५ ते ३३६
“२८ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 28 January
राम कृष्ण हरी आज दिनांक २८ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
26-3
तरी आपुलेया सवेसा । का न मगावासी परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥26॥
तर मग हे परमेश्वरा ! माझ्या इच्छेप्रमाणे मी का बरे तुझ्याकडे (हट्ट धरू नये) मागू नये ? देवा, माझ्या मनातील हेतू (इच्छा) पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. (तो दिवस प्रकाशीत झाला आहे)
27-3
देखे सकळार्तीचे जियाले । आजि पुण्य यशासि आले । हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥27॥
पाहा, माझ्या सर्व मनोकामना परिपूर्ण झाल्या. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले.
28-3
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । तू स्वाधीन आजि आम्हा । म्हणऊनिया ॥28॥
कारण, अहो महाराज, सर्वोकृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवांत श्रेष्ठ असलेल्या देवा, तू आमच्या ताब्यात (सोबत आहेस) आला आहेस, म्हणून.
29-3
जैसा मातेचा ठायी । अपत्या अनवसरु नाही । स्तन्यालागूनि पाही । जियापरी ॥29॥
पाहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईसाठी कोणतीच वेळ ही अवेळ नसते,
30-3
तैसे देवा तूते । पुसिजतसे आवडे ते । आपुलेनि आर्ते । कृपानिधि ॥30॥
त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या (मनातील निर्माण झालेला भ्रम दूर करण्यासाठी) इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला विचारणार आहे.
31-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तरी पारत्रिकी हित । आणि आचरिता तरी उचित । ते सांगे एक निश्चित । पार्थु म्हणे ॥31॥
तर मग परलोकात कल्याणकारक आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित असे जे एक निश्चित स्वरूपाचे आहे, ते मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला.
32-3
श्रीभगवानुवाच:
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिनां ॥3. 3॥
भावार्थ :-
श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना ! या लोकात पूर्वी मी दोन प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग :- ज्ञानयोगाच्या आधारे आत्मज्ञानी सांख्याचा. दुसरा मार्ग :- निरपेक्ष कार्मयोगाच्या आधारे कर्म करण्याचा. (सिद्धी व असिद्धी विषयी समबुद्धी ठेवण्याचा)
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥32॥
अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणाले, हे अर्जुना ! आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला. (माझ्या बोलण्याचा अभिप्राय काही प्रमाणात गूढ आहे. )
33-3
जे बुद्धियोगु सांगता । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्ही ॥33॥
कारण की, निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही (ज्ञानमार्गाची व्यवस्था) सांख्याना मान्य अशा योगाची निष्ठा सांगितली.
34-3
तो उद्देशु तू नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायाचि । तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥34॥
तो उद्देश तू जाणला नाहीस; म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. तर आता ध्यानात ठेव की हे दोनही मार्ग (ज्ञानयोग आणि कर्मयोग) मीच सांगितले आहेत.
35-3
अवधारी वीरश्रेष्ठा । ये लोकी या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥35॥
हे विरश्रेष्ठा अर्जुना ऐक ! हे दोन्ही मार्ग अनादि काळापासून आहेत, आणि (हे मार्ग)माझ्यापासून प्रकट झालेल्या आहेत. (या लोकी व्यक्त झाल्या आहेत हे जाण)
36-3
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यी अनुष्ठीजे । जेथ ओळखीसवे पाविजे । तद्रूपता ॥36॥
या पैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रुपता प्राप्त होते.
37-3
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥37॥
(आणि) दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोग होय. कर्ममार्गाचे लोक समत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि काही काळाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
38-3
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानी । जैसे सिद्धसाध्यभोजनी । तृप्ति एकी ॥38॥
असे हे दोन मार्ग असले, तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी (परंतु शेवटी एकाच ठिकाणी) एकरूप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते.
39-3
का पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहता । मग सिंधूमिळणी ऐक्यता । पावती शेखी ॥39॥
किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्या दिसतात, मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात;
40-3
तैसी दोनी ये मते । सूचिती एका कारणाते । परी उपास्ति ते योग्यते – । आधीन असे ॥40॥
त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्याचे आचरण करणे, करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.
41-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
देखे उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगे नरु केवी तैसा । पावे वेगा ॥41॥
असे पाहा की, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल ? सांग बरे.
42-3
तो हळूहळू ढाळेढाळे । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळे । निश्चित ठाकी ॥42॥
तो मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जात असतो आणि काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो.
43-3
तैसे देख पा विहंगममते । अधिष्ठूनि ज्ञानाते । सांख्य सद्य मोक्षाते । आकळिती ॥43॥
पाहा. (वरील दृष्टांतातील पक्षाप्रमाणे) त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाचे जे वाटचाल करतात, ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात.
44-3
येर योगिये कर्माधारे । विहितेचि निजाचारे । पूर्णता अवसरे । पावते होती ॥44॥
दुसरे जे कर्मयोगी आहेत, ते कार्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचारच करून, काही काळाने मोक्षाला प्राप्त होतात.
45-3
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥3. 4॥
भावार्थ :-
मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही. तसेच, प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर- साक्षात्काररूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही.
वाचोनि कर्मारंभ उचित । न करिताचि सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥45॥
कर्माचा आरंभ केल्याशिवाय, योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषांप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही.
46-3
का प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे । हे अर्जुना वाया बोलिजे । मूर्खपणे ॥46॥
अर्जुना ! (अधिकारानुसार आपल्या भागाला आलेले) विहित कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे व्यर्थ व मूर्खपणाचे आहे.
47-3
सांगे पैलतीरा जावे । ऐसे व्यसन का जेथ पावे । तेथ नावेते त्यजावे । घडे केवी ॥47॥
पूर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर कसे जावे, असे संकट जेंव्हा निर्माण होते, तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल ? सांग बरे.
48-3
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । की सिद्धुही न सेविजे । केवी सांगे ॥48॥
अथवा, जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल ? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल ? सांग बरे.
49-3
जव निरार्तता नाही । तव व्यापारु असे पाही । मग संतुष्टीचा ठायी । कुंठे सहजे ॥49॥
जोपर्यंत निरिच्छ अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म केले पाहिजे. असे समज. एकदा का आत्मसंतुष्ठ अवस्था प्राप्त झाली, की कर्म सहजच थांबले जाते.
50-3
म्हणोनि आइके पार्था । जया नैष्कर्म्यपदी आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥50॥
म्हणून हे अर्जुना ! ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र अशी इच्छा आहे, त्याने आपली आपली उचित विहित कर्माचा त्याग करणे योग्य होणार नाही.
दिवस २८ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२५ ते ३३६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 325.
कोणते कारण राहिले यामुळे । जे म्या तुज बळे कष्टवावे ॥१॥
नाही जात जीव होत नाही हानी । सहज ते मनी आठवले ॥धृपद॥
नाही काही चिंता मरतो उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥२॥
हे तो तुज कळो येतसे अंतरी । लापणीक वरी साच भाव ॥३॥
तुका म्हणे देवा नासिवंतासाठी । पायांसवे तुटी करिती तुझ्या ॥४॥
अर्थ
माझे असे कोणते काम अडले होते म्हणून मी तुला मुद्दाम बोलावून घेईन तुला कष्ट देईन. माझा काय जीव जाणार नव्हता किंवा माझ्यावर काही प्रसंग ओढावला नव्हता पण मला सहजच तुझे स्मरण झाले त्यामुळे मी तुला आठविले. देवा मला कसलीही चिंता नाही किंवा मी उपवासी आहे असे नाही मला अन्नधान्य किंवा गायी म्हैसी असावे असेही वाटत नाही. महाराज म्हणतात देवा माझ्या अंतरंगात खरा भाव आहे की खोटा भाव आहे याचे तुला चांगलेच ज्ञान आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा हे माणसे तुम्हाला नाशिवंत पदार्थासाठी बोलावितात व तुमच्या पायाचे स्मरण न करून नुसकान करून घेतात.
अभंग क्र. 326
आमिषाचिये आशा गळ गिळी मासा । फुटोनिया घसा मरण पावे ॥१॥
मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळी ॥२॥
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा । तुका म्हणे सुखा पार नाही ॥३॥
अर्थ
मासे पकडण्याचे जे सामुग्री असते त्याच्या टोकाला मासे पकडण्यासाठी माशाला आमिष म्हणून लावलेले असते मग मासा त्या आमिषाला बळी पडून तो गळ तोंडात पकडतो व घसा फुटून मरण पावतो. मग मरणाच्या वेळी तो तळमळ करतो व त्या वेळी त्या कृपाळू देवाचे स्मरण करतो. तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी मरणाच्या वेळेस जो देवाचे नामस्मरण करतो त्याच्या सुखाला पारावर नाही कारण तो वैकुंठाला जातो.
अभंग क्र. 327
तुजवरी ज्याचे मन । दर्शन दे त्याचे ॥१॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥धृपद॥
अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळा रोखिले ॥२॥
तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावी देवा ॥३॥
अर्थ
हे हरी तुझ्यावर जे आसक्त आहेत ज्यांचे तुझ्यावर प्रेम आहे त्या भक्तांचे दर्शन मला घडू दे. त्यांची जाती व त्यांचा भाव हे किती शुद्ध आहे हे सांगण्याची गरज नाही कारण त्यांच्या हाताला पायांना व सर्वांगाला तुझ्या भक्ती वाचून दुसरा व्यापारच नाही. त्या भक्ताने त्याच्या सर्व इंद्रियांचा मेळा करून त्याचे डोळे फक्त तुझ्या स्वरूपावरच रोखले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुझ्या आड लपेल आणि ते भक्त आले की मला त्या भक्तांचे दर्शन घडू दे एवढे माझे कोड तू पूर्ण कर.
अभंग क्र. 328
विश्वव्यापी माया । तिणे झाकुळिले छाया ॥१॥
सत्य गेले भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥धृपद॥
आपुलेचि मन । करवी आपणा बंधन ॥२॥
तुका म्हणे देवा । तुम्ही कोडी ही उगवा ॥३॥
अर्थ
देहाची छाया प्रमाणे ब्रह्मा ची माया तिने सर्व विश्व व्यापले आहे व सत्य हे ब्रम्ह आहे हे त्याने झाकले आहे. म्हणूनच तर सत्य हे भोळ्या वर गेले आहे म्हणजे या विश्वात सत्याला विसरून सर्व अविद्येकडे जात आहेत म्हणजे सत्याला विसरून या जगात अविद्येची थोरी आहे. मायेत गुंतलेले आपले मन हे आपल्यालाच बंधनकारक ठरते. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्हीच या मायेचा गुंता म्हणजे कोडे तुम्हीच सोडवा.
अभंग क्र. 329
पोटी जन्मती रोग । तरि का म्हणावे आप्तवर्ग ॥१॥
रानी वसती औषधी । तरि का म्हणाव्या निपराधी ॥२॥
तैसे शरीराचे नाते । तुका म्हणे सर्व आप्ते ॥३॥
अर्थ
आपल्या पासून अनेक रोगांची उत्पत्ती होते मग त्या रोगांना आप्त म्हणवे का म्हणजे आपले म्हणावे का ? रानामध्ये अनेक प्रकारच्या औषधी असतात मग त्यांना निरपराधी म्हणावे काय. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्या शरीराचे ज्यांच्याशी हितकारक संबंध असते ते सर्व आपले आप्त असतात आपले असतात.
अभंग क्र. 330
नव्हे शब्द एक देशी । सांडी गिवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥धृपद॥
मोकलिले जावे बाणे । भाता जेणे वाहिला ॥२॥
आता येथे कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥
अर्थ
माझे शब्द म्हणजे कोण्या एका मताचे खंडन किंवा मंडन करणारे नाहीत किंवा अर्थ सांगणारे नाहीत. माझी वैखरी वाणी म्हणजे विश्वव्यापक परमात्मा त्याच्याप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे भात्याने बाणाला बरेच दिवस राखलेले असते परंतु बाण त्याला सोडून धनुष्याला धरून बाहेर सुटतो त्याप्रमाणे माझी वाणी या परमात्म्याच्या आधारावर जगत असते व ते या परमात्मा वाचून अन्य कोठेही मोकाटपणे जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता येथे मी बोलत नसून माझ्या प्रत्येक शब्दावर माझ्या स्वामीचा म्हणजे या विठ्ठल परमात्मा चा शिक्का आहे.
अभंग क्र. 332
माप म्हणे मी मविते । भरी धणी ठेवी रिते ॥१॥
देवा अभिमान नको । माझे ठायी देऊ सको ॥धृपद॥
देशी चाले सिका । रिते कोण लेखी रंका ॥२॥
हाती सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥
अर्थ
माप म्हणते मी धान्य मोजतो त्यामुळे मी श्रेष्ठ आहे पण त्याचा जो धनी आहे मालक आहे तो त्यामध्ये धान्य ओततो एरवी त्याला रिकामेच ठेवतो. देवा माझ्या ठिकाणी असा अभिमान निर्माण होऊ देऊ नका. देशांमध्ये जो सत्ताधारी राजा असतो त्याच्याच शिक्क्याला महत्त्व असते त्याच्याशिवाय दुसऱ्या कशालाही महत्त्व नसते. तुकाराम महाराज म्हणतात या जगात खऱ्या सत्तेचे सूत्र ज्याच्या हातात असते त्याचीच थोरी या जगामध्ये असते.
अभंग क्र. 333
कोण सांगायास । गेले होते देशोदेश ॥१॥
जाले वार्या हाती माप । समर्थ तो माझा बाप ॥धृपद॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥२॥
तुका म्हणे या निश्चये । माझे निरसले भय ॥३॥
अर्थ
देवाचा महिमा सांगण्यासाठी कोणी देशोदेशी फिरले होते काय ? पण माझा बाप हा पांडुरंग हा समर्थ आहे कि त्याची कीर्ति चे माप वाऱ्या हाती झाले आहे वाऱ्याच्या सरशी त्याचे अलौकिक सामर्थ्य सर्व जगात पसरलेले आहे. या जगामध्ये अशी कोणाची सत्ता आहे तर या परमात्म्यचीच ही सत्ता आहे त्याच्या सत्तेने सर्वजण बोलतात सर्वाना प्रेरणा मिळते. तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये विठ्ठलाचीच सर्व सत्ता आहे असा माझा दृढ निश्चय झाला असून त्या कारणामुळे मला कसलेही भय राहिले नाही.
अभंग क्र. 334
सकळीच्या पाया माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरे पारखुन बांधा गाठी ॥धृपद॥
फोडिले भांडार धन्याचा हा माल । तेथे मी हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहू देशी । उतरला कसी खरा माल ॥३॥
अर्थ
सर्वाच्या चरणी मी मस्तक ठेवून अशी विनंती करीत आहे, जे कोणी श्रोता असेल किंवा वक्ता असेल या सर्वानी जे काही खरे आहे हे पारखुन त्याचा स्वीकार करा. नामसंकीर्तन धान्याचा भांडार मी फोडला आहे याचा मालक म्हणजे तो विठ्ठल परमात्मा आहे मी फक्त तो माल वाहण्याचे हमाली करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या नामरूपी मालाचे सामर्थ्य सगळीकडे पसरले आहे संतांच्या पारखीने तो माल खऱ्या कसाला उतरला आहे.
अभंग क्र. 335
कोण त्याचा पार पावला धुंडिता । पुढे विचारिता विश्वंभरा ॥१॥
अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाही । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥धृपद॥
फळात कीटक येवढे आकाश । ऐसी तरुवरास अनेक किती ॥२॥
दाविले अनंते अर्जुनासि पोटी । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥
तुका म्हणे लागा संताचिये कासे । ठाव घेता कैसे वाचा जीवे ॥४॥
अर्थ
या विश्वंभरा चा कोणी कितीही विचार केला किंवा त्याच्यावर कोणी कितीही आभ्यास केला तरी त्याचा शेवट कोणालाही लागलेला नाही. तो परमात्मा अणु रेणू पेक्षा हि सूक्ष्म आहे आणि स्थूल पदार्थापेक्षा ही अतिस्थूल आहे व वेदही त्याविषयी विचार करून शेवटी त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणू लागले. एका फळात अनेक कीटके असतात त्यांच्यासाठी त्या फळा येवढेच त्यांचे आकाश असते असे फळ एका झाडाला किती असतात असे झाड या भूतलावर किती असतात ? या अनंताने आपल्या उदरात अर्जुनाला अनेक गोष्ट अनेक सृष्टी अनेक कृष्ण अनेक लोक दाखविले. तुकाराम महाराज म्हणतात याकरिता तुम्ही संतांची कास धरा तसे न करता तुम्ही जर अनंताचा शोध घेण्यास निघाल तर तुमचा जीव कसा वाचेल त्यामुळे संतांची कास धरून तुम्ही परमात्म्याचा शोध करा म्हणजे तुम्हीही परमात्मरूप व्हाल.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















